उपोषण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपोषण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

कायद्याच्या आघाडीवर




कायद्याच्या आघाडीवर
दाभोलकर, कायदा, इच्छाशक्तीचा अभाव, उपोषण, कायदा प्रक्रिया
जादूटोणाविरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर करण्याबाबत शाब्दिक सहानुभूती भरपूर आहे. मात्र तिचे प्रत्यक्षात कृतीत रूपांतर होऊ शकते का, याबद्दल मी साशंक आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अवघे दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येथे कायदा या अधिवेशनात होईलच, अशी ग्वाही पत्रकार परिषदेत दिली. दैनिक सकाळने त्यांच्या सर्व आवृत्त्यांत ठळकपणे पहिल्या पानावर हे छापले. इतर वृत्तपत्रांनीही या बातमीस यथोचित जागा दिली. त्यानंतर दोनच दिवसांनी अधिवेशनापूर्वीचे विरोधकांसमवेतचे चहापान झाल्यानंतरच्या वार्तालापात मुख्यमंत्र्यांनी याच बाबीचा पुनरुच्चार केला. त्यामुळे अनेकांना असे वाटले की, कायदा या अधिवेशनात नक्की होणार; परंतु कथनी आणि करणी यात नेहमीच बरेच अंतर असते. कायदा मंजूर होण्यासाठी काय घडावयास हवे, याची नोंद खाली क्रमश: दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया किती खडतर असते, याची कल्पना येऊ शकेल.

१.    २१ डिसेंबरला नागपूरला मुख्यमंत्र्यांनी वारकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा एकदा ९ जानेवारीला वारकरी प्रतिनिधींच्याबरोबर सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे सविस्तरपणे बोलले. त्यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात येणाऱ्या बदलाची नोंद त्यांनी प्रतिनिधींना दिली. हे एक महत्त्वाचे पाऊल शासनाने उचलले.
२.    हा सुधारित मसुदा मुख्यमंत्र्यांच्या सहीने सामाजिक न्याय विभागाकडे जावयास हवा. हा लेख लिहीपर्यंत (२१ मार्च) तो गेलेला नव्हता. स्वाभाविक त्यापुढील सर्व बाबींची तर सुरुवातही झालेली नाही.
३.    सामाजिक न्याय विभागाचे सचिव; तसेच राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री यांच्या सहीने तो महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरी यांच्याकडे जावयास हवा.
४.    चिफ सेक्रेटरी यांनी तो मसुदा मंत्रिमंडळासमोर मांडण्यासाठी मंत्रिमंडळाच्या कामकाज पत्रिकेत समाविष्ट करावयास हवा.
५.    मंत्रिमंडळाने मसुदा मंजूर करावयास हवा.
६.    यानंतर तो मसुदा कायदेशीर परिभाषेत होण्यासाठी विधी खात्याकडे पाठवण्यात येईल.
७.    विधी खात्याने मंजूर केलेला मसुदा हा कायदा सध्याच्या ‘इंडियन पिनल कोड’मधील तरतुदीशी सुसंगत आहे ना, हे पाहण्यासाठी गृहखात्याकडे पाठवण्यात येईल.
८.    गृहखात्याकडून अनुमती आल्यानंतर तो मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रिमहोदया-कडून विधानसभेत मांडण्यात येईल. मसुदा बदललेला असल्यामुळे जुलै २०११ मध्ये मांडलेला मसुदा रद्द झाला आहे. त्यामुळे हा नवा मसुदा सभागृहाच्या पटलावर ठेवावा लागेल.
९.    यानंतर सभागृहाच्या कामकाजपत्रिकेत दाखवून त्यावर चर्चा करून विधानसभेत तो मंजूर करावा लागेल.
१०.   विधानसभेत मंजूर झाल्यानंतर तो विधान परिषदेत मंजूर करून घ्यावा लागेल.

वरील सर्व बाबी जास्तीत जास्त २६ एप्रिलपर्यंत म्हणजे विधिमंडळ कामकाजाच्या शेवटच्या दिवसापर्यंत करवून घ्याव्या लागतील. काहीजणांच्या मते, हे अधिवेशन १८ एप्रिलपर्यंतच चालणार आहे. असे झाल्यास वेळ आणखी कमी होईल.

आतापर्यंतचा शासनाचा याबाबतचा अनुभव उत्साहवर्धक नाही. तरीही अत्यंत चिकाटीने समितीने हा लढा चालू ठेवला आहे. याबाबत आजची परिस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
१.    मुख्यमंत्री कायदा करण्यास अनुकूल आहेत. मात्र तो त्यांच्या प्राधान्याचा विषय नाही.
२.    उपमुख्यमंत्री कायदा करण्याबाबत आग्रही आहेत.
३.    वारकरी संप्रदायाच्या सूचनेप्रमाणे कायद्यात बदल केला आहे.
४.    या बदलानंतर शिवसेना-भाजपचा विरोध सौम्य झाला आहे. त्यांचा एकच मुद्दा आहे की, कायदा सर्व धर्मियांसाठी हवा आणि तो तसाच असल्यामुळे त्यांचा आक्षेप टिकणारा नाही.
५.    मनसेचा कायद्याला विरोध नाही.
६.    शेकाप, लोकभारती, रिपब्लिकन, सीपीएम हे पक्ष थेटपणे कायद्याच्या बाजूचे आहेत.
७.    कायद्याला अजूनही धर्माच्या नावाने विरोध करणारे जे आहेत, ते ज्या संघटनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे केली आहे, त्यांचे सभासद आहेत, याची जाणीव महाराष्ट्र शासनाला आहे. याच मंडळींनी नेहमीप्रमाणे विधानसभा अधिवेशन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आरोप केले आहेत, ज्यांची दखल माध्यमांनी घेतलेली नाही.
८. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत निवेदने कायदा करण्याबाबत पाठवण्याची जी मोहीम चालवण्यात आली, त्याला सर्वसामान्य नागरिक व मान्यवर    यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री ना. हसन मुश्रीफ, तसेच खा. सुप्रिया सुळे, कोल्हापूरचे सध्या गादीवर असलेले शाहू महाराज, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विविध पक्षांचे आमदार यांच्या व्यक्तिगत सहीची निवेदने मुख्यमंत्र्यांच्या समोर थेटपणे ठेवण्यात आली. त्याचा परिणाम झाला आहे.
९.    कायदा करण्यासाठी सत्तारूढ पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे.

समिती आता काय करत आहे?
१.    कायदा होण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडावयास हवी, असे वर लिहिलेले आहे. ती लवकरात लवकर पार पाडावी, यासाठी प्रयत्नशील आहे.
२.    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांची एकत्रित बैठक होऊन कायदा होण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन समितीला मिळावे, यासाठी समिती प्रयत्नशील आहे. या स्वरुपाचे पत्र ना. अजितदादा पवार, दोनदा मा. मुख्यमंत्र्यांना दिले आहे, ही जमेची बाजू आहे. यामुळे अशी बैठक होण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव जैन यांच्याशीही याबाबत तपशिलात बोलणे झाले आहे व त्यांनीदेखील अशी बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले आहे.

वरील सर्व आढावा लक्षात घेतला तर कायदा होण्याबाबत अनुकुलता असली तरी पूर्वीचा प्रदीर्घ अनुभव शासनावर विसंबून राहण्यासारखा नाही. त्यामुळे १० एप्रिलपर्यंत काय घडते, हे पाहिले जाईल. कायदा करण्याच्या प्रक्रियेने योग्य ती गती न पकडल्यास ११ एप्रिल महात्मा फुले जयंती ते १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत ७२ तासांचे आत्मक्लेष उपोषण मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले जाईल. हे उपोषण दबाव आणण्यासाठी नसून शासनाची असंवेदनशीलता व नाकर्तेपणा याच्या विरोधात असेल. त्यानंतर १५ तारखेला मुंबईला आझाद मैदानावर अंनिसचे सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते जेलभरो सत्याग्रह करतील. सत्याग्रही गुन्हा कबूल करून शिक्षा स्वीकारतील.

उपोषण व जेलभरो याबद्दलच्या सूचना :-
१.    उपोषणात सहभागी होणाऱ्यांनी एक दिवस उपोषण करणे अभिप्रेत आहे. ७२ तास उपोषण करावयाचे असल्यास स्वत:च्या प्रकृतीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. कुटुंबियांशीही बोलावे.
२.    एक दिवस उपोषण करणारे अन्य दोन दिवस उपोषणस्थळी थांबू शकतात. त्यांची आवश्यक सोय केली जाईल.
३.    पुणे, कोल्हापूर, इस्लामपूर येथून वाहनाने एकत्रितपणे व नियोजनपूर्वक कार्यकर्ते उपोषणात सहभागी होतील, असे पाहिले जात आहे. अर्थात, महाराष्ट्रातून कोठूनही कार्यकर्ते येऊ शकतात.
४.    १५ तारखेला अथवा १६ तारखेला मुंबईला जेलभरो आंदोलन होईल.

वरील दोन्ही कार्यक्रम हे शासनाचा प्रतिसाद काय आहे, यावर अवलंबून आहेत. मात्र आपण आपल्या बाजूने ते करावे लागतील, असे गृहीत धरून तयारी करत आहोत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल २०१३)




रविवार, १४ जानेवारी, २०१८

असे झाले मुंबईतील ‘थोबाडीत मारा’ (स्वतःच्या) आंदोलन


असे झाले मुंबईतील ‘थोबाडीत मारा’ (स्वतःच्या) आंदोलन
दाभोलकर, स्वतःच्याच थोबाडीत मारायचे आंदोलन, उपोषण, मंत्र्यांचे आश्वासन 
शुक्रवार, दि. २५ जुलै. मुंबईला अधून-मधून; पण जोरदारपणे पावसाच्या सरी कोसळत होत्या. ज्या आझाद मैदानावर स्वत:च्याच थोबाडीत मारा या अभिनव सत्याग्रहाचा समारोप होता, त्याच्या एका बाजूला पाणीही साचले होते. समितीचा मंडप ज्या ठिकाणी घातला गेला होता, त्याला लागूनच प्रा. एन. डी. पाटील बेमुदत उपोषणाला बसले, त्यांचाही मंडप होता. सरांचे उपोषण त्यांना शासनाने वर्षापूर्वी दिलेले आश्वासन पाळले नाही, या वचनभंगाबद्दल होते; तर आपला सत्याग्रह १९९९ साली लेखी स्वीकारलेल्या कार्यक्रमाबाबत सतत ९ वर्षे वचनभंग चालू आहे, त्यासाठी होता. मंडपातले प्रतिनिधी वेगवेगळे होते; परंतु अंत:करणे परिवर्तनाच्या समान धाग्यांनीच बांधलेली होती. स्वाभाविकच दोन व्यासपीठे होती; पण अनेक बाबतीत वक्ते एक होते. घोषणा पूरक होत्या. गाण्यातील शब्द वेगळे होते; पण आशय समग्र बदलाचाच होता. सकाळी ९ पासून कार्यकर्ते येऊ लागले. ११ वाजता कार्यकर्त्यांची संख्या शंभरीच्या घरात पोचली. मुंबई, ठाणे, रायगड येथील कार्यकर्तेच बोलावले असल्याने स्वाभाविकपणे एवढीच संख्या अपेक्षित होती. मात्र उत्साहाने इस्लामपूर (जि. सांगली) शाखेचे कार्यकर्ते खास जीप करून आले होते; तर अन्य काही जिल्ह्यांतील कार्यकर्तेही प्रातिनिधिक स्वरुपात होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर गजानन खातू, पुष्पाताई भावे, सदाशिव अमरापूरकर, सुरेखा दळवी, समविचारी संघटनांचे अन्य नेते, कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली. आपापली मते मांडली. पाठिंबा दिला. कमी-जास्त प्रमाणात सगळ्यांचा सूर एकच होता. तो म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा, अक्षम्य दिरंगाई, सरकारला जाब विचारण्याची गरज इत्यादी. परंतु प्रसारमाध्यमांना या भाषणात कमी रस होता. त्यांना पाहिजे होती, स्वत:च्याच थोबाडीत मारा या सत्याग्रहाची छायाचित्रे. व्यासपीठावरील ध्वनिक्षेपकावरून १ पासून १०० पर्यंतचे आकडे जोराने उच्चारले गेले आणि दोन्ही मंडपातील उपस्थित समुदायाने स्वत:च्या गालावर थपडा मारत त्याला साथ दिली. १०० चा एक राऊंड झाला की, काही भाषणे, गाणी; मग पुन्हा राऊंड असे सतत चालू राहिले.

दीड वाजता पोलिसांच्या गाडीतून समितीचे १२ प्रतिनिधी कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकरांच्यासह विधानभवनात मंत्र्यांच्या भेटीसाठी गेली. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ना. चंद्रकांत हांडोरे यांची भेट मला निराशाजनक वाटली. संयुक्त चिकित्सा समितीकडे गेले १५ महिने जादूटोणाविरोधी विधेयक सखोल चर्चेसाठी आहे. मात्र त्याबाबतची कार्यवाही अत्यंत संथ गतीने चालू आहे. १३ सप्टेंबर २००७ नंतर त्याची बैठकही नामदार महोदयांनी घेतलेली नाही. ती का घेतली नाही, याचे काही कारणही ते देऊ शकले नाहीत आणि या बैठका लवकर संपवून हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडूच, असेही स्पष्टपणे सांगण्याची (वा न सांगण्याची) हिंमत त्यांनी दाखवली नाही. त्यांनी दिलेली सर्वच उत्तरे असमाधानकारक होती. शिष्टमंडळाला त्याबद्दल तीव्र नाराजी वाटली, हे त्यांच्याही लक्षात आले असावे. कारण अधिकृत भेट संपल्यानंतर त्यांनी सदाशिव अमरापूरकर यांना पुन्हा बोलावून घेतले आणि स्वत:ची बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर सर्व शिष्टमंडळ विधिमंडळाच्या इमारतीत उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले. त्या दिवशी उपमुख्यमंत्री अत्यंत व्यग्र होते. एक तर त्यांच्या गृहखात्यावर सविस्तर चर्चा चालू होती. शिवाय मुख्यमंत्री मुंबईत नसल्याने त्यांच्यावर अधिक जबाबदारी होती. त्यातच विधिमंडळ अधिवेशन एक आठवडा आधी संपवण्याचे ठरल्याने कामकाजाचा ताण होता. तरीही शिष्टमंडळाला भेट देण्याचा शब्द त्यांनी दिला होता व तो त्यांनी पाळला. त्यांची भेट मिळण्यासाठी सुमारे दीड तास थांबावे लागले. तेवढ्या वेळात सदाशिव अमरापूरकर व नरेंद्र दाभोलकर यांनी विधानसभेचे सभापती बाबासाहेब कुपेकर यांची भेट घेतली. कुपेकर यांनी अंनिसच्या कामाला स्वत:चा मनापासून पाठिंबा असल्याचे सांगितले व कायद्याचा विषय निकाली लागण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे मान्य केले.

उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमवेत भेट कमी वेळात; पण नेमकी झाली. त्यांनी सांगितले की, या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्यांचे बोलणे झाले होते व मुख्यमंत्रीही कायदा करण्याच्या बाजूचेच आहेत. ६ ऑगस्टला म्हणजे बुधवारची मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक घडवून आणून जादूटोणाविरोधी कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनच होकार ऐकण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. यावेळी मृणालताई गोरे, उल्का महाजन यापण उपस्थित होत्या. पुन्हा पोलिसांच्या गाडीतून सर्व शिष्टमंडळ आझाद मैदानावर आले. भेटीगाठींचा वृत्तांत सत्याग्रहींना कथन करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीत प्रदीर्घ काळ होऊनही ही लढाई चिकाटीने लढण्याचा व त्यात यशस्वी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मग दोन्ही मंडपातील कार्यकर्त्यांनी आपापल्या शेजाऱ्याचे हात हातात धरले. उच्च स्वराने हम होंगे कामयाब हे गाणे गायले आणि यश मिळेलच, हा आशावाद सर्वांच्या मुखातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००८)


‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...