चळवळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चळवळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

गुटखा निर्मूलन हवे




गुटखा निर्मूलन हवे
दाभोलकर, समाजजीवन, कार्यक्रम, विवेकजागर, व्यसनविरोध, चळवळ
लातूर येथील आपल्या समितीच्या राज्य कार्यकारिणीत एक मुद्दा चर्चेला आला. तो असा होता की, आपण स्वत:ला विवेकवादी संघटना मानतो. अंधश्रद्धा विवेकवादाला थेट छेद देतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात आपण लढतो. समितीचे विवेकवादी बनवू इच्छिणाऱ्या संघटनेस एवढ्यावर समाधान मानून चालेल काय? समाजजीवनात आज एकूणच अविवेक फार वाढला आहे. त्या विरोधात वैचारिक भूमिका घ्यावयास हवी. त्याशिवाय विवेकाचे आणि शहाणपणाचे केवळ शब्द लोकांचे समाधान करू शकणार नाहीत. त्यासाठी त्यांच्या जीवनात उपकारक श्रेयस्कर अशी काही कृती विवेकवादी संघटना व व्यक्ती यांनी करावयास हवी; अन्यथा लोकांना विवेकवाद हा फक्त शब्दांचा बुडबुडा वाटेल. यासाठी काय करावे, याची चर्चा आपण आता समितीत सुरू करत आहोत. परंतु खरे तर केवळ समितीच्या कार्यकर्त्यांचा हा प्रश्न नाही. ज्यांना-ज्यांना समाजात काही चांगला बदल घडवावासा वाटतो, योग्य विचार रूजावा, असे वाटते, त्या सर्वांनीच या धडपडीत सामील व्हावयास हवे.

विचाराच्या पातळीवर आणि कृतीच्या पातळीवर असे दोन कार्यक्रम यासाठी आता उपलब्ध होत आहेत.

पहिला कार्यक्रम आहे, धर्मांधताविरोधी प्रबोधन मोहिमेचा. एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन ही समविचारी संघटना साने गुरुजी जन्मशताब्दीच्या निमित्ताने ही मोहीम चालवणार आहे. विवेकजागर हे त्याचे नाव असेल. महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचे विचार आक्रमक प्रबोधनाच्या रूपात पोचवणे असा त्याचा प्रयत्न असेल. याची गरज किती आहे, हे वेगळे सांगायला नकोच. अलिकडे भोपाळ येथे चमत्कारामागील विज्ञान यासाठी भारतीय पातळीवरील एक चर्चासत्र झाले. आपल्यासारखेच कार्य मध्य प्रदेशमध्ये करणाऱ्या सायन्स सेंटर या संस्थेने ते आयोजित केले होते. परंतु त्याला जोडूनच धर्मांधतेविरोधात एक राष्ट्रव्यापी संमेलनही त्यांनी आयोजित केले होते. त्यामध्ये भारतातील अनेक व्यक्ती सहभागी होत्या. सध्या देशामध्ये धर्मांधता वाढविण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक चालू आहेत. अशा वेळी धर्मविषयक व्यापक भूमिका धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व संविधानाचा भाग कसे झाले? त्यामध्ये काय अभिप्रेत आहे? धर्मनिरपेक्षता नाकारल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सोडाच; परंतु लोकाशाही कार्यप्रणाली कशी धोक्यात येते, हे सर्व विषय आता समितीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी महाराष्ट्रभर पोचवण्याची गरज आहे. विविध नामवंत वक्त्यांची व्याख्याने महाराष्ट्रभरातील आपल्या विविध शाखांच्यात घडवून आणण्याची आपली कल्पना होतीच. विवेकजागर अभियान हे त्याच प्रकारचे; परंतु अधिक व्यापक व टोकदार आंदोलन आहे. आपापल्या ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी यामध्ये आवर्जून आणि पुढाकाराने सहभागी व्हावयास हवे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत असतानाच आपण व्यसनविरोधी भूमिका घेत असतोच. अंधश्रद्धा आणि व्यसन दोन्ही विवेकविरोधी असतात, अशी आपली मांडणी असते. व्यसनविरोधी लढाई अत्यंत अवघड आहे. दारूचा खप प्रत्येक दिवशी वाढत आहे. दारूविक्रीतून अधिकाधिक महसूल मिळतो म्हणून शासन दारूविक्रीस प्रोत्साहन देते, परमिट रूम, बिअरबार या धंदेवाल्यांची जोरदार लॉबी सत्तारूढ राजकीय पक्षात असते. बेकायदा दारूविक्रीत खेडेगावातले आर्थिक हितसंबंध आणि पोलिसांचे हातही गुंतलेले असतात. हे सर्व लक्षात घेतले तर दारूबंदीचा लढा जवळपास अशक्य बनतो.

गेल्या १० वर्षांत गुटख्याचे व्यसन पसरले आहे आणि ते तेवढेच घातक आहे. मात्र त्या विरोधात प्रखर आवाज उठला तर संपूर्ण गुटखाबंदी शक्य आहे, असे मला वाटते. एक तर गुटख्याच्या विक्रीपासून मिळणारा महसूल हा अजून तुलनेत बराच कमी आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे थेट हितसंबंध गुटखाविक्रीत गुंतलेले आहेत. गुटख्यामुळे पहिल्यांदाच व्यसन लहान मुले व महिलांच्यात उघडपणे पोचले, याची समाजमनात खंत आहे. पूर्ण गुटखाबंदी झाल्यास बेकायदा गुटखा विक्री करणे अवघड आहे. हे सर्व लक्षात घेता गुटखाबंदीची मागणी पूर्ण होणे तुलनेने शक्य आहे. लवकरच महाराष्ट्रातील निवडणुका येतील. प्रत्येक राजकीय पक्षाने स्वत:च्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास संपूर्ण गुटखाबंदीचे आश्वासन द्यावयास हवे; अन्यथा असे आश्वासन न देणारे पक्षच नागरिकांनी पराभूत करावेत, असे आवाहन आपण करू शकतो व त्याचा किमान परिणाम होऊ शकतो. प्रत्यक्षात यासाठी चळवळ कशी उभारावी? मी मा. अण्णा हजारेंना विनंती केली की, त्यांनी या महाराष्ट्रव्यापी मोहिमेचे नेतृत्व करावे. महाराष्ट्रातून अनेक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे आपापल्या ठिकाणी वातावरणनिर्मिती करतील आणि जनमानस संघटित बनवतील. कृती कार्यक्रम एक कलमी व सोपा आहे. आपापल्या भागात ज्या-ज्या राजकीय पक्षांचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य असतील, त्यांना ही मागणी पटवून देणे. स्वाभाविकच ते आपापल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत या मागणीचा आग्रह धरतील आणि पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात या मागणीचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहतील. समजा त्यांनी नकार दिलाच तर त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून उपोषणाचा सनदशीर मार्ग शिल्लक आहेच. एप्रिलपासून ही मोहीम सुरू होईल. ऑक्टोबरपर्यंत चालेल. महाराष्ट्रातील निवडणुका नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान होणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये कदाचित पक्षांचे जाहीरनामे तयार होऊ लागतील. त्यावेळच्या परिस्थितीवर २ ऑक्टोबरची कार्यवाही ठरेल. परंतु तोपर्यंत तरी उत्साहाने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी आपापल्या कुवतीनुसार यात सहभागी व्हावयास हवे. ज्यांना अशी इच्छा असेल, त्यांनी मला जरूर लिहावे. अधिक तपशील देता येईल.

मुद्दा कोणताही असो; वैचारिक जनजागरणाचा की, गुटखा निर्मूलनाचा त्यातील मूळ असे आहे- अंनिसला अभिप्रेत असलेले विवेकवादी चळवळ विस्तारण्याचे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९९)




शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

रचनात्मक संघर्षाचे शिक्षण




रचनात्मक संघर्षाचे शिक्षण
दाभोलकर, संघर्ष, प्रबोधन, चळवळ, पुस्तक विक्री, प्रशिक्षण शिबीर
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्याख्यानांना, चमत्काराच्या प्रात्यक्षिकांना मिळणारा प्रतिसाद उदंड असतो. त्याही पुढे जाऊन एखाद्या बाबाचा पर्दाफाश करायचा असेल तर काहीजणांचा उत्साह अनावर होतो. भानामतीच्या घटना इतरांना गूढ वाटतात, तर आपल्या कार्यकर्त्यांना ती चांगली संधी वाटते. भूत दाखविणे अथवा कोणत्याही कार्यकर्त्याला भूत लावून दाखविणे, यासाठी संघर्षाच्या पवित्र्यात कार्यकर्ते सदैव सिद्ध असतात. चमत्कारांना द्यावयाचे आव्हान असाच उत्साह निर्माण करते. ही सारी आणि या स्वरुपाची इतर कारणे ही संघर्षाची असतात. त्यामध्ये नाट्य असते, आव्हान असते. बातमी असल्यामुळे प्रसिद्धी असते. समितीची ओळख आज महाराष्ट्राला आहे. त्यामध्ये अंधश्रद्धांच्या विरोधात सतत संघर्षात उभे राहणे, यात समितीच्या लढाऊपणाचा नक्कीच वाटा आहे.

याबरोबरच संघर्षाच्या कार्यक्रमाची एक मर्यादाही जाणवते. एक तर संघर्षाचे विषय सतत असतातच, असे नाही. चळवळ स्थिरावल्यानंतर आता गूढ भानामतीचे प्रकार फारसे आढळत नाहीत आणि आढळले तरी टिकत नाहीत. भुताबाबतचे आव्हान घेऊनही आता सहजासहजी कोणी पुढे येत नाही. चमत्काराचा दावा करणारे बुवा, बाबा, स्वामी, महाराज देखील अपवादानेच दिसतात. बुवाबाजीचे प्रकार घडत असतात व शाखा त्याचा प्रतिकारही करीत असतात.

संघर्ष करण्याचे कार्यक्रम घेण्यात आणखी एक अडचण असते. अनेकदा अंधश्रद्धेचे रूप अप्रकटपणे देवाधर्माशी जोडलेले असते. त्याबाबत किती कठोर प्रहार करायचा व त्याचा परिणाम काय होईल, हे ठरविणे, सांगणे सोपे नसते. मूळ मुद्दा बाजूला राहून भलतेच काही उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे संघर्ष टाळण्याकडे काही कार्यकर्त्यांचा कल असतो. शिवाय एकदा लढाईला तोंड फुटले की, किती वेळ लागेल हे सांगणे शक्य नसते. त्यासाठी हुकमी वेळ, पैसा, धावपळ याचे गणित जमवावे लागते. याबाबतही अनेक अडचणी असू शकतात. या साऱ्याचा परिणाम असा होतो की, चळवळीच्या चमकदारपणाच्या आकर्षणातून आपण चळवळीकडे येतो; परंतु या ना त्या कारणामुळे ती झळाळी राहत नाही. मग कार्य थंडावते, कार्यकर्ते पांगतात.

रचनात्मक कार्य
कुठल्याही चळवळीत लढाईचे, आकर्षणाचे, प्रसिद्धीचे प्रसंग कमीच असतात व असणार. पण ज्यावेळी संघर्षाला सामोरे जावे लागते, त्यावेळी हुकुमी उपलब्ध असा असावा म्हणून शक्तिसंचय करावा लागतो. तो करता येतो रचनात्मक कार्यामधून. शांत, संथ, झळाळी नसलेले; पण उपयुक्तता असलेले हे असे कार्य असते. त्याबाबत जेवढा उत्साह, चिकाटी, कल्पकता, सातत्य दाखवावयास हवे, तेवढे दाखविले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

खरे तर भाषणे देणे हा कार्यक्रम शुष्क रचनात्मक नाही. समोरच्या श्रोतृवर्गाचा प्रतिसाद तुम्हाला ताबडतोब तुमच्या श्रमाचे फळ देतो. परंतु अर्थातच सन्मानाने मानधनासह निमंत्रण येईल, अशी वाट बघत बसले तर संपलेच. अनेक मोठ्या संघटनांचे कार्यकर्ते आजही स्वखर्चाने झपाटल्याप्रमाणे वेळ देऊन आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जिवाचे रान करीत असतात. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मूलत: प्रबोधनाची चळवळ आहे. व्याख्यानाचे निमंत्रण मिळविणे ही बाब आता चळवळीच्या प्रभावाने अवघड राहिलेली नाही. खरा प्रश्न आहे, व्याख्यानाचा. रचनात्मक कार्यासाठी स्वत:च्या पुढाकाराने स्वत:चा वेळ देण्याचा.

आज अनेकविध रचनात्मक कामे संघटनेमार्फत निर्माण झालेली आहेत. माझा मुद्दा आहे तो असा की, ही रचनात्मक कामे संघटनेतील क्रियाशील कार्यकर्त्यांचा स्थायी भाव झालेली नाहीत. पुस्तकविक्री हे एक अतिशय उपयुक्त रचनात्मक हत्यार आहे. एका बाजूला समितीचा विचार त्यामुळे सर्वदूर जातो, तर दुसऱ्या बाजूला संघटनात्मक कामासाठी हुकमी निधी पुस्तकविक्रीच्या माध्यमातून उभा राहतो. मात्र यासाठी पुस्तक जवळ ठेवण्याची, इतरांना दाखविण्याची, त्याबद्दल बोलण्याची, पुस्तक विकत घेण्याचा आग्रह करण्याची वृत्ती हवी. आज संघटनेत असे आढळत नाही. सत्यशोध प्रज्ञा परीक्षा हे असेच एक रचनात्मक कार्य आहे. त्याचे प्रशिक्षण शिबीर घेतले की, आपले काम संपले, अशी जाणीव अनेक कार्यकर्त्यांच्यात आढळते. यामुळे शिबिराचा पाठपुरावा करून शिक्षकांना आपल्या शाळेत केंद्र सुरू करण्यासाठी उद्युक्त करणे, हे घडत नाही. मग स्वत:च्या शाखेमार्फत किमान एक-दोन शाळांत सत्यशोध प्रज्ञा परीक्षेचे केंद्र चालविणे तर दूरच. खरे तर याही उपक्रमांतून विद्यार्थी अथवा तरुणांशी संपर्क आणि शाखेला काही निधी याचा लाभ होऊ शकतो. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पात आता आपण व्यसनमुक्ती, सर्पविज्ञान, महिला आरोग्य असे छोटे-छोटे अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर हे तर अधिकच गरजेचे झाले आहे.

कोणत्या कार्यकर्त्यांची उभारणी हवी?
याचे भान विसरले की, समितीच्या कामाला प्रासंगिक उत्साही उपक्रमाचे स्वरूप प्राप्त होते. आज अन्य कोणीही तेवढे करीत नाही. त्यामुळे त्या कार्याबाबत कौतुकही होते; परंतु यामधून ना संघर्षासाठी शक्तिसंचय होतो ना रचनात्मक कामाच्या भक्कम पायावर संघटनात्मक उभारणी होते. ही त्रुटी असूनही आज समितीचे कार्य तरून जाते, याचे कारण काहीजण खूप अधिक काम करतात आणि एकूण फायद्याची बाजू वरचढ दाखवतात. जसे-काही व्यक्ती, शाखा निष्ठेने मोठ्या संख्येने आपली प्रकाशने विकतात आणि समितीचा प्रकाशन व्यवसाय फायद्यात ठेवतात.

कुठल्याही संघटनेत रचनात्मक संघर्षाचे हे संतुलन कसे राखलेले असते, यावरच प्रगतीची वाटचाल अवलंबून असते. मला तरी आज याबाबत संघटनेची स्थिती समाधानकारक वाटत नाही. कामाची यापुढची झेप घ्यायची तर ही उणीव दूर करावयास हवी. मोजक्या संघर्षात असो; पण ठामपणे उभे राहतील आणि संथपणे, सातत्याने प्रसिद्धिविन्मुख राहून रचनात्मक कामाला स्वत:ला जोडून घेतील, अशा कार्यकर्त्यांची उभारणी हे आजचे अग्रहक्काचे काम आहे. हे कसे घडून येईल? आजची नेमकी स्थिती याबाबत काय आहे आणि ती कशी पालटेल, याबाबत मी सहकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर १९९७)




बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

प्रतिसाद द्याल



प्रतिसाद द्याल
दाभोलकर, व्यापक परिवर्तन, चळवळ, जनआंदोलन   
५ जूनला अण्णा हजारे यांनी बोलाविल्यामुळे राळेगणसिद्धी येथे गेलो होतो. अण्णांचा व माझा थोडाबहुत परिचय असला, तरी भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीच्या संदर्भात ही पहिलीच भेट होती. डॉ. श्रीराम लागू व मी पुण्याहून एकत्रितच गेलो. माझा जाण्याचा हेतू चळवळ समजून घेणे हा होता आणि डॉक्टरांना व मला दोघांनाही या चळवळीबाबत स्वत:च्या मर्यादा सांभाळून अण्णांना मदत करता येणे शक्य आहे काय? त्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत, याबाबत चर्चा करण्यात रस होता.

मेळाव्यासाठी सुमारे ४०० जण महाराष्ट्रभरातून आलेले होते. केवळ एका पत्राने स्वखर्चाने इतक्या जणांनी लांबलांबून येणे हे चळवळीचे आवाहन सर्वदूर पोचल्याचे एक लक्षण होते. विश्वस्त मंडळातील अण्णा व त्यांचे अन्य निवडक सहकाऱ्यांची (बाबा आढाव, गोविंदभाई श्रॉफ, पुष्पाताई भावे, ग. प्र. प्रधान, अविनाश धर्माधिकारी) एक स्वतंत्र बैठक झाली. त्यात देखील काही काळ मी सहभागी होतो.

मेळाव्यात मी बोलणार नव्हतो. पण नाव पुकारण्यात आले म्हणून मी बोललो. माझी व्यक्तिगत मते मी मांडली. मेळावा संपल्यानंतर अनेकजण भेटले. महाराष्ट्रात सतत फिरत असल्याने आणि अनेक संघटनांशी संबंधित असल्याने आलेले बरेच जण स्वाभाविकपणे ओळखत होते. पण आश्चर्य म्हणजे त्यातील बऱ्यापैकी संख्या ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणाऱ्या किंवा केलेल्या कार्यकर्त्यांची होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य हे प्रामुख्याने अंधश्रद्धा दूर करण्याचे आहे, हे खरेच तरी तेवढेच आहे, असे आपण कधी मानले नाही. व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे, हे आपण आपले काम मानलेच आहे. आपल्या समितीतील काही कार्यकर्ते अन्य पक्षसंघटनांत काम करतात. तसेच त्यापैकी काहींनी भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलनात केले तर ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच. खरा प्रश्न आहे तो यापेक्षा थोडा वेगळा आणि त्याचा निर्णय आपल्याला आज ना उद्या घ्यावाच लागेल.

समितीचे संघटन आज महाराष्ट्रात आता बऱ्यापैकी उभे आहे. समिती स्वत:ला पुरोगामी चळवळीचा भाग मानते, हेही सर्वांना माहीत आहे. स्वाभाविकच अन्य जनआंदोलनातील प्रश्न ज्यावेळी ऐरणीवर येतात, त्यावेळी समितीचे कार्यकर्ते किंवा एक संघटना म्हणून समिती काय करणार, असा प्रश्न विचारला जातोच. विशेषत: ही जनआंदोलने जेव्हा राजकीय पक्षाची नसतात, त्यावेळी हा प्रश्न अधिक जोरात विचारला जातो. अलिकडच्या काळातील अशी दोन जनआंदोलने म्हणजे एन्रॉनच्या प्रश्नावर मेधा पाटकर यांनी सुरू केलेले आंदोलन आणि दुसरे अण्णा हजारेंचे. एन्रॉनच्या प्रश्नावर एप्रिलअखेरपासून सत्याग्रहाने उचल खाल्ली. त्यानंतरच्या काळात आपण ठरविले असते, तर सत्याग्रहींची एक छोटी तुकडी आपण त्या चळवळीत उतरवू शकलो असतो आणि आपला भातृभाव सिद्ध करू शकलो असतो. अण्णा हजारे उपोषणाला बसले त्याही वेळी आपण लाक्षणिक पाठिंब्यासाठी एक दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपोषण करू शकलो असतो. अर्थात, ही पाठिंब्याची क्षमता आहे म्हणून केवळ तो देणे असे त्याचे स्वरूप असता कामा नये. काही महत्त्वाचे प्रश्न त्याच्याशी जोडलेले आहेत आणि त्याबाबत सगळ्यांनी; कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी मोकळेपणाने मला लिहावे, अशी विनंती आहे. त्यामुळे संघटनेची वाटचाल अधिक अचूक होऊ शकेल. सहजपणे उपस्थित होणारे मुद्दे असे-

१)    ज्या चळवळीत आपण प्रतीकात्मक सहभागी होणार, त्या चळवळीबरोबर आपले संपूर्ण मतैक्य नसणार, हे उघड आहे. एक तर ते प्रश्न गुंतागुंतीचे व मतभिन्नतेचे आहेत आणि दुसरीकडे समितीच्या कार्यकर्त्यांच्या विचारमंथनात ते आलेले नाहीत. वृत्तपत्रीय बातम्यांतून आणि पुरोगामी चळवळीशी संबंधित व्यक्ती म्हणून कार्यकर्त्याला या प्रश्नाची तोंडओळख आहे, एवढेच. अशा परिस्थितीत कोणत्या चळवळी आणि त्यातले कोणते कार्यक्रम याची निवड करण्यात यावी? त्याचे निकष काय असावेत?
२)    समितीचे काम विस्तारत आहे. संघटनेत वाढ, उपक्रमात वाढ आणि विचारात सकसपणा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये असलेला कार्यकर्ता आधीच गुंतून पडलेला असतो. अशावेळी आणखी जबाबदारी घेणे शक्य नाही. पाठिंबा जाहीर करावा; पण कृतीच्या क्षेत्रात उतरू नये.
३)    समितीच्या कामाबद्दल एक आक्षेप मित्रमंडळींच्याकडूनच असा येतो की,  तुम्ही मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात इतके कसे गुंतून पडलात? आपल्या आजूबाजूस महत्त्वाचे जीवन-मरणाचे लढे सुरू आहेत. त्यात  काही योगदान देणार की नाही?
४)    आपला सहभाग एकतर्फीच असावा की संबंधित संघटनेने आपल्या कामाला अशीच मदत द्यावी, या देवाणघेवाणीवर अवलंबून असावा?
५)    सहभाग घ्यावा तो समिती म्हणून संघटित करावा. संबंधितांना याची कल्पना द्यावी; परंतु प्रत्यक्ष सहभाग हा समितीचे नाव न वापरता द्यावा.       त्यामुळे समितीच्या कार्याचे अनेक हितचिंतक त्यांच्या मनात समिती आणखी काय-काय करू लागली (किंवा विनाकारण कशाकशात नाक खुपसू लागली?) ही प्रतिक्रिया उमटणार नाही, असे करणे योग्य की अयोग्य?
६)    आपण बरे, आपले बरे या पद्धतीने समितीचे काम जोमात सुरू ठेवावे. बाकीच्या घडामोडीत लक्ष घालण्यास आपले वेळ, श्रम व पैसे वाया घालवू नयेत.
वरील मुद्दे आहेत विचारार्थ. यापेक्षा वेगळे काही आपणांस सुचू शकतील. आपण त्यावर जरूर लिहावे.

संघटनेचा विस्तार आणि महिलांचा अधिक सहभाग या पहिल्या दोन्ही लेखांना प्रतिसाद आला नाही. हे फारसे चांगले लक्षण नाही. सततचे विचारमंथन, त्यातून नव्या कल्पनांचा स्वीकार आणि त्यामधून संघटनेसाठी वाढते बळ आणि पाठिंबा मिळवणे, हे कुठल्याही चळवळीला वर्धिष्णु राहण्यासाठी आवश्यक असते. आपण आता या टप्प्यावर आलो आहोत आणि म्हणूनच आव्हान म्हणा अथवा कर्तव्य, आपण ही जबाबदारी स्वीकारायलाच हवी.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जुलै १९९७)

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

सहचिंतन



सहचिंतन 
दाभोलकर, संघटन, चळवळ
भ्रमंती हे सदर बराच काळ सुरू होते. महाराष्ट्रातून चळवळीच्या कामासाठी हिंडत असताना भेटणारे लोक, घडणाऱ्या घटना, कार्यकर्त्यांचे कमी-अधिक, जाणवणाऱ्या बाबी, येणारे विचार यांचे धागेदोरे तुमच्यापर्यंत पोचवावे, ही यामागील कल्पना होती.

समितीचे कार्य, चळवळीकडून लोकांच्या अपेक्षा वाढत्या आहेत. महाराष्ट्रातला पहिला समाजकार्य पुरस्कार मिळाल्यामुळे मान्यतेच्या दृष्टीनेही चळवळ पुढच्या टप्प्यावर गेली आहे. अशा वेळी चळवळीच्या कामाबाबत सहचिंतनाची गरज फार जाणवते. हे चिंतन घटापटादी वैचारिक चर्चेसाठी नाही. (त्याचीही गरज असते व त्यासाठी स्वतंत्र प्रयत्नही लागतील; पण तो भाग वेगळा.) तर समितीचे प्रत्यक्ष कार्य कसे चालले आहे, त्यावर समितीचे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याशी प्रत्यक्ष सूचनांच्या द्वारे केलेले आदानप्रदान असे त्याचे रूप मला अभिप्रेत आहे.

शाखांचा विस्तार, महिलांचा संघटनेत प्रभावी सहभाग, समविचारी संघटनांशी संपर्क, भारतभर समितीच्या कार्याचा विस्तार, निधी संकलन, चळवळीचे संस्थीकरण, युवकांना कार्यात अग्रहक्काने संधी देण्याची यंत्रणा, असे अनेकविध विषय समोर आहेत. शंभराच्या आसपास अडलेल्या शाखांच्या संख्येची वाढ कशी होईल? महिलांचा कायमस्वरुपी सहभाग मिळविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचे भान बाळगावे लागेल? भारतातील अनेक राज्यात आज समितीच्या कार्याबद्दल आस्था, कुतूहल आढळते. त्याला संपर्कात आणणे, फलदायी बनवणे हे कसे करता येईल? निधी संकलन ही नेहमीची डोकेदुखी. त्याची यंत्रणा कशी हवी? चळवळीचा जोर कमी-अधिक होत राहणारच. अशा वेळी चळवळीतून मिळालेली ताकद टिकवून धरणारे रचनात्मक काम कसे हवे? युवकांच्या शक्तीवरच कोणतीही संघटना मोठी होते. त्यांना अधिकाधिक संधी संघटनेत कशी देता येईल? विचार करावयास लागल्यावर असे अनेक मुद्दे पुढे येतात.

यापैकी एक मुद्दा एका वेळच्या अंकात टिपण स्वरुपात असेल. अंक ५ पर्यंत वाचकांना पोचतो. अंक वाचणारे कार्यकर्ते असोत, चळवळीचे सहानुभूतीदार असोत वा नुसतेच वाचकही; ज्यांना-ज्यांना असे वाटते की, त्यांना याबाबत काही म्हणावयाचे आहे, त्यांनी त्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत त्याबाबतच्या आपल्या कल्पना, सूचना, मते मला कळवावीत. त्या सर्वांचा आधार व आढावा घेत हे सहचिंतन सिद्ध होईल. त्या सर्वांची नावे ही लेखाच्या खालील येतीलच.
संघटना विस्तार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून काम सुरू झाले, त्यावेळी एकत्र आलेल्या शाखा होत्या १५-१६. हळूहळू वाढत त्यांची संख्या ८०-८५ पर्यंत पोचली. संपर्क शाखा धरून ती संख्या शंभराच्या आत-बाहेर होईल. गेली चार वर्षे जवळपास ही संख्या कायम आहे. काही नव्या शाखा उभ्या राहतात; काही जुन्या नावापुरत्या उरतात. महाराष्ट्रातील या शाखांची संख्या दुप्पट करण्याचा आपला संकल्प आहे. या वाढीसाठी काय करावे? कामाची कोणती पद्धत उपयोगी ठरेल/ती कशाप्रकारे वापरावी लागेल? पुणे शाखेने एक वेगळा मार्ग आखला आहे. त्यांनी स्वत:च निधीची तरतूद केली आहे. व्यवस्थित मानधन देऊन त्यांनी पूर्ण वेळ कार्यकर्ता नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ता एम.एस.डब्ल्यू.ची परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल. रीतसर मुलाखती, लेखी परीक्षा यामधून त्याची निवड होईल. सत्यशोध परीक्षा सर्व तालुक्यात घेणे, तालुक्या-तालुक्यात शाखा उभ्या करणे हे कार्य तो करेल. दुसरा मार्ग सातारा शाखेचा. त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आपापल्या भागात घरोघरी फिरून लोकांना हॅन्डबिले वाटली. चळवळीचा विचार ऐकण्यासाठी त्यांना त्याच भागात एकत्र केले. यातून वार्तापत्राचे काही वर्गणीदार मिळाले, काही जणांनी समितीशी अधिक संपर्क वाढवण्याची इच्छा प्रकट केली. आपापल्या ठिकाणी वा सर्व ठिकाणी उपयोगी पडू शकतील, असे या स्वरुपाचे आणखी कोणकोणते मार्ग तुम्हाला सुचतात?

लोकांना एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आपण जसा मांडतो, त्याचे आकर्षण आहे. दुसऱ्या बाजूला मनात अनेक आशंका आहेत. तिसरीकडे प्रत्यक्षात कृती करताना जी ओढाताण होईल, त्याची भीती आहे. शंका दूर व्हाव्यात, सहभागी होण्याची इच्छा वाढावी, यासाठी लोकमानसाला साद घालण्याचा उपयुक्त शक्यतो अचूक मार्ग कोणता? सप्रयोग व्याख्याने? शिबिरे-किती दिवसांची? अनौपचारिक गप्पा? यामधून अधिक वाढणारे आकर्षण हे प्रत्यक्ष संघटित व्हावे, यासाठी प्रयत्न कसा करावा?

महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीला एकूण मरगळ आहे (असे अनेकांना वाटते), अशावेळी संघटना बांधणीच्या आपल्या अपेक्षाही माफकच हव्यात, हे खरे काय? माफक म्हणजे किती? तीन अथवा पाच जणांचा गट एखाद्या शहरात असणे आणि त्यांनी उपक्रम साजरे करणे (वर्षातून तीन-चार) एवढे पुरेसे आहे की, संघटनात्मक नियमितता शिस्त आवश्यक आहे? समिती उपक्रमाच्या पातळीवर राहिली तर बोलबाला कमी होत नाही (कारण तो नेहमी उपक्रमाद्वारेच होत असतो); पण संघटनात्मक ढिलेपणाने प्रभाव मात्र मर्यादित होतो. आपल्यासारख्या विषयावरच्या संघटनेत हे अटळ आहे की, आपण ही पळवाट शोधतो आहोत?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विस्तार, प्रभावक्षेत्र याची स्वाभाविक मर्यादा काय? प्रत्येक तालुक्यात एक शाखा (पाच-सहा जणांचा एक गट) ही कमाल मर्यादा की किमान दहा हजार वस्तीच्या गावापर्यंत पोचणे शक्य आहे, अशा शाखांना अनेक मर्यादा पडतात. त्यांचा उत्साह, काम थंडावते. असे घडू नये म्हणून संघटनांतर्गत काय यंत्रणा उभी करता येईल? या सगळ्यासाठी वेळ द्यावा की, ठळक लक्षवेधक, धडाकेबाज कार्यक्रम घेत राहून संघटनेचे आकर्षण सतत जागते आणि नाव चमकते ठेवावे, विचारांचा एक दरारा उभा करावा? कोणत्या मार्गाने संघटना चालवावी? या दोन्ही प्रकाराचा समन्वय साधावयाचा, ही कल्पना शक्यता आहे की, कल्पनाविलास?

एक ना अनेक प्रश्न. तुमच्या संघटनेसाठी तुम्हीच विचारा, उत्तरेही तुम्हीच शोधा.

कामाची डायरी-काही नोंदी
ता. ३० मार्च डॉ. लढ्ढा पती-पत्नी लिखित आरोग्य आणि अंधश्रद्धा या पुस्तकाचे; तसेच डॉ. प्रदीप पाटकर लिखित भूतबाधा-मानसिक आजार या पुस्तकांचे पुणे येथे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते प्रकाशन. डॉ. बाबा आढाव यांची विशेष उपस्थिती. पुस्तक प्रकाशनानिमित्त जाहीर कार्यक्रम ता. ३१ मार्च रोजी शेवगाव (जि. नगर), व पनवेल (जि. रायगड) येथे ता. २४ एप्रिल रोजी झाले. ता. १६ मार्च - गोवा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील समितीच्या कामाशी संबंधित कार्यकर्त्यांची कामे वाढविणे व नाणीजच्या नरेंद्र महाराजांच्यावरील कारवाई संबंधात सावंतवाडी येथे बैठक. ५० जणांची उपस्थिती. सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे कार्य संयुक्तपणे वाढविण्याचा निर्णय.

ता. ३१ मार्च - पाथर्डी (जि. नगर) येथील शाखेचे नरेंद्र दाभोलकरांच्या हस्ते उद्घाटन. बाबा आरगडे, मच्छिंद्र वाघ यांचे सप्रयोग व्याख्यान.

ता. ६ एप्रिल - मराठवाडाव्यापी भानामती प्रबोधन मोहीम संयोजनाची बैठक लातूर येथे, चाळीस जणांचा सहभाग (तपशील अंकात अन्यत्र)

ता.१३ एप्रिल - वार्तापत्र संपादक मंडळाची बैठक. दिवाळी अंकाची तयारी सुरू- सत्यशोध प्रज्ञा संयोजन, महाराष्ट्रव्यापी बैठक. पुढील वर्षाच्या संयोजनाचा तपशील ठरवला.

ता.२० एप्रिल -रत्नागिरी शाखेचे उद्घाटन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील कार्यकर्त्यांची दुसरी बैठक.

ता.२६, २७ एप्रिल - बुवा कसा पकडावा? याबाबत जिल्हा प्रतिनिधींचे शिबीर सातारा.

ता.१५, १६ एप्रिल - उमरी पोहरा (जि. अकोला) येथे बंजारा समाजाच्या यात्रेत ३५ ते ४० हजार पशुबळी होतात. त्याविरोधात यात्रेत प्रबोधन सत्याग्रह युवा बंजारा दल व कृषी गोसेवा संघ मालेगाव यांच्या सहकार्याने.

ता. १३, १४ एप्रिल - मुंबई (गोरेगाव) येथे प्रशिक्षण शिबीर

ता. ७ एप्रिल -धुळ्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. हिराजी पाटील यांचा अमृतमहोत्सवी नागरी सत्कार.

ता. २८ मार्च, २५ एप्रिल - सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अंधश्रद्धा व व्यसनविरोधी विशेष मोहीम समाज संजीवन दिंडी या नावाने. कार्यक्रमांना महिलांचा मोठा सहभाग.

ता. ३०, ३१ मे व १ जून - राज्य कार्यकारिणी शांतीवन-रायगड.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९७)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...