शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

माणसापरास मेंढरं..?



माणसापरास मेंढरं..?
दाभोलकर, बाळूमामाची मेंढरं, ईश्वरी अवतार, आव्हान
बाळूमामाची मेंढरं हा प्रकार सातारा जिल्ह्यात गेली तीन महिने धुमाकूळ घालत आहे. याबाबतची कल्पना लोकांच्याकडून येणाऱ्या पत्रांतून, वृत्तपत्रांतून थोड्याबहुत प्रमाणात येत होती. मेंढराला नवस करायला लोक, हजारोंच्या संख्येंने गर्दी करतात व मेंढरांच्या कानात आपली इच्छा सांगितल्यास इच्छापूर्ती होते असे मानतात, हे ऐकून वेदना होतच होती. परंतु......! काय करावे याचाही फारसा अंदाज येत नव्हता. ९ मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शरद पवार सातारला येणार होते. त्यांना उद्देशून मी एक अनावृत्त पत्र वृत्तपत्रास लिहिले. बाळूमामाची मेंढरं हा मुद्दा मध्यवर्ती करून पत्रात असे लिहिले होते की, अशा बाबतीत लढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कितीशी पुरी पडणार? रयत शिक्षण संस्थेसारख्या हजारो शिक्षक व लाखो विद्यार्थी असलेल्या शिक्षण संस्थेने अशा बाबतीत जाहीर स्पष्ट भूमिका घ्यावयास हवी. सातारा जिल्ह्यात खेडोपाडी पोचलेल्या रयत शिक्षण संस्थेने जर बाळूमामांच्या मेंढरांबद्दलची अंधश्रद्धा शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना, पालकांना, ग्रामस्थांना समजावून दिली तरच या अंधश्रद्धांचा काहीतरी प्रतिकार होऊ शकेल; पण काही घडले नाही.
बाळूमामाची मेंढरं हा प्रकार चक्रावून टाकणारा आहे. १८९२ मध्ये बेळगाव जिल्ह्यात जन्माला आलेल्या बाळूमामाने १९६६ साली कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालु्क्यात म्हणे समाधी घेतली! ते काट्यावर झोपत, सांकेतिक भाषा बोलत, लोक त्यांना खुळा समजत. परंतु लग्न झालेल्या बाळूमामाने संसार केला, तो मात्र मेंढ्या राखत उघड्या आभाळाखाली. दुसऱ्याची चाकरी करायला नको म्हणून आपला करदोरा विकून त्यांनी पाच मेंढरं घेतली. आता त्याचीच हजारो मेंढरं झाली आहेत. या मेंढरांचा खेळ आता अनेक वर्षे चालू आहे. त्यांचे दहा कळप झाले आहेत. प्रत्येक कळपात तीन ते चार हजार मेंढरे असतात. अगदी धष्टपुष्ट, गुबगुबीत. आधी एखादं गाव या मेंढरांच्या कळपाला आमंत्रण देते आणि मग बघता-बघता आजूबाजूची २५-५० गावं या मेंढरांना निमंत्रण देतात. रोज संध्याकाळी काही शेतकरी तरी येतातच आणि दुसऱ्या दिवशी मेंढरं आपल्या शेतात चरायला आणावीत, अशी गळ घालतात, असे बाळूमामाचे भक्तगण सांगतात.
हे सारे यासाठी की, बाळूमामा आणि त्यांच्या मेंढरांना लोक जणू ईश्वरी अवतार मानतात. ही मेंढरं शेतात बसून गेली की, शेताचं भाग्य फळफळतं, अशी त्यांची अंधश्रद्धा आहे. क्रमश: पुढील गावे, तालुके, जिल्हे येथून या दैवी मेंढरांना निमंत्रणे देतात आणि सिलसिला चालू राहतो. बाळूमामाची ही मेंढरं लोकांच्या शेतात चरायला जातातच; परंतु फुकटच्या चरण्याबरोबर वरकमाई देखील मिळवून आणतात. या कमाईतूनच भुदरगड तालु्क्यातील आदमापूर येथे दीड कोटी रुपयांचा बाळूमामा देवालय ट्रस्ट उभा करण्यात आला आहे. मेंढरांची संख्या अतिरिक्त झाली की, त्यांची विक्रीही करण्यात येते. मागच्या वर्षी मेंढराच्या ताफ्यातील सत्तावीस लाख रुपयांची नर मेंढरं विकण्यात आली. कुठलाही व्यवहार करायच्या आधी बाळूमामाच्या आजोळी असलेल्या त्याच्या प्रतिमेचा कौल घेतला जातो. बाळूमामाने उजवा कौल दिल्याशिवाय कुठलाही व्यवहार होत नाही. एवढे कमी म्हणून की काय, मेंढ्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी रोज जे सात-आठशे लोक बाळूमामाच्या आरतीला असतात, त्या सर्वांना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते. हे धान्य रोज देणगीतूनच जमा होते.
वरील सर्व पार्श्वभूमीवर सातारा शहर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी आला. सातारा शहराच्या जवळच असलेल्या सोनगाव, माजगाव या गावी मेंढरे आल्याने त्याबाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे ठरले. यासाठी सातारा शाखेच्या कार्यकर्त्यांनी बरेच परिश्रम घेतले. दि. ९, १०, ११ जून रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, फोटो घेण्यासाठी प्रशांत पोतदार, किशोर ओंबळे, व. म. करडे, अमिन सय्यद, सचिन मोरे, दशरथ रंधवे, सुनील रंधवे, आनंद माने, अनमोल गाडेकर हे कार्यकर्ते गेले होते. ११ आणि १२ जूनला व्हिडीओ शूटिंगदेखील घेतले गेले. ही सर्व पाहणी करताना फोटो घेणारे अथवा व्हिडीओ शूटिंग करणारे स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत होते. बाकीचे सर्व कार्यकर्ते बघ्या भाविकांच्या भूमिकेत फिरत होते. भेट दिलेल्या कळपात चार ते साडेचार हजार मेंढरं, बकऱ्या, शेळ्या होत्या. सोबत १० ते १५ लोकांचा सर्व संयोजन करणारा ताफा होता. बाळूमामाच्या समाधीची चांदीची दीड फुटी प्रतिकृती या ताफ्याबरोबर होती. मंडप घालून त्यामध्ये पलंग, त्यावर गादी आणि त्या गादीवर समाधी विराजमान झालेली. दर दोन दिवसांनी नव्या ठिकाणी जाताना यामध्ये वेळ वाया जाऊ नये म्हणून भक्तांची एक टीम पुढे रवाना होत असे व सर्व जय्यत तयारी करून ठेवत असे. बाळूमामाच्या समाधीच्या बाजूने बांबूचे कडे करून प्रदक्षिणेचा मार्ग आखून दिला होता. दर्शन सोहळा सुरू असे. प्रत्येकाला भंडारा लावत. सकाळी ९ व रात्री ९ वाजता आरतीचा कार्यक्रम होई आणि त्यानंतर उपस्थित सर्वांना प्रसादाचे भोजनही दिले जाई. आरतीच्या पूर्वी रुग्णांचे अनुभवकथन होई. मेंढरांच्या सान्निध्याने, बाळूमामाच्या समाधीचे दर्शन घेऊन किंवा आजार गंभीरच असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे तीन किंवा पाच वाऱ्या करून आपले आजार कसे बरे झाले, हे लोक सांगत असत. त्या सर्व बाबी दैवी चमत्काराच्या होत्या. उदा. - कॅन्सर, अर्धांगवायू, आंधळे, मुके बहिरेपण. अशा जवळपास अशक्यप्राय व्याधींनी ग्रस्त असलेली माणसे, बाळूमामाच्या मेंढरांनी आपल्या जीवनात कसा चमत्कार घडला, याचे वर्णन रसभरीत करत. आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मेंढरांना नवस करा, मेंढरांची ओटी भरा असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून वारंवार केले जाई आणि खणा-नारळाने मेंढरांची ओटी भरण्यासाठी माणसांची रांग लागलेली असे. याबरोबरच आणखी दोन बाबी कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे भाविक मेंढरांना आपल्या शेतात बोलवतात, हे अर्धसत्य आहे. पूर्णसत्य हे आहे की, दैवी (!) वरदान लाभलेली ही मेंढरं बिनदिक्कतपणे कोणाच्याही शेतात घुसतात आणि शेतातील उभ्या पिकांचे नुकसान संबंधित शेतकरी तोंड दाबून बु्क्क्यांचा मार म्हणून सहन करतात. चमत्काराचे वलय वाढवण्यासाठी ताफ्यातील बोकड अमावस्या, पौर्णिमेला दूध देतो हा प्रचारही पद्धतशीरपणे केला जात आहे. शहर शाखेच्या बैठकीत कार्यवाहीची दिशा ठरली. एक म्हणजे जनजागृतीसाठी धरणे धरणे, दुसरे म्हणजे बोकड दूध देतो याला ११ लाख रुपयांचे चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान देणे आणि तिसरे म्हणजे दैवी प्रचारांचा उपचार व बोगस डॉक्टर या दोन कायद्यान्वये संबंधितांच्यावर कारवाई करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करणे. ता. १४ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे धरणे. जिल्ह्यात ३७ (अ) कलम सुरू आहे आणि त्यामुळे फक्त चारजणांनाच एकावेळी धरण्याच्या जागी थांबता येईल, असे पोलिसी खाक्यात सांगण्यात आले. सनदशीर मार्गाने; पण निर्धाराने चळवळ चालवण्याच्या समितीच्या शिरस्त्यानुसार ही अट पाळून देखील धरण्याचा कार्यक्रम पार पडला. धरण्याच्या जागी मागच्या बाजूस विचार करावयास लावणारा एक फलक लावला होता. ‘सातारा जिल्हा कोणत्या दिशेने?’ असा प्रश्न विचारणाऱ्या या फलकावर एका बाजूला कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील ही परंपरा होती आणि बाणाच्या दुसऱ्या दिशेला बाळूमामांच्या मेंढरांचा कळप होता. समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुबराव पाटील यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी ‘अंनिस’चा विचार मानणारे आहेत. मात्र त्यांना हा सर्व प्रकार गंभीरपणापेक्षा गमतीचा वाटला. बोगस अहवाल मागवण्यासाठी त्यांनी जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना ते निवेदन शेरा मारून पाठवले.
पुढे जवळपास आठवडा गेला. कार्यवाही काहीच झाली नाही. सातारा तालु्क्यातील पाडळी येथील बाळूमामाचे भक्त असलेले ग्रामस्थ शाखेच्या कार्यालयात आले आणि बोकडाचे दूध काढण्याचे आव्हान आम्ही स्वीकारत आहोत, असे पत्र देऊन गेले. आव्हान स्वीकारल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे आली आणि बोकडाचे दूध काढत असतानाचे काही फोटोही प्रसिद्ध झाले. जिल्ह्यातील उत्सुकता ताणली गेली. समितीच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त एस. बी. कोळी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व पशू महाविद्यालयांच्या मिळून बनलेल्या नागपूर येथील पशुविज्ञान विद्यापीठाचे प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एल. देवपूरकर यांच्याशी थेट फोनने संपर्क करून दिला. देवपूरकर यांनी, बोकडाने दूध देणे यामागचे विज्ञान स्पष्ट केले. ते थोडक्यात असे -

इस्ट्रोजीन या हार्मोनचा प्रभाव गर्भधारणेनंतर मादीच्या शरीरात वाढल्याने दुधाची निर्मिती होते. नराच्या शरीरात याचे प्रमाण अतिशय कमी असते. मात्र इस्ट्रोजीनचे इंजेक्शन नराला दिल्यास काही नरांच्यात या हार्मोनचे प्रमाण वाढून अतिशय कमी प्रमाणात त्यांना दूध येऊ शकते. प्रायोगिकरित्या कुत्र्यावर, बैलावर ही गोष्ट देशात, विदेशात सिद्ध झाली असून त्याचे रेकॉर्डही उपलब्ध आहे. भाकड गायींनाही या इंजेक्शनने दूध आणता येते. स्वीट क्लोव्हर नावाच्या गवतात वनस्पतिजन्य फायटोइस्ट्रॉनअसते. सतत वेगवेगळ्या ठिकाणी चरणाऱ्या शेळ्या, मेंढ्या यासारख्या प्राण्यातील नराने म्हणजेच बोकडाने हे गवत सातत्याने मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास त्याच्या शरीरात इस्ट्रोजीनचे प्रमाण काहीसे वाढते व काही बोकडात अतिशय कमी प्रमाणात दूध तयार होते. बोकडाला दूध येणे ही गोष्ट विज्ञानाला माहीत असून ज्याच्या शरीरात संबंधित हार्मोन्स गेले आहेत वा टोचले गेले आहेत, त्या नराच्या बाबतीत यामध्ये कसलाही चमत्कार नाही; परंतु ज्या नराच्या शरीरात गवताद्वारे वा इंजेक्शनद्वारे इस्ट्रोजीन हार्मोन गेलेलाच नाही, त्याला दूध येणे कदापि शक्य नाही आणि तसे झाले तर तो चमत्कार मानावा लागेल. डॉ. देवपूरकर यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांकही दिला आणि याबाबत समितीच्या सोबत आनंदाने असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांची उमेद व उत्साह वाढला. यानंतर ताबडतोब १८ जूनला सातारा समितीने आव्हानप्रक्रिया जाहीर केली. ती थोडक्यात अशी -
सातारा येथील समितीच्या कार्यालयात सकाळी ९ ते १० वाजता समिती दोन बोकडे हजर ठेवेल. ११ लाख रुपयांच्या मूळ पावत्या पत्रकारांना दाखवेल. आव्हानप्रक्रियेच्या नियमाप्रमाणे संबंधितांनी ११ हजार रुपये अनामत ठेवणे आवश्यक आहे. ९ ते १० या एक तासात हे शक्य न झाल्यास (वा झाल्यास) दोन्ही बाजूंना पुढील आठ दिवसांत आणखी एक संधी देण्यात येईल. म्हणजे नंतर तक्रारीला कोणालाच वाव राहणार नाही. बोकडाचे दूध काढण्याचा चमत्कार सिद्ध झाल्यास ११ हजार अनामत रकमेसह ११ लाख रुपये संबंधितांना देण्यात येतील. चमत्कार सिद्ध न झाल्यास ते ११ हजार रुपये समितीकडे जमा होतील. हे आव्हान बाळूमामांची मेंढरं या ट्रस्टने न स्वीकारल्यास हा सर्व प्रकार बुवाबाजी आहे, असे सिद्ध होईल. त्यानंतर शासनाने लोकांची फसवणूक, पिकांची नासाडी, धर्मादाय ट्रस्टचा गैरवापर यासाठी कारवाई करावी, असा ‘अंनिस’चा आग्रह राहील. हे आव्हान संबंधित देवस्थानच्या ट्रस्टने अधिकृतपणे पार पाडावयाचे आहे.
आव्हानाला स्वाभाविकच व्यापक प्रसिद्धी मिळाली. समितीच्या कार्यकर्त्यांनी आदल्या दिवशी दोन बोकडे पैदा केली. त्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेतली आणि संस्थेच्या कार्यालयात ती रात्रभर बांधून ठेवली. सकाळी ९ वाजता लोकांचे थवे उत्सुकतेने आव्हानस्थळी लोटू लागले. जिल्ह्यातून कुतुहलाने; विशेषत: ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष आले होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अर्थातच हजर होतेच. वातावरणात ताण जाणवत होता. प्रत्यक्ष आव्हानस्थळी गोंधळ टाळण्यासाठी प्रवेश नियंत्रित केला होता. ‘अंनिस’चे कार्यकर्ते, पत्रकार, गावातील काही मान्यवर आणि अर्थातच दोन बोकडे हजर होती. जसजसा वेळ उलटत चालला तसतशी लोकांची उत्सुकता ताणली गेली. एक तास संपला, आणखी अर्धा तास गेला. परंतु बाळूमामाच्याकडून कोणी म्हणजे कोणी आलेच नाहीत. मग बाहेर जमलेल्या सर्व जनसमुदायाला आव्हानस्थळी बोलवण्यात आले. आव्हानप्रक्रियेमागील विचारधारा त्यांना समजावून सांगितली. बाळूमामाच्या मेंढरांची भक्ती ही अंधश्रद्धाच आहे. परंतु ज्यांना ती करावयाची असेल, त्यांना भारतीय घटनेनुसार आम्ही आड येत नाही. परंतु या भक्तीला दैवी चमत्काराची जोड देऊन फसवणूक सुरू झाल्याने समितीने आव्हान दिले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. बाळूमामाच्या मेंढरांना समितीचे हे आव्हान कायमस्वरुपी आहे आणि पुरेशा पूर्वसूचनेने ही आव्हानप्रक्रिया आम्ही केव्हाही पार पाडू, असे दाभोलकर यांनी जाहीर केले. ११ लाख रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्याही त्यांनी पत्रकारांना दाखवल्या.
आव्हानप्रकिया संपली. परंतु फसवणूक करणाऱ्यांना मात्र प्रत्यक्षात कोणत्याच कारवाईला सामोरे जावे लागले नाही. समितीकडे असलेली चित्रफीत, बाळूमामाच्या समाधीशेजारी भाषणांची ध्वनिफीत, वृत्तपत्रांतील चमत्कारांच्या बातम्या या सर्वांमुळे द ड्रग्ज अ‍ॅन्ड मॅजिक रेमेडिज ऑब्जेक्शनेबल अ‍ॅडव्हरटाईजमेंट अ‍ॅक्ट १९५४ या दखलपात्र असलेल्या कायद्याप्रमाणे कारवाई होऊ शकते, असे समितीला वाटत होते. यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीसप्रमुख चंद्रकांत कुंभार यांची भेट घेतली. त्यांनी समितीला तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला याबाबत त्वरित कारवाई करण्याचे तोंडी व लेखी आदेश दिले. यानंतर समितीचा पूर्णवेळ कार्यकर्ता प्रशांत पोतदार यांनी तक्रार दाखल केली. त्यासाठी त्यांना दोन-तीन दिवस हेलपाटे पडले. वेळ गेला; पण तक्रार योग्यप्रकारे दाखल झाली. प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या अन्य कार्यकर्त्यांचे जाबजबाब झाले. त्यानंतर पोलिसांनी त्वरेने हालचाल केली आणि बाळूमामाच्या मेंढरांचे कळप चालक संभाजी माने व अन्य १५ जण यांच्यावर दैवी शक्तीच्या आधारे बोकड दूध देतो, असाध्य रोग बरे होतात, असे ध्वनिक्षेपकाद्वारे व स्थानिक वृत्तपत्रांत बातमी, जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल केली म्हणून खटला दाखल झाला. नंतर जामिनावर आरोपींची सुटका झाली.
उभ्या पिकांत मेंढरे घालून पिकाची वाट लावणाऱ्या या प्रकाराविरोधात तक्रार करण्यास संबंधितांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन समितीने वारंवार केले. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. तीन लोकांनी लेखी निवेदने दिली. आणखी चारजणांनी फोनवर तक्रार नोंदवली. या नुकसानीबाबत स्थानिक पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेत नाही, अशीही तक्रार समितीकडे आली. नैसर्गिक कोपामुळे झालेल्या नुकसानीला शासन नुकसानभरपाई देते, तर बाळूमामाची मेंढरे या दैवीकोपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने स्वत: करावी वा संबंधितांच्याकडून करून द्यावी’, असा आग्रह समिती कलेक्टर व जिल्हाधिकारी यांच्याकडे धरणार होती; मात्र लोकांच्या अपुऱ्या प्रतिसादामुळे हे घडू शकले नाही. मानसिक गुलामगिरीची बेडी किती घट्ट आहे, याचेच यातून दर्शन घडले. २१ व्या शतकात समाजसुधारकांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यात इतक्या सहजपणे हे सगळे घडावे आणि घडत राहावे, यावर अधिक भाष्याची गरज आहे काय?
बाळूमामांच्या मेंढरांनी पिके खाल्ल्याने लोक संतप्त
बाळूमामांच्या मेंढरांनी वासुंबे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील पिके खाल्ल्याने शेतकऱ्यांचे जवळपास अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मेंढरे अडवून ठेवली. तक्रार देण्यासाठी थेट पोलीस ठाणे गाठले. बाळूमामा ट्रस्टचे पदाधिकारी आल्यानंतर मेंढरे सोडण्यात आली. पिकांचे नुकसान केल्याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद नाही.
वासुंबे येथे आदमापूर (जि. कोल्हापूर) येथील संत बाळूमामांच्या सहा हजार मेंढ्यांचा कळप बुधवारी (ता. ६) सकाळी येथे आला. येथे आल्यानंतर तीन दिवस त्याने परिसरातील द्राक्षबागा, सोयाबीन, हळद यासारख्या पिकांबरोबरच इतर खरीप पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय मेंढरे न सोडण्याचा पवित्रा घेतला. बाळूमामा ट्रस्ट, भक्तगण व शेतकऱ्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण संतप्त बनले होते. नुकसानभरपाईवरून चर्चा सुरूच होती. शेवटी ट्रस्टने नुकसानभरपाई देण्याचे तोंडी मान्य केले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

 (ऑगस्ट २००५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...