रविवार, २० ऑगस्ट, २०१७

प्रभावी कार्याचा स्रोत (भाग 1)



प्रभावी कार्याचा स्रोत (भाग 1)

दाभोलकर, कार्यक्रम, जाहीरनामा, भूमिका

                                              



महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य व संघटन आज ज्या स्वरुपात दिसत आहे, त्याची सुरुवात झाली १९८९ च्या ऑगस्टमध्ये. त्या आधी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत झालेला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे जाहीरनामा परिषद. महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कार्यकर्ते, कायदेपंडित, न्यायमूर्ती, कलाकार, साहित्यिक अशा क्षेत्रातील मान्यवर मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाहीरनामा तयार करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी झाले. येणाऱ्या काही वर्षांत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कृती कार्यक्रम कोणते असावेत व दिशा कोणती असावी, यावर सखोल चर्चा झाली. पुढील कामात हा जाहीरनामा मार्गदर्शक ठरला.



त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे संघटित, बरेचसे शिस्तबद्ध व सूत्रबद्ध कार्य चालू आहे, त्याची सुरुवात वर लिहिल्याप्रमाणे ऑगस्ट १९८९ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत समितीचे कार्य व संघटन एकसंधपणे सतत वाढते आहे.


वैचारिक भूमिका

समिती ही अंधश्रद्धा निर्मूलन करणारी व विवेकवादाचा प्रसार करणारी चळवळ आहे, यात शंकाच नाही. परंतु समितीचे एक वैशिष्ट्य असे की, चळवळीची वैचारिक मांडणी समितीने वेगळी केली आहे. काही जणांना ही भूमिका अपुरी वाटते, काहींना सोयीची वाटते; तर काहींना तात्पुरत्या बचावाची वाटते. या भूमिकेबाबत संघटनांतर्गत सतत चर्चाही चालू असते. परंतु त्यामुळे कार्यात कधी अडचण निर्माण झालेली नाही. चळवळीच्या कसावर आज तरी संघटनेची भूमिका अर्थपूर्ण व परिवर्तनाला उपकारक सिद्ध झाली आहे. या मांडणीचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :

१) देव व धर्म याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती तटस्थ आहे. स्वत:ची देव आणि धर्म कल्पना सोडून चळवळीत दाखल व्हावे, असा आग्रह समिती कधी धरत नाही.
समितीच्या व्यासपीठावरून कोणत्याही देवाच्या वा धर्माच्या बाजूने वा विरोधी प्रचार केला जात नाही. प्रत्येक व्यक्ती याबाबत स्वत:चे मत बाळगून समितीमध्ये कार्यरत असू शकते. मात्र या कल्पनांची चिकित्सा करण्याचे अन्य जणांचे स्वातंत्र्यही त्यांना मान्य असावे लागते. ही भूमिका भारतीय घटनेतील धर्म व उपासना या संदर्भातील भूमिकेशी सुसंगत आहे, असे समितीला वाटते. भारतीय घटनेत नागरिकाला कोणताही धर्म स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. कोणत्याही पद्धतीची उपासना करण्याचे अथवा न करण्याचेही स्वातंत्र्य दिले आहे. याबाबत दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या जाव्यात, असे समितीला वाटते. एक तर भारतीय संविधानाने दिलेले हे धर्म स्वातंत्र्य निरपवाद नाही. कायदा-सुव्यवस्था, सार्वजनिक नीतिमत्ता, राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक आरोग्य याबाबत ज्यावेळी व्यक्तीचे धर्मस्वातंत्र्य प्रश्न निर्माण करेल, तेव्हा तो धर्म मर्यादित करून राष्ट्रीय एकात्मता, नीतिमत्ता याला प्राधान्य द्यावे, ही घटनेतील भूमिका समितीला अतिशय रास्त व उपयुक्त वाटते.


देव या संकल्पनेबाबतदेखील अशीच विविधता व्यक्ती-व्यक्तीतही आढळते. प्रत्येकाच्या लेखी या शब्दाचा अर्थ वेगळा असतो. कोणाला तो विश्वाचा निर्मिक वाटतो, तर कोणाला नियंत्रक वाटतो. आणखी कोणाला तो निर्गुण निराकार वाटतो; तर अन्य जणांना नवसाला पावणारा सगुण साकार. एकाला तो आनंदनिधान वाटतो, तर दुसऱ्याला संकटकालीन आधार. कोणाला त्यामध्ये स्वत:च्या नैतिकतेचा आविष्कार दिसतो. प्रत्येकाचे देवाबद्दलचे आकलन वेगवेगळे असते आणि अनेकदा ते बदलतही असते. तेव्हा देव मानणे वा न मानणे, अशी सरधोपट चर्चा करण्यापेक्षा या कल्पनेलाही त्याची कोणती भूमिका आहे, अशी नेमकी चर्चा करणे समितीला महत्त्वाचे वाटते. याशिवाय देव या कल्पनेची सुरुवात माणसाच्या मनात लहानपणी कशी होते, ते मानसशास्त्रीय सत्यही लक्षात घ्यावयास हवे. मुलाची चिकित्सक बुद्धी तयार होते साधारणपणे पाच वर्षांनंतर. तोपर्यंत बऱ्याच वेळा सांगण्यात आलेल्या गोष्टी जशाच्या तशा स्वीकारल्या जातात. अगदी लहानपणापासून घरात, समाजात, शाळेत देव ही मांगल्याची कल्पना म्हणून रूजवली जाते. जे चांगले ते देवाला आवडते, जे वाईट ते आवडत नाही, असे मुलाच्या मनावर बिंबवले जाते. या संस्कारातून वाढणारी आजच्या समाजातील जवळपास सर्व मुले देव या कल्पनेशी एक वेगळे मानसिक नाते निर्माण करून वाढतात. प्रत्यक्षात वास्तव जगात देवाच्या नावाने भलतेच विपरीत चाललेले त्यांना आढळते. परंतु मानसिक पातळीवर त्यामुळे बदल घडवून येतो, असे नाही. त्यामुळे देवाचे अस्तित्व एकदम नाकारणे, हा माणसाच्या अंतर्मनावर मोठा आघात ठरण्याची शक्यता असते; तेव्हा चिकित्सा करण्याची पद्धत व्यक्तीला शिकवणे आणि त्या आधारे त्याने आपले विचार दुरुस्त करणे, हे समितीला अधिक श्रेयस्कर वाटते, योग्यही वाटते.


श्रद्धा-अंधश्रद्धा

प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते, असे एक मत आहे. श्रद्धा कधीच अंधश्रद्धा नसते, असे आणखी एक मत आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक करावयास हवा आणि तो करता येतो, असेही मत मांडले जाते. या स्वरूपाच्या मतमतांतराच्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की, यापैकी अनेकांच्या मतभिन्नतेचे मूळ आपल्या सोयीप्रमाणे ‘श्रद्धा’ या शब्दाची व्याख्या करण्यात आहे. इतर लोक ज्याला डोळस श्रद्धा म्हणतात, त्याला विश्वास अथवा निष्ठा असा शब्द वापरावा, असा आग्रह असतो. या शब्दच्छलामध्ये समितीला फार रस नाही. अंधश्रद्धा ही उघडपणे माणसाचा मेंदू गहाण टाकणारी बाब आहे आणि ती ओळखणे फार अवघड आहे, असे समितीला वाटत नाही. अर्थात अशा अंधश्रद्धांवरही प्रहार करताना व्यक्तीने क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची भावना ठेवावी, असे समितीला वाटते. माणसाचे व्यक्तिमत्त्व भावना आणि बुद्धी यांच्या संतुलनातून घडलेले असते. व्यक्ती अनेकदा भावनेच्या पोटी निर्णय घेते. तो नंतर बुद्धीच्या आधारे तपासण्याचे धैर्य व शहाणपण जर दाखवले गेले, तर श्रद्धा म्हणजे भावनेचे बुद्धीत परिणीत वा विकसित झालेले रूप ठरते. परंतु त्याला आणखी चार कसोट्या लावाव्या लागतात. पहिली अर्थातच सत्याची. सत्याच्या निकषावर स्वत:ला तपासण्यास जी नकार देते, ती अंधश्रद्धाच असते. दुसरी कसोटी अहिंसेची. आपल्यापेक्षा वेगळ्या श्रद्धा समाजात अस्तित्वात असणारे हे वास्तव सदैव मान्य करावयास हवे. या श्रद्धा प्रसंगी आपल्याला मान्य नसल्या, तरी जोपर्यंत व्यक्ती, समाज व राष्ट्र यांच्याशी विघातक नाहीत, तोपर्यंत त्या श्रद्धा बाळगण्याचा अधिकार व्यक्तीला हवा. हिंसेच्या आधारे कधीही त्या श्रद्धेची मुस्कटदाबी करता कामा नये. तिसरी बाब म्हणजे श्रद्धा अटळपणे माणसाला कृतिशील बनवते किंवा कृती करण्यापासून रोखणाऱ्या भीती आणि मोह या दोन प्रेरणांवर मात करण्यास शिकवते आणि निर्णायक कसोटी म्हणजे माणसाचा मूल्यविवेक जी उन्नत करते, ती श्रद्धा असते आणि जी अवनत करते ती अंधश्रद्धा असते.


समितीच्या कार्याची पंचसूत्री

समितीच्या कार्याचे पहिले सूत्र आहे शोषण, फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांशी संघर्ष करण्याचे. समितीच्या कार्याची नोंद महाराष्ट्रातील जनमानसावर झाली आहे. कारण हे संघर्ष समितीच्या स्थापनेपासून सतत आणि सर्वत्र झडले आहेत. परंतु संघर्ष आवश्यक असले तरी अपुरे आहेत. त्यासाठी लोकांना आणि विशेषत: तरुणांना, विद्यार्थ्यांना, वैज्ञानिक दृष्टिकोन द्यावयास हवा, हे आहे कार्याचे दुसरे सूत्र. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प व त्यामार्फत होणारी विज्ञान जाणीव प्रशिक्षण शिबिरे आणि त्याबरोबरच ग्रामीण भागात चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांसह होणारी व्याख्याने ही सारी या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य तसे अवघड आहे. प्रवाहाविरुद्ध पोहताना कार्यकर्त्यांचा उत्साह सतत टिकवून धरावा लागतो. त्यासाठी नवनवीन उपक्रम कल्पकतेने शोधावे लागतात. समिती यामध्ये आजपर्यंत तरी यशस्वी झाली आहे. ही अखंड उपक्रमशीलता हा समितीच्या कार्याचा तिसरा पैलू. चौथा महत्त्वाचा भाग म्हणजे धार्मिक रूढी, परंपरा, प्रथा यांची कठोर चिकित्सा विधायक वृत्तीने करणे. समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये नीतीचा विचार विवेकवादाच्या आधारे आम्ही निर्माण करू इच्छितो. मात्र धर्माच्या आधारे नीतीचा पाठपुरावा करू इच्छितात, त्याबद्दल समितीला आदरच आहे. या साऱ्याबरोबर समितीचे कार्य हे काही सुटेपणाने करावयाचे समाजपरिवर्तनाचे कार्य आहे, असे समितीला वाटत नाही; तर अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे व्यापक परिवर्तन चळवळीचा एक भाग आहे, असेच समिती मानते. भारतीय घटनेतील लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, राष्ट्रवाद या बाबींवर समितीचा दृढ विश्वास आहे. या मूल्यासाठी कार्यरत असलेल्या संस्था समितीला आपल्या जवळच्या वाटतात. समितीचे कार्य यशस्वी झाले तर ही मूल्ये असणारा समाज लवकर निर्माण होईल आणि मूल्य संस्थापनेसाठी आज होणारे अन्य संघर्ष यशस्वी झाले तर समितीच्या कामाला उठाव मिळेल, असे अन्योन्य नाते आहे.



बुवाबाजीविरोधी संघर्ष

महाराष्ट्रात समितीच्या कार्याचा ठसा उमटला तो ठिकठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने बुवाबाजीविरोधात जो संघर्ष उभा केला त्यामुळे. समितीच्या सुरुवातीच्या काळात ‘बुवाबाजीवर हल्लाबोल’ नावाचे एक महाराष्ट्रव्यापी अभियान समितीने राबविले. महाराष्ट्रातील सुमारे दीडशे कार्यकर्त्यांना बुवाबाजीविरोधाची वैचारिक भूमिका, चमत्कार कसे केले जातात, बुवा, बाबा, महाराज कसा पकडावा, याचे प्रशिक्षण दिले. या अभियानात महाराष्ट्रात बुवाबाजीविरोधात जवळपास दोन हजार व्याख्याने सप्रयोग देण्यात आली. मोठमोठे मेळावे घेण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुले व दिवंगत राम नगरकर यांनी यासाठी बराच वेळ दिला. त्यामुळे या अभियानाचे रूपांतर जनचळवळीत होऊ शकले. गेल्या काही वर्षांत समितीच्या विविध शाखांनी मिळून लहानमोठे अनेक बाबा, बुवा, भगत, मांत्रिक, देवऋर्षी यांना त्यांची जागा दाखवून दिली. त्यांचा लोकांच्या फसवणुकीचा धंदा बंद करायला त्यांना भाग पाडले. माफी लिहून घेतली. अशा मंडळींच्या मनात एक धाक आणि लोकांच्या मनात बाबावर कारवाई होऊ शकते, हा विश्वास चळवळीने निर्माण केला. या लढाईत सर्व पातळीवरील बुवाबाजीचा समावेश आहे. श्री सत्यसाईबाबा हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुवाबाजीचे मोठे प्रस्थ आहे. स्वत:च्या दैवी शक्तीने हवेतून हात फिरवून आपण अनेक गोष्टी निर्माण करतो, असा त्यांचा दावा आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत असा चमत्कार करून रिकाम्या हातातून त्यांनी सोन्याची चेन काढली. प्रत्यक्षात ही शुद्ध बनवेगिरी होती. ही हातचलाखी कशी केली गेली, याची परप्रांतात असलेली चित्रफीत उपलब्ध करून महाराष्ट्रात समितीने ती सर्वत्र दाखवली. यामुळे सत्यसाईबाबांच्या चमत्काराचे सत्यस्वरूप सर्वसामान्यांना समजले. कुंडलिनी जागृत करून त्याद्वारे असंख्य गोष्टींचे दावे करणाऱ्या निर्मलामाता यांनादेखील समितीने खुलेआम आव्हान दिले. तिची तथाकथित कुंडलिनी जागृती ही परसंमोहनाचा वा काही वेळा स्वसंमोहनाचा साधा प्रकार आहे, हे सिद्ध करून दाखवले. जगातील ५० देशात कुंडलिनी जागृत करत फिरणाऱ्या निर्मलामाताजींना असे रोखठोक आव्हान मिळाले ते फक्त महाराष्ट्रातच. यापलिकडे जाऊन स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी हाताळलेली बुवाबाजी संघर्षाची प्रकरणे तर खूपच आहेत. जिवंत विषारी सर्प सदंत खातो, असा दावा करणारा व ‘झी टीव्ही’वर गाजलेला भुसावळचा अन्वर खान याला ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ करून म्हणजेच समोर विषारी नाग उभा करून लेखी माफी मागण्यास समितीने भाग पाडले; तर लातूरला मोठे प्रस्थ बनलेल्या मल्लिनाथ महाराजाला पळता भुई थोडी केली. अशा अनेक रोमहर्षक लढ्यांबाबत समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी वृत्तपत्रात लिखाण केले आहे व आता त्यावर स्वतंत्र पुस्तकेही उपलब्ध आहेत.


चमत्कारांना आव्हान

विज्ञानाचे ज्ञात नियम ओलांडणारे अद्भुत असे काही जगात दैवी शक्तीमुळे नसते. एखादी घटना अनाकलनीय वाटणे शक्य आहे; पण त्याचा शोधही शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे आज ना उद्या लागणार, असा समितीचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे दैवी शक्तीचा आविष्कार म्हणून दाखवण्यात येणाऱ्या तथाकथित चमत्कारांना समितीने नेहमीच आव्हान दिले आहे. विज्ञानाचा नियम ओलांडणारा कोणताही चमत्कार तज्ज्ञांच्या समोर नियंत्रित परिस्थितीत सादर करणाऱ्या व्यक्तीस समितीचे पाच लाख रुपयांचे आव्हान आहे आणि ही रक्कम मुदत ठेवीच्या स्वरुपात समितीने ठेवली आहे लोकवर्गणीतून जमा करून. ही आव्हान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पंतप्रधानांचे माजी ज्येष्ठ वैज्ञानिक सल्लागार डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राम ताकवले, सकाळ पेपर्सचे कार्यकारी संचालक प्रताप पवार, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. श्रीराम लागू व निळू फुले आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व सत्यशोधकी विचारांचे झुंजार कार्यकर्ते प्रा. एन. डी. पाटील यांचा समावेश आहे. चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान स्वीकारल्याची वल्गना काहीजण करतात; परंतु प्रत्यक्षात आव्हानप्रक्रियेच्या रिंगणात मात्र येत नाहीत, असा अनुभव आहे. लोकांच्या मनावर या सर्वांमुळे योग्य त्या विचाराचा ठसा उमटतो आणि तथाकथित चमत्कार व ते दाखवणारा बाबा याबद्दल साशंकता निर्माण होते, असा समितीचा अनुभव आहे. याबरोबरच बाबालोक जे तथाकथित दैवी चमत्कार करतात, ते जागोजागी प्रत्यक्ष सादर करून त्यामागील फसवेपणादेखील समितीचे कार्यकर्ते स्पष्ट करत असतात. महाराष्ट्रात हा विचार सर्वदूर पोचवण्यासाठी समितीने १५ जिल्ह्यांतून एक सत्यशोध यात्रा काढली होती. त्यामध्ये एका वाहनास आकर्षकपणे विज्ञानयानाचा आकार दिला होता आणि त्यावर घोषवाक्य होते, ‘चमत्कार घडवा.... यात्रा अडवा.... पाच लाख मिळवा’ सर्वत्र उत्साहाने या सत्यशोध यात्रेचे स्वागत झाले.


कायद्याची निर्मिती

बुवाबाजीविरोधी लढण्यासाठी सध्या स्वतंत्र असा परिणामकारक कायदा नाही. असा कायदा निर्माण व्हावा, यासाठी समितीचे गेली सात वर्षे प्रयत्न सुरू आहेत. या कायद्याचा मसुदा कमीत कमी वादग्रस्त व जास्तीत जास्त परिणामकारक असावा, अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. त्यासाठी राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक भास्करराव मिसर; तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अशा मान्यवर व्यक्ती व संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत या कायद्याचा प्रस्ताव २७ विरुद्ध ६ मतांनी एक वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. मात्र त्याबाबत पुढील वाटचाल करून प्रत्यक्ष कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने काहीही हालचाल केलेली नाही. समिती याबाबत प्रयत्नशील आहे.



भूत, भानामती, मनाचे आजार

भुताबाबतची भीती मनामध्ये लहानपणापासून बनलेली असते; तर मन म्हणजे काय, याची समज व्यक्तीला मोठेपणीही नसते. ‘भूत’ असते हा लहानपणी झालेला संस्कार विविध स्वरुपाच्या धर्माची निर्मिती आणि मनोरुग्णता यापैकी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भूत या कल्पनेची निर्मिती होते. याबाबतचे प्रबोधन होणे अतिशय गरजेचे आहे. समिती सातत्याने हे प्रबोधन करते. कोकण विभागात या कल्पना अधिक आहेत. यासाठी संपूर्ण कोकणात ‘शोध भुताचा, बोध मनाचा’ अशी एक मोठी मोहीम समितीने राबवली. या मोहिमेत तीन जथ्थे होते. तीनही जथ्थ्यांबरोबर मानसोपचारतज्ज्ञ होते. कोकणात एकूण १७६ जाहीर कार्यक्रम झाले, मानसोपचारतज्ज्ञांच्या मुलाखती झाल्या. ही मोहीम चालू असताना (१ ते १२ डिसेंबर) बाबरी मशीद पाडल्याची घटना घडली; परंतु या कार्यक्रमाचे आकर्षण इतके जबर होते की, तशा वातावरणातही मोहीम पूर्ण यशस्वी झाली. भूत दाखवतो किंवा तुम्हाला भूत लावून दाखवतो, अशी आव्हानेही समितीला देण्यात आली आणि समितीने त्या सर्वांचा यशस्वी प्रतिवाद केला आहे.



नवरात्रात अंगात देवी येण्याचा प्रकार महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. अंगातील हा संचार कधी ढोंगबाजी असते, कधी संमोहन अवस्था; तर कधी प्रासंगिक मनोविघटन. याबाबत देवीचा संचार-संमोहनाचा प्रकार वा मनाचा आजार ही मोहीम महाराष्ट्रभर प्रभावीपणे जनजागृती करणारी ठरली.

भानामतीच्या घटना आपल्या समाजात घडत असल्याचे अधून-मधून सतत कानावर येते. अचानक व आपोआप घरावर दगड पडणे, अन्नात राख वा विष्ठा मिसळली जाणे, कपडे फाटणे वा पेटणे या स्वरुपाच्या घटना वरपांगी कोणताही कार्यकारणभाव न दिसता घडतात. त्यामुळे एक गूढ भीती तयार होते. समिती असे ठामपणे मानते की, जगात आपोआप काही घडत नाही. त्यामुळे भानामतीदेखील घडविली जाते व त्यामागे कोणा ना कोणाचा हात असतो. ही भानामती कशी शोधून काढावी, याचे तंत्रच समितीने निर्माण केले आहे. महाराष्ट्रात सर्वत्र समितीकडे आलेली भानामतीची सर्व प्रकरणे समितीने यशस्वीपणे हाताळली आहेत. हे कोण घडवून आणते, याचा तपास लावून भानामती यशस्वीपणे थांबविली आहे. बहुसंख्य वेळेला हे प्रकार करणारी व्यक्ती वैफल्यग्रस्त वा काही प्रमाणात मनोविकृत असते. समितीने त्याबाबत त्यावर उपचारही केले आहेत.


मराठवाड्यात ज्याला भानामती म्हणतात, तो एक वेगळ्या स्वरुपाचा प्रकार आहे. प्रामुख्याने तो ग्रामीण अशिक्षित स्त्रियांच्यात गटागटाने आढळतो. भानामतीग्रस्त व्यक्ती ओरडते, किंचाळते, भुंकते, भुंकल्यासारखा आवाज काढते. अशा अवस्थेत ती यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचे नाव घेते. स्वाभाविकच ती व्यक्ती गावाच्या रागाची बळी पडते. तिला छळण्यापासून ठार मारण्यापर्यंत काहीही घडू शकते. बाईची अवस्था खरे तर एक सौम्य मनोविकृतीच आहे. परंतु हे तिला माहीत नसते आणि गावातील अन्य जणांनाही. हा भानामतीचा प्रकार म्हणजे संस्कृतीबंधित मनोरुग्णतेचा आविष्कार आहे. अशा रुग्णांच्यावर उपचार करण्याचे समितीचे कार्य गेली सात वर्षे सुरू आहे आणि त्याप्रमाणे जवळपास अकराशे रुग्णांवर मानसिक उपचार करण्यात आले आहेत. ही प्रथा बंद करण्यासाठी शिक्षक, पोलीस, आरोग्य खाते यांचीही गरज लागते. हे लक्षात घेऊन शासनाने एका भानामती अभ्यास गटाची स्थापना करावी, असा आग्रह समितीने धरला आहे. यासाठी जनजागृतीची मोठी मोहीम १९९६ मध्ये मराठवाड्यात सुरू करण्यात आली. येत्या चार वर्षांत ही अंधश्रद्धा मराठवाड्यातून हद्दपार करण्याचा समितीचा प्रयत्न आहे.


फलज्योतिषाला आव्हान

सर्व थरातील माणसे मोठ्या आवडीने ज्योतिष पाहतात. माणसांना स्वत:च्या जीवनातील अज्ञाताबद्दल कुतूहल असते आणि त्याबरोबरच सुखाची स्वप्ने विकत घेण्याची गरज भासते. परंतु या प्रकाराला ज्यावेळी फलज्योतिषशास्त्र आहे म्हणून गौरविले जाते, त्यावेळी विरोध करणे क्रमप्राप्त बनते. शास्त्र म्हणजे काय, याची पुरेशी स्पष्टता आजच्या विज्ञानाला आहे आणि त्या निकषावर फलज्योतिष शास्त्र का नाही, याविषयी महाराष्ट्रातील कोणत्याही ज्योतिषाशी, कोणत्याही व्यासपीठावर वादविवाद करण्यास समिती सदैव तयार आहे. परंतु तथाकथित शास्त्रियतेचा दावा करणाऱ्या ज्योतिषी व त्यांच्या महामंडळापैकी कोणीही यासाठी तयार होत नाही. ज्योतिष हे गणितासारखे शास्त्र नाही; पण ते इम्पिरिकल सायन्स नक्कीच आहे, असा दावा केला जातो. मात्र यासाठी कोणतेही पुरावे सादर केले जात नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अखिल भारतीय ज्योतिष महामंडळाला सातत्याने असे आव्हान दिले आहे की, आम्ही तुम्हास सेकंदापर्यंत अचूक अशा २० कुंडल्या देतो किंवा हाताचे ठसे देतो, त्या आधारे त्या व्यक्तीचे शिक्षण, विवाह, अर्थार्जन, संतती, अपघात याबाबत त्यांनी ८० टक्के अचूक ठरणारी उत्तरे द्यावीत. परंतु कोणीही हे आव्हान स्वीकारत नाही. कुंडलीच्या आधारे रोगाचे निदान बहुतांशी अचूक करता येते, असे सांगितले जाते. पण त्यासाठीही ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ या पद्धतीने प्रचिती देण्यास कोणी पुढे येत नाही. निवडणुकांच्या वेळी भारतातील नामवंत ज्योतिषांना आवाहन करूनही निवडणुकांचे संभाव्य निकाल अचूकपणे कोणी आधी सांगत नाही. भविष्यात भृगूसंहिता वा तत्सम ग्रंथ यांना फार मोठे महत्त्व दिलेले असते. त्रिकालदर्शी ऋषींनी आपल्या अंतर्ज्ञानाने सर्व मानवांचे सर्वकालीन भविष्य यामध्ये लिहून ठेवले आहे म्हणे. परंतु याबाबत प्रत्यक्ष अभ्यास करून हे सर्व प्रकरण किती बेगडी आहे, हे समितीने सिद्ध केले आहे.


‘दैववादाची होळी’ हा एक विशेष कार्यक्रम समिती फलज्योतिषाच्या विरोधात राबवते. व्यक्तीच्या जन्मवेळेला अस्तित्वात असलेल्या ग्रहगोलांच्या स्थितीद्वारे भविष्यातील त्यांच्या जीवनातील संकेत मिळतात, असे मानले जाते. हे सारे वर्तविले जाते कुंडली मांडून; म्हणजे एका अर्थाने कुंडली हा नियतीने व्यक्तीच्याबाबत योजलेल्या प्रारब्धाचा जणू नकाशाच असतो. ही सर्व कल्पनाच समितीला साफ नामंजूर आहे. कारण यामुळे दैव, प्रारब्ध, संचित या कल्पनांना मान्यता मिळते. माणसे कर्तृत्व नाकारून नियतीच्या मागे लागतात. म्हणून दैववादाचे प्रतीक असलेल्या या कुंडलीची जाहीर होळी करावी, असा कार्यक्रम अखिल भारतीय ज्योतिष महामंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने समितीने घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्रात भरपूर विचारमंथन घडून आले.


यात्रेतील पशुहत्येला विरोध

महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी देवाच्या नावाने नवस फेडण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पशुहत्या होते. प्राथमिक अंदाजानुसार प्रतिवर्षी ५ लाख शेळ्या, बकऱ्या यात्रेच्यावेळी नवस फेडण्यासाठी मारल्या जातात. पशूची किंमत व सर्व अनुषंगिक बाबी लक्षात घेता नवस फेडण्याच्या सक्तीच्या मानसिकतेपायी संबंधित व्यक्ती दीड-दोन हजार रुपये प्रत्येकी खर्च करते. त्या गरीब व्यक्तीचे हे तीन-चार महिन्यांचे उत्पन्न असते. अटळपणे स्वत: कर्जबाजारी होऊनच तिला नवस फेडावा लागतो. एकूण विचार करता देशाला भांडवल संचयाची अत्यंत गरज असताना एका महाराष्ट्रात ७५-१०० कोटी रुपये या अंधश्रद्धेपायी खर्च होतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पशुहत्येमुळे कमालीची अस्वच्छता पसरते व रोगराई वाढते, ते वेगळेच. देवाच्या उदात्त कल्पनेशीही त्याच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी होणारी पशुहत्या सुसंगत नाही. सर्व संतांनी, समाजसुधारकांनी या बळीचा निषेध केला. गेली चार वर्षांपासून या हत्येच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्य करीत आहे. याबाबत महाराष्ट्र पशु-पक्षी बळी प्रतिबंधक समितीचे चांगले सहकार्य लाभले आहे. सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीतही सुमारे २० छोट्या-मोठ्या यात्रांतील पशुहत्या थांबविण्यात यश आले आहे. यामध्ये समितीच्या कार्यकर्त्यांना मारही खावा लागला आहे. पशुहत्या रोखण्यात यशस्वी झालेल्या ठिकाणांत सहा मुस्लिम स्थळांचा समावेश आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) या तालुक्यात बंजारा समाजाचे एकूण ५२ तांडे आहेत. नवरात्रीमध्ये परंपरेच्या नावाखाली प्रत्येक तांड्यावर ३०० ते ४०० बोकडांची हत्या होते. मोठ्या प्रमाणावर दारू वापरली जाते. कर्जबाजारीपणा तर येतोच. याविरोधात व यानिमित्ताने संपूर्ण खानदेश विभागाच्या यात्रा पशुहत्याविरोधी निर्धार समितीने घेतला. त्याला बंजारा समाजाचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतरच्या प्रबोधन सत्याग्रहाने अनेक तांड्यांवरची पशुहत्या थांबविण्यात समितीला यश आले. पशुहत्येविरोधातील सर्व बाबींचा आढावा घेणारी एक पुस्तिका समिती प्रसिद्ध करत आहे.


जटा निर्मूलन

देवदासीची माणुसकीला कलंक लावणारी प्रथा आजही महाराष्ट्रात सुरू आहे. ही प्रथा सुरू राहण्याचे एक कारण म्हणजे स्त्रियांना येणारी जट. केसाला तेल-पाणी, वेणी-फणी नसते. त्यामुळे केस एकमेकांत गुंतत जातात. या गुंतलेल्या केसांनाच देवीचे अंधश्रद्धाळू वा लबाड भक्त ‘जट येणे,’ असे म्हणतात. जट येणे म्हणजे यल्लमादेवीचे जणू निमंत्रणच येणे. यानंतर त्या जटेवर हळदीकुंकू, वडाचा चिक वाहणे सुरू होते. देवीची वारी बाईच्या अंगात येऊ लागते. डोक्यावर देवीचा जग येतो आणि नंतर देवीबरोबर लग्नही लागते. म्हणजेच थोडक्यात स्वत:च्या सुखी संसाराच्या स्वप्नाची राखरांगोळी होते. ही देवदासीची प्रथा चालू राहण्यात ‘जट येणे’ या प्रथेचा मोठा भाग आहे. खरे तर या जटा म्हणजे अस्वच्छ केसांचा झालेला गुंता असतो. परंतु तो सोडविण्याचा प्रयत्न केल्यास कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या यल्लमादेवीचा कोप होईल, या भीतीने या जटा सोडवल्या जात नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या जटा अनेक ठिकाणी जाहीरपणे सोडवल्या आहेत. त्याबाबतचे लोकांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जटा आलेल्या मुलींना तिचे नैसर्गिक स्त्रीजीवन जगण्यास मिळावे, असा प्रयत्न केला आहे. याबरोबरच देवदासीविरोधी चळवळीत शक्य असेल ती सर्व मदत केली आहे. पोतराज प्रथेमध्ये देवीच्या नावाने लहानपणीच मुलाला सोडले जाते. केस वाढवून अंगावर आसूड मारून देवीची भक्ती करणे व भीक मागणे, एवढेच हा पोतराज करतो. या प्रथेतूनही त्यांची सुटका करण्याचे काम समिती करत आहे.


‘विवेक जागरा’चा संवाद

देव, धर्म, नीती, श्रद्धा-अंधश्रद्धा या सर्व बाबी लोकमानसात सतत चर्चेच्या आहेत. देव आणि धर्म यांना नाकारणे, ही समितीच्या कामाची पूर्वअट मानली जात नाही. मात्र डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या समितीचे मित्र असलेल्या ज्येष्ठ विवेकवाद्यांना मनापासून असे वाटते की, अंधश्रद्धा निर्मूलन यशस्वी व्हावयाचे तर देव ही कल्पना मुळापासून नाकारणे आवश्यक आहे. लोकमानसातील या विषयाचे औत्सुक्य व समितीची भूमिका लोकांच्या समोर स्पष्टपणे येण्याची गरज लक्षात घेता डॉ. श्रीराम लागू व समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाहीर वादसंवादाचे कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आयोजित केले गेले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक येतात व विचारमंथनात सहभागी होतात, असा समितीचा अनुभव आहे. त्यामुळे समितीची भूमिका लोकांना नेमकेपणाने कळते; तसेच विचाराला चालनाही मिळते.


संमोहन

संमोहन हा बहुतेकांच्या मनातील गूढ कुतुहलाचा विषय आहे. माणूस संमोहित होतो कसा? संमोहन अवस्थेमध्ये त्याला काही अद्भुत शक्ती प्राप्त होते काय? दुसऱ्याला संमोहित करणारा संमोहक. त्याच्याजवळ काही विशेष शक्ती असते काय? अशा असंख्य गोष्टींबाबत बहुतेक सर्वांच्या मनात कुतूहल व तेवढेच अज्ञान असते. त्याबरोबरच संमोहनाच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकास करणाऱ्यांचे अलिकडे पेवच फुटले आहे. संमोहनाची उपयुक्तता ते भरमसाठ वाढवून सांगत असतात. हे सर्व लक्षात घेता संमोहनाबाबत समिती तिहेरी भूमिका पार पाडते. एक तर संमोहन म्हणजे काय? याबाबत जिज्ञासूंना पुस्तिका व प्रात्यक्षिके या स्वरुपात माहिती देते. दुसरे असे की, संमोहनाचा संबंध अंधश्रद्धा निर्मूलनातील काही घटनांशी येतो. जसे अंगात येणे किंवा (तथाकथित) पुनर्जन्माची स्मृती जागृत होणे. अशा स्वरुपाच्या सर्व घटना कशा घडल्या जातात, याचे संमोहनाच्या आधारे स्पष्टीकरण देऊन लोकांना त्याबाबतची यथार्थ कल्पना; प्रसंगी सप्रयोग देता येते. तसेच संमोहनाद्वारे जे भरमसाठ दावे केले जातात, त्यातील फोलपणाही स्पष्ट करता येतो. या सर्वांमुळे चळवळीतील कार्यकर्ते; तसेच सामान्य नागरिक या दोघांनाही फायदा होतो, असा अनुभव आहे.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(विशेषांक १९९६)






                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...