डॉ. लागू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉ. लागू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

बुवाबाजीवर हल्लाबोल



बुवाबाजीवर हल्लाबोल
दाभोलकर, बुवाबाजी, निळूभाऊ फुले, डॉ. लागू, प्रबोधन, आर्थिक सहाय्य
सुप्रसिद्ध अभिनेते निळूभाऊ फुले आपल्या चळवळीसाठी नेहमीच वेळ देतात. नम्रपणे असंही सांगतात, माझ्यामुळे गर्दी जमते, तुमचे काम होते, तेवढीच मदत.’ पाच मिनिटांचे छोटेसे भाषणही करतात. त्यापेक्षा जास्त अंधश्रद्धेवर बोललेले मी त्यांना कधीच ऐकलेले नाही.

बार्शीला काय झालं?
बुवाबाजीवर हल्लाबोल मोहिमेसाठी निळूभाऊंचा सोलापूर जिल्हा दौरा होता. १९ डिसेंबरला सायंकाळी बार्शीला जाहीर कार्यक्रम. कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम केलेले. प्रचंड गर्दी. कार्यक्रम सुरू झाला आणि लक्षात आले ध्वनिक्षेपक साथ देत नाही. गर्दीच्या निम्म्यापर्यंतही आवाज पोचत नाही. स्वागतगीत, पाहुण्यांचा परिचय, प्रास्ताविक सारे उरकले गेले. श्रोत्यांच्यापर्यंत न पोचताच पर्यायी ध्वनिक्षेपकासाठीही धावाधाव सुरू झाली. गर्दीवर ताबा मिळविण्यासाठी राम नगरकरांचा हुकमी एक्का वापरला. निपाणीकरांनी प्रयोग पाहण्याचे आवाहन केले; पण प्रेक्षकांची गडबड सुरूच. या सर्व गोंधळात दुसरा कुठलाही ज्येष्ठ अभिनेता संयोजकांना दोष लावून कधीच निघून गेला असता. निळूभाऊ शांतपणे बसून होते. शेवटी अखेरचे वक्ते म्हणून ते उठले. लोक एकदम शांत झाले. तोपर्यंत ध्वनिव्यवस्थाही सुधारली होती. निळूभाऊंचा आवाज सर्वत्र पोचत होता. नेहमी पाच मिनिटात भाषण आटोपणाऱ्या निळूभाऊंनी ओळखले की, किल्ला लढवायला फक्त आपणच शिल्लक आहोत. पाच-सात हजार लोकांच्यापर्यंत काही विचार तर पोचायला हवा आणि त्यांनी मोठ्या तळमळीने, सामर्थ्याने, कार्यकर्त्यांच्या पोटतिडकीने ते काम केले. ते खाली बसले. सभा पूर्ण ताब्यात आली होती. मग चमत्काराच्या प्रयोगापासून सारे सुरळीत झाले.

निळूभाऊंना याची काय गरज होती? ते निघून जाऊ शकत होते, बोलायचे नाकारू शकत होते, दोन मिनिटांचे भाषण करून थांबू शकत होते. पण त्यांनी ते केले नाही. कारण त्यांच्या श्रेष्ठ कलावंताच्याही पलिकडे असलेला सच्चा कार्यकर्ता जागा होता. माझ्या मनात विचार येतो, आपण जे कार्यकर्ते आहोत त्यांच्यामध्ये तरी स्वत:च्या पलिकडे जाण्याचा हा सच्चेपणा जागा आहे काय? क्षुल्लक राग-लोभ, खरे-खोटे, रूसवे-फुगवे, मानापमान, व्यक्तिगत हवेदावे यांचे दर्शन काम करत असताना अनेकदा होते. चळवळीबाबत तरी सहजपणे स्वत:ला विसरण्याची जी वृत्ती हवी, ती दिसत नाही. सगळ्या जगाची चिकित्सा करावयास निघालेलो आपण तरी याबाबत स्वत:ची चिकित्सा करावयास नको काय?

सोलापूर जिल्ह्यातील प्रतिसाद मन सुखावणारा होता. सर्व शाखांनी केलेले संघटन कौतुकास्पद होते. मात्र अशा कार्यक्रमाला आणि अंधश्रद्धांविरुद्ध लढताना दिसणारा उत्साह संघटनात्मक कामात कुठे लुप्त पावतो, हे मला एक कोडेच आहे. हा प्रश्न कोणत्या एका जिल्ह्याचा नाही, तर सर्व महाराष्ट्राचा आहे. शिबिरे जोरात होतात; पण त्यानंतर पाठपुरावा करून संघटना वाढ होत नाही. धडाकेबाज कार्यक्रम होतात; पण त्याचे रिपोर्टिंग आपल्या वार्तापत्राला कधीच होत नाही. शाखेच्या चळवळीची वृत्तपत्रात बातमी येते; पण शाखेने संलग्नता फी पाठवलेलीच नसते. पत्रे पाठवूनही किमान गरजेच्या संघटनात्मक बाबींची पूर्तताही होत नाही. त्यामुळे होते असे की, आपले दोष सुधारणे राहूनच जाते.

साधे प्रयोग सादरीकरणाचे बघा ना! हा आपल्या चळवळीतील सर्वाधिक आकर्षण असलेला भाग आहे. हे प्रयोग सादर कसे करावेत, ते आटोपशीर; पण परिणामकारक कसे घडवावेत, केवळ जादूचे प्रयोग असे स्वरूप त्याला न येता बुवाबाजी व अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यासोबत कसा पोचवावा, नवनवे चमत्कार कसे शिकत राहावे, याबाबत आपणा सर्वांनाच खूप शिकण्यासारखे आहे. ते आता आवश्यकही होऊन बसले आहे. नाहीतर मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांची निराशा होते, असा अनुभव येतो. हा गलथानपणा मग विचारात तर येतोच. मूलभूत वैचारिक मांडणी हा भाग जांभया येणारा. त्यात शिस्तीचा अभाव असला की, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. डॉ. श्रीराम लागू हे आपल्या चळवळीचे ज्येष्ठ मित्र. त्यांनी महाराष्ट्र टाईम्ससारख्या मातब्बर दैनिकात लेख लिहिला, ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी परमेश्वराला निवृत्त करा. महाराष्ट्रभर त्यामुळे काही खळबळ उडालेली मला जाणवली. पण आपल्या केंद्रांचे काय? कोणकोणत्या शाखेवर या लेखकावर चर्चा झाली? वादविवाद झडले? आपली बाजू काय, हे मांडण्याचा प्रयत्न झाला. आपल्यासारख्या बुद्धिवादी चळवळीत विचारमंथनही पूर्वअटच नाही का?

हे विचारमंथन सतत घडत राहिले की काय होते? कोकणातल्या संकल्पित शोध भुताचा मोहिमेसाठी दापोलीला वक्ता प्रशिक्षण शिबीर होते. पुण्याहून कार्यकर्ते गेले होते. भुताची तीच ती माहिती आणि किस्से आता बहुतेक कार्यकर्त्यांना पाठ झालेत. मग विषयाचे नाविन्यच संपते. पुण्याहून गेलेले डॉ. विद्याधर बोरकर, उज्ज्वला परांजपे, शुभांगी शहा यांनी मन, मनाचे आजार, भ्रम घडणे ही घटना याबाबत बरीच नवी माहिती अभ्यासपूर्वक देण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय वक्तृत्वकलेबद्दलही सांगितले. शिबिरार्थींना बरेच काही नवीन मिळाल्याचे मला नंतर शिबिरार्थींकडून समजले आणि खूप बरे वाटले.
आणखी एक जाता-जाता. भाषणाची बरीच निमंत्रणे येतात. तुम्हालाही कमी-जास्त प्रमाणात येत असणारच. अलिकडे मला असे जाणवू लागले आहे की, तथाकथित प्रतिष्ठित संस्थांना आपाल्याला बोलवण्याचे अगत्य वाटू लागले आहे. मला विचाराल तर हे समाजमान्यतेचे लक्षण आहे; तसेच धोक्याचा इशाराही. आपण कोणाकरिता लढत आहोत? अंधश्रद्धेच्या जोखडातून आपण कोणाला मुक्त करू इच्छितो, याचे नि:संदिग्ध उत्तरात पहिल्यांदा ग्रामीण गरीब जनता, दलित वस्त्या, झोपडपट्ट्या; त्यातही प्राधान्याने महिला आणि संस्कारक्षम विद्यार्थी असे आहे. याठिकाणी पोचणे अवघड असेल, त्रासाचेही. सुरुवातीस संस्थांच्या निमंत्रणाची सोय तेथे नसेल, तरीही आपण मात्र आपली ताकद, श्रम, वेळ, पैसा कोठे द्यावयाचा, याबाबत पुरेसे डोळस आणि कृतिशील असले पाहिजे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी १९९२)

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

सांस्कृतिक वर्चस्वाचे हत्यार



सांस्कृतिक वर्चस्वाचे हत्यार

दाभोलकर, गंगाखेड, यज्ञसंस्कृती, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. लागू, परिषद
गंगाखेड (जि. परभणी) येथे यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषद घेण्याचे समितीने ठरवले. त्याचवेळी लक्षात आले होते की, आपण कितीही समंजस भूमिका घेतली, तरी प्रक्षोभकता निर्माण केली जाणार आहे. अर्थातच चोखपणे; पण शांततेने त्याला उत्तर देण्याचे ठरवूनच परिषद जाहीर झाली. परिषदेला सुरुवातीपासून ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे परिषदेच्या पहिल्या निवेदनापासून परिषदेचा हेतू स्वच्छपणे लोकांच्यासमोर आला. याबाबतचे ते निवेदन पुढीलप्रमाणे होते.
यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषद
महाराष्ट्रात अलिकडील काळात यज्ञसंस्कृती वाढवण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू आहे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वाटते. चार महिन्यांपूर्वी नागपूरला मोठा अग्निस्तोम वाजपेय यज्ञ झाला. अलिकडेच नांदेडला अश्वमेघ थाटात पार पडला. गंगाखेड (जि. परभणी) येथे तर सध्या सोमयाग महायज्ञ २८ मार्च १९९९ ते २८ मार्च २००० पर्यंत असा ३६६ दिवस चालणार आहे. अशा प्रकारचा महायज्ञ महाभारत काळानंतर प्रथमच होत असल्याचा संयोजकांचा दावा आहे. या सर्वांमागे एका बाजूला उच्चविद्याविभूषित समाज आहे, तर दुसरीकडे कष्टकरी बहुजनांनादेखील त्याची भुरळ पडू लागली आहे. यामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराची व कार्याची पीछेहाट होईल, असे समितीला वाटते.
या संदर्भात जनजागृतीसाठी महाराष्ट्र पातळीवर यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषद ८ जुलै रोजी गंगाखेड येथे समितीने आयोजित केली आहे. यज्ञ हे धर्माचे प्राथमिक अवस्थेतील रूप आहे. यातू कल्पनांवर आधारित असे कर्मकांड आहे; नैतिकतेवर आधारलेल्या उन्नत धर्माचे हे रूप नाही. त्यामुळे यज्ञयागाच्या वातावरणातून समाजाचे पाऊल पुढे पडण्याच्या दृष्टीने वाटचाल होत नाही, असे समितीचे मत आहे.
घटनेत नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी यज्ञाचे स्वरूप विसंगत आहे. यज्ञामुळे पर्जन्यवृष्टी होते, संतती प्राप्त होते, पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यावर मुलगाच होतो, हे सर्व अशास्त्रीय आहे. यज्ञात होणारी अन्नधान्याची नासाडी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. देशातील चाळीस टक्के लोक दारिद्रयरेषेखाली जगत असताना, असेलच तर त्या गोरगरिबांना अन्न देणे हाच श्रेष्ठ अन्नयज्ञ ठरेल. नांदेड येथील अश्वमेघ यज्ञास १४ हजार किलो तूप, ८० क्विंटल तेल, ८० क्विंटल साखर, १० क्विंटल तांदूळ, ५० किलो मध यांची आहुती देण्यात आली.

शोषणव्यवस्थेच्या प्रतीकांना आपल्या देशातील विषम व्यवस्थेने पावित्र्य बहाल केले आहे, त्यामुळे शोषणव्यवस्थेचे वर्चस्व टिकवण्यास मदत होते. प्रतीकात शोषण नसले, तरी ती व्यवस्था त्या प्रतीकातून जपली जाते. स्त्रियांना, शूद्रांना यज्ञ कर्मकांडात समान अधिकार नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
भारतात प्रस्थापितांच्या विरोधात ज्या चळवळी झाल्या, त्या सर्वांनी यज्ञसंस्कृती नाकारली. उपनिषदांनी यज्ञाला फुटक्या नावा म्हटले आहे. महावीर, गौतम बुद्ध यांनी यज्ञ कटाक्षाने नाकारले. बौद्ध धर्माची पीछेहाट भारतातच झाल्यावर त्या यज्ञसंस्कृतीने पुन्हा उचल खाल्ली, हा इतिहास आहे. संतांचा भक्तिमार्ग हा यज्ञ-यागातील बंदिस्त चाकोरी नाकारण्यासाठी दिलेला पर्याय आहे. विठ्ठलाचे नाव हाच जपयज्ञ मानण्यात आला. नाव यज्ञाचे ठेवले; पण आशय बदलला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असे वाटते की, माणसाने विवेकाने, निर्भयतेने जगावे. त्यासाठी ही परिषद आहे. परिषदेस ज्येष्ठ विचारवंत व संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे, सातारा व डॉ. रुपा कुलकर्णी, नागपूर यांच्यासह डॉ. श्रीराम लागू उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने श्री. साळुंखे यांचे या विषयावरील लेखनही प्रसिद्ध होणार आहे. परिषदेनंतर त्याच दिवशी रात्री नांदेड येथेही याच विषयावर जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या स्वरुपाच्या परिषदा यानंतर कोल्हापूर व नागपूर येथे घेण्यात येतील.
परभणी जिल्ह्यात समितीचे काम चालू झाले, त्याला वर्षच झाले. उत्साह व उपक्रम यांचे प्रमाण चांगले असले तरी संघटन नवीन आहे. त्यामुळे मोठी परिषद कशी यशस्वी होईल, याबद्दल मी काहीसा साशंक होतो. परंतु आनंदाची व अभिमानाची गोष्ट ही की, गंगाखेड शाखेने अतिशय मेहनतीने परिषद यशस्वी केली. तेथील शाखेचे अध्यक्ष श्री. विलास जंगले यांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. खर्च तर त्यांनी एकहाती केला. संयोजनासाठी २०-२५ तरुण कार्यकर्ते राबत होते आणि जंगले यांचे घरच परिषदेचे कार्यालय झाले होते. घरच्या सर्व कुटुंबीय मंडळींचा सहभागही वाखाणण्यासारखा होता. या सर्व धडपडीला परभणीहून डॉ. मावळगे, प्रा. मोडक, पुण्याहून अशोक एंगडे, लातूरहून माधव बावगे यांची सतत मदत होते. परस्पर विचारविनिमयातून एकत्रितपणे होणारा हा कामाचा उठाव संघटना व चळवळीला नेहमीच पुढे नेणारा ठरतो.
परिषदेचे उद्घाटन
८ जुलैला सकाळी ११.३० वाजता आम्ही गंगाखेडमधील परिषदस्थळी गेलो. गावातील तो एकमेव बंदिस्त मोठा हॉल आहे. स्टेज उत्तम प्रकारे सजवलेले होते. हॉल संपूर्णपणे खचाखच भरलेला होता. हॉलच्या वरील बाल्कनीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विलास जंगले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर उद्घाटक डॉ. आ. ह. साळुंखे व्याख्यानाला उठले. त्यांचे भाषण सुरू होत असताना काही लोक क्रमाक्रमाने उठून परिषदस्थळातून बाहेर पडले. त्यांची संख्या फार नव्हती; परंतु त्यामुळे थोडी गैरशिस्त निर्माण झाली. नंतर आम्हाला समजले की, काही यज्ञसमर्थक मंडळी याच हेतूने येऊन सुरुवातीपासून जागा अडवून बसली होती. आणखी एक अडचण निर्माण झाली. प्रेक्षकांच्यात सारखी कुजबूज ऐकू येत होती. साळुंखेंच्यासारख्या कसलेल्या वक्त्यालाही त्यामुळे सभेवर पकड घेणे अडचणीचे जात होते. याचे कारण थोड्या वेळाने स्पष्ट झाले. एका श्रोत्याने उभे राहून ऐकू येत नसल्याची तक्रार केली. दुसऱ्या श्रोत्याने त्याला दुजोरा देताना असे सांगितले की, आवाज ऐकू येत आहे. परंतु अर्थबोध न होणाऱ्या स्वरुपात तो ध्वनी पोचत आहे. परिषदेच्या हॉलमध्ये हा दोष आहे, याची कल्पना संयोजकांना होती. त्यांनी तो दोष काढण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्नही केला होता. तरीही काही प्रमाणात दोष राहिला असावा. पुन्हा थोडी धावाधाव झाली. ध्वनिक्षेपकांच्या, कर्ण्यांच्या दिशा बदलण्यात आल्या आणि मग मात्र आवाज नीट पोचू लागला. त्यानंतरचे डॉ. साळुंखेंचे भाषण अत्यंत व्यवस्थितपणे लोकांना पोचले व पटलेदेखील.
डॉ. साळुंखे यांनी केलेले प्रतिपादन थोडक्यात असे - यज्ञ हे वैदिक संस्कृतीचे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक कर्मकांड आहे. ते सकामच असते व त्यामध्ये तूप-मांस अग्नीमध्ये समंत्र अर्पण करावे लागतात. अवैदिकांची पूजा ही यापेक्षा पूर्णपणे वेगळी व अत्यंत सोपी आहे. भारतीय समाजावर यज्ञसंस्थेने फार मोठा प्रभाव गाजवला, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सामाजिक इतिहास समजण्यासाठी यज्ञसंस्थेचा अभ्यास आवश्यक आहे; परंतु त्याचे पुनरुज्जीवन अत्यंत चूक आहे. कारण काळाच्या ओघात यज्ञ हे प्रस्थापितांच्या स्वार्थी हितसंबंधांचे रक्षण व पोषण करण्याचे साधन बनवले गेले. त्यामुळे भारतीय समाजासमोर आजच्या परिस्थितीत दोन वाटा आहेत. एक तर यज्ञयाग करणे आणि दुसरा दु:खी, कष्टी लोकांना जवळ करून त्यांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करणे. यज्ञाच्या विरोधात उपनिषदांत असलेल्या टीकेचा साळुंखे यांनी तपशीलवार परामर्ष घेतला. गीता, ज्ञानेश्वर, तुकाराम या सर्वांनी सकाम कर्म; तसेच यज्ञयागाच्या बाबत काय लिहिले आहे ते सांगितले. यज्ञाच्या विरोधातील कारणेही त्यांनी स्पष्ट केली. एकेकाळी यज्ञात प्रचंड हिंसा केली जात असे. यज्ञ हे अत्यंत गुंतागुंतीचे, किचकट, खर्चिक आणि अगदी मोजक्या लोकांची मक्तेदारी बनलेले कर्मकांड आहे, असे सांगून यज्ञकर्मात शूद्रांना व स्त्रियांना कसे दुय्यमत्व दिले आहे, याचा परामर्ष साळुंखे यांनी घेतला. यज्ञातील अवैज्ञानिकता स्पष्ट करून यज्ञ हे सांस्कृतिक वर्चस्वाचे हत्यार म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट केले. खरा धर्म शुद्ध आचारात, निष्कपट भावनेत व सर्वांना प्रेमाने जवळ करण्यात असतो, हे आवर्जून सांगितले.

त्यानंतर मी बोललो. यज्ञ ही यातुक्रिया असल्याचे मी सोदाहरण सांगितले. समाजात कर्मकांड वाढवण्याचा सतत व जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे, त्याचा तपशीलवार आढावा घेतला. यामागील राजकारण लक्षात घेण्याची गरज प्रतिपादन केली. श्रद्धांचे जाणीवपूर्वक व्यापारीकरण, विकृतीकरण केले जात आहे, असे सांगून त्याची मांडणी केली.
प्रस्ताव व त्यावरील भाषणे
डॉ. साळुंखे व दाभोलकर यांच्या भाषणानंतर परिषदेसमोर प्रस्ताव मांडण्यात आला. तो पुढीलप्रमाणे -
यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषदेचा प्रस्ताव
यज्ञ कालबाह्य झाले, असे वाटत असतानाच अलिकडच्या काळात यज्ञ-संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. यज्ञ ज्या संस्कृतीचा पुरस्कार करतो, ती अनेक अंगांनी विषमतावादी आहे. समाजाच्या सर्व घटकांना समतेचा अधिकार देऊन बरोबर घेऊन जाणारी नाही, अशा संकुचित परंपरेची प्रतीके नाकारली तर पाहिजेतच; परंतु त्यांचा जाणीवपूर्वक उदो-उदो करण्यामागे कोणत्या सामाजिक शक्ती आहेत, याचाही विचार करावयास हवा. भारतीय इतिहासात यज्ञ-यागासारख्या कर्मकांडाचे जेव्हा-जेव्हा पुनरुज्जीवन करण्यात आले, तेव्हा-तेव्हा सर्वसामान्य लोकांचे शोषण वाढले आहे, हे लक्षात घ्यावयास हवे.
यज्ञ अवैज्ञानिक आहेत. अन्नधान्यांची प्रचंड नासाडी करणारे आहेत, हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. या सर्वांमुळेच चार्वाक, जैन, बौद्ध, गीता, संत यांनी यज्ञयाग नाकारले आहेत. सर्वांनी याचा गंभीर विचार करावा आणि धर्माच्या कर्मकांडात न अडकता विवेकाचा, माणुसकीचा वसा घ्यावा, असे कळकळीचे आवाहनही परिषद करीत आहे.
यज्ञ या ठरावावर भाषणे झाली. त्यामध्ये गंगाखेडच्या प्रा. कीर्तिकुमार मोरे यांनी यज्ञ ही मागासलेल्या समाजाची संस्कृती आहे, अशी मांडणी केली. डॉ. मोहन मावळगे हे परभणी शाखेचे अध्यक्ष आहेत. यज्ञ सुरू झाल्यावर ते संयोजकांना भेटले होते. त्यावेळी संयोजकांनी या यज्ञामुळे विश्वशांती होईल. गंगाखेड भागातील लोकांचे आरोग्य सुधारेल, गुन्हेगारी कमी होईल, ही यज्ञाची फलिते असल्याचे सांगितले. यापैकी प्रत्येक बाबीला वस्तुस्थितीच्या आधारे त्यांनी सडेतोड आक्षेप घेतले. प्रा. अनिलकुमार शिंगारे यांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून बहुजनाला न्याय मिळण्याची शक्यता आली आहे. ती जागृती दडपण्यासाठी कर्मकांडप्रधान संस्कृती आणली जात आहे, असा आक्षेप घेतला. समाजात पुरोहिताला प्रतिष्ठा आहे; श्रमाला नाही, हे नजरेला आणून दिले.
डॉ. लागूंचे विवेचन
डॉ. लागू यांनी यज्ञसंस्कृतीला गेली काही हजार वर्षे धक्के बसूनही ती का गेली नाही, याचा विचार करण्याचे आवाहन केले. मानवी संस्कृतीच्या विकासक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. निसर्गातील घटना न समजणाऱ्या, कळप करून राहणाऱ्या, संस्कृतीचा गंध नसलेल्या माणसाला अग्नीचा शोध लागला. त्यामुळे हिंस्त्र श्वापदे दूर गेली. त्यातून अग्नी सतत प्रज्वलित ठेवला तर स्वत:चे रक्षण होईल, असे त्याला वाटले. अन्न शिजवून मिळणे हा अग्नीचा उपयोग समजला आणि यज्ञसंस्कृतीचा उदय झाला. आरंभीच्या ऋग्वेदाच्या काळात यज्ञ समाजाच्या मागणीसाठी होते. समाजाला आरोग्य, धन मागितले जात होते; पण यजुर्वेदाच्या काळात यजमान निर्माण झाला. नंतर पुरोहितशाही आली आणि त्यांनी फक्त यजमानासाठी मागण्या सुरू केल्या. म्हणून यज्ञ नाकारण्यासाठी परमेश्वराधिष्ठित धर्म ही कल्पनाच नाकारावयास नको का, असा सवाल डॉ. लागू यांनी केला. सर्व धर्म विज्ञानपूर्व म्हणून ते रद्द करावयास हवेतच व संपूर्ण मानवजातीला कवेत घेणाऱ्या एका नव्या मानवधर्माची निर्मिती करावयास हवी, तरच यज्ञसंस्कृती खऱ्या अर्थाने दूर करता येईल, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांचे आक्षेप
परिषद चालू असताना परिषदेच्या विरोधात गावात एक मोर्चा निघाला. वारकरी आषाढी वारीसाठी निघालेले होते. त्यातील ज्या दिंड्यांचा मुक्काम त्या दिवशी गंगाखेड येथे होता, त्यांना हाताशी धरून मोर्चाची संख्याही वाढवण्यात आली. त्यानिमित्ताने दोन पत्रके वाटण्यात आली. त्यातील सारांश या लेखात इतरत्र छापला आहे.
परिषद संपवून आम्ही विलास जंगले यांच्याकडे आलो तर पत्रकार वाटच पाहत होते. डॉ. साळुंखे, मी व पत्रकार यांची बरीच चर्चा झाली. त्यामध्ये आलेले मुद्दे थोडक्यात असे - यज्ञाबाबत तो करणाऱ्यांनी दुसरी बाजू समाजासमोर आणल्यास आम्ही त्याचे स्वागत करतो. सत्याचा शोध जरूर घ्यावा. परंतु तो वस्तुनिष्ठ असावा; व्यक्तिनिष्ठ नको.
एका यज्ञाने काय बिघडते? चातुर्वर्ण्य लगेच परत येतो का? हा प्रश्न गैरलागू आहे. कारण मग एका परिषदेने तरी काय बिघडते, असा प्रतिप्रश्न करता येऊ शकतो. यज्ञ हे शोषकांना गुलामगिरीत ठेवणाऱ्या संस्कृतीच्या शोषणाचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याबाबत लोकांना सावध करणे आवश्यक आहे.
यज्ञात वारकरी व बहुजन समाज सहभागी होतो, हे खरे; पण मग तो यज्ञ यज्ञच ठरत नाही. कारण शूद्रांना यज्ञाचा अधिकार नाही व सध्याच्या कलियुगात सर्व ब्राह्मणेतर शूद्र आहेत. यावर कोणी असे म्हणेल की, आम्ही यज्ञधर्म परिष्कृत करून घेतला आहे. मात्र यज्ञ धर्मशास्त्राला हे अजिबात मान्य नाही आणि तसे परिष्करण करावयाचेच असल्यास मग पूर्ण मूल्यांकनच का करू नये?

बहुजन समाजाला या गोष्टी हिताच्या नाहीत; पण चुकीच्या भुलभुलैय्यातून ते यामध्ये अडकतात. बहुजनांची ताकद अफाट आहे; परंतु त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी साधनसामग्री फारच तोकडी आहे.
गंगाखेड येथील यज्ञात वर्षभरात जो अमाप खर्च होणार आहे, तेवढ्या रकमेत गंगाखेड येथे आरोग्य, वाचन, स्वच्छता याबाबत केवढे तरी कार्य घडू शकेल. त्यालाच यज्ञ समजणे हिताचे आहे.
परिषद संपली. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून समितीच्या विरोधात ध्वनिक्षेपकासह रिक्षा फिरवून सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये वर पत्रकाद्वारे व्यक्त केलेल्या विचारांची उजळणी झालीच. त्याबरोबरच समितीच्या विरोधात आणखी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. प्राचीन गोष्टींच्या जतनासाठी आधुनिक विज्ञानाला कसे वेठीला धरले जाते, त्याचा तो चांगला नमुना आहे. तो पुढीलप्रमाणे -
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रचार... म्हणजे कावळ्यांची कावकाव!
देव, धर्मशास्त्र, आत्मा, पुनर्जन्म, परलोक, यमलोक, स्वर्ग-नरक, मंत्रफळ, पापपुण्य आदी अतींद्रिय गोष्टींवर विश्वास असणे ही अंधश्रद्धा होय. ती बाळगणे हे अवैज्ञानिक आहे. ती बाळगली तर या जगाचे वाटोळे होईल, या चिंतेने अहोरात्र अस्वस्थ होऊन.... ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती.... त्या विरुद्ध प्रचाराचे विधायक सत्कार्य (?) करीत आहे. हे सत्कार्य ऐकायला, पाहायला जनता हजारोंच्या संख्येंने जमावी म्हणून ही समिती तोंडाला रंग फासून जन्मभर करमणुकीचा व्यवसाय करणाऱ्या नाच्यांचा उपयोग करून घेऊन अत्याधुनिक प्रचारतंत्राने प्रचारकार्य करीत आहे. थोड्याच कालावधीत ही अंधश्रद्धा समूळ निर्मूलन होईल आणि आजचे वाटोळे जग सरळ आणि सपाट होईल. या जगाचे, तुमचे, आमचे, सर्वांचे कल्याण होईल! पण.... लोकहो.... पऽऽऽण!
विज्ञानाच्या कक्षा आता फार मोठ्या झाल्या आहेत. मानसशास्त्र, परामानसशास्त्र, विचारसंक्रमण, इंगितज्ञान, मनाची कारकशक्ती, अतींद्रिय वस्तुस्पर्श, अतींद्रिय वस्तुज्ञान, दूरदर्शन आत्मा, पुनर्जन्म, परलोकास्तित्व, पिशाच्चास्तित्व, मृत्यूनंतरचे जीवाचे अस्तित्व इ. विषय १८८२ पासून वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेत अभ्यासले जात आहेत. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया, जर्मनी, जपान आणि भारत आदी देशातील विद्यापीठे अध्ययन करीत आहेत. इतकेच नव्हे, तर त्या विषयावरील संशोधनांना डॉक्टरेटच्या पदव्याही देत आहेत.
सत्य झाकून ठेवणे किंवा सत्याला असत्य ठरविणे शक्य होणार नाही.
पुन्हा चार दिवसांनी ग. वा. कोपरकर (पुणे) यांनी संयोजकांच्यासोबत गंगाखेड येथे पत्रकार परिषद घेऊन मला एकाच व्यासपीठावर जाहीर वादविवादासाठी आव्हान दिले. त्याला समितीने दिलेले उत्तर थोडक्यात पुढीलप्रमाणे -
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वैचारिक वादसंवादासाठी नेहमीच तयारी आहे. याबाबत समितीने अधिवेशनाच्यावेळी या विषयाचे तज्ज्ञ डॉ. आ. ह. साळुंखे यांची पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्या पद्धतीने त्याला उत्तर देणारी व आपली वैचारिक बाजू मांडणारी यज्ञसमर्थकांची पुस्तिका आल्यास त्याचे ‘अंनिस’ स्वागतच करेल. या समर्थकांनी याबाबत आतापर्यंत जी पत्रके काढली त्यावर प्रकाशक व मुद्रक यांचे नावही नाही. त्यामुळे यज्ञ संयोजक आपली भूमिका अधिकृतपणे प्रकाशित करत असल्यास त्यांनी ते जरूर करावे. दोन्ही बाजूंनी अशी प्राथमिक मांडणी पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षातील चर्चेचा तपशील जरूर ठरविता येईल. अशी चर्चा मर्यादित उपस्थितीत व्हावी आणि त्याच्या व्हिडीओ चित्रीकरणाद्वारा ती केबलद्वारा सर्वत्र दाखवण्यात यावी. ही बाब विचारमंथनासाठी समितीला स्वागतार्ह वाटते. मात्र यासाठी समितीच्या पुस्तिकेप्रमाणेच स्वत:ची भूमिका नेमकेपणाने मांडणारी पुस्तिका यज्ञ संयोजकांनी प्रसिद्ध करणे ही पूर्वअट आहे. याचे पालन यज्ञ संयोजक करतील, असा समितीचा विश्वास आहे. लोकशाही पद्धतीने व्यक्त होणाऱ्या सर्व मतभिन्नतांचे स्वागत समिती करते. त्याबरोबरच धर्मचिकित्सा करण्याचा समितीला आग्रहही कायम आहे, असे पत्रक स्थानिक संयोजन समिती, परिषदेचे निमंत्रक विलास जंगले व कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रसृत केले आहे.
यज्ञकुंडातील अग्नी आतापर्यंत एवढा प्रज्वलित झाला आहे, पुढे काय घडते ते सर्वांना समजावे, अशीच समितीची इच्छा आहे.
गवामयन सत्र सोमयाग, गंगाखेड
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा गंगाखेडच्या यज्ञसंस्था व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषदेच्या मुद्रित मजकुरासंबंधी त्यांच्या आक्षेपांना उत्तर अर्थात अंधश्रद्धा निर्मूलनवादींच्या भ्रमजाळास चोख उत्तर! गंगाखेड येथे होत असलेल्या गवामयन सत्र सोमयागासंबंधी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नसताना यज्ञात जीवहत्या होते. मौल्यवान वस्तूंची आहुती दिली जाते. धान्यसामग्री जाळली जाते इत्यादी धादांत खोटी विधाने केली आहेत, यज्ञ धर्माचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास न पाहता केवळ कुत्सित भावनेने, द्वेषभावनेने बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले. त्याचप्रमाणे आशा-आकांक्षा तृप्त होतात, पर्जन्यवृष्टी होते. पुत्रप्राप्ती होते, देवाच्या जवळचे स्थान मिळते, असे त्यांनी लिहिले आहे. परंतु गंगाखेड येथे होत असलेल्या यज्ञामध्ये अशा कोणत्याही प्रकारचे भ्रामक मायाजाल नसून शुद्ध वैदिक स्वरुपाच्या विज्ञाननिष्ठ अशा प्रक्रियांचा आविष्कार होत आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या सुप्तगुणाचा परिचय करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही लोकांच्या श्रद्धा व धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत नसून मानवाचा खरा धर्म काय आहे, याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. खऱ्या यज्ञधर्माचा कोणत्याही सत्पुरुषाने धिक्कार केला नाही व विरोधही केला नाही.

मात्र वेदांचा, शतपथ ब्राह्मण ग्रंथाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता यज्ञासंबंधीची दुसरी बाजू (यज्ञविरोधी) लोकांसमोर पत्रक काढून जाहीरपणे प्रसारित करणे म्हणजे केवळ हास्यास्पद नसून वेश्येने पतिव्रता धर्माचा उपदेश करणे एवढ्या धाडसाचे आहे. दि. ९ जुलै ९९ रोजी यज्ञ व विश्वकल्याण परिषद यज्ञभूमीवर होणार आहे, तरी या कार्यक्रमास जनता बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येंने उपस्थित राहावे, असे आवाहन गवामयन सत्र सोमयाग यज्ञ सेवा मंडळींनी केले आहे.
गंगाखेडच्या सोमयाग यज्ञास जाण्याचा विचार महिलांनी रद्द केला!
अंनिस, अंबेजोगाई (जि. बीड) शाखेच्या वतीने सध्या महिला जागृतीचे कार्य हाती घेतले असून त्या अनुषंगाने भारज, नांदगाव, सुगाव व सायगाव या ग्रामीण भागात महिला मेळावे घेतले. उद्बोधन व्याख्यानांसोबत अनुराधा देशमुख यांची भस्म काढण्याची चित्रफीत दाखवण्यात आली.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. ११ जून ९९ रोजी अंबेजोगाई येथे रविवार पेठेत गजाननराव पेडगावकर यांच्या वाड्यात महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास त्या गल्लीतील २०० महिला उपस्थित होत्या. या मेळाव्यात लग्नपत्रिका, भूतबाधा, करणी, चेटकी, यज्ञ आदीविषयी वाद-संवाद झाला. महिलांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे प्रा. डॉ. डी. एच. थोरात, संतराम कराड, बाबूराव तिडके, नीलकंठ जिरगे यांनी दिली. रामसिंग बेले यांनी चमत्कारांचे प्रयोग सादर केले. शेवटी अनुराधा देशमुख यांची व्हिडीओ कॅसेट दाखवण्यात आली.
कार्यक्रमाचा परिणाम एवढा झाला की, रविवार पेठेतील महिला मंडळाने गंगाखेड येथील सोमयाग यज्ञास जाण्याचा कार्यक्रम रद्द केला. जीप भाड्याने केली होती, त्याचा अ‍ॅडव्हान्स सोडून दिला.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट १९९९)

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

खोट्या बातम्यांची बित्तंबात



खोट्या बातम्यांची बित्तंबात      

दाभोलकर, डॉ. लागू, विवेक जागर, प्रेस कौन्सिल, सामना, तरुण भारत, खोटी बातमी
ता. ३१ एप्रिल १९९६ रोजी मी व डॉ. श्रीराम लागू यांच्या औरंगाबाद येथील विवेकजागराच्या कार्यक्रमात स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. मला मारहाण केली. या घटनेचे अत्यंत विपर्यस्त वृत्त औरंगाबादेवरून निघणाऱ्या सामनादेवगिरी तरुणभारत या दोन दैनिकांनी छापले. त्यातील काही भाग असा-
१. एप्रिल सामना - औरंगाबाद : छत्रपती शिवाजी खोटे बोलला, असा शब्द शिवरायांची संभावना करणारे डॉ. श्रीराम लागू व हिंदू धर्मावर टीका करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर संतप्त तरुणांनी प्रश्नांची सरबत्ती केली.... शनिवारी दुपारी ४ वाजता विवेकानंद महाविद्यालयाच्या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले होते. प्रसंगी शिवाजी महाराज खोटे बोलले, असे वाक्य त्यांनी उच्चारले होते. तसेच स. भु. सभागृहात दाभोलकरांनी संतांच्या ईश्वरी साक्षात्काराबद्दल शंका घेणारे मत व्यक्त केले. याबाबत दाभोलकरांनी असे म्हटले आहे की, परमेश्वरी साक्षात्कार झालेला माणूस वेडा असला पाहिजे, तो खोटे बोलत असला पाहिजे किंवा मग तो संमोहन विद्येच्या आहारी गेला असला पाहिजे....
१ एप्रिल, दै. ‘देवगिरी तरुणभारत’ -....
काल, शनिवारी विवेकानंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू यांनी शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले. महाभारतात व्यासांनी जे लिहिले त्या कमी भाकडकथा आहेत, शिवाजीच्या तर खूपच भाकडकथा आहेत. त्यांना चरित्रच नाही. शिवाजीने गायीला कसायापासून वाचविले, असा उल्लेख केला जातो. पण शिवाजी किती खोटे बोलला, हे सांगितले जात नाही, अशी व अन्य काही विधाने डॉ. श्रीराम लागू यांनी शिवाजी महाराजांबद्दल केली होती....
अत्यंत चुकीच्या व लोकांच्या मनाची दिशाभूल व्हावी, अशा प्रकारे छापलेल्या बातम्यांच्या बाबत दोन्ही वृत्तपत्रांविरुद्ध प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे मी व डॉ. लागूंनी ठरविले. पण त्याआधी संबंधित वृत्तपत्रांना संधी द्यावी, यासाठी त्या दोन्ही वृत्तपत्रांच्या संपादकांना पत्रे पाठविली, ती अशी-

स.न.वि.वि.
मी व डॉ. श्रीराम लागू हे महाराष्ट्रात ‘विवेकजागरा’चा वादसंवाद हा कार्यक्रम करतो. श्रद्धा-अंधश्रद्धा, देवाचे अस्तित्व, धर्माचे प्रयोजन, फलज्योतिष, अंगात येणे, या स्वरुपाच्या विविध बाबी याबद्दल मुलाखतीद्वारे प्रश्नोत्तर रूपाने होणारी चर्चा, असे त्याचे स्वरूप असते.          
या स्वरुपाचा आमचा कार्यक्रम ता. ३० मार्च १९९६ रोजी औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका दंतकथेचा उल्लेख एका प्रश्नाचे उत्तर देताना झाला. दुसऱ्या दिवशी सरस्वती भुवन, औरंगाबाद येथे खुला कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर आदल्या दिवशी जे अजिबात बोलले गेले नाही, त्यावरून काही तरुणांनी वितंडवाद घातला. मला मारण्याचा प्रयत्न झाला. मला वाचविणाऱ्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. डॉ. श्रीराम लागूंनाही धक्काबुक्की झाली.  
हे वृत्त आपल्या दैनिकाच्या ता. १ एप्रिल १९९६ च्या अंकात अत्यंत विपर्यस्त, चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाले. त्यामुळे मी व डॉ. लागू, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ यांचे नुकसान झालेच; तसेच समाजात प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्नही दिशाभूल करणाऱ्या वृत्तामुळे झाला.
तरी आपण याबाबत दिलगिरी व्यक्त करून सत्य परिस्थिती ठळकपणे प्रसिद्ध करावी. असे न झाल्यास आम्हास न्यायालयात व प्रेस कौन्सिलकडे त्याबाबत दाद मागावी लागेल.

आपला विश्वासू,
(डॉ. नरेंद्र दाभोलकर)
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
      
या पत्राला अर्थातच उत्तर आले नाही. पुन्हा एकदा १५ सप्टेंबरला स्मरणपत्र पाठविले आणि त्याच वेळेला प्रेस कौन्सिलकडे तक्रार नोंदविण्यात आली. खरे तर तक्रार दोन महिन्यांच्या आत नोंदवायची असते. त्यामुळे उशीर का झाला, यावरही खुलासे झाले. ते पटल्यानंतरच केस दाखल झाली. दोन्ही वृत्तपत्रांतील बातम्या इंग्लिशमध्ये भाषांतर करून पाठवाव्या लागल्या. तक्रार, पत्रव्यवहार हा अर्थात इंग्लिशमध्ये होता. एकूण कोर्टाची (किंवा प्रेस कौन्सिलची) प्रक्रिया वेळ खाणारी असते; पण चिकाटीने ती लढवायची, असे ठरविले होते.          
थोडी आणखी पत्रापत्री झाली आणि २२ एप्रिल १९९७ ला सुनावणीची तारीख लागली. फक्त चार दिवस आधी पत्र मिळाले. एवढे बरे होते की, सुनावणी मुंबईला होती; पण डॉ. लागूंना ही तारीख सोयीची नव्हती. त्यामुळे पुढची तारीख मागून घेण्याचे ठरले. तारखा देणे ही गोष्ट कोर्टाला अजिबातच नवी नसते. मुंबईच्या कौन्सिल हॉलमध्ये प्रेस कौन्सिलचे चेअरमन न्या. पी. बी. सावंत (निवृत्त न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली) आपल्या कौन्सिलच्या सदस्यांसह वेळेत उपस्थित झाले. कोणत्याही परिस्थितीत पुढची तारीख देण्यात येणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. कौन्सिलच्या कामाची सुरुवात झाली.   
पहिली केस चालविताना बघितल्यावरच ही काहीशी अनौपचारिक प्रक्रिया आहे, याची कल्पना आली. आणखी काही खटल्याचे कामकाज बघितल्यावर तर आमची बाजू मी स्वत:च मांडण्याचा निर्णय घेतला. एक तर वकिलाशिवाय आपापली बाजू मांडायची मुभा होती. न्या. सावंत मराठीमध्ये बोलण्यासही अनुमती देत होते. शिवाय घडणाऱ्या घटनांचा संदर्भ, आमची वक्तव्ये, छापून आलेल्या खोडसाळ बातम्या यांचा अन्वयार्थ मला अधिक नेमकेपणाने माहीत होता. दोन्ही वृत्तपत्रांचे संपादक व मी यांच्यात सुनावणीस प्रारंभ झाला. दैनिक सामनाच्या प्रतिनिधीचे म्हणणे असे होते की, कार्यक्रमाच्या स्थळी संतप्त तरुणांच्याकडून मिळालेली माहिती आम्ही छापली. दुसऱ्या बाजूची माहिती आम्हास मिळाली नाही म्हणून छापली नाही. न्या. सावंत यांनी त्यास समज दिली. डॉ. दाभोलकर इतकी वर्षे हे काम करतात, हे तुम्हाला ठाऊक असणार. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधून सत्य जाणून घेणे, हे तुम्ही करावयास हवे होते. तुम्ही जर विद्यार्थी नेत्यांना विचारले तर मग डॉ. लागू-दाभोलकर यांना का विचारले नाही? न्यायमूर्तींनी आणखी एक प्रश्न विचारला, हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम चांगले आहे, असे आपणास वाटते ना? आणि त्या प्रश्नाला दै. सामनाच्या प्रतिनिधीने होकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील कथित घटनेबद्दल डॉ. लागू हे नेमके काय म्हणाले, ते मी सांगितले. बालशिवाजीला कसायाने गाय कोठे गेली, हे विचारले, बालशिवाजीने गाय गेल्याच्या विरुद्ध दिशेला बोट दाखविले. त्यामुळे अकारण मारल्या जाणाऱ्या गायीचे प्राण वाचवून शिवाजीने नैतिक कामगिरी केली; पण मग त्याला त्यासाठी खोटे बोलावे लागले. हे धार्मिक भाषेत अनैतिक आहे. असा पेच अनेकदा जीवनात येतो आणि त्याचा निर्णय धर्माच्या नव्हे, तर विवेकाच्या आधारे घ्यावा लागतो. हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यानंतर न्यायमूर्ती म्हणाले, डॉ. लागूंचे प्रतिपादन मला अतिशय संयुक्तिक दिसते. विवेक हा कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कोणत्याही खऱ्या धर्मभावनेचा पाया हा विवेकच असतो. या विवेकाचे पालन करून शिवरायांनी चांगले उदाहरण घालून दिले आहे. या मांडणीत गैर काहीच नाही. उलट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कामच या विवेकाधिष्ठित, खऱ्या धर्मभावनेचे पोषण करणारे आहे. यानंतर मुद्दा निघाला साक्षात्काराचा. साक्षात्काराबद्दल दाभोलकरांनी व्यक्त केलेली शंका ही हिंदू धर्माचा अपमान आहे, असे वृत्तप्रतिनिधींचे म्हणणे होते. याबाबत न्या. सावंत यांचे मत अगदी स्पष्ट होते. ते म्हणाले, एक तर हे सर्व विवेचन मला शास्त्रीय दिसते. अधिक महत्त्वाचे म्हणजे संतांचे, प्रेषितांचे साक्षात्कार हे सर्वच धर्माचे भाग आहेत; फक्त हिंदू धर्माचे नाहीत. त्यामुळे साक्षात्कारावरचे हे मत हे तर फक्त हिंदू धर्मावरची टीका होऊच शकत नाही.

या सगळ्या सुनावणीच्या अंती न्यायमूर्तींनी स्पष्टपणे दोन्ही प्रतिनिधींना सांगितले, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे चांगले आहे, तुम्ही या कामाला मदत करण्याच्या दृष्टीने विचार करणे हेच योग्य आहे. तेव्हा या कामाला मदत देण्याचे दोन्ही प्रतिनिधींनी मान्य केले. यानंतर डॉ. लागू व दाभोलकर यांचा खुलासा तिसऱ्या पानावर छापण्याबाबत आदेश न्यायमूर्तींनी दिला. त्यामध्ये दिलगिरी असावी, असेही सांगितले. या निकालाची बातमी महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांनी छापली. मराठवाड्यातील सर्वाधिक खपाच्या दै. ‘लोकमतने तर ठळकपणे प्रसिद्ध केली.
या बातमीनंतर मी प्रत्यक्ष खुलासा वृत्तपत्रांना पाठविला- डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल छापलेल्या बातमीबाबत दिलगिरी.
दैनिक सामना, संभाजीनगर यांच्या १ एप्रिल १९९६ च्या अंकात म्हणे शिवाजी खोटे बोलला, हिंदू धर्माचीही संभावना केली या मथळ्याखाली जी बातमी प्रसिद्ध झाली, त्यामुळे डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर व त्यांच्या ‘विवेकजागरा’चा कार्यक्रम यांना जी हानी पोचली, त्याबद्दल दै. ‘सामना, संभाजीनगर दिलगिरी व्यक्त करीत आहे. त्या वृत्ताबाबत डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुढील खुलासा केला आहे - छत्रपती शिवाजी खोटे बोलला, अशा शब्दांत डॉ. लागू यांनी शिवरायांची संभावना केली, अनुद्गार काढले.... प्रसंगी शिवाजी महाराज खोटे बोलले ही सर्व वचने डॉ. लागूंच्या तोंडी घातली आहेत. डॉ. लागू यांना शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी असे उद्गार काढणे शक्यच नाही. हे उद्गार त्यांच्या तोंडी घालणे म्हणजे निव्वळ कुभांड आहे. बालशिवाजीने कसायापासून गायीचे प्राण वाचविले, या कथेचा संदर्भ देऊन निर्माण होणारा नैतिक पेच हा विवेक व सारासार बुद्धी याआधारे कसा सोडवावा लागतो, याचे विवेचन लागू यांनी औरंगाबाद येथील विवेकजागराच्या कार्यक्रमात केले होते. या गोष्टीतून नीतीचा पाया विवेकाधिष्ठित असावा, हा विचार मांडला गेला. २१ एप्रिल १९९७ रोजी प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. पी. बी. सावंत यांनीही या विचाराला नि:संदिग्ध अनुकुलता दर्शविली. हिंदू धर्मावर डॉ. दाभोलकर यांनी टीका केली, यासाठी बातमीत ईश्वर साक्षात्काराबद्दल दाभोलकरांचे मत दै. ‘सामना’च्या वरील बातमीत देण्यात आले आहे. साक्षात्कार या प्रकाराचे मानसशास्त्रीय पातळीवर दाभोलकर नेहमीच स्पष्टीकरण देतात. त्यामध्ये हिंदू धर्माच्या अवमानाचा कोणताच प्रश्न येत नाही. ता. २२ एप्रिल १९९७ रोजी प्रेस कौन्सिल समोरच्या सुनावणीत न्या. सावंत यांनी याबाबत स्पष्ट मतप्रदर्शन केले की, सर्वच धर्मात साक्षात्कार आहेत, त्याची शास्त्रीय चिकित्सा चूक ठरत नाही व कोणाचा अवमान ठरत नाही. आपली मते मान्य नसणाऱ्या व्यक्ती व त्यांचे विचार यांना हेतुपुरस्सर बदनाम करण्यासाठी अशा बातम्या पसरविल्या जातात काय, याचा संपादकांनी शोध घेणे व त्याला आळा घालणे, हे गरजेचे आहे. संपादक म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असे मत डॉ. लागू व डॉ. दाभोलकर यांनी काढलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.
हा खुलासा दै. ‘देवगिरी तरुण भारतने प्रसिद्ध केला. तो १३ जुलैपर्यंत तरी दै. ‘सामना’ने मात्र तो प्रसिद्ध केला नाही (वा केला असल्यास निदान माझ्या पाहण्यात नाही - तरुण भारतने रजिस्टर पोस्टाने त्यांचे अंक मला पाठविले) असेच चालू राहिले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट १९९७)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...