शनि-शिंगणापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शनि-शिंगणापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

हरविलेला सत्यशोधकी बाणा




हरविलेला सत्यशोधकी बाणा 
दाभोलकर, शनि-शिंगणापूर, विरोध, चिकित्सा, चमत्कार
शनि-शिंगणापूर येथील दैवी चमत्कार व स्त्री-पुरुष विषमता याबद्दल मी बोललो. त्यामुळे उठलेले वैचारिक वादळ आता सर्वज्ञात आहे. शनि-शिंगणापूरच्या भोवतीचे चमत्काराचे वलय तसेच ठेवण्यात ज्यांना रस आहे, त्यांनी याबाबत काहूर उठवावे, हे स्वाभाविकच आहे. परंतु याबाबत नाराजीचा अनपेक्षित सूर उमटला तो सत्यशोधक समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांकडूनच. याबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्या साधारणपणे पुढीलप्रमाणे होत्या.

वसंतराव फाळके यांचा आरोप
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन दाभोलकरांच्या वक्तव्यामुळे लांबले- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण बिघडल्यामुळे सोनई येथे होणारे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुढे ढकलावे लागल्याची खंत सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव फाळके यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, स्त्रियांच्या गुलामगिरीस धर्म व अंधश्रद्धा कारणीभूत आहेत. या परिसंवादासाठी अध्यक्ष या नात्याने आम्ही डॉ. दाभोलकर यांना निमंत्रित केले होते. परिसंवादामध्ये त्यांनी या विषयावरील विचार व्यक्त केले असते तर ते संयुक्तिक ठरले असते. परंतु शनि-शिंगणापूरच्या श्रद्धा व परंपरा याविरुद्ध दाभोलकरांनी भाष्य केले व वातावरण बिघडविले. त्यामुळे शासनाने हस्तक्षेप करून हे अधिवेशन पुढे ढकलण्यास भाग पाडले. प्राचार्य गजमल माळी यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अखिल भारतीय सत्यशोधक समाज यात खूप फरक आहे.

याबाबतची वस्तुस्थिती काय आहे?
1.      अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सत्यशोधक समाज यांच्या कामात फरक असला, तरी दैवी चमत्कारांना विरोध व धर्माधिष्ठित स्त्री-पुरुष विषमता नाकारणे हा समान धागा आहे. कारण तो थेट महात्मा फुले यांच्या विचारांचा धागा आहे.
2.      सत्यशोधक अधिवेशनानिमित्तानेच समितीने काहीतरी आक्रस्ताळे वैचारिक वर्तन केले, हे खरे नाही. समितीचे मुखपत्र असलेल्या मासिकात, दोन वर्षांपूर्वीच दिवाळी अंकात याबद्दल विशेष लेख होता. त्यानंतर समितीने या विषयावर स्वतंत्र पुस्तिका काढली. तिचे वितरण नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाले. या विषयावर महाराष्ट्रात समितीला सतत विचारले जाते आणि समिती आपली भूमिका रोखठोकपणे मांडत असते. नगर जिल्ह्यात या मोहिमेचे नेतृत्व करणारे कॉ. बाबा आरगडे हेच सत्यशोधक अधिवेशनाच्या संयोजक समितीचे कार्याध्यक्ष आहेत. संयोजन समितीचे मार्गदर्शक आहेत. पी. बी. कडू-पाटील जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती नगर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.
3.      हरिदास हे सत्यशोधक समाजाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी दाभोलकरांना पत्र लिहून अशी विनंती केली की, सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनानिमित्ताने तुम्ही शनि-शिंगणापूर प्रकाराबाबत भूमिका घ्यावी.
4.      सत्यशोधक समाजाचे सध्याचे अध्यक्ष आहेत व्यंकटअण्णा रणधीर. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली माझी जाहीर सभा शिरपूर व बोराडी येथे ता. २४ व २५ डिसेंबरला झाली. त्यावेळी अधिवेशन स्थगितीची घटना घडून गेलेली होती. या दोन्ही सभेत त्यांनी शनि-शिंगणापूर येथील दैवतांच्या चिकित्सेला जाहीर पाठिंबा दिला. याचा अर्थ असा होतो की, सत्यशोधक समाजातील पदाधिकाऱ्यात याबाबत वेगवेगळी मते होती.
5.      मी अधिवेशनाला उपस्थित राहिलो तर अधिवेशन उधळून लावण्याची धमकी शनि-शिंगणापूरच्या ग्रामस्थांनी व हिंदू संरक्षणकर्त्यांनी दिली होती.  याबाबतची भूमिका अशी होती की, ज्यांनी मला निमंत्रण दिले आहे, ते माझे मित्र आहेत. त्यांना अडचण वाटत असेल तर मी अधिवेशनाला जाणार नाही. ही भूमिका घेण्यामागे दुहेरी कल्पना होती. एक तर असे की, अधिवेशनात माझ्या उपस्थितीचे निमित्त करून वैचारिक हितशत्रूंना गोंधळ घालावयास मिळाला, तर त्यामुळे मूळ वैचारिक कार्याला गौणत्व प्राप्त झाले असते, जे घडणे इष्ट नाही. तेव्हा या गोंधळासाठी त्यांनी जे निमित्त शोधले ती माझी उपस्थिती हे निमित्त त्यांना मिळूच द्यावयाचे नाही. अर्थात, हा निर्णय संयोजन समितीने घ्यावयाचा होता. मी परिषदेला गेलो नसतो आणि अन्य सर्व प्रमुख पाहुणे व वक्ते यांच्यासह परिषद पार पडली असती - ज्यामध्ये बाबा आढाव, निळू फुले, पुष्पाताई भावे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. य. दि. फडके, पन्नालाल सुराणा, हरी नरके ही समविचारी ज्येष्ठ मंडळी होती, तरी हा विषय त्यांच्यामार्फत नक्कीच चर्चेचा व विचारमंथनाचा झाला असता. यापुढे जेव्हा केव्हा ही परिषद होईल, त्यावेळीही हे होईलच.
6.      सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, दैवी चमत्काराची चिकित्सा व स्त्री- पुरुष विषमतेवर आधारित जाहीर धर्मवर्तन याबाबत सत्यशोधक समाजाची संघटना म्हणून भूमिका काय, हे या निमित्ताने स्पष्ट व्हावयास हवे. त्याचा संदर्भ लक्षात घेता कोणती भूमिका असू शकते, याबाबत संदेह राहण्याचीही गरज नाही. दैवी चमत्काराची चिकित्सा झाली पाहिजे, त्या नावाने होणारी दिशाभूल व शेटजी-भटजीद्वारे होणारी लूट थांबली पाहिजे. स्त्रियांना लिंगावर  आधारित विषम वागणूक मिळता कामा नये आणि कोणत्याही धमक्यांना न घाबरता या मागण्या पुढे मांडल्या जातील, अशी रोखठोक भूमिका सत्यशोधक समाजाकडून अपेक्षित आहे. सत्यशोधक समाजाला ऐतिहासिक परंपरेने, महात्मा फुले यांच्या नावाने अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या संदर्भात सर्वस्वी वडिलकीचा मान आहे. त्यामुळे शनि-शिंगणापूरच्या प्रकरणात त्यांच्या कृतिशील पाठिंब्याची अपेक्षा आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी १९९९)




रविवार, ३ डिसेंबर, २०१७

बांधिलकीची व्यापक वाट



बांधिलकीची व्यापक वाट
दाभोलकर, सामाजिक कृतज्ञता निधी, नवे वाण, शनि-शिंगणापूर
आपली चळवळ व्यापक समाजपरिवर्तनाशी जोडण्याची भाषा आपण नेहमी बोलतो. आपली तशी मनापासून इच्छाही असते; प्रत्यक्षात मात्र हे तसे अवघडच असते. व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उरलेल्या वेळात आपले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य यामध्ये वेळ मिळणे जमत नाही. तरीही काही वेळा, प्रसंग असे येतात की, ही बांधिलकी सांभाळावी लागते. भावकीला मदत करताना हातातले काम बाजूला ठेवावे लागते. सामाजिक कृतज्ञता निधीच्या एक उपवास कृतज्ञतेचा या उपक्रमाला आपल्या कार्यकर्त्यांनी जो हातभार लावला, त्यामुळे त्यांच्या या व्यापक सामाजिक बांधिलकीची प्रचीती आली.

पूर्णवेळ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाप्रती समाजाची कृतज्ञता म्हणून मानधन देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना दहा वर्षांपूर्वी झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, बाबा आढाव, अनिल अवचट, पुष्पाताई भावे ही आपली सारी ज्येष्ठ मित्रमंडळी त्यामध्ये आहेत; मीही आहे. निधीची रक्कम वाढवण्यासाठी एक उपवास कृतज्ञतेचा ही अभिनव मोहीम घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ३० जानेवारीस हुतात्मादिनी एकवेळचा उपवास करावा आणि त्यातून वाचलेले पाच वा दहा रुपये फक्त या निधीसाठी द्यावेत, अशी ही कल्पना. महाराष्ट्रात ती पहिल्या टप्प्यावर आठ जिल्ह्यात पोचवायची ठरली. त्यापैकी अनेक ठिकाणी उत्साहाने याचे संयोजन करणारे कार्यकर्ते नव्हते किंवा होते तरी त्यांना मदतीची गरज होती. हे काम आपल्या समितीच्या शाखांच्या विविध कार्यकर्त्यांनी फार तत्परतेने केले.

सावंतवाडी येथे नागरिकांची सभा आयोजित करणे, जिल्हाभर नागरिकांच्या पातळीवर निधी संकलनासाठी संपर्क साधणे हे काम डॉ. कदम, त्यांच्या पत्नी, डॉ. विजया चिंडक व तेथील शाखेच्या अन्य कार्यकर्त्यांनी यांनी स्वत:ला तोशिष लावून केले. रत्नागिरी जिल्ह्यात संयोजन मुळातच उभे राहत नव्हते. त्यासाठी दापोली, चिपळूण, रत्नागिरी अशी त्रिस्थळी धावाधाव स्वत:च्या खर्चाने स्वत:ची मोटार बाहेर काढून अमृते यांनी केली. छपाई, पोस्टिंग ही सारी हमाली कामे अनिश पटवर्धन यांनी पार पाडली. नगरलाही अशीच अडचण होती. तेथील जिल्हा अध्यक्ष पी. बी. कडू-पाटील, कार्यवाह बाबा आरगडे, नीलिमाताई बंडेलू, रवींद्र सातपुते, रामचंद्र तावरे यांच्या धडपडीतून नगरला संयोजन होऊ शकले. नाशिकला एकूण आखणी उत्तम केली होती. त्यामध्ये इतरांच्या जोडीने तेथील सामाजिक कृतज्ञता निधी मित्रमंडळाचे एक निमंत्रक व आपल्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. किशोर पवार यांचा महत्त्वाचा वाटा होता. जळगावच्या संयोजनात अविनाश पाटीलची धडपड होती. आपापल्या ठिकाणी हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जावा म्हणून तासगाव (जि. सांगली) व सिंदखेडा (जि. धुळे) येथे अनुक्रमे प्रताप घाटगे व परेश शहा यांनी जणू मोहीमच राबविली आणि खरे तर इथे नावे न लिहिलेल्या आपल्या इतर अनेक कार्यकर्त्यांनी घरचेच काम आहे, असे समजून अगत्य दाखविले. चळवळीच्या ज्या ज्येष्ठ मित्रांची नावे वर लिहिली आहेत, त्या सर्वांना या सहभागाबद्दल आनंद वाटला. व्यापक समाजकारणाशी दैनंदिन कामात जोडून घेणे शक्य होत नसेल; पण गरज पडताच हे तर आपलेच काम आहे, ही समज, उमज व कृती आपल्या कार्यकर्त्यांनी सहजपणे, परिणामकारकपणे दाखविली, याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करावयास हवे.

नवे वाण
रूढी, प्रथा, कर्मकांडे यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी आहे, अशी सर्वसाधारणपणे कल्पना असते. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी, कुटुंबियांनी या स्वरुपाचे कोणतेही वर्तन केले की, ते लगेच चर्चेचा विषय होते. याबाबत नेहमी दोन-तीन मुद्दे पुढे येतात. एक म्हणजे सगळी कर्मकांडे सरसकट नाकारावीत. दुसऱ्या काहीजणांचा आग्रह असतो, असे वागणे म्हणजे समाजापासून तुटून पडणे होईल. त्यामुळे ज्या कर्मकांडांना शोषण, मिथ्याकथन याचा आधार असतो, ती तेवढी नाकारावीत; परंतु ज्यामध्ये परस्परातील चांगल्या भावनांचा परिपोष असेल ती आचारावीत, जसे तिळगूळ देणे-घेणे, समारंभ, स्वागतप्रसंगी श्रीफलाचा स्वीकार करणे. आणखी तिसरा एक मतप्रवाह आहे, तो असा की, आपण पारंपरिक कर्मकांडे; प्रसंगी केली तरी काय बिघडते? त्यामध्ये नवा आशय आपणाकडून भरण्याचा प्रयत्न करणे अधिक श्रेयस्कर.

विषय गुंतागुंतीचा आहे, नाजूकही. कार्यकर्त्यांच्या वर्तनावर समाजाचे बारीक लक्ष आणि बऱ्याच वेळा आसपासचे लोक टीकेसाठी टपलेले. त्यामुळे त्याला हे आचारस्वातंत्र्य कमी उपभोगता येते. कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची; विशेषत: पत्नीची गोष्ट काहीशी वेगळी असते. त्यांना स्वत:ला मत असते आणि ते कार्यकर्त्यांपेक्षा वेगळे असणे सहज शक्य असते. समाजाशी अशा कर्मकांडातून जोडलेले नाते एकदम तोडणे त्यांना शक्य नसते; अनेकदा इष्टही वाटत नाही. दुसऱ्या बाजूला आपल्या माणसाची विचारसरणी त्यांना माहीत असते, बरीचशी पटतही असते. अशा वेळेला कर्मकांडांना काही वेगळा संदर्भ देण्याचा प्रयत्न करतात.

बाबा आरगडे हे आपले महाराष्ट्राचे कार्यवाह. नगर जिल्ह्यातील. त्या जिल्ह्यातील शनि-शिंगणापूरच्या देवस्थानात स्त्रियांना असणारी बंदी उठवावी, अशी आपली मागणी आहे. स्त्रियांनी देवपूजेला जावे, याची ही चळवळ नाही, तर लिंगभेदामुळे उपासनेचे व्यक्तिस्वातंत्र्य नाकारले जाऊ नये, हा समतेचा मूल्यविचार त्यामागे आहे. या चळवळीचे नेतृत्व बाबा आरगडे करतात. आपली भूमिका नीटपणे मांडणारी एक पुस्तिकाही यानिमित्ताने आपण प्रकाशित केली आहे. बाबांच्या पत्नी सूर्यकलाबाई. रूढार्थाने फारसे शिक्षण न झालेल्या. त्यांनी हळदीकुंकू समारंभ म्हणजे एका अर्थाने महिलांचे स्नेहमिलनच बनविले. मात्र विधवा स्त्रियांना त्यातून वगळले जाते, ही मोठीच विषमता. हा दोष टाळून हळदी-कुंकू समारंभ केला तर तो एक सांस्कृतिक कार्यक्रम बनतो. त्यातलाच एक भाग असतो, वाण लुटण्याचा. आलेल्या प्रत्येक स्त्रीला काहीतरी उपयुक्त वस्तू द्यावयाची. सूर्यकलाबाईंनी स्वत:च विचार केला आपण शनि-शिंगणापूरची वस्तुस्थिती विषद करणारी पुस्तिकाच सर्वांना दिली तर... त्यांनी तसे केले. ज्या स्त्रियांच्या पर्यंत एरव्ही ही पुस्तिका पोचली नसती, त्यांच्यापर्यंत ती सहज पोचली. त्यातल्या अनेकांच्या घरात विचार वाचला गेला. पटला. महिलांची मने बदलू लागली, नगर जिल्ह्यातील अनेक हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये या पुस्तिकाचे वाण जागोजागी दिले गेले, तर परिवर्तनाचा विचार थेट संबंधितापर्यंत पोचण्याचा मार्ग वेगळ्या प्रकारे झाला. तुम्हाला याबद्दल काय वाटते?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९७)

शनिवार, २ डिसेंबर, २०१७

कौटुंबिक जिव्हाळ्याची संघटना



कौटुंबिक जिव्हाळ्याची संघटना
दाभोलकर, कौटुंबिक जिव्हाळा, शनि-शिंगणापूर, वार्तापत्र, संघर्ष
वेळ रात्री १०.३० ची. पुण्याहून फोन मिळाला, अनिल इंगवलेला अपघात झाला होता. सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे अपघात झाला. एक दिवस तेथे उपचार. पुढे दोन दिवस औरंगाबादला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार अपुरे. हाताची सूज प्रचंड. शर्टातून हात निघाला नाही. म्हणून शर्टाची बाही फाडावी लागली. शेवटी अनिल पुणे ससूनमध्ये दाखल झाला. अनिल इंगवले हा आपला कबनूर शाखेचा धडाडीचा कार्यकर्ता. हात राहतो की जातो, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. उपचार तातडीने हवेत. खात्रीचे हवेत; शिवाय आर्थिक मदत हवी आणि मानसिक आधारसुद्धा. पुणे हे गाव तसे धावपळीचे. आपले सगळे कार्यकर्ते आपापल्या व्यवसायात व्यग्र. मी रात्रीच श्री. दीपक गिरमे यांना फोन केला. सकाळपासून पुणे शाखेचे कार्यकर्ते अनिलच्या दिमतीला हजर झाले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना गाठण्यात आले. सर्व काही काळजीपूर्वक होईल, याची खात्री करण्यात आली. आवश्यक पैशांची तातडीने तरतूद झाली. चंदू चव्हाण, भालचंद्र जोशी हे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये अनिल होता तोपर्यंत रात्री झोपण्यास गेले. ही सगळी धावपळ जेव्हा मला समजली, तेव्हा खूप बरे वाटले. संघटना म्हणजे सभासदत्वाचा फॉर्म नव्हे अथवा साप्ताहिक बैठका नव्हेत. वैचारिक वादविवाद आणि अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष एवढ्यातूनही समितीचे काम उभे राहू शकत नाही. कुठल्याही संघटनेत एक कौटुंबिक जिव्हाळा असावा लागतो. आपला सहकारी अडचणीत आल्यावर स्वत:चे काम बाजूला ठेवून धावून जाण्याची वृत्ती असावी लागते. प्रसंग आला म्हणजेच त्याची परीक्षा होते आणि या परीक्षेत ज्या संघटनेचे कार्यकर्ते उतरतात, तीच संघटना सर्व प्रतिकूल परिस्थितींना टक्कर देत टिकून राहते, वर्धिष्णू होते. आपल्या संघटनेत हे घडत आहे. हा दिलासा पुणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी दिला. इतरांच्यासाठी एक वस्तुपाठ उभा केला.

नगरच्या साहित्य संमेलनात शनि-शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) हे देवस्थान महिलांच्यासाठी खुले व्हावे म्हणून आपण चळवळ करणार होतो. तशा बातम्याही येऊन गेल्या. पुढे तीन आठवडे उलटले. संमेलन जवळ आले. त्यावेळी काही बाबी पुढे आल्या.
१)    या बातमीमुळे महाराष्ट्रात ज्या प्रमाणात चर्चा होईल असे वाटले होते, तशी ती झाली नाही. खुद्द नगर जिल्ह्यातही झाली नाही.
२)    नगरमध्ये जनमताची एक बाजू अशी होती की, आमचा या मागणीला पाठिंबा आहे. पण कधी नव्हे ते साहित्य संमेलन होत आहे, या आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही बाहेरून तुमचे संघर्ष कशाला घुसवता?
३)    चळवळीचा मुद्दा धर्माशी जोडलेला आणि म्हणूनच संवेदनशील आहे. या मुद्द्यावर आंदोलन करताना प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आल्यास प्रचंड गर्दीत त्याचे गोंधळात वा दंगलीत रूपांतर होऊ शकेल. समितीच्या कार्यावर नाराज असलेल्या काही विघ्नसंतोषी लोकशक्ती हे कदाचित मुद्दामहून घडवून आणतील आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहून भलतेच वळण लागेल.

२६ डिसेंबरला मी नगरला होतो. नगर जिल्ह्यातील बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जमलेले होते. त्यांच्यासमोर मी वरील वस्तुस्थिती मांडली आणि तीन पर्याय सांगितले. पहिला म्हणजे घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आंदोलन करायचे आणि जे काही सोसावे लागेल ते सर्व सोसायचे. दुसरा पर्याय आंदोलन पूर्ण रद्द करायचे आणि तिसरा म्हणजे आंदोलन न करता फक्त प्रबोधन करावयाचे. त्याबाबत आपली भूमिका मांडणाऱ्या छोटेखानी पुस्तिकेचे वितरण करावयाचे आणि संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांच्या पाठिंबादर्शक सह्या घ्यावयाच्या.

सर्व कार्यकर्त्यांना मत विचारण्यात आले आणि सर्वांनी एकमुखाने असे सांगितले की, मोहीम प्रबोधनापुरती मर्यादित करावी. याबरोबरच या प्रश्नांवर महाराष्ट्र पातळीवर महिलांची परिषद घेणे, देवस्थानच्या दारात सद्भावना जागृती उपोषण करणे आणि त्यातूनही प्रश्न नाही सुटला तर सत्याग्रह करणे. ही पुढील वाटचालही नक्की करण्यात आली.

समितीमधील नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयातून मला असे जाणवले की, चळवळीतील कार्यकर्त्यांचे मन प्रगल्भ होत चालले आहे. आततायीने एखादी गोष्ट करणे किंवा एकदम घूमजाव करणे यापेक्षा चिवटपणे संघर्ष करण्याचा हा दीर्घकालीन मार्ग आहे, याची समज त्यांना येत नाही. मला ही खूण आशादायी वाटते.

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांत तरी गेलो. सर्वत्र चौकशी करत होतो. वार्तापत्र वर्गणीदार नोंदणी कशी चालली आहे? प्रतिसाद अजिबात उत्साहवर्धक नव्हता आणि त्याचे एकमेव खरे कारण म्हणजे कार्यकर्ते वर्गणी मागण्यास बाहेरच पडलेले नव्हते. हे चित्र अस्वस्थ करणारे. वर्षाकाठी कार्यकर्त्यावर असलेली राज्य पातळीवरील जबाबदारी ती फक्त एवढीच. त्यातही आपली वर्गणी निश्चितच कमी, अंक नियमित, दर्जा चांगला. चळवळीला मर्यादित का होईना; पण अनुकुलता. हे सर्व असताना केवळ उदासीनता आणि निष्क्रियता यामुळे जर आपण वर्गणीदार वाढवण्याच्या कर्तव्यात कसूर करणार असू तर चळवळ वेगाने पुढे कशी सरकणार? कार्यकर्त्याने जिद्द दाखवली तर काय घडते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंदखेड्यामध्ये या डिसेंबरला दोनशे वर्गणीदार केले. धुळे जिल्ह्यातील एकट्या तालुक्यात जर हा प्रतिसाद मिळू शकतो आणि कर्तृत्वाने मिळवला जातो, तर महाराष्ट्रातील सर्व शाखांनी मनावर घेतले तर केवढी झेप आपण मारू शकू?
पण लक्षात कोण घेतो?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी ११९७)

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०१७

पुन्हा एकदा शनि-शिंगणापूर



पुन्हा एकदा शनि-शिंगणापूर

दाभोलकर, शनि-शिंगणापूर, चमत्कार, डुंगेश्वर देवस्थान, विरोध
नगर जिल्ह्यातील शनि-शिंगणापूर हे देवस्थान गेल्या काही वर्षांत दैवी चमत्काराचे केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. तेथील घरांना दारे नाहीत. परंतु शनिदेवाच्या प्रभावाने कोणीही व्यक्ती तेथे चोरी करूच शकत नाही. प्रयत्न केलाच तर तिचे डोळे जातात वा ती भ्रमिष्ट बनते. देवस्थानचा हा चमत्कार बहुचर्चित आहे. महाराष्ट्रात याबाबत कार्यकर्त्यांना सतत प्रश्न विचारले जातात.
दोन वर्षांपूर्वीच्या समितीच्या दीपावली अंकात याबाबतची सत्यस्थिती सांगणारा सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. चमत्काराच्या दाव्यातील फोलपणा त्यामुळे स्पष्ट होतो. त्याबरोबर आणखी एक विषमतेची प्रथा त्या ठिकाणी आहे. शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिला जात नाही. एवढेच नव्हे, तर ज्या विहिरीतील पाण्याने शनिदेवाला अंघोळ घातली जाते. त्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी स्त्रियांना मज्जाव आहे. तशा पाट्याच त्या विहिरीवर लटकत असतात. हा प्रश्नही समितीने पुढे आणला होता. दोन वर्षांपूर्वी नगरला संमेलन झाले. त्यावेळी एक प्रचार मोहीम उघडून, पुस्तिका वितरीत करून ही सर्व बाजू समितीने लोकांच्यासमोर मांडली होतीच.
सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने
महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अधिवेशन ता. १९, २० डिसेंबर रोजी शनि-शिंगणापूर येथील सोनई येथे भरणार होते. सत्यशोधकी चळवळीचा पूर्ण वारसा हा धर्मचिकित्सेचा (चमत्कारविरोधाचा, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध करणारा) आहे. स्वाभाविकच यानिमित्ताने या विषयावर पुन्हा एकदा विचारमंथन व्हावे म्हणून हा प्रश्न लोकांच्यासमोर मी मांडण्याचे ठरविले. नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बोलणेही झाले होते. सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. किशन हरिदास यांनी तसे आग्रहपूर्वक सुचवलेही होते.
‘लोकमत’ पुणे येथील वार्ताहर प्रसाद घारे यांच्याशी बोलण्यात हा विषय निघाला. पत्रक काढून प्रसिद्धीला देण्याआधी व्यक्तिगत बातमीदाराकडून ही बातमी वृत्तपत्रांना गेली. शनि-शिंगणापूरच्या दैवी चमत्काराबाबत मला असंख्य वेळा महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा चमत्कार घडत नाही, याचे वस्तुस्थितीतील स्पष्टीकरण मी देतोच. तेथील पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या चोरीच्या नोंदी, व्यापारी वर्गाचे नोटा खिशात ठेवणे, शाळेचे महत्त्वाचे रेकॉर्ड गुरुजींनी कुलूप नसलेल्या कपाटात देवाच्या भरवशावर न ठेवता स्वत:च्या घरी ठेवणे आणि देवासमोरील पैशाची पेटी उघडी न ठेवता कुलूप नसतानाही चोरी शक्य नसावी, अशा खुबीदारपणे बंद असणे या सर्वांचा उल्लेख मी माझ्या भाषणात करत असे. याबरोबरच मी गमतीने असेही म्हणत असे की, पाहिजे असल्यास शनि-शिंगणापूर येथे चोरी करण्याची आमची तयारी आहे. मात्र आम्हाला शिक्षा देण्याचे काम शनिदेवाने करावे. पोलिसांनी व ग्रामस्थांनी मध्ये येऊ नये. हे माझे प्रतिपादन हा याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीचा मुख्य गाभा ठरला व चोरी करण्यास समिती जाणारच, असा कृती कार्यक्रमही बातमीत जाहीर करण्यात आला. दैवी चमत्काराची वस्तुनिष्ठ तार्किक चिकित्सा; तसेच स्त्रियांना मिळणारी देवस्थान ठिकाणची विषम वागणूक हे सर्व मुद्दे साफ मागे पडले.
गदारोळ
या बातमीनंतर शनि-शिंगणापूर येथे प्रक्षुब्ध प्रतिक्रिया वाढली. तीन दिवस शनि-शिंगणापूर निषेधार्थ बंद राहिले. माझी प्रतिमा जाळण्यात आली, असे पत्रकारांनी मला सांगितले. मी सत्यशोधकी अधिवेशनाला आलोच तर त्याच मंडपात माझा तेरावा घालण्याचाही निर्णय झाला होता. अधिवेशनाआधी नगर येथे मी समितीच्या शिबिराला जाणार होतो. मला नगर प्रवेश बंद केल्याचा इशारा बजरंग दलाने दिला. मी आलोच तर रस्ता अडवून माझ्या तोंडाला काळे फासण्याचा कृती कार्यक्रमही जाहीर झाला. नगर येथे एका लग्नाला मी सकाळी पोचलो. मी कधी येणार, हे विचारून पोलिसांनी लग्नघरातील माणसांना हैराण केले होते. पोलीस बंदोबस्त कडेकोट होता. लग्न संपवून मी शिबिराला निघालो. शिबिराच्या जागी मला अडवण्यात येऊन मारहाण होण्याची शक्यता पोलिसांनी सांगितली. आम्ही संरक्षण देण्याचा प्रयत्न करू. परंतु आम्ही पुरे पडलो नाही तर... असा त्यांचा प्रामाणिक चिंतेचा सूर होता. मी शिबिराला गेलो. वेळ दुपारी दोनची होती. कारण काहीही असो; परंतु निदर्शक तेथे नव्हते. पोलीस बंदोबस्त चोख होता. माझे भाषण झाले. तीन वाजता हमालभवनात पत्रकार परिषद झाली. ती चांगली झाली. ती संपवून मी बाहेर पडत असताना जय भवानी, जय शिवाजीचा घोष करत सात-आठ शिवसैनिक आले. मी जीपमध्ये बसणार तेवढ्यात तेथे धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यांच्या हातात काळ्या शाईच्या बाटल्या होत्या. झटापटीत त्याचा प्रसाद एका पोलिसालाच मिळाला. पोलिसांनी निदर्शकांना अटक करून नेले. (नंतर सोडून दिले.) जिल्हाधिकाऱ्यांनी मला भेटण्याची इच्छा प्रकट केली होती म्हणून मी, बाबा आरगडे, कडू-पाटील व विनायक बंगाळ ही ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. तेथे कलेक्टर व जिल्हा पोलीसप्रमुख होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मला विचारलेले प्रश्न थक्क करणारे होते. एक तर त्यांचे असे मत होते की, मी सातारा व त्याला जवळ असणाऱ्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातील अंधश्रद्धा दूर करण्याचे सोडून इतक्या दूर नगर जिल्ह्यात का आलो आहे? दुसरा प्रश्न असा होता की, देवाच्या भीतीने चोरी होत नाही, ही चांगली गोष्ट घडते. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन म्हणून विरोध का? एखादा चोर भुताच्या भीतीने रात्रीची चोरी करत नसेल तर भूत नसते, हे त्याला कशाला सांगायचे? असे त्यांचे मत. मी वाद घातला नाही; फक्त त्यांची व समितीची मते भिन्न आहेत, एवढे त्यांना सांगितले. समितीची चळवळ ही अतिशय जाणीवपूर्वक चालणारी आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आमच्या बाजूने कधीच उपस्थित केले जाणार नाहीत; परंतु आमची मते मांडण्याचा अधिकारही दुसऱ्यांच्या गुंडागर्दीमुळे नाकारता येणार नाही, हे स्पष्ट केले. यानंतर पोलीस बंदोबस्तात मला नगर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आले व पुढे बसमध्ये बसवून देण्यात आले.
वैचारिक भूमिका
या सर्व प्रकरणात प्रक्षोभकता निर्माण होण्याचे कारण वरपांगी असे सांगण्यात येते की, चला शनि-शिंगणापूरला, चोरी करायला या बातमीच्या शीर्षकाने भाविकांच्या श्रद्धा मोठ्या प्रमाणात दुखावल्या. याबाबत मी पत्रकार परिषदेत देखील स्पष्ट केले होते की, दैवी चमत्कारावर श्रद्धा ठेवण्याचा लोकशाही अधिकार भाविकांना असेल तर असा चमत्कार घडत नाही, ही श्रद्धा (विश्वास) बाळगण्याचा अधिकार समितीला आहे. विशेषत: वस्तुस्थितीत ज्या वेळेला चोऱ्या होतात आणि त्या होत नाहीत, असा दंभ फक्त तयार केला आहे, तेथे तर हे सत्यशोधन अधिकच महत्त्वाचे आहे. असे सत्यशोधन समिती संबंधितांच्या अनुमतीनेच करते. कारण संबंधितांनी अनुमती नाकारणे यामधूनही तथाकथित चमत्कारावरील त्यांची डळमळीत श्रद्धा सिद्ध होते. तेव्हा चोरी न होण्याच्या दैवी चमत्काराचे सत्यशोधन करण्यास ग्रामस्थांनीच पुढे यावे. दुसरी गोष्ट अशी की, समिती चोरीसारख्या अनैतिक गोष्टींचे समर्थन करते, असा तिरका अर्थ यातून कोणी काढू नये. कारण हे आवाहन फक्त शनि-शिंगणापूर या अत्यंत छोट्या गावातील चोरीशी (जे दैवी चमत्काराशी जोडलेले आहेत) संबंधित आहेत. समिती विवेकाचा प्रचार करत असल्यामुळे ती चोरी करायला शिकवणार काय, असा प्रश्नही हास्यास्पद ठरेल.
धमक्या
शनिशिंगणापूर येथे माझ्यावर हल्ला करण्याच्या धमक्या उच्चारल्या गेल्याच; परंतु सर्वांत कहर म्हणजे न्याय व विधी खात्याचे राज्यमंत्री दिलीप सोपल यांनी श्रद्धांना हात घालणाऱ्या दाभोलकरांना लाथांनी तुडवून नीट केले पाहिजे, असे जाहीर वक्तव्य शनि-शिंगणापूरला केले. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दाभोलकरांनी स्वत:च्या पत्नीला घेऊन शनिच्या चौथऱ्यावर उभे राहावे आणि शनिच्या अवकृपेची प्रचिती घ्यावी, असे आव्हान दिले. (हे आव्हान समितीने लगेच स्वीकारले आणि अनेक कार्यकर्त्यांच्या पत्नीसह देवाच्या चौथऱ्यावर चढून शनिच्या अवकृपेची जाहीर प्रचिती घेण्याची तयारी दाखविली.) जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या हातातील शस्त्र उचलले. विरोधकांची भूमिका अशी होती की, दाभोलकर परिषदेला आल्यास ती उधळून लावण्यात येईल. त्यांचे निमंत्रण रद्द करावे. माझी भूमिका अशी होती की, संयोजक माझे मित्र आहेत. त्यांची अडचण होत असेल व त्यांनी विनंती केली तर मी परिषदेस जाणार नाही. मात्र महाराष्ट्रातील सत्यशोधनाच्या चळवळीच्या दृष्टीने ही गोष्ट उचित नव्हे. मी परिषदेस गेलो नाही, तरी माझे अनेक वैचारिक मित्र परिषदेत या ना त्या स्वरूपात निमंत्रित आहेत. त्यामुळे ते माझ्या अनुपस्थितीत देखील हा विषय मांडतील, अशी मला खात्री होती. (बाबा आढाव, निळू फुले, पुष्पाताई भावे, प्रा. एन. डी. पाटील, पन्नालाल सुराणा, हरी नरके, गोविंद पानसरे, डॉ. य. दि. फडके वगैरे) माझे निमंत्रण संयोजकांनी परत घेतले. पण तेवढ्याने भागले नाही. या अधिवेशनानिमित्ताने लोकभावना प्रक्षुब्ध होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा अहवाल कलेक्टर यांना तालुका मामलेदार यांनी दिला. त्यामुळे असे घडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे बंधन जिल्हाधिकाऱ्यांनी संयोजकांच्यावर टाकले. याची खात्री मुळात अवघड आणि समजा ती दिली तरी ऐनवेळी कलेक्टरने बंदीच आणली (वा १४४ कलम लावले) तर सर्वच तयारी वाया जाणार, या भीतीतून संयोजकांनी अधिवेशनच स्थगित करून टाकले.
कारणमीमांसा
शनि-शिंगणापूर येथील चमत्काराबाबत समिती गेली अनेक वर्षे बोलत आहे, लेख लिहिले आहेत, पुस्तके वाटली आहेत. याचवेळी इतकी तीव्र प्रतिक्रिया का यावी? याची काही कारणे दिसतात.
पहिले असे की, शनि-शिंगणापूर हे देवस्थान गेल्या काही वर्षांत अफाट वाढले आहे. व्यापारी व सर्व अनुषंगिक लोकांचे हितसंबंध त्यामध्ये तयार झाले आहेत. दैवी चमत्काराची खुलेआम चिकित्सा करणे म्हणजे त्या चमत्काराला संपुष्टात आणणे, देवस्थानचे अद्भुत वलय लयाला जाणे. तसे घडले तर सगळी आर्थिक आवकच थांबणार. त्यामुळे प्रथेवर हल्ला या नावाने प्राणपणाने विरोध सुरू झाला. अनेक देवस्थानाबाबत असतात, तशा तक्रारी शनि-शिंगणापूरबद्दल यापूर्वी वृत्तपत्रांतून अनेकदा छापून आल्या आहेत. शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावयाचा असतो. ते गोडेतेल दुप्पट दराने विकले जाते (रोज एका भाविकाकडून अर्धा लिटर असे जवळपास दोन हजार अभिषेक होतात. १ हजार लिटर तेल म्हणजे १०००x६० = ६०,००० रुपये रोज अक्षरश: वाया जातात.) पूजेच्या वेळची सोवळी भाड्याने देणे, पूजेच्या वस्तू, वाहनांचे पार्किंग, खाद्यपदार्थ असे अनेक आर्थिक हितसंबंध मजबूत निर्माण झाले आहेत. त्या सगळ्यांनाच थेट धक्का बसण्याचा प्रश्न निर्माण झाला.
बजरंग दल, शिवसेना आदींनी आंदोलनाची आगखाऊ घोषणा केली. महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती अशी आहे की, भावनांना हात घालणारे भडक कार्यक्रम ही या संघटनांच्या अस्तित्वाची गरज निर्माण झाली आहे. शिवाय अशा चळवळी चालवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा देणारे लोक अनायसे तयारच होते. त्यामुळे तीही अनुकुलता होती. स्थानिक आमदार शिवाजीराव कर्डिले हे अपक्ष आहेत. ते पुन्हा निवडून येण्याची शक्यता खूप कमी मानली जाते. त्यामुळे त्यांना लोकमताला पेटवणारे काही हवेच होते. शासनाने हा प्रश्न निव्वळ कायदा व सुव्यवस्थेचा मानला. त्यातही ही अंधश्रद्धा आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनाच वाटत नव्हते. सत्यशोधकी अधिवेशनाचे मुख्य प्रवर्तक, स्थानिक नेते यशवंतराव गडाख यांनी बोटचेपी भूमिका घेतली आणि माझे निमंत्रण रद्द करून परिषद वाचवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाने याबाबत एक ‘ब्र’ देखील उच्चारला नाही. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे क्षुब्धतेचे दर्शन.
विचारमंथनाचे मुद्दे
ज्या चमत्काराने चांगले काही घडत आहे, त्याला विरोध कशाला? हा अनेकांच्या मनातील सवाल आहे. त्याचे उत्तर असे - खरोखरच असे घडत असले तरी ती गोष्ट वेगळी होती. प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे आणि हे समितीने वारंवार मांडले आहे आणि ते सिद्धही केले. याबाबत नि:पक्षपाती तपास केव्हाही करता येईल. दैवी चमत्काराच्या नावाने दांभिकता तर वाढतेच; परंतु चोरी करणाऱ्यांचे डोळे जातात वा तो भ्रमिष्ट होतो, या कल्पनेतून (चोऱ्या न थांबताच) शनिदेवाभोवती चमत्काराचे वलय तयार झाले. प्रसारमाध्यमांनी ते घट्ट केले. चमत्कार मान्य करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारणे. हा दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे घटनादत्त कर्तव्य आहे. शासनाचे शैक्षणिक धोरण, मूल्यसंस्कार शिक्षण यातही वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राधान्य आहे. त्यामुळे चमत्काराच्या चिकित्सेची मागणी अत्यंत योग्य ठरते. शनिदेवावरील भाविकांच्या भक्तीचा समिती आदर करते. प्रश्न आहे तो दैवी चमत्काराचा. (जसे -गणपतीवरील श्रद्धा मान्य असली, तरी गणपती दूध पितो या चमत्काराला विरोधच करावा लागतो.) दैवी चमत्कार घडतातच, ही श्रद्धा बाळगण्याचा जर अधिकार असेल तर विज्ञानाचे नियम ओलांडणारे चमत्कार घडत नाहीत ही श्रद्धा बाळगण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा समितीचा अधिकार आहे. असे असताना काळे फासणे, प्रतिमा जाळणे, प्रवेश नाकारणे ही दंडेली कशासाठी? खरे तर एकाच व्यासपीठावर याबाबत जाहीर वादविवाद करण्याचे माझे आवाहन संबंधितांनी स्वीकारावयास हवे होते. विश्वस्तांनी अनुमती दिल्यास माझ्या पत्नीसह इतर अनेक कार्यकर्ते शनिच्या चौथऱ्यावर चढून दैवी कोपाची प्रचिती तपासण्यात तयार असताना तर संबंधितांनी स्वत:च्या दैवी चमत्काराच्या सत्यशोधनाची तयारी ठेवावयास हवी होती. स्त्रियांना देवाच्या चौथऱ्यावर असलेला मज्जाव व अभिषेकासाठी काढण्यात येणाऱ्या विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायलाही मज्जाव ही बाब अनुचित आहे हे मात्र बहुतेकांना पटले आहे. तिसरा एक मुद्दा असा की, थेट हल्ला कशाकरिता? हा व्यूहरचनेचा, मतभेदाचा मुद्दा होऊ शकतो. या प्रकरणात जे काही घडले ते या थेट सवालातूनच. सत्यशोधनाला अशी परवानगी नाकारणे म्हणजे दैवी चमत्काराच्या सत्यतेबद्दल स्वत:ची साशंकताच जाहीर करणे आहे, हे अनेकांना आपोआपच समजून येईल.

या सर्व वादविवादात एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सत्यशोधकी समाज, महात्मा फुलेंचे अनुयायी स्वत:ला म्हणवून घेणारे अनेकजण, व्यक्तिस्वातंत्र्याचे पाठीराखे यांनी कोणीही याबाबत ताबडतोब कोणतीही लेखी वा तोंडी प्रतिक्रिया माझ्याकडे दिली नाही. महाराष्ट्रभर पसरलेल्या समितीच्या शाखातील कार्यकर्त्यांनाच ही लढाई लढावी लागली.
पत्रकार परिषदेतील समितीचे निवेदन
अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांच्या उपासना स्वातंत्र्याचा आदर करते; मात्र याचा संबंध चमत्काराशी आहे, असे समितीला वाटत नाही. शनि-शिंगणापूर गावात चोरी करणाऱ्या व्यक्तीचे डोळे जातात अथवा तो भ्रमिष्ट होतो किंवा त्याला देव अद्दल घडवतो. हे सर्व चमत्कार शनिदेवाच्या प्रभावाने होतात, असे तेथील ग्रामस्थांना वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती दैवी चमत्कार मानत नाही. त्यांना ही समज अंधश्रद्धा वाटते. अशी मतभिन्नता समाजात राहणारच. याबाबत सत्य वा अहिंसा या दोन तत्त्वांच्या आधारे व्यवहार व्हावा, असे समितीला वाटते. अहिंसा याचा अर्थ असा की, दोन्ही बाजूंना स्वत:ची मते मांडण्याची मुभा असली पाहिजे. त्याबाबत कोणीही हिंसक पद्धतीने वागता कामा नये. दुसरा मुद्दा असा की, सत्यशोधन करण्याची व त्यातून सिद्ध होईल ते स्वीकारण्याची मनमोकळी तयारी दोन्ही बाजूंनी ठेवावयास हवी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रथमपासून त्या दोन्ही निकषांचे पालन केले आहे. तरीही सत्यशोधन करणे ही गोष्ट समिती संबंधितांच्या अनुमतीनेच करते. संबंधितांचा विरोध असेल तर हे सत्यशोधन होत नाही. मात्र वैचारिक मतप्रदर्शन होत राहते. जे शनि-शिंगणापूरबाबत गेली काही वर्षे समिती करत आहे व करत राहील.
या स्वरुपाचे एक उदाहरण काही वर्षांपूर्वी डुंगेश्वर देवस्थान (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे घडले आहे. तेथील देवाला भक्तांनी असंख्य घंटा अर्पण केल्या आहेत. देव व घंटा दोन्हीही खुल्या मोकळ्या जागेवर आहेत. येथील घंटा कोणीही उचलून घेऊन गेले, तर संबंधित व्यक्तीला असह्य वेदना होऊन महिन्याच्या आत तो शरण येतो व घंटा परत आणून देतो. हा चमत्कार आहे, असे तेथील ग्रामस्थांचे मत होते. त्यांची अनुमती घेऊन तेथील चौदा घंटा समितीने उचलून आणल्या. चार महिने विविध कार्यकर्त्यांच्याकडे ठेवल्या. त्यापैकी एकाही कार्यकर्त्याला काहीही झाले नाही. नंतर त्या पुन्हा देवस्थानला दिल्या. अर्थात, शनि-शिंगणापूर ग्रामस्थांची अनुमती असल्यासच दैवी चमत्काराची चाचणी होऊ शकते, अशीच समितीची भूमिका आहे.

बहुजन समाजाला अज्ञ समजुतीत गुरफटून ठेवल्यामुळेच त्याचे शोषण होते, असे महात्मा फुले यांचे मत होते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नेवासा येथे होत असताना हा प्रश्न उपस्थित करणे आम्हाला औचित्यपूर्ण वाटते.
देवाची पूजा व त्याच्या अभिषेकाचे पाणी यामध्ये स्त्रियांना मज्जाव करण्याची परंपरा प्राचीन असली तरी समर्थनीय नाही. लिंगभेदाने दिली जाणारी ही विषम वागणूक देवत्वाच्या कल्पनेशीच विसंगत आहे, असे समितीचे मत आहे. त्यामुळे विहिरीवरील मनाईच्या पाट्या व पूजेला प्रतिबंध या गोष्टी देवस्थानच्या विश्वस्तांनी मोठ्या मनाने स्वत:हून दूर कराव्यात, असे समितीचे त्यांना आवाहन आहे. आवश्यकता पडल्यास याबाबत एक मोठी महिला परिषद समितीतर्फे नगर येथे यथावकाश घेण्यात येईल.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जानेवारी १९९९)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...