फलज्योतिष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फलज्योतिष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० डिसेंबर, २०१७

फॅसिस्ट शक्तीविरोधी रान उठविणार




फॅसिस्ट शक्तीविरोधी रान उठविणार   
दाभोलकर, फॅसिझम, दैववादाची होळी, फलज्योतिष, विरोध  
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा. सातारकरांना आवाहन दैववादाची होळी या कार्यक्रमात सहभागी व्हा अशा मथळ्याचे एक पत्रक ज्योतिष संमेलनात अंनिसतर्फे काढण्यात आले. त्याचा आशय असा होता -

अखिल भारतीय ज्योतिष संमेलन दिनांक ३ नोव्हेंबर ९५ ते ५ नोव्हेंबर ९५ रोजी सातारला होत आहे. यापूर्वी ते महाराष्ट्रात जेथे-जेथे झाली, त्या-त्या ठिकाणच्या परिवर्तनवादी संघटनांनी त्यांच्यासमोर जे प्रश्न मांडले, त्यांची समाधानकारक उत्तरे कधीही मिळाली नाहीत. या संमेलनाआधी त्या संमेलनाचे कार्याध्यक्ष, अध्यक्ष, महाराष्ट्र ज्योतिष महामंडळाचे अध्यक्ष या सर्वांना आम्ही प्रश्न पाठविले त्यांची योग्य उत्तरे मिळाली नाहीत. ही वस्तुस्थिती सातारकरांच्या समोर यावी म्हणून हे पत्रक आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

ग्रहताऱ्यांची भ्रमणे ही खगोलशास्त्र व गणिताच्या आधारे वर्तवता येतात; मात्र व्यक्तीच्या जीवनात बरे-वाईट, शुभ-अशुभ असे घडविण्याची कोणतीही शक्ती या ग्रहात नसते. दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा दावा करणाऱ्या तथाकथित फलज्योतिषशास्त्राने याबाबत कोणताही पुरावा आजपर्यंत पुढे आणलेला नाही. भारताच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकांचे कर्तव्य सांगितले आहे. त्याचा विचार करून अशास्त्रीय फलज्योतिषाला लोकांनी मनोरंजनापलिकडे अधिक स्थान आपल्या आयुष्यात देऊ नये, अशी विनंती आम्ही करीत आहोत.

फलज्योतिष हे ग्रहगोलाद्वारे व्यक्तीला नियतीचे संकेत देते, असे ज्योतिषी सांगतात. याचा अर्थ व्यक्तीचे सर्व जीवन नशिबावर अवलंबून असते, असा होतो. माणसाचे कर्तृत्व, समाजाची स्थिती व्यक्तीचे जीवन घडविते. नवग्रह आणि नशीब याच्याशी त्याचा अजिबात संबंध नाही, असे आम्हाला ठामपणे वाटते. म्हणूनच समाजमन दैववादी बनविणाऱ्या ज्योतिषाला माणसांनी दूर ठेवावे, असे आमचे आवाहन आहे. महात्मा फुले, विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित नेहरू या सर्व थोरांनी म्हणूनच ज्योतिषाबाबत विरोधी मत प्रदर्शित केले आहे, हे आम्हाला महत्त्वाचे वाटते.

व्यक्तीच्या लहानपणी तिची जन्मकुंडली तयार होते. व्यक्तीच्या लहानपणीच तो दैववादाला आधार देणारा पांगुळगाडा आहे. तो निर्धाराने टाकून देण्यासाठी या जन्मकुंडल्यांची आम्ही दि. ४ नोव्हेंबर ९५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गांधी मैदान, सातारा येथे जाहीर होळी करीत आहोत. चांगल्या हेतूने व प्रामाणिक प्रयत्नाने काम करण्यासाठी सर्व वेळा सारख्याच असतात. शुभ वेळ व अशुभ वेळ या केवळ मानसिक कल्पना आहेत, हे लोकांना समजावे यासाठी पंचांगातील शुभवेळाच्या पानांचीही होळी यावेळी केली जाणार आहे.

प्रयत्नवादाचा स्वीकार करण्यासाठी नियतीवादाला ठोकरण्यासाठी, निर्भय बनण्यासाठी, समाजसुधारकांचा वारसा चालविण्यासाठी दैववादाची होळी या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे, ही विनंती. १) लोकरंगमंच, सातारा, २) राष्ट्रसेवक क्रांती दल, सातारा, ३) राष्ट्रसेवा दल सातारा, ४) राष्ट्रीय एकता मंच, सातारा, ५) एस.एफ.आय., सातारा, ६) छात्रभारती, सातारा, ७) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा-सातारा, ८) धुमकेतू विज्ञान मंडळ, सातारा, ९) सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळ, सातारा, १०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅकॅडमी, सातारा, ११) एकता शिक्षण प्रसारक संस्था, सातारा, १२) एम. एस. ई. बी. वर्कर्स फेडरेशन, सातारा, १३) सातारा म्युनिसिपल कामगार युनियन, सातारा, १४) जिल्हा परिषद पुरोगामी नोकर संघटना, सातारा, १५) विमा कामगार संघटना, सातारा, १६) एस.टी. कामगार संघटना, सातारा, १७) ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन सातारा.

हिंदू एकजूट या संघटनेने या कार्यक्रमाला विरोध केला. दाभोलकर, मंडपे, देशमुख यांची नावे गाढवावर लिहून त्यांची मिरवणूक काढली. त्याच दिवशी डाव्या पक्षांची जिल्हा बैठक होती. हे वृत्त कळताच, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन महासंघ, भारिप या सर्व पक्षांनी उत्स्फूर्तपणे याबाबत कडाडून टीका केली, निषेध नोंदविला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यास पाठिंबा जाहीर केला. गावागावात या फॅसिस्ट शक्तींविरोधी प्रचाराचे रान उठवण्याचे ठरवले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मे १९९६)

 




शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

विरोध आणि सहकार्य



विरोध आणि सहकार्य
दाभोलकर, फलज्योतिष, चळवळ, आर्थिक मदत
लोकसत्तेतून फलज्योतिषावरचा वाद मुंबईत चांगलाच रंगला. दोन्ही बाजू अहमहमिकेने नेहमीप्रमाणे एकमेकांवर तुटून पडल्या. वृत्तपत्राने काही दिवसांनी त्यांच्यापुरता वाद थांबविला. पण आपल्या कार्यकर्त्यांनी मात्र या वातावरणाचा फायदा उचलावयाचे ठरवले आणि फलज्योतिषावर दोन दिवसांचे विचारमंथन जाहीरपणे ठेवले.

दादर सार्वजनिक वाचनालयाने आनंदाने सहकार्य दिले. कल्पना होती, एकदा आमने-सामने सवाल- जवाब झडायलाच हवेत! पण आश्चर्य म्हणजे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकरांपासून ते महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री. श्री. भटांपर्यंत सगळ्यांनी या ना त्या कारणाने लढतीला येण्याचे टाळले. अधिकृत प्रतिनिधीही ते देऊ शकले नाहीत. वेळ सोयीची नाही, हे पेटंट कारण होतेच. परिसंवाद, व्याख्याने छान झाली. दोन्ही दिवशी तुडुंब गर्दी होती. दुसऱ्या दिवशी तर अक्षरश: जागाच नव्हती. प्रकाश घाटपांडे आणि मा. श्री. रिसबूड या दोघांनीही फलज्योतिषाच्या आधारातीलच अंतर्विसंगती चांगल्या प्रकारे दाखवून दिली. आश्चर्य म्हणजे बहुसंख्य श्रोतृवर्ग आपल्या विचारांशी मिळता-जुळता होता. त्यामुळे येणारे तिरके प्रश्न हे ज्योतिष हे शास्त्र आहे म्हणवणाऱ्यांना होते. फलज्योतिषाला शास्त्राच्या पंक्तीत बसवावयास निघालेले (भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर) निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जोशी यांची त्या प्रश्नांनी चांगलीच पंचाईत केली. आपल्या विचाराचेच जास्त लोक व्याख्यानाला आले होते का, मध्यमवर्गीयातील एक छोटा प्रवाह आपल्याला अनुकूल होत आहे, याचा माझ्या मनाला काहीसा प्रश्न पडला. नेहमीच्यापेक्षा वेगळी मांडणी मी अभ्यासपूर्वक करण्याचा प्रयत्न केला होता. लोकांना तो रूचल्याचे जाणवले.

पुण्यातील एका धनवंत जैन भगिनींच्या घरी गेलो होतो. धर्माच्या नावाने पैशाची होणारी अनाठायी उधळपट्टी याविरुद्ध त्या सतत आवाज उठवितात. समाजाच्या सामाजिक प्रश्नाकडे पोटतिडकीने लक्ष वेधतात. सांगलीला सप्टेंबर महिन्यात असाच एक मोठा यज्ञ होणार आहे. पंधरा-वीस लाखंचा चुराडा. त्या विरूद्ध काय करता येईल, याची चर्चा झाली. सांगलीचा डॉ. प्रदीप पाटील बरोबर होताच. सांगलीची अंनिस यात पुढाकार घेईल. तुमचा सहभाग काय व कसा राहील, असे मी विचारले. चळवळीसाठी पूर्ण आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली गेली. पण उघड संलग्नता नको, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. वृत्तपत्रे निवेदन, चळवळ यामधील सहकार्यासही नकार मिळाला. आमचे आम्ही एकटे करतो म्हणून समाज नाराज असला तरी खपवून घेतो. उद्या अंनिससारख्या बाहेरच्यांशी हातमिळवणी केली. पेपरला गेलो, तर बहिष्कारच पडेल, असे सांगण्यात आले. चुकीच्या रूढी, परंपरा, कर्मकांडे मोडण्याचे काम किती अवघड आहे, हे पुन्हा एकदा लख्खकन् माझ्या डोळ्यांसमोर चमकून गेले. बोहरा समाजातले ताहेर पुनावाला असोत, नाहीतर जैन समाजातील हे व्यापारी, दोघेही पुण्यासारख्या सुधारक शहरातले. आर्थिकदृष्ट्या अतिशय मजबूत. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरचा त्यांचा व्यापारी समाज आणि तरीही त्यांना द्यावी लागणारी पूर्णत: एकाकी लढत, समाजाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बहिष्कार. खरंच! ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई किती अवघड आहे?

परंतु तरीही आपण ती लढत आहोत. कारण सहकार्याचे, मदतीचे अनेक हात आपोआप पुढे येत आहेत. अनेक प्रकारचा दुसराही प्रतिसाद मिळत आहे. आपल्या आर्डे सरांनी कोल्हापूरच्या पुढारी दैनिकात लेख लिहिला, तर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वत:हून त्यांना बोलावून घेतले. तालुक्यातील ग्रामसेवक आणि शिक्षक एकत्र करतो, त्यांच्या पुढे बोला, असा प्रस्ताव ठेवला. टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथे शाखा नुकतीच स्थापन झालेली. पण त्यांनी पंधरा ऑगस्टला बुवाबाजीवरील व्याख्यानाबरोबर रक्तदानासारखा महत्त्वाचा उपक्रमही पार पडला. त्यांची प्रशिक्षण शिबिरार्थी नोंदणीही दोनशेच्या घरात पोचली आहे. नेवासा (जि. नगर) जवळच्या ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यावर त्यांनी व्याख्यानाला दोघांचा प्रवासखर्च सोडून हजार रुपये चळवळीसाठी (मानधनरूपाने) दिले. शिवाय शाखा निघेल ते वेगळेच. ‘मातृमंदिर, देवरूख’सारखी कोकणातील मातब्बर संस्था कोकण विभागातच शिबीर घेऊ मागते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा एल्गार या आपल्या चळवळीचे सल्लागारपद स्वीकारायला युवक खात्याचा स्वतंत्र भार सांभाळणाऱ्या नामदार शामराव आष्टेकरांनी आणि सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकरांनी आवर्जून लगेच मान्यता दिली. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन. भारतातील ही सर्वांत मोठी शिक्षणसंस्था. एन. डीं.नी साताऱ्याला सर्व स्थानिक प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक घेऊन, आपल्या चळवळीच्या विचाराला अनुकूल असे प्राध्यापक, शिक्षकांचे मानस घडविण्यावर भर दिला.

जगूबाबा गोरड याच्यामुळे तर चळवळीचा नवीनच एक परिणाम पुढे आला आहे. जगूबाबा हा सातारा, सांगली भागातला नावाजलेला देवऋषी. काही कारणाने तो आटपाडी शाखेच्या आर. एस. कुलकर्णींच्या सान्निध्यात आला. त्याने धंदा आधीच बंद केला होता; पण कुलकर्णींनी त्याला चळवळीचा स्पर्श दिला. ग्रामीण भागात त्याचे अनुभवकथन घेतले. प्रचंड प्रतिसाद मिळाला. सांगली, सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी कार्यक्रम झाले. चळवळीला जगूबाबाचा उपयोग होतो, यात शंकाच नाही. त्याचे पनवेल, डोंबिवली, अलिबाग, दादरचे कार्यक्रमही चोखंदळ श्रोतृवर्गापुढे गाजले. पण त्याच्या पोटा-पाण्याचे काय? मुलाबाळांचे काय? हा प्रश्न होताच. मंडपेसरांनी खटाटोप करून त्याची दोन मुले बालसुधारगृहाध्ये दाखल केली. दहा एक हजार रुपये मिळाले असते तर शेतीला पाणी देणे शक्य होते. पण आणायचे कुठून? मी सरळ मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले. चंबळच्या दरोडेखोरांचे पुनर्वसन होते; मग फुले स्मृतिशताब्दी वर्षात धंद्यातून बाहेर येऊन चळवळीत सामील होणाऱ्या जगूबाबाचे का होऊ नये? तेव्हा मुख्यमंत्री निधीतून दहा हजार रुपये पाठवावेत आणि आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री निधीचा चेक आलादेखील. सातारच्या पोलीस उपअधीक्षकांच्या हस्ते तो समारंभपूर्वक जगूबाबाला देण्यात आला. बारामतीच्या शाखेचे आपले कार्याध्यक्ष विजयराव मोरे प्रमुख पाहुणे होते.

थोडक्यात काय, विरोध आणि सहकार्य या दोन्ही काठांच्या मधूनच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा प्रवाह पुढे सरकणार, हे दिसत आहेच. परंतु प्रवाह जिता, जागता, गतिमान ठेवणे हे आपले सर्वांचे काम. म्हणजे चळवळ आपोआप पुढे जाणारच.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९०)

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

आम्हीच खरे ब्राह्मण्यविरोधक! (भाग 2)



आम्हीच खरे ब्राह्मण्यविरोधक! (भाग 2)

दाभोलकर,   सत्यनारायण, फलज्योतिष, वास्तुशास्त्र,  सत्यशोधकी विवाह,  कुंडलिनी
१) पुणे शहरातील एका नामवंत शाळेला साठ वर्षे झाली म्हणून त्या शाळेने एकाच वेळी सत्यनारायणाच्या साठ महापूजा घातल्या. त्या विरोधात समितीच्या पुणे शाखेने पूर्ण दिवसभर धरणे धरले. स्फोटक वातावरणात असा कार्यक्रम घेणे म्हणजे लोकक्षोभाचा बळी होण्याची शक्यता असते. हा धोका पत्करून समितीचे कार्यकर्ते तेथे नुसते बसलेच नाहीत; तर त्यांनी तेथे एक बंद पेटी ठेवली आणि त्यावर लिहिले, ‘बोलते व्हा. मोठ्या प्रमाणात धरण्यांबाबतच्या प्रतिक्रिया पेटीत जमा झाल्या. पेटी उघडल्यावर हे लक्षात आले की, त्यातील निम्म्या प्रतिक्रिया तरी समितीच्या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या होत्या. हा प्रतिसाद नक्कीच आश्वासक होता. विशेष म्हणजे त्यानंतर गेल्या चौदा वर्षांत पुण्यात कोणत्याही शिक्षण संस्थेने आपला रौप्य, सुवर्ण अथवा हीरक महोत्सव साजरा करताना सत्यनारायणाचे जाहीर प्रदर्शन करण्याची हिंमत दाखविली नाही.
२) ब्राह्मणी संस्कृतीचा आधार आहे वेद. फलज्योतिष हे वेदाचे उपांग मानण्यात येते. या कथित ज्योतिषशास्त्राला जेवढ्या प्रमाणात व जेवढ्या तीव्रतेने समितीने विरोध केला, तेवढा महाराष्ट्रात कोणीही केलेला नाही. फलज्योतिष शास्त्र का नाही आणि थोतांड का आहे, याबद्दल अक्षरश: शेकडो व्याख्याने महाराष्ट्रात दिली गेली. याबरोबरच समिती गेली १३ वर्षे शिक्षक, प्राध्यापकांच्यासाठी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवते. यामध्ये आतापर्यंत सुमारे १५ हजार शिक्षक, प्राध्यापकांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयाचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या सर्वांना फलज्योतिष व विज्ञान हा विषय नीटपणे शिकवण्यात आला. त्यामुळे तो विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोचला. निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिषांना आव्हान पत्रे पाठवून संभाव्य निकालांची भाकिते ज्योतिषशास्त्राच्या आधारे देण्याचे आव्हान देण्यात आले. त्यासाठी ११ लाख रुपये ही आव्हान रक्कम समितीकडे आहे, ती पणाला लावण्यात आली. महाराष्ट्रातील एकाही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत दाखविली नाही. अजूनही कोणी दाखविल्यास समितीची तयारी आहे. सातारा येथे अखिल भारतीय ज्योतिष महामंडळाचे संमेलन झाले. अधिवेशनाआधी सतत २१ दिवस वृत्तपत्रांतून या संयोजकांना रोज एक प्रश्न विचारण्यात आला. यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर ही मंडळी देऊ शकली नाहीत. या अधिवेशनासमोर समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील तरुण-तरुणींना बरोबर घेऊन जन्मकुंडली हा दैववादाचा नकाशा आहे म्हणून त्याची होळी करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. यातून प्रक्षोभ निर्माण झाला. कार्यक्रम घेतल्यास अटक करण्याची धमकी मिळाली. हा कार्यक्रम देणाऱ्या दाभोलकरांना अपमानित करण्यासाठी एका गाढवावर त्यांचे नाव लिहून त्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तरीही कुंडलींची होळी हा कार्यक्रम जोरदारपणे पार पडला. डॉ. एन. डी. पाटील, आ. ह. साळुंखे यांचा त्यात समावेश होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने फलज्योतिष हा विषय विद्यापीठात शिकवण्याची शिफारस केली. या विरोधात समितीने आकाश-पाताळ एक केले. महाराष्ट्रातील सर्व कुलगुरूंना त्यांच्या विद्यापीठात हा विषय न शिकवण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे त्यावेळचे उच्च शिक्षणमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी समितीची मागणी उचलून धरली व विद्यापीठ अनुदान आयोगाला असे कळवले की, फलज्योतिष या विषयाऐवजी त्यांनी जलसंवर्धन या विषयाचा अभ्यासक्रम तयार करावा. औरंगाबाद खंडपीठासमोर याबाबतची याचिकाही समितीने दाखल केली. यानंतर थोड्याच कालावधीत उच्च न्यायालयाने फलज्योतिष विषय शिकवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा नीटपणे अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालावर भाष्य न करण्याचा संकेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती कायम ठेवली आहे. याचाच अर्थ असा की, विद्यापीठ अनुदान आयोगाने, नवी तज्ज्ञ समिती नेमली व त्यांनी पूर्वीचा निर्णय रद्दबातल केल्यास सर्वोच्च न्यायालय त्याच्या आड येणार नाही. मधल्या कालावधीत केंद्रातील सरकार बदलले. शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न हे सरकार चालवणार नाही, तो पूर्णत: बंद करेल, हे निवडणुकीतील अभिवचन होते. त्याला जागून मानव संसाधन विकास खात्याने नवी समिती नेमावी व फलज्योतिषाची हकालपट्टी शिक्षणातून करावी, असा समितीचा प्रयत्न आहे. याच कालखंडात फलज्योतिष शास्त्र आहे काय, याबाबत जाहीर वादविवाद महाराष्ट्रातील कोणत्याही ज्योतिषाशी, कोणत्याही व्यासपीठावर करण्याची तयारी समितीने दाखवली. ते आव्हान कोणीही स्वीकारलेले नाही. फलज्योतिष शास्त्र या निकषावर टिकू शकत नाही, याबद्दल परदेशात अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे. मात्र भारतात या स्वरुपात संशोधन झालेले नाही, हे लक्षात घेता समितीने एक संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. मतिमंद मुले व सतत उत्तम मार्काने पास होणारी मुले यांच्या नेमक्या जन्मतारखा, वेळ व स्थळ जमवण्यात येत आहे. याआधारे कोणाही ज्योतिषाने त्यांच्या कुंडल्या मांडण्यात आणि त्याआधारे त्यातील कोणत्या कुंडलीत ग्रहयोग मतिमंदत्व दाखवतात आणि कोणते ग्रहयोग उच्च दर्जाची बुद्धिमत्ता दाखवतात, याचे अचूक निदान करावे, अशी कल्पना आहे. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे याला मार्गदर्शन लाभले असून संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी पुणे विद्यापीठ मदत देणार आहे. हे सर्व लक्षात घेतले, तर फलज्योतिषाविरोधात केवढी व्यापक आघडी समितीने उघडली आहे, हे लक्षात येते.
३) फलज्योतिष या स्वरुपाची दुसरी ब्राह्मणी विद्या म्हणजे वास्तुशास्त्र किंवा भ्रामक वास्तुशास्त्र शास्त्रीय पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या वास्तुशास्त्रापेक्षा हे भ्रामक वास्तुशास्त्र पूर्णत: वेगळे आहे, व्यक्तीची दिशाभूल करणारे आहे. व्यक्ती कोणतीही वास्तू बांधताना ती सुखकारक, सोयीची व सुरक्षित असावी, असा स्वाभाविक प्रयत्न करते. मात्र भ्रामक वास्तुशास्त्र विचार करते वास्तू लाभेल कशी, याचा. वास्तूचे दार, खिडकी, पाण्याची जागा, स्वयंपाकगृह, बंगल्याचे फाटक या गोष्टी कशा पद्धतीने असल्या तर वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीची भरभराट होते आणि नसल्या तर तेथे वाटोळे होते, याचे कथित शास्त्र (!) म्हणजे वास्तुश्रद्धाशास्त्र. हा सर्वच पाया उघडपणे दैववाद आणि प्रारब्ध यांना बळकटी देणारा आहे. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी शेजारच्या आंध्र राज्यातून वाजत-गाजत या शास्त्राचे महाराष्ट्रात आगमन झाले. एका नवीन अंधश्रद्धेने वास्तुरचनाकार, बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांचा ताबा घेतला. उत्तम प्रकारे बांधलेल्या वास्तूंची तोडफोड सुरू झाली. या विरोधात समितीने वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक जाहीरनामा प्रस्तुत करणारी एक राज्यव्यापी परिषद पुणे येथे घेतली. वास्तुरचनाकारांच्या मदतीने एक विवेकी वर्ग या कामात समिती बरोबर होता. त्यांच्या सहकार्याने व जयंत नारळीकर यांच्या सहीने वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या विषयातील बुवाबाजी स्पष्ट करणारे अनेक लेख समितीने लिहिले. भ्रामक वास्तुशास्त्र हे डॉ. प्रदीप पाटील यांचे पुस्तकही प्रसिद्ध केले. या विषयाची ही शास्त्रीय बाजू दाखविणारे ते मराठीतील एकमेव पुस्तक आहे. बहुतेक जिल्ह्यात वास्तुशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर भाषणे, परिसंवाद, चर्चासत्रे झाली. या सर्वांमधून वस्तुस्थिती लोकांना समजून आली. यामुळे भ्रामक वास्तुशास्त्राच्या घोडदौडीला नक्कीच आळा बसला. याबरोबरच वास्तुशास्त्रदृष्ट्या अपशकुनी असलेल्या वास्तूत राहण्याचे आव्हानही समितीने स्वीकारले.
४) सत्यशोधकी विवाह ही पद्धत ब्राह्मणी पुरोहितशाहीचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी महात्मा फुले यांनी सुरू केली. यातील वैशिष्ट्य म्हणजे पुरोहिताची गरज लागत नाही. मंगलाष्टके आधुनिक विचाराची असतात. स्त्रीला समतेने वागवण्याचे आश्वासन त्यात दिलेले आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेली हीच मंगलाष्टके म्हणावयास हवीत, अशीही सक्ती नाही. वैशिष्ट्य म्हणजे यातील एक मंगलाष्टक वधूने, एक मंगलाष्टक वराने व एक उपस्थितांनी म्हणावयाचे असते. तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळल्या जाव्यात, अशी महात्मा फुले यांची कल्पना होती. या सत्यशोधकी विवाह पद्धतीचा गाभा कायम ठेवून त्यात कालसुसंगत बदल करून असे विवाह लावण्यास समितीने सुरुवात केली. तेरा वर्षांपूर्वी असा पहिला विवाह समितीने नेवाशाचे कार्यकर्ते डॉ. मच्छिंद्र वाघ यांच्या मुलांचा अमावस्येच्या दिवशी संपन्न झाला. त्याला निळूभाऊ फुले व प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत समितीने हे विवाह लावले. यांची संख्या १६० च्या पुढे जाते. समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी असे विवाह करुन बोले तैसा चाले याची प्रचिती दिली. या विवाह पद्धतीत समितीने काही बदल केले. विचारपीठावर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ठेवली जाते. वधू-वरांच्या बरोबरच अशा आगळ्या वेगळ्या विवाहाला अनुमती देणाऱ्या त्यांच्या माता-पित्यांचा फुलांनी सत्कार केला जातो. नंतर वधू-वरांचा परिचय करून दिला जातो. यानंतर मान्यवरांची पाठिंबा देणारी भाषणे थोडक्यात होतात. नंतर वधू आणि वर शपथ घेतात. एकमेकांच्या गळ्यात हार घालतात व विवाहबद्ध होतात. मंगलाष्टके काही ठिकाणे होतात. जेथे होतात त्या ठिकाणी आवर्जून फुलांच्या पाकळ्या उधळल्या जातात. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही लग्ने शक्य तेवढ्या कमी खर्चात पार पडावीत, असा प्रयत्न समिती करते. तसेच लग्नाचा हा वाचलेला खर्च वधू-वरांच्या नावाने दीर्घकाळच्या मुदत ठेवीत संयुक्तपणे गुंतवला जावा, असाही प्रयत्न समिती करते. म्हणजे हे विवाह सत्यशोधकी बचत विवाह व्हावेत, असा समितीचा प्रयत्न असतो.
५)  प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कुंडलिनी असते. ती योगसाधनेने जागृत करता येते. पाठीत असलेल्या सहा चक्रातून ती वर सरकली आणि टाळूतील बाह्यरंध्रातून बाहेर पडली की, त्या व्यक्तीला सर्व ज्ञान प्राप्त होते, असा कुंडलिनी जागृती ही कल्पना मान्य करणाऱ्यांचा दावा असतो. याचा घाऊक प्रचार निर्मलामाता करतात. त्यांच्या मते, त्यांनी सहजयोग नावाचा साधना करण्याचा प्रकार शोधून काढला आहे आणि अवघ्या दहा मिनिटांत कुंडलिनी जागृत करण्याचे ट्रेनिंग त्यांच्याकडून घेता येते. त्याद्वारे अक्षय्य आनंद, आरोग्य यांची प्राप्ती होते. निर्मलामाता यांच्या या दाव्याला समितीने पुणे, सातारा येथील कार्यक्रमात जोरदार विरोध केला. त्यानंतर अंगापूर (जि. सातारा) येथे निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर निर्मलामातेच्या कथित भक्तांनी हल्ला केला. त्यांना मारहाण केली आणि चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने सातारा येथील कोर्टात त्यांच्यावरच केस दाखल केली. ही केस आठ वर्षे चालली. कार्यकर्त्यांनी तितके दिवस हेलपाटे घातले. यातले काही कार्यकर्ते तर नोकरी करणारे होते. सर्वजण निर्दोष सुटले. यानंतर हायकोर्टामध्ये त्यांनी अपील केले. त्याचाही काही उपयोग झाला नाही. तेवढा त्रास देणे पुरेसे नाही म्हणून की काय, याबाबत नरेंद्र दाभोलकर यांनी जो लेख लिहिला होता, त्यामुळे निर्मलामाताजींची बदनामी झाली, असा कांगावा करत दिल्ली कोर्टात त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. दिल्लीला जाऊन सात-आठ वर्षे तो त्यांनी लढवला. अगदी अलिकडे प्रचंड जाहिरातबाजी करून सातारा येथे निर्मलामातेचा कार्यक्रम जाहीर झाला, त्या विरोधात समितीने जो अभिनव सत्याग्रह केला. त्यामुळे निर्मलामाता यांचे येणे रद्द झाले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र/ (विशेषांक २००५)


‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...