मृत्युलेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मृत्युलेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

लोकविज्ञानाचा निष्ठावंत प्रसारक



लोकविज्ञानाचा निष्ठावंत प्रसारक
दाभोलकर, मंगल धारवाडकर, मृत्युलेख, लोकविज्ञान

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करते, हे आता उभ्या महाराष्ट्राला पक्के माहीत आहे. त्याची योग्य नोंद महाराष्ट्राच्या मानसिकतेने व माध्यमाने घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या संघर्षाबरोबर कळत-नकळत धर्मचिकित्साही येते. त्याचे राग-लोभ समितीला चिकटतात. त्याहीबाबत वाचकांना थोडीबहुत जाणीव आहे. पण या दोन्हीबरोबरच एक तिसरे अंग संघटनेला आहे. ते आहे, संविधानाच्या मूल्यजाणिवांसह विज्ञानप्रसाराच्या प्रबोधनाचे. खरे तर याबाबत आज प्रामुख्याने काम सुरू आहे, औरंगाबाद शहरात आणि तेही डॉ. मंगल धारवाडकर यांच्याकडून. ते नीट समजावून घेतले तर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर तर प्रकाश पडेलच; पण अनेकांना आपापल्या ठिकाणी ते पथदर्शक ठरू शकेल.

डॉ. मंगल धारवाडकर हे तंत्रज्ञानातील उच्चपदवी विभूषित आहेत. अनेक वर्षे अमेरिकेत राहिलेले आहेत. औरंगाबाद येथील प्रथितयश कॉलेजात त्यांनी विभागप्रमुख आणि प्राचार्य म्हणून जबाबदारी निभावली आहे. सध्या ते निवृत्त आहेत. गेली वीस वर्षे ते महाराष्ट्र अंनिसशी संबंधित आहेत. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प हा त्यांचा आवडीचा विभाग.

समिती महाराष्ट्रभर फिरते नभांगण आयोजित करते. हा उपक्रम अत्यंत विद्यार्थीप्रिय व समितीला नवी ओळख करून देणारा ठरला. पण याच्या प्रारंभाचे श्रेय जाते डॉ. मंगल धारवाडकरांच्याकडे. त्यांनी प्रथम आयुकाचे फिरते नभांगणाचे कार्यक्रम औरंगाबादला घेतले. त्यानंतर त्यातील ताकद ओळखून आपण महाराष्ट्रात त्याचा विस्तार केला.

महाराष्ट्र अंनिस औरंगाबाद शाखेच्या वैज्ञानिक प्रकल्पाला त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिटची जोड दिली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यासाठी महाविद्यालयातीलच विद्यार्थी त्याच कॉलेजातील राष्ट्रीय सेवा योजना केंद्राशी संबंधित असावे लागतात. राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिटचे तसे नसते. त्यामध्ये कोणतेही विद्यार्थी, निवृत्त नोकरदार, नागरिक सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्रातले हे या स्वरुपाचे पहिलेच युनिट आहे.

भारतीय संविधानात लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय व स्त्री-पुरुष समता अशा बाबींचा प्राधान्याने उल्लेख आहे. विद्यार्थ्यांपर्यंत हे विचार पोचण्यासाठी दरवर्षी त्यातील एक विषय धारवाडकर निवडतात. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अशी विनंती केली जाते की, या विषयावर दोन तासांची कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात होईल. त्यांनी हॉल, ध्वनिक्षेपक द्यावा. वक्त्याला प्रवासखर्चापोटी हजार रुपये द्यावेत. विद्यार्थ्यांना उपस्थितीसाठी आवाहन करावे. आता यावर्षी १५ महाविद्यालयांत स्त्री-पुरुष समतेबाबत अशा कार्यशाळा झाल्या. सर्व ठिकाणी तरुण-तरुणींची उपस्थिती १०० ते १५० होती. वेगवेगळ्या तारखांना हा उपक्रम झाला. त्यातील एक दिवसासाठी पूर्णवेळ मेधा पाटकर आवर्जून आल्या होत्या.

यावर्षीच्या उपक्रमावर नजर टाकली तरी त्याचा वेगळेपणा चटकन लक्षात येईल. २८ नोव्हेंबरला महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी विवाहपद्धतीवर तरुणांच्या विचारांची खुली चर्चा झाली. त्यांच्या दृष्टीने संवेदनशील विषयावर त्यांनी मन:पूर्वकतेने मतप्रदर्शन केले. २६ डिसेंबरला बालविज्ञान प्रदर्शन झाले. पाणी आडवणे, जिरवणे, जलप्रदूषण रोखणे, अन्नभेसळ ओळखणे अशा अनेक बाबींचा परिचय बालचमूंना झाला. २ जानेवारीला फुले दांपत्य, फातिमाबी शेख यांचे जीवनकार्य नाटिका, पोवाडा या रूपाने सादर करण्यात आले. विशेष म्हणजे या सादरीकरणात हमाल मापाडी, मोलकरीण यांच्या संघटनांतील कामगारांच्या मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिट बरोबर होतीच. बालविज्ञान आनंद मेळाव्यात विज्ञान, भूगोल या अभ्यासक्रमातील प्रयोग सादर करण्याची कार्यशाळा शाळेतील मुलांसाठी झाली. तज्ज्ञ प्राध्यापकांनी स्वयंसेवी पद्धतीने त्यात मुलांना मार्गदर्शन केले. याबरोबरच मुलांनी स्वत: दोन प्रयोग करावयाचे होते. त्याचे सामाजिक महत्त्व सांगावयाचे होते. यामध्ये एकूण १२० मुलांनी सहभाग घेतला. त्यांना अगदी आगळे-वेगळे बक्षीस देण्यात आले. पहिल्या २० जणांना लोणारचे प्रख्यात सरोवर, २१ ते ४० या नंबरांना पाबलचा विज्ञानाश्रम आणि ४१ ते ६० यांना आयुका भेट असे ते बक्षीस होते. या प्रवासाचा एक वेळचा खर्च सोसण्यात आला. २६ फेब्रुवारीला मानसिकता व समाज यावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित झाली. , मानसिकता, ताणावर मात, यशस्वी परस्परसंवाद अशी ही सशुल्क कार्यशाळा झाली. दि. ७ - ८ मार्चला अगदी वेगळीच कार्यशाळा होती. तिचा विषय होता लाईफ सायन्सेस (मेडिसीन, केमिस्ट्री, बॉटनी, मायक्रोबायॉलॉजी, झुआलॉजी) व तंत्रज्ञान विषय. या विषयातील मराठवाडा विभागातील महिलांची कामगिरी, तिची दखल घेणे, मूल्यमापन करणे, भावी वाटचालीचे चिंतन करणे. दि. ८ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर याचे वेगळे महत्त्व सांगायला नकोच. एक सामाजिक जाणिवा प्रकल्पही संकल्पित आहे. आपल्या शहरातील सांडपाण्याचा निचरा, ध्वनिप्रदूषण, पाण्याची गुणवत्ता, भाजीपाला, फळे यांची गुणवत्ता ट्रॅफीक नियोजन यादृष्टीने काम करू इच्छिणारे जे-जे कोणी आहेत, त्यांना एकत्रित, प्रशिक्षित व कार्यान्वित करणे असे त्याचे स्वरूप आहे.

औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात उर्दू शाळा आहेत. त्या शाळेतील सर्वेक्षण असे दाखवते की, या शाळेतील आठवी, नववीमधील १० टक्के मुले व २० टक्के मुली शाळेतून बाहेर फेकल्या जातात. घरचे दारिद्र्य आणि शिक्षणाचा पालकांच्यात अभाव ही त्याची महत्त्वाची दोन कारणे आहेत. धारवाडकरांनी एकूण १३ शाळांतील अशी गरीब ४० मुले निवडली. त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची शैक्षणिक साधनसामग्री लोकदेणग्यांतून दिली. १२ फेब्रुवारीला हे वाटप झाले. सर्व पालकांची मुले आली होती. त्यांच्या पालकांनी, ‘आम्ही या मुलांना शाळेतून गळू देणार नाही. तुमच्या मदतीने आमचा उत्साह, उमेद वाढली आहे,’ असे सांगितले. १८ ते २५ मेदरम्यान बाबा आमटेंच्या ‘आनंदवन’चे शिबीर आणि जूनमधील डॉ. अभय बंग यांच्याकडचे शिबीर यांना विद्यार्थ्यानी जावे, अशी ही धारवाडकरांची धडपड सुरू आहे.

धारवाडकरांना या वर्षात गंभीर आजाराला तोंड द्यावे लागले. त्यांचे उपचार, पथ्यपाणी अजूनही सुरूच आहे. काळजी कमी झाली; पण पूर्णांशाने गेली, असे नाही. या सर्व परिस्थितीवर मात करत ते झपाट्याने हा लोकविज्ञानाचा कार्यक्रम राबवीत आहेत. मला वाटते, तो ‘अंनिस’चे कार्यकर्ते व हितचिंतक सर्वांनाच पथदर्शक ठरावा.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल २०११)


शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

विवेकी चैतन्य लोपले



विवेकी चैतन्य लोपले
दाभोलकर, आर. ए. जागीरदार, मृत्युलेख, अनुभव, रॅशनॅलिस्ट फौंडेशन, रीझन

एखाद्या व्यक्तीचे जगणे हाच एक उत्सव असतो. त्याच्यासाठी नव्हे, तर त्याच्या सहवासात येणाऱ्या सर्वांसाठी. न्या. राघवेंद्र जागीरदार हा असा एक उत्सव होता. यावर्षीच्या २३ फेब्रुवारीला तो संपला.

जहागिरदार अंतर्बाह्य निखळ होते. एका बाजूला विचारशीलता, तत्त्वनिष्ठा होती. दुसऱ्या बाजूला शिस्तबद्ध नीटनेटके जीवन, सौंदर्यदृष्टी, जीवन जगण्याची हौस या बाबी होत्या. या दोन्हींचा मेळ घालता-घालता भल्याभल्यांची दमछाक होते. राघवेंद्र जहागिरदारांना ते सहज साधले होते. तुका म्हणे झरा। आहे मूळचाचि खरा।। याची मूर्तिमंत प्रचिती म्हणजे त्यांचे जगणे होते.

१५ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन. तो भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणूनच ओळखला जातो. स्वातंत्र्य हेच सर्वोच्च मूल्य मानणाऱ्या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वज्ञानाच्या पाईकाला हाच जन्मदिवस लाभावा, हे किती अन्वयार्थक आहे. न्या. जहागिरदारांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी रॉय यांनाही (रॉय यांच्या इतर काही अनुयायांप्रमाणे) आंधळेपणाने अजिबात अनुसरले नाही. रॉय यांच्या २२ मुद्द्यां’च्या सुप्रसिद्ध प्रबोधनाबाबतही त्यांनी आपली चिकित्सक बुद्धी वापरून काही प्रश्न उपस्थित केले होते.

न्या. जहागिरदार विवेकवादी होते. देव कल्पनेला स्पष्टपणे नकार देणारे होते आणि तरीही त्यांचा पिंड हा मानवतावादी विचारांचा अधिक होता. देव आणि धर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत, ही महाराष्ट्र अंनिसची भूमिका त्यांना अधिक योग्य वाटत होती. न्यायमूर्ती म्हणून निर्णय देतानाही त्यांनी कायद्याच्या कक्षेत माणुसकीच्या बाजूने झुकते माप दिले. त्यांच्यासमोर आलेल्या एका केसमध्ये बाईने विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि स्वत:बरोबर स्वत:च्या मुलालाही घेतले, असा आरोप होता. आरोपीच्या वकिलांनी आरोपी विहिरीत पडल्यानंतर मदतीसाठी ओरडत होता (म्हणजेच त्याचा आत्महत्येचा हेतू नव्हता), असा बचाव घेतला. तो न्यायमूर्तींनी मान्य केला. त्यांचे मत असे होते की, त्या बाईला शिक्षा ठोठावणे म्हणजे तिच्या मुलाचे जगणेच पूर्ण उद्ध्वस्त करण्यासारखे होते, जे टाळणे त्यांना इष्ट वाटले.

न्या. जहागिरदारांच्या पिढीचा कालखंड हा मार्क्सवादी, समाजवाद, गांधीवाद अशा एखाद्या विचारधारेच्या आधारे जीवनातील सर्व प्रश्नांना उत्तरे मिळू शकतात, असे मांडण्याचा होता. या सर्वांपलिकडे विवेक हे तत्त्व न्यायमूर्ती महोदयांना महत्त्वाचे वाटत होते. जीवन असंवेदनशील नसावे, हाव कमी व्हावी, अंधश्रद्धांना थारा देऊ नये, विचारात कर्मठपणा नसावा, या बाबींना त्यांच्या लेखी अधिक मूल्य होते. या मूल्यांचा पाठपुरावा त्यांनी कृतिशीलपणे केला. विचारांच्या प्रसाराचे काम मनापासून केले. १९३१ ते १९४२ पर्यंतचे रीझन या मासिकाचे अंक विचारप्रचारार्थ स्कॅन करून सी.डी.च्या रूपाने लोकांना उपलब्ध करून दिले. अनेक लेख लिहिले, भाषणे दिली. विवेकवादी विचारांच्या कार्यक्रमात स्वत:हून हजेरी लावली. त्यांचे लिहिणे, बोलणे इंग्रजीत असे. खरे तर ही बाब भारदस्तपणा प्राप्त करून देणारी. पण न्यायमूर्तींनी मात्र आपणास मराठीत लिहिणे, बोलणे चांगले जमले असते, तर लोकांच्या अधिक जवळ जाता आले असते, याची खंत बाळगली. मला त्यांनी ती अनेकदा बोलून दाखवली.

लोकांत जाऊन विवेकवादाची चळवळ चालवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल त्यांना मनापासून आस्था होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला त्यांनी अंत:करणपूर्वक व सर्व प्रकारे मदत केली. समितीच्या दिवाळी अंकातील परिसंवाद प्रायोजित केले. पुस्तके प्रकाशित करण्यासाठी अर्थसहाय्य दिले. वास्तुशास्त्राच्या विरोधात दादर येथे घेतलेल्या व गाजलेल्या परिसंवादाचे अध्यक्षपद स्वीकारले. माझी महत्त्वाची एक आठवण आहे. निर्मलामातेच्या भक्तांनी समितीवर खोटा खटला दाखल केला. सातारा येथील जिल्हा न्यायालयात त्याचा निर्णय समितीच्या बाजूने लागला. हायकोर्टमध्ये अपील झाले. हायकोर्टात कोण वकील द्यावयाचा, हे आम्हाला माहीत नव्हते, परवडणारेही नव्हते. त्यावेळी वकील झालेले न्या. जहागिरदार त्यांच्या गाडीतून एका नामवंत वकिलाकडे आम्हाला घेऊन गेले. स्वाभाविकच आमचे पुढचे सर्व प्रश्न चुटकीसारखे सोपे झाले. ती केस आम्ही हायकोर्टात जिंकली.

आपण ज्या संघटनेचे भाग आहोत, त्यामध्ये तरुण नाहीत, याची खंत त्यांना सतत जाणवत असे. त्याबाबतचे एक वाक्य ते मला विनोदाने सतत ऐकवत. ते म्हणत, ‘मी अवघा ६८ वर्षांचा आहे आणि माझ्या संघटनेतला सर्वांत तरुण आहे. अखेरपर्यंत या ब्लॅक ह्यूमरमधील स्वत:ची वयोमर्यादा वाढत गेली, एवढेच. काम पुढे नेण्यासाठी स्वत:च्या उत्पन्नातूनच काही लाख रुपये बाजूला काढून त्यांनी रॅशनॅलिस्ट फौंडेशनची स्थापना केली. आपल्या हयातीत प्रामुख्याने तरुणांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवली. अंनिसशी संबंधित ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी आता त्या न्यासाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. त्यामार्फत न्या. जहागिरदारांच्या लेखनाचे दोन इंग्लिश खंड देखणेपणे प्रकाशित होऊन महाराष्ट्रातील महाविद्यालयांना पोचले आहेत.
न्या. जहागिरदारांची अखेरची काही वर्षे आजारपणात गेली. तीव्र दुखण्याच्या तडाख्यातून ते वाचले. त्यांना ओळखणाऱ्यांनी गमतीने हा उपकारकर्ता हात देवाचा आहे असे सांगितले. न्या. जहागिरदारांनी मात्र यथार्थतेने याचे सारे श्रेय आपल्या नामवंत डॉक्टर पत्नी शरद जहागिरदार यांना दिले. ते सर्वार्थाने खरेही होते. त्यांच्या अखेरच्या आजारपणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संभाव्य वास्तूसाठी फार मोठी देणगीही त्यांच्यावतीने श्रीमती जहागिरदार यांच्यामार्फत मिळाली. वास्तू होईल त्यावेळी त्याच्या सभागृहास न्या. राघवेंद्र जहागिरदार यांचे नाव सन्मानपूर्वक देण्यात येईलच; पण न्यायमूर्तींच्या अस्तित्वाअभावी निर्माण होणारी पोकळी मात्र भरून निघणे कठीण. त्यांच्या स्मृतीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परिवाराचे विनम्र अभिवादन!

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल २०११)

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

कृतार्थ साधक



कृतार्थ साधक
दाभोलकर, ग. प्र. प्रधान, मृत्युलेख, अनुभव, चरित्र

अनेक वेळा प्रधान मास्तरांचा हात हातात घेऊन साने गुरुजी रुग्णालयातील त्यांच्या खोलीत त्यांच्या बाजूला मी बसत असे. अस्थिपंजर उरले होते. गात्रे पार थकली होती. अंधुक दृष्टी, चालणे अशक्य. ऐकू येणे तर कधीचेच थांबलेले. निसर्ग आपले आक्रमण करीत होता. प्रधान मास्तर अस्वस्थ, असहाय्य होते. मास्तरांना संजीवनी कशी मिळेल? एका क्षणी मनात विचार चमकला - तुमच्या अस्थीपासून वज्र बनवले तर लोकशाही समाजवादाची लढाई जिंकता येईल. असे सांगितले तर हा जराजर्जर म्हातारा ताडकन् उठून म्हणेल, ‘अजिबात वेळ लावू नका. तसे म्हणण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता. कारण जन्मभर देण्यासाठीच ती हाडे झिजत आली होती.

फकिरी मस्ती
१८ वर्षांची आमदारकीची अत्यंत यशस्वी कारकीर्द सरांनी पूर्ण केली. पुन्हा चौथ्या वेळी उभे राहिले असते तर निश्चितपणे निवडून आले असते; पण साने गुरुजींच्या साधनात काम करण्याच्या अनिवार इच्छेमुळे ते साधनात दाखल झाले. त्यांच्यामुळे साधना स्थिरावण्यास,साधना’चे रूप पालटण्यास मोठीच मदत झाली. जाणीवपूर्वक अकांचनता स्वीकारण्याची ही फकिरी मस्ती आणि स्वत:ला भिरकावून देणे, याची एक वेगळी ओढ मास्तरांना असावी. पाच वर्षांपूर्वी स्वत:चे घर सोडून ते कायमच्या मुक्कामासाठी साने गुरुजी रुग्णालयात गेले. त्यावेळी त्यांनी मृत्युपत्र करून माझ्याकडे दिले. त्यात मृत्यूनंतर स्वत:च्या खात्यावरचे साडेतीन लाख रुपये सात संस्थांना वाटण्याचा उल्लेख होता. १५ दिवसांनी माझ्याकडून मृत्युपत्र घेऊन ते फाडून टाकले. म्हणाले, ‘चांगल्या कामाला उशीर कशाला? ते पैसे संबंधित संस्थांना रवाना केले. त्यांचा चेहरा कृतार्थतेने भरून आला. याचे टोक म्हणजे आजच्या बाजारभावाने सुमारे एक कोटी रुपये किमतीचे घर सरांनी साधना ट्रस्टच्या झोळीत टाकले. मृत्यूनंतर हस्तांतर करण्याचा स्वत:चा आधीचा निर्णय त्यांनी बदलला आणि दोन वर्षांपूर्वीच घराचे उदक साधना ट्रस्टच्या हातावर सोडून ते तृप्त झाले.

लेखक मास्तर
लिहिणे, बोलणे, प्राध्यापकीचा व्यवसाय, संपादकत्व या क्षेत्रातील व्यक्तीच्या मागे विचारवंत ही पदवी सहज चिकटवली जाते. प्रधान सरांना तशी ती चिकटली होतीच; मात्र खरा विचारवंत कसा असतो आणि आपण विचारवंत कसे नाही, याची प्रधानसरांना नीट कल्पना होती आणि त्याबाबत ते अनेकदा मोकळेपणाने बोलतही असत. आणखी एक बाब त्यांना लख्खपणे माहीत होती, ‘मी भोळाभाबडा; प्रसंगी काहीसा बावळट आहे, असे लोकांना वाटते. हा त्यांचा समज कायम ठेवण्याचा फायदा समजलेला मी धूर्त माणूस आहे असे ते हसतच सांगत. आंबेडकरांवरील पुस्तक लिहून झाल्यावर त्यांनी मला मुद्दामहून बोलावले. आम्ही त्यांच्या टेबलासमोर उभे होतो. टेबलावर दोनच फोटो - एक महात्मा फुलेंचा, दुसरा महात्मा गांधींचा. पुस्तकेही दोनच - एक तुकारामगाथा व समग्र शेक्सपिअर. मला म्हणाले, आता इच्छा उरली नाही. मन तृप्त आहे. इस्टेट एवढीच आहे. वळकटी बांधून मी तयार आहे. आणि गर्रकन् मागे वळून हातातली काठी टेकत खोलीच्या बाहेर पडले. मला वाटते, साहित्य हाच प्रधानसरांचा खरा प्रांत होता. पण त्यांच्यातील कार्यकर्त्याने, त्यांच्यातील साहित्यिकावर मात केली.

...आहे मूळचाचि खरा।
      प्रापंचिक आसक्ती तोडण्याची भूमिका त्यांनी कठोरपणे स्वीकारली आणि निभावली. २००३ साली त्यांना पुणे येथे महाराष्ट्र फौंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यात त्यांनी जाहीर केले, ‘यापुढे मी कोणत्याही समारंभात भाषण करणार नाही आणि कसलाही पुरस्कार स्वीकारणार नाही.’ लोकांची प्रचंड मागणी, प्रामाणिक इच्छा असूनही सर्व जाहीर कार्यक्रम पुढील आयुष्यात त्यांनी नाकारले. सदाशिव पेठेतील घर सोडून साने गुरुजी रुग्णालयात हडपसरला कायम मुक्कामी जाताना सर्व पुरस्कार तेथे अडगळीच्या खोलीत टाकले. मुंबईतील एक अत्यंत प्रतिष्ठित एक लाख रुपयांचा पुरस्कार मास्तरांनी घ्यावा, असा निवड समितीचा आग्रह होता. निवड समिती मास्तरांकडे थडकली. मास्तरांनी मोजून तीन वाक्ये उच्चारली. निर्णयाबद्दल धन्यवाद! पुरस्कार स्वीकारू शकत नाही. क्षमस्व! येण्याची उगीच तसदी घेतलीत.
      तुका म्हणे झरा। आहे मूळचाचि खरा।। या कोटीचे मास्तरांचे निखळपण होते.

मानवसन्मुख करुणा
भगवी वस्त्रे न घालता संन्यासी बनण्याचा अट्टाहास मास्तरांनी बाळगला होता. तो त्यांनी यशस्वीपणे पुरा केला. अध्यात्माचा एक पारंपरिक अर्थ आहे. आत्म्याचे अस्तित्व न मानवणाऱ्या मास्तरांचे या अध्यात्म्याशी अर्थातच काही देणे-घेणे नव्हते. मास्तरांचे अध्यात्म म्हणायचेच असेल तर वेगळे होते. लौकिक सुखापलिकडे जीवनाचे एक श्रेयस आहे आणि त्या सुखांच्या पेक्षा ते अनंतपटींनी मोलाचे आहे, याची नोनी जाण मास्तरांना झाली होती. या जीवनदृष्टीमुळे जीवनात संयम, साधेपणा, सदाचार अपरिग्रह येतो. तो त्यांना प्राप्त झाला होता. करुणेने मानवसन्मुख कृती घडते. जीवनात साक्षात् शूचिता व पावित्र्य प्रकटते, हे त्यांच्या रूपाने हाराष्ट्राने पाहिले. साने गुरुजींच्या मानसपुत्राने त्यांच्यापासून घेतलेल्या अस्तिक्य बुद्धीतून जीवनाचा हा अर्थ लावला होता. या जाणिवेतून मुक्तिपथावरील या कृतार्थ साधकाचा प्रवास झाला.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जुलै २०१०)

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

निळूभाऊ फुले : मोठा कलावंत, महान माणूस



निळूभाऊ फुले : मोठा कलावंत, महान माणूस
दाभोलकर, निळू फुले, मृत्युलेख, अनुभव

निळूभाऊंचा आणि माझा पहिला संपर्क आला तो प्रसंग मला लख्खपणे आठवतो. १९८१ साली लक्ष्मण मानेंच्या उपरा या आत्मकथनाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यावेळी मानेंचा सत्कार सातारा येथे गांधी मैदानावर जाहीरपणे करण्याचे आम्ही मित्रांनी ठरवले. एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे प्रमुख पाहुणा तसाच तोलामोलाचा हवा. मी पुण्याला येऊन अनिल अवचट यांच्याबरोबर निळूभाऊंच्या घरी गेलो. ती त्यांची व माझी पहिलीच भेट. प्रचंड जनसमुदायाला संबोधित करत असलेले डॉ. राममनोहर लोहिया यांचा फोटो त्यांच्या दिवाणखान्यात ठळकपणे लावला होता. तो मला आजही स्पष्टपणे आठवतो. कसलेही आढेवेढे न घेता निळूभाऊ येतो म्हणाले आणि ठरलेल्या वेळी माझ्या घरी दाखल झाले. कार्यक्रमाची वेळ होत आली होती. एवढ्यात पोलीस अधिकाऱ्यांचा निरोप आला. कसेही करा; पण लवकर निघा. काय झालं? मी विचारले. त्याने उत्तर दिले, ‘गर्दी फार झाली आहे. काबूत ठेवणे अशक्य झाले आहे. निळूभाऊंना घेऊन घरातून खाली उतरलो, तर घराला निळूभाऊंच्या चाहत्यांचा वेढा पडला होता. तेथून वाट काढत आम्ही मैदानावर पोचलो. मैदान तुडुंब भरले होते. प्रास्ताविक कसेबसे उरकले. प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ पत्रकार मुणगेकर. ते बोलायला उभे राहिले असता श्रोतृवर्ग त्यांचा एकही शब्द ऐकून घेण्यास तयार नव्हता. निळूभाऊंच्या नावाचा जयघोष अखंड सुरू होता. मुणगेकरांची स्थिती अवघडल्यासारखी झाली होती. आम्हालाही काय करावे कळेना. निळूभाऊ उठले, ध्वनिक्षेपकाकडे गेले. आपल्या खास आवाजात आर्जवी; पण ठाम शब्दांत त्यांनी जनसमुदायाला बजावले, तुम्हाला मुणगेकरसाहेबांचे भाषण शांतपणे ऐकून घ्यावेच लागेल. निळूभाऊंची ती मात्रा लागू पडली. समुदाय शांत झाला आणि कार्यक्रम उत्तमपणे पार पडला.

१९९० च्या दरम्यान मी निळूभाऊंना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होण्याची विनंती केली. पदे स्वीकारणे हा निळूभाऊंचा पिंड नव्हे. त्यांनी नकार दिला; मात्र त्याचवेळी शब्द दिला की, ‘‘मी तुला दर महिन्यातील दोन दिवस देईन.’’ हा शब्द निळूभाऊंनी फार कसोशीने पाळला. प्रमुख पाहुणे निळूभाऊ आहेत, असे जाहीर झाल्यानंतर त्या कार्यक्रमाला गर्दी जमणे हा प्रश्नच राहत नसे. निळूभाऊंना चळवळीबद्दल मन:पूर्वक आस्था होती. त्यामुळे त्यांनी कधीही मानधन घेतले नाहीच; परंतु कार्यक्रमाच्या वेळी स्वत:ची निवास, प्रवास, भोजनव्यवस्था कशी असावी, याबद्दल कधीही आग्रह धरला नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीला जी मान्यता व लोकप्रियता लाभली, त्यामध्ये निळूभाऊंचा मोठा वाटा आहे. चळवळीचा कोणताही उपक्रम असला की, त्याला निळूभाऊंनी कधीही नकार दिला नाही. बुवाबाजीविरोधाचा लढा असो, देवदासीची जट सोडवणे असो, मुख्यमंत्र्यांना भेटणे असो किंवा कोकणातील शोध भुताचा : शोध मनाचा चळवळ असो, निळूभाऊ कार्यकर्त्यांसारखे वेळेवर येत असत. कोकण दौऱ्यात दापोलीला झालेली निळूभाऊंची सभाही पोलिसांच्या मते शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेपेक्षा मोठी होती. अनेक सभांमध्ये ते अभिमानाने उल्लेख करत की, मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा ढोलकीवाला आहे. रस्त्यावर खेळ सुरू करण्यापूर्वी ढोलकी वाजवली जाते. त्याचा उद्देश एवढाच असतो की, कुतुहलाने लोक जमा व्हावेत. माझ्या चेहऱ्याचा उपयोग या चळवळीचे विचार ऐकण्यासाठी लोक गोळा करायला होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. निळूभाऊ कधीही पाच ते सात मिनिटांच्यावर भाषण करत नसत. तेवढ्या वेळातही एखादा वैचारिक मुद्दा जनसमुदायापर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्याकडे तयार असे. त्यांचे वाचन उत्तम होते. सामाजिक बदल आणि राजकारण यांचे अवलोकन प्रगल्भ होते. उक्ती आणि कृती यामध्ये सुसंगती होती. त्यामुळे त्यांच्या भाषणात मुद्दा असे आणि ते श्रोत्यांना अंतर्मुखही करीत असत; मात्र ते कधीही जास्त बोलत नसत. एकच अपवाद. बार्शीला टोलेजंग सभा भरली होती. आधी माझे भाषण झाले. त्यानंतर ध्वनिक्षेपक व्यवस्था पूर्णत: कोलमडून गेली. श्रोत्यांना भाषण ऐकू गेले नाही. ध्वनिक्षेपक बदलण्यात आले. नंतर रामभाऊ नगरकर बोलले. एकपात्री नाटक सादर करणारे दमदार गडी; पण ध्वनिक्षेपकाने पुन्हा दगा दिला. समुदाय अस्वस्थ होता. निळूभाऊ बोलायला उठले. आमच्या दोघांच्या भाषणाची कसर त्या दिवशी २५ ते ३० मिनिटे बोलत त्यांनी भरून काढली. निळूभाऊंचे मी ऐकलेले ते सर्वांत मोठे भाषण होते.

निळूभाऊ महान कलाकार होते, हे सर्वज्ञात आहे. दिलीप कुमार, नसिरूद्दिन शहा यांना त्यांच्या अभिनयाचे कौतुक होते. डॉ. लागू जगातील उत्तम नटांमध्ये निळूभाऊंची गणना करीत. निळूभाऊंचा चाहता वर्ग महाराष्ट्रात अफाट पसरलेला होता. त्यामुळे काही वेळा त्यांची अवहेलना होईल, असे घडत असे; पण तेही स्थितप्रज्ञ वृत्तीने निळूभाऊ एक शब्दही न उच्चारता सहन करीत असत. एकदा अत्यंत धावपळीचा दौरा असताना रेल्वेत रात्रीच्या वेळी वातानुकूलित दुसऱ्या वर्गाचे आरक्षण मिळाले नाही. साध्या दुसऱ्या वर्गातील एका गैरसोयीचा साईड बर्थ मिळाला. त्या गर्दीच्या डब्यात निळूभाऊंना आम्ही बसवले. तेथील माणसांना वाटले की, हे चित्रपटातील शूटिंग आहे. शांतपणे बर्थवर चढले आणि निद्राधीन झाले. हे फक्त निळूभाऊच करू शकले. निळूभाऊंना व्यवहार पक्का कळत असे. माणसाची उत्तम जाण होती. खरे-खोटे समजत असे. परंतु त्यांच्यातील ऋजुता भिडस्तपणा धारण करीत असे. त्यामुळे अनेकदा निळूभाऊंना वैताग येत असे. हे सर्व ते हसत-हसत सांगत असत. कलाकारांचा आवडता चौथा अंक हा निळूभाऊंनाही प्रिय होता. दौऱ्यावर एकत्र अनेकदा असल्याने थेंबभरही घेत नसून त्या अंकाच्या वेळी मी त्यांच्याबरोबर असे. अशा वेळी निळूभाऊंच्यामध्ये राजकीय कार्यकर्ता आणि कडवा लोहियावादी उफाळून येत असे. पण महत्त्वाचे हे की चौथ्या अंकात एका शब्दानेही त्यांच्या तोंडून स्वत:ची कधी आत्मप्रौढी मी ऐकली नाही. इतर कलाकारांच्या वागण्या-बोलण्याबद्दल त्यांनी कधी ब्र उच्चारला नाही. लाखो रुपये स्वकमाईतून निळूभाऊंनी कार्यकर्त्यांना वाटले; पण त्याचा उच्चार कधी कोणाकडे केला नाही. व्यक्तिमत्त्वाची आणि विचारांची पक्की जडणघडण असल्याशिवाय हे करणे अशक्य आहे.

निळूभाऊंना आपण जीवनात काय करायचे आहे, हे नीटपणे कळले होते. त्यांनी ते जाणले असल्याने मोहात पडणारी कितीतरी निमंत्रणे आली असता त्यांनी त्याकडे सहजपणे पाठ फिरवली. आयुष्यभर समतावादी विचारांशी संगत करत ते जगत राहिले. मस्तीत राहिले, मजेत राहिले. जीवन त्यांना कळले हो या बोरकरांच्या ओळीची सार्थकता म्हणून निळूभाऊंच्या जीवनाकडे बोट दाखविता येईल. निळूभाऊ मोठे कलाकार होतेच; परंतु त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे एक महान माणूस होते.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट २००९)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...