गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

‘भ्रमंती’ची दैनंदिनी
‘भ्रमंती’ची दैनंदिनी
दाभोलकर, चळवळ, संघटन, ताई महाराज, कायदा, वास्तुशास्त्र  
भ्रमंती सदर म्हणजे धावपळीच्या दौऱ्यामध्ये भावलेले तुमच्यापर्यंत पोचविणे. कधी एखादी घटना, कधी विचारतरंग, तर कधी चळवळीच्या अंतरंगाचे दर्शन; पण गेल्या महिन्यात भटकंती इतकी झाली की, ‘भ्रमंती सदरात यावेळी फक्त त्यातील काही नोंदीच करायचं ठरवलं. शक्यता आहे (असावीच) की, त्यातले काही तुम्हाला विचारप्रवृत्त, कार्यप्रवृत्त करेल. तसे नाही; तरीपण त्याबाबत पत्र लिहायला प्रवृत्त केले, तरी तेही नसे थोडके.

ऑगस्ट - बेळगावात तीन कॉलेजात व्याख्याने, सायंकाळी कार्यकर्त्यांची बैठक, त्यामध्ये महिला-विद्यार्थिनींची उपस्थिती. हे चित्र आपल्याकडे इतके दुर्मिळ का बरे आहे? बैठकीला अनपेक्षितपणे दै. गोमन्तक-पणजीचे संपादक चंद्रकांत घोरपडे आले. अगदी छोटेच भाषण दिले. पण आपल्या कामाचे सामाजिक, सांस्कृतिक संबंध काय आहेत, काय असावेत, यावर त्यामध्ये मर्मग्राही भष्य होते. आपल्या संघटनेतील किती जण हे व्यापक भान जोपासतात?

, ४ ऑगस्ट - पोतराज निर्मूलन परिषद, तुळजापूर- परिषद यशस्वी झाली म्हणता येईल इतपत संयोजन होते. पण त्याला अन्यही कारणे होती. मला जाणवली ती गोष्ट वेगळीच. तुळजापूरला समितीची शाखा नाही. मारुती बनसोडे खूप राबला; पण संघटनेची उणीव तो कसा भरून काढणार? असे मोठे कार्यक्रम घ्यावयाचे म्हणजे एकतर तेथे आपली संघटना हवी. नाहीतर प्रसंगी बाहेर जाऊन चार-आठ दिवसांची सवड काढून तेथे मुक्काम ठोकणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी हवी. आज संघटनेत हुकमी कार्यकर्त्यांचा अभाव जाणवतो. तो कसा दूर करता येईल?

७ ऑगस्ट -वारणानगर - व्याख्यानमालेत बावन्न हजार रुपयांची पुस्तके व्याख्यानानंतर विकली गेली. कोणत्याही कार्यक्रमाला कंटाळा न करता आपली पुस्तके बरोबर हवीतच.

१९ ऑगस्ट- जालना - कॉलेजात शिबीर झाले. कामासाठी सायंकाळी बैठक. २५-३० जण हजर होते. त्याच रात्री परतूरला खुल्या मुलाखतीचा कार्यक्रम. वीज गेल्याने बराच वेळ अंधार होता. त्यामध्येही शंभरजण शांतपणे चर्चेसाठी आलेले. सकाळी कॉलेजात कार्यक्रम. संस्थेचे चेअरमन म्हणाले, संस्थेच्या सर्व सोळा शाळांना पुस्तकांचे संच घेतो. सायंकाळी औरंगाबाद येथील स्वामी विवेकानंद कॉलेजात प्राचार्यांसह वातावरण उत्साही. जालना, परतूर, औरंगाबाद सर्वत्र मला जाणवत होते की, लोक समिती समजून घेण्यास उत्सुक आहेत. मर्यादित प्रमाणात; पण निश्चितपणे प्रत्यक्ष सहभागासाठीही अनुकूल आहेत. हे तुम्हाला जाणवते का?
     
२० ऑगस्ट- नेवासा/शेवगाव- सत्यशोध प्रज्ञा परीक्षांची शिबिरे दोन्ही ठिकाणी झाली. पण त्याशिवाय नेवासा येथे इन्स्पेक्टर जाधव मुद्दामहून भेटायला आले. शिबिरालाही आले. ते मोठ्या उत्साहाने व चिकाटीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा आशय असलेली फिल्म तयार करतात. (रहस्य शोधून काढणाऱ्या अंनिसच्या पथकाच्या प्रमुखाचे काम मेहमूद करतोय) शेवगावला पत्रकार परिषदेत बहुतेक प्रमुख दैनिकांचे पत्रकार आले होते आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ते सर्व समितीचे कार्यकर्ते होते, हेही सांगत होते. वेगवेगळ्या माणसांना आपल्याशी जोडून ठेवणे, ही जाणीवपूर्वक घडवावयाची गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात (सत्य न सोडता केलेल्या) लोकसंग्रहाशिवाय पर्याय नाही, हे आपल्यापैकी किती जणांच्या लक्षात आलंय!

२२ ऑगस्ट मरकळ (जि. पुणे) - दत्ताचा अवतार बनलेल्या ताईमहाराजांच्या विरोधात सभा घेण्यासाठी गेलो. सभेला गर्दी ठीक होती. प्रतिसाद चांगला होता. स्थानिक शिवसेना सभेत आपल्या बाजूने बोलली. गाव वारकरी संप्रदायाचे. त्यांनी सभेत मुद्दा काढला. ताईमहाराजांची ही बुवाबाजी हा संतांना कलंक आहे. सभेसाठी वातावरण तयार करणे, आधी प्रचार करणे या बाबी आपल्या पुण्याच्या शाखेने फार परिश्रमपूर्वक केल्या होत्या; पण हे चित्र एकीकडे आणि दुसरीकडे सात महिन्यांपूर्वी दैवीसंचाराचा बनाव घडवून ताईमहाराज बनलेल्या अरुणा लोखंडेचा अफाट भक्तगण (यामध्ये फार मोठ्या संख्येने स्त्रिया) हे चित्र, दुसरीकडे. आपल्या कामाच्या खडतरपणाचाच नव्हे, तर मती गुंग करणाऱ्या वास्तवाचा वेध कसा घ्यावयाचा?

२४ ऑगस्ट - अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने स्वत:हून समिती स्थापन केली. त्यात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कायदा खात्याचे माजी सचिवही होते. विधान परिषदेत मान्य झालेला कायद्याचा ठराव त्यात घेऊन त्यांनी प्रत्यक्ष कायद्याचा मसुदा काटेकोरपणे तयार केला होता. न्या. धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना व्यक्तिगत पत्र लिहून प्रतिष्ठानच्या वतीने ती मागणी करावी आणि नकार आल्यास विधानसभेच्या नोव्हेंबरच्या अधिवेशनात नागपूरला मागणी परिषद घ्यावी आणि त्यानेही नाही भागले तर मार्चच्या विधानसभा अधिवेशनावेळी धरणे धरावे, असे ठरले. गेली सात वर्षे चिकाटीने आपण ही मागणी करत आहोत. त्याला यामुळे निश्चितच यश येईल. पुन्हा तोच मुद्दा सहकार्याचे समर्थ हात शोधणे, जोडणे, जोपासणे अधिकाधिक प्रभावी कसे करता येईल?

२४ तारखेला सायंकाळी वनमाळी हॉलला वास्तुशास्त्रावर परिसंवाद झाला. तुडुंब गर्दी. सध्याचा जिव्हाळ्याचा विषय. आपण महाराष्ट्रात तो प्रभावीपणे न्यावयास हवा. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आवर्जून हे परिसंवाद व्हावयास हवेत. कुठलीही चळवळ हाती घेताना महत्त्व असते, अचूक टायमिंग साधायला. तथाकथित वास्तुशास्त्राला चळवळीचा विषय म्हणून पकडणे हे समितीच्या बहुसंख्य शहरी शाखांना का बरे जमले नाही? नोंद करण्यासारखी वेगळी बाब म्हणजे या कार्यक्रमानंतर समितीचे कार्यकर्ते होण्यासाठी ८० जणांनी नावे नोंदविली. असा उत्साह पुढे संघटित कसा करावयाचा?

२५, २६ ऑगस्ट मुंबईत जाहिराती मिळविण्यासाठी हिंडलो. कोठेही नकारघंटा मिळाली नाही. बहुतेक ठिकाणी तर प्रतिसाद अनुकूलच होता. जाहिराती मिळवताना आणि वर्गणीदार नोंदविताना नि:संकोचपणे मागायला सुरुवात करून तर बघा आणि मग अनुभव कळवा, देणाऱ्याचे हात किती?
     
३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर लातूरचे शिबीर - माध्यमिक शिक्षक व प्राध्यापकांचे एकता शिबीर चांगले झालेच; पण कार्यकर्त्यांनी सर्व दोनशे शिबिरार्थींचे भोजन माणसे लावून तयार करून घेतले आणि विशेष म्हणजे ही धावाधाव करताना हिशेब तयार करून मी रात्री लातूर सोडण्यापूर्वीच माझ्या हाती सर्व हिशेब चोख ठेवला. सर्वांनीच गिरवावा असा कित्ता हा झाला. एका महिन्याचा ताळेबंद; पण यामधून मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि संधीची सार्थकता करण्यासाठी ज्यावेळी आपण कामाला भिडू, त्याचवेळी ही भ्रमंती मनामनात आणि कामाकामात सुरू होणार.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९६)
बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

ठामपणे उभे राहाठामपणे उभे राहा
दाभोलकर, विवेक जागर, विरोध, चळवळ
, , ३ जुलै रोजी डॉ. श्रीराम लागू व मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. विवेक जागराच्या वादसंवादाचे कार्यक्रम होते. नाशिक, सटाणा, निफाड येथे कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद. हॉल ओसंडून वाहणारे. सटाण्याहून निफाडकडे जातानाच बातमी कळली की, शिवसेना (कळवण) ३ तारखेच्या कार्यक्रमाला विरोध करण्याच्या तयारीत आहे. नंतर असेही कळले की, तेथील शिवसेनेत दोन गट आहेत. त्यापैकी पदभ्रष्ट गट आपला कडवेपणा सिद्ध करण्यासाठी या खटाटोपीत आहे; परंतु एकूण प्रकरण फारसे गंभीर नाही.

दोन तारखेचा सटाण्याचा कार्यक्रम आटोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कळवणला जाण्यासाठी निघायचे होते. पण रात्री एक वाजताच कळवणहून सात-आठ जण निफाडला थडकले. त्यांनी मला उठविले. कळवणला आपली सक्रिय शाखा नाही, संपर्क आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कामाची उभारी धरण्याचा प्रयत्न करणारा जो गट होता, तोच सगळा आला होता. त्यांचे चेहरे चिंताक्रांत आणि निराश वाटत होते. त्यांनी गावातील घडामोडी सांगितल्या. शिवसेनेच्या शाखेने आक्रमक रूप घेतले होते. कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली होती. कार्यक्रम बाजारपेठेत भर वस्तीत बँकेच्या हॉलमध्ये होता. मुलाखत घेणाऱ्या प्राचार्यांना एकेकाळी त्यांचेच विद्यार्थी असणाऱ्या शिवसैनिकांनी खबरदार..! मुलाखत घ्यायला आला तर... असा सज्जड दम भरला होता. कार्यक्रम झालाच तर दंगल होईल, असा इशारा देण्यात आला होता. हे सगळे टाळायचे असेल तर एक मार्गही सुचविला होता. तो म्हणजे दाभोलकरांनी असे लिहून द्यावे की, देव आणि धर्म याबाबत एक शब्दही कार्यक्रमात उच्चारला जाणार नाही. या सगळ्या ताणातून सुटका होण्यासाठी स्थानिक मंडळींनी पोलिसांना कार्यक्रम रद्द केल्याचे सांगून मला सांगण्यास ते आले होते. पोलीस हे देखील पक्षपाती आहेत आणि त्यांचे सहकार्य देखील खात्रीचे नाही, अशी त्यांची भावना होती.

...तर आमच्यावर खटला भरावा
त्यांच्या बोलण्याचा आवेग ओसरल्यानंतर मी त्यांना शांतपणे; पण ठामपणे सांगितले, ते थोडक्यात असे, उद्या आम्ही कळवणला येणारच. योग्य वाटेल ते बोलणारही. आम्ही काय बोलावे, यासाठी कोणाचीही सेन्सॉरशिप अजिबात मान्य नाही. बँकेच्या संचालकांनी हॉल नाकारला आणि प्राचार्य आलेच नाहीत, तर बँकेसमोरच्या रस्त्यावर आम्ही सभा घेऊ. ध्वनिक्षेपक मिळाला नाही तर त्याच्याशिवाय भाषण करू. आमचे मत मांडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो घटनात्मक हक्क असल्याने पोलिसांनी आम्हाला संरक्षण देणे आणि गुंडांना प्रतिबंध करणे, ही त्यांची जबाबदारी आहे; विशेषत: शिवसेनेचे राज्य असताना शिवसैनिकच घटना मोडीत काढत असतील तर ती आणखी गंभीर बाब आहे, असे मी मानतो. आमची भाषणे कोणत्याही कारणाने पोलीस वा शिवसैनिक यांना प्रक्षोभक वाटल्यास त्यांनी आमच्यावर खटला भरावा. तो आम्ही लढवू आणि भाषण देण्यालाच पोलिसांनी प्रतिबंध केल्यास तोंडाला पट्टी बांधून, हातात निषेधाचा फलक घेऊन फेरी काढू; परंतु आम्ही कळवणला येणारच. संयोजन समितीला अडचणीचे वाटत असल्यास त्यांनी दूर राहावे. अर्थात, हे सर्व माझे मत आहे. उद्या पहाटे मी डॉ. लागूंच्या बरोबर चर्चा करेन. तुम्हीही रात्री चार तास इथेच थांबावे व पहाटे डॉक्टरांच्याबरोबर बोलून निघावे, असे मी त्यांना सांगितले. ते सर्वजण निफाडच्या कार्यकर्त्यांसोबत निघून गेले. पहाटे ५.३० ला डॉ. लागूंना हा विषय मी सांगू लागलो. तेवढ्यात त्यांच्याबरोबर रात्री आलेला निफाडचा श्रीवास्तव हा कार्यकर्ता आमच्या खोलीवर थडकला. त्याने सांगितले की, माझ्या बोलण्याने कार्यकर्त्यांची मानसिकताच बदलली. स्वत:च्या भित्रेपणाबद्दल ओशाळलेपण आले आणि पडेल ती किंमत देऊन ३ तारखेला सकाळचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ते रातोरात कळवणला परतले होते.

कळवण गावाला कलंक
सकाळी ठीक ९.३० वाजता मी व डॉ. लागू नाशिकचा कार्यकर्ता महेंद्र दातरंगे हे कळवणला पोचलो. कार्यकर्त्यांनी ठामपणे घेतलेल्या भूमिकेचा परिणाम वातावरणात जाणवत होता. आमच्या कार्यक्रमाचा बोर्ड चौकात ठळकपणे लिहिलेला होता. शिवसेना कार्यालयासमोरील विरोधाचा बोर्ड पुसलेला होता. बँकेसमोर गाडी उभी केली तर त्यावर दगडफेक होईल, ही आधीची भीतीदेखील खरी वाटली नाही. त्यामुळे आम्ही भर बाजारात बँकेच्या बाजूला आमची गाडी उभी केली. बँकेत यथोचित स्वागत झाले. प्राचार्यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र दातरंगेने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कार्यक्रम सुरू झाला. एवढ्यात खाली निषेधाच्या घोषणा देत १५-२० जणांचे टोळके आले. पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांनी थोडीशी वादावादी केली. काहीतरी केले याचे समाधान मिळविले आणि काढता पाय घेतला. हॉलमधील कार्यक्रमाला त्याचा काहीच परिणाम झाला नाही. दोन तास कार्यक्रम उत्तमपणे पार पडला. बऱ्यापैकी गर्दी होती. कॉलेज सुटल्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रम संपता-संपता आल्या. त्यामुळे गर्दीत भरच पडली. पोलिसांनीदेखील काम चोख बजाविले. अध्यक्षस्थानावरून बोलताना बँकेच्या चेअरमननी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि अशा स्वरुपाची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा कळवण गावाला कलंक असल्याचे सांगितले.
कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहार घेऊन निघण्यापूर्वी रात्री जाणवलेल्या दहशतीच्या उदास वातावरणाचा मागमूसही राहिला नव्हता. कळवण येथे शाखा कशी वाढवता येईल, वार्तापत्राचे वर्गणीदार कसे नोंदवता येतील, शिबीर कधी घेता येईल, याची चर्चा सुरू होती. कार्यक्रम जिद्दीने आणि निर्भयपणे यशस्वी करून दाखवल्याचा उत्साह आणि समाधान चेहऱ्यावर जाणवत होते. निर्धाराने, ठामपणे, कणखरपणे उभे राहिले तर धमकावणारे वाघ कागदीच निघतात, या प्रचितीचा तो आनंद होता.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर १९९६)

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

मला सिनेमा काढायचाय!मला सिनेमा काढायचाय!
दाभोलकर, चित्रपट, भानामती, पोतराज प्रथा
गेली वर्षभर आपली बिरादरी हे सदर चालवीत होतो. आपल्या चळवळीला किती बाजूने मदतीचे हात पुढे येत आहेत, हे समजावे आणि त्याबरोबरच आपण व्यापक परिवर्तनाच्या या बिरादरीचे भाग आहोत, याचे भान यावे, असा त्याचा उद्देश होता. तो काही प्रमाणात सफल झाला, असे वाटते. अर्थात, औरंगाबादच्या घटनेनंतर प्रत्यक्ष मैदानावरच ही बिरादरी स्पष्ट झाली. असो.

यावर्षी म्हणजे या अंकापासून भ्रमंती हे सदर सुरू करत आहे. तसे काही वर्षांपूर्वी या नावाचे सदर मी चालवत होतोच. कल्पना अशी आहे की, भ्रमंती सर्व प्रकारची. सतत फिरत असतो. त्यामुळे संघटनेशी संपर्क अधिक येतो त्याची माहिती. अनेक व्यक्ती भेटतात. त्यांचे विचार, अनेक उपक्रम उभे राहतात. त्याचे कथन. काही आगळे-वेगळे वाचायला, ऐकायला मिळते. त्यातील मुद्दे असे जे-जे काही सापडेल ते-ते तुमच्या समोर सादर करणे.

३१ मे ला पूर्णा येथे होतो. परभणी जिल्ह्यातील २० हजार वस्तीचे हे रेल्वेचे जंक्शन. तेथे पुरोगामी विचारांच्या प्रसारासाठी तळमळणारे युवा मंडळ आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांना मनापासून रस आहे. त्यांनी श्रद्धा-अंधश्रद्धा, धर्मश्रद्धा या विषयावर माझे भाषण ठेवले होते. गाव छोटे, वेळ रात्रीची ८ ची. तरीही त्यांनी केलेला प्रचार आणि विचार ऐकावयाची गावाची सवय. यामुळे दोन-अडीचशे लोक सभेला होते. कार्यक्रम, भोजन वगैरे सर्व झाल्यावर रात्री ११ वाजता बैठक झाली. त्यालाही १५-२० जण उपस्थित होते. समितीचे कार्य सुरू करण्यात त्यांना मनापासून हौस होती. परभणी जिल्ह्यात सध्या आपले कार्य नाहीच; पूर्णा येथे त्याचा प्रारंभ चांगल्या प्रकारे होईल, असे वाटते.

कल्चर बाऊंड सिंड्रोम
१ तारखेला नांदेडला अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर झाले. पूर्वप्रसिद्धी देऊनही फक्त दहाजण आले होते. परंतु दोन-तीन गोष्टी नोंदवण्यासारख्या. एक तर शिबिरात बोलणाऱ्या कोणत्याही वक्त्याने आपला विषय श्रोते कमी म्हणून कसा तरी आवरला नाही. दुसरे असे की, नांदेड जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे तरुण अध्यक्ष श्री. हंगरगेकर-पाटील आपल्या चार सहकाऱ्यांसह हजर होते. त्यांना शिबीर उपयुक्त वाटले. नांदेडला प्रामुख्याने भानामतीच्या अनुषंगाने कार्य सुरू आहे. परंतु संघटनात्मक बांधणी नव्हती. डॉ. नंदकुमार मुलमुले, प्रा. शंभुनाथ कहाळेकर यांनी आता दर आठवड्याला न चुकता साप्ताहिक बैठक सुरू करण्याचे या शिबिरात पक्के ठरवले. मराठवाड्यात अंगात येऊन स्त्रियांनी घुमणे, किंचाळणे, लोळणे, भुंकणे असा प्रकार अनेक खेडेगावात मोठ्या प्रमाणात आढळतो. याला भानामती म्हणतात. हा एक फक्त मराठवाड्यात आढळणारा वैशिष्ट्यपूर्ण कल्चर बाऊंड सिन्ड्रोम (संस्कृती बंधित मनोविकार) आहे. या प्रकाराविरोधात नांदेड शाखेने बरेच काम केले आहे. आता हा प्रकार मराठवाड्यातून काही वर्षांत हद्दपार करण्यासाठी कंबर कसण्याची गरज जाणवते. त्या दृष्टीने मराठवाडा पातळीवर भानामती निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे नांदेड भेटीत ठरले.

८ जून ला लातूरहून उस्मानाबादला जात होतो. एक उत्साही तरुण भेटायला आला होता. लातूरला गडबडीत बोलणे जमले नाही. म्हणून तो बसमध्येच माझ्याबरोबर चढला. तो दिग्दर्शक होता. त्याला निर्माता बनावयाचे होते. अंधश्रद्धा निर्मूलनाची कथा होती. ती मला त्याने गाडीत वाचून दाखविली. त्याला उदंड उत्साह होता. पैसे कोठून तरी (म्हणजे कोठून ते त्यालाच माहीत) मिळतील, अशी आशा होती. त्या फिल्ममध्ये डॉ. श्रीराम लागू, निळूभाऊ, सदाशिव अमरापूरकर या सर्वांनी विनामूल्य काम करावे, असा त्याचा आग्रह होता. त्याला निराश करणे मला जिवावर आले. परंतु थोडे कठोर बनून मी ते केले. कथा अत्यंत मामुली होती. हे त्याला सांगितले. वाईट कथानकाच्या अशा सिनेमात केवळ चळवळीचे संबंध म्हणून ज्येष्ठ कलावंत विनामूल्य काम कसे करतील? त्यालाच विचारले. सिनेमाची निर्मिती हा भरपूर खर्चिक आणि बहुधा अंगाशी येणारा आतबट्ट्याचा धंदा आहे, याची कल्पना दिली. त्याचा खूप हिरमोड झाला. त्याला माझ्याकडून सहकार्याची भरपूर अपेक्षा होती. पण डोळसपणाची चळवळ चालवताना वास्तवावरचे पाय सुटून काय उपयोग?

उत्स्फूर्त मदत
तुळजापूरला मराठवाडा विभागाच्या पोतराज प्रथा निर्मूलन परिषदेची बैठक होती. समाधानाची बाब म्हणजे तरुण हजर होते. मारुती बनसोडेने बैठकीसाठी परिश्रम घेतले होते. तुळजापूरचे शे. का. पक्षाचे आमदार माणिकराव खपले आवर्जून उपस्थित होते. मारुती बनसोडेने प्रास्ताविक केले. याबाबत स्वत: केलेले कार्य सांगितले. नंतर परिषद संयोजनामागची भूमिका मी विषद केली. उपस्थितांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. परस्पर परिचय होतानाच त्यापैकी बहुतेकांनी समितीच्या कार्याचे आकर्षण असल्याचे व त्यामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. तुळजापूरसारख्या ठिकाणी मिळालेली ही दाद मन सुखावणारी होती. त्याबरोबरच लोकांना कामाची उत्सुकता आहे आणि आपण मात्र पोचण्यात कमी पडत आहोत, याचीही खंत निर्माण करणारी होती. परिषदेच्या खर्चाचा प्रश्न निघाला. हॉल, माईक, बॅनर, प्रवास अशा विविध खर्चासाठी कोणी ना कोणी देणगीदार पुढे आले. आपली आर्थिक अडचण जणू त्यांनी ओळखली. जे पोतराज परिषदेत जटा निर्मूलन करून घेतील, त्यांचा सत्कार करण्याची कल्पना मी मांडली. कल्पना अशी की, एक फूल देऊन सत्कार करावा; परंतु आ. खपले म्हणाले, कितीही पोतराज केस कापावयास तयार होवोत, त्या सर्वांना माझ्यातर्फे फेटा बांधणार. त्यांची ही उत्स्फूर्त देणगी उमेद वाढवणारी होती.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९६)

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

समितीची भूमिका

समितीची भूमिका

दाभोलकर, भूमिका, जनसंवाद, पशुहत्या, चळवळ
अलिकडेच जळगावला गेलो होतो. सुप्रसिद्ध उद्योगपती भंवरलालजी जैन यांची भेट घेतली. झाले होते ते असे, काही महिन्यांपूर्वी माझा व डॉ. श्रीराम लागूंचा विवेक जागराचा वादसंवाद कार्यक्रम जळगावला झाला होता. त्याचा वृत्तांत भंवरलालजींच्या कानावर गेला होता. देव आणि धर्म याबाबतच्या आपल्या भूमिकेबद्दल त्यांच्या मनात काही प्रश्नचिन्हे होती. त्याबद्दल बोलणे हे भेटीचे एक प्रयोजन होते. वेळेला पैशाची किंमत असते, हे तर खरेच. उद्योगपतींच्या बाबतीत हे अधिकच खरे आहे; परंतु त्यांनी पुरेसा वेळ दिला. आस्थेवाईकपणे आपली भूमिका समजून घेतली. स्वत:च्या मनातील शंका दूर झाल्याची मनमोकळी कबुली दिली. मला वाटते, हे प्रातिनिधिक ठरावे. लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व देव आणि धर्म यांची स्वत: घातलेली सांगड असते. त्यामुळे समितीची भूमिका समजावून घेण्याऐवजी स्वत:च्या मनातील आक्षेप, हीच समितीची भूमिका असा चुकीचा ग्रह करून घेतला जातो. आपले कार्यकर्तेही हा गैरसमज दूर करण्याचे प्रभावी प्रयत्न करताना दिसत नाहीत. हा आळस आहे, की समितीची भूमिका स्वत:लाच नीट समजलेली नाही, का इतरांना भूमिका पटवून देण्याचे कौशल्य कमी पडते. कारण काहीही असो, या विषयावर प्रभावी जनसंवाद वाढवणे आता गरजेचे झाले आहे.

सोलापूर शाखेने स्वत:च्या कामाचा काढलेला अहवाल नुकताच बघितला. अंधश्रद्धा निर्मूलन कशासाठी, मागील वर्षांतील कार्य, लोकांच्याकडून अपेक्षा या सर्व बाबी त्यांनी नेमकेपणाने नोंदवल्या आहेतच; पण मला विशेष कौतुक वाटले ते याचे की, त्यांनी वर्षभराचा जमा-खर्च अहवालासोबत छापला आहे. लोकांच्या प्रत्येक पैशाला आपण जबाबदार असतो आणि कामाच्या अहवालाबरोबरच पैशाचा अहवालही चोखपणाने द्यावयास हवा, ही जाण आपल्या सर्व शाखा जितक्या लवकर दाखवतील तेवढे चांगले, असे मला आवर्जून वाटते.

डॉ. लागू यांच्याबरोबर बेळगाव, सिंधुदुर्ग व गोवा असा दौरा झाला. विवेक जागराचे कार्यक्रम चांगले झाले. तरुण भारत हे बेळगावचे दैनिक या सर्व भागात सर्वाधिक खपाचे आहे. त्यांनी सतत उत्तम प्रसिद्धी दिली. बेळगावच्या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी होती. सावंतवाडीची वेळ दुपारची असूनही प्रतिसाद चांगला होता. खंत वाटते ती ही की, याचे पुढे संघटना बांधणीत प्रतिबिंब उमटत नाही. प्रयत्न करूनही सावंतवाडीला आपली शाखा निघू शकलेली नाही. बेळगावच्या कार्यक्रमानंतर तेथील पूर्णवेळ कार्यकर्ते श्री. नारायण आतिवाडकर यांचे पत्र आले, ‘कार्यक्रमामुळे प्रत्यक्षात कार्यासाठी येणाऱ्यांचा ओघ वाढेल असे वाटले होते; तेच मात्र घडले नाही. हा अनुभव तसा नवीन नाही. माझ्या आणि चळवळीतील इतर अनेकांच्या सभांना जी गर्दी जमते, ती प्रत्यक्ष कामात परावर्तीत होत नाही. काही प्रमाणात असे होणारच. परंतु संघटनात्मक आकलनात व संयोजनात काही त्रुटी राहिल्यामुळे असे होते का, याचा शोध अंतर्मुख होऊ घ्यावयास हवा.

एका जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक घेतली. विषय आपापसातील राजी-नाराजीचे. अशा बैठकीत शेवटी साधारणपणे झाले गेले विसरून एकत्रितपणे काम करण्याची भाषा होते, काहीशी सक्तीच्या खुशीने. संघटना चालवायची तर मानवी स्वभावाला धरून या तडजोडी होणारच. पण या बैठकीत एक नवीनच मुद्दा पुढे आला. तो असा की, समजा एकमेकांचे स्वभाव आपापसात जमवून घेण्यासाठी पूर्णपणे विसंवादीच असतील तर...? असे असल्यास उगीच जुळवाजुळवी करण्यात काय अर्थ? मला स्वत:ला हा मुद्दा पटला नाही. काहीसा क्लेशदायकही वाटला. आपण एक विवेकी चळवळ चालवतो. सर्व जगाशी मूल्याधिष्ठित सुसंवादित्व हा विवेकाचा पाया आणि कालपर्यंत ज्यांच्याबरोबर काम केले, त्यांच्याशी एकदम पूर्ण विसंवादित्व निर्माण होणे, यात आपलेच काही चुकत नसेल का? विशेषत: ध्येय, संघटना, कार्यक्रम एकच असताना असे घडत असेल तर आपण अंधश्रद्धा निर्मूलन ते काय करणार; मग विवेकाधिष्ठित समाजाची निर्मिती तर दूरच राहिली. याहीपेक्षा वेगळा पेच एका कार्यकर्त्याने सांगितला. कामाच्या आकर्षणाने एक व्यक्ती समितीची सभासद बनली. उत्साहाने चळवळीत आली. देवधर्म मुळातच मानत नसल्याने व वैज्ञानिक जाणिवा आत्मसात केल्या असल्याने बाकीचा प्रश्न नव्हताच. ती व्यक्ती ज्या ठिकाणी नोकरीस होती, तेथील शिरस्त्याप्रमाणे तिला वरकमाई चांगली होती आणि ती घेताना तिच्या मनाला कोणतीही बोचणी नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व नोकरीचा व्यवहार दोन्ही आपण आपल्या ठिकाणी चोख सांभाळतो, असे तिला वाटत होते. मला मात्र ही आत्मवंचना वाटते, विवेकवादी जीवनमूल्यांशी केलेली.

उस्मानाबाद जिल्ह्यात दीडशे कार्यकर्त्यांचे एक दिवसाचे शिबीर उत्तम झाले. तेथे कलापथक बसवूनही काम सुरू आहे.

चाळीसगाव जवळच्या बंजारा समाजाच्या एकेका तांड्यावर नवरात्रीला सुमारे ४०० ते ५०० बोकडे नवसापोटी मारली जातात. अशा तांड्यांची संख्या ४० आहे. इंदर चव्हाण हा तेथील आपला तडफदार कार्यकर्ता नागेश सामंत यांच्याबरोबर काम करतो. प्रबोधनाने दोन वर्षांपूर्वी दोन तांड्यांवरील पशुहत्या त्यांनी पूर्ण थांबवली. यंदा सर्व तांड्यांवर हे करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. २५ सप्टेंबरला खानदेश विभागाची यात्रा पशुहत्याबंदी कृती परिषद चाळीसगावला होईल आणि नवरात्रीपर्यंत निकराचे प्रयत्न केले जातील.

गोव्यातील कार्यक्रम चांगले झाले. जुलै महिन्यात तेथे शिबीर होईल व संघटनात्मक कामकाज बहुधा सुरू होईल. कर्नाटकातून कन्नड भाषकांत सत्यशोध प्रज्ञा परीक्षा घेण्याची मागणी आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९४)


‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...