अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

अंधश्रद्धेमागील धार्मिक आशय



अंधश्रद्धेमागील धार्मिक आशय
 
दाभोलकर, प्रबोधन, विरोध, अंधश्रद्धा
ता. १८ एप्रिल. वेळ रात्रीची १०.३०. स्थळ - सांगलीचे रेल्वे स्टेशन. डॉ. श्रीराम लागू, डॉ. प्रदीप पाटील, उज्ज्वला व मी असे काहीजण गाडीची वाट बघत उभे. देवाचे अस्तित्व, धर्मकल्पना, धर्मांधता, धर्मनिरपेक्षता या विषयावरच्या खुल्या चर्चेचे सांगली जिल्ह्यातील समितीने आयोजित केलेले चार कार्यक्रम संपवून डॉ. लागू परत निघालेले असतात. एवढ्यात १५-२० तरुणांचा घोळका आमच्याकडे येतो. स्वत:ची ओळख जहाल हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून ते करून देतात. वागण्यात अरेरावी, उद्धट आक्रमकता पुरेपूर भरलेली. एकेरीवर येण्याच्या तयारीनेच आलेले. डॉ. लागूंना त्यांचा सवाल, ‘तुमची हिंदुत्ववादी व्याख्या सांगा?’ डॉ. लागूंचा स्पष्ट नकार व सडेतोड उत्तर मला जे सांगावयाचे आहे, मी स्पष्ट आणि सविस्तरपणे जिल्ह्यामध्ये दोन दिवस सांगितले आहे. यात काही बोलण्याची मला अजिबात गरज वाटत नाही. तरुणांचे हुज्जत घालणे सुरूच. हिंदुत्वाची व्याख्या डॉ. लागूंच्याकडून त्यांना ताबडतोब आणि रेल्वे स्टेशनवरच हवी असते. थोडी वादावादी होते. ताणतणाव थोडा वाढतो; परंतु हाताबाहेर जात नाही. सियावर रामचंद्र की जय, जय भवानी, जय शिवाजी घोषणा देत घोळका फलाटावरून निघून जातो. निघून जाण्यापूर्वी हिंदू धर्माबद्दल काही बोलायचे नाही, असा सल्ला (की आदेश?) देण्यास विसरत नाहीत.

प्रसंग छोटासाच; पण अंतर्मुख करावयास लावणारा. अंधश्रद्धा या केवळ अज्ञानातून येत नाहीत त्यामागे कळत-नकळत; परंतु अनेकदा प्रभावीपणे धार्मिक आशय लपलेला असतो. खरा धर्म कोणता आणि धर्माच्या नावाने उभे केलेले अवडंबर कोणते? नीतीचा संबंध कशाशी आहे? आणि कोणत्या बाबी अर्थशून्य, निरर्थक कर्मकांडे आहेत, याचा सारासार विवेक स्वत: करणे, जनमानसाला करावयास लावणे, त्याआधारे नीतिमान आचार-विचारासाठी प्रवृत्त करणे हे सारे म्हणूनच आपल्या चळवळीचे महत्त्वाचे व पायाभूत काम ठरते. अलिकडच्या काळातील समाजात धर्मांध वातावरण उभे करण्याच्या काही प्रवृत्तींच्या प्रभावामुळे धर्मचिकित्सेचे हे काम बरेचसे अवघड झाले आहे. वर लिहिलेला अनुभव हा याच वास्तवाची एक झलक आहे. शिवाय या शक्तींना वैचारिक वादविवादाची आवश्यकताच वाटत नाही. तसे असते तर या चर्चेचे आपण सदैव स्वागतच केले असते. या शक्तींचा वैचारिक चर्चेपेक्षा दुसऱ्यांच्या हिंसक मुस्कटदाबीवर अधिक भर असतो. आपले मतच खरे, यापेक्षा वेगळे मत मांडणारे धर्मद्रोही, देशद्रोही आहेत. त्यांना ठोकून काढणे हेच केवळ इष्ट नव्हे, तर अभिमानास्पद आहे, अशी या शक्तींची, संघटनांची धारणा असते. या शक्ती आपल्या महाराष्ट्रात सध्या बलशाली बनत आहेत. यात दूरगामी धोका संभवतो. परिवर्तनाचे कोणतेच काम या शक्ती यशस्वी होऊ देत नाहीत. त्यांना चिकित्सा नको असते आणि धर्मचिकित्सेला तर त्यांचा कडवट विरोध असतो. धर्माचे विधायक; पण परखड मूल्यमापन करू इच्छिणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला या सामाजिक वातावरणाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. डॉ. लागू यांच्यावर ओढवलेल्या छोट्या प्रसंगातून हा इशारा स्पष्टपणे पुढे येतो. मला वाटते, या वास्तवाचे पुरेसे भान आपल्यातील अनेक कार्यकर्त्यांना जवळपास नाही. मग त्यापलिकडे जाऊन या देशातील धर्मनिरपेक्षता कशी आहे, कशी असावी याबद्दलचे वाचन, चिंतन तर दूरच राहिले. बुवाबाजी, चमत्कार, अंधश्रद्धांचे ढोबळ प्रकार यापलिकडे आपण काही करत आहोत व करू इच्छित आहोत, याची सजगता संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना जेवढ्या लवकर येईल, तेवढे चळवळीचे पाऊल दमदार पुढे पडेल. कौतुक आणि प्रसिद्धी याच्या पलिकडे जाऊन चळवळीकडे अनेक अपेक्षा समाजातील विविध थर व्यक्त करताना स्पष्टपणे जाणवते. याचे भान बाळगून कृती करण्यासाठी आपणही आपला वैचारिकरित्या बरोबरच संघटनात्मक कसही वाढवावयास हवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९३)

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

बुवाबाजीविरोधी लढ्याची वैचारिक भूमिका



बुवाबाजीविरोधी लढ्याची वैचारिक भूमिका
   
दाभोलकर, बुवाबाजी, अंधश्रद्धा, अध्यात्म, दैवी सामर्थ्य, वैज्ञानिक दृष्टिकोन
बुवाबाजीविरुद्धची लढाई हा चळवळीतील नेहमीच आकर्षणबिंदू राहिला आहे. त्यामुळे ‘बुवाबाजी’ या शब्दाची व्याप्ती खूप मोठी ठरते. चिल्लर चमत्कार करून कुंकवाचा बुक्का अथवा हळदीचे कुंकू करणारी बाई ही बुवाबाजीच करत असते आणि ज्याच्या ७० व्या वाढदिवसाला रु. १७० कोटी एवढ्या देणग्या मिळत असतात. तो सत्य साईबाबाही बुवाबाजीच करत असतो. चमत्काराची बुवाबाजी करणाऱ्यांना विरोध करणे तसे सोपे आणि थेट असते. एकतर चमत्कार हे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी उघडपणे विसंगत असतात. घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. त्यामुळे चमत्काराचे अस्तित्व मान्य करणे हे एका अर्थाने कर्तव्यपूर्ती ठरते. दुसऱ्या बाजूने कोणी असा दावा केलाच की, असे दैवी सामर्थ्य माझ्याकडे आहेच, तर त्याला चमत्कार तपासण्याचे खुले आव्हानही देता येते; परंतु एकूण हे प्रकार कमीच असतात. कोणताही चमत्कार न करणारे; परंतु प्रचंड शिष्य वर्ग असलेले अनेक बुवा-बाबा-स्वामी, महाराज आपण पाहत असतो. त्यांच्या भक्तांच्या लेखी हे सर्वजण त्यांचे तारणहारच असतात. ही मानसिकता नीटपणे समजावून घेतल्याशिवाय बुवाबाजीमागच्या वैचारिक लढाईचा अर्थबोध होणार नाही. अर्थातच, या मानसिकतेला अनेक महत्त्वाच्या; पण अनुषंगिक बाबी जोडलेल्या असतात व त्यातूनच बाबांच्या प्रभावाचे अद्भुत रसायन तयार होते.
अध्यात्मिक अधिकार
देवाच्या मूर्ती सर्वत्र असतातच; परंतु काही मूर्तींना विशेष देवत्व प्राप्त झालेले असते. गणपतीची मंदिरे सर्वत्र असतात; परंतु दगडूशेठ हलवाई गणपती किंवा सिद्धिविनायक यांचे महात्म्य वेगळेच असते. बालाजीची मंदिरे नवीन नाहीत. पण तिरुपतीचे बालाजी एकमेवाद्वितीयआहेत. याचे केले जाणारे स्पष्टीकरण एवढेच असू शकते की, या स्थानात अथवा मूर्तीत काही अद्भुत सामर्थ्य हा जादूटोण्याचा प्रकार आहे. परंतु तसे मान्य करणे अशक्यच. प्रत्यक्षात घडते ते असे की, या विशेष पवित्र देवाची उपासना केली तर त्याच्या अद्भुत सामर्थ्याने संकट निवारले जाईल, असे भक्त मानतो. जीवनात लहानमोठ्या कोणत्याही अरिष्टापासून हे दैवी सामर्थ्य आपला बचाव करेल, अशी भावना बाळगली जाते; परंतु बहुतेकवेळा हे सारे स्वत:पाशीच ठेवले जाते, जाहीरपणे कबूल केले जात नाही. या देवांची भक्ती आम्ही करतो यामध्ये आणखी काहीच साधावयाचे नाही. भक्तीच साधावयाची आहे, असा दावा सर्वजण करतात. ही भक्ती कशासाठी याचे उत्तर तत्परतेने असे मिळते की, या भक्तीत जीवनाचे सार्थक आहे. हे सार्थक कशामुळे होते याचे उत्तर येते की, या भक्तीतून जीवनाचे अध्यात्मिक कल्याण घडते. आता म्हणजे काय होते याचा पुरावा द्या, हा प्रश्न अप्रस्तुत असतो. कारण तसा पुरावा मागू नये अशीच धारणा असते. उलट प्रश्न विचारला जातो. पुरावा कसला मागता? त्यांचा अधिकार आहे तसा. पुढे अशीही मल्लिनाथी केली जाते की, आई-वडिलांना, गुरुजनांना प्रत्येक पुरावा मागता काय? आइनस्टाइनसारख्या थोर शास्त्रज्ञाने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. त्यांना पुरावा मागाल काय? वरील सर्वच्या सर्व युक्तिवाद जी माणसे त्यांचे-त्यांचे बाबा, गुरू, महाराज, स्वामी यांच्या भजनी लागलेले असतात त्यांच्याबाबत याचप्रकारे करतात. अध्यात्मिक कल्याण हा आमच्या व्यक्तिगत अनुभूतीचा भाग आहे व त्याचा पुरावा मागण्याची आवश्यकता नाही आणि असा पुरावा मागणे, ही काही फारशी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे श्रद्धेला विनाकारण तडा जातो, असे ठामपणे मांडणारे हे प्रतिपादन आहे.
पुरावा मागण्याची गरज
घटनेमध्ये नागरिकांचे कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मुख्य तत्त्व म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत जेवढा पुरावा, तेवढाच विश्वास ठेवायचा; खरे तर दैनंदिन व्यवहारात देखील ही बाब आपण पाळत असतो किंवा एक विवेकी नागरिक म्हणून पाळावी, अशी अपेक्षा असते.  आई सांगते म्हणून ग्रहणकाळात दारे-खिडक्या बंद करून बसण्याची गरज नसते. वडील जातीसाठी माती खावी या विचाराचे असले, तरी मुलगा आंतरजातीय विवाहावर ठाम राहू शकतो. शाळेत गुरुजी पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते असे नुसतेच शिकवत नाहीत तर त्याचा पुरावा देतात आणि तो पुरावा कसा तपासावयाचा, हे पण शिकवतात. निदान त्यांनी तसेच शिकवावे, अशी रास्त अपेक्षा असते. गुरुजी असलेले ज्येष्ठ हे नंतर सहकारी देखील होऊ शकतात आणि श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही न मानता विचारांचे आदानप्रदान होऊ शकते. आइनस्टाइनचा सिद्धांत समजून घेण्यासाठी पुरेसा अभ्यास व परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणाही सुजाण व्यक्तीला तो समजून घेण्याची धडपड करता येते. समजून घेणेही शक्य होते. न्यूटनच्या सिद्धांतातील त्रुटी आइनस्टाइन दूर करू शकतो आणि त्याच्यामागील उणिवा कोणीही दाखवल्याच तर वैज्ञानिक विश्वात त्याचे स्वागतच होते. थोडक्यात, पुरावा मागणे, त्यासाठी प्रश्न विचारणे हे डोळसपणाचे; तसेच माणसाला पुढे नेणारे वर्तन आहे. लहान मूल अनेक निर्णयांच्यावर आई-वडिलांच्यावर अवलंबून असते. परंतु ते जसजसे मोठे होत जाईल, तसतसे स्वतंत्रपणे स्वत:चे निर्णय घेऊ लागते. व्यक्ती प्रौढ झाल्यावरही आई-वडिलांना विचारूनच प्रत्येक निर्णय घेऊ लागली तर पालकांनी केलेले त्यांचे संगोपन अपुरे व अयोग्य आहे, हे आपण समजू शकतो. या तर्काने असे निश्चितपणे म्हणता येते की, जो गुरू असतो तो शिष्याला दृष्टी देतो, त्याच्या पायावर उभे करतो. जीवनात स्वत:च्या कर्तृत्वाने लढण्याची हिंमत देतो; याउलट आपल्या भक्तांची सर्व जबाबदारी जो गुरू आपल्या अंगावर घेतो, तो त्यांना कायमचा दुबळा करतो, पांगुळगाडा देतो. स्वत:वर अवलंबून राहण्यास भाग पाडतो. अशा गुरूच्या कथित अद्भुत सामर्थ्याला जे शरण जातात ते स्वत:ची सारासार बुद्धी गहाण टाकतात. म्हणजे माणूस म्हणून त्यांची असलेली क्षमताच ते जणू गमावतात. बुवाबाजीची खरी भयानकता ही आहे.
बुवाबाजीची शक्तिस्थाने
वरील विवेचनात तथ्यांश असूनही माणसे फार मोठ्या प्रमाणात बुवाबाजीला बळी पडतात. बाबा, बुवा, महाराज, स्वामी, महंत यांना आपल्या जीवनाचे तारणहार समजतात. हे घडते याच्यामागे अनेक कारणे आहेत, बुवाबाजीची लढाई कशी गुंतागुंतीची आहे, हे या कारणांना समजावून घेतले की स्पष्ट होते.
१. आजही आपल्या समाजात बहुसंख्यांचा असा पारंपरिक विश्वास आहे की, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे. तिचा कृपाप्रसाद या ना त्या स्वरुपात काहीजणांना लाभतो. चमत्कार माझे व्हिजिटिंग कार्ड आहे, असे सत्य साईबाबा म्हणतात ते याच अर्थाने. अशा दैवी सामर्थ्य लाभलेल्या व्यक्तीचे प्रारब्ध समजतात व बदलूदेखील शकतात. महाराजांच्या वरची श्रद्धा हा भवसागर उद्धारून नेईल, असे लोकांना मनोमन वाटते. बाबा वापरत असलेले आत्मा, ब्रह्म, मोक्ष हे शब्द ओळखीचे असतात. त्यांचे अर्थ गूढगहन वाटण्याऐवजी परिचित वाटतात. या शब्दांचा वापर करणारा व्यक्तींच्या मनापर्यंत फारसे काही न करता थेट भिडू शकतो.
२. या देशात सौम्य मनोरुग्ण असलेल्या व्यक्तींचे प्रमाण जवळपास १० टक्के आहे. अशा व्यक्तींना बाबा, बुवा देतात तसला आधार फार हवाहवासा वाटतो. काहीजण जन्मत:च कमी-जास्त प्रमाणात भोळसट असतात. जगातल्या धकाधकीच्या मामल्यात त्यांचा टिकाव लागणे तसे अवघडच असते. त्यांना महाराजांच्या नादी लागणे, हे दुहेरी फायद्याचे ठरते. एक तर आधार मिळाल्याचे समाधान लाभते व दुसरे म्हणजे स्वत:च्या जीवनातील अपयश महाराजांच्या कथित भक्तीच्या सेवेत झाकले जाते. याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. ती अशी की, माणसाचा मेंदू हा मूलत: एका प्राण्याचा मेंदू आहे. उत्क्रांतीच्या काळात माणसात बुद्धी धारण करणारा एक उत्क्रांत अवस्थेतील मानवी मेंदू विकसित झाला. पशुमेंदूच्या उत्क्रांतीचा विचार करता त्यापेक्षा खूपच कमी काळात विकसित झालेला हा मानवी मेंदू या दोन्हीमध्ये पुरेशी सुसंगती नाही, असे आधुनिक संशोधन सांगते. मानवी मेंदूला आपल्याच मेंदूचा एक मोठा भाग असलेल्या प्राणी मेंदूवर व त्याद्वारे व्यक्त होणाऱ्या अतार्किक विचार व वागण्यावर मात करता आलेली नाही. म्हणजेच सदैव वैज्ञानिक दृष्टिकोनाचीच विचार करण्याची क्षमता मानवी मेंदूला अजून लाभलेली नाही. पारंपरिक संस्कार जीवनाच्या प्राथमिक शारीरिक निसर्गप्रेरणा या प्रभावाखाली हा मेंदू आहे. निदान काही प्रमाणात तरी यापासून त्याला मुक्त करणे हे काम शिक्षणप्रक्रियेचे आहे, जे आजही डोळसपणे शिक्षण व्यवस्थेत बहुसंख्य वेळा केले जात नाही. या सर्व मर्यादा माणसाला बुवाबाजीकडे वळण्यासाठी पूरक ठरतात.
३. समाजजीवनात विलक्षण अगतिकता, अस्थिरता व असुरक्षितता आहे. या सर्वांवरचा हुकमी उपाय व सोपा प्रभावी तोडगा यासाठी माणसे बाबाच्या भक्तीत लागतात. आजचे जीवन नियंत्रित करणारे राजकारणी, शेअर बाजारदार, स्मगलर, सिनेकलावंत या सर्वांना सतत एका अस्थिर जीवनातच जगावे लागत असते, उद्याची शाश्वती नसते. अशी माणसे जीवनातल्या वाढत्या गरजांनी रोज अधिकाधिक अगतिक होत आहेत. बेकारी, महागाई, जातीय दंगली, दुष्काळ, व्यसनाधिनता, बायकांची छेडछाड अशा अनेक बाबतीत आपले काहीच चालू शकत नाही म्हणून हताश बनली आहेत. त्याला स्वाभाविकपणेच कोणत्या तरी दैवी आधाराची गरज लागते. ती गरज बाबा भागवतात. महिलांच्याबाबत सततचे असुरक्षिततेचे वातावरण आजूबाजूला असते. त्यांनाही आधार हवाच असतो.
४. अर्थात, परिस्थिती अनुकूल आहे म्हणून बुवा निर्माण होतील; परंतु टिकणार नाहीत. आज समाजामध्ये विविध पातळीवर, विविध स्तरावरील बुवाबाजी वाढलेली दिसते. त्याचे महत्त्वाचे एक कारण हे आहेच, की यामागे संबंधित बुवा, बाबा, महाराज, स्वामी यांची एक पद्धतशीर यंत्रणा आहे. या महाराजांकडे असलेला पैसा, बहुसंख्यांना दिपवून टाकणारा भपका, प्रसारमाध्यमांकडून विकत घेतली जाणारी व्यापक प्रसिद्धी, गरजेनुसार टीकाकारांचा चोख बंदोबस्त करणारे गुंडपुंड या सर्वांना लाभणारा राजकीय लोकांचा आश्रय, हे सारे घटक बुवाबाजी संघटित व समर्थ करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात.
५. या देशातील माणसांचा पारंपरिक तत्त्वज्ञानातूनच कर्मविपाकावर विश्वास आहे. आपण केलेल्या पापाचे फळ भोगावयास लागू नये आणि काही चांगले हातून घडले तर त्याचे फल विनाविलंब मिळावे, यासाठी अशा कोणत्या तरी शक्तींची गरज असते की, ज्यांना माणसाची नियती, संचित, प्रारब्ध समजू शकते. त्याच्या दुष्परिणामापासून माणसाला जे वाचवू शकतात आणि चांगले काही घडावे, यासाठी दैवी आधार पुरवू शकतात. संचित बदलण्याचे हे काम गुरूच्या कृपाप्रसादानेच होईल, अशी बहुसंख्यांची खात्री असते. समाजात असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, ही गोष्ट आणखी तीव्र बनवतो. म्हणूनच अंगावरील वस्त्राचे भान नसलेला चांगले मिष्टान्न जेवण सोडून उकिरड्यावरची शिते चिवडणारा, व्यक्तिगत स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष करणारा, अर्थहीन बडबडणारा, व्यसनात रमलेला असा माणूस आपणाकडे मनोरुग्ण न मानता अवलिया अथवा विदेही असा सद्पुरुष समजतात. ज्या ठिकाणी चिकित्सा तहकूब होते, तेथे बुवाबाजीचे पीक अमाप येते, यात नवल नाही.
बुवाबाजीचे मार्ग
बुवाबाजीचे प्रमाण वाढते व माणसे त्याला बळी पडतात. याचे कारण बुवा, बाबा, महाराज, स्वामी हे संतसाहित्याचा वापर आपल्या सोयीसाठी करतात. या देशात संतांनी धर्माच्या मार्गाने मानवतेचा, करुणेचा मार्ग सांगितला व कृतिशील आचरून दाखवला. उठता-बसता त्यांचे नाव घेणारे या बाबांच्याकडे मात्र असतात; फक्त कोरडे शब्द. ज्यांच्या मुखातून संतांचा उद्घोष होतो ते प्रत्यक्ष वर्तनात कमालीचे मतलबी असतात. त्याची सर्व आखणी व्यक्तिमहात्म्य वाढवणाऱ्या तंत्राची असते. विशिष्ट रंगाचे कपडे, विशिष्ट रंगाची माळ, पेन, बॅज आणि या सर्व ठिकाणी छोट्या-मोठ्या आकारातील महाराजांचा फोटो यातून प्रथम एकजुटीची भावना निर्माण होते. सोबत जीवनाला जणू उद्धारून नेणारा एखादा छोटा-मोठा मंत्र बाबा देत असतोच. या एकजुटीच्या भावनेत एक समाधान व सामर्थ्य असते. पुढे-पुढे त्याची सवय होते. त्याच्याशिवाय राहणे अश्नय बनते किंवा तशी इच्छा झालीच तरी तसे न वागण्याची सक्ती केली जाते. त्यानंतर मग एक गुप्तता निर्माण होते आणि सर्व काही आदेशानुसार चालत राहते. मठ चिल्लर नरेंद्र महाराजाचा असो वा स्वत:ला भगवान समजणाऱ्या ओशो आचार्य रजनीशांचा; प्रक्रिया हीच असते. महाराजांची भक्ती सोडून सर्व जीवन निरर्थक आहे, असे वाटू लागते.    
महाराजांना विरोध करणे महापाप बनते. त्यांना विरोध करणाऱ्या दुर्जनांचा नाश हे पुण्यदायी मानले जाते. महाराजांच्या अनुग्रहानेच जीवनाचे कोटकल्याण होईल, असा संदेश सतत बिंबवला जातो. त्यामुळे भक्त हा कडवा सैनिक बनतो आणि बुवाबाजी ही एक अभेद्य व्यूहरचना बनते. ती टिकवून धरण्यासाठी सतत ब्रेन वॉशिंग व कंडिशनिंग चालू राहते. यामधून भक्ताला संमोहित करणारे वातावरण तयार होते. संमोहन अवस्थेप्रमाणेच माणसाची चिकित्सक बुद्धी तहकूब होते. भक्तांची महाराजांवरील तीव्र भक्ती, प्रीती यामुळे संमोहनसदृश अवस्थेत जाणे सहज शक्य होते. संवेदनाचे भ्रम तयार होऊ शकतात. आजूबाजूला काहीच नसताना चंदनाचा वास येतो. दैवतांचे मंजुळ स्वर कानी पडतात. फारच भाग्यवान असेल तर देवाचे दर्शन घडते. दैवी चमत्काराला साक्षी बनण्याचे परमपुण्य लाभते. बाबांचा शब्द मोक्षाचे दार उघडतो आहे, अशी जाणीव होते. बहुसंख्यवेळा हे संमोहन अवस्थेतील मनोभ्रम असतात. काही वेळेला तो गंभीर मानसिक आजारही असू शकतो, यासोबत पद्धतशीरपणे पिकवलेल्या अफवांचे मोठे पीक असते. सर्व वातावरणाचा संदेश एकच असतो. भक्ताच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी बाबांनी घेतली आहे. ही परमभाग्याची गोष्ट आहे. कारण त्यामुळे भक्ताला भौतिक, भावनिक, अध्यात्मिक, पारलौकिक सर्व आधार एकाचवेळी प्राप्त झाले आहेत.
अध्यात्म आणि बाबा
ज्या अध्यात्मिक कल्याणासाठी बाबांच्याकडे जावयाचे ते आध्यात्मिक कल्याण म्हणजे काय, याची कोणतीही एकसंध व एकवाक्यता असलेली मांडणी नाही. पण तरीही जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते हे वाक्य आवडीने ऐकवले जाते. तसेच अध्यात्मिक यशस्वी जीवन हेच जीवन सार्थक मानले जाते. प्रत्येक धर्माचे, पंथाचे अध्यात्म वेगवेगळे असते. काही वेळा ते विरोधीही असते. ते व्यक्तिसापेक्ष तर असतेच असते, तरीही बौद्धिक प्रतिवादाने माणसाच्या मनातील या अध्यात्मिकतेचा प्रतिवाद करणे जवळपास अश्नय बनते, असा अनुभव आहे. म्हणून यासाठी मी अध्यात्माचा पारंपरिक व जवळपास सर्वमान्य अर्थ घेतो. तो असा आहे की, या विश्व व विश्वाच्या पलिकडे एक चैतन्य आहे. त्याला तुम्ही चैतन्य म्हणा, ब्रह्म म्हणा, परबह्म म्हणा, पारमार्थिक सत्य म्हणा, परमात्मा म्हणा; परंतु असे काहीतरी आहेच. त्याचे स्वरूप सच्चिदानंद आहे. म्हणजेच ते सत्य आहे, शाश्वत आहे आणि आनंद स्वरूप आहे. व्यक्तीच्या जीवनातील आत्मतत्त्व आणि हे परब्रह्म तत्त्व एकमेकाला भेटणे म्हणजे जिवा-शिवाची गाठ पडणे आणि आनंदाचे डोही, आनंद तरंगअशी अवस्था निर्माण होते. आता ही सारी झाली शब्दांची आतषबाजी. यातून नेमके काय म्हणावयाचे आहे किंवा नेमका कोणता अर्थ निघतो, हे स्पष्ट होत नाही. नुसता शब्दबंबाळपणा. परंतु खरा अध्यात्मिक पुरुष ओळखायचा कसा? त्याची सोपी खूण अशी की, अध्यात्मिक व्यक्ती हे मान्यच करते की, भौतिक सुखापलिकडचे जीवनाचे श्रेयस आहे व भौतिक सुखापेक्षा ते अनंत पटीने मोलाचे आहे. असे ज्या व्यक्तीला वाटते ती व्यक्ती त्याचा डांगोरा पिटत बसत नाही, तर त्या व्यक्तीच्या जीवनातच संयम, सदाचार, अपरिग्रह भरून राहिलेले असतात. ती व्यक्ती मानवसन्मुख कृती करते. अध्यात्म ही त्या व्यक्तीच्या मानसिक, आंतरिक विकासाची साधना असते. त्यामुळे जीवनात ही शूचिता व पावित्र्य येते, त्यांचा सहज प्रत्यय इतरांना येतो. जे आचरणात येते ते अध्यात्म. बाकीची सर्व पोकळ बडबड वा पोपटपंची, व्यवहारात नैतिकदृष्ट्या जागे ठेवलेले नामस्मरण, बाकीचा देखावा अथवा नामाचा गजर. थोडक्यात, या निकषावर महाराजांची अध्यात्मिकता तपासता येते, तपासावयास हवी. यासाठी गाडगेबाबांसारखे चांगले उदाहरण शोधून सापडणार नाही. अंगठाबहाद्दर गाडगेबाबांनी कोट्यवधी रुपये जमवले. खर्च केले. प्रत्येक पैशाचा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर स्वत:ची मालमत्ता म्हणून निर्माण केली; फक्त हातातील काठी, अंगावरच्या चिंध्या आणि डोक्यावरच्या खापराचा तुकडा. स्वत: बांधलेल्या भव्य धर्मशाळेत स्वत:ची पत्नी मुक्कामाला गेली आहे, हे समजताच तिला तेथून तरातरा बाहेर काढले. हे वैराग्य आणि अध्यात्म एका बाजूला; तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र महाराजांची काही लाखाची अलिशान गाडी, देशोदेशी पसरलेले निर्मलामातादेवीचे भव्य संगमरवरी प्रासाद, सत्यसाईबाबाचे स्वत:चे विमानतळ. एवढेच कशाला लाखाच्या घरात बिदागी घेऊन ज्ञानेश्वरीचा सप्ताह घालणारे ह.भ.प. आणि निर्माण केलेले विश्वस्त निधी आपल्या घरच्यांच्या मुठीत ठेवणारे अध्यात्मिक महाराज, संयम, सदाचार, अपरिग्रह, शुचिता यांची ही कसोटी मानली तर भोंदू बाबांचे वस्त्रहरण फार लवकर व फार स्पष्टपणे होऊ शकेल.
आपण काय करावे?
बुवाबाजीपासून स्वत: आणि समाज दूर राहण्यासाठी आणि ठेवण्यासाठी असा संकल्प करावयास हवा की, मी स्वत:वरचा विश्वास गमावणार नाही. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे धैर्याने जगणे यात माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत:चे प्रश्न काय आहेत व ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात? याचे भाव आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद याचा वापर करून येते. सर्वमान्य नीतिसंकेताचे पालन करणे यामुळे आचरणात कणखरता येते. स्वत: बुवाबाजीपासून दूर राहणे आणि इतरांना या मानसिक गुलामगिरीतून दूर ठेवणे, यातच जीवनाची सार्थकता आहे. जो गुरू, बाबा, स्वामी, महाराज भक्तांच्या सर्व प्रश्नांची कायमस्वरुपी सर्व उत्तरे आयुष्यभर देण्याची जबाबदारी घेतो, तो त्या भक्ताला अधिकाधिक गाळात नेतो, परावलंबी बनवतो. खरा गुरू भक्ताला पायावर उभे राहून जीवनसंघर्षाच्या रणधुमाळीत लढण्याची हिंमत व ताकद देतो. त्याला सजग समर्थ डोळस बनवतो आणि स्वत:च्या विवेकबुद्धीच्या रूपाने असा एक गुरू तरी आपल्या प्रत्येकाजवळ असतोच असतो. निर्भयपणे आणि कृतिशीलपणे त्याला कौल लावण्यास आपण शिकले पाहिजे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (विशेषांक २०००)

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

निर्मलबाबाचा दूषित बोध



निर्मलबाबाचा दूषित बोध

दाभोलकर, निर्मलबाबा, सिक्स्थ सेन्स, आव्हान, फसवणूक, चमत्कार, संत तुकाराम, अंधश्रद्धा 
झारखंडमधील एका दैनिकामुळे आणि त्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या बातम्यांमुळे निर्मलबाबाचा पर्दाफाश झाला. गेली अनेक वर्षे तो स्वत:ला सहावे अद्भुत इंद्रिय लाभले आहे, असे सांगून लोकांची फसवणूक करत असे. विविध असाध्य आजार बरे करणे, वेगवेगळे प्रश्न सोडवणे यासाठी आपण मदत करतो, असे सांगून तो लोकांकडून हजारो रुपये उकळत असे. ऐसे कैसे झाले भोंदूसारख्या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला साडेतीनशे वर्षांपूर्वीच सावध करून ठेवलेले आहे. पण इतक्या वर्षांनंतरही बुवांच्या नादी लागणाऱ्या आणि स्वत:चे नुकसान करून घेण्याच्या मानसिकतेत बदल झालेला नाही.      
निर्मलबाबाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आणि देशभर जी चर्चा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला होता. त्यामध्ये ते म्हणतात -
ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू।
अंगा लावूनिया राख। डोळे झाकुनी करती पाप।
दावूनी वैराग्याच्या कळा। भोगी विषयाचा सोहळा।
तुका म्हणे सांगू किती। जळो तयांची संगती।।
आज साडेतीनशे वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या बुवांची संगती जळो सोडाच; पण संगती मिळो, अशा पद्धतीने समाजाची वाटचाल सुरू असलेली दिसते. निर्मलबाबाचे कारनामे हे त्याचे ठळक उदाहरण म्हणता येईल. निर्मलबाबाच्या बाबतीत जी माहिती बाहेर आली आहे, त्याप्रमाणे तो त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या नोंदणीसाठी दोन हजार रुपये आकारत असे. माझ्या शक्तीच्या माध्यमातून मी विविध रोग, अगदी असाध्य रोगही बरे करू शकतो, लोकांच्या अडचणी, त्यांच्या चिंता, समस्या दूर करतो, कोणाला नोकरी नसेल तर ती मिळावी यासाठी उपाय सुचवतो, कोणाकडे काही तंटे असतील तर ते सोडवतो, असे तो सांगत असे. हे उपायही कार्यकारणभावाशी विसंगत आहेत. त्याच्याकडे उपाय करून घेण्यासाठी शेकडो लोक येत असत. सामान्यपणे माणसाला पाच इंद्रिये असतात. पण निर्मलबाबा मात्र स्वत:ला सहावे इंद्रिय (सिक्स्थ सेन्स) हे अद्भुत इंद्रिय प्राप्त झाले आहे, ज्याद्वारे आपण संबंधित रोगाचे निदान करतो आणि त्यावर उपचारही करतो, असे सांगत असे. त्यासाठी तो लोकांकडून त्यांच्या पगाराच्या १० टक्के रक्कम घेत असे.
खरे तर त्याचे बुवाबाजीचे स्वरूप, स्वरूप म्हणून नवे काहीच नाही. असे बाबा याआधीही झाले आहेत आणि लोक असेच अंधश्रद्धेला बळी पडत राहिले तर यापुढेही होत राहणार आहेत. निर्मलबाबा हा हायटेकबाबा. त्याचे ताजे ढळढळीत उदाहरण आहे. ज्यावेळी काही चॅनेल्सनी त्याच्याविरोधात आवाज उठवला, त्यावेळी त्याचे हे कारनामे पुढे आले आणि त्याची अमाप संपत्ती उघड झाली. ज्या गोष्टीला आव्हान देणे, कायद्याच्या चौकटीत बसवणे शक्य होते, त्या गोष्टीला याआधीच खरे तर आव्हान द्यायला हवे होते. बाबा अशा प्रकारे रुग्णांवर उपचार करत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून त्याला दहा रुग्ण देण्यात येतील. त्याने त्या रोगावर उपचार करणे दूरच; पण त्या रोगाचे निदान केले तरी त्याला समितीतर्फे २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच असे उपचार हा आजदेखील द ड्रग्ज अँड मॅजीक रेमिडिज ऑब्जेक्शन अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅक्ट १९५४ प्रमाणे दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे तो बाबा, त्याचे कथित चमत्कार दाखवणारे चॅनेल्स यांच्यावर पोलीस कारवाई करू शकतात. यापुढे जाऊन विज्ञानसंस्थांनी जाहीर करावे की, विज्ञानात सहावे इंद्रिय याला काडीचेही स्थान नाही. त्याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. त्याचप्रमाणे लोकांची फसवणूक करून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करणाऱ्या बाबाकडे आयकर विभागाची तरी नजर जायला हवी होती. याचा अर्थ असा की, आहे त्या परिस्थितीतही त्याच्या विरोधात जाणे शक्य होते. आमच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने संकल्पित जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला, त्याचप्रमाणे तो केंद्रानेही मंजूर केला तर अशा बाबांना पाच ते सात वर्षे खडी फोडायला जावे लागेल. मात्र गंमत अशी की, लोक दीर्घकाळ स्वत:ची फसवणूक का आणि कशी करून घेतात? या मानसिकतेविरुद्ध मंगेश पाडगावकर यांची बुवाबाजी ही कविता डोळे उघडायला लावणारी आहे. बुवा नाम जपण्याची नशा देई असे ते आपल्या कवितेत म्हणतात. अशा भोंदू बाबांकडे जाणाऱ्यांची मानसिकता याच्यावरच प्रकाश टाकणारी आहे. पण त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की, माणसे अडचणीत असतात, अगतिक असतात. त्यातून आपली सुटका व्हावी, असे त्यांना वाटत असते. त्यासाठी ते अशा बाबांकडे जातात. पण अशा बाबांकडचे असे उपचार हे त्या रोगापेक्षाही भयंकर असतात. याबरोबरच हेही भान असले पाहिजे की, मनाची अगतिकता हा अशा बाबांसाठी शोषणाच्या धंद्याचा विषय होता कामा नये. याविरोधात काय करता येईल, याची स्पष्ट त्रिसूत्री समितीने मांडली आहे. पहिली बाब अशी की, घटनेत, शैक्षणिक धोरणात, मूल्यशिक्षणात, समाजसुधारकांच्या धोरणात वैज्ञानिक आग्रह आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ कार्यकारणभाव तपासणे. एखाद्या गोष्टीचे कारण काय आहे, ते माझ्या बुद्धीने समजू शकते आणि म्हणून ते कारण बदलताही येऊ शकते, असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. तो असेल तर पराधीन स्वाधीन होतो, परतंत्र स्वतंत्र होतो. ज्यावेळी निर्मलबाबाकडे लोक त्यांचे प्रश्न घेऊन जात असत, तेव्हा तो त्यांना सांगत असे की, तुझे कल्याण कशात आहे ते मला समजते. तू सांगितले नाहीस तरी, मला ते कळते. त्यामुळे मी सांगतो त्याच्यावर श्रद्धा ठेव. याचा अर्थ अशा भोंदू बाबांच्या मागे लागताना आपल्याला शिक्षणाचा, घटनेचा, समाजसुधारकांच्या विचारांचा विसर पडतो. हे थांबणे गरजेचे आहे.
निर्मलजितसिंह नरूला असे या बाबाचे मूळ नाव आहे. आज तो निर्मलबाबा म्हणून ओळखला जातो. इंटरनेटवर त्याच्या तीस लाखांहूनही अधिक लिंक्स आहेत. निर्मलबाबाचे मोठे बंधू मंजितह सध्या लुधियानामध्ये राहतात. निर्मलबाबा छोटा असून तो पतियाळाच्या सामना गावात रहिवासी आहे. देशाची फाळणी झाली, त्यावेळी निर्मलबाबाचे कुटुंबीय भारतात आले. निर्मलबाबा विवाहित असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. झारखंडमधील मेदिनीनगर येथील दिलीपसिंह बग्गा यांच्या तिसऱ्या मुलीशी त्याचा विवाह झाला. छतराचे खासदार आणि झारखंड विधानसभेचा माजी अध्यक्ष इंदरसिंह नामधारी यांचा निर्मलबाबा हा मेहुणा आहे. नामधारी याने दिलेल्या माहितीनुसार १९६४ मध्ये निर्मलबाबाचा विवाह झाला, त्यावेळी तो १३-१४ वर्षांचा होता. १९७०-७१ मध्ये तो मेदिनीनगरमध्ये आला आणि १९८२ पर्यंत तेथेच राहिला. रांचीमध्येही त्याचे घर होते. पण १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उडालेल्या शीखविरोधी दंगलीच्या वेळी त्याने आपले रांचीतील घर विकून टाकले.     
रांचीमध्ये असताना त्याने मेदिनीनगरमधील कंकारी येथे वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला होता. पण, त्यामध्ये त्याला यश आले नाही. त्यानंतर त्याने गढवालमध्ये कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. पण त्यामध्येही त्याला अपयशच आले. नंतर त्याने आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्याचा दावा केला आणि तो लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करू लागला.
झारखंडमधील एका दैनिकाला निर्मलबाबाच्या बँक खात्यांची माहिती मिळाली आणि त्याने बाबाचा पर्दाफाश केला. या दैनिकाला मिळालेल्या माहितीनुसार या बँक खात्यामध्ये फक्त यावर्षी (जानेवारी २०१२ ते एप्रिल २०१२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत) १०९ कोटी रुपये जमा झाले आहेत. याचा अर्थ रोज सुमारे १.११ कोटी रुपये जमा झाले. हे पैसे केवळ झारखंड, बिहार, बंगालमधून जमा झालेले नसून ते संपूर्ण देशातून जमा झाले आहेत; एका बँक खात्यामध्ये १२ एप्रिल २०१२ ला १४.९३ कोटी रुपये; तेही सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत जमा झाले आहेत. संध्याकाळपर्यंत या खात्यामध्ये सुमारे ९६ कोटी रुपये जमा झाले. हे खाते ‘निर्मल दरबार’ या नावाने आहे. एका बँकेमध्ये बाबाच्या नावावर २५ कोटी रुपयांचे फिक्सड् डिपॉझिटही आहे. बाबा जाहिराती, न्यूज चॅनेल्स यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतो. ही रक्कम २५ हजारांपासून ५.५ लाख प्रतिएपिसोड असते. बाबाचे चॅनेल्सवर जेवढे कार्यक्रम होतात, ते सारे पेडच असतात. बाबाच्या सत्संगमध्ये भाग घेण्यासाठी फक्त सर्वसामान्य माणसेच येतात, असे नाही तर मोठमोठे अधिकारी, राजकीय नेते, सॉफ्टवेअर इंजिनिअरही येथे येतात.
अशा प्रकारांमध्ये माध्यमांनी; विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी बेजबाबदारपणा दाखवला. त्यांनी  निर्मलबाबाला सतत आपल्या वाहिन्यांवर दाखवल्याने तो देशभर पसरला. स्वत:च्या धंद्यासाठी लोकांची फसवणूक करणारा निर्मलबाबा सातत्याने प्रेक्षकांसमोर दाखवण्यात येत होता, त्यावेळी आपण काय दाखवत आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत, याचे भान माध्यमांनी; विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ठेवायला हवे होते. या माध्यमांना सेन्सॉरशिप नको असेल तर त्यांनी स्वत:ची आचारसंहिता तयार करावी. राजकीय नेतृत्वानेही निर्मलबाबा प्रकरणातून धडा घ्यायला हवा. बुवाबाजी हा स्पष्ट भ्रम आहे. १७ वर्षे पंतप्रधानपदी असणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे कधीही कोणत्याही बाबाच्या मागे गेले नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात शरद पवार यांचे वर्तनही तसेच आहे. तेही कधी कोणत्या बाबाकडे गेले नाहीत. पण, इतर अनेक राजकीय नेतेही बुवांच्या नादी लागतात.
   
निर्मलबाबा प्रकरणातून सामान्यांनीही बोध घ्यायला हवा. प्रत्येक व्यक्तीने असा निर्धार करावा की, मी स्वत:वरचा विश्वास गमावणार नाही. मी माणुसकीने, प्रामाणिकपणे, निर्भयपणे जगेन. यातच खरी प्रतिष्ठा आहे. विवेकाने जगत असताना प्रश्न काय आहेत, ते सोडवण्यासाठी काय करायला हवे, याचे भान येते. हे आत्मभान हा जीवनाचा पाया आणि कणा आहे. जीवनातील प्रश्नांची सर्वकालीन उत्तरे देण्याचा दावा करणारे बाबा हे व्यक्तीला मानसिक गुलाम करतात आणि कायमचे पांगळे करून टाकतात. हा विचार आपल्या मनामध्ये कायम असायला हवा आणि तो सर्वदूर पोचवायला हवा.
निर्मलबाबाविरुद्ध एफआयआर दाखल
स्वयंघोषित देवदूत निर्मलबाबा याच्याविरुद्ध फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरविण्याच्या आरोपांवरून प्राथमिक माहिती अहवाल (एफ.आय.आर.) दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ ठाकूर यांच्या दोन मुलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी  एफ.आय.आर. दाखल करण्याचे आदेश दिले. या तक्रारीवरील आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
-दैनिक सकाळ (१३ मे २०१२)
निर्मलबाबाविरोधात अटक वॉरंट
स्वत:ला दिव्यसाक्षात्कारी मानणाऱ्या निर्मलसिंह निरूला ऊर्फ निर्मलबाबाविरोधात बिहारमधील अररिया जिल्ह्यात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट येथील स्थानिक न्यायालयाने लागू केले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख शिवदीप लांडे यांनी सांगितले की, निर्मलबाबा याच्यावर फसवणूक व धोकेबाजी केल्याचा आरोप आहे.
-दैनिक पुढारी (२० मे २०१२)

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जून २०१२)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...