मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

शेषराव महाराजाची दारूमुक्तीशेषराव महाराजाची दारूमुक्ती

दाभोलकर,  दारूमुक्ती, शेषराव महाराज, व्यसनविरोध, अंधश्रद्धा, दैवी उपचार, चमत्कार
भारतातील महिलांना लाभदायी ठरणारे उपाय व त्याबाबतचे संशोधन यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेला परिषद होती. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासीत काम करणारे डॉ. अभय बंग तिला निमंत्रित होते. असे संशोधन कोणते, याबाबत जाण्याआधी अनेक महिलांशी ते बोलले. वेगवेगळ्या थरातल्या सर्व महिलांनी एकमुखाने सांगितले, ‘नवऱ्याची, मुलाची, भावाची दारू सुटेल असा काही अक्सरी उपाय शोधता आला तर बघा. तेवढे काम झाले तर आम्ही आमच्या विकासाचे बघून घेऊ. डॉ. बंग यांनी परिषदेत हे सांगितले. कमालीचे गंभीर बनत तज्ज्ञ म्हणाले, ‘डॉ. बंग. आज तरी असे काही नाही. तुमच्या महिलांना सांगा, ज्यावेळी असा खात्रीचा उपाय सापडेल, त्यावेळी मानवजातीवरच महान उपकार झालेले असतील.’     
महाराष्ट्रात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. त्यातील साधारण २० टक्के दारूडे होतात. व्यसनी होणे याची शास्त्रीय व्याख्या दुष्परिणामांसह परावलंबित्व येणे. असे बेवडेबाज आज महाराष्ट्रात अंदाजे १८ ते २० लाख आहेत. या सामाजिक पार्श्वभूमीवर शेषराव महाराजांना मिळणारा प्रतिसाद समजून घ्यावा लागेल.          
महाराष्ट्रातील पूर्वीच्या व आजच्या दोन्ही शासनाचे धोरण दारूवर्धकच होते व आहे. या प्रश्नाबाबत शासनाने करण्याजोगे खूप आहे. महाराष्ट्रात व्यसनविरोधी कार्य करणाऱ्या संघटनांची व्यसनमुक्ती परिषद आहे. त्यांनी शासनाला समग्र व्यसनविरोधी नीतीचा मसुदा दिला होता व क्रमश: अंमलबजावणीची विनंती केली होती. ते शक्य नसेल तर काही नियंत्रण आणण्यासाठी किमान अत्यावश्यक कार्यक्रम सुचविला होता. याबाबत मी आमदारांच्यासह मुख्यमंत्री मनोहर जोशींना भेटलो होतो; पण काहीही झाले नाही.
दारूचा प्रश्न हा ज्या-त्या व्यक्तीवर सोडून देण्याचा केवळ नैतिक प्रश्न नाही. जागतिक बँकेने व्यसनाचे विकासविरोधी स्वरूप स्पष्ट केले आहे. दारूच्या व्यसनातून निर्माण होणारे अपघात, मद्यसेवनातून वाढणारे गुन्हे व त्यासाठी पोलीस, तुरुंग, न्यायालये यांचा खर्च, दारूमुळे कामगारांची घटती हजेरी व देशाची घसरणारी उत्पादकता, संबंधित व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबावरचे सामाजिक दुष्परिणाम. दारूड्यावरील उपचार व पुनर्वसन खर्च वा साऱ्याचा ताळेबंद मांडून व्यसनापासून (दारूविक्रीतून) मिळणाऱ्या कराच्या रकमेपेक्षा ही किंमत फार मोठी आहे.

फसवी उत्तरे
अशा जटिल प्रश्नांना सोपी उत्तरे मिळवण्याचा मोह नेहमीच होतो. उदाहरणादाखल बारावीच्या परीक्षेचा फॉर्म मुहुर्तावर भरण्याची कल्पना घेऊ. बारावी परीक्षेतील यशावर जीवनाची दिशा अवलंबून असते. मुहुर्तावर त्या परीक्षेचा फॉर्म विद्यालयांनी भरल्यास अधिक लाभदायक हा विचार स्वाभाविकच येतो. (निवडणुकीचे फॉर्म तर मुहुर्तावर भरतातच) याबाबतचा संबंधितांचा युक्तिवाद समजून घेतल्यास व्यक्तीच्या मानसिकतेवर चांगला प्रकाश पडेल. (जो व्यसनमुक्तीच्या दैवी प्रयत्नाबाबतही खरा आहे.) १) हमखास यश मिळेल, याची खात्री कोणी देत नाही; मग हाही प्रयत्न का करू नये?  २) ज्योतिषांमुळे अनेकांना लाभ झाला सांगतात; मग आपण फायदा घेण्यात काय चूक? ३) आणि समजा फायदा नसला तरी तोटा तर नाही ना? कधीतरी फॉर्म भरणारच होतो, तो या वेळेला भरला. ४) त्यामुळे मानसिक आधार मिळतो, तो का नाकारावयाचा? ५) अभ्यास तर करणारच; पण ही तेवढीच मदत.
दारूचे दुष्परिणाम तर टोकाचे. त्यामुळे शेषराव महाराजांचा दैवी उपचार करून घेणाऱ्यांचे समर्थन असेच काही असते -१) दारू सोडण्याचा हुकमी उपाय अन्य कोणाकडे आहे काय? २) त्यामुळे तोटा कोणताच नाही, ३) बहुसंख्यांची/काहीजणांची दारू सुटते. त्यांचे तरी कुटुंब सुखी होते. ४) दैवी शक्ती असते. तिच्या अस्तित्वाची महाराजांमार्फत प्रचिती येते. ५) इतर उपाय सुचवले गेले तर तेही केले जातील.  
याच पद्धतीने सत्य साईबाबा रिकाम्या हातातून काहीजणांना सोन्याचे हार काढून देतात, तेव्हा त्यांचे तरी कल्याण होते. मग कशाला सत्य साईबाबाच्या चमत्कारांना विरोध करायचा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि खरे तर दोन संगीताचे कार्यक्रम करून महाराष्ट्रातील वीस लाख लोकांना रोजगार देण्याची यंत्रणा उभारते किंवा मुंबईत ४० लाख झोपडपट्टीवाल्यांना मोफत घरे देणे हे प्रकारही प्रश्नांची सोपी, फसवी उत्तरे शोधण्याचाच प्रयत्न असतो.
दारूच्या व्यसनावरचा शास्त्रीय उपचार
आग विझविण्याचे काम एकटा मनुष्य करू शकत नाही. त्याला मदत करणारे अनेक हात लागतात. व्यसन उपचाराबाबत हेच खरे आहे. हा सर्वांगीण उपचार कसा असतो?
अ) नशापान नेहमीच व्यक्तीच्या वैयक्तिक, भावनिक, कौटुंबिक, शारीरिक समस्यांना आमंत्रण देते. नशा हट्टी असते. पण नशेचा आनंद मिळताना त्याचे चटके   मात्र बसू नयेत. असे शक्य नसल्याने व्यसनी व्यक्तीच्या मनोव्यापारात चटक्यां’ची जाणीवच नाकारणे चालू होते. विशेष म्हणजे हे घडते, व्यसनी व्यक्तीच्याही नकळत अंतर्मनातील स्वयंभावाच्या (इगो) पातळीवर. हे नाकारणे म्हणजे जणू काही व्यसनी व्यक्तीच्या मनात तिच्याही नकळत उभी राहिलेली भिंतच असते. नशापानातून उद्भवणाऱ्या साऱ्या समस्या या भिंतीआड करून अपराधाची वा क्लेशाची भावना निर्माण करण्याचे टाळले जाते.
मी नशापान करीत नाही करीत असलो तरी व्यसनी बनलेलो नाही माझ्या नशापानामुळे मला अगर इतरांना कसलाच उपद्रव नाही किंवा मी व्यसनी बनलो याला मी जबाबदार नसून माझी बायको/आई-वडील/मित्र/सहकारी/शेजारी/वरिष्ठ/अधिकारी/अन्य एखादी परिस्थिती कारणीभूत आहे. अशा प्रकारची विधाने व्यसनी व्यक्ती नेहमी करते व याला खोटारडेपणा समजून त्याच्याशी संबंधित माणसे त्रासून गेलेली असतात. ही नकारघंटा वाजणं थांबवूनच व्यसनमुक्तीचा प्रवास होऊ शकतो. व्यसनी रुग्णाचा विश्वास कमावून त्याला त्याचा मनोव्यापार उलगडून दाखविणे, हे शास्त्र (व कला देखील) उपचाराचा महत्त्वाचा भाग असतो.
ब) विविध प्रकारची औषधे, विशिष्ट आहार व व्यायाम याच्या माध्यमातून व्यसनी व्यक्तीचे शारीरिक उपचार केले जातात. नशेचा पदार्थ वारंवार व अतिप्रमाणात घेतल्याने शारीरिक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या असतात. व्यसनी व्यक्तींना नशेचा पदार्थ न मिळाल्याबद्दल येणारे विथड्रॉल्स यावरही उपचार करावे लागतात. या उपचारांकरिता व्यक्तींना रुग्णालयात दाखल करणेही गरजेचे असते. मात्र शक्यतो नेहमीच्या वातावरणात राहूनच व्यसनी व्यक्तींना उपचार देण्याचा प्रयत्न केला जातो.
क) शारीरिक समस्या आटोक्यात आल्यानंतर अशा व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते. यामध्ये व्यसनी व्यक्तीची लहानपणापासूनची मानसिक जडणघडण व तिची सध्याची मानसिक अवस्था समजावून घेतली जाते. त्या व्यक्तीच्या स्वभावातील कोणत्या वैशिष्ट्यामुळे अथवा कमतरतेमुळे ती व्यक्ती दारूच्या आहारी गेली असावी? त्या व्यक्तीच्या परिवारातील कोणत्या व्यक्तींचा आणि परिस्थितीतील कोणत्या घटकांचा तिच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटा आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधून त्या उत्तरांच्या आधारे व्यसनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक स्वयंपूर्ण, आरोग्यसंपन्न व जीवनाचा सकारात्मक आनंद घेऊ शकेल, असे घडविण्याचा दीर्घकाल प्रयत्न मानसोपचाराद्वारे केला जातो. यामध्ये संवादातून समस्या समजावून घेणे, समस्या सोडविण्याचे व संवाद साधण्याचे तंत्र शिकविणे, वर्तणुकीत व सवयीत बदल घडवून आणणे, स्वभावातील काही त्रुटी (चिंताखोर वृत्ती, भित्रेपणा, न्यूनगंड) दूर करण्यास शिकविणे इत्यादी गोष्टींचा समावेश मानसोपचारात असतो. व्यक्तिगत कौटुंबिक व सामूहिक पातळीवर तो करावा लागतो. याखेरीज व्यसनी व्यक्तींना मुळातच अथवा नशेच्या पदार्थाचा मेंदूवर परिणाम होऊन काही मानसिक विकार जडण्याची शक्यता अनेकदा असते. त्यावर विशिष्ट औषधोपचार करावे लागतात.
ड) व्यसनी व्यक्तीचे कुटुंबाशी, शेजाऱ्यांशी, व्यवसायाच्या ठिकाणी अनेकदा नातेसंबंध बिघडलेले असतात. त्याचप्रमाणे व्यसन सोडून कितीही काळ लोटला तरी पाय घसरण्याचा धोका कायम असतो. या दोनही दृष्टीने व्यसनी व्यक्तीला मदत करणे हे सामाजिक पुनर्वसन होय. व्यसनी व्यक्तीचे पालक, पत्नी आणि मुले यांचे मनोधैर्य वाढविणे व व्यसनी व्यक्तीस समजावून  घेण्यास शिकविणे, हेही महत्त्वाचे असते.
व्यसनासाठीचा उपचार हे याप्रमाणे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व पालटण्याची जिकिरीची दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. एवढे करूनही व्यसनी व्यक्तीचे कच्चे व्यक्तिमत्त्व, क्षीण अस्मिता, सामाजिक व आर्थिक कमजोरी, सततच्या नशापानाने येणारी बोधनिक अकार्यक्षमता यामुळे व्यसनमुक्तीचे उपचार अनेकदा अयशस्वी ठरतात, तरीही चिकाटीने वाटचाल करावीच लागते.
व्यापक परिवर्तनाचा प्रश्न
कॅन्सरग्रस्त रुग्णाला वेदनाशामक औषधाने बरे वाटते; मात्र खरा उपाय कॅन्सर रोगावरचा शक्यतो उपचार करणे आणि तो नसल्यास त्या दिशेने संशोधन पुढे नेण्यास धडपडणे हाच असतो. अंगात येणे, भुताने झपाटले जाणे, यामधून काही वेळा मांत्रिकही बरे करतो. यावर उपाय कौटुंबिक व सामाजिक मानसिकता बदलणे व मानसिक आजारावर उपचार करणे हा असतो. हातात लाभणारी अंगठी घालून एखाद्याला नोकरी लागते; पण बेकारीच्या प्रश्नावरचा तो उपाय नसतो. नवस केल्याप्रमाणे मुलीचे लग्न मनाप्रमाणे जमतेही कदाचित; पण सर्व मुलींना मनाप्रमाणे स्थळ मिळण्याची शक्यता निर्माण होण्यास हुंडा, मानपान, खानदान, जात या गोष्टी मुळातून बदलणे गरजेचे असते. तेव्हा योग्य व टिकाऊ उत्तरासाठी; मग प्रश्न कोणताही असो, प्रश्नाचे व्यापक भान त्याप्रमाणे सामाजिक वास्तवात बदल व पुन्हा प्रश्नावरचे विशिष्ट उपचार अशी सांगड हवी.            
शेषराव महाराजांचे दावे प्रचंड आहेत. दीड वर्षात ५० लाख लोक व्यसनमुक्त होऊन सुखाने जगत आहेत, असे त्यांनी दिंडोरी तालु्क्यातील खेडगाव येथे सांगितल्याची बातमी आहे. (लोकमत, जून १९) व्यक्ती किमान एक वर्ष व्यसनापासून दूर राहिली तर तिला व्यसनमुक्त मानावी असे आपण समजूया. (हे देखील शास्त्रीय नाही.) व्यसनापासून पूर्ण दूर झाली नाही; पण प्रवृत्ती व कौटुंबिक संबंध, व्यवसाय यामध्ये सुधारणा झाली तर ते यश मानू. पण मग अशा पद्धतीने सर्वेक्षण करून ती माहिती नावासह प्रसिद्ध करणे ही महाराजांच्या भक्तांची जबाबदारी ठरते. आपणाकडे बहुधा दारू सुटण्याच्या काही व्यक्तिनिष्ठ उदाहरणावरून सार्वत्रिक वस्तुनिष्ठ निष्कर्ष करण्याची नेहमीच घाई केली जाते. शिवाय व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीने अन्य उपचार कोणते घेतले, हाही महत्त्वाचा प्रश्न असतोच. महाराजांच्या उपदेशाने अथवा कोणत्या कीर्तनांनंतर माळ घालून व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न करणे; याचे यश फार मर्यादित असते. यासाठी एकतर खरे झाल्याचे सर्वेक्षण हवे आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे अपयशाची कारणे नीटपणे ध्यानात घ्यावयास हवीत. या साऱ्यासाठी स्वाभाविक डोळसपणा हवा. दारूच्या व्यसनातच अंतर्भूत असलेली मनोरुग्णता व त्यावरील उपाय याचे भान हवे. व्यसनाला लाभलेल्या प्रतिष्ठेला धक्का मारावयास हवा. चंगळवादाचे समाजातील वाढते आकर्षण रोखावयास हवे. दारूच्या आर्थिक व राजकीय बाजूंची जाण न ठेवणे हा भाबडेपणा ठरेल. दारूची उपलब्धता मुबलक ठेवून दारूबंदी ही महात्मा गांधींसारख्यांनीही अशक्य समजली होती. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख पुढारी बियर बार व सरकारमान्य दारूची दुकाने चालवितात. आंतरराष्ट्रीय बियर उत्पादकांच्या मते भारतात अजूनही प्रतिवर्षी ६० कोटी बियर बाटल्यांचे मार्केट आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारला प्रतिवर्षी दारूपासून महसूल मिळतो जवळपास बाराशे कोटी. त्यावर पाणी सोडणे म्हणजे विकासाला तिलांजली असे सरकारला वाटते. पण बाराशे कोटी महसूल मिळण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेच्या खिशातून सहा हजार कोटी रुपये बाहेर येतात. ही रक्कम शासनाच्या वार्षिक अंदाजपत्रकाएवढीच आहे, याचेही भान नाही. हे सारे असेच ठेवून कोणत्याही मार्गाने दारूचा प्रश्न कधीच सुटणार नाही.         
प्रश्न खूपच अवघड आहे. त्यामुळे त्याला सोपी उत्तरे नसणारच. ती तशी आहेत व जगात कोठेही औषधे न सापडलेल्या दारूच्या आजाराला एक अंतिम दैवी इलाज शेषराव महाराजांच्या रूपाने मिळाल्याचा भ्रम या सर्वांतून तयार होतो. अगतिकतेपायी अवैज्ञानिकता व अंधश्रद्धा जन्म घेते. व्यसनमुक्तीच्या आशेने व्याकूळ होऊन धावणारे लक्षावधी लोक व त्यांचे कुटुंबीय त्यांचा वेळ, श्रम, पैसा व बुद्धी वाया जाते. अंतिमत: निराशाच पदरी येते. अतिअवघड प्रश्नांना अतिसोपी उत्तरे शोधण्याची मानसिकता जोपर्यंत आहे, तोपर्यंत या ना त्या रूपाने असे दैवी तोडगे निघणारच. कधी त्याचे रूप पोटावरून हात फिरवून निपुत्रिकांना संतती देणाऱ्या पार्वतीमाँचे असेल, तर कधी दारू सोडणाऱ्या शेषराव महाराजांचे असेल. असे उपाय टिकाऊ नसतात. प्रश्नाचे सम्यक आकलन करून शास्त्रीय पद्धतीने विचार करून दीर्घकालीन रचनात्मक संघर्षातूनच हे बदलू शकेल, हे जितक्या लवकर लक्षात येईल तेवढे हिताचे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जानेवारी १९९८)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...