गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

निळूभाऊ फुले : मोठा कलावंत, महान माणूस



निळूभाऊ फुले : मोठा कलावंत, महान माणूस
दाभोलकर, निळू फुले, मृत्युलेख, अनुभव

निळूभाऊंचा आणि माझा पहिला संपर्क आला तो प्रसंग मला लख्खपणे आठवतो. १९८१ साली लक्ष्मण मानेंच्या उपरा या आत्मकथनाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यावेळी मानेंचा सत्कार सातारा येथे गांधी मैदानावर जाहीरपणे करण्याचे आम्ही मित्रांनी ठरवले. एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे प्रमुख पाहुणा तसाच तोलामोलाचा हवा. मी पुण्याला येऊन अनिल अवचट यांच्याबरोबर निळूभाऊंच्या घरी गेलो. ती त्यांची व माझी पहिलीच भेट. प्रचंड जनसमुदायाला संबोधित करत असलेले डॉ. राममनोहर लोहिया यांचा फोटो त्यांच्या दिवाणखान्यात ठळकपणे लावला होता. तो मला आजही स्पष्टपणे आठवतो. कसलेही आढेवेढे न घेता निळूभाऊ येतो म्हणाले आणि ठरलेल्या वेळी माझ्या घरी दाखल झाले. कार्यक्रमाची वेळ होत आली होती. एवढ्यात पोलीस अधिकाऱ्यांचा निरोप आला. कसेही करा; पण लवकर निघा. काय झालं? मी विचारले. त्याने उत्तर दिले, ‘गर्दी फार झाली आहे. काबूत ठेवणे अशक्य झाले आहे. निळूभाऊंना घेऊन घरातून खाली उतरलो, तर घराला निळूभाऊंच्या चाहत्यांचा वेढा पडला होता. तेथून वाट काढत आम्ही मैदानावर पोचलो. मैदान तुडुंब भरले होते. प्रास्ताविक कसेबसे उरकले. प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ पत्रकार मुणगेकर. ते बोलायला उभे राहिले असता श्रोतृवर्ग त्यांचा एकही शब्द ऐकून घेण्यास तयार नव्हता. निळूभाऊंच्या नावाचा जयघोष अखंड सुरू होता. मुणगेकरांची स्थिती अवघडल्यासारखी झाली होती. आम्हालाही काय करावे कळेना. निळूभाऊ उठले, ध्वनिक्षेपकाकडे गेले. आपल्या खास आवाजात आर्जवी; पण ठाम शब्दांत त्यांनी जनसमुदायाला बजावले, तुम्हाला मुणगेकरसाहेबांचे भाषण शांतपणे ऐकून घ्यावेच लागेल. निळूभाऊंची ती मात्रा लागू पडली. समुदाय शांत झाला आणि कार्यक्रम उत्तमपणे पार पडला.

१९९० च्या दरम्यान मी निळूभाऊंना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होण्याची विनंती केली. पदे स्वीकारणे हा निळूभाऊंचा पिंड नव्हे. त्यांनी नकार दिला; मात्र त्याचवेळी शब्द दिला की, ‘‘मी तुला दर महिन्यातील दोन दिवस देईन.’’ हा शब्द निळूभाऊंनी फार कसोशीने पाळला. प्रमुख पाहुणे निळूभाऊ आहेत, असे जाहीर झाल्यानंतर त्या कार्यक्रमाला गर्दी जमणे हा प्रश्नच राहत नसे. निळूभाऊंना चळवळीबद्दल मन:पूर्वक आस्था होती. त्यामुळे त्यांनी कधीही मानधन घेतले नाहीच; परंतु कार्यक्रमाच्या वेळी स्वत:ची निवास, प्रवास, भोजनव्यवस्था कशी असावी, याबद्दल कधीही आग्रह धरला नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीला जी मान्यता व लोकप्रियता लाभली, त्यामध्ये निळूभाऊंचा मोठा वाटा आहे. चळवळीचा कोणताही उपक्रम असला की, त्याला निळूभाऊंनी कधीही नकार दिला नाही. बुवाबाजीविरोधाचा लढा असो, देवदासीची जट सोडवणे असो, मुख्यमंत्र्यांना भेटणे असो किंवा कोकणातील शोध भुताचा : शोध मनाचा चळवळ असो, निळूभाऊ कार्यकर्त्यांसारखे वेळेवर येत असत. कोकण दौऱ्यात दापोलीला झालेली निळूभाऊंची सभाही पोलिसांच्या मते शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेपेक्षा मोठी होती. अनेक सभांमध्ये ते अभिमानाने उल्लेख करत की, मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा ढोलकीवाला आहे. रस्त्यावर खेळ सुरू करण्यापूर्वी ढोलकी वाजवली जाते. त्याचा उद्देश एवढाच असतो की, कुतुहलाने लोक जमा व्हावेत. माझ्या चेहऱ्याचा उपयोग या चळवळीचे विचार ऐकण्यासाठी लोक गोळा करायला होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. निळूभाऊ कधीही पाच ते सात मिनिटांच्यावर भाषण करत नसत. तेवढ्या वेळातही एखादा वैचारिक मुद्दा जनसमुदायापर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्याकडे तयार असे. त्यांचे वाचन उत्तम होते. सामाजिक बदल आणि राजकारण यांचे अवलोकन प्रगल्भ होते. उक्ती आणि कृती यामध्ये सुसंगती होती. त्यामुळे त्यांच्या भाषणात मुद्दा असे आणि ते श्रोत्यांना अंतर्मुखही करीत असत; मात्र ते कधीही जास्त बोलत नसत. एकच अपवाद. बार्शीला टोलेजंग सभा भरली होती. आधी माझे भाषण झाले. त्यानंतर ध्वनिक्षेपक व्यवस्था पूर्णत: कोलमडून गेली. श्रोत्यांना भाषण ऐकू गेले नाही. ध्वनिक्षेपक बदलण्यात आले. नंतर रामभाऊ नगरकर बोलले. एकपात्री नाटक सादर करणारे दमदार गडी; पण ध्वनिक्षेपकाने पुन्हा दगा दिला. समुदाय अस्वस्थ होता. निळूभाऊ बोलायला उठले. आमच्या दोघांच्या भाषणाची कसर त्या दिवशी २५ ते ३० मिनिटे बोलत त्यांनी भरून काढली. निळूभाऊंचे मी ऐकलेले ते सर्वांत मोठे भाषण होते.

निळूभाऊ महान कलाकार होते, हे सर्वज्ञात आहे. दिलीप कुमार, नसिरूद्दिन शहा यांना त्यांच्या अभिनयाचे कौतुक होते. डॉ. लागू जगातील उत्तम नटांमध्ये निळूभाऊंची गणना करीत. निळूभाऊंचा चाहता वर्ग महाराष्ट्रात अफाट पसरलेला होता. त्यामुळे काही वेळा त्यांची अवहेलना होईल, असे घडत असे; पण तेही स्थितप्रज्ञ वृत्तीने निळूभाऊ एक शब्दही न उच्चारता सहन करीत असत. एकदा अत्यंत धावपळीचा दौरा असताना रेल्वेत रात्रीच्या वेळी वातानुकूलित दुसऱ्या वर्गाचे आरक्षण मिळाले नाही. साध्या दुसऱ्या वर्गातील एका गैरसोयीचा साईड बर्थ मिळाला. त्या गर्दीच्या डब्यात निळूभाऊंना आम्ही बसवले. तेथील माणसांना वाटले की, हे चित्रपटातील शूटिंग आहे. शांतपणे बर्थवर चढले आणि निद्राधीन झाले. हे फक्त निळूभाऊच करू शकले. निळूभाऊंना व्यवहार पक्का कळत असे. माणसाची उत्तम जाण होती. खरे-खोटे समजत असे. परंतु त्यांच्यातील ऋजुता भिडस्तपणा धारण करीत असे. त्यामुळे अनेकदा निळूभाऊंना वैताग येत असे. हे सर्व ते हसत-हसत सांगत असत. कलाकारांचा आवडता चौथा अंक हा निळूभाऊंनाही प्रिय होता. दौऱ्यावर एकत्र अनेकदा असल्याने थेंबभरही घेत नसून त्या अंकाच्या वेळी मी त्यांच्याबरोबर असे. अशा वेळी निळूभाऊंच्यामध्ये राजकीय कार्यकर्ता आणि कडवा लोहियावादी उफाळून येत असे. पण महत्त्वाचे हे की चौथ्या अंकात एका शब्दानेही त्यांच्या तोंडून स्वत:ची कधी आत्मप्रौढी मी ऐकली नाही. इतर कलाकारांच्या वागण्या-बोलण्याबद्दल त्यांनी कधी ब्र उच्चारला नाही. लाखो रुपये स्वकमाईतून निळूभाऊंनी कार्यकर्त्यांना वाटले; पण त्याचा उच्चार कधी कोणाकडे केला नाही. व्यक्तिमत्त्वाची आणि विचारांची पक्की जडणघडण असल्याशिवाय हे करणे अशक्य आहे.

निळूभाऊंना आपण जीवनात काय करायचे आहे, हे नीटपणे कळले होते. त्यांनी ते जाणले असल्याने मोहात पडणारी कितीतरी निमंत्रणे आली असता त्यांनी त्याकडे सहजपणे पाठ फिरवली. आयुष्यभर समतावादी विचारांशी संगत करत ते जगत राहिले. मस्तीत राहिले, मजेत राहिले. जीवन त्यांना कळले हो या बोरकरांच्या ओळीची सार्थकता म्हणून निळूभाऊंच्या जीवनाकडे बोट दाखविता येईल. निळूभाऊ मोठे कलाकार होतेच; परंतु त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे एक महान माणूस होते.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट २००९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...