सावरकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सावरकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

‘सेक्युलर’ हिंदुत्ववाद

‘सेक्युलर’ हिंदुत्ववाद
दाभोलकर, धर्मांधताविरोध, जमातवाद, सावरकर
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य धर्मांधतेच्या विरोधात आहे, हे चटकन समजते. धर्मश्रद्धा बहुतेक वेळेस अंधरूपाने प्रकट होते. रूढी, व्रतवैकल्ये, कर्मकांडे, सण, उत्सव या सर्वांमध्ये गुंतलेल्या माणसाबद्दल आपण सतत बोलत असतो, कृतीही करत असतो. हे काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मोठ्या आग्रहाने केले. त्यामुळे ते अंधश्रद्धा निर्मूलनाचेच प्रवक्ते आहेत, असेही आपल्यापैकी अनेकांना वाटते. सावरकर एवढेच काय; बॅरिस्टर जिना देखील पारंपरिक अर्थाने धर्मश्रद्ध नव्हतेच; पण तरीही त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडले, त्यांची फळे आपण आज भोगत आहोत.

आपण धर्मांधतेविरोधी आहोत; परंतु जमातवादाविरोधी आहोत का, असा प्रश्न विचाराल तर समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते व हितचिंतक विचारात पडतील. कारण धर्माची अंधता व अंधश्रद्धा हे नाते आपल्याला चटकन समजते-उमजते. परंतु जमातवादाचा धोका तेवढ्या नेमकेपणाने आपल्या मनात नोंदलेला नसतो. धर्मांधतेविरोधात एक महाराष्ट्रव्यापी मोहीम आपल्या समविचारी काही संघटनांनी अलिकडेच चालू केली. संपूर्ण महाराष्ट्रात ती पुढील वर्षभर चालेल. त्यानिमित्ताने आपण आपले विचार अधिक नेमके व धारदार करावयास हवेत, असे मला वाटते.

जमातवाद याचा अर्थ धर्म हा राजकीय हेतूने एकत्र आणणे किंवा लोकांना एकत्रित आणणारा राजकीय घटक म्हणून धर्माचा वापर करणे. असे करावयाचे म्हणजे स्वत:च्या धर्माबद्दल, त्याच्या उज्ज्वल भूत आणि भविष्य काळाबद्दल अतिरेकी अभिमान निर्माण करावयाचा. दुसरीकडे, इतर धर्म तात्त्विकदृष्ट्या आणि व्यवहारातही कसे कमअस्सल आहेत, याचा सतत पुकारा करावयाचा; याबरोबरच ते आपले शत्रू आहेत, हे घोषित करावयाचे आणि यासाठी करावयाच्या कृती कार्यक्रमात हिंसा अटळ, आवश्यक, समर्थनीय व नैतिक आहे, असे आग्रहाने प्रतिपादन करावयाचे. जमातवादाची ही लक्षणे लक्षात घेतली म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे सावरकरांचे कार्य हे प्रत्यक्षात त्यांच्या जमातवादी तत्त्वज्ञानाला ताकद देण्यासाठीच त्यांना हवे होते, हेच स्पष्ट होते. धर्माच्या तलवारीवर अंधश्रद्धेचा गंज चढलेला असेल तर ती पुरेशी प्रभावी ठरणार नाही. यासाठी तो गंज काढून तलवार लखलखीत करावी, अशी ती भूमिका होती. ती विवेकवादी बुद्धिप्रामाण्यवादाची नव्हती. जमातवादी राजकारणाला सोयीस्कर अशी विज्ञानवादी होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी हे नीटपणे समजावून घ्यावयास हवे. धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या शक्ती कोणत्याही धर्माच्या असोत, त्या विवेकवादी चळवळीला घातकच आहेत. त्यांचा कठोरपणे मुकाबला करावयास हवा. परंतु मुसलमान, ख्रिश्चन यांनी स्वत:ला सांभाळून नीटपणे आणि निमूटपणे राहावे, असे इशारे अलिकडे बजरंग दल अथवा विश्व हिंदू परिषद यांनी दिले. त्यातील गांभीर्य अधिक आहे. कारण या राष्ट्रातील बहुसंख्यांना विद्वेषी भावनेने चेतावण्याचा तो प्रकार आहे. तो तसा वाटू नये म्हणून हिंदुत्ववाद्यांनी एक वैचारिक धक्कातंत्र वापरले आहे, ते म्हणजे त्यांच्या मते, खरे धर्मनिरपेक्ष तेच आहेत आणि बाकीचे खोटे धर्मनिरपेक्षवादी आहेत, म्हणजे काय?

धर्मावर आधारित राष्ट्रवाद हीच ज्यांची धारणा आहे, त्यांनीच स्वत:ला खरे धर्मनिरपेक्षवादी म्हणून घोषित केले. त्यांच्या मते, हिंदू धर्म हाच फक्त धर्म या संज्ञेला पात्र आहे. धर्म ही एक विशाल संकल्पना आहे आणि त्यामध्ये जीवनाची, समाजाची धारणा करणारी सर्व अंगे आपोआपच समाविष्ट आहेत. परंतु हे फक्त खरे आहे, हिंदू धर्माबद्दलच. बाकीचे धर्म उदाहरणार्थ, इस्लाम अथवा ख्रिश्चन या फक्त उपासनापद्धती आहेत. या उपासनापद्धतीचा पूर्ण आदर या देशात केला जाईल. कारण या देशाची तशी परंपराच आहे. परंतु याची एक पूर्वश्रद्धा आहे, ती अशी की, या अन्य धर्मियांनी मान्यता द्यावयास हवी की, या राष्ट्राचा मुख्य प्रवाह हिंदू धर्म आहे. याचाच अर्थ हे अन्य धर्मीय पहिल्यांदा व्यापक राष्ट्रीय अर्थाने (जो हिंदुत्ववाद्यांच्या मनात आहे) प्रथम हिंदू आहेत; मग त्यांच्या उपासना धर्माचे आहेत. म्हणजेच त्यांनी स्वत:ची ओळख हिंदू-मुस्लिम, हिंदू-ख्रिश्चन अशी करून द्यावयास हवी. ही भूमिका धर्म ओलांडून राष्ट्राच्या मुख्य गाभ्यापर्यंत जाऊन पोचते. म्हणून ती खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे. ती भूमिका बाळगणारे हिंदुत्ववादी सेक्युलर आहेत आणि या भूमिकेला विरोध करणारे स्युडो सेक्युलर आहेत.

परंतु हा वैचारिक गोंधळ उडवून देऊनच ही मंडळी थांबत नाहीत, तर दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन आणि मुस्लिम यांनी आमचा प्रस्ताव मानावा; अन्यथा या राष्ट्रातून बाहेर पडावे, असे बजावू लागतात आणि त्यासाठी शारीरिक बळाचा (हिंसेचा) वापर करतात. जमातवादाच्या या चेहऱ्याचा धर्मचिकित्सेशी वा धर्मसुधारणेशी काहीही संबंध नसतो.

या सर्वांविरोधात उभे राहत असताना कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावयाच हवी. मुस्लिम धर्मांधता, जमातवाद यामुळे हिंदूंना कट्टर बनणे शक्य झाले हे खरे आहे; परंतु हे अर्धसत्य आहे. मुस्लिम जमातवाद्यांच्या चुकांच्यामुळे हिंदू जमातवाद फोफावण्यास मदत झाली हे खरे; परंतु याबरोबरच यासाठी महत्त्वाचे आर्थिक कारणही आहे, जे डोळ्याआड करून चालणार नाही. भारतातील वाढ खुरटलेल्या भांडवलशाहीला लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जमातवादाची वाढ होणे सोयीचे होते. आता तर मूठभर भांडवलदारांपेक्षा गावोगावी पसरलेला, कोणताही विधिनिषेध न बाळगणारा व्यापारीवर्ग तालु्क्यात संघटित झाला आहे. त्यांच्या प्रचंड नफेखोरीवरून, ऐषआरामी जगण्यावरून लक्ष उडवण्यासाठी जमातवाद वापरला जात आहे.

थोडक्यात असे की, धर्मांधता विरोधाचे आणि धर्मनिरपेक्षतेचा पुकार करणारे कार्य हे केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाने होणार नाही. त्यासाठी जमातवाद जाणीवपूर्वक व हिंसक पद्धतीने जनसमुदायात पोचवण्याचे कट-कारस्थान आपण ओळखले पाहिजे, त्याचा मुकाबला करणे आपले कर्तव्य मानले पाहिजे. निदान आक्रमक प्रबोधनाच्या पातळीवर हे करण्याची गरज पूर्वी कधी नव्हती, एवढी आता निर्माण झाली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९९)

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

शेवटी साध्य महत्त्वाचे



शेवटी साध्य महत्त्वाचे
दाभोलकर, सावरकर, जमातवाद, हिंदुत्ववाद

प्रति संपादक,
आपल्या जून ९९ च्या अंकात माझ्या पत्रासोबतच डॉ. नरेंद्र दाभोलकर त्यांचा खुलासाही आपण प्रसिद्ध केला. त्यामुळे समाधान वाटले. ते म्हणतात की, ‘हिंदू हे एका धर्माचे नाव नसून एका राष्ट्राचे नाव आहे. हेच स्वा. सावरकरांचे वाक्य आज भाजपही सांगत आहे. भाजपच्या कोणत्या प्रवक्त्याने केव्हा हे सांगितले? भाजप हे आर.एस.एस.चे अपत्य आहे. त्यांना सावरकरांपेक्षा गोळवलकर गुरुजींचे विचार अधिक जवळचे वाटतात आणि हे गुरुजी तर सावरकरांबद्दल, ते राष्ट्रीयदृष्ट्या मुसलमान आहेत’, असे म्हणाले होते. गोळवलकर गुरुजींचे विचार सावरकरांना चिकटवणं सावरकरांवर अन्यायकारक होईल, असे वाटते.

मुसलमान, ख्रिश्चन यांनी स्वत:ला हिंदू मुसलमान, हिंदू ख्रिश्चन म्हणवून घेत या राष्ट्रात राहावे, असे सावरकर कुठं व केव्हा म्हणाले? गोळवलकर गुरुजी असे म्हटले असण्याची खूप शक्यता आहे. ही भूमिका धर्मनिरपेक्षतेच्या मुळावरच येते, हे मला मान्य आहे; पण भाजपने ती सावरकरांकडून उचलली, याला आधार काय? बलाचा वापर फक्त जमातवादीच करतात काय? स्वत:ला ‘सेक्युलर’ समजणारे त्यापासून अलिप्त आहेत काय? स्वत:ला गांधीवादी म्हणणारे सुद्धा अपवाद नाहीत. मुळातच बलाचा वापर यावर डॉक्टरांचा एवढा कटाक्ष का?
     
स्वातंत्र्यवीरांनी सत्यनारायणाची पूजा घातली असेल तर ती कशी? हे कोडं कॉ. डांगे सत्यनारायणाचा (कामगारांनी केलेल्या) प्रसाद घेत व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांनी एका उद्ध्वस्त मंदिराच्या पुनरुत्थान विधीचं पौरोहित्य केलं होतं, या कोड्याइतकच अनाकलनीय वाटतं. अशी आणखी उदाहरणे आहेत. डॉ. दाभोलकरांच्यात अशी विसंगती नसेल तर ते नि:संशय अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी, माझा युक्तिवाद बालिश व घोर अज्ञान दाखविणारा आहे. असा आहेरही मला दिलेला आहे. त्यावर अधिक भाष्य करणं मला उचित वाटत नाही. कारण मी लहान आहे. हे सर्व प्रकरण प्रा. शेषराव मोरे, नांदेड त्यांच्यापर्यंत अवश्य पोचवावे, असं मला प्रकर्षाने वाटतं.
य. ज. महाबळ, जळगाव

संपादक,
श्री. महाबळ यांचे पत्र वाचले. मला वाटते, ते समजून घेण्यात घोटाळा करत असावेत किंवा समजून देण्यात मी अपुरा पडत असावा. म्हणून अगदी थोडक्यात,
१) सावरकरांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा विचार हा जमातवादीच होता.
२) यासाठी हिंदू कोण याची व्याख्या करणे भाग होते. पितृभू आणि पुण्यभू भारत असणारे ते हिंदू, अशी सावरकरांनी व्याख्या केली. ज्यांची पुण्यभू भारताबाहेर आहे, म्हणजे विशेषत: इस्लाम व ख्रिश्चन हे अर्थातच यामुळे अहिंदू ठरले. हिंदू राष्ट्रनिर्मितीत दुय्यम दर्जाचे ठरले.
३) सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह हा हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी सहाय्यकारी म्हणून होता, तो मानवतावादी नव्हता.
४) धर्मनिरपेक्षता हा घटनेच्या मूळ ढांचाचा भाग आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या १९ जणांच्या खंडपीठाने एकमताने सांगितल्यावर धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र निर्माण करू इच्छिणाऱ्या संघाची पंचाईत झाली. मग त्यांनी पवित्रा बदलला व सांगावयास सुरुवात केली की, देशातले सर्व हिंदूच आहेत. कारण ती एकच जीवनपद्धती आहे. बाकीच्या उपासनापद्धती आहेत. म्हणून या देशातला मुसलमान ख्रिश्चन हा ख्रिश्चन-हिंदू आहे, असे प्रतिपादन आहे. म्हणजे धर्म व संस्कृती या अर्थाने हिंदू उपासनापद्धतीचे स्वातंत्र्य म्हणून मुस्लिम. स्वाभाविकच ही भूमिका खरी धर्मनिरपेक्ष आहे, अशी मल्लिनाथी ते करतात.
५) या देशातील कोट्यवधी मुस्लिम व ख्रिश्चन बांधवांना हे कधीही मान्य होणार नाही. त्यांना मान्य करण्याचा उपाय काय तो राहतो. बलाचा, हिंसेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर. अर्थातच तो त्याज्यच मानावयास हवा.
६) सत्यनारायणाची पोथी व पूजा ही पूर्णत: भाकड आहे, यावर सावरकरांचा विश्वास होता. पण ती करण्याची लोकांची इच्छा असेल तर करावी आणि हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी धर्मांतरित हिंदू पुन्हा हिंदू धर्मात येण्यासाठी साकडे घालावे, यात त्यांना काही गैर वाटत नव्हते. शेवटी साध्य महत्त्वाचे; साधन कोणते का असेना, अशी ही भूमिका होती. ती नैतिक म्हणून चूक आहे. सावरकरांच्या प्रमाणे तर्कतीर्थ वा डांगे यांनी याबाबत स्वत:ची भूमिका लिहून ठेवली आहे का? भाषणरूपाने, बातमीरूपाने उपलब्ध आहे का? हा मूळ भूमिकेबद्दलचा प्रश्न नाहीसा होत नाही, असे मला वाटते. माझ्याकडून ही चर्चा आता मी थांबवत आहे.

नरेंद्र दाभोलकर
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑक्टोबर १९९९)

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

सोयीस्कर (धर्म) राष्ट्रवादी सावरकर



सोयीस्कर (धर्म) राष्ट्रवादी सावरकर
दाभोलकर, सावरकर, हिंदुत्ववाद

प्रति संपादक,
आपल्या मे-९९ च्या अंकात पृष्ठ ३२ वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा सेक्युलर हिंदुत्ववाद हा लेख आहे. तो वाचल्यावर मला काय वाटलं, ते थोडक्यात असं....

ते असं म्हणतात की, स्वा. सावरकरांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे प्रत्यक्षात त्यांच्या जमातवादी तत्त्वज्ञानाला ताकद देण्यासाठीच त्यांना हवे होते, हेच स्पष्ट होते..... त्यांची भूमिका विवेकवादी बुद्धिप्रामाण्यवादाची नव्हती.

रत्नागिरीला स्थानबद्ध असताना स्वातंत्र्यवीरांनी अस्पृश्यता निवारणाचे जे प्रचंड कार्य केले, त्यानं महात्मा गांधीही प्रभावित झाले होते व ते सपत्नीक रत्नागिरीला येऊन स्वा. सावरकर व त्यांच्या पत्नी यांना त्या दोघांनी सादर नमस्कार केला होता! हिंदू हे एका धर्माचे नाव नसून एका राष्ट्राचे आहे, विज्ञान हाच आजच्या युगाचा धर्म झाला पाहिजेजुने धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणे इ. कपाटात गुंडाळून ठेवा, केवळ संदर्भासाठी अशी ठाम विधाने करणारे सावरकर जमातवादी-धर्मवादी कसे, ते मला उमगत नाही आणि ते विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नव्हेत, असं ठाम विधान लेखक कसं करतात, तेही माझ्या आकलनात येत नाही. समाजवादी मताचे मुसलमान बॅ. असफअली व ‘ब्लिट्झ’चं शेवटचं पान लिहिणारे साम्यवादी मताचे दुसरे मुसलमान ख्वाजा अहमद अब्बास यांच्या लिखाणात सुद्धा स्वा. सावरकरांबद्दल गौरवोद्गार आढळतात. त्यांनाही सावरकरांचं लेखकानं वर्णिलेलं रूप उमगत नव्हतं, असं समजायचं काय?

स्वा. सावरकरांचा बुद्धिवादस्वा. सावरकरांचं समाजकारण : सत्य आणि विपर्यास हे दोन पारितोषिकप्राप्त बृहद्ग्रंथ लिहिणाऱ्या नांदेडच्या प्रा. शेषराव मोरे यांनाही सावरकर समजलेच नाहीत, असं समजायचं का? ते तर लेखकाच्या या लेखावर माझ्यापेक्षाही अधिक समर्थपणे विवरण करू शकतील. योग्य वाटल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. स्वा. सावरकर राष्ट्रसेवा दलाचे नव्हते म्हणून तर ही प्रतिकूल टीका, ‘नावडतीचं मीठ अळणी या न्यायानं नाही ना? मग तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कॉ. एम. एन. रॉय, कॉ. माधवराव बागल यांच्यासारख्यांच्या कट्टर बुद्धिवाद्यांबाबतही ते विवेकवादी बुद्धिप्रामाण्यवादी नव्हते, असं म्हणण्याची पाळी येईल! दाभोलकर खुलासा करतील काय?

य. ज. महाबळ,
जळगाव

प्रति संपादक,
            य. ज. महाबळ यांचे पत्र वाचले. तरीही मला माझी भूमिकाच योग्य असून आग्रहाने मांडावयास हवी, असे वाटते. सावरकरांची जी विधाने महाबळ यांनी दिली आहेत, त्याचा अर्थ काय होतो, ते नीटपणे बघितल्यासही तेच सिद्ध होते.
१)    हिंदू हे एका धर्माचे नाव नसून एका राष्ट्राचे आहे, हेच नेमके आज भाजप सांगत आहे. हिंदू हा धर्म नसून ती राष्ट्रवादी जीवनपद्धती आहे आणि इतर धर्म उदा. इस्लाम, ख्रिश्चन या उपासनापद्धती आहेत. स्वाभाविकच या उपासनापद्धतीच्या नागरिकांनी स्वत:ला हिंदू-मुसलमान, हिंदू-ख्रिश्चन असे म्हणावे व खुशाल या हिंदू राष्ट्रात राहावे. अशी भूमिका धर्मनिरपेक्षतेच्या थेट मुळावरच येणारी आहे व भाजपने ती सावरकरांच्याकडून उचलली आहे.
२)    विज्ञान हाच आजच्या युगाचा धर्म झाला पाहिजे, असे सावरकर म्हणणारच. कारण विज्ञानाला प्रचंड सामर्थ्य आहे आणि सावरकरांना सामर्थ्य संपादनाचे जणू वेडच होते. बलाचा वापर हे जमातवादाचे एक प्रमुख लक्षण आहे. विज्ञानाद्वारे प्राप्त होणाऱ्या शक्तीला मूल्य चिकटलेले नसते. अणुशक्ती ही विधायक व विध्वंसक दोन्हीही असू शकते. हे मूल्य विवेकबुद्धीच्या आधारे      प्राप्त होते. केवळ विज्ञानाला धर्म मानणे, यामध्ये सामर्थ्यसंपन्न बनून हिंदू धर्मराष्ट्र (वर उल्लेखलेले) विजयी करणे यापेक्षा अधिक काही नाही.
३)    जुने धर्मग्रंथ, पोथ्या-पुराणे कपाटात गुंडाळून ठेवा; फक्त संदर्भासाठी, या विधानाचा थेट अर्थ असा की, या पोथ्या-पुराणाने हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या हत्यारांना गंज चढतो, म्हणून विरोध आहे. सावरकरांचा सत्यनारायणाच्या       पूजेला विरोध होता. परंतु तरीही त्यांनी सत्यनारायणाची पूजा घातल्याचे आढळते. याचे समर्थन त्यांनी ‘पुढील वर्षभरात वसईकडील धर्मांतरित हजार ख्रिश्चन कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात आली तर मी हजार सत्यनारायण       घालीन,’ अशी मागणी पूजेच्या वेळी केली, या शब्दात केले आहे. त्यांचा विरोध जुन्या पोथ्या-पुराणे यांना होता. कारण ती हिंदू राष्ट्रनिर्मितीत अडथळा आणत होती. हिंदू राष्ट्रनिर्मितीस पूरक ठरत असेल, तर सत्यनारायणाचे पौरोहित्य करण्यात त्यांना काही चूक वाटत नव्हती. मुळात धर्माच्या आधारे राष्ट्रउभारणीचा कालबाह्य विचार करणारा कुणीही माणूस विवेकवादी होऊच कसा शकणार? कारण विवेकवादाच्या कठोर तपासणीवर धर्म नावाचे काही विवेकी वास्तव शिल्लक राहत नाही, हा जगभरच्या       धर्मचिकित्सकांचा अनुभव आहे.
४)    कोणत्या व्यक्तींनी सावरकरांना कसे गौरवले आहे, यावर सावरकर समजून      घेण्याची गरज मला वाटत नाही. कारण शब्द प्रामाण्यवाद मानून विचार करू नये, हे विवेकवादाचे प्रथम तत्त्व आहे आणि हे महाबळ यांच्यासारख्या       श्रेष्ठांना मी सांगण्याची गरज नाही.
५)    सावरकर राष्ट्रसेवा दलाचे नव्हते. म्हणून ही प्रतिकूल टीका करता का? आणि त्या न्यायाने लक्ष्मणशास्त्री जोशी, एम. एन. रॉय, माधवराव बागल यांनाही ते विवेकवादी नाहीत, असे म्हणण्याची पाळी येईल, हा महाबळ       यांचा युक्तिवाद बालिश तर आहेच किंवा वरील महनीय व्यक्तींच्याबद्दल घोर अज्ञान दाखवतो. सुदैवाने वरील तीनही लोकांचे पुरेसे लिखाण उपलब्ध आहे. ते लेखन आणि सावरकरांचे लेखन शेजारी-शेजारी ठेवले तर कोण मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी आहे व कोण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून   धर्मानिष्ठित राष्ट्रउभारणीवादी आहे, याचा फैसला सहज करता येईल.

नरेंद्र दाभोलकर
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जून १९९९)


‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...