वैज्ञानिक दृष्टिकोन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैज्ञानिक दृष्टिकोन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

फॅसिस्टांचा पराभव होत आहे



फॅसिस्टांचा पराभव होत आहे
दाभोलकर, विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता
शुक्रवार, ता. ४ जानेवारी २००८ रोजी माझे व्याख्यान जळगाव रोटरीने ठेवले होते. जाहीर सभा होती. त्याची तयारी उत्तम होती. त्याला जोडून आणखी तीन महाविद्यालयांनी भाषणे ठेवली होती. मी रात्री साडेनऊ वाजता जळगावसाठी रेल्वेने निघण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात जळगावहून फोन खणखणले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माझ्या भाषणावर बंदी घातली होती. भाषण घेतल्यास कारवाई करण्याची धमकी संयोजकांना दिली होती. थोडक्यात घडले होते, ते असे : माझे भाषण जाहीर झाल्यावर नेहमीप्रमाणे काही हिंदुत्ववादी संघटना पोलीस स्टेशनला गेल्या. मी हिंदू देवतांवर टीका करणारे बोलतो, यासाठी माझ्या भाषणावर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली. दाभोलकरांच्या भाषणात देव-देवतांवर टीका झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, या संयोजकांना नेहमी दिल्या जाणाऱ्या धमकीऐवजी एक पाऊल पुढे टाकून थेट भाषणच रद्द करण्यात आले. रोटरी क्लबची मनःपूर्वक इच्छा होती. त्यांनी सर्व ते प्रयत्न केले. रोटरी क्लब पदाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या समान मित्राकडूनही बोलणी झाली. पण नन्नाचा पाढा कायम राहिला. शेवटी त्यांनी हे मला कळविले.

मी दोन फोन नंबर समोर ठेवले. एक गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा व दुसरा जळगाव जिल्हा पोलीसप्रमुखांचा. मी ते आळीपाळीने लावत होतो. त्यापैकी पहिल्यांदा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा लागला. मी त्यांच्याशी जे बोललो त्याला मराठी भाषेत कानउघाडणी म्हणतात. मी सुनावलेले मुद्दे असे :
·         पोलीस खाते भारतीय घटनेच्या संरक्षणासाठी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मला भारतीय संविधानाने दिला आहे. तो बजावण्यासाठी मला कोणी अडथळा आणत असल्यास त्यांचा बंदोबस्त करणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र माझ्या भाषणाबाबत पोलीस खाते नेमके उलटे वागत आहे. ही गंभीर चूक त्यांनी सुधारावी.
·         मी गेली तीस वर्षांत हजारो व्याख्याने दिली. शेकडो लेख लिहिले. डझनभर पुस्तके लिहिली. त्यांना शासनाचेही अनेक पुरस्कार मिळाले. या सर्वांत मी उच्चारलेल्या वा लिहिलेल्या एकाही शब्दाबाबत आतापर्यंत माझ्यावर एकदाही गुन्हा दाखल झालेला नाही.
·         मी सतत भारतीय घटनेमध्ये लिहिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा पाठपुरावा करतो आहे. माझ्या भाषणावर आक्षेप घेणारी मंडळी सतत हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची घटनाविरोधी भाषा करीत असतात.
·         तुम्ही माझे भाषण रद्द करूच शकत नाही. मी उद्या येणार. भाषण देणार. माझ्या संघटनेची जळगाव शाखा ते आयोजित करेल. आपण खटला भरावाच. मी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे धरून बसेन. तुम्हाला निश्चितपणे माघार घ्यावी लागेल. तुमचा फोन आधी लागला. त्या आधी गृहमंत्र्यांचा लागला असता तर तुम्हाला तुमच्या साहेबांच्याकडून भाषणाला परवानगी देण्याचा आदेश ऐकायला लावला असता. साधारण दहा मिनिटे माझे सुनावणे अखंड चालू होते. पोलीस अधीक्षकांना असे ऐकून घेण्याची सवय थोडीच असते? पण तरीही त्या दिवशी त्यांना ते ऐकावे लागलेच. दहा मिनिटांनंतर ते मला म्हणाले, डॉक्टर, एवढेच सांगा, तुमचा विषय काय आहे? मी उत्तरलो, तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे’. ‘डॉक्टर मित्रत्वाच्या भावनेने ’- एस.पी. माझा विषय माझे अध्यत्मिक आकलनत्यात हिंदू देवदेवतांचा प्रश्न कुठे येतो?’ मी. परवानगी दिली, बंदोबस्त लावतो. काहीही घडणार नाही.’ -एस. पी. - धन्यवाद’.

फोनची चक्रे पुन्हा भराभरा फिरली. वृत्तपत्रात गेलेली दाभोलकरांचे भाषण रद्दही नोंद दाभोलकरांच्या भाषणाला अखेर परवानगीअशी पहिल्या पानावरची बातमी बनली. महाविद्यालयातील जळगाव, भुसावळमधील सर्व व्याख्याने उत्तम झाली. सायंकाळच्या जाहीर व्याख्यानालाही श्रोतृसमुदाय चांगला होता. भाषण पूर्ण शांततेत झाले. पुस्तकविक्री उत्तम झाली. सोलापूरच्या भाषणानंतर या मंडळींना मिळालेला हा दुसरा धडा होता. अर्थात, त्यामुळे ते शहाणे बनतील, अशी आशा बाळगावयास नको. त्यांच्या सनातन वृत्तीत ‘शहाण’पणाची प्रभात होणे म्हणजे सूर्याने पश्चिमेलाच उगवणे ठरावे.

माझ्या वरील उक्तीचा प्रत्यय मला माझे भाषण झाल्यावर तासाभरातच आला. नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई) हा राज्य कार्यकारिणीचा पदाधिकारी. त्याचा फोन आला. अंधेरी लोहमार्ग पोलीस स्टेशनवरून तो बोलत होता. घडले होते ते असे - आपला तरुण कार्यकर्ता स्वप्नील तावरे हा कुर्ला रेल्वे स्टेशनवर समितीची पुस्तके व दिवाळी अंक विकणे, संपर्क नोंदविणे, याचे कार्य करत होता. एकटाच होता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागरण समिती या संघटनांचे नाव सांगणारे ४०-५० जण तेथे अचानक गेले. पुस्तके फेकली गेली. बॅनर फाडला गेला. स्वप्नीलला धक्काबुक्की झाली. त्यालाच धरून रिक्षात बसवण्यात आले. त्याला अंधेरी लोहमार्ग पोलीस स्टेशनला आणण्यात आले. अंधश्रध्देची दुनिया, चमत्काराची किमया या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर त्रिशूलाचे चित्र आहे. त्यावर लिंबू खोचलेले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, याखाली स्वप्नीलवर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक करा, असा दबाब ते आणत होते. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या याच! मी एन. डी. पाटील यांना फोन केला. त्यांनी तेथील पोलीस इन्स्पेक्टरला फोनवरून सुनावले : समिती जी मासिके विकत आहे, ती काही सरकारने बंदी घातलेली प्रकाशने नाहीत. तेव्हा संघटनेची पुस्तके विकताना झालेला हस्तक्षेप हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. अशा बाबतीत तुम्ही गुन्हा दाखल केल्यास तुम्हीच अडचणीत याल. पोलीस उपनिरीक्षकाने प्रक्रिया थांबवली. एफ. आय. आर. दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते. तोपर्यंत गृहमंत्र्यांच्या सचिवाशी मी बोललो होतो. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता. वातावरण पूर्ण बदलले होते. वागणूक चांगली मिळाली, चहा मिळाला. रात्री गोंधळ घालणाऱ्यांच्यापैकी फक्त एकच जण सकाळी उगवला होता. त्याला पोलिसांनी स्पष्ट सुनावले की, ते खटला दाखल करणार नाहीत. त्यांना पाहिजे असल्यास व्यक्तिगत पातळीवर काय ते करावे. संबंधिताला निमूटपणे बाहेर जावे लागले. समितीच्या पुस्तकाच्या विक्री वेळेस आवश्यक तर पोलीस देण्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करणे पोलिसांनी टाळले, ही उणीव राहिली. मात्र ज्या हिमतीने स्वप्नील तावरे वागला आणि त्याला नंदकिशोर तळाशीलकर व राजू निरभवणे यांनी साथ दिली, त्याला दाद द्यावयासच हवी.

बोध काय द्यावयाचा..?
आपली भूमिका अगदी स्पष्ट आहे. आपली संघटना भारतीय घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता लोकशाही या तत्त्वाशी बांधलेली आहे. आपण लोकांच्या धर्म व देव भावनांचा आदर करतो. कारण ही भूमिका भारतीय घटनेचीच आहे. जे या संदर्भात आपणाला विरोध करतात, ते हिंदू राष्ट्रधर्मनिर्मितीचे जाहीर पुरस्कर्ते आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अजिबात मान्य नाही. लोकशाही, खुली चर्चा, अहिंसक मार्ग याऐवजी हिंसा, ठोकशाही, कटकारस्थाने, खोटे खटले यातच त्यांना रस आहे. ही फॅसिस्ट मंडळी आहेत. ती सुधारतील, ही आशा व्यर्थ आहे. आपणच सावध, सतर्क, सजग व समर्थ राहावयास हवे. या मंडळींच्या उचापती आपल्या सहज लक्षात येतात. त्या दृष्टीने आधीच तयारीत असावे. परस्पर संपर्क, शाखा संघटन भक्कम असावे. भूमिका आग्रही घ्यावी; पण शब्द जपून वापरावेत. प्रत्येक शाखेने एका वकिलाशी चांगला संपर्क ठेवावा. कधीही हक्काने त्यांची मदत मिळावयास हवी. अशा गोष्टींनी आपण दुप्पट उत्साहाने व ताकदीने कामाला लागावयास हवे. आपल्या विरोधकांच्या या उचापतीमधून समितीचा फायदाच होतो आहे, हे त्यांच्या लक्षात येईल आणि मग आपोआपच त्यांचे ताबूत थंडे होतील.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी २००८)

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

कायदा समजून घ्या


कायदा समजून घ्या 
दाभोलकर, कायदा, विरोध, सैलानीबाबा, वैज्ञानिक दृष्टिकोन, अघोरी उपचार, नरबळी

महाराष्ट्र विधानसभेने अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित कायदा अलिकडेच मंजूर केला. हा कायदा कोणत्याही प्रकारे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, याची पूर्ण कल्पना असूनही लांडगा आला रे, लांडगा आला या पद्धतीने स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणाऱ्या संघटनांनी आरोळी ठोकली. सत्तारूढ पक्षाचे आमदारही काही प्रमाणात या भूलथापांना बळी पडले. १३ एप्रिल २००५ रोजी सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनीच स्वत:च्या सरकारने केलेल्या कायद्याचे बिल रोखण्याचा अविवेक केला. खरे तर या बिलात तसे काहीही नव्हते. मात्र याबाबत विरोधकांना ठणकावून सांगण्याऐवजी कायदा सर्वसंमतीने करावा, अशी सूचना विलासरावजींनी केली. कायद्याच्या मसुद्यात दूरान्वयानेही धर्मविरोधी काही नाही, हे मुख्यमंत्र्यांना पटले होते. परंतु एखादा सामाजिक कायदा सर्व संमतीने झाला तर बरे, असे त्यांना वाटत होते. विधानसभेतील चर्चा लक्षात घेऊन कायद्याचे प्रारूप सौम्य करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कायदा मंजूर होताना विरोधकांनी (अकारण) गोंधळ घालावयाचा तो घातलाच. असेच होणार होते तर आधीचे प्रारूपच जे मंत्रिमंडळानेही एकमताने मंजूर केले होते, ते ठेवून काय बिघडले असते, असे वाटल्यावाचून राहिले नाही. पण आता जे झाले ते झाले. असलेला कायदा समजून घेणे, त्याप्रमाणे कारवाईचा आग्रह धरणे आणि ज्या बाबी कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, त्याबाबत पुन्हा नव्याने आग्रह निर्माण करणे, हे करावे लागेल. यासाठी कायदा समजून घ्यावयास हवा. तो तसा समजून घेणे सोपे आहे. कारण कायद्याच्या व्याख्येत परिशिष्टातील बाबींना अंधश्रद्धा समजावे, अशी स्पष्ट व थेट तरतूद आहे. (या लेखाआधीच्या कायद्यावरील लेखातील अनुसूची वाचावी.) या बाबींचे आचरण करणे हा सहा महिने ते सात वर्षांच्या सक्तमजुरीपर्यंतची शिक्षा असलेला गंभीर गुन्हा होऊ शकतो.



क्र. १ ची तरतूद पाहावी. आपल्या देशात अजूनही माणसाचे मन आजारी पडते, हे माहीत नाही. माणूस वेड्यासारखा वागू लागला तर तो अचानक असे वागू लागला, याचे कारण बाहेरची बाधा असे मानण्यात येते. त्यावरचा उपाय स्वाभाविकपणेच भगत, मांत्रिक, देवऋषी करतात. हे उपाय केवळ अज्ञानावर आधारित नसतात; तर अघोरी व क्रूर असू शकतात. मनोरुग्ण व्यक्तीला भूतबाधा झाली असे समजून तिचे केस ओढणे, तिला चटके देणे व मारणे या सर्व बाबी व्यक्तीच्या अंगातील भूत उतरवून त्याला पूर्ववत माणूस बनवणे, या उदात्त (?) हेतूने केल्या जातात. स्वाभाविकपणे मनोरुग्णाला छळ, मानहानी सोसावी तर लागतेच; परंतु त्याबरोबरच चुकीचा उपाय होतो, हे आणखीच घातक. बुलढाण्यापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सैलानीबाबाच्या दर्ग्यावर भुताने झपाटल्याच्या नावाने मनोरुग्ण दोन वर्षांपूर्वी साखळदंडाने बांधून ठेवलेले आढळले होते. अशी ठाणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहेत. भूत उतरवण्याचे काम तेथे अमावस्या, पौर्णिमेला अथवा काही विशिष्ट दिवशी चालते. या बाबींची माहिती मिळाल्यास अथवा असा उपचार करणाऱ्यांना हा कायदा कळाल्यास प्रतिबंधात्मक म्हणूनही हा प्रकार रोखता येईल.



२) ही तरतूद तथाकथित चमत्काराचा दावा करणे व फसवणे यासाठी आहे. यामध्ये चळवळीने एक महत्त्वाचा विजय संपादन केला आहे. कायद्यात चमत्कारांचा उल्लेख तथाकथित चमत्कारअसा आहे. कोणताही चमत्कार तथाकथितच असतो, ही याच्यातील महत्त्वाची बाब आहे. भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे म्हणजे कार्यकारणभाव तपासणे आणि चमत्कार घडणे, याचा अर्थ विज्ञानाचा कार्यकारणभावाचा नियम ओलांडून काही अद्भुत बाबी घडतात, असे मानणे. अर्थात, असा तथाकथित चमत्कार करणे हा गुन्हा नाही, तर त्याचा प्रचार, प्रसार करून लोकांना फसवणे, आर्थिकदृष्ट्या लुबाडणे, स्वत:ची दहशत बसवणे हा गुन्हा आहे. एखादा बाबा महिलेकडे जातो. तिच्याच घरातले कुंकू तिच्याच हातावर ठेवून तिच्याच घरातले पाण्याचे चार थेंब त्यावर टाकतो. बघता-बघता लालभडक कुंकू काळेकुट्ट होते. अर्थ उघड आहे. कुंकवाने व्यक्त होणाऱ्या सौभाग्याला धोका आहे. शांती करण्यासाठी काही रकमेची मागणी केली जाते. ती निमूटपणे दिली जाते. पुन्हा घरातलीच हळद बाईच्याच हातावर देऊन घरातलेच पाणी त्यावर शिंपडले जाते आणि हळदीचे कुंकू बनते. घरधन्याचा धोका टळतो. बाई खुशीने पैसे देते, हे फसवणे आहे आणि दैवी दहशतवादही. हा मी अतिशय प्राथमिक प्रकार सांगितला. यापेक्षा अनेक पातळ्यांवर विविध स्वरुपाच्या कथित चमत्कारांद्वारे फसवणूक चालूच असते. अशा सर्व प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यास खटला दाखल केला जाईल. त्यामुळे स्वाभाविकच या प्रकारापासून कायद्याच्या धाकाने परावृत्त होणाऱ्यांची संख्या वाढेल. फसवणुकीचे प्रमाण घटेल.



३) महाराष्ट्रातल्या अनेक जत्रा-यात्रांत नवस फेडण्यासाठी अनेक अघोरी प्रकार चालतात. देवळाच्या दगडी भिंतीवर टकरा घेणे, पाठीला लोखंडी गळ टोचणे, डोक्यावर वस्तऱ्याच्या सहाय्याने चिरा मारून रक्त काढणे वगैरे या बाबी कोणत्याही धर्माचा भाग असूच शकत नाहीत. या प्रथांचा अवलंब करणे अथवा करावयास भाग पाडणे, हा गुन्हा आहे. मात्र मसुद्यात जीवघेणा असा शब्द आहे. या स्वरुपाचे कृत्य जीव घेणे आहे की नाही, याचा निर्णय कोर्टच देऊ शकेल आणि केस लॉ तयार होईल व मग परिणामकारकता वाढेल.



४) या प्रकाराशी संबंधित बाबी मानवहत्येपर्यंत गेल्यानंतर आजही गुन्हाच बनतात. मात्र या तरतुदीमध्ये अशा प्रकारांना प्रवृत्त करणे व प्रोत्साहन देणे, हा देखील गुन्हा आहे. हा कायदा अस्तित्वात असता तर पैशाचा पाऊस पाडण्याच्या लोभातून झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोशीचे हत्याकांड रोखणे सोपे गेले असते.



५) अंगात संचार होणे आणि तो दैवी आहे, असे सांगून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे, हे प्रकार आजही अनेक ठिकाणी चालू असतात. अंगात येणाऱ्या बायका जे बोलतात, त्याला दैवी उद्गाराचे प्रामाण्य लाभते आणि त्यामुळे अशा बाईच्या वा व्यक्तीच्या मुखातून जो निर्णय येतो, तो पाळणे सक्तीचे बनते. अशा सर्व बाबींना या कलमातील तरतुदींद्वारे रोखता येईल.



६) ही तरतूद प्रामुख्याने आदिवासी भागातील डाकीण व भुताळी या अघोरी प्रथेबद्दल आहे. गावात काही मुले आजारी पडतात, लवकर बरी होत नाहीत. त्यातील काही दगावतातही. काही वेळा गावात रोगराई निर्माण होते. या सर्वांचे खापर अंधश्रद्ध बहुसंख्य जनमानस व काही मतलबी लोकांचे कटकारस्थान यातून गावातील एखाद्या व्यक्तीवर डाकीण व भुताळी या नावाने ठेवले जाते. या व्यक्तीला गावात जगणे तर अवघड बनतेच; प्रसंगी जीवालाही मुकावे लागते. महाराष्ट्र राज्याच्या आदिवासीबहुल जिल्ह्यात हा प्रकार आजही मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याला थेट आळा घालणे कलमातील या तरतुदीमुळे जमू शकेल.

७) या कलमातील तरतूद करणी, मूठ मारणे या स्वरुपाच्या प्रकाराबद्दल आहे. अशा बाबी असतात व त्या खऱ्या असतात, असा मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे घरावर कोणी करणी केली किंवा मूठ मारली, हे सांगितले गेले की, संबंधित व्यक्तीच्या मारहाणीपर्यंत प्रकरण जाते. दोन व्यक्तींची मारामारी ही किरकोळ बाब मानली जाईल; पण करणीच्या नावाने होणारी मारहाण ही मात्र आता त्यातील अंधश्रद्धेच्या घटकामुळे गंभीर बाब मानली जाईल. शिक्षाही जबर होऊ शकेल आणि त्यामुळे असे प्रकार थांबण्यासच या कायद्याची मदत होईल.

८) पश्चिम महाराष्ट्रात आजही मोठी आई किंवा बाई हा प्रकार; विशेषत: डोंगराळ भागात आढळतो. व्यक्तीला कोणत्याही स्वरुपाची गाठ उठते. ती कधी करट असते, कधी कॅन्सरचे ट्युमरही असू शकते; तर कधी क्षयरोगाच्या गंडमाळा असतात. या गाठीकडे बोट दाखवून असे सांगितले जाते की, हा मोठ्या आईचा (अथवा बाईचा) कोप आहे. यावर डॉक्टरांचे उपाय त्वरित बंद करा. त्यानंतर मांड भरणे नावाचा एक भरपूर खर्चिक विधी करावयास लावला जातो. याची परिणती शेवटी केवळ कर्जबाजारीपणातच होते, असे नाही तर योग्य उपचाराच्या अभावी व्यक्तीला जीवही गमवावा लागतो. चळवळीच्या प्रभावाने असे प्रकार आम्ही मर्यादित प्रमाणात रोखले आहेत; मात्र या कायद्याने अशा बाबींवर थेट आघात होऊन त्या पूर्णपणे बंद होण्याची शक्यता वाढेल.



९) पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर एकमेव उपाय असतो, प्रतिबंधात्मक इंजेक्शन घेण्याचा; अन्यथा रेबीज हा रोग होऊ शकतो. आजही जगात त्याला उपाय नाही. १०० टक्के मृत्यू हीच सुटका. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाची पारंपरिक इंजेक्शन्स प्रचंड दुखतात. हल्ली निघालेली नवीन इंजेक्शन्स खूप महाग आहेत. यावरचा उपाय म्हणून काही ठिकाणी पोटात घेण्याचे अत्यंत स्वस्त औषध दिले जाते. सांगलीजवळील कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील रमजान गुंडू शेख याच्यावर याबाबत समितीने खटला घातला होता. आठवड्यातील ज्या दिवशी तो औषध देई, त्यावेळी दूरदूरहून शेकड्यांच्या संख्येने गर्दी होई. न्यायालयात आम्ही खटला हरलो होतो. आता तसे होणार नाही. अशी मंडळी थेट गजाआड जातील. विषारी नागाचा दंश झाल्यानंतर त्यावर एकच उपाय म्हणजे त्वरित प्रतिविषाचे इंजेक्शन घेणे. परंतु याही बाबतीत मंत्र टाकून विष उतरवणाऱ्या मांत्रिकांची चलती आहे. अनेकदा सर्प बिनविषारी असतो आणि श्रेय मांत्रिकाला जाते. यापुढे असे उपचार करणाऱ्या केंद्रावरील व्यक्ती आणि त्यांना तेथे नेणारे हे दोघेही थेट तुरुंगात जातील. साप विषारी की बिनविषारी, हा मुद्दाच राहणार नाही. योग्य वैद्यकीय उपचाराऐवजी दिशाभूल करणे व योग्य उपचार रोखणे हा गुन्हा मानला गेला आहे. (अर्थात यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरेशा प्रमाणात प्रतिविषाची इंजेक्शने उपलब्ध असणे याची गरज आहे, हे लक्षात ठेवायला हवे.)



१०) हाताच्या बोटाने पोटाची अथवा हृदयाची अवघड शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणाऱ्या अस्मलबाबाने महाराष्ट्रातील जनतेला मजबूत लुटले. आता त्याला त्वरित अटक व भरभक्कम शिक्षा होऊ शकेल. (कारण त्याने स्वत:च्या प्रचाराच्या सी. डी. काढल्या होत्या. त्यामुळे पुरावा आयताच उपलब्ध आहे.) मुलगाच हवा या हव्यासापोटी गर्भवती स्त्रीवर काही विधी करून गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती काही वर्षांपूर्वी दिसत, त्या आता दिसत नाहीत. परंतु मुलगा होण्याची आकांक्षा असे विधी करवून घेण्यास प्रवृत्त करते. या स्वरुपाच्या प्रकारांना त्यामुळे आळा बसेल.



११) बुवा तेथे बाया असे एक दु:खदायक समीकरण बऱ्याच ठिकाणी दिसते. विवंचनेने ग्रासलेल्या आणि पारंपरिक विचारातून आलेल्या अवतार कल्पनेने भारलेल्या वास्तवामुळे स्त्रियांना कथित अवतार असलेल्या बाबा, बुवा, महाराजांचा आधार वाटू लागतो; शिवाय अशा ठिकाणी अशा व्यक्तीकडे वारंवार जाणे हा धार्मिक आचरणाचा भाग मानला जात असल्यामुळे याबाबतीत अडथळाही येत नाही. यातूनच स्त्रियांचे लैंगिक शोषण जन्म घेते. पुणे येथील काही वर्षांपूर्वी गाजलेली वाघमारे बाबाची केस ही याबाबत कुप्रसिद्ध आहे. अनेक स्त्रियांशी शरीरसंबंध करूनही तो कायद्याच्या चौकटीत फारसा अडकला नाही. नव्या कायद्याने ही त्रुटी भरून निघेल.



१२) बुवाबाजी हा अत्यंत बरकतीला आलेला धंदा आहे. त्यातील एक अफलातून युक्ती अशी की, मंद बुद्धीची एखादी व्यक्ती निवडावयाची की जितकी जास्त मंद बुद्धीची असेल, तितके अधिक बरे. अशी व्यक्ती ही अवलिया महाराज आहे. तिच्यामध्ये काही विशेष शक्ती आहे, असे भासवून तिच्या नावाने धंदा उभारला जातो. अशा बाबाला काहीच कळत नसल्यामुळे टोळक्यांचे चांगलेच फावते. या बाबींच्यात आता त्वरित हस्तक्षेप करता येईल.



मूळ कायदा यापेक्षा कडक होता. त्यामध्ये अंधश्रद्धेची एक व्यापक व्याख्या होती. त्यामुळे परिणामकारकता वाढली होती. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाची तरतूद होती. त्यामुळे कायदा केवळ पोलिसांवर अवलंबून राहिला नसता. पोटावर हात फिरवून मुले देणारी पार्वतीमाँ, डोक्यावर फरशी ठेवून निदान करणारा फरशीवालेबाबा यांचा थेट समावेश होता. या सर्व बाबी आता वगळल्या आहेत. एक मागणी अशीही आहे की, कायद्यात नारायण नागबळी, वास्तुशास्त्र, तोडगे विधी सांगणारे ज्योतिषी यांचा समावेश करा. मागणी रास्तच आहे; पण अवघडही. पहिले पाऊल तर पडले आहे. कायदा अधिक कडक करण्याच्या मागणीमागील जनतेचा आवाज जेवढा बुलंद आणि सक्रिय होईल, त्याप्रमाणात पुढच्या टप्प्यांकडे वाटचाल होईल. मात्र त्याआधी खूप प्रबोधन करावे लागेल आणि संघर्षही.



आवाहन

१) या कायद्यानं सांगितलेल्या बाबी आपल्या भागात जेथे कोठे घडत असतील, त्या व्यक्ती, त्यांच्या जागा, त्यांचे दिवस वा तिथी, तेथे चाललेले प्रकार हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मध्यवर्ती कार्यालय यांच्याकडे कळवावी. या माहितीसोबत माहिती देणाऱ्याचे नाव, पत्ता व फोन नंबर कळवावा. तो पूर्ण गुप्त ठेवला जाईल. या उपक्रमातून कायद्याच्या गरजेचे व्यापक सर्वेक्षण घडून येईल.



२) या कायद्याच्या कक्षेत आज न येणाऱ्या; पण खरे तर यावयास हव्यात, अशा ज्या बाबी वाचकांना वाटतील त्या त्यांनी वरीलप्रमाणेच तपशीलवार कळवाव्यात.

३) या कायद्याच्या माध्यमातून व स्वतंत्रपणे याबाबतची अंमलबजावणी करणे, यासाठी ज्यांना उत्साह असेल ती मंडळे व व्यक्ती यांनी जरूर कळवावे. त्यांना सर्व ती मदत व प्रशिक्षण देण्यात येईल.



या कायद्यातील सर्व तरतुदी या ग्रामीण, अडाणी, अशिक्षित लोकांसाठी आहेत. पांढरपेशी, शहरी उच्चभ्रू लोकांच्या अंधश्रद्धांना यात हातच लागलेला नाही, हा आक्षेप बरोबर आहे. याबाबतची स्पष्ट भूमिका अशी की, अंधश्रद्धा ही प्रामुख्याने गरिबाला गरीब ठेवण्याचे कारस्थान आहे. त्यामुळे ज्यांचे या अंधश्रद्धांतून शोषण, नुकसान होऊन जीवन उद्ध्वस्त होते, त्यांनाच प्रथम वाचवणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा वाईटच; पण त्या आघाताने मोडून पडू शकणाऱ्या दुर्बल घटकांना संरक्षणाची गरज अधिक म्हणून कायदाही प्रथम त्यांच्याकरिता.



अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(जानेवारी २००६)





रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद




वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिषद, विवेकवाहिनी, संघटन
आज समाजात वैचारिक चर्चा करण्यात कोणाला रस राहिलेला नाही; कृती तर दूरच. सर्वत्र मरगळ आली आहे. या दृढ होत चाललेल्या नेहमीच्या समजांना महाराष्ट्रातल्या शिक्षणक्षेत्राच्या वैज्ञानिक जाणिवा कृती परिषदेने जोरदार धक्का दिला. ३० जून आणि १ जुलैला लातूरला ही परिषद संपन्न झाली. महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले व्यापक प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, कार्यकर्ते यांची ओसंडून वाहणारी संख्या; या सर्वांत प्रामुख्याने वयाने तरुण असलेल्यांचा सहभाग, उदंड उत्साह, चोख व्यवस्था व शिस्त आणि कृतीचा निर्धार या सर्वच बाबी मनाची उमेद वाढविणाऱ्या होत्या.

अंधश्रद्धा निर्मूलन पुढच्या टप्प्यावर
गेले एक तपाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काहीसे यश लाभले, तशाच मर्यादाही जाणवू लागल्या. चळवळीमधील सामर्थ्य कायम ठेवून मर्यादा ओलांडण्याचा लक्षणीय प्रयत्न म्हणजे ही परिषद. विज्ञानाची करणी हरघडी वापरताना विज्ञानाची विचारसरणी मात्र दूर ठेवण्याच्या प्रवृत्तीला या परिषदेने धक्का दिला. याची सुरुवात शिक्षण क्षेत्रातून होणेही उचितच होते. खरे तर भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, हे सर्व नागरिकांचेच कर्तव्य सांगितले आहे. पण शिक्षण क्षेत्रात त्याचे महत्त्व अधिक. कारण शिक्षणाचा गाभाघटकातील महत्त्वाचा घटक आहे, वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती. शिक्षण म्हणजे जर वर्तनबदल असेल तर त्याबाबत शिक्षण क्षेत्राने विचार देणे व कृतीचा संस्कार करणे, दोन्ही मोलाचे ठरते. महाराष्ट्रातील सत्यशोधकी विचारांचा पैलू देखील याला पूरकच आहे. व्यवहारात मात्र आज माणसे, युवक डोळस विचारांच्या आधारे कृती करून समाजजीवन अनुकूल पद्धतीने बदलता येते, हा वैज्ञानिक दृष्टिकोनातील आत्मविश्वास गमावताना आढळतात. फलज्योतिषाचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश, पंतप्रधानांना आराम पडण्यासाठीचा यज्ञ, समाजधुरिणांचे चमत्कार करणाऱ्या बाबापुढचे लोटांगण, ही त्याची एक बाजू वाढता दैववाद, छद्मविज्ञानाचा प्रभाव, प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात दीर्घदृष्टीचा अभाव व विवेकहिनता ही त्याची दुसरी बाजू. देशाचे वैज्ञानिक धोरण मांडताना पंडित नेहरू यांनी Scientific temperament is spirit of a free man असे उद्गार काढले होते. ते पुन्हा कसे आणावयाचे, हा खरा प्रश्न होता. याची सुरुवात केवळ विचारमंथनातून नव्हे, तर स्वत:च्या जीवनात आग्रहाने व निर्धाराने बदलण्यापासून व्हावी. हा संकल्प सामूहिक स्वरुपात व्यक्त व्हावा, ही कल्पना शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद संयोजनामागे होती.

विचारमंथन - वैज्ञानिक दृष्टिकोन
हेमू अधिकारी, ना. य. डोळे, विकास आमटे व दत्ता देसाई यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर सखोल चर्चा घडवून आणली. त्यातील सकारात्मक भाग पुढे आणला. ही विचारपद्धती मानवाच्या अंगभूत समतेचा विचार करून उत्तरे शोधता येतात, याकडे लक्ष वेधले गेले. राखीव जागांनी शिक्षणाचा दर्जा घसरला, मुसलमानांची संख्या या देशात एकदा हिंदूंना मागे टाकेल, मोठी धरणे हेच पाणी नियोजनाचे प्रभावी उत्तर आहे, या सर्व (गैर) समजाची चिकित्सा करतानाही वैज्ञानिक विचारपद्धती वापरता येते. मात्र यासाठी खुली चर्चा व चूक स्वीकारण्याची प्रवृत्ती आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नीतीसाठी काहीच उपयोग नाही, हेही खरे नाही. मूल्यनिर्मितीसाठीही त्याचा वापर करता येतो. देवावरची श्रद्धा ही वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत; पण हा दृष्टिकोन रोज प्रश्न विचारावयास शिकवते, ही प्रवृत्ती केवळ निसर्गविज्ञानात नाही, तर मानवी दैनंदिन जीवनात वाढीला लावावयास हवी. विद्यार्थ्यांनी शिक्षणव्यवस्थेला, अनुयायांनी नेत्याला, सज्जनांनी गुंडाला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावयास हवी. ही मनोवृत्ती वाढीस लागली, तरच आपण ही अवघड लढाई हरतो आहोत, असे वाटते. तिचे विजयात रूपांतर होऊ शकेल, असा प्रतिपादनाचा सूर होता.

धर्मांधता, धर्मनिरपेक्षता, धर्मचिकित्सा
गोविंद पानसरे, पुष्पाताई भावे, डॉ. आ. ह. साळुंखे व रावसाहेब कसबे यांच्या सहभागाने रंगलेले हे चर्चासत्र परिषदेचे परमोच्च बिंदू ठरावे. माणसाने चांगला माणूस होण्यासाठी स्वत:च्या गरजा निर्माण केल्या, त्यात धर्म आहे. जगात सर्व लोकसमूह धर्म मानणारे. त्यात एक असले तरी धर्माचा विनियोग तपासावयास हवा. माणुसकीचे वर्तन करणारा धर्म मान्य करावयास हवा. शोषण करणारा धर्म नाकारावयास हवा. यासाठीच चिकित्सा हवी. धर्माचे विलक्षण सामर्थ्य हे की, त्याच्यामुळे ज्यांचे शोषण वाढते, तेच त्याच्यासाठी रक्त सांडतात. ही माणसे सश्रद्ध व अगतिक फसवली गेलेली आहेत त्यांच्याबद्दल कणवच हवी. त्यांना योग्य बाजूने आणण्यासाठी केवळ शुष्क युक्तिवाद नाही, तर हृदय त्यांच्याशी जोडावे लागेल. जे चूक असेल ते निर्भयपणे नाकारावे लागेल. याचबरोबर धर्मग्रंथ, कर्मकांड, व्रतवैकल्य या सर्वांची चिकित्सा करावी लागेल. जनसमुदायाला असेच अंधश्रद्ध ठेवण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, ते या चिकित्सेवर हिंसक हल्ला करतात, असा अनुभव आहे. त्याचा मुकाबला शक्तीने करावा लागेल आणि भौतिक वास्तव सामान्यांना सुखकर करणाऱ्या लढ्याशी त्यासाठी जोडून घ्यावे लागेल.

उद्घाटन-समारोप
परमेश्वर नाकारल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन अशक्य, ही आपली नेहमीची भूमिका उद्घाटनाच्या सत्रात डॉ. श्रीराम लागू यांनी रोखठोक मांडली. मात्र पुढच्या काही सत्रात दत्ता देसाई व पुष्पाताई भावे यांनी त्याचा समर्थ प्रतिवाद केला. धर्म, विज्ञान व समाज यातील गुंतागुंत प्रा. य. दि. फडके यांनी समर्थपणे मांडली. शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाकडेही लक्ष वेधले. समारोपाच्या सत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा विचार अजून शिक्षण क्षेत्राच्या बाहेर अडकलेल्या लक्षावधी तरुणांपर्यंत पोचविण्याचा सल्ला प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. अतिशय छोटे; पण आशयसंपन्न बोलताना निळूभाऊ फुले यांनी वैज्ञानिक जाणिवा रूजवण्यासाठी स्वत:च्या पातळीवर यासंदर्भातील कथनी आणि करणी यातील फरक नष्ट करावा, असे आवाहन केले. निर्धाराने केलेल्या कृती कार्यक्रमाने काय घडू शकते, याची उदाहरणे दिली. महाराष्ट्रातील विविध पुरोगामी प्रवाह या परिषदेनिमित्त एकत्र आले, याचा आनंद आवर्जून व्यक्त केला आणि हे शहाणपण पुढेही चालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कृती कार्यक्रम
सर्व प्रतिनिधींना विवेकजागर ही पुस्तिका नोंदणी करताना देण्यात आली होती. त्यामध्ये पंचवीस कृती कार्यक्रम देण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा त्याला आधार होता. यापैकी काही कार्यक्रमांबाबतचे अनुभवकथनही एका सत्रात झाले. वटसावित्रीच्या व्रताचे केलेले व्यापक सर्वेक्षण, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, भानामती निर्मूलनाची धडक मोहीम, पंधरा हजारांहून अधिक गणपती दान मिळवणारी विसर्जित गणपती दान करा ही मोहीम, फलज्योतिषाला आव्हान देण्याची शास्त्रीय पद्धती, याबाबतची माहिती प्रतिनिधींना उद्बोधक वाटली. खरे तर इतर उपक्रमही अनेक आहेत. प्रश्न आहे ते निर्धाराने अमलात आणण्याचा. याबाबतही ठोस निर्णय झाले. येत्या १५ ऑगस्टपर्यंत दीडशे महाविद्यालयांत याबाबत व्याख्याने, चर्चा घडविल्या जातील. जे विद्यार्थी, प्राध्यापक यासाठी स्वत:हून पुढे येतील त्यांचे गट करण्यात येतील, त्यांना विवेकवाहिनी समर्पक नावही देण्यात आले आहे. ही केंद्रे महाविद्यालय व्यवस्थापनाच्या मान्यतेने व त्यांच्यामार्फतच चालविली जातील. त्यांना मदत, मार्गदर्शन, प्रशिक्षित करण्याचे कार्य परिषद संयोजन समिती करेल. विद्यार्थी व प्राध्यापक यांनी वैज्ञानिक जाणिवा कृतिशील करण्याच्या निर्धाराने केलेला उठाव, असे त्याचे स्वरूप असेल. याचा प्रभाव त्या-त्या महाविद्यालयातील युवकांवर व सर्वांचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर पडावा, अशी अपेक्षा आहे. हा प्रभाव समाजजीवनाला डोळसपणे, विवेकाने स्वत:चे आत्मभान जागृत करून अधिक समर्थ बनवेल, कृतिशील करेल, असा विश्वास परिषदेने निर्माण केला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि लातूर जिल्हा शिक्षणसंस्था चालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद, लातूर.
ठराव
समाजात आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. त्यामुळे समाजापुढील खरे प्रश्न बेकारी, दारिद्र्य, विषमता, जाती निर्मूलन, धर्मांधता यांचा डोळसपणे विचार करून उपाय शोधण्यास समाज अपुरा पडत आहे. मूल्याधिष्ठित वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अंग आहे, याचा जाणीवपूर्वक उल्लेख आम्ही करत आहोत. यामुळे सामाजिक मूल्यनिर्मितीसाठीही वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी भूमिका बजावू शकतो, असे आम्हाला वाटते. या विचाराचा उठाव महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात व्हावयास हवा. महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने जनमानसात प्रभावी व कृतिशील बनण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही परिषद करीत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००१)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...