बुवाबाजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बुवाबाजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

आपण मनावर घेतले तर...




आपण मनावर घेतले तर...
दाभोलकर, बुवाबाजी, अस्लमबाबा, हाताच्या बोटांनी ऑपरेशन्स
प्रिय आर. आर.
 स. न. वि. वि.
एका मोठ्या राज्याच्या गृहमंत्र्याला, एका बाबाला आवरा, असे साकडे घालण्याची पाळी यावयास नको होती, हे मला समजते. पण परिस्थितीचे गांभीर्यच तसे करायला मला भाग पाडत आहे. कर्नाटकातल्या चंदनचोर वीरप्पनला पोलिसांची पाळत तरी सतत चुकवावी लागते. कर्नाटकातला अस्लमबाबा तेवढाच खतरनाक. पण तो महाराष्ट्रातल्या हजारो लोकांच्या आरोग्यावर उपचाराच्या नावाने दिवसाढवळ्या दरोडा घालून वर उजळमाथ्याने वावरतो. दोघेही दहशतवादीच; पण अस्लमबाबाचे कृत्य अधिक गंभीर. कारण स्वत:च्या करणीला तो थेट कुराणाचे समर्थन देतो.

आबा, अस्लमबाबाचा हा हंगामा जवळपास गेली वर्षभर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून वादळासारखा फिरत आहे. हजारो लोकांना घेऊन गोंदिया-गडचिरोली ते सिंधुदुर्गपर्यंतच्या गाड्या अहोरात्र बागलकोटला पळत आहेत. अस्लमबाबा हाताच्या बोटांनी मोठमोठी ऑपरेशन्स पंधरा मिनिटात करतो. अपेंडिक्स, मूतखडे, कॅन्सरच्या गाठी अद्भुत शक्तीने हा-हा म्हणता काढतो. सोबत झाडपाल्याची दवा दिली जाते. रोजची गर्दी तीन-चार हजारांची. बहुसंख्य महाराष्ट्रीय. हजारजणांवर रोज उपचार (!) होतात. सरासरी पाचशे रुपयांप्रमाणे रु. पाच लाखांचा रोजचा गल्ला जमतो. उरलेले सर्वजण उपचाराच्या अत्यंत गलिच्छ बकाल जागेत गैरसोय सोसून आपल्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी नंबर येईपर्यंतचे दिवस जीव मुठीत धरून राहतात. प्रत्यक्षात भल्यामोठ्या फसवणुकीचे बळी ठरतात. आजार असाध्य असतात, माणसे अडचणीत असतात; पण लोकांची अगतिकता हा लुटारू धंद्याचा परवाना ठरावा काय? डॉक्टरी उपाय महाग खरेच; पण हा उपायदेखील भरपूर पैसे मोजायला लावतोय. समाजसुधारकांची नामावली उठता-बसता घेणाऱ्या महाराष्ट्राच्या शासनाने थंड, तटस्थ नजरेने जनतेची ही नागवणूक पाहावी काय?

गृहमंत्री महोदय, दोन वर्षांपूर्वी ही कीड थेट महाराष्ट्राच्या भूमीवर पसरू पाहत होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शर्थीने ती रोखली. अस्लमबाबाचे सोलापूरला उपचार शिबीर होते. समितीच्या प्रयत्नाने त्यात पोलीस हस्तक्षेप झाला. गुन्हा दाखल झाल्यामुळे अस्लमबाबाला नंतर महाराष्ट्रातले आपले काळे कारनामे थांबवावे लागले. या कारवाईच्या वेळी सोलापूरच्या जिल्हा  शल्यचिकित्सकांनी वस्तुस्थितीच्या पाहणीसाठी तज्ज्ञ सर्जन असलेल्यांची नेमणूक केली. त्यांचा अहवाल आरोग्य खात्याकडून मिळवून नामदार महोदय, आपण जरूर वाचावा. आपल्या रेडी रेफरन्ससाठी या पत्रात त्यातील काही बाबींचा फक्त उल्लेख करतो.

अस्लमबाबांची दस्तूरखुद्द जबानी असे सांगते की, मी पाच वर्षांचा असताना कुराण, सहा वर्षांचा असताना वेद, सात वर्षांचा असताना बायबल व नऊ वर्षांचा असताना सर्व हिस्ट्री वाचली. अल्लाहतालाच्या कृपेने वयाच्या दहाव्या वर्षापासून रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करू लागलो. एचआयव्ही, टी.बी., ब्लड कॅन्सर, टक्कल पडणे, कातडीचे आजार या सर्वांवर मी उपचार करतो. मी हार्ट, स्टमक स्टोनसाठी ऑपरेशन करतो. सैतानाचाही इलाज करतो. निदान करण्यासाठी मला रुग्णाला हात लावण्याची कधी गरज भासत नाही. कोणत्या रुग्णाला औषध द्यावयाचे व कोणाचे ऑपरेशन करावयाचे, हे मी कुराण व हादीसच्या आधारे ठरवितो. या ग्रंथांच्या हिशोबाने जगात ३५०० आजार आहेत. त्यापैकी १००० दवा से व १००० दुवा से बरे होतात. हजारांसाठी ऑपरेशनची गरज पडते; तर ५०० आपोआप बरे होतात. ऑपरेशनासाठी रुग्णाला भूल देण्याची गरज मला भासत नाही. पाण्याने हात ओले करून बोटे पोटात अथवा छातीत खुपसून मी ऑपरेशन करतो. हृदयाचे व्हॉल्व्हज् बिघडले असतील तर छातीत बोटे खुपसून मी हे व्हॉल्व्ह बाहेर काढतो, रिपेअर करतो व जागेवर ठेवतो. टाके न घालता पंधरा मिनिटांत जखम बरी होते. ऑपरेशननंतर काही काळजी, औषधे लागत नाहीत. ही ऑपरेशन्स ही अल्लाहची देन आहे. हजारो रुग्ण येतात. त्यामुळे कशाचीही नोंद ठेवली जात नाही. गृहमंत्री महोदय, कारवाई करण्यासाठी आणखी कुठल्या कबुलीजबाबाची गरज आहे? विशेष म्हणजे दोन तास थांबून व कबूल करूनही बाबा एकही ऑपरेशन तज्ज्ञ सर्जनला दाखवू शकला नाही. आर. आर. पाटीलसाहेब, महाराष्ट्रात ज्याची दुकानदारी आम्ही रोखली, त्याने बागलकोटला आता सुपर मार्केट खोलले आहे. एके काळी खाटिकाचा धंदा करणारा अस्लमबाबा प्राण्याच्या आतड्याचे, मांसाचे तुकडे ऑपरेशनमधून काढले म्हणून रुग्णाच्या हातावर ठेवत आहे. गुंडाची यंत्रणा मजबूत आहे. धंदा वाढवण्यासाठी स्वत:च्या अद्भुत ऑपरेशनच्या सी. डी. काढणारा हा पहिलाच हायटेकबाबा. टेम्पो ट्रॅक्सने रुग्णांना वाहून आणणाऱ्या वाहनचालकांना व्यवस्थितपणे धंद्याचे एजंट बनविण्यात आले आहे. दोनशे एकर जमीन खरीदण्यात आली आहे. त्याला स्थानिक पाठिंबा शून्य आहे. कर्नाटकातील रुग्ण कमीच आहेत. भरभरून गर्दी करत आहे आणि स्वत:चा वेळ, श्रम, बुद्धी, पैसा वाया घालवून बसत आहे, ती बहुसंख्येने महाराष्ट्राची रयत.

सुजाण नामदार महोदय, गेली वर्षभर आम्ही या विरोधात शक्य तेवढा आवाज उठवला; पण आम्ही अपुरे पडलो आहोत. काही वृत्तपत्रांनी अस्लमबाबाची बुवाबाजी फार तपशीलवारपणे व पोटतिडकीने मांडली; पण जनांचा प्रवाह थांबवण्यासाठी तेही अपुरे ठरले आहे. वृत्तवाहिन्यांनीही बातम्या दिल्या, तरीही अपेक्षित परिणाम साधलेला नाही. यापैकी कशावरही आपण नजर टाकली तर आपला महाराष्ट्रीय बांधव कसा व किती लुटला जात आहे, त्याच्या आजाराचा अस्लमबाबा कसा लिलाव मांडत आहे, याची कल्पना आपणास येईल. ही संतापजनक नागवणूक अजूनही मोठ्या प्रमाणावर चालू असल्याची माहितीही आपले अधिकारी आपल्याला देतील.

आबा, आपल्याला साकडे घालण्याचे आणखी एक कारण म्हणजे उत्तर कर्नाटकचे पोलीस महासंचालक पी. ओमप्रकाश यांची मी अलिकडेच बेळगावला भेट घेतली. अस्लमबाबावर कारवाईची मागणी केली आणि त्यांनी माझी साफ निराशा केली. कोणत्या कायद्याखाली कारवाई करू, असा प्रतिप्रश्न त्यांनी मला केला. बड्या मुस्लिम राजकीय नेत्याचा अस्लमबाबाला कसा पाठिंबा आहे, याची रेकॉर्ड वाजविली. अस्लमबाबा पोटावर पांढरा कागद पसरतो, मग ऑपरेशन करतो. कागद लाल रंगाने न्हाऊन निघतो, ते रक्त समजले जाते. तो तांबडा रंग कशाचा आहे, रक्ताचा असल्यास ते रक्त प्राण्याचे आहे का? माणसाचे असल्यास ऑपरेशन केलेल्या व्यक्तीच्या रक्तगटाचेच ते रक्त आहे का? काढलेला मांसाचा तुकडा तपासल्यावर त्यातील पेशी काय सांगतात, असे साधे प्रश्न त्यांना सुचले नव्हते आणि सांगितल्यावर बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर असे बजावत अस्लमबाबाच्या मुसक्या आवळण्याची त्यांची तयारी नव्हती.

मा. आर. आर. पाटील, छत्रपती शिवरायांचा कल्याणकारी वारसा आपण सांगता ना? मग शासकीय प्रसारमाध्यमांना प्रभावीपणे वापरून बागलकोटला फसण्यासाठी जाणाऱ्या आपल्या बांधवांचे लोंढे कृपया थांबवा! आरोग्यासाठी तरी कॉलऱ्याची लस टोचण्यापासून, पाणी उकळून पिण्याची सक्ती करणारे शासन, प्रखर प्रचारमोहिमेतून जनमानसाला अस्लमबाबाच्या मायाजालापासून नक्कीच बऱ्याच प्रमाणात रोखू शकते. अस्लमबाबावर सोलापूर कोर्टात दखलपात्र गुन्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखल करून दोन वर्षे झाली. हा खटला जनहितार्थ त्वरित चालविण्याची विनंती आपण न्यायमूर्तींना करावी. आम्हाला या निर्णयातून अस्लमबाबाला धडा मिळण्याची मोठी आशा वाटते. कर्नाटक सरकारच्या गृहखात्यालाही आपण लिहावे. त्यांची कारवाईची हिंमत होत नसेल, तर आपले तडफदार अधिकारी पाठवावेत. कर्नाटकच्या वा महाराष्ट्राच्या तुरुंगात खडी फोडण्यासाठी अस्लमबाबाची लवकरात लवकर रवानगी होईल, हे पाहावे.
यातले काहीच होणे नसेल, तर मात्र अस्लमबाबाला सन्मानपूर्वक महाराष्ट्रात बोलवावे. आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू करावे. कोट्यवधी रुपयाची वैद्यकीय महाविद्यालये आणि लक्षावधी रुपयांच्या फीचा विद्यार्थ्यांना भुर्दंड यापेक्षा अस्लमबाबा विद्यापीठाची डिग्री सुरू करावी. आपण अनेक वर्षे महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ केवळ पाहत नाहीत, तर त्याचे सक्रिय साथीदार आहात. नरेंद्र महाराजाच्या बुवाबाजीविरोधी पहिला प्रखर संघर्ष तासगावात सात वर्षांपूर्वी झडला, त्यावेळी आपणच तर त्यात अग्रभागी होता. आपण मनावर घेतलेत तर अस्लमबाबाची बदमाषी कठोरपणे व त्वरित बंद करू शकाल, असा विश्वास वाटतो. आपण तो सार्थ ठरवाल या अपेक्षेने, हा पत्रप्रपंच.
आपला,
नरेंद्र दाभोलकर.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००४)




गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

बुवाबाजीवर हल्लाबोल



बुवाबाजीवर हल्लाबोल
दाभोलकर, बुवाबाजी, निळूभाऊ फुले, डॉ. लागू, प्रबोधन, आर्थिक सहाय्य
सुप्रसिद्ध अभिनेते निळूभाऊ फुले आपल्या चळवळीसाठी नेहमीच वेळ देतात. नम्रपणे असंही सांगतात, माझ्यामुळे गर्दी जमते, तुमचे काम होते, तेवढीच मदत.’ पाच मिनिटांचे छोटेसे भाषणही करतात. त्यापेक्षा जास्त अंधश्रद्धेवर बोललेले मी त्यांना कधीच ऐकलेले नाही.

बार्शीला काय झालं?
बुवाबाजीवर हल्लाबोल मोहिमेसाठी निळूभाऊंचा सोलापूर जिल्हा दौरा होता. १९ डिसेंबरला सायंकाळी बार्शीला जाहीर कार्यक्रम. कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम केलेले. प्रचंड गर्दी. कार्यक्रम सुरू झाला आणि लक्षात आले ध्वनिक्षेपक साथ देत नाही. गर्दीच्या निम्म्यापर्यंतही आवाज पोचत नाही. स्वागतगीत, पाहुण्यांचा परिचय, प्रास्ताविक सारे उरकले गेले. श्रोत्यांच्यापर्यंत न पोचताच पर्यायी ध्वनिक्षेपकासाठीही धावाधाव सुरू झाली. गर्दीवर ताबा मिळविण्यासाठी राम नगरकरांचा हुकमी एक्का वापरला. निपाणीकरांनी प्रयोग पाहण्याचे आवाहन केले; पण प्रेक्षकांची गडबड सुरूच. या सर्व गोंधळात दुसरा कुठलाही ज्येष्ठ अभिनेता संयोजकांना दोष लावून कधीच निघून गेला असता. निळूभाऊ शांतपणे बसून होते. शेवटी अखेरचे वक्ते म्हणून ते उठले. लोक एकदम शांत झाले. तोपर्यंत ध्वनिव्यवस्थाही सुधारली होती. निळूभाऊंचा आवाज सर्वत्र पोचत होता. नेहमी पाच मिनिटात भाषण आटोपणाऱ्या निळूभाऊंनी ओळखले की, किल्ला लढवायला फक्त आपणच शिल्लक आहोत. पाच-सात हजार लोकांच्यापर्यंत काही विचार तर पोचायला हवा आणि त्यांनी मोठ्या तळमळीने, सामर्थ्याने, कार्यकर्त्यांच्या पोटतिडकीने ते काम केले. ते खाली बसले. सभा पूर्ण ताब्यात आली होती. मग चमत्काराच्या प्रयोगापासून सारे सुरळीत झाले.

निळूभाऊंना याची काय गरज होती? ते निघून जाऊ शकत होते, बोलायचे नाकारू शकत होते, दोन मिनिटांचे भाषण करून थांबू शकत होते. पण त्यांनी ते केले नाही. कारण त्यांच्या श्रेष्ठ कलावंताच्याही पलिकडे असलेला सच्चा कार्यकर्ता जागा होता. माझ्या मनात विचार येतो, आपण जे कार्यकर्ते आहोत त्यांच्यामध्ये तरी स्वत:च्या पलिकडे जाण्याचा हा सच्चेपणा जागा आहे काय? क्षुल्लक राग-लोभ, खरे-खोटे, रूसवे-फुगवे, मानापमान, व्यक्तिगत हवेदावे यांचे दर्शन काम करत असताना अनेकदा होते. चळवळीबाबत तरी सहजपणे स्वत:ला विसरण्याची जी वृत्ती हवी, ती दिसत नाही. सगळ्या जगाची चिकित्सा करावयास निघालेलो आपण तरी याबाबत स्वत:ची चिकित्सा करावयास नको काय?

सोलापूर जिल्ह्यातील प्रतिसाद मन सुखावणारा होता. सर्व शाखांनी केलेले संघटन कौतुकास्पद होते. मात्र अशा कार्यक्रमाला आणि अंधश्रद्धांविरुद्ध लढताना दिसणारा उत्साह संघटनात्मक कामात कुठे लुप्त पावतो, हे मला एक कोडेच आहे. हा प्रश्न कोणत्या एका जिल्ह्याचा नाही, तर सर्व महाराष्ट्राचा आहे. शिबिरे जोरात होतात; पण त्यानंतर पाठपुरावा करून संघटना वाढ होत नाही. धडाकेबाज कार्यक्रम होतात; पण त्याचे रिपोर्टिंग आपल्या वार्तापत्राला कधीच होत नाही. शाखेच्या चळवळीची वृत्तपत्रात बातमी येते; पण शाखेने संलग्नता फी पाठवलेलीच नसते. पत्रे पाठवूनही किमान गरजेच्या संघटनात्मक बाबींची पूर्तताही होत नाही. त्यामुळे होते असे की, आपले दोष सुधारणे राहूनच जाते.

साधे प्रयोग सादरीकरणाचे बघा ना! हा आपल्या चळवळीतील सर्वाधिक आकर्षण असलेला भाग आहे. हे प्रयोग सादर कसे करावेत, ते आटोपशीर; पण परिणामकारक कसे घडवावेत, केवळ जादूचे प्रयोग असे स्वरूप त्याला न येता बुवाबाजी व अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यासोबत कसा पोचवावा, नवनवे चमत्कार कसे शिकत राहावे, याबाबत आपणा सर्वांनाच खूप शिकण्यासारखे आहे. ते आता आवश्यकही होऊन बसले आहे. नाहीतर मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांची निराशा होते, असा अनुभव येतो. हा गलथानपणा मग विचारात तर येतोच. मूलभूत वैचारिक मांडणी हा भाग जांभया येणारा. त्यात शिस्तीचा अभाव असला की, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. डॉ. श्रीराम लागू हे आपल्या चळवळीचे ज्येष्ठ मित्र. त्यांनी महाराष्ट्र टाईम्ससारख्या मातब्बर दैनिकात लेख लिहिला, ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी परमेश्वराला निवृत्त करा. महाराष्ट्रभर त्यामुळे काही खळबळ उडालेली मला जाणवली. पण आपल्या केंद्रांचे काय? कोणकोणत्या शाखेवर या लेखकावर चर्चा झाली? वादविवाद झडले? आपली बाजू काय, हे मांडण्याचा प्रयत्न झाला. आपल्यासारख्या बुद्धिवादी चळवळीत विचारमंथनही पूर्वअटच नाही का?

हे विचारमंथन सतत घडत राहिले की काय होते? कोकणातल्या संकल्पित शोध भुताचा मोहिमेसाठी दापोलीला वक्ता प्रशिक्षण शिबीर होते. पुण्याहून कार्यकर्ते गेले होते. भुताची तीच ती माहिती आणि किस्से आता बहुतेक कार्यकर्त्यांना पाठ झालेत. मग विषयाचे नाविन्यच संपते. पुण्याहून गेलेले डॉ. विद्याधर बोरकर, उज्ज्वला परांजपे, शुभांगी शहा यांनी मन, मनाचे आजार, भ्रम घडणे ही घटना याबाबत बरीच नवी माहिती अभ्यासपूर्वक देण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय वक्तृत्वकलेबद्दलही सांगितले. शिबिरार्थींना बरेच काही नवीन मिळाल्याचे मला नंतर शिबिरार्थींकडून समजले आणि खूप बरे वाटले.
आणखी एक जाता-जाता. भाषणाची बरीच निमंत्रणे येतात. तुम्हालाही कमी-जास्त प्रमाणात येत असणारच. अलिकडे मला असे जाणवू लागले आहे की, तथाकथित प्रतिष्ठित संस्थांना आपाल्याला बोलवण्याचे अगत्य वाटू लागले आहे. मला विचाराल तर हे समाजमान्यतेचे लक्षण आहे; तसेच धोक्याचा इशाराही. आपण कोणाकरिता लढत आहोत? अंधश्रद्धेच्या जोखडातून आपण कोणाला मुक्त करू इच्छितो, याचे नि:संदिग्ध उत्तरात पहिल्यांदा ग्रामीण गरीब जनता, दलित वस्त्या, झोपडपट्ट्या; त्यातही प्राधान्याने महिला आणि संस्कारक्षम विद्यार्थी असे आहे. याठिकाणी पोचणे अवघड असेल, त्रासाचेही. सुरुवातीस संस्थांच्या निमंत्रणाची सोय तेथे नसेल, तरीही आपण मात्र आपली ताकद, श्रम, वेळ, पैसा कोठे द्यावयाचा, याबाबत पुरेसे डोळस आणि कृतिशील असले पाहिजे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी १९९२)

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

बुवा तेथे राजकारणी



बुवा तेथे राजकारणी

दाभोलकर, बुवाबाजी, नरेंद्र महाराज, नाना महाराज, अध्यात्म, शोधक पत्रकारिता   
बुवा, बाबा, स्वामी, महाराज, कथित संत-महंत यांचा एक खळाळलेला प्रवाह संपूर्ण भारतात; आणि स्वाभाविकपणे त्याच जोमदारपणे महाराष्ट्रातही वाहत आहे. जागतिकीकरणामुळे सैरभैर बनलेला जनसमूह, धार्मिक राजकारणासाठी लोकांच्या धर्मभावनांना उधाण आणण्याचा चाललेला धंदा, नंबर दोनच्या अर्थव्यवस्थेचा प्रभाव, त्या पैशाच्या आधारे विकत घेतलेल्या प्रसारमाध्यमांचे गारूड अशी अनेक कारणे यामागे आहेतच. परंतु त्यातील एक विशेष पैलू म्हणजे सर्व पक्षांच्या राजकारण्यांनी या वाहत्या गंगेत स्नान करण्यासाठी दाखवलेला उतावळेपणा. ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे नाणीजला नरेंद्र महाराजाच्या दर्शनास गेले, त्याच दिवशी पुट्टपर्थीला सत्य साईबाबाच्यापुढे नम्रतेने झुकलेल्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची छबी वृत्तपत्रात झळकली. हे कमी म्हणून की काय, अलिबागला नगराध्यक्षा सौ. सुनीता नाईक यांनी नरेंद्र महाराजांना मानपत्र दिले. घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य सांगितले आहे. अशा वेळी स्वत:ला उघडपणे चमत्काराचा अवतार म्हणवून घेणाऱ्या व चिल्लर चमत्कार (म्हणजेच जादूचे प्रयोग) आपल्या दैवीशक्तीचा आविष्कार म्हणून दाखवणाऱ्या सत्य साईबाबाकडे जाताना देशाच्या पंतप्रधानांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे हे कर्तव्य आडवे झाले नाही. उठता-बसता फुले-शाहू-आंबेडकरांची भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नरेंद्र महाराजांच्यावर स्तुतिसुमने उधळताना हा वारसा आठवला नाही. हायटेक मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आधुनिक मन सत्य साईबाबापुढे झुकताना खंतावले नाही आणि आजही जो पक्ष निष्ठेने मार्क्सवादाचे नाव घेतो त्या शेतकरी कामगार पक्षाच्या नगराध्यक्षा सौ. सुनीता नाईक यांना नरेंद्र महाराजांना मानपत्र देताना गंभीर चूक घडते आहे, असे जाणवले नाही.
नाणीज भेटीचा नमुना
मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नरेंद्र महाराजाला भेटावयास जाण्यास रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसवाल्यांचा स्पष्ट विरोध होता. त्यांनी जाऊ नये, यासाठी प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयात सतत प्रयत्न केला, जो निष्फळ ठरला. समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री वादग्रस्त बाबाच्या भेटीला जातात. त्यामुळे संत आणि समाजसुधारकांपेक्षा बाबाचे पारडे जड झाल्याचा संदेश जातो. याचा देखावा रत्नागिरी अंनिसने शहरात उभा केला व हे पाहवत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधून अभिनव पद्धतीने धरणे धरले. पत्रकारांनी रत्नागिरी जिल्ह्यातच ग्रामसेवक असलेल्या नरेंद्र महाराज ऊर्फ पूर्वाश्रमीच्या सुर्वे याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या, तरीही नरेंद्र महाराजाच्या भेटीला मुख्यमंत्री गेले. महाराष्ट्रातील सर्वांत तरुण संत म्हणून त्यांनी त्याचा उदोउदो केला. त्यांच्यात गाडगेबाबांचा कर्मवाद आणि विवेकानंदांचे चिंतन आढळते, असे जाहीर केले. नरेंद्र महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य करत आहेत, हे त्यांचे उद्गार तर निराश करणारे ठरावेत.
नरेंद्र महाराजाच्या मठातर्फे अधिकृतपणे विकल्या जाणाऱ्या नरेंद्र लीलामृतच्या पानापानावर चमत्कार आहेत. यापैकी एकाही चमत्काराचा कसलाही पुरावा महाराज देऊ शकत नाही, याची कबुली त्याच्या स्वत:च्याच तोंडाने देणारी चित्रफीत उपलब्ध आहे. अजूनही महाराज नवनव्या चमत्कारांचे दावे करत असतो, ‘चित्रलेखाच्या दोन वार्ताहरांना पाच वर्षांपूर्वी नाणीजच्या मठात बेदम मारहाण झाली होती. १९९९ मध्ये निश्चितपणे जगबुडी होईल, अशी भंपक भाकिते याच महाराजाने केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या आपल्या विरोधकांच्या बाबतीत नरेंद्र महाराज अत्यंत अनुदार, असभ्य व असहिष्णू भाषा वापरतो. खोटे-नाटे आरोप समितीच्या कार्यावर करतो. सर्वसंग परित्याग करून निखळ मानवतावादी व विवेकवादी भूमिकेतून समाजसेवेसाठी आपले उभे आयुष्य पणाला लावणारे गाडगे महाराज कोठे, तुकडोजी महाराज आणि विनोबाजींच्यासारखे संत कोठे आणि भपकेबाज अलिशान राहणीत मग्न असलेले नरेंद्र महाराज कोठे? महाराष्ट्राच्या सुविद्य मुख्यमंत्र्यांना हे माहीतच नाही, इतके ते अडाणी अथवा गाफील आहेत, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. म्हणूनच हे सर्व राजकारणी बुवा-बाबांच्या चरणी का लागले आहेत, याचा शोध अधिक खोलात जाऊन घ्यावयास हवा. या सर्वांपासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार बरेच दूर आहेत. तरीही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नाना महाराज धर्माधिकारींना मानपत्र दिले ते त्यांच्या हातून. अगदी अलिकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या अमृतमहोत्सवाचा जंगी सोहळा रायगड जिल्ह्यात झाला. त्या कार्यक्रमात व्यासपीठावर राजकीय नेत्यांच्या सोबतच नाना धर्माधिकारी सन्मानपूर्वक उपस्थित होतेच. स्वत:ला सनातनी हिंदू असे अभिमानाने म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना कोणत्याही कथित बाबा-बुवांचे पाय धरावेत, असे कधीही वाटले नाही. पंडित जवाहरलाल नेहरू १७ वर्षे देशाचे पंतप्रधान होते; परंतु कोणत्याही बाबा, बुवा, महाराज, स्वामी यांची पायरी त्यांना चुकूनही चढाविशी वाटली नाही. इंदिरा गांधींच्यापासून काँग्रेस पक्षात आणि इतर सर्व पक्षातही बाबा, महाराज यांच्यासमोरची लोटांगण स्पर्धा जोरात सुरू झाली. अपवाद मधु दंडवते, माजी पंतप्रधान गुजराल, अशा काही व्यक्ती आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्ष एवढाच दिसतो.
खुजेपणाची कबुली
निवडणुकीच्या राजकारणात कोणत्याही प्रकारे निवडून येणे ही सर्वाधिक प्राधान्याची बाब बनली आहे. स्वत:चे कर्तृत्व, चारित्र्य, पक्षसंघटना, सचोटीचा राजकीय व्यवहार यामधून निवडणुकीत निवडून येण्याचा विश्वास बहुतेक राजकीय नेत्यांनी गमावला आहे. अशा वेळी ज्याच्याकडे आयतीच गर्दी आहे, तेथे जाणे अथवा बाबामुळे गर्दी असते म्हणून आपल्या कार्यक्रमांना त्यांना बोलावणे अटळ होऊन बसते. सत्तेचा सारीपाट सतत अस्थिर असतो. त्यामध्ये स्वत:ची सत्ता मिळणे व टिकणे हा जणू जीवन-मरणाचा प्रश्न असतो. या सर्व राजकारणी मंडळींचा नशिबावर दांडगा विश्वास असतो. त्यामुळे बाबा आपले प्रारब्ध जाणेल व स्वत:च्या दैवीशक्तीने ते बदलेलही, असेही राजकारणी भक्तांना वाटत असते. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचा राजकारणी हा फुले, शाहू, आंबेडकर, गाडगेबाबा यांचे नाव घेऊनच बोलतो; मात्र त्याच्या वागण्यात या महापुरुषांच्या विचारांचा अंश असला पाहिजे, याबद्दल तो बिलकूल फिकीर करत नाही. कथनी आणि करणी यात फरक असणारच आणि तो फारसा मनावर घेण्याची गरज नाही, असेच जणू ते मानतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे व स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ना. सुशीलकुमार शिंदे राजरोसपणे नरेंद्र महाराजाच्याकडे जातात, याचा अर्थ एरव्ही कसा लावायचा?
श्रद्धांची तपासणी नाही
मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहास हा खरे तर श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे. जो वैज्ञानिक दृष्टिकोन घटनेत भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे व शालेय मूल्यशिक्षणात ज्याचा समावेश आहे, तो कृतीत आणण्याचा आग्रह शिक्षणसंस्था क्वचितच धरतात. वैज्ञानिक दृष्टिकोन मानावयाचा तर चमत्कार करण्याचा दावा करणारा बाबा; मग तो सत्यसाईबाबा असो वा नरेंद्र महाराज, ते फ्रॉड आहेत, असे शाळेत ठामपणे मुलांना सांगावे लागेल. त्यामुळे निदान आपले राजकारणी विसंगत वर्तन करतात, हे मुलांच्या मनावर रुजेल व ही मुले उद्या मतदार झाल्यावर काही आग्रह धरण्याची शक्यता निर्माण होईल. परंतु सध्या सर्व बाबा, बुवा हे श्रद्धेचे विषय झाले आहेत. त्यांची तपासणी खुलेपणाने करणे म्हणजे रोष ओढवून घेणे. प्रसारमाध्यमेही बहुधा रोखठोक भूमिका घेण्याऐवजी बातम्या देण्यातच धन्यता मानतात. या आधुनिक बुवाबाजीच्या क्षेत्रात शोधक पत्रकारितेची खूप गरज आहे. मात्र अनेक अडचणींनी तसे घडत नाही. नाना महाराज यांच्या बैठका हे रायगड जिल्ह्यातील एक प्रचंड प्रकरण आहे. या बैठकीतील व्यक्ती आपले जीवनविषयक सर्व महत्त्वाचे प्रश्न तेथील प्रमुखामार्फत नाना महाराजांपर्यंत पोचवतात व महाराजांच्या मुखातून आलेले उत्तर शिरसावंद्य मानून आचरण करतात. ही गंभीर स्वरुपाची मानसिक गुलामगिरी नव्हे काय? परंतु अशा बाबी सविस्तर व सखोलपणे पुढे येत नाहीत. एकूणच वाढत्या बुवाबाजींच्या वातावरणाला छेद देणारे काही घडत नाही. यामुळेही बाबा, बुवाकडे जाणाऱ्या राजकारण्यांना त्याबाबत विचार करण्याची गरज पडत नाही.

नैतिकतेची गरज व व्यापक व्यवस्था परिवर्तन
सध्याच्या मूल्यप्रदूषित वातावरणात नैतिकपणे जगू इच्छिणाऱ्या कोणाचीही घुमसट होते. जे वागत आहोत ते उचित नाही, हे कळत असते; मात्र उचित वागण्याचे धैर्य उरलेले नसते. राजकारणी माणसेही संवेदनशील असतात. आपले स्खलन त्यांनाही डाचत असते. परंतु त्यासाठी खरेखुरे नैतिक जगणे त्यांच्या आवाक्याच्या पलिकडचे असते. अशा वेळी या बाबा, बुवा, महाराजांचे भ्रामक नकली अध्यात्म त्यांना तात्पुरता दिलासा देणारे ठरते.    
खरे तर आजचा समाज नीतिमान बनण्यासाठी एका व्यापक व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे. हे परिवर्तन बाबा, बुवा, महाराज समजू शकतील, हा त्यांचा वकूब नाही आणि अशा व्यवस्था परिवर्तनामध्ये त्यांचे हितसंबंध सांभाळले जाणार नाहीत. वामनराव पै त्यांच्या प्रवचनात स्त्रीमुक्ती व व्यसनमुक्ती याबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते सांगतात की, हे प्रश्नच आमच्याकडे अस्तित्वात नाहीत. आमच्याकडे येणारे सर्वजण पत्नीला समतेनेच वागवतात आणि व्यसनाधिनतेचा तर आमच्याकडे प्रश्नच येत नाही. हे समस्यांचे अतिसुलभीकरण झाले. पुरुषप्रधान व्यवस्था अथवा शासनाची व्यसनवर्धक धोरणे याचे भान न बाळगता दिलेली अशी उत्तरे चमकदार वाटली, तरी खऱ्या प्रश्न सोडवणुकीपासून शतयोजने दूर असतात. बाबांना खरे प्रश्न सोडवायचे नसतातच. त्यांना कोठे मते मागायला जायचे असते? राजकारण्यांना समाजाचे गंभीर प्रश्न खऱ्या मूलगामी पद्धतीने सोडवणे आपल्याला जमणार नाही, याची पुरेपूर जाण असते. खरे तर सध्या बहुसंख्य राजकारणीही आपल्या अत्यंत मर्यादित हितसंबंधासाठी राजकारण करत असतात. अशा वेळी हे राजकारणी आणि बुवा, बाबा, स्वामी, महाराज यांची मांदियाळी यांनी गळ्यात गळा घातला नाही तरच आश्चर्य! 
त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन, बुवाबाजीविरुद्धची, मानसिक गुलामगिरीविरुद्धची, विवेकी आत्मभान समाजात रूजवण्याची लढाई अवघड होत आहे, हे खरेच. परंतु या परिस्थितीवर देखील मात करण्याचा मार्ग आणि हिंमत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारसाच देईल, असा दृढ विश्वास आम्ही बाळगून आहोत.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल २००४)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...