कार्यक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कार्यक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा एल्गार

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा एल्गार
दाभोलकर, युवा एल्गार, अनुभवकथन, कार्यक्रम
कार्यक्रमाची उद्दिष्टे -
१)    प्रबोधन - अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्यशोधकी जाणिवा यांचे विचार व्याख्यान, शिबिरे, चर्चा, प्रात्यक्षिके, पथनाट्ये, पोस्टर प्रदर्शने, पुस्तक विक्री यातून युवक वर्गापर्यंत पोचवणे.

२)    चळवळीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे - प्रबोधनातील विचार पटून जे प्रत्यक्ष कार्याला तयार होतील, त्यांच्यामार्फत विविध स्वरुपाच्या अंधश्रद्धांचे सर्वेक्षण करणे. हा प्रश्न आजही किती व्यापक आहे, हे जनतेसमोर आणणे, त्याबाबत लोकशिक्षण व संघर्ष करण्यास युवकांस तयार करणे, ‘युवा एल्गारचा कार्यक्रम या दोन महिन्यांत संपल्यानंतरही पुढे सतत सुरू राहणारे हे कार्य आहे. यासाठी यावेळी संपर्कात येणारे कृतिशील युवक स्थानिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्न होणे उपकारक ठरेल.

३)    संकल्प - प्रबोधनाच्या मोहिमेमुळे किमान स्वत:च्या आयुष्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काही संकल्प स्वीकारण्यासाठी तयार झालेल्या युवकांची संकल्प पत्रे भरून घेणे.

४)  युवा एल्गार मेळावे - युवकांच्या उसळत्या उत्साहाला प्रकट वाव देण्यासाठी,  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारामागे उभ्या असलेल्या युवाशक्तीच्या सामर्थ्याचा संघटित आविष्कार घडविण्यासाठी युवकांची मिरवणूक काढणे, त्याचे मेळाव्यात रूपांतर करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संघर्ष करण्याचा निर्धार समूहाने प्रकट करणे.

कार्यपद्धती
वरील उद्दिष्टे पार पाडण्यासाठी यंत्रणा कशी उभी करावी, याबाबत स्थानिक शाखांना स्वातंत्र्य आहे. एक सर्वसाधारण रूपरेषा पुढे मांडली आहे. त्यामध्ये स्थानिक गरजानुसार आवश्यक ते बदल करण्यास काहीच हरकत नाही.
१)    संपर्क - महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख, इतर युवक मंडळे, विद्यार्थी संघटना, रोटरॅक्ट/लायन्स यांच्याशी या उपक्रमाबाबत बोलावे. त्यांच्या सहकार्याने त्या-त्या कॉलेजात शक्यतो सर्व विद्यार्थ्यांपुढे या मोहिमेबद्दल भाषणे द्यावीत (त्याच्यातील तपशिलाच्या काही सूचना पुढे स्वतंत्रपणे दिल्या आहेत.) कॉलेजबाहेरही विद्यार्थी युवकांसमोर विचार मांडण्याचे प्रयत्न करावेत. कॉलेजातील वा बाहेरील व्याख्यानांना प्राचार्य वा विद्यार्थी-युवक जगताशी संबंधित व्यक्ती व अध्यक्ष असेल, असे पाहावे.
२)    संकल्प पत्रे भरून घेणे - विद्यार्थी-युवकांच्या समोर केलेल्या भाषणानंतर त्यातील ज्यांची इच्छा असेल, त्यांच्याकडून संकल्प पत्रे भरून घेणे.
३)    सक्रिय सहभागासाठी नोंदणी-जे विद्यार्थी आपापल्या भागातील अंधश्रद्धांचे सर्वेक्षण; प्रसंगी संघर्ष, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभाग करू इच्छित असतील त्यांची नावे घेणे, त्यांना समितीच्या बैठकांना बोलावणे. युवा एल्गारचा जो मोठा व प्रभावी मेळावा घ्यावयाचा आहे, त्यामध्ये त्यांचे सहकार्य. हा प्रथम कार्यक्रम त्यांना देता येईल. त्यामुळे संयोजनास मनुष्यबळ लाभेल.
४)    युवा एल्गार संकल्प - मिरवणूक व मेळावे - या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी सामील व्हावे, हा प्रयत्न करावा. मिरवणुकीत बॅनर, पोस्टर्स, घोषणा असाव्यात. त्याला काहीसे जल्लोषाचे स्वरूप असावे. गावातल्या भिंती रंगवाव्यात, पोस्टर्स लावावीत (ती पाठवली जातील). मिरवणुकीचे रूपांतर मेळाव्यात व्हावे. मेळाव्याची आखणी ही नाविन्यपूर्ण असावी. त्याचा तपशील स्थानिक पातळीवर ठरवावा. एक-दोन चांगली गाणी, चमत्काराचे काही प्रयोग, अंधश्रद्धेबाबत काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अनुभव कथन, जाहीर संकल्प स्वीकारणे व पाहुण्यांची एक वा दोनच भाषणे असा दोन-तीन तासांचा कार्यक्रम असावा. प्रमुख पाहुणा युवकांना आकर्षित करणारा, बोलविण्याचा प्रयत्न करावा.

संयोजन
युवा एल्गार मेळाव्यासाठी स्थानिक संयोजन समिती स्थापन करावी. त्यामध्ये कार्यक्रमास आर्थिक व अन्य मदत देऊ शकतील, असे काहीजण असावेत. त्यामुळे एकूण कार्यक्रमाला उठाव जोरदार घेऊ शकेल.

आर्थिक बाजू
स्थानिक केंद्रांनी स्वत: याची आर्थिक तरतूद उभी करावी, अशी अपेक्षा आहे. एकूण कार्यक्रमाच्या संयोजनास किती खर्च येईल, याचा नीट अंदाज घ्यावा. निधी संकलन देणगीरूपाने वा ५, १० रुपयांची कूपन्स खपवूनही होऊ शकेल. संकल्पपत्रे व पोस्टर्स मध्यवर्तीतर्फे छापून घेऊन पाठविली जातील. त्याची किंमत प्रत्येकी एका नगास २० पैसे व ७५ पैसे राहील. ही रक्कम स्थानिक शाखेने, ही पोस्टर्स घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडे रोख द्यावीत, अशी अपेक्षा आहे. (मात्र ते शक्य नसल्यास शक्यतेनुसार नंतर पाठविली तरी चालतील) मध्यवर्तीकडे निधी नसल्याने ही विनंती करण्यात येत आहे.

प्रसिद्धी
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा एल्गारची कल्पना, त्यासाठी स्थापन झालेली संयोजन समिती, विविध महाविद्यालयांतील भाषणे व संकल्प पत्रे भरून घेणे, मेळाव्याची तयारी, मेळावा याबाबत वेळोवेळी बातम्या द्याव्यात. स्थानिक वृत्तपत्रांचे सहकार्य असल्यास संकल्प पत्रातील प्रत्येक संकल्पावर रोज एक-एक याप्रमाणे टिपण लिहावे. स्थानिक प्रचारासाठी छोटी पत्रकेही जरूर छापून घ्यावीत. आपल्या विभागातील आकाशवाणी केंद्राशीही संपर्क साधावा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९०)

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

गुटखा निर्मूलन हवे




गुटखा निर्मूलन हवे
दाभोलकर, समाजजीवन, कार्यक्रम, विवेकजागर, व्यसनविरोध, चळवळ
लातूर येथील आपल्या समितीच्या राज्य कार्यकारिणीत एक मुद्दा चर्चेला आला. तो असा होता की, आपण स्वत:ला विवेकवादी संघटना मानतो. अंधश्रद्धा विवेकवादाला थेट छेद देतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात आपण लढतो. समितीचे विवेकवादी बनवू इच्छिणाऱ्या संघटनेस एवढ्यावर समाधान मानून चालेल काय? समाजजीवनात आज एकूणच अविवेक फार वाढला आहे. त्या विरोधात वैचारिक भूमिका घ्यावयास हवी. त्याशिवाय विवेकाचे आणि शहाणपणाचे केवळ शब्द लोकांचे समाधान करू शकणार नाहीत. त्यासाठी त्यांच्या जीवनात उपकारक श्रेयस्कर अशी काही कृती विवेकवादी संघटना व व्यक्ती यांनी करावयास हवी; अन्यथा लोकांना विवेकवाद हा फक्त शब्दांचा बुडबुडा वाटेल. यासाठी काय करावे, याची चर्चा आपण आता समितीत सुरू करत आहोत. परंतु खरे तर केवळ समितीच्या कार्यकर्त्यांचा हा प्रश्न नाही. ज्यांना-ज्यांना समाजात काही चांगला बदल घडवावासा वाटतो, योग्य विचार रूजावा, असे वाटते, त्या सर्वांनीच या धडपडीत सामील व्हावयास हवे.

विचाराच्या पातळीवर आणि कृतीच्या पातळीवर असे दोन कार्यक्रम यासाठी आता उपलब्ध होत आहेत.

पहिला कार्यक्रम आहे, धर्मांधताविरोधी प्रबोधन मोहिमेचा. एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन ही समविचारी संघटना साने गुरुजी जन्मशताब्दीच्या निमित्ताने ही मोहीम चालवणार आहे. विवेकजागर हे त्याचे नाव असेल. महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचे विचार आक्रमक प्रबोधनाच्या रूपात पोचवणे असा त्याचा प्रयत्न असेल. याची गरज किती आहे, हे वेगळे सांगायला नकोच. अलिकडे भोपाळ येथे चमत्कारामागील विज्ञान यासाठी भारतीय पातळीवरील एक चर्चासत्र झाले. आपल्यासारखेच कार्य मध्य प्रदेशमध्ये करणाऱ्या सायन्स सेंटर या संस्थेने ते आयोजित केले होते. परंतु त्याला जोडूनच धर्मांधतेविरोधात एक राष्ट्रव्यापी संमेलनही त्यांनी आयोजित केले होते. त्यामध्ये भारतातील अनेक व्यक्ती सहभागी होत्या. सध्या देशामध्ये धर्मांधता वाढविण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक चालू आहेत. अशा वेळी धर्मविषयक व्यापक भूमिका धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व संविधानाचा भाग कसे झाले? त्यामध्ये काय अभिप्रेत आहे? धर्मनिरपेक्षता नाकारल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सोडाच; परंतु लोकाशाही कार्यप्रणाली कशी धोक्यात येते, हे सर्व विषय आता समितीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी महाराष्ट्रभर पोचवण्याची गरज आहे. विविध नामवंत वक्त्यांची व्याख्याने महाराष्ट्रभरातील आपल्या विविध शाखांच्यात घडवून आणण्याची आपली कल्पना होतीच. विवेकजागर अभियान हे त्याच प्रकारचे; परंतु अधिक व्यापक व टोकदार आंदोलन आहे. आपापल्या ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी यामध्ये आवर्जून आणि पुढाकाराने सहभागी व्हावयास हवे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत असतानाच आपण व्यसनविरोधी भूमिका घेत असतोच. अंधश्रद्धा आणि व्यसन दोन्ही विवेकविरोधी असतात, अशी आपली मांडणी असते. व्यसनविरोधी लढाई अत्यंत अवघड आहे. दारूचा खप प्रत्येक दिवशी वाढत आहे. दारूविक्रीतून अधिकाधिक महसूल मिळतो म्हणून शासन दारूविक्रीस प्रोत्साहन देते, परमिट रूम, बिअरबार या धंदेवाल्यांची जोरदार लॉबी सत्तारूढ राजकीय पक्षात असते. बेकायदा दारूविक्रीत खेडेगावातले आर्थिक हितसंबंध आणि पोलिसांचे हातही गुंतलेले असतात. हे सर्व लक्षात घेतले तर दारूबंदीचा लढा जवळपास अशक्य बनतो.

गेल्या १० वर्षांत गुटख्याचे व्यसन पसरले आहे आणि ते तेवढेच घातक आहे. मात्र त्या विरोधात प्रखर आवाज उठला तर संपूर्ण गुटखाबंदी शक्य आहे, असे मला वाटते. एक तर गुटख्याच्या विक्रीपासून मिळणारा महसूल हा अजून तुलनेत बराच कमी आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे थेट हितसंबंध गुटखाविक्रीत गुंतलेले आहेत. गुटख्यामुळे पहिल्यांदाच व्यसन लहान मुले व महिलांच्यात उघडपणे पोचले, याची समाजमनात खंत आहे. पूर्ण गुटखाबंदी झाल्यास बेकायदा गुटखा विक्री करणे अवघड आहे. हे सर्व लक्षात घेता गुटखाबंदीची मागणी पूर्ण होणे तुलनेने शक्य आहे. लवकरच महाराष्ट्रातील निवडणुका येतील. प्रत्येक राजकीय पक्षाने स्वत:च्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास संपूर्ण गुटखाबंदीचे आश्वासन द्यावयास हवे; अन्यथा असे आश्वासन न देणारे पक्षच नागरिकांनी पराभूत करावेत, असे आवाहन आपण करू शकतो व त्याचा किमान परिणाम होऊ शकतो. प्रत्यक्षात यासाठी चळवळ कशी उभारावी? मी मा. अण्णा हजारेंना विनंती केली की, त्यांनी या महाराष्ट्रव्यापी मोहिमेचे नेतृत्व करावे. महाराष्ट्रातून अनेक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे आपापल्या ठिकाणी वातावरणनिर्मिती करतील आणि जनमानस संघटित बनवतील. कृती कार्यक्रम एक कलमी व सोपा आहे. आपापल्या भागात ज्या-ज्या राजकीय पक्षांचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य असतील, त्यांना ही मागणी पटवून देणे. स्वाभाविकच ते आपापल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत या मागणीचा आग्रह धरतील आणि पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात या मागणीचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहतील. समजा त्यांनी नकार दिलाच तर त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून उपोषणाचा सनदशीर मार्ग शिल्लक आहेच. एप्रिलपासून ही मोहीम सुरू होईल. ऑक्टोबरपर्यंत चालेल. महाराष्ट्रातील निवडणुका नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान होणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये कदाचित पक्षांचे जाहीरनामे तयार होऊ लागतील. त्यावेळच्या परिस्थितीवर २ ऑक्टोबरची कार्यवाही ठरेल. परंतु तोपर्यंत तरी उत्साहाने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी आपापल्या कुवतीनुसार यात सहभागी व्हावयास हवे. ज्यांना अशी इच्छा असेल, त्यांनी मला जरूर लिहावे. अधिक तपशील देता येईल.

मुद्दा कोणताही असो; वैचारिक जनजागरणाचा की, गुटखा निर्मूलनाचा त्यातील मूळ असे आहे- अंनिसला अभिप्रेत असलेले विवेकवादी चळवळ विस्तारण्याचे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९९)




रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

फॅसिस्ट मनोवृत्ती रोखण्याचे ‘अंनिस’ला आव्हान



फॅसिस्ट मनोवृत्ती रोखण्याचे ‘अंनिस’ला आव्हान
दाभोलकर, कार्यक्रम, विरोध, फॅसिस्ट वृत्ती

‘अंनिस’ शाखांच्या कामात अनेक कारणांनी चढउतार होत असतात. एखाद्या कालखंडात प्रभावीपणे काम करणाऱ्या शाखेचे कार्य काही कारणांनी नंतर थांबते. ते जसे थांबते तसेच काही वेळेला, काही काळानंतर उसळी मारून वर येते. पनवेल शाखेचे काहीसे असेच झाले. एकेकाळी ही शाखा अत्यंत कृतिशील होती. महाराष्ट्रव्यापी काही प्रमुख मोहिमा पनवेल येथून निघाल्या किंवा पनवेल येथे त्यांचा समारोप झाला. समितीचे वार्तापत्र काही काळ पनवेल येथूनच प्रकाशित होत होते. पुढे काही ना काही कारणांनी ‘पनवेल’चे काम हळूहळू थांबले. अलिकडच्या काळात पुन्हा एकदा ‘पनवेल’ने जोर पकडला. पनवेल शाखा उत्तम प्रकारे कार्यक्रम आयोजित करते, असे ऐकत होतो. प्रत्यक्षात कार्यक्रमाला जाण्याचा योग आला, तो माझ्या पुस्तकाच्या ग्रंथार्पण सोहळ्याच्या निमित्ताने.
     
कार्यक्रमाची भरपूर आणि नीट तयारी पनवेल शाखेने केली होती. वातावरणनिर्मिती चांगली झाली होती. ‘अंनिस’चे कार्यक्रम जोरात होणार, असे दिसू लागले की, स्वत:ला सनातनी धर्माचे रक्षक म्हणवणाऱ्यांच्या पोटात दुखू लागतेच. कार्यक्रमाच्या दिवशीच १०० जणांचा जथ्था पोलिस स्टेशनला थडकला. माझे नाव घेऊन त्यांनी भाषणबंदी आणण्याची मागणी केली. त्यावेळी गडबडून न जाता ‘पनवेल’चे साथी खंबीर राहिले. अर्थात, पोलिसांचा दृष्टिकोनही आपल्याला सहकार्याचा होता. त्यांनी भाषणात अमुक-अमुक नसावे (उदा. हिंसेची चिथावणी, धार्मिक भावना दुखावणे इ.) अशी नोटीस माझ्यावर बजावली. मात्र हा आमचा नोकरीचा नाईलाज आहे, अशीही खंत बोलून दाखवायला ते विसरले नाहीत. अशा परिस्थितीत सत्याग्रही वृत्तीने नोटीस स्वीकारणे मला योग्य वाटते. तशीच ती याही वेळा मी स्वीकारली. नोटीस स्वीकारून काहीच फरक पडत नाही. आपल्याला बोलावयाचे ते बोलता येतेच; परंतु त्यामधून स्थानिक पोलीस प्रशासनाशी कार्यकर्त्यांचे सहकार्याचे संबंध जुळू शकतात. त्याचा काम करताना त्यांना फायदा होऊ शकतो.

कार्यक्रमाच्या हॉलमधील वातावरण कार्यकर्त्यांच्या उमेदीमुळे उत्साही होते. पोलीस बंदोबस्त भरपूर होता; परंतु तणाव नव्हता. कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न झाला. कार्य घरचेच आहे, या भावनेने आरती नाईक, महेंद्र नाईक, महेंद्र पाटेकर, मनस्वी पाटेकर, मनोहर तांडेल, संतोष टकले, प्रसाद शहा, धनाजी फडके, मधुश्री, उल्हास ठाकूर भरपूर राबले. आरती नाईकने सूत्रसंचालन उत्तम प्रकारे केले. ते इतके प्रभावी ठरले की, सोनाली कुलकर्णीने तिला आपणहून दाद दिली. कार्यक्रम संपला. महेंद्र पाटकरांच्या घरी सर्व सहकाऱ्यांचे एकत्रित भोजन झाले. त्याचा बेतही साधा, सुटसुटीत होता. पनवेल येथे शाखेची चांगली टीम उभी राहत आहे, याचे समाधान घेऊन मी पनवेल सोडले. अर्थात, रायगड जिल्ह्याचे सहकार्य सतत पनवेल शाखेसोबत आहेच. कार्यक्रमालाही नितीन राऊत, नीलेश घरत, रोहिदास गायकवाड, तुकाराम शिंदे, श्रीमती जेधे, श्रीमती जोगळेकर हे कार्यकर्ते आले होतेच. पनवेल शाखेचा उल्हास ठाकूर हा तसा सर्वात जुना कार्यकर्ता असावा. त्यांनी पनवेल शाखेच्या नव्या उभारीबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले.

आणि हो, एक महत्त्वाचे सांगायचे राहिलेच. पनवेल शाखेचा अध्यक्ष संतोष टकले हा उत्साही तरुण आहे. तो भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतो. उत्तम सामाजिक बांधिलकी असलेला संतोष टकले पनवेल शाखेचा अध्यक्ष तसा अलिकडेच झाला. अत्यंत अल्प किमतीत खेडेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी तो संगणक वर्गही चालवतो. त्याने अगदी सहजपणे आणि कसलाही गाजावाजा न करता ५० हजार रुपयांची देणगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली.

पनवेल शाखेची ही वाटचाल सुखावणारी आहे. ग्रंथार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ती प्रत्यक्ष अनुभवायास मिळाली, हा मोठाच फायदा झाला.

ग्रंथार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी जे कार्यक्रम झाले, त्यात काही वेगवेगळे मुद्दे पुढे आले. ते समितीच्या कार्याची उपयुक्तता, सामर्थ्य वा आव्हाने दाखवतात. त्यातील दोन मुद्दे असे-

१) पुणे येथे ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी असा मुद्दा मांडला की, समिती ज्या स्वरुपाचे काम करते, त्या कामात एक धोका असतो, तो म्हणजे लोकांपासून एलिनेट होण्याचा; म्हणजेच अलग पडण्याचा. अंधश्रद्धा निर्मूलनार्थ जी बौद्धिक, वैचारिक मांडणी करावी लागते, त्यामध्ये धारदार युक्तिवाद असतो. दुसरीकडे, अंधश्रद्धांचा उपहास असतो. समोरच्या माणसाशी संवाद साधायला या दोन्ही बाबी उपकारक नाहीत. धारदार युक्तिवाद करणाऱ्या माणसांबद्दल एक प्रकारचा परकेपणा वाटतो. इतरांविषयी तुच्छभाव जाणवतो. दुसरीकडे, ज्या अंधश्रद्धा असतात, त्यांचे महत्त्व त्या व्यक्तींच्या लेखी खूप असते. त्यामुळे त्यांची खिल्ली उडवणारी व्यक्ती त्यांना परकी वाटते. या दोन्हीचा परिणाम एकच होतो, तो म्हणजे सर्वसामान्य लोक चळवळीपासून अलग पडतात. विवेकवादी चळवळीबद्दल हे महाराष्ट्रात काही प्रमाणात घडून आलेले आपण पाहतो. गेली २० वर्षे प्रत्यक्ष मैदानात असूनही हा धोका टाळण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती यशस्वी झाली आहे, याबद्दल प्रा. जाधव यांनी समाधान व्यक्त केले. त्यांचे हे प्रतिपादन ऐकल्यानंतर मला जाणवले की, यापूर्वी हा मुद्दा आपल्या कधी लक्षातच आला नव्हता. ही बाब अजाणता घडून आलेली आहे. तरीही ती कशाप्रकारे घडून आली, याचा शोध घेणे उद्बोधक ठरेल.

२) मुंबई येथे प्रा. डॉ. सुधीर पानसे यांनी आधुनिक बुवाबाजीचा मुद्दा संभाव्य फॅसिझमशी जोडून दाखवला. त्यांचे मत असे की, सध्याच्या बुवा-बाबांना मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. हे अनुयायी बाबांचा शब्द अंतिम प्रमाण मानतात. त्याबाबत प्रतिवाद करणारा कोणताही तर्क वा युक्तिवाद त्यांना अजिबात खपत नाही आणि एवढेच नव्हे, तर असे वैचारिक जनजागरण करणाऱ्या लोकांचा, संघटनांचा ते हिंसक प्रतिवाद करतात. डॉ. पानसे यांच्या मते, एखाद्याचे शब्द प्रामाण्य मानणे, त्याबाबत कोणताही प्रतिवाद न ऐकणे आणि कोणी तसा करण्याचा प्रयत्न केल्यास हिंसा वापरून तो आवाज बंद करणे, हे सर्व फॅसिस्ट मनोवृत्तीचे लक्षण आहे. आपल्या समाजात आज ज्या पद्धतीने बुवा, बाबा वाढत आहेत, त्या पद्धतीने विचार केला तर समाजात फॅसिस्ट वृत्तीची वाढ होण्यासाठी अनुकुलता तयार होत आहे, याची ती खूण आहे. यामुळे लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होऊ लागते. काही प्रमाणात महाराष्ट्रात ही सुरुवात झालेली आहे. ‘अंनिस’च्या कार्याला पुढचे आव्हान हेही फॅसिस्ट मनोवृत्ती समाजात पसरू नये, यासाठी करावयाच्या संवादाचे आहे.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून २०१०)

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

शैक्षणिक जाहीरनामा परिषद



शैक्षणिक जाहीरनामा परिषद
दाभोलकर, कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, तरुण पिढी, जाहीरनामा, शिक्षण

      महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ हे संयुक्तपणे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद घेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वाटचालीतील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे जाण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमास व्यापक स्वरुपात कृतीचा पाया लाभण्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे. अशा महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती ही प्रत्यक्ष कार्यक्रमातून हल्ली महाराष्ट्रातील लोकांपर्यंत कमी पोचते. कारण हल्ली वृत्तपत्रांना जिल्हा अथवा विभागाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रव्यापी परिषदेसारखी महत्त्वाची घटनाही योग्य प्रकारे महाराष्ट्रातील वृत्तपत्रीय प्रसारमाध्यमांत नोंदवली जाईलच, असे नाही. दुसरे असेही आहे की, अशा परिषदेच्या निमित्ताने आपला विचार सर्वदूर पोचवणे व त्यासाठी त्या विचाराच्या पैलूबाबत छोट्या-मोठ्या स्वरुपात लेखन करणे ही बाबदेखील महत्त्वाची असते. असे लेखन स्वत: करणे किंवा ज्यांना लेखनक्षमता आहे, अशा समविचारी मित्रांकडून किंवा पत्रकारांकडून करवून घेणे, लेखन प्रकाशित होईल याची काळजी घेणे हे कार्य ‘अंनिस’चे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याकडून अपेक्षित आहे. या लेखनात कोणते मुद्दे यावेत, यासाठी पुढे विस्तृत नोंदी दिल्या आहेत. त्यापैकी काही मुद्द्यांचा वापर करून स्थानिक पातळीवरील छोटी-मोठी वृत्तपत्रे, साप्ताहिके यामध्ये छोटे-मोठे लेख द्यावेत. आधी संपादकांशी बोलून त्यांना अपेक्षित शब्दसंख्या विचारून घ्यावी. त्याबरोबरच लेखात त्यांना कोणत्या मुद्द्यांची चर्चा अधिक आवडेल, हेही विचारावे. लेख २१ अथवा २८ सप्टेंबरदरम्यान प्रसिद्ध होण्यासाठी त्याआधी १० दिवस संपादकांना पोचावे लागतात. यासाठी माझ्या टिपणाचे वाचन होताच त्वरित कार्यवाही करावी. तसेच प्रसिद्धीला दिलेल्या लिखाणाची एक प्रत (ते कोठे प्रसिद्धीला दिले, या वृत्तपत्राच्या नावासह) माझ्याकडे पाठवावी.

वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या शैक्षणिक जाहीरनाम्यावरील लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे.
१) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी उभी राहिली. या टप्प्यापासून वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत समितीच्या वैचारिकतेचा झालेला कृतिशील विकास समितीची प्रगल्भता स्पष्ट करते. हे टप्पे थोडक्यात पुढीलप्रमाणे -
अ) जादूटोणा, भूत, भानामती, डाकीण प्रथा, चमत्कार या सर्वांच्या विरोधात संघर्ष करणे हे समितीचे एक प्रमुख कार्य आहे. याबाबत समिती सतत संघर्षशील आहेच. जादूटोणाविरोधी कायद्याची निर्मिती व अंधश्रद्धेला प्राधान्याने बळी पडणाऱ्या महिला व अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत राज्यव्यापी परिषद व जाहीरनामा या महत्त्वाच्या बाबी आहेत.
ब) वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी समितीने अथक प्रयत्न केले आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण, त्यामार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे, सुसज्ज वाहनातून विज्ञानबोध वाहिनी आणि फिरते नभांगण यासाठीचे प्रकल्प, सर्प, पर्यावरण व वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबतची राज्यव्यापी परिषद, शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद ही सर्व या वाटचालीची उदाहरणे आहेत.
क) अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुढच्या टप्प्यावर विवेकवादाकडे वाटचाल केली. शासनाने व्यसनविरोधी समग्रनीती स्वीकारावी, यासाठी; तसेच एच.आय.व्ही.बाधित नसल्याची विवाहपूर्व चाचणी करावी, यासाठी एक लाख सह्यांचे निवेदन शासनाला दिले व राज्यव्यापी परिषद घेतली. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी राज्यव्यापी केंद्र सुरू केले व त्या मार्फत सुमारे २०० विवाह संपन्न झाले. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह समर्थन व संघटन परिषद घेतली.
ड) शिक्षण क्षेत्रात मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद चालू व्हावा म्हणून सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता याची शैक्षणिक सनद तयार केली.
इ) वरील सर्व वाटचालीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा ता. २३ व २४ फेब्रुवारीला राज्यव्यापी चर्चासत्रात तयार करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या सहकार्याने ही जाहीरनामा स्वीकृती परिषद ता. २७, २८ सप्टेंबर रोजी जळगावला होते आहे. या स्वरुपाचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील हा पहिला प्रयत्न आहे.
२) संघटनात्मक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मांडणी कालसुसंगत व समाजाला पुढे नेणारी आहे. याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्राचे शिक्षण खाते, वनखाते, सामाजिक वनीकरण संचालनालय, पर्यावरण खाते अशा अनेक शासकीय यंत्रणांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर आनंदाने सहयोग केला. ही बाबदेखील समिती मांडत असलेल्या विचाराला मान्यता दाखवते.
३) हा जाहीरनामा ज्या गृहितकावर तयार केला आहे, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व मूल्यांना व्यापक प्रमाणावर अधिमान्यता आहे. ती खालीलप्रमाणे -
) भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी व मानवतावाद यांची जोपासना करणे, हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे.
ब) शिक्षणाच्या गाभाघटकात महत्त्वाचा गाभाघटक म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे. याबरोबरच मूल्यशिक्षणातही त्याचा अंतर्भाव आहे.
क) महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी हाच विचार प्रभावीपणे मांडला आहे, व्यक्तिगत जीवनात आचरला आहे व सामाजिक जीवनात पुरस्कारला आहे.
ड) महाराष्ट्रातील बहुसंख्य शिक्षण संस्था आज महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवतात. महाराष्ट्रातील विद्यापीठांना संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांची नावे देण्यात आली आहेत, हे लक्षणीय आहे आणि या दोन्ही संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.
४) भारतीय घटनेने व्यक्तीला धर्मपालनाचे व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. या मूलभूत स्वातंत्र्याचा पूर्ण आदर करून वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याचा विचार पसरवता येतो. याबरोबरच हेही लक्षात घ्यावयास हवे की, सामाजिक हितासाठी धर्मचिकित्सा करणे हेदेखील संविधानास अभिप्रेत आहे. अशी धर्मचिकित्सा समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख करते, परमेश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री करते. त्यामधून धर्मनिरपेक्षतेचा विचार अधिक प्रगल्भ बनतो. त्यामुळे जाहीरनाम्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन व धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा गाभा रूजवला जाईल.

जाहीरनामा अंमलबजावणीत अपेक्षित असलेल्या बाबी
१) शाळेची प्रार्थना, परिपाठ यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संदेश देणाऱ्या गीतांचा, वचनांचा समावेश करावा.
२) आजही ग्रामीण महाराष्ट्रात जादूटोणा, भूत, भानामती, मंत्र-तंत्र, मूठ मारणे, चेटूक या स्वरुपाच्या अनेक अनिष्ट व अघोरी बाबी चालू असतात. त्याबाबत विद्यार्थी मनात एक गूढता व संदिग्धता आढळते. अशा सर्व बाबी स्पष्टपणे व धैर्याने नाकारण्याचे विद्यार्थी मानस घडवावयास हवे. आजची पिढी अशी घडल्यास उद्याच्या समाजातील अंधश्रद्धा कमी होतील. महाराष्ट्र शासनाचा संकल्पित जादूटोणाविरोधी कायदा हे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. त्यामुळे या कार्याला थोडी अनुकुलताही प्राप्त झाली आहे.
३) समाजात सर्व प्रकारची धार्मिक कर्मकांडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, वाढवली जात आहेत. समाजाच्या धार्मिक मानसिकतेला नैतिकतेकडे नेण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. याउलट सध्या सर्वच धर्मवादी शक्ती ही धार्मिकता धर्मांधतेकडे वळवण्याचा खटाटोप राजकारणासाठी करत आहेत. अशा वेळी कालबाह्य रूढी, परंपरा याबाबतीत विधायक पर्याय देण्याची गरज आहे. असे प्रयत्न काही प्रमाणात शिक्षण क्षेत्रात आज सुरू आहेत. त्याला व्यापक पाठबळ जाहीरनामा व त्याची अंमलबजावणी यामुळे लाभेल. महाराष्ट्रातील प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विषारी रासायनिक रंगांनी रंगवलेल्या सुमारे एक कोटी गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण करतात. याला पर्याय म्हणून मातीच्या अथवा कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती तयार करून त्या वनस्पती रंगाने रंगवल्या व विसर्जन घरोघरी केले तर संपूर्ण परिस्थिती बदलते. लाकूड जाळणाऱ्या होळीला दुर्गुणांच्या होळीचा अभिनव पर्याय देता येतो.
४) केवळ विज्ञान विषयच नव्हे, तर शिक्षणातील सर्व विषयांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन आनंददायी पद्धतीने देता येतो, कृतिशील करता येतो. शिक्षकांचे सक्षमीकरण त्यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून मिळवून हे करता येते. याचे प्रयोग ‘भारत ज्ञान-विज्ञान समुदाया’ने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत सिद्ध केले आहेत. शाळेत आलेले सुतार, सायकल दुरुस्तीवाले, शेतकरी या व्यवसायातले पालकही एक कृतिशील वैज्ञानिक दृष्टिकोन देतात व तो उपयुक्त ठरतो. या प्रयोगांचे अनुकरण व सार्वत्रिकरण व्हावयास हवे.
५) अवैज्ञानिक आत्मघातकी जीवनशैली आज विद्यार्थ्यांना सतत खुणावते व बाजारी व्यवस्थेद्वारे त्यांच्यावर लादलीही जाते. व्यसनाची ओढ, फास्टफूडचे सेवन, व्यायाम व वाचनाचा अभाव, यामुळे संपूर्ण जीवनशैलीच अशास्त्रीय बनते व आजारी पडते. दुसरीकडे ग्रीन हाऊस परिणामासारख्या बाबी पृथ्वीची मृत्युघंटा वाजवत आहेत. ही बाब शास्त्रीयपणे सर्वमान्य झाली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला संपूर्णपणे मानव जबाबदार आहे. २०३६ पर्यंत ग्रीन हाऊस वायूचे प्रमाण इतके वाढेल की, त्यामुळे संपूर्ण जगाचे भीषण व अपरिवर्तनीय नुकसान होईल, असे मानले जात आहे. काही मान्यवर तज्ज्ञ हे साल २०२२ असेल, असे सांगतात. हा आघात सोसावा लागू नये म्हणून अनेकविध उपाययोजना व यंत्रणा आज कार्यरत आहेत. परंतु गाभ्याचा मुद्दा असा आहे की, वाढलेल्या ग्रीन हाऊस वायूंचा संबंध सरळसरळ आजच्या चंगळवादी जीवनशैलीशी निगडित आहे. वातानुकूलित व्यवस्था, दिव्यांचा झगमगाट, असंख्य मोटारी, गगनचुंबी इमारती व जीवनशैलीला प्रगती मानणारा आणि त्या चंगळवादात बुडालेला वर्ग आज समाजनियंत्रण करतो आहे. हा वर्ग प्रभावी व संघटित आहे आणि या चंगळवादी जीवनशैलीचे गारूड त्याने भारतातील नव्हे, तर जगातील फार मोठ्या वंचित समूहावर घातले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने म्हणजेच विवेकवादाने जगत असताना पर्यायी जीवनशैलीची सामाजिक गरज निर्माण करणारी मानसिकताही तयार करावी लागेल. जसे - खासगी मोटारीऐवजी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यकतेशिवाय वातानुकूलित व्यवस्थेला नकार इत्यादी. हा विचार एक संस्कार म्हणून शिक्षणात रूजवला जावयास हवा.
६) भारतीयांसंदर्भात एका विशिष्ट महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख अपरिहार्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार केला तर जन्मजात लाभणाऱ्या जातीप्रमाणे व्यक्तीला उच्च-नीच मानले जाते व त्याप्रमाणे व्यवहार करणे, ही निखालस अंधश्रद्धाच आहे. सर्व व्यक्तींची जन्मजात प्रतिष्ठा सारखी आहे, हा संस्कार करावयास हवा. अर्थात, भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाची जी कल्पना आहे, तिला पाठिंबा देणे व जातीला अंधश्रद्धा मानणे या परस्परपूरक बाबी आहेत, याचे भान हवे.

शैक्षणिक जाहीरनामा अंमलबजावणी
वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याच्या शैक्षणिक जाहीरनाम्याचा वरील विस्तृत आशय पाहता हे कार्य संस्थांकडून कसे पार पडेल, अशी एक आशंका येऊ शकते. त्याबाबत पुढील वस्तुस्थिती ध्यानात घ्यावयास हवी.

) नव्या मूल्यजाणिवा रूजविण्याचे कार्य हे कोणत्याही देशात नेहमीच शिक्षण क्षेत्राचे मानले जाते. त्यामुळे ते स्वीकारणे हे शिक्षणव्यवस्थेने स्वत:चे कर्तव्य मानावयास हवे. भारतीय संविधानाची; तसेच शैक्षणिक धोरणाची शिक्षण क्षेत्राकडून हीच अपेक्षा आहे.
२) संपूर्ण शिक्षण क्षेत्राने या स्वरुपाचा निर्णय घेणे व राबवणे हे शासनावर अवलंबून असेल; परंतु महाराष्ट्रातील या शिक्षणसंस्था मनापासून शाहू, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांचा वारसा मानतात. त्यांनी स्वत:च्या शिक्षणसंस्थेच्या पातळीवर या जाहीरनाम्याची अंमलबजावणी आग्रहपूर्वक करावी, अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे १५० शिक्षणसंस्थांनी या जाहीरनाम्यास लेखी मान्यता कळवली आहे. या शिक्षणसंस्थांच्या शाळा व महाविद्यालयांची संख्या याहीपेक्षा बरीच जास्त आहे. या सर्व शाळा, महाविद्यालयांत जाहीरनाम्याची अंमलबजावणी चालू झाल्यास ते इतर संस्थांना नक्कीच पथदर्शक ठरू शकेल.
३) हा जाहीरनामा स्वीकारणाऱ्या संस्थांमधील अंमलबजावणी दोन टप्प्यात असेल-
अ) याबाबतच्या जाणीवजागृतीत मनापासून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांचे प्रशिक्षण घेतले जाईल.
ब) त्यांच्यामार्फत प्रामुख्याने विद्यार्थ्यांत; तसेच सहकारी प्राध्यापकांत हा विचार रुजवणारे प्रबोधन व कृती कार्यक्रम घेतले जातील. याचा आराखडा गेल्या २० वर्षांच्या वाटचालीतून समितीकडे आहे.
४) शिक्षकाने हे कार्य कोणतेही जादा काम, या भावनेने करू नये आणि तसे ते त्याला करावे लागणारही नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने स्वत: अधिक आधुनिक, यशस्वी व नैतिक व्यक्ती बनण्याचा आनंददायी प्रयत्न व त्याला सामूहिक रूप देणे, असे या कामाचे स्वरूप आहे.
५) शाळा अथवा महाविद्यालयांत विचार प्रसार करणारे हे गट विवेकवाहिनी या नावाने कार्यरत होऊ शकतील. विवेकी स्वयंविकासाची ही प्रक्रिया विवेकवाहिनी या नावाने चालवण्यास महाराष्ट्राच्या उच्चशिक्षण संचालनालयाची मान्यता आहे. शालेय पातळीवर ती मिळू शकेल व त्यामुळे एक अधिकृतता लाभू शकेल.
६) जाहीरनाम्याची अंमलबजावणी करताना प्रधान कार्य योग्य विचार करावयास शिकवणे आणि त्या विचाराचा जाहीर प्रसार करणे, हे राहील. शक्य तेवढा आचार करावा हे अभिप्रेत आहेच; परंतु प्रत्यक्ष संघर्ष हा अभिप्रेत नाही.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट २०१२)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...