विवेकाधिष्ठित नीती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विवेकाधिष्ठित नीती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

माझे अध्यात्मिक आकलन (उत्तरार्ध)




माझे अध्यात्मिक आकलन  (उत्तरार्ध) 
दाभोलकर, अध्यात्म, धार्मिक, विवेकाधिष्ठित नीती, समाजसुधारकांचा वारसा, धर्मजागर
ईश्वरदर्शन
अध्यात्माचे प्रयोजन हे ईश्वरदर्शनाचेच आहे. ईश्वर कशाला म्हणावयाचे, या घटापटादी चर्चेत न पडता तीन प्रकारे हे दर्शन होऊ शकते, असे मानले आहे. अ) अंतर्यामी ब) निसर्गात क) जनता जनार्दनात.
ईश्वर आहे का नाही, या वादात जाण्याचे कारण नाही. तो नाही असे मानूनही एक विवेकवादी म्हणून या तीन पातळ्यांवर काय दिसते?
·         माणसाच्या वासना, विकारावर मात आणि माणसाच्या मंगल नैतिक भावनांचा परिपोष. ही बाब ईश्वराच्या नावाने असो वा त्याच्या नावाशिवाय; घडून येण्याची गरज आहे. माणसाच्या मनाचे हे उन्नयन कसे घडून येईल, याचा शोध धर्माने आणि अध्यात्माने आपल्या परीने घेतला. त्यातील प्रामाणिकपणा मान्य करूनही तो साफ अपुरा ठरला, हे दिसतेच आहे. मात्र त्याचा आदर करावयास हवा. दुसऱ्या बाजूला मनोविज्ञानाच्या क्षेत्रात एक आव्हान आहे की, माणूस स्वत:च्या भावभावनांचे शुद्धीकरण व उन्नतीकरण कसे करू शकेल? बाह्यपरिस्थितीमुळेच या भावभावना उद्भवतात, असे जरी मानले तरी देखील याबाबत करण्यासारखे बरेच काही मनोविज्ञानासाठी शिल्लक आहे.
·         निसर्गसुसंगत जीवन जगावे यासाठी खरे तर त्याद्वारे आपणास परमात्म्याचे दर्शन घडते, असे सांगण्याची गरजही राहिली नाही आणि तसे घडते असे मानून कोणी पर्यावरणसुसंगत जीवन जगत असेल तर त्याला विरोध करण्याचेही कारण नाही. एक पर्यावरणविसंगत आत्मघातकी जीवनशैली आजचा समाज अंगीकारत आहे. यामध्ये देव आहेच मानणाऱ्यापासून देव नाही मानणाऱ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. पालेभाज्या, उसळी, फळे नियमाने सेवन करावेत. तेलकट, तिखट, तळलेले, गोड यांचे सेवन टाळावे. साधे सुती कपडे घालावेत. नैसर्गिक पेये प्यावीत. थोडे शरीरश्रम आवर्जून करावेत. डोळ्यांचा वापर सतत टी.व्ही. पाहण्याऐवजी वाचन व निसर्ग अवलोकन यासाठी करावा. हे समजण्यात काहीही अध्यात्मिक नाही. हा साधा शहाणपणाचा भाग आहे आणि याचा अवलंब कोणी अध्यात्मिक साधना म्हणून करत असेल तर त्यात आक्षेपार्हही काही नाही. याच जाणिवेचे विकसित रूप म्हणजे एकूणच समाजजीवनाची जडणघडण पर्यावरणसुसंगत पद्धतीने करण्यासाठी धडपडणे.
·         विनोबाजींनी असे म्हटले आहे की, मी १२ वर्षे संपूर्ण भारतात दोन वेळा पदयात्रा केली. यामुळे मला जनता-जनार्दनाच्या रूपातील ईश्वराचे तिसरे रूपही भेटले; अन्यथा माझी अध्यात्मिकता अपूर्ण राहिली असती. जनता-जनार्दनाच्या रूपात परमेश्वर भेटतो की नाही, हे माहीत नाही. पण आज अध्यात्माच्या नावाने ज्यांच्याभोवती लक्षावधींची गर्दी होते, ते सर्वजण जनता-जनार्दनाशी संबंधित मानवी मूल्यांच्या लढ्याकडे पाठ फिरविताना दिसतात. या कथित कोट्यवधी अध्यात्मिक सुस्थितीतील भाविकांचे मन स्वत:विषयीच्या अनेक ताणाने अस्वस्थ होते. त्यांना उत्तरे मिळवताना त्यांची वृत्ती उघडपणे स्वार्थाची व आत्मकेंद्री असते; अध्यात्माची नसते. नैतिक सामर्थ्य कृतीत आणण्यासाठी माणूस स्वत:च्या देहाच्या मर्यादेत, समाजाच्या मर्यादेत भारावलेपणाने काम करतो. या अवघड प्रयत्नात व त्याच्या यश-अपयशातच आनंद आहे, कृतार्थता आहे. कारण त्यामध्ये शोषितांच्याविषयी जिव्हाळा आहे. म्हणजे ज्याला जनता जनार्दनाच्यामधून अध्यात्माद्वारे परमात्म्याला भेटावयाचे असेल, त्याने खरे तर माणुसकीकडे वळावयास हवे. ही विज्ञाननिष्ठ व्यवस्था परिवर्तनाची जाण देते. अध्यात्म त्याबद्दल जर बोलत नसेल तर ते फुकाचे अध्यात्म ठरते. उदा. दरवर्षी निघणाऱ्या आषाढी वारीच्या अध्यात्मिकतेबद्दल बरेच काही बोलले जाते. प्रत्यक्षात मात्र काही शतके-वैष्णवाचा धर्म वैष्णव ते जन। भेदाभेद भ्रम अमंगळ।। म्हणणाऱ्या वारकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात त्या अमंगल भेदाचे उच्चाटन झाल्याचे कोठेही दिसत नाही. वारकरी संप्रदायाच्या प्रभावामुळे अस्पृश्यता कमी झाली, गावकुसाबाहेरच्या दलित वस्त्या गावात आल्या. आंतरजातीय लग्नाला पाठिंबा देणारी मानसिकता निर्माण झाली. निवडणुकीत जातीचा प्रभाव कमी झाला, असे काहीच झालेले दिसत नाही. परमेश्वर न मानणारी विज्ञाननिष्ठ व्यक्ती समाजपरिवर्तनासाठी जनता जनार्दनाबरोबर असण्याची शक्यता अधिक आहे आणि परमेश्वर मानणारी अध्यात्मिक व्यक्ती आज तरी शाब्दिकतेपलिकडे जनता-जनार्दनातील परमेश्वरासाठी काहीच करण्यास तयार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

वरील सर्व मांडणीचा थोडक्यात अर्थ असा की, अहंकार सोडण्यासाठी सतत कार्यमग्न राहण्याचा सल्ला देणारे अध्यात्म, समोरील व्यक्तीचे गुणग्रहण करून मन­:शुद्धीची कल्पना मांडणारे अध्यात्म, सामूहिक सुखासाठी साधना करू मागणारे अध्यात्म, यासाठी बिचकून जाऊन विरोध करण्याचे वा त्याबरोबर भांडत बसण्याचे कारण नाही. दुसऱ्या बाजूला यातून साध्य होणार आहे, ती अभिव्यक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा माणूस अधिक सहजपणे आत्मसात करू शकेल. कारण स्वत:चे मन व आत्मभान उन्नत करणे, पर्यावरणसुसंगत वर्तन करणे आणि विज्ञाननिष्ठ परिवर्तनाबाबत आग्रही राहणे या गोष्टी विवेकवादी व्यक्ती करतच असते. या अर्थाने ती व्यक्तीच खरी अध्यात्मिक नाही काय?

शेवटी एक मुद्दा चळवळीसाठी. अध्यात्माचा दावा करणाऱ्या अनिरुद्ध बापूंच्याबद्दल असा थेट खोटा प्रचार केला जातो की, ते भक्तांना एकाच वेळी विविध देवांच्या रूपात भेटतात. दुसरे अध्यात्मिक पुरुष नरेंद्र महाराज हे तर जाहीरपणे विरोधकांचे हातपाय तोडण्याची धमकी देत असतात. आसारामबापू हे मागील जन्मातील पापामुळे या जन्मी स्त्री विधवा होते, असे खुशाल सांगतात. सत्य साईबाबा चमत्कार करतात; पण तो कधीही तपासू देत नाहीत. आणि स्वत:वर हल्ला करणाऱ्या स्वत:च्या भक्तांना अटक करण्याऐवजी गोळी घालून संपवले जाईल, असे पाहतात. निर्मलामाताच्या कुंडलिनी जागृतीला आव्हान दिले तर तिचे भक्त निदर्शकांच्यावर तुटून पडून मारहाण करतात. ही सर्व मंडळी अध्यात्मिक मानले जाणे, याचा अर्थ अध्यात्म या शब्दाचे समाजाचे आकलन अपुरे असणे आहे. दुसरे असे की, यापैकी प्रत्येकाचे वागणे अत्यंत अलिशान असते. महाप्रचंड मालमत्ता जमा झालेली असते. ती पद्धतशीरपणे अत्यंत मूठभर व्यक्तींच्या हातात केंद्रित असते आणि थोडी समाजोपयोगी कामे करून जणू काही फार मोठी सत्कृत्ये केल्याचे दावे ही मंडळी करत असतात. व्यवस्था परिवर्तनाबद्दल ते कधी चकार शब्द बोलत नाहीत. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता, विषमता, स्त्री-भ्रूणहत्या हे त्यांचे विषयच नसतात.

याउलट गाडगेबाबा, महात्मा गांधी, विनोबाजी यांची परंपरा आहे. गाडगेबाबांनी कोट्यवधी रुपये जमा केले, प्रत्येक पैचा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर स्वत:ची मालमत्ता म्हणून बाळगल्या फक्त चिंध्या, हातातील काठी आणि भिक्षा घेण्यासाठी खापराचा तुकडा. उभा महाराष्ट्र स्वच्छ करण्याचे व्रत घेऊन ते हिंडले. जातीच्या उच्च-नीचतेबद्दल, अंधश्रद्धांबद्दल सतत कडाडून आसूड ओढत राहिले. विनोबाजी संपूर्ण भारतात सतत १२ वर्षे एकदाही आजारी न पडता पदयात्रा करत राहिले. ४२ लाख एकर जमीन त्यांनी दान मिळविली. त्यातील काही लाख जमिनींचे वितरणही केले. बॅरिस्टर असलेले गांधी इंग्लंडमधील कडाक्याच्या थंडीतही एकाच पंचावर राहिले. बादशहालाही तसेच भेटले आणि स्वत:च्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले असतानाही स्वातंत्र्यदिनाला हजर न राहता नौखालीत दंगलग्रस्तांचे अश्रू पुसावयास गेले. ही सर्व माणसे अत्यंत सश्रद्ध होती. देव मानणारी होती. अध्यात्मिक उन्नतीची एक विशिष्ट उंची कष्टसाध्यतेने मिळवलेली होती आणि आजच्या कथित अध्यात्मिक पुरुषांच्यापेक्षा संपूर्ण वेगळी आणि संपूर्ण अस्सल होती. त्यांची परिभाषा देवाची, धर्माची आणि अध्यात्माची होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची परिभाषा ती असण्याचे कारण नाही; पण या विभूतींच्या जीवनातील सकारात्मकतेचा अर्थ लावताना अध्यात्म या शब्दाचा सकारात्मक (कोणी त्याला चळवळीसाठी सोयीस्कर असेही म्हणून शकेल) अर्थ लावण्यास काय हरकत आहे?

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००७)




शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

माझे अध्यात्मिक आकलन (पूर्वार्ध)




माझे अध्यात्मिक आकलन  (पूर्वार्ध)
दाभोलकर, अध्यात्म, धार्मिक, विवेकाधिष्ठित नीती, समाजसुधारकांचा वारसा, धर्मजागर
दोन महिन्यांपूर्वी मी पुणे येथे माझे विज्ञान : माझे अध्यात्म या विषयावर भाषण दिले. कार्यकर्त्यांना व नागरिकांना ते आवडले. नवीन वाटले. यापूर्वी मी महाराष्ट्रात काही ठिकाणी आम्हीच खरे धार्मिक या विषयावरही बोललो होतो. विषयाचे शीर्षक थोडे चकवा देणारे होते, हे खरेच. धर्म न मानणाऱ्या व्यक्तीने मी खरा धार्मिक आहे, असे उच्चारवाने सांगणे यात अंतर्विरोध वाटतोच. असे असतानाही हा विषय घेतला होता, याचे कारण होते. एक तर धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण व राजकारण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न चालू होता. महाराष्ट्रात व दिल्लीतही त्याच मंडळींच्या हातात सत्ता होती. धर्माच्या नैतिक भागाशी त्यांचे काही देणे-घेणे नव्हते. कर्मकांडे, पुरोहितशाही, शोषण, हेच त्यांच्या धर्माचे रूप होते. मी ‘अंनिस’चा कार्यकर्ता होतो. त्यामुळे विवेकाने म्हणजेच विवेकाधिष्ठित नीतीने जगत होतो. या अर्थाने मी धार्मिकपणेच जगत होतो. मी ज्यांच्यापोटी जन्माला आलो, त्यांचा धर्म मला आपोआप लाभला होता. तो सोडून मी दुसरा अधिकृतपणे स्वीकारलेला नव्हता. तोपर्यंत मी जन्माला आलेल्या हिंदू धर्माचाच होतो. मला आपोआपच संत आणि समाजसुधारकांचा वारसा लाभलेला होता आणि त्यांनी सांगितलेला धार्मिकतेचा उदात्त अर्थ मला मान्य होता. हिंदू धर्मातील प्रचंड लवचिकतेमुळे देव न मानणारा, वेद न मानणारा असूनही मी हिंदू राहू शकत होतो. मी धार्मिक नाही, हे जाहीर करण्याची घाई माझ्या वैचारिक विरोधकांना होती. कारण त्यांना धर्म म्हणजे काय, यावर मत प्रदर्शित करणे आणि कृती करणे, यावर राजकीय स्वार्थासाठी एकाधिकारशाही स्थापन करावयाची होती. धर्मासारखे प्रभावी अस्त्र त्यांच्या हातात संपूर्णपणे सोपवण्याऐवजी त्यांच्या धर्मविषयक वैचारिक भूमीवर जाऊन मीच खरा धार्मिक आहे, तुम्ही खोटे धार्मिक आहात,’ असे ठणकावून सांगण्याचा एक डावपेचात्मक पवित्राही त्या विषयाच्या मांडणीत होता.

अलिकडच्या काळात बापू, दादा, परमपूज्य आदी विशेषणांनी संपन्न, अध्यात्मिक महाराजांची प्रचंड चलती आहे. त्यांना अफाट अनुयायी वर्ग लाभत आहे. त्यांचा परवलीचा शब्द अध्यात्म हा आहे. याबाबतचे एक सरधोपट विवेचन सदैव उपलब्ध आहे. गांजलेल्या माणसाला आधार देणारे, त्याच्या वेदनेवर फुंकर घातली जात आहे, असे कृतक समाधान देणारे असे काही या धर्मजागरात, अध्यात्मिक प्रचारात असते आणि त्यामुळे माणसांचा लोंढा त्याकडे वळतो, असे प्रतिपादन असते. ते मर्यादित अर्थाने खरेही आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाने धर्माची चिकित्सा करावयाची, तर धर्माचे समाजशास्त्रीय आकलन ही पूर्वअट असते, असे मला वाटते. मी निरीश्वरवादी आणि कोणताच धर्म न मानणारा आहे. तरीही सामाजिकदृष्ट्या विचार करता धर्माविषयी अज्ञेयवादी भूमिकाच घेणे मला योग्य वाटते. समाजशास्त्रज्ञ व धर्मशास्त्रज्ञ या दोघांनीही अधिक प्रगल्भ व शास्त्रीय आणि सहिष्णू भूमिका स्वीकारण्याची गरज आहे.

धर्म ही सामाजिक संस्था आहे, हे तथ्य धर्मशास्त्रज्ञांनी स्वीकारले तर धर्माचे स्थलकालातीत निकष त्यांना शोधता येतील. त्यातून धार्मिक मूलतत्त्ववादाला हे दूर ठेवू शकतील. धर्माच्या समाजशास्त्रीय अभ्यासकाने जर स्वत:च्या ठिकाणी धार्मिक सहानुकंपा विकसित केली, तर विनोबा अथवा विवेकानंद यांच्यासारख्या काही थोर धर्मचिंतनकारांनी जो धर्माचा उन्नत अर्थ लावला, त्यातून त्याला काही वेगळी दृष्टी लाभू शकेल. मार्क्सवादी असलेले विचारवंत दि. के. बेडेकर यांचाही याबाबत उल्लेख करावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म याबाबतचे विवेचन करताना ही भूमिका माझ्या मनात होती. ही भूमिका योग्य आहे अथवा ही संघटनेची अधिकृत भूमिका आहे, असे नाही, तर या भूमिकेवर विचारमंथन घडून येणे गरजेचे आहे. या कल्पनेतून सूत्ररूपाने ही भूमिका पुढे मांडत आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलची भूमिका सर्वज्ञात आहे आणि त्याबाबत मतभिन्नताही नाही. निरीक्षण ते प्रयोग या प्रक्रियेतून सत्य शोधता येते. वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच नम्र असतो. तो अंतिम सत्याचा दावा करत नाही. सत्याचे सातत्य त्याला महत्त्वाचे वाटते. हे सत्य सार्वत्रिक व वस्तुनिष्ठ असते. वैज्ञानिक दृष्टिकोन आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या आकलनाच्या परिपक्वतेमुळे समाजासमोरील प्रश्नांचीही उत्तरे मिळतात. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रयोगशाळेत न वापरता सर्वत्र वापरावयास हवा.

आता अध्यात्माविषयी
अध्यात्म म्हणजे आत्म्याचा विचार. आत्मा नसतोच, असे मानणाऱ्या विचारसरणीप्रमाणे अध्यात्माची पोकळ चर्चा अर्थहीन असते. ‘जेथे विज्ञान संपते, तेथे अध्यात्म सुरू होते.’ या लोकप्रिय वाक्याचा प्रतिवाद ‘अध्यात्म खूप जुने आहे. त्याने माणसाचे भूक, दारिद्र्य, विषमता याचे कोणतेच प्रश्न सुटेनात आणि विज्ञानामुळेच हे प्रश्न सुटण्याची दिशा लाभली. त्यामुळे अध्यात्मिक जेथे साफ अपुरे ठरले, तेव्हा विज्ञान मानवाच्या मदतीला धावले,’ असा केला जातो. ही जुगलबंदी बाजूला ठेवून आपण मान्यताप्राप्त अध्यात्मिक मांडणीच्या क्षेत्रात जाऊन त्याबाबत बोलणार आहोत.

अध्यात्मिक तत्त्वाच्या स्वरुपाबद्दल मतभिन्नता बरीच आहे. विविध धर्म, पंथ यामध्ये या मांडणीत फरक आहे. तरीही बरीचशी ठोकळ सहमती आहे, ती अशी. दोन प्रकारे अध्यात्माकडे पाहता येते.

१) अध्यात्म हा आधिभौतिक विचार आहे. इहलोकापेक्षा पारलौकिकाचा विचार आहे. ऐहिक जीवनाला त्यामध्ये गौण स्थान आहे. आत्म्याचे मूळ स्वरूप काय आहे, तो व्यक्तीच्या जीवनापूर्वी व जीवनानंतर कुठे राहतो? तो अनेक योनीतून फिरतो का? तो अमर आहे का? हे विश्व कोणी निर्माण केले? त्याचा हेतू काय? हे विश्व चालवते कोण? त्याचा आत्म्याशी संबंध काय? मी कोण? मी माझ्याशीच संवाद करतो म्हणजे काय? डोळे पाहतात हे खरे; पण डोळे कुणामुळे पाहू शकतात? अशा असंख्य प्रश्नांचे उत्तर शोधणे अध्यात्मात येते. धार्मिक गोष्टी व अध्यात्मिक गोष्टी यामध्ये थोडा फरक आहे. अध्यात्मिक तत्त्व हे भौतिकतत्त्वापेक्षा निराळे असे चेतनतत्त्व आहे. निरनिराळ्या कारणांनी ते अज्ञानात पडते, अशुद्ध होते, बंधनात पडते व दु:खी होते. या चेतन तत्त्वाला आत्मज्ञान झाले की, ते सगळ्या बंधनातून मुक्त होईल व त्याला अनंत सुख मिळेल. जगाचे मूलतत्त्व अध्यात्मिक आहे. त्यालाच ईश्वर म्हणतात. व्यक्तीचे सारतत्त्व अध्यात्मिक आहे, त्याला आत्मा म्हणतात. आत्मा व ईश्वर(म्हणजे परमात्मा) याचे जीवाशिवाचे मिलन झाले की आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अवस्था प्राप्त होते. ही अवस्था सच्चिदानंद स्वरुपी असते. याचा अर्थ ती सत् म्हणजे सत्य असते. चित् म्हणजे शाश्वत असते आणि आनंदरूपी तर असतेच असते. दु:खात पडलेल्या अध्यात्मिक तत्त्वाला आत्मज्ञान करून देण्याचा जो मार्ग आहे, त्याला धर्म म्हणतात. हे सर्व ज्ञान मिळण्याचा पाया शब्द व साक्षात्कार हा आहे. शब्द याचा अर्थ अलौकिक शब्द- वेदाप्रमाणे वा प्रेषिताच्या वचनाप्रमाणे. अध्यात्मिक तत्त्व चेतन असते. चेतन असल्यामुळेच आत्मा विचार करू शकतो, त्याला स्मृती असते. त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकते. ते संवेदनक्षम असल्यामुळे त्याला सुख-दु:खाची जाणीव असते. दया, प्रेम, परोपकार, नैतिकता या गोष्टी अध्यात्मिक तत्त्वालाच शक्य असतात. प्रत्येक व्यक्तीला आत्मा असतो. परमेश्वर केवळ एक आत्मा नाही, तो परमात्मा आहे. तो गुणवत्तेच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. आत्म्याचे-परमात्म्याशी मीलन झाले की, स्वाभाविकच या सर्वश्रेष्ठ गुणवत्तेचा लाभ या आत्म्याला होतो. तो आत्मा धारण करणाऱ्या व्यक्तीला होतो. त्याची अपूर्णता भरून निघते. सर्वसंपन्नता प्राप्त होते. तेव्हा प्रत्येकाने जीवनाचा हाच मार्ग अनुसरावयास हवा.

अध्यात्माची वरील कल्पना नाकारावयास हवी. उत्क्रांतीचा अभ्यास असे सांगतो की, सध्याचे ब्रह्मांड एका अमूर्त ऊर्जेतून निर्माण झाले. ब्रह्मांडातील सर्वच गोष्टींची पूर्वज ती स्वयंभू निर्जीव ऊर्जा आहे. तिच्यापासून उत्क्रांती होत होत भौतिक पदार्थ, जीवन व चैतन्य आले. आदिऊर्जेला चेतनशक्ती म्हणता येणार नाही. कारण वैज्ञानिकांनी हे दाखवून दिले आहे की, जिवंत मेंदू म्हणजेच चेतना. त्याशिवाय चैतन्याचे अस्तित्व संभवत नाही. तेव्हा विश्वाचे मूलतत्त्व ज्ञानी, संवेदनशील, नैतिक, न्यायी आणि आनंदस्वरूप आहे, असे मानण्यास काहीही आधार नाही. अमूर्त स्वयंभू निर्जीव ऊर्जेतून भौतिक पदार्थाची, त्यांच्यातून प्राण्याची व त्यांच्यातूनच पुढे चैतन्याचा विशेष विकसित स्तर लाभलेल्या मानवाची निर्मिती झाली. तेव्हा मानव हा देवाचा विशेष लाडका प्राणी आहे, हे खरे नव्हे. उत्क्रांतीच्या विशेष टप्प्यावर पोचू शकलेला प्राणी आहे, एवढेच खरे आहे.

आत्म्याचे परमात्म्याशी मीलन करून आनंदीआनंद निर्माण करण्याच्या या अध्यात्मिक कार्यक्रमातील आणखी एक गंभीर धोकाही दि. के. बेडेकरांनी सांगितला आहे. माणसाच्या जीवनात प्रत्यक्षात दैनंदिन जगण्याचे काही अटळ संघर्षाचे प्रश्न असतात. त्याच्या सोडवणुकीसाठी करावयाच्या संघर्षाऐवजी (अस्तित्वात नसलेल्या) एक परमात्म्याबरोबर जीवा-शिवाची भेट घडून सर्व प्रश्नांपासून सुटका करावयाचा हा मार्ग प्रत्यक्षात व्यक्तिमत्त्व दुभंग करणारा ठरू शकतो. खडतर जीवन व आभासी अध्यात्म यामध्ये मनोव्यापाराचा दुभंगलेपणाच पदरी येण्याची शक्यता जास्त असते.

२)    अध्यात्माचे विनोबाप्रणित रूप सांगते की, अध्यात्म हे मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. मन शुद्ध करण्यासाठी कुंडलिनी योग, सुदर्शन क्रिया, नामजप याची आवश्यकता नाही. स्वत:मधील वासनाविकार गळावेत आणि नैतिक गुण उजळावेत, याची अध्यात्म ही साधना आहे. अध्यात्माचा हा विचार असे मानतो की, भौतिक सुखाच्या पलिकडे जीवनाचे एक श्रेयस आहे आणि भौतिक सुखापेक्षा ते अनंत पटीने मोलाचे आहे. सर्वसामान्य माणसे भौतिक जीवन हेच आयुष्याचे श्रेयस मानतात. अधिकाधिक पैसा, आराम, उपभोग, मानसन्मान यामध्येच जीवनाची कृतार्थता समजतात. परंतु खरा अध्यात्मिक पुरुष याच्या पलिकडे गेलेला असतो. त्याचे जीवन संयमी,             सदाचारी, साधे, अपरिग्रही असे असते, तो करुणेने मानवसन्मुख कृती करतो. याचा अर्थच असा की, जे आचरणात येते ते अध्यात्म. बाकीची नुसतीच पोपटपंची. जे नैतिकदृष्ट्या जागे ठेवते ते नामस्मरण, बाकी नुसताच नावाचा गजर. एखादा महान अध्यात्मिक पुरुष कोट्यधीश आहे. रोज पंचपक्वान्ने जेवतो. सुंदर-सुंदर महागडी रेशमी वस्त्रे परिधान करतो, संगमरवरी महालात राहतो, सतत सुंदर स्त्रियांच्या सहवासात असतो, असे जर बोलले जात असेल तर त्यातील विसंगती ऐकणाऱ्याला आपोआप जाणवते. कारण अध्यात्माचा संबंध विवेकी, संयमी वर्तनाशी, अपरिग्रही जीवनशैलीशी जोडलेला आहे. अध्यात्मिक जाणिवेत आणखी एक सूत्र आहे. अखेर सत्याचाच जय होईल, मांगल्याचा विजय होईल. ही मानवी जीवनाची भावात्मक गरज आहे. यासाठीचा प्रयत्न करण्याचा मार्ग म्हणूनही अध्यात्माकडे पाहता येईल. ही गोष्ट उघड आहे की, सर्वच धर्मांचे एक दर्शन अखेरचा विजय मानवी मांगल्याचाच होईल, हे आहे. धर्मश्रद्धेचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. या अर्थाने विनोबा म्हणतात की, सर्व धर्मांचे अध्यात्म एकच आहे. यापुढे जाऊन विनोबांचे एक प्रख्यात वाक्य आहे- ते असे की, ‘राजकारण वा धर्म जातील, विज्ञान व अध्यात्म राहील.’ या वाक्याचा अर्थ थोडा नीटपणे समजावून घ्यावयास हवा. राजकारण हे उघडपणे हितसंबंधाच्या झटापटीचे क्षेत्र असते. उपलब्ध साधनसामग्रीवर स्वत:चा कब्जा करण्याची ती लढाई असते. विज्ञानाने जगातील सर्वांना पुरेसे मानवी सुख देता येईल, याची उपलब्धी करून ठेवली आहे. मात्र हितसंबंधांच्या राजकीय लढायांत ते आज अशक्यप्राय वाटते. साधी एक आकडेवारी बघितली तरी हे लक्षात येऊ शकेल. भारताचे आजचे संरक्षणाचे बजेट ८७ हजार कोटी रुपये आहे. स्वाभाविकपणेच विकासासाठीचा सर्व पैसा संरक्षणाचे राजकारण फस्त करते. आज संरक्षण खर्च अटळ वाटतो. त्याबाबतचे राजकारण अपरिहार्य वाटते. विनोबा असे चित्र पाहतात की, शहाणा होत जाणारा माणूस एक दिवस या राजकारणातील व्यर्थता ओळखेल आणि त्यावेळी विज्ञानाचा वापर माणसाच्या कल्याणासाठी करण्यात असलेला प्रमुख अडथळा दूर होईल. याचाच पुढचा भाग धर्माचा. राजकारण हा अल्पकालीन धर्म आहे आणि धर्म हे दीर्घकालीन राजकारण आहे, असे डॉ. लोहियांचे एक मार्मिक वाक्य आहे. दीर्घ स्वरुपाचे राजकारण असलेल्या प्रत्येक धर्मात नीती आहे. धर्माचे तत्त्वज्ञान आहे. कर्मकांडे आहेत. पुरोहित आहे आणि शोषणही आहे. या धर्माचा दोन प्रकारे क्षय होईल, असे स्वामी विवेकानंद अथवा विनोबा यांना वाटते. एक तर धर्माच्या ज्या बाबी विज्ञानाच्या नियमाशी उघडपणे विसंगत असतील, त्या गळून पडतील. जसे - गॅलिलिओच बरोबर होता म्हणून उशिरा का होईना पोपला बिनशर्त माफी मागावी लागली; परंतु सर्व धर्मातील गाभ्याचा भाग म्हणजे मानवी मांगल्याचा विजय होईल, हा नैतिकतेच्या विजयावरील विश्वास. यालाच विनोबाजी सर्व धर्मातील समान अध्यात्म म्हणतात. बाकीचे तत्त्वज्ञान, कर्मकांडे, पुरोहितशाही ही धर्माची अनुषंगिक अंगे झाली. ती कधीतरी गळून पडतील आणि फक्त अध्यात्मच विज्ञानासोबत शिल्लक राहील, अशी विनोबांची मांडणी आहे.

अंतिम विजय मांगल्याचाच होईल, हा विश्वास कार्यकारणभावावर आधारित नाही, तसाच तो सर्वस्वी कार्यकारणभावाच्या विरोधीही नाही. सत्याचा विजय होतो; परंतु अनेकदा सपशेल पराभवही होतो, असे व्यवहारात दिसते. अशावेळी रूढ अर्थाने धार्मिक व्यक्ती अखेर सत्याचा विजय परमेश्वरकृपेने होईल, असे म्हणते. हे तिचे प्रतिपादन परमेश्वरावरील तिच्या असलेल्या विश्वासाबरोबरच मांगल्याचाच विजय व्हावा, या सहजस्फूर्त माणुसकीच्या अभिव्यक्तीवरही अवलंबून असते. ज्याचा परमेश्वर आणि धर्म यावर विश्वास नाही, असा माझ्यासारखा माणूस स्वत:ला श्रेयस्कर वाटणाऱ्या; परंतु जी मूल्ये साकार करणे माझ्या शक्तीपलिकडची आहेत, त्याच्या पूर्ततेसाठी धडपडतो, त्यावेळी त्याला देवाधर्माचा आधार उपलब्ध नसतो, हे उघडच आहे. मात्र त्याची भावना अशी असते की, माझ्या शक्तीपलिकडच्या या धडपडीत इतर माणसे मला सहकार्य करतील व मी मला इष्ट वाटणाऱ्या मूल्यांच्या समीप जाऊ शकेन. या भूमिकेतही थेट कार्यकारणभाव नाही. कारण मूल्यासाठीच्या या धडपडीत माणसे सहकार्य करतात, असा अनुभव आहे. तसाच विरोधही करतात, असाही अनुभव आहे. थोडक्यात, हा आशावाद हीदेखील व्यक्त होण्याची एक अभिव्यक्तीच आहे. बारकाईने वरील भूमिका तपासली, तर त्यामध्ये मूळ मुद्द्यातील अंतर्विरोध कमी आहे, असे आढळते.

अध्यात्म साधना
अध्यात्माच्या रूढ साधनांचे बाजार आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्यामुळे त्याबाबत लिहिण्याची गरज नाही. मात्र वरील प्रकारे अध्यात्माचा अभिनव अर्थ सांगणाऱ्या विनोबाजींच्या अध्यात्म साधनेचे मार्गही काहीसे अभिनव आहेत. ते थोडक्यात पुढीलप्रमाणे.
·         अध्यात्माचा सर्वांत मोठा शत्रू अहंकाराची वृत्ती हा आहे. त्याच्यापासून सुटका होण्यासाठी सतत कार्यमग्न राहावयाचे. यामुळे एकाच वेळी अनेक बाबी साधतात. कार्यमग्न राहिल्याने कार्य वाढत राहत, हा फायदा होतोच. कामात यश येते; तर त्यामधून स्वकर्तृत्वाचा अहंकार कर्मातून येतो, तेव्हा अहंकार सोडण्यासाठी कर्मच बंद करावे म्हणजे अहंकार निर्माणच होणार  नाही, असा एक युक्तिवाद केला जातो, तो संपूर्णत: चूक मानावयास हवा. कर्मशून्य आळशीपणा म्हणजे अहंकार सोडणे तर नव्हेच; उलट स्वत:चे कर्तव्य चुकवणे आहे. बी पेरण्याचे कर्तव्य करावेच लागते. त्याच्या फळाची आशा ठेवू नये, ही वृत्ती साधी व्यवहारी आहे. याचे कारण असे की, संस्कृतीच्या विकासाची जी फळे आज कोणीही व्यक्ती चाखते, ते बी कोणीतरी खूप आधी लावलेले असते. स्वाभाविकच आपण लावलेल्या झाडाचे फळही कोणाला तरी नंतरच मिळणार. ते सोडण्याची फार मोठी अध्यामिक अनासक्ती वगैरेची गरज नाही. साधे व्यवहारिक शहाणपणही पुरेसे आहे.
·         अध्यात्मिकतेचा खरा गाभा आहे मन शुद्धीचा. विकारी विचारापासून मुक्ती आणि उन्नत विचाराची अभिव्यक्ती, या दोन्ही बाबी सोप्या नाहीत. सर्व अध्यात्मिक कर्मकांडे याच नावाने चाललेली असतात. कुंडलिनी जागृती, नामजप, सुदर्शनक्रिया या स्वरुपाच्या असंख्य साधना मनःशुद्धीसाठी सांगितल्या जातात. विनोबाजींची याबाबतची कल्पना अफलातून आहे. त्यांचे म्हणणे असे की, जो विश्वात्मा आहे, परमात्मा आहे, तो विश्वात त्याच्या गुणरूपाने प्रकट झाला आहे. व्यक्तीने स्वत:चे मन शुद्ध करायचे म्हणजे निसर्गातील वा व्यक्तीतील प्रत्येकात परमात्मा ज्या गुणरुपाने प्रकट झाला, त्याचे दर्शन घ्यावयाचे, स्तवन करायचे आणि त्याचे ग्रहण करावयाचे. याचा अर्थ स्वत:च्या अध्यात्मिक उन्नतीसाठी स्वत:ची गुणग्राहकता वाढवावयाची. सामान्यपणे व्यक्तीची मानसिकता नेमकी उलट असते. तो दुसऱ्याच्या दोषाचे फार लवकर दर्शन घेतो आणि गुणाकडे दुर्लक्ष करतो.
·         समाज दु:खी आहे. कारण तो स्वार्थी आहे. समाज स्वार्थी वाटतो. कारण त्यातील प्रत्येक व्यक्ती स्वार्थी असते. ती स्वत:चे सुख बघते आणि बहुधा त्यामुळे इतरांना दु:ख होते, हे लक्षात घेत नाही. यासाठी अध्यात्मिक साधना सामूहिक हवी. कारण सामूहिक सुखासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
·         सहजस्फूर्त मानवता हेच अध्यात्माचे रूप आहे आणि ते माणुसकीच्या पायावरच उभे राहू शकते.


क्रमशः
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००७)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...