अभियान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभियान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० जानेवारी, २०१८

आता निर्णायक लढाई हवी



आता निर्णायक लढाई हवी
दाभोलकर, कायदा, अपप्रचार, अभियान, माहिती पुस्तिका
पावसाळी अधिवेशनात आश्वासन मिळूनही जादूटोणाविरोधी कायदा झाला नाही. यामुळे मला वेदना झाली. आपले कार्य किती कठीण आहे, याचीही जाणीव झाली. त्याबरोबरच हे आता करावयाचेच, ही जिद्द आणखी वाढली. कायदा करण्याचे आश्वासन स्पष्टपणे मिळाले होते. त्याबाबत काय झाले, असं मला वाटते. यासाठीचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र याच अंकात छापले आहे. त्यावरून थोडी अधिक कल्पना येईलच. मात्र आता पुढे काय करावे, यासाठी विचारार्थ हे लेखन करत आहे. कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी, पाठीराख्यांनी याबाबतची आपली मते मला जरूर कळवावीत. राज्य कार्यकारिणीला यासंदर्भात निर्णय घेताना ती उपयोगी ठरू शकतील.

१)    यापुढे कायदा करण्याबाबतची ही लढाई आता निर्णायकच करू, या जिद्दीने लढवावयास हवी.
२)    शासनाला म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना कायदा करण्याची प्रामाणिक इच्छा आहे, असे मला वाटते. मात्र त्यांच्या प्राधान्यक्रमाचा तो विषय नाही. कायद्याबाबत अजूनही अपप्रचार सुरू आहे. तो अपप्रचारच आहे आणि त्यात काहीही तथ्य नाही, हे शासनाला पुरते ठाऊक आहे. परंतु या दबावाखाली कायद्याची वाटचाल आस्ते कदम चालू आहे. आता जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे शासनाची मानसिक दोलायमानता आणखी वाढेल. हे सर्व लक्षात घेता होणारा कायदा हा महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल पुढे नेणारा आहे, ही चांगली समाजहिताची गोष्ट आम्ही केली आहे, अशा ताठ मानेने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी निवडणुकीला लोकांसमोर या कायद्याच्या संदर्भात जावे, असे वातावरण निर्माण व्हावयास हवे. सत्तारूढ पक्ष हे करेल यासाठी प्रयत्न करूच; परंतु अन्यथा आपली जबाबदारी म्हणून हे काम आपण करावयास हवे.
३)    कायदा होण्याबाबत शासनावरील दबाव कायम ठेवण्यासाठी आपण आतापर्यंत अनेक उपक्रम, मोहिमा राबविल्या; मात्र कायद्याची गरज, त्याची उपयूक्तता, यातील तरतुदी, त्यावरील आक्षेप, त्याची उत्तरे हे थोडक्यात; परंतु थेटपणे, नेमकेपणे व स्पष्टपणे महाराष्ट्रात सर्वदूर पोचविणारी प्रभावी मोहीम आपण चालविलेली नाही. कायद्यातील अंधश्रद्धा मानलेली गेलेली कलमे फक्त सांगण्यात आली. हे खूपच अपुरे आहे व होते.
४)    ही त्रुटी दूर करण्यासाठी वरील सर्व बाबींची माहिती देणारी एक पुस्तिका काढली जावी. २४ पानांत ती निघू शकेल. सर्व आमदारांना एन. डी. पाटलांच्या सहीने ती पाठवावी. या पुस्तिकेची किंमत प्रत्येकी रु. फक्त दोन ठेवण्यात यावी. सर्व कार्यकर्त्यांनी किमान ५० पुस्तिका आपल्या मित्रांना, ऑफीसमध्ये वा इतरत्र वाटाव्यात वा विकाव्यात. २५ हजार पुस्तिका विक्रीचे उद्दिष्ट ठेवावे.
५)    ही पुस्तिका वार्तापत्राच्या दिवाळी अंकात छापावी का, याचा विचार करावा. या पुस्तिकेतील विविध मुद्दे व आपल्या जिल्ह्यातील विविध अंधश्रद्धेच्या घटना यांच्या आधारे स्थानिक, छोटी वृत्तपत्रे, साप्ताहिके यांना आवर्जून लेख लिहावेत व ते प्रसिद्ध होतील हे पाहावे. ही बाब आतापर्यंत सातत्याने दुर्लक्षिली आहे. मोठी वृत्तपत्रे लेख छापतील याच्यामागे राहू नये. त्यांच्या स्थानिक आवृत्तीने लेख छापला तरी पुरेसे आहे.
६)    शक्य तेवढ्या ठिकाणी पुरेशा तयारीने कायद्याबाबत जाहीर भाषणे घ्यावीत. सत्तारूढ पक्षाचे आमदार, जबाबदार अधिकारी यांना अध्यक्ष करावे. कायदा त्यांचा आहे हे त्यांना व लोकांना समजावयास हवे.
७)    राज्य नेतृत्वाने राज्यव्यापी दौरा आयोजित करून कायद्याची उपयुक्तता व गरज पटवून द्यावी. स्थानिक चॅनेलवर त्या दौऱ्याच्या वेळी प्रश्नोत्तरे वा आमने-सामने असे कार्यक्रम घडवून आणावेत. ते शक्य नसल्यास त्याबाबतची एक व्ही.सी.डी. समितीनेच तयार करावी व ती स्थानिक केबलना द्यावी.
८)    वाचकांचा पत्रव्यवहार हे लोकजागृतीचे एक मोठे साधन आहे. तेव्हा कायद्याच्या बाजूने अशी पत्रे वाचकांच्या पत्रव्यवहारात सतत येतील, असा प्रयत्न सजगपणे करावा.

वरील स्वरुपाच्या प्रबोधन मोहिमेबरोबरच कायद्याच्या मागणीचा दबाव कायम ठेवण्यासाठी पुढील उपाय करावेत.
१)    आपापल्या भागातील मान्यवरांची पत्रे मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांच्या नावाने पाठवावीत.
२)    चौकात कायद्याच्या मागणीचा मोठा बॅनर करून थेट त्याच्याखाली पाठिंब्याच्या शेकडो सह्या घ्याव्यात.
३)    भाजपा, शिवसेना वगळता अन्य सर्व पक्षांचा कायद्याला पाठिंबा आहे. या पक्षांच्या नेत्यांची व प्रवक्त्यांची पत्रे हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना पाठविली जातील हे पाहावे. दिवाळीनंतर या अभियानास शिस्तबद्धपणे प्रारंभ करावा व १२ डिसेंबरला नागपूर अधिवेशन चालू होते, तोपर्यंत हे अभियान वाढत्या तीव्रतेने चालवावे.

हे अभियान केवळ ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी चालवावयाचे नसून वार्तापत्राचे जे-जे वाचक यात सहभागी होऊ इच्छित असतील, त्यांचा सहभाग मिळवावा. अशा वाचकांनी वार्तापत्र कार्यालयात त्यांच्या अनुमतीचे पत्र पाठविल्यास त्यांना सर्व तपशील पाठविला जाईल.
. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २०११)

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी



मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी
दाभोलकर, व्यापक परिवर्तन, अभियान, संघटन, पुस्तक विक्री, जनसंवाद
कोल्हापूरला डॉ. श्रीराम लागूंच्या सोबत कार्यक्रमाला गेलो होतो. रात्री कॉ. गोविंद पानसरे यांच्याबरोबर गप्पा झाल्या. पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस आहेत. कम्युनिस्ट संघटनेत हे पद त्या-त्या पातळीवरील सर्वोच्च असते. पानसरे हे चळवळीचे ज्येष्ठ मित्र आहेत. बोलताना त्यांनी आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, ‘खरे सांगू, तुमची ही चळवळ मी गेली काही वर्षे पाहत आहे, ऐकत आहे; पण त्याकडे माझे फारसे लक्ष नव्हते. यावे असेही वाटले नाही; पण गेल्या दोन वर्षांत मला लक्षात आले की, चळवळ अंधश्रद्धेविरुद्ध चालवीत असला तरी तुम्ही भाषा बोलत आहात व्यापक परिवर्तनाच्या चळवळीची आणि ती मनापासूनची आहे; म्हणून मला तुमच्या कार्यात आस्था आली. समितीच्या कामाला व्यापक समाजबदलाच्या कामाचा भाग बनवण्याच्या आपल्या प्रयत्नाची ही उचित नोंद आपल्याला समाधान देणारी वाटावयास हवी.

याच विचाराचा एक भाग म्हणून आपण लढा नव्या स्वातंत्र्याचा, बेड्या तोडू गुलामीच्या हे अभियान घेत आहोत. त्यामागचा विचार व त्याबाबतचा व्यवहार हा दोन्ही चळवळीची बिरादरी वाढवण्यास उपयुक्त आहे. नगर जिल्ह्यात ता. २४ ते २८ हे अभियान प्रथम चालेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबरच, स्वातंत्र्य सैनिकांची संघटना, कामगार संघटना, युवावर्ग त्यामध्ये सहभागी होत आहे. ज्यासाठी स्वातंत्र्य मिळाले, त्यापेक्षा काही विपरीतच देशात घडत आहे. व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, फुटीरता, धर्मांधता जनजीवनात वाढते आहे, याची खंत स्वातंत्र्य सैनिकांना आहे. नवे आर्थिक धोरण हे बरोबर की चूक, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यामुळे लोकांच्या समोर प्रसारमाध्यमातून सादर होणारे बेबंद चंगळवादी जीवन हे निश्चितच घातक आहे. सरळपणे अर्थार्जन करून ते जीवन लाभणे केवळ अशक्य; मग भ्रष्टाचार वा दैववाद याचा आश्रय माणसे घेऊ लागली आहेत. अंधश्रद्धा वाढवण्याचा उद्योग राजकारणी लोक, शासन, प्रसारमाध्यमे करीत आहेत. गुलामगिरीची ही विविध रूपे आहेत. स्वातंत्र्यसैनिक राजकीय गुलामगिरीविरुद्ध लढले, कामगार लढू इच्छितो मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची धडपड आहे. या साऱ्यांनी आपली बिरादरी एकच आहे, हे ओळखून खांद्याला खांदा भिडवण्यास नको काय? ‘लढा नवा स्वातंत्र्याचा ही या दृष्टीने चांगली सुरुवात आहे. आपण आपापल्या ठिकाणी प्रत्यक्ष कामातून ही बिरादरी बळकट करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.

संघटनेच्या आघाडीवर या महिन्यात...
चळवळ सशक्त, मजबूत करावयाची तर संघटनाही तशीच हवी. संघटना तशी निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हवा. क्रियाशील कार्यकर्त्यांचा, सामान्य सभासदांचा, वार्तापत्र वर्गणीदारांचा आणि वार्तापत्राचे केवळ वाचक असणाऱ्या हितचिंतकांचा देखील. हा सहभाग कसा असावा, याचे एक वेळापत्रकच आपण तयार केले आहे.

हा अंक तुम्हाला पोचेल, त्यावेळी आपला पुस्तक विक्री पंधरवडा सुरू झाला असेल. १ ते १५ ऑक्टोबर हा त्याचा कालखंड. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महाराष्ट्रात स्वतंत्र चळवळ म्हणून अलिकडेच सुरू झाले. दलित चळवळ जशी दलित साहित्य घेऊन आली, तसे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू झाल्यावर या विषयाची पुस्तके मोठ्या प्रमाणात बाजारात आली. आपल्या समितीने देखील गेल्या तीन वर्षांत मिळून दहा पुस्तके-पुस्तिका प्रकाशित केल्या.
     
पण लक्षात घ्या, आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत. प्रकाशक पुस्तकांच्या प्रती काढतात. एक हजार वा दोन हजार आणि त्या खपतात दोन-तीन वर्षांत, आपल्याला हे परवडणारे नाही आणि महाराष्ट्रव्यापी संघटनेला शोभणारेही नाही.
     
आपली पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली गेलीच पाहिजेत. त्याची अनेक कारणे आहेत. एक तर आपण काही सर्वदूर पोचू शकत नाही. पण पुस्तके अनेकांच्या हातातून जातात. ठिकठिकाणी लोकांच्या मनात विचाराचे बीज टाकत जातात. चळवळीला हे खूप उपकारक ठरते. पुस्तके विकताना अनेकांशी संवाद होतो. चळवळीबद्दलचे जनमानस अधिक चांगल्या प्रकारे समजते. कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना एक कृती कार्यक्रम मिळतो. आपल्या पुस्तकांच्या किमती फारच माफक आहेत आणि ती विकत घ्या, असे सांगायला आपण तोंड उघडले तर लोकांचा हात विषयाच्या उत्सुकतेने, चळवळीच्या प्रेमापोटी, कमी किमतीमुळे-कारण कोणतेही असो; त्याच्या खिशात जातोच, असा अनुभव आहे.

तेव्हा १५ ऑक्टोबरपर्यंत; पण उशिरात उशिरा ऑक्टोबरअखेर क्रियाशील सचिव यांच्याकडून रोखीनेच घ्यावयाची. स्वत:चे शंभर रुपये घालायचे ते शाखा पातळीवर एकत्र करून वा स्वतंत्रपणे मारुतराव पांगे, ४०, शिवनेरी हौसिंग सोसायटी, अजिंक्यतारा रोड, गोडोली, सातारा. ४१५ ००१ या पत्त्यावर पाठवावयाचे. संघटनेच्या पोस्टेज खर्चाने, सवलतीच्या दरात पुस्तके आपल्याकडे येतील. पुस्तके विकायला बाहेर पडायचे. ती विकली जातातच, असा अनुभव आहे; परंतु समजा नाहीच विकली गेली तर पुस्तके परत पाठवा. संघटना आपले पैसे परत पाठवेल. पण ही पाळी येणारच नाही. मित्रांच्यात, शाळेत, ऑफिसात पुस्तके सहज विकली जातील. भाषणानंतर लोक हौसेने घेतील आणि वाढदिवस, लग्न अशा वेळी भेट म्हणून पुस्तकेच देण्यास विसरू नका.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९५)

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

बुवाबाजी संघर्षाचा नवा टप्पा



बुवाबाजी संघर्षाचा नवा टप्पा

दाभोलकर, बुवाबाजी, आंदोलन, संघर्ष, विरोध, अभियान
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या दहा वर्षांत अंधश्रद्धांच्या विविध प्रकारांबाबत अनेकविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्या सर्वांत यावर्षी   संघटित केलेले बुवाबाजी संघर्ष अभियान हे व्यापक आहे. या अभियानाची वाटचाल पुढीलप्रमाणे झाली.
अ) ६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या स्वतंत्र कायद्यासाठी धरणे.
ब) बुवाबाजीबाबत समग्र भूमिका मांडणाऱ्या ऐसे कैसे झाले भोंदू? या पुस्तकाचे प्रकाशन.
क) बुवा कसा पकडावा, याचे; तसेच चमत्कार सादरीकरण याबाबतचे महाराष्ट्रव्यापी शिबीर.
ड) बुवाबाजी संघर्ष अभियानाची दोन टप्प्यात महराष्ट्रव्यापी यात्रा, त्यामध्ये पुढील जिल्ह्यांत थेटपणे हे अभियान यात्रेद्वारे पोचले.
जिल्हेः मुंबई, पुणे, सातारा,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, ठाणे, रायगड, मुंबई.
दुसरा टप्पा :- लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक.
इ) ता. ३१ जानेवारी इचलकरंजी येथे महाराष्ट्रव्यापी निर्धार परिषदेने समारोप.
स्वरूप
अभियानाचे स्वरूप असे होते की, तीन वाहने, तीन जथ्थे होते. प्रत्येक जथ्थ्यात पाच कार्यकर्ते. त्यांच्या सोबत स्थानिक कार्यकर्ते असत. हे जथ्थे दिवसात प्रत्येकी तीन कार्यक्रम करत. हे कार्यक्रम शाळा, कॉलेज, महिला मंडळे व नागरिकांसाठी जाहीर या स्वरूपाच्या श्रोतृवर्गांसमोर असत. शक्यतो प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न असे. जथ्थ्याबरोबर पोस्टर्स; तसेच विक्रीसाठी पुस्तके असत. पुस्तकांची विक्री समाधानकारक झाली. वार्तापत्राची नोंदणीही करण्यात येई. जथ्थ्यातील कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बुवाबाजीचे चमत्कार हे असे. चमत्कारांचे सादरीकरण प्रभावीपणे होत असे व लोकांना ते चांगल्याप्रकारे आवडतही असे.
वैचारिक आशय  
अ) बुवाबाजी ही समाजात सर्वच स्तरावर आढळते. त्याबाबत समग्र मांडणी, प्रभावी जनजागरण व शक्य तेवढा विरोध संघटित करावयास हवा.
ब) बुवाबाजी संघर्ष यामध्ये दोन मुद्दे मांडण्यात आले.
१)  बुवाबाजीविरोधी कायदा करणे.
२) बुवाबाजी संघर्ष ही जनचळवळ म्हणून लोकांनीच हातात घेणे.
क) चमत्कार सत्यशोधन यामध्ये मांडण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे.
१) समितीने लोकवर्गणीतून जमवून रु. अकरा लाखांची आव्हान रक्कम चमत्कार सिद्ध करणाऱ्यांसाठी ठेवली आहे.
२) कोणीही, कसलाही चमत्कार सिद्ध केल्यास समिती त्याला अकरा लाख रुपये देईलच; परंतु त्याबरोबरच ‘अंनिस’ची चळवळच बंद करेल. कारण चमत्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचे नाते प्रकाश-अंधाराचे आहे. चमत्कार सिद्ध होणे याचा अर्थ भारतीय घटनेत नागरिकाचे कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पराभूत होणे, इतकी ही बाब गंभीर आहे. संपूर्ण मोहिमेत कोणीही हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत दाखवली नाही. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन काहीशा अभिनवपणे लोकांच्यापर्यंत पोचला.
ड) आवाहन अभियानातील हे आवाहन प्रसारमाध्यमे, शिक्षणसंस्था व राजकीय नेतृत्व यांना आहे. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांना ठोसपणे वैज्ञानिक दृष्टिकोन दिल्यास, राजकीय नेतृत्वाने जबाबदारीने वागल्यास व प्रसारमाध्यमाने कृतिशील होकारात्मक भूमिका घेतल्यास बुवाबाजी संघर्षाचे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकेल.
संयोजन     
अ) महाराष्ट्रात तीनशेहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले.
ब)  सर्वत्र कल्पनेचे उत्तम स्वागत झाले. गर्दी भरपूर होती आणि चमत्काराबरोबरच वैचारिक आशय समजून घेण्यातही लोकांना रस होता.
क) चमत्कार व वैचारिक आशय हा कार्यक्रमातून एकत्रितपणे पोचवण्याचे कसब आपल्या जथ्थ्यांनी बऱ्याच चांगल्या प्रमाणात आत्मसात केले.
ड) विनायक सावळे यांनी बोलक्या बाहुल्या या तंत्राद्वारे आशय पोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली. दुसऱ्या टप्प्यात त्याचे अनुकरण विवेक सांबरे व संजय बनसोडे यांनी केले.
इ) सर्व जिल्ह्यांनी कार्यक्रमाचे संयोजन खूप परिश्रमपूर्वक केले होते. दुसरीकडे अविनाश पाटील, माधव बावगे, शालिनीताई ओक आणि मच्छिंद्र मुंडे यांनी जथ्थ्यांच्या मार्फत करावयाचे नियोजन परिणामकारकपणे केले.
फ) स्थानिक वृत्तपत्रांनी कार्यक्रमांना चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली.
ग) स्थानिक केबल, तसेच दूरदर्शन, ई.टी.व्ही., अल्फा मराठी या वाहिन्यांनी दिलेल्या बातम्यांमुळे सर्व महाराष्ट्रात यात्रा पोचली.
ह) आव्हानाचा चित्ररथ तयार केला होता. तो लोकांना आवडत असे. मात्र हा चित्ररथ फक्त एकाच जथ्थ्याबरोबर जाऊ शकत असे. उरलेल्या दोन्ही जथ्थ्यांच्या सोबत फक्त बॅनर लावलेली वाहने होती. मात्र त्यांचे स्वागतही उत्तम प्रकारे होत असे. त्यामुळे चित्ररथ आवश्यकच होता असे नाही, असे जाणवले.
ज) अरुण टिकेकर, निखिल वागळे, श्रीराम लागू, प्रतीक्षा लोणकर,             प्रताप पवार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कोळस्कर, मोहन धारिया, पुष्पाताई भावे, सोनाली कुलकर्णी, सुभाष भेंडे, निळूभाऊ फुले, कुमार केतकर, मृणाल गोरे, सुनील देशमुख (अमेरिका), माजी पोलिस महासंचालक भास्करराव मिसर, किसनरावजी देशमुख, दै. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, दै. ‘पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, ना. लक्ष्मणराव ढोबळे आदी अनेक मान्यवर विविध ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
विरोध
अ) एकूण तीनशे कार्यक्रमांपैकी मिरज, सोलापूर, डोंबिवली व मुंबई या चार ठिकाणी स्वत:ला धर्मरक्षक म्हणवणाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. यापैकी कोठेही तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. सोलापूर व डोंबिवली येथे सभेमध्येच त्यांना गप्प बसवण्यात आले. मिरज व मुंबई येथे सुमारे १५ ते २० जणांच्या घोषणाबाजीमुळे कार्यक्रम १५ ते २० मिनिटे थांबला. मात्र त्यानंतर पुढील कार्यक्रम अतिशय उत्तमप्रकारे पार पडला. गर्दी केलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालणाऱ्या लोकांना अजिबात साथ दिली नाही. सनातन भारतीय संस्था यांच्या सनातन प्रभात या वृत्तपत्रात अतिशय खोट्या स्वरुपात याबाबतची माहिती छापण्यात आली.
ब) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिवेशन आम्ही उधळून लावू. कारण ही मंडळी हिंदू देव, धर्म यांच्यावर टीका करतात, अशी धमकी धर्मरक्षणाच्या नावाने एकत्रित आलेल्या स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या इचलकरंजी येथील संघटनांनी दिली. अधिवेशनात काय बोलावे, काय बोलू नये याचे आदेश देण्याचा हास्यास्पद प्रयत्नही त्यांनी केला. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी तो ताबडतोब धुडकावून लावला आणि काय बोलायचे ते आम्हाला समजते, असे ठणकावून सांगितले. तसेच कोणत्याही संघटनेचा कार्यक्रम या पद्धतीने उधळणे या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी, असाही आग्रह धरला. या नोंदी लिहीत असताना (ता. १७ पर्यंत) एवढीच नोंद उपलब्ध आहे. प्रत्यक्षात काय घडले, हा वृत्तांत मार्च महिन्याच्या अंकात वाचकांना कळेलच.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (फेब्रुवारी २००३)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...