भूमिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भूमिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

समितीची भूमिका

समितीची भूमिका

दाभोलकर, भूमिका, जनसंवाद, पशुहत्या, चळवळ
अलिकडेच जळगावला गेलो होतो. सुप्रसिद्ध उद्योगपती भंवरलालजी जैन यांची भेट घेतली. झाले होते ते असे, काही महिन्यांपूर्वी माझा व डॉ. श्रीराम लागूंचा विवेक जागराचा वादसंवाद कार्यक्रम जळगावला झाला होता. त्याचा वृत्तांत भंवरलालजींच्या कानावर गेला होता. देव आणि धर्म याबाबतच्या आपल्या भूमिकेबद्दल त्यांच्या मनात काही प्रश्नचिन्हे होती. त्याबद्दल बोलणे हे भेटीचे एक प्रयोजन होते. वेळेला पैशाची किंमत असते, हे तर खरेच. उद्योगपतींच्या बाबतीत हे अधिकच खरे आहे; परंतु त्यांनी पुरेसा वेळ दिला. आस्थेवाईकपणे आपली भूमिका समजून घेतली. स्वत:च्या मनातील शंका दूर झाल्याची मनमोकळी कबुली दिली. मला वाटते, हे प्रातिनिधिक ठरावे. लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व देव आणि धर्म यांची स्वत: घातलेली सांगड असते. त्यामुळे समितीची भूमिका समजावून घेण्याऐवजी स्वत:च्या मनातील आक्षेप, हीच समितीची भूमिका असा चुकीचा ग्रह करून घेतला जातो. आपले कार्यकर्तेही हा गैरसमज दूर करण्याचे प्रभावी प्रयत्न करताना दिसत नाहीत. हा आळस आहे, की समितीची भूमिका स्वत:लाच नीट समजलेली नाही, का इतरांना भूमिका पटवून देण्याचे कौशल्य कमी पडते. कारण काहीही असो, या विषयावर प्रभावी जनसंवाद वाढवणे आता गरजेचे झाले आहे.

सोलापूर शाखेने स्वत:च्या कामाचा काढलेला अहवाल नुकताच बघितला. अंधश्रद्धा निर्मूलन कशासाठी, मागील वर्षांतील कार्य, लोकांच्याकडून अपेक्षा या सर्व बाबी त्यांनी नेमकेपणाने नोंदवल्या आहेतच; पण मला विशेष कौतुक वाटले ते याचे की, त्यांनी वर्षभराचा जमा-खर्च अहवालासोबत छापला आहे. लोकांच्या प्रत्येक पैशाला आपण जबाबदार असतो आणि कामाच्या अहवालाबरोबरच पैशाचा अहवालही चोखपणाने द्यावयास हवा, ही जाण आपल्या सर्व शाखा जितक्या लवकर दाखवतील तेवढे चांगले, असे मला आवर्जून वाटते.

डॉ. लागू यांच्याबरोबर बेळगाव, सिंधुदुर्ग व गोवा असा दौरा झाला. विवेक जागराचे कार्यक्रम चांगले झाले. तरुण भारत हे बेळगावचे दैनिक या सर्व भागात सर्वाधिक खपाचे आहे. त्यांनी सतत उत्तम प्रसिद्धी दिली. बेळगावच्या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी होती. सावंतवाडीची वेळ दुपारची असूनही प्रतिसाद चांगला होता. खंत वाटते ती ही की, याचे पुढे संघटना बांधणीत प्रतिबिंब उमटत नाही. प्रयत्न करूनही सावंतवाडीला आपली शाखा निघू शकलेली नाही. बेळगावच्या कार्यक्रमानंतर तेथील पूर्णवेळ कार्यकर्ते श्री. नारायण आतिवाडकर यांचे पत्र आले, ‘कार्यक्रमामुळे प्रत्यक्षात कार्यासाठी येणाऱ्यांचा ओघ वाढेल असे वाटले होते; तेच मात्र घडले नाही. हा अनुभव तसा नवीन नाही. माझ्या आणि चळवळीतील इतर अनेकांच्या सभांना जी गर्दी जमते, ती प्रत्यक्ष कामात परावर्तीत होत नाही. काही प्रमाणात असे होणारच. परंतु संघटनात्मक आकलनात व संयोजनात काही त्रुटी राहिल्यामुळे असे होते का, याचा शोध अंतर्मुख होऊ घ्यावयास हवा.

एका जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक घेतली. विषय आपापसातील राजी-नाराजीचे. अशा बैठकीत शेवटी साधारणपणे झाले गेले विसरून एकत्रितपणे काम करण्याची भाषा होते, काहीशी सक्तीच्या खुशीने. संघटना चालवायची तर मानवी स्वभावाला धरून या तडजोडी होणारच. पण या बैठकीत एक नवीनच मुद्दा पुढे आला. तो असा की, समजा एकमेकांचे स्वभाव आपापसात जमवून घेण्यासाठी पूर्णपणे विसंवादीच असतील तर...? असे असल्यास उगीच जुळवाजुळवी करण्यात काय अर्थ? मला स्वत:ला हा मुद्दा पटला नाही. काहीसा क्लेशदायकही वाटला. आपण एक विवेकी चळवळ चालवतो. सर्व जगाशी मूल्याधिष्ठित सुसंवादित्व हा विवेकाचा पाया आणि कालपर्यंत ज्यांच्याबरोबर काम केले, त्यांच्याशी एकदम पूर्ण विसंवादित्व निर्माण होणे, यात आपलेच काही चुकत नसेल का? विशेषत: ध्येय, संघटना, कार्यक्रम एकच असताना असे घडत असेल तर आपण अंधश्रद्धा निर्मूलन ते काय करणार; मग विवेकाधिष्ठित समाजाची निर्मिती तर दूरच राहिली. याहीपेक्षा वेगळा पेच एका कार्यकर्त्याने सांगितला. कामाच्या आकर्षणाने एक व्यक्ती समितीची सभासद बनली. उत्साहाने चळवळीत आली. देवधर्म मुळातच मानत नसल्याने व वैज्ञानिक जाणिवा आत्मसात केल्या असल्याने बाकीचा प्रश्न नव्हताच. ती व्यक्ती ज्या ठिकाणी नोकरीस होती, तेथील शिरस्त्याप्रमाणे तिला वरकमाई चांगली होती आणि ती घेताना तिच्या मनाला कोणतीही बोचणी नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व नोकरीचा व्यवहार दोन्ही आपण आपल्या ठिकाणी चोख सांभाळतो, असे तिला वाटत होते. मला मात्र ही आत्मवंचना वाटते, विवेकवादी जीवनमूल्यांशी केलेली.

उस्मानाबाद जिल्ह्यात दीडशे कार्यकर्त्यांचे एक दिवसाचे शिबीर उत्तम झाले. तेथे कलापथक बसवूनही काम सुरू आहे.

चाळीसगाव जवळच्या बंजारा समाजाच्या एकेका तांड्यावर नवरात्रीला सुमारे ४०० ते ५०० बोकडे नवसापोटी मारली जातात. अशा तांड्यांची संख्या ४० आहे. इंदर चव्हाण हा तेथील आपला तडफदार कार्यकर्ता नागेश सामंत यांच्याबरोबर काम करतो. प्रबोधनाने दोन वर्षांपूर्वी दोन तांड्यांवरील पशुहत्या त्यांनी पूर्ण थांबवली. यंदा सर्व तांड्यांवर हे करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. २५ सप्टेंबरला खानदेश विभागाची यात्रा पशुहत्याबंदी कृती परिषद चाळीसगावला होईल आणि नवरात्रीपर्यंत निकराचे प्रयत्न केले जातील.

गोव्यातील कार्यक्रम चांगले झाले. जुलै महिन्यात तेथे शिबीर होईल व संघटनात्मक कामकाज बहुधा सुरू होईल. कर्नाटकातून कन्नड भाषकांत सत्यशोध प्रज्ञा परीक्षा घेण्याची मागणी आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९४)


शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

मांढरदेवी : मौन वेदनादायी!

मांढरदेवी : मौन वेदनादायी!

दाभोलकर, यातुधर्म, मांढरदेवी दुर्घटना, भूमिका
मांढरदेवी दुर्घटनेनंतर निर्माण झालेला अव्वल दर्जाचा प्रश्न वेगळाच आहे. तो आहे श्रद्धा विषयाच्या कालोचित चिकित्सेचा. ज्या पद्धतीने तो बाजूला पडला किंवा खरे तर उपस्थितच झाला नाही, ती बाब निश्चितच गंभीर मानावयास हवी.
धर्माचा, धार्मिक उत्सवाचा, कर्मकांडाचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मात सुरू आहे. धर्माभिमान व धर्मविचार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याचा साफ विसर पडला आहे. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी, असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. आदिमानवाच्या सामाजिक जीवनात प्राथमिक धर्मभावना यातुप्रधान होती. विश्वातील माणसात, प्राणिमात्रात, निर्जीवात एक यातुतत्त्व आहे. यातु क्रियाद्वारे त्याची उपासना हे यातुधर्माचेरूप होते. जुन्या-त्याज्य श्रद्धांचे उल्लंघन करून चैतन्यपूर्ण नव्या श्रद्धा स्वीकारणे व्यक्तीच्या-समाजाच्या स्वास्थ्य व सामर्थ्यासाठी आवश्यक असते. विज्ञानाच्या आजच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी यातुनिर्भर रूढ धर्मश्रद्धेतून मानवी मन बाहेर पडणे हितावह होते. प्रत्यक्षात बहुसंख्य लोकसमुदाय आजही यातुप्रधान धर्मश्रद्धेला धरूनच आहे. जातपात, बळी देण्याची प्रथा, मंत्र, तंत्र, शकून, तोडगे, ताईत, काळी जादू, देवदेवस्की यांचा पगडा सर्वदूर आणि रावापासून रंकापर्यंत सर्वांवर आहे. या प्रभावाव्यतिरिक्त विकसित धर्मश्रद्धाही काही व्यक्तींच्या मनात आहे; परंतु या दोन्हीमध्ये मोठा संघर्ष झाल्याचे दिसत नाही. अमुक बकरी, कोंबडे बळी देणे, तमुक तंत्र म्हणून अभिषेक करणे, विशिष्ट क्षेत्री जाऊन जागृत दैवताला नवस करणे यातूनच देव पावेल, पुण्य मिळेल अशी अपेक्षा बहुसंख्य भाविकांच्या अंत:करणात असते. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने कर्तव्यकर्म करावे ते ईश्वराची आज्ञा म्हणून, ईश्वरार्पण बुद्धीने करावे. अंत:करणाच्या शुद्धीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने, करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही. पण नव्या श्रद्धेचा हा भक्तिमार्ग, विवेकमार्ग संतांच्या शिकवणीनंतरही यातू टाकू शकला नाही. पाप-पुण्याचे, त्यासाठी करावयाच्या यातुक्रिया, कर्मकांड यांचेच साम्राज्य अबाधित राहिले आहे, असे दिसते.
मांढरदेवीला फोडलेल्या नारळातील पाण्याचे लोट वाहिले. दीपमाळेला वाहिलेले तेल त्यात मिसळले, चार-पाच हजार बकऱ्यांचा नवस फेडण्यासाठी बळी ही नेहमीची बाब. दारू पिणे हा रिवाज. कमालीची अस्वच्छता हे अंगी पडलेले वळण. देवळाच्या मागील असंख्य झाडांवर मारलेले खिळे, टांगलेल्या बाहुल्या आणि लिंबे, दुसऱ्याचे वाटोळे व्हावे आणि त्याची श्रीमंती आपल्याकडे यावी, या इच्छा प्रकट करणाऱ्या झाडावर लटकवलेल्या शेकडो चिठ्ठया हे सारे यातुश्रद्धेचे उघड रूप आहे. सर्व पक्षांचे महाराष्ट्राचे नेते मांढरदेवीला भेट देऊन गेले. यापैकी शरद पवार यांनी उच्चारलेले ‘पुढील वर्षी दारू व पशुहत्या यावर बंदी आणावी, अशी विनंती आम्ही राज्य शासनाला करू’, हे वाक्य सोडता, एकही जण एकही वाक्य बोलला नाही. उठता-बसता महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांच्या नावांचा गजर करणारी ही मंडळी हा वारसा विसरली कशी?
एकोणिसाव्या शतकातल्या महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी धर्माला विवेकी रूप देण्याचा प्रयत्न केला. ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला. मानवी जीवनाचे नियमन केवळ शासन व कायदे करू शकणार नाहीत, तेथे माणसातील नैतिकतेलाही आवाहन करण्याची गरज आहे, अशी ही भूमिका होती. आज महाराष्ट्रात समाजप्रबोधनाच्या वाऱ्याचा वेग मंदावला आहे. विसाव्या शतकातील प्रबोधनाने आणलेली आधुनिकता समतावादी नैतिकतेचे मूल्य जोपासण्यात धडपडत होती. आता एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी विपरीत घडते आहे. ही आधुनिकता कर्मकांडात रमण्यात, जत्रा, यात्रा, मेळे यात मिरवण्यात, बाबा-बुवांच्या पालख्या उचलण्यात धन्यता मानते आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरवून १९ व्या शतकातले समाजसन्मुख प्रबोधन २१ व्या शतकात समाजविन्मुख बनले आहे. खरी वेदना याची, की याबद्दल ना कोणाला सोयर, ना सुतक.....
हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर जे शाब्दिक वा प्रत्यक्षातील प्रहार सोसावे लागतात. ते अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या विवेकवादी चळवळी रोज अनुभवत आहेत. देवाच्या घरी धर्माने निषिद्ध मानलेली दारू कशी चालते की, यांना सुरापान करणारे आठवतात. शेकडो लिटर तेल वाया का घालवायचे, हा प्रश्न त्यांना पवित्र रूढी-पालनाचा वाटतो. स्वच्छता राखणे सरकारची जबाबदारी म्हणून अंग झटकले जाते. काळी बाहुली, लिंबे, करणीच्या चिठ्ठ्या या बाबी समाज सुशिक्षित झाल्यावर आपोआप जातील, असा (गैर) समज असतो. एकाच विशिष्ट दिवशी सर्व भाविकांची गर्दी आवश्यक आहे का, हा प्रश्न तर धर्मावरचा हल्ला वाटतो. श्रद्धा कोणत्याही स्वरुपातील असो, तपासाल तर खबरदार, असा पवित्रा असतो. खंत याची वाटते, की याबाबत सारेच कसे सोयीस्कर मौन बाळगतात? मांढरदेवीजवळील वाईला अनेक वर्षे धर्मकोशाचे काम चालते, त्यांना याबद्दल काही का म्हणावयाचे नसते? बहुजनांच्या विकासाचा वारसा घेतलेल्या शिक्षणसंस्था याबाबत मूग का गिळतात? राजकीय नेत्यांनी कातडीबचाव भूमिका समजू तरी शकते; पण कुलगुरू, शास्त्रज्ञ, साहित्यिक यांच्या मौनाचा अर्थ काय? संतांचा अभिमानास्पद वारसा सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाला याबद्दल काय वाटते? शाळेत मूल्यशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रात यासारख्या घटितामागे कोणते मूल्य दिसते आणि खरे ते कोणते असावयास हवे, याचा ब्र शिक्षक का उच्चारत नाहीत? वायफळ वेळी तावातावाने बोलणारे, समाजसुधारकांचा जयघोष करणारे, वेळ येताच सारे कसे शांत शांत कसे होतात? पुरोगामी महाराष्ट्राची आजची प्रत्यक्ष अवस्था सांगण्यासाठी या सर्वांचे हे मौन खूप बोलके आहे, आणि वेदनादायीही!

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑक्टोबर २००३)

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

महात्मा फुलेंच्या पुण्यात महापालिकेची बुवाबाजी



महात्मा फुलेंच्या पुण्यात महापालिकेची बुवाबाजी


दाभोलकर, निर्मलामाता, कुंडलिनी, सहजयोग, पुणे महानगरपालिका, आंदोलन, भूमिका
पुणे महानगरपालिकेने ७ एप्रिल रोजी सहजयोगाद्वारे कुंडलिनी जागृतीचा दावा करणाऱ्या निर्मलामाता यांना मानपत्र दिले. या कार्यक्रमास पुणे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र विरोध नोंदवला होता. याचा कृती कार्यक्रम म्हणून हे मानपत्र प्रदान करण्याचा सोहळा ज्यावेळी बालगंधर्व सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत झाला, त्याचवेळी महात्मा फुले यांच्या वाड्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याखाली डोळ्याला पट्टी बांधून अभिनव आंदोलन केले गेले. या आंदोलनास पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्धी दिली. यासंदर्भात समितीने पुढील स्वरुपात भूमिका मांडली होती.
१) निर्मलामाता जी कुंडलिनी जागृत करण्याचा दावा करतात, ती कुंडलिनी मानवी शरीरात कुठेही अस्तित्वात नाही. त्यामुळे ती जागृत करून माणसांचा आत्मोद्धार करण्याचा दावा ही बुवाबाजीच ठरते. निर्मलामाताजींनी आधुनिक वैद्यकशास्त्रातील कोणत्याही पुस्तकातून कुंडलिनीच्या अस्तित्वाचा पुरावा सादर करावा, असे आव्हान समितीने दिले. त्याबरोबरच त्यासाठी समितीचे रु. २१ लाखाचे आव्हान आहे, हेही स्पष्ट केले.
२) निर्मलामाताच्याद्वारे ज्यावेळी कुंडलिनी जागृती केली जाते, त्यावेळी कुंडलिनी जागृत झालेल्या व्यक्तीच्या अंगावरून वाऱ्याची मंद झुळूक गेल्यासारखे संबंधितांना जाणवते, असे त्या सांगतात. ही साधी स्वसंमोहन अवस्थेतील  सूचनेद्वारे निर्माण होणारी बाब आहे. समितीदेखील हे करू शकते, असेही समितीने प्रतिपादन केले.
३) महाराष्ट्राला समाजसुधारकांचा वारसा आहे. अनेक थोर समाजसुधारकांची कार्यभूमी पुणे होती. महात्मा फुले यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेसमोर उभा आहे. हे सर्व लक्षात घेता महानगरपालिकेने सार्वजनिक पैशातून असे कार्यक्रम करणे ही बाब अयोग्य आहे; तसेच घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. या कर्तव्यापासून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक दूर जात आहेत.
४) डोळ्याला पट्टी बांधून सत्याग्रह करण्याचे प्रयोजन समितीतर्फे पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आले.
(अ) हा कार्यक्रम आम्ही पाहू इच्छित नाही, याचा प्रतीकात्मक निषेध म्हणून याच कार्यक्रमाच्या काळात डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
(ब) महानगरपालिकेचे नगरसेवक आंधळेपणाचे वर्तन करत आहेत, हे देखील आम्ही याद्वारे सूचित करू इच्छितो.
(क)       सन्मानपत्र देण्याच्या कार्यक्रमामुळे पुरोगामी पुण्याचा पराभव होत आहे व महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारसा विसरला जात आहे       याची वेदना व निषेध यासाठीही डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली.      
या आंदोलनात पुणे, पिंपरी-चिंचवड, येरवडा, भोर शाखांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यामध्ये दीपक गिरमे, अनंत लिमये, रासकर, अरविंद पाखले, मिलिंद देशमुख, विवेक सांबारे, नलवडे, ज्ञानोबा घोणे आदींचा समावेश होता. तसेच पुण्याचे माजी महापौर व समाजवादी नेते भाई वैद्य, उपमहापौर सतीश देसाई (काँग्रेस पक्ष), माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस), राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त सुभाष वारे, कष्टकरी पंचायतीचे नितीन पवार, लोकस्वतंत्रता संघटनेचे रा. प. नेने, ताहेर पुनावाला, लोकविज्ञानचे गुत्तीकर आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. माळवदकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सध्या पुणे महानगरपालिकेत सत्तेत आहे. परंतु त्या पक्षाचेही वर्तन चूक आहे आणि त्याबाबत पक्ष बैठकीत आवाज उठविला जाईल. त्याबरोबरच पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार हे बुवाबाजीच्याविरोधी आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मे २००८)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...