शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा एल्गार

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा एल्गार
दाभोलकर, युवा एल्गार, अनुभवकथन, कार्यक्रम
कार्यक्रमाची उद्दिष्टे -
१)    प्रबोधन - अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्यशोधकी जाणिवा यांचे विचार व्याख्यान, शिबिरे, चर्चा, प्रात्यक्षिके, पथनाट्ये, पोस्टर प्रदर्शने, पुस्तक विक्री यातून युवक वर्गापर्यंत पोचवणे.

२)    चळवळीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे - प्रबोधनातील विचार पटून जे प्रत्यक्ष कार्याला तयार होतील, त्यांच्यामार्फत विविध स्वरुपाच्या अंधश्रद्धांचे सर्वेक्षण करणे. हा प्रश्न आजही किती व्यापक आहे, हे जनतेसमोर आणणे, त्याबाबत लोकशिक्षण व संघर्ष करण्यास युवकांस तयार करणे, ‘युवा एल्गारचा कार्यक्रम या दोन महिन्यांत संपल्यानंतरही पुढे सतत सुरू राहणारे हे कार्य आहे. यासाठी यावेळी संपर्कात येणारे कृतिशील युवक स्थानिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्न होणे उपकारक ठरेल.

३)    संकल्प - प्रबोधनाच्या मोहिमेमुळे किमान स्वत:च्या आयुष्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काही संकल्प स्वीकारण्यासाठी तयार झालेल्या युवकांची संकल्प पत्रे भरून घेणे.

४)  युवा एल्गार मेळावे - युवकांच्या उसळत्या उत्साहाला प्रकट वाव देण्यासाठी,  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारामागे उभ्या असलेल्या युवाशक्तीच्या सामर्थ्याचा संघटित आविष्कार घडविण्यासाठी युवकांची मिरवणूक काढणे, त्याचे मेळाव्यात रूपांतर करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संघर्ष करण्याचा निर्धार समूहाने प्रकट करणे.

कार्यपद्धती
वरील उद्दिष्टे पार पाडण्यासाठी यंत्रणा कशी उभी करावी, याबाबत स्थानिक शाखांना स्वातंत्र्य आहे. एक सर्वसाधारण रूपरेषा पुढे मांडली आहे. त्यामध्ये स्थानिक गरजानुसार आवश्यक ते बदल करण्यास काहीच हरकत नाही.
१)    संपर्क - महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख, इतर युवक मंडळे, विद्यार्थी संघटना, रोटरॅक्ट/लायन्स यांच्याशी या उपक्रमाबाबत बोलावे. त्यांच्या सहकार्याने त्या-त्या कॉलेजात शक्यतो सर्व विद्यार्थ्यांपुढे या मोहिमेबद्दल भाषणे द्यावीत (त्याच्यातील तपशिलाच्या काही सूचना पुढे स्वतंत्रपणे दिल्या आहेत.) कॉलेजबाहेरही विद्यार्थी युवकांसमोर विचार मांडण्याचे प्रयत्न करावेत. कॉलेजातील वा बाहेरील व्याख्यानांना प्राचार्य वा विद्यार्थी-युवक जगताशी संबंधित व्यक्ती व अध्यक्ष असेल, असे पाहावे.
२)    संकल्प पत्रे भरून घेणे - विद्यार्थी-युवकांच्या समोर केलेल्या भाषणानंतर त्यातील ज्यांची इच्छा असेल, त्यांच्याकडून संकल्प पत्रे भरून घेणे.
३)    सक्रिय सहभागासाठी नोंदणी-जे विद्यार्थी आपापल्या भागातील अंधश्रद्धांचे सर्वेक्षण; प्रसंगी संघर्ष, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभाग करू इच्छित असतील त्यांची नावे घेणे, त्यांना समितीच्या बैठकांना बोलावणे. युवा एल्गारचा जो मोठा व प्रभावी मेळावा घ्यावयाचा आहे, त्यामध्ये त्यांचे सहकार्य. हा प्रथम कार्यक्रम त्यांना देता येईल. त्यामुळे संयोजनास मनुष्यबळ लाभेल.
४)    युवा एल्गार संकल्प - मिरवणूक व मेळावे - या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी सामील व्हावे, हा प्रयत्न करावा. मिरवणुकीत बॅनर, पोस्टर्स, घोषणा असाव्यात. त्याला काहीसे जल्लोषाचे स्वरूप असावे. गावातल्या भिंती रंगवाव्यात, पोस्टर्स लावावीत (ती पाठवली जातील). मिरवणुकीचे रूपांतर मेळाव्यात व्हावे. मेळाव्याची आखणी ही नाविन्यपूर्ण असावी. त्याचा तपशील स्थानिक पातळीवर ठरवावा. एक-दोन चांगली गाणी, चमत्काराचे काही प्रयोग, अंधश्रद्धेबाबत काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अनुभव कथन, जाहीर संकल्प स्वीकारणे व पाहुण्यांची एक वा दोनच भाषणे असा दोन-तीन तासांचा कार्यक्रम असावा. प्रमुख पाहुणा युवकांना आकर्षित करणारा, बोलविण्याचा प्रयत्न करावा.

संयोजन
युवा एल्गार मेळाव्यासाठी स्थानिक संयोजन समिती स्थापन करावी. त्यामध्ये कार्यक्रमास आर्थिक व अन्य मदत देऊ शकतील, असे काहीजण असावेत. त्यामुळे एकूण कार्यक्रमाला उठाव जोरदार घेऊ शकेल.

आर्थिक बाजू
स्थानिक केंद्रांनी स्वत: याची आर्थिक तरतूद उभी करावी, अशी अपेक्षा आहे. एकूण कार्यक्रमाच्या संयोजनास किती खर्च येईल, याचा नीट अंदाज घ्यावा. निधी संकलन देणगीरूपाने वा ५, १० रुपयांची कूपन्स खपवूनही होऊ शकेल. संकल्पपत्रे व पोस्टर्स मध्यवर्तीतर्फे छापून घेऊन पाठविली जातील. त्याची किंमत प्रत्येकी एका नगास २० पैसे व ७५ पैसे राहील. ही रक्कम स्थानिक शाखेने, ही पोस्टर्स घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडे रोख द्यावीत, अशी अपेक्षा आहे. (मात्र ते शक्य नसल्यास शक्यतेनुसार नंतर पाठविली तरी चालतील) मध्यवर्तीकडे निधी नसल्याने ही विनंती करण्यात येत आहे.

प्रसिद्धी
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा एल्गारची कल्पना, त्यासाठी स्थापन झालेली संयोजन समिती, विविध महाविद्यालयांतील भाषणे व संकल्प पत्रे भरून घेणे, मेळाव्याची तयारी, मेळावा याबाबत वेळोवेळी बातम्या द्याव्यात. स्थानिक वृत्तपत्रांचे सहकार्य असल्यास संकल्प पत्रातील प्रत्येक संकल्पावर रोज एक-एक याप्रमाणे टिपण लिहावे. स्थानिक प्रचारासाठी छोटी पत्रकेही जरूर छापून घ्यावीत. आपल्या विभागातील आकाशवाणी केंद्राशीही संपर्क साधावा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...