सत्याग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्याग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

वाचन मनन, चिंतन



वाचन मनन, चिंतन     
दाभोलकर, सत्याग्रह, पशुहत्याविरोध, वाचन
१७ फेब्रुवारीला बार्शीला पोचलो. १८ तारखेला चाळीसजणांसह निपाणीकरांच्या नेतृत्वाखाली चिवरीच्या यात्रेत सत्याग्रहासाठी दाखल झालो. मागच्या वर्षीच्या आठवणी मनात जाग्या होत्या. निवडणुकीच्या प्रचारासारखी रणधुमाळी मागील वर्षी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात उठवली होती. शासनाची साथ होतीच. देवीसमोरच्या जागेवरचे बळी थांबले हे खरे; पण बाजूबाजूला हजार-बाराशे पशुहत्या झालीच. शिवाय दुसऱ्या दिवशी भुताच्या यात्रेच्या वेळी प्रबोधन करणाऱ्या सत्याग्रहींना मार खावा लागला. या वर्षी काय होणार याचे प्रश्नचिन्ह मागील वर्षीपेक्षा मोठे होते. मागील वर्षीची स्थिती यावर्षीही कायम राहावी, असा आपला आग्रह होता. यंदा पशुहत्या करावयाचीच, असा शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना अट्टाहास होता. शासन सांगत होते की, प्रबोधन मोहीम चालवू नका, सत्याग्रह करू नका, आम्ही सारे बघून घेतो. अशा तणावाच्या वातावरणात लाख-दीड लाखाच्या यात्रेत काय होणार, याचा दबाव आणि चिंता सर्वांनाच होती. १८ तारखेला सकाळी यात्रास्थळावर गाडी पोचली आणि लक्षात आले प्रश्न खरा सोडवलाय भाविकांनीच, यात्रेकरूंनीच. म्हणजे असे की, ते यात्रेला फिरकलेच नाहीत. लाखाची यात्रा मांडली जाणाऱ्या त्या विस्तीर्ण माळरानावर जेमतेम पाच-दहा हजार यात्रेकरूच आले होते. अनेक गावांत तर आठवडा बाजाराला यापेक्षा जास्त गर्दी असते; शिवाय येताना त्यांनी रेडे, बकरी, कोंबड्या काहीच आणले नव्हते. त्यामुळे हत्या होण्याची शक्यता मुळातच निकालात निघाली होती. तापलेल्या वातावरणाचा हा सारा अप्रत्यक्ष परिणाम होता.

मला आणि सोबतच्या अनेकांना प्रश्न पडला. यात्रा जवळपास मोडलीच. हे चांगले घडले की वाईट? योग्य की अयोग्य? यात्रेतील पशुहत्या थांबायला हवीच, अंगात येऊन बेभान घुमणे बंद व्हायला हवेच, याबद्दल शंकाच नाही. पण यापलिकडे जाऊन यात्रा भरण्यालाच आपला विरोध आहे का? यात्रा म्हणजे त्याला येणाऱ्यांच्या दृष्टीने जणू स्नेहसंमेलनच. हजारोंच्या संख्येने जथ्थ्या-जथ्थ्याने येऊन लहानमोठे, पुरुष-बाया, अडाणी, ग्रामीण समाजाला सामुदायिक आनंद लुटण्याचे ठिकाण म्हणजे त्यांच्या यात्रा. त्यामध्ये पशुहत्या होऊ नये हे बरोबर; पण पूर्ण यात्राच बंद पडणे किती श्रेयस्कर? आपला विरोध नेमका कशाला? उत्तर वाटते तितके सोपे नाही; पण टाळता येणारेही नाही. आपण साऱ्यांनीच स्वत:च्या विचाराला यासाठी ताण द्यावयास हवा. तो तुम्ही द्यावा, मनमोकळेपणाने यावर बोलावे, लिहावे असे मला आग्रहाने सुचवावेसे वाटते.
मुंबईला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. जहागीरदार यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. ते अलिकडेच निवृत्त झाले. विवेकनिष्ठ, वैज्ञानिक विचारसरणीचे न्या. जहागीरदार हे कृतिशील उपासक. खंदे पुरस्कर्ते. निवृत्तीनंतर न्यायमूर्तींना या ना त्या स्वरुपात सन्मानित कामे व पदे सहज मिळतात; पण जहागीरदार यांनी निर्णय घेतला की, वेळ फक्त वाचन-मननात घालवायचा आणि एवढेच नाही, तर आपल्याला कोणीही कार्यक्रमाला बोलवले तर आपल्या खर्चाने सामाजिक भावनेने जायचे. त्यांना वाटते, निवृत्ती आधीच घेतली असती तर बरे झाले असते. कारण वाचायला महासागर पडलाय आणि वेळ तर इतका अपुरा. मी त्यांना विनंती केली, दर महिन्यातून एखादा दिवस मुंबईतील आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही तुमच्या या वाचनातले काही कण देत चला. त्यांनी ती आनंदाने मान्य केली.

मला वाटतं, आपला प्रश्न दुहेरी आहे. महाराष्ट्रात फिरताना मला सतत जाणवतं की, कार्यकर्त्यांचे नवे मराठी वाचनही थांबले आहे. मग त्यांचे मनन, चिंतन आणि स्वत:च्या मांडणीत त्याचा समावेश तर दूरच राहिला. हा विचारांचा शिळेपणा घालवायला निर्धारपूर्वक कंबर कसायला हवी. चळवळ पुढे जाते आहे आणि कार्यकर्ता विचारात मागे रेंगाळतो आहे, हे चित्र बदलावयास हवे. पण समजा अगदी नाहीच झाला वेळ तर निदान आपापल्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील अशा कार्यकर्त्यांना, मित्रांना आणि सहानुभूतीदारांना एकत्र घेऊन महिन्यातून किमान एकदा तरी एक बैठक घ्यावी आणि आपल्याकडे असलेल्या चळवळीवरील एखाद्या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करायला हरकत नाही. सुरुवातीला एखादा विषय घ्यायचा, त्यावर वाचन करायचे, चर्चा करायची, असा प्रयत्न केला तरी विचारांची देवाणघेवाण होईल. पुढच्या बैठकीकरिता प्रत्येकाने काहीतरी वाचन करून यायचे आणि मग त्यावर चर्चा करायची. या चर्चेच्या अनुरोधाने आपल्या समोरील प्रश्नांकडे पाहण्याची एक वैचारिक पातळी निर्माण होण्यास मदत होईल. 
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९२)

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

यात्रेतील पशुहत्येचा गळफास सोडवताना...



यात्रेतील पशुहत्येचा गळफास सोडवताना...

दाभोलकर, यात्रेतील पशुहत्या, सत्याग्रह
महाराष्ट्रात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. नवस फेडण्यासाठी दिले जाणारे प्राण्यांचे बळी हे यापैकी अनेक यात्रांचे समान वैशिष्ट्य आहे. प्रचंड पशुहत्या, कमालीची अस्वच्छता, अंगात येणाऱ्या स्त्रियांची झुंबड यामध्ये लाख-दोन लाख लोक सुखाने वावरत असतात. लक्षावधीच्या त्या जनसमुदायाला या प्रथेमागचे शोषण व अमानुषपणा जाणवतच नाही. उलट त्यांना ती प्रथा पाळणे हाच धार्मिक आचार व अधिकार वाटतो. भाविक परंपरा जपणारे आणि ती मानाने मिरवणारे असतात. त्यांना या प्रकाराविरोधात समजावण्यासाठी कशाला वेळ, श्रम व पैसा फुकट घालवायचा?  गाडगेमहाराजांनी जेथे गुडघे टेकले, तेथे तुम्ही कोण लागून गेलात?’ या शेरेबाजीची आता सवय झाली आहे. या चळवळीवर एक आक्षेप हिंदुत्ववादी हेतुपुरस्सर घेतात. त्यांचे मत असे की, बकरी ईदला हजारो बोकडांचा बळी दिला जातो. त्याविरुद्ध न बोलता तुम्ही आमच्याच धर्मामागे का लागता?’ याचे एक उत्तर असे आहे की, हिंदू धर्म असे मानतो की, प्रत्येक प्राणिमात्रात देव आहेच. स्वाभाविकच बोकडाचा जीव सुरी मानेवर फिरवून घेतला जातो, त्यावेळी त्यामध्ये असलेल्या देवाचा आपण काय विचार करतो? आपण आपल्याच धर्मातील उदात्ततेचे अवमूल्यन करीत नाही का? हा प्रश्न खरे तर प्रत्येक हिंदू अभिमान्यांनी स्वतःला विचारावयास हवा. अर्थात, परवडत नसताना सणवार म्हणून किंवा कर्जबाजारी होऊन बोकड बळी देणे ही कोणत्याही धर्मात असो अंधश्रद्धाच आहे. कारण ते गरिबाला गरीब ठेवण्याचे हुशारीने रचलेले कट-कारस्थान आहे. सर्व विरोधासह समितीने आजपर्यंत यात्रेमध्ये होणाऱ्या पशुहत्या सुमारे दीडशे ठिकाणी थांबवल्या आहेत. ही गोष्ट खरीच आहे की, हे यश मर्यादित आहे. कारण पशुहत्या होणाऱ्या यात्रांची संख्या महाराष्ट्रात जवळजवळ तीन ते चार हजार एवढी जास्त आहे. शिवाय ज्या ठिकाणी आम्ही पशुहत्या थांबवतो, त्या ठिकाणी यात्रेचे दिवस सोडून चुपचुपके ती सुरूच राहते. या साऱ्या मर्यादांना घेऊन आम्ही लढत आहोत.
यात्रेतील पशुहत्या म्हटली की, मला चिवरी (जि. उस्मानाबाद) येथील चित्तथरारक अनुभव आठवतो. त्याला बरोबर दोन दशके झाली. आम्ही सत्याग्रह केला, त्याच्या आदल्या वर्षी त्या यात्रेत पाच हजार बोकड आणि दहा हजार कोंबड्या मारल्याच्या यात्रा समितीच्या पावत्या फाटल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूर्ण महिनाभर धडक प्रचार मोहीम राबवली. आलुरे गुरुजी या गांधीवादी माजी आमदारांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह चांगली साथ दिली. यात्रेला येणारे बहुसंख्य भाविक अनुसुचित जाती व भटक्या विमुक्त जातीमधील होते. त्यामुळे मागास समाजाच्या वस्ती-वस्तीतून या प्रथेविरोधात रान उठवले. प्रतिसाद चांगला होता. पण एके ठिकाणी मार खावा लागला, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाला. स्थानिक वृत्तपत्रांनी विषय उचलून धरला आणि यात्रेच्या आदल्या दिवशी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांनी चिवरीत बैठक घेऊन पशुहत्येला कायद्याने बंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. वातावरणात प्रचंड ताण आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रा सुरू झाली. झुंडीझुंडीने भाविक लक्ष्मीआईच्या देवळाकडे येऊ लागले. देवळाच्या उजव्या बाजूला पोलिसांचा भला मोठा फौजफाटा होता. त्या ठिकाणी ‘सार्वजनिक ठिकाणी पशुहत्या हा गुन्हा आहे, तो केल्यास दंड व शिक्षा दोन्ही होऊ शकते,’ असा इशारा वारंवार दिला जात होता. भाविकांकडील बोकड, कोंबड्या पोलीस जप्त करत होते. कार्यकर्ते देवळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. ग्यानबा तुकाराम, बोकडाचे काय काम ही घोषणा करत गाणी म्हणत हँडबिल वाटत कार्यकर्त्यांचे काम चालू होते. ताटात चपात्या, गूळ, भात, नारळ असा नैवेद्य घेऊन भक्तांच्या रांगा पुढे सरकत होत्या. पशुहत्या पूर्णपणे बंद होती. देवळाच्या समोर तरण्याताठ्या मुलीपासून ते म्हाताऱ्या बायांपर्यंत सर्व वयातील स्त्रिया आळोखे-पिळोखे देत कपड्याची शुद्ध न बाळगता बेभानपणे घुमत होत्या. त्यांच्याच बाजूला हलगी-ताशे याच्या कडकडण्यात चिंध्याचा घागरा, हातात आसूड, मोकळे केस, पायात चाळ आणि पूर्ण चेहऱ्यावर शेंदरासारखा गडद रंग फासून डझनवारी पोतराज घुमत होते. दुपारी १२ वाजता काशिनाथ घोडके नावाचा तरुण शंभर-दीडशे जणांच्या घोळक्याने जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत मंदिरासमोर आला. हात उंच करून पकडलेले कोंबडे देवीसमोरच बळी देण्याचा त्याचा हट्ट होता. त्याला पोलिसांनी बाजूला घेतले. वातावरण तणावपूर्ण बनत गेले. कोंबडे मारावयास दिले जाणार नाही, याची खात्री पोलीस, आम्ही सत्याग्रही आणि काशिनाथ व त्याचे साथीदार या सर्वांनाच पटली... आणि मग अगदीच अनपेक्षित घडले ! तोंडाला शेंदूर फासून घुमणाऱ्या एका पोतराजाने काशिनाथच्या हातातून कोंबडे हिसकावून घेतले. त्याची मान स्वतःच्या दाताखाली घातली. ती कचाकचा चावली. ती धडापासून वेगळी केली. धड फेकून दिले. कोंबडीचा मानेपासूनचा पुढचा भाग तसाच स्वतःच्या तोंडात धरून ठेवला. त्यातून गळणारे रक्त काशिनाथच्या सहकाऱ्यांनी हातावर घेतले. काशिनाथच्या कपड्यावर त्यांचे पंजे उमटवले आणि हिंदू धर्म की जय अशा घोषणा देत काशिनाथला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली. आम्ही तक्रार नोंदवूनही पोलिसांनी याबाबत कारवाई करण्याचे टाळले. यानंतर माळरानावर पसरलेल्या काही भाविकांनी ही परवानगी समजून आपल्या सुऱ्या सरसावल्या. जवळपास पाच-सहाशे बकऱ्या व हजारभर कोंबड्या कापल्या गेल्या. पोलिसांनी काही ठिकाणी सुऱ्या आणि कातडे जप्त केले खरे; पण त्यांनी प्रामुख्याने मंदिरासमोरच्या मैदानावरच आपले लक्ष केंद्रित केले. यात्रेतील पशुहत्या रोखण्याचे एक पाऊल पुढे पडले, यात आम्ही समाधानी होतो.

मात्र हे समाधान फार दिवस टिकले नाही. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी तेथे भुताची यात्रा भरते. कारण पशुहत्येतील रक्त आणि हाडे खायला भुते येतात म्हणे! या कल्पनेचा पगडा इतका जबर की, लाखाची यात्रा दुसऱ्या दिवशी दुपारी चारपर्यंत खाली होत असे. जगात भूत कुठेच नसते, असे मानणारे आम्ही ‘अंनिस’वाले. आम्ही असे ठरवले की, दुसऱ्या दिवशी यात्रेच्या ठिकाणी रात्रभर मुक्काम करायचा आणि भूत नसते, याची प्रचिती सर्वांना द्यायची. कार्यकर्ते सायंकाळी ६ पासून पहाटे चारपर्यंत जागेवर थांबले. पहाटे परत निघाले, त्यावेळी पुढे काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. रात्री चिवरी गावात यात्रेचे नाटक होते. तेथे सत्याग्रहींच्यावर आग ओकणारी भडक भाषणे झाली. अद्दल घडवण्याचा संकल्प ठरला. मग पहाटे सत्याग्रह आटोपून यशस्वीपणे परत येणाऱ्या सत्याग्रहींची वाहने रस्ते दगड टाकून अडविण्यात आली. काचा फोडण्यात आल्या, वाहनांची मोडतोड झाली. कोणाच्या डोक्याला मारहाणीने टाके पडले, तर कोणाच्या हाताचे हाड मोडले. मात्र या सुनियोजित भ्याड हल्ल्याचा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र विरोध झाला आणि पोलिसांनीही संबंधितांना पकडून योग्य ती कारवाई केली.
परंतु अशा अडचणींना न जुमानता पशुहत्येविरोधात संघर्ष करण्याचा ‘अंनिस’चा निर्धार कायम आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मार्च २०१३)


मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

चिकित्सेचे धर्मकारण की प्रसिद्धीचे राजकारण?



चिकित्सेचे धर्मकारण की प्रसिद्धीचे राजकारण?

दाभोलकर, सत्याग्रह, धर्मचिकित्सा, पुरोहितशाही
धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी, असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. धर्माचा अभिमान- अस्मिता- अभिनिवेश- अहंकार अधिकाधिक बलवान करण्याचा प्रयत्न सर्वच धर्मांत चालू आहे. देवळात जाणे, यात्रा करणे, धर्माची प्रवचने-कीर्तने, देवतांचे व धर्माचे उत्सव यांचे उदंड पीक समाजात आले आहे. त्याकडे धर्मातील सर्वसामान्य समाजच नव्हे, तर सुशिक्षित तरुण पिढीही आकर्षित झालेली दिसते. संतांनी धर्मभावना नैतिकतेकडे वळवली. ती आता धर्मांधतेकडे वळवली जात आहे; शिवाय हा सर्व अब्जावधी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करणे सुरू आहे. लोकांच्या प्रश्नावर काम करून मते मागण्याऐवजी लोकांची धर्मभावना उद्दीपित करून व ठेवून सत्तेकडे जाण्याचा राजकीय शॉर्टकट शोधला जात आहे.
धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीसाठी धर्मचिकित्सा अपरिहार्य बनते. याच भावनेतून शनि-शिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना असलेला बंदीप्रवेश उठवावा, यासाठी २००० मध्ये महाराष्ट्रात सत्याग्रह झाला. या कल्पनेला भाजप व शिवसेना या पक्षांच्या सर्व आघाड्यांनी टोकाचा विरोध केला. वातावरण इतके प्रक्षुब्ध होते की, नगरहून ५० किलोमीटवर असलेल्या शनि- शिंगणापूरकडे निघालेल्या हजार सत्याग्रहींना नगरपासून अवघ्या ५० पावलांवर अटक झाली. त्यामध्ये प्रा. एन. डी. पाटील, डॉ. श्रीराम लागू, डॉ. बाबा आढाव, प्रा. पुष्पाताई भावे अशा दिग्गजांचा समावेश होता. त्यामुळेच नंतर शनि-शिंगणापूर व अंबाबाईच्या गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली. ती आता सुनावणीच्या अंतिम टप्प्यावर आहे.
एवढ्यात अगा नवल वर्तले याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत अंबाबाईच्या मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्याची मागणी केली आणि नंतर दोनच दिवसांत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष सहकाऱ्यांना घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात घुसल्यादेखील. यामागे प्रसिद्धीचा भाग आहेच; पण स्त्री-पुरुष समतेच्या आग्रहाची तात्त्विक झालरही त्याला आहे. परंतु ही घटना अधिक गांभीर्याने पाहावयास हवी, ती व्यापक व साक्षेपी धर्मचिकित्सेच्या अंगाने.
असा एक प्रश्न सहजच विचारता येण्यासारखा आहे की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिदे, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या सर्वांनी कठोर धर्मचिकित्सा करूनही धर्मभावनेलाच नकार का दिला नाही? आढळते ते असे की, या सर्वांनी धर्माचा विचार आस्थेने व शोध घेण्याच्या बुद्धीने केला. त्यामधून त्यांनी समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला. परलोकवादी धर्म इहलोकवादी केला. ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला. धर्माचे भ्रष्टीकरण व साधनीकरण होण्याचे भय वाढले आहे. अशा वेळी तर या स्वरुपाची विधायक धर्मचिकित्सा हा महत्त्वाचा प्रश्न मानावयास हवा.
महाराष्ट्रातील आजच्या प्रबोधनातून हा प्रश्न जवळजवळ रद्दबातल झाला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या अंगाने तो उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी धर्माचे अघोषित प्रवक्ते त्याला तीव्र व हिंसक विरोध करतात. समाजाचे धारण करतो तो धर्म ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. जगात असा आदर्श धर्म कुठेही नाही. पण प्रत्येक धर्म स्वत:ला आदर्श मानतो. समाजाचे कल्याण कशामुळे होते? ते प्रत्यक्षात होते की नाही, हे प्रत्येक धर्म स्वत: ठरवत असतो. आमचा धर्म धारणा करणाराच आहे, असा प्रत्येक धर्माचा ठाम सिद्धांत असल्याने धर्माने धारणा होते की नाही, ही शंका उपस्थित करणे धर्मद्रोहाचे लक्षण असते. धर्मासंबंधातील वादाचा खरा मुद्दा आदर्श धर्म कसा असावा, हे सांगणे नाही तर धर्म आदर्श नसल्यास तसे ठरवावे कोणी आणि ते बदलावे कोणी हा आहे. कोणताच धर्म असे अधार्मिक व धर्मद्रोही प्रश्न उपस्थित करू देणार नाही. भारताची राज्यघटना आज समाजाची धारणा करते, म्हणून राज्यघटनेला धर्मग्रंथ मानण्यास व त्यातील आदेशाला धर्म मानण्यास कोणताही धार्मिक तयार होत नाही. धर्मचिकित्सा सुरू केली की धर्माचा पगडा असलेल्या फार मोठ्या जनसमूहाला ही धर्मचिकित्सा म्हणजे धर्मद्रोह वाटतो.
व्यवहारात जी धार्मिकता असते त्यात प्रथा, रूढी, कर्मकांडे, उपासना, पुरोहितशाही व अहिंसा, सत्य, अपरिग्रह ही मूल्ये व याचबरोबर समाजव्यवस्थेचे नियमन असे सर्वकाही असते; या सर्वांच्या मिलाफातूनच धर्म साकार होतो. असे धर्मपण व्यक्तिमानसात, समाजमानसात एकवट मुरलेले असते. धर्मनिरपेक्ष पद्धतीने समाज घडवताना धर्माच्याच नावाने बळकट झालेल्या रूढी, परंपरा सर्वच धर्मांत प्रगतीचे अडथळे ठरतात. चुकीच्या मार्गाने समाजाला नेतात. कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मस्तकावर नागलिंगयोगी हे तांत्रिक स्वरुपाचे चिन्ह आहे. या प्रकारच्या मूर्तीची पूजा महिलांना नाकारली जाते, हे आक्षेपार्ह मानून तेथे सत्याग्रह झाला हे चांगलेच झाले; पण मग मुलगी ही दानपात्र वस्तू समजून मोठ्या हौसेने कन्यादान केले जाते, स्वत:च्या पोटात मूल वाढवणाऱ्या आईला वैधव्यामुळे तो (चुकीचा) हक्कही नाकारला जातो. हळदी-कुंकवात विधवेला अघोषित मज्जाव असतो आणि शुभकार्यात तिचे पांढरे पाऊल न पडेल, याची दक्षता घेतली जाते. मासिक पाळीच्या शरीरधर्मात स्त्री सर्व धर्म व मंगल कार्यात अपवित्र असते. या सर्वच बाबींना सक्रिय विरोध करणे आवश्यक आहे.
धर्माची चिकित्सा सुरू झाली की, पुरोहितशाही तपासावी लागतेच. परमेश्वराला जे-जे काही द्यावयाचे ते पुरोहितामार्फत देण्यात येते. व्यवहारात पुरोहितच त्याचा उपभोग घेतो, अशी ही दलाल व्यवस्था आहे. देवाची जी गुणवैशिष्ट्ये आणि थोरवी वर्णिली जाते, त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी कोणत्याही स्वरुपातील मध्यस्थाची कल्पना ही अनावश्यक व विसंगत ठरते. पुरोहित स्वत:चे घट्ट हितसंबंध तयार करतात. महिलांना महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारणारे तेथील पुजारी स्वत:च्या घरातील स्त्रियांना मात्र पूजेची मुभा देतात. त्या वेळी पुरोहितशाहीच्या ढोंगाचे दर्शन होते. विधायक धर्मचिकित्सेबरोबर पुरोहितशाहीला तडाखा देखील देणे आवश्यक आहे. समाजमानसाच्या दबावाखाली पुजारीवर्गाने माघार घेतली आहे, हे खरे; पण हे पुरोहितांचे मतपरिवर्तन नव्हे, नाईलाजाने केलेले आचरण आहे. तसे नसते तर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातील याबाबतच्या जनहित याचिकेत महिलांना गाभारा प्रवेशबंदीचे समर्थन करणारे जे प्रतिज्ञापत्र दाखल केले, ते मागे घेतले असते.
या पलिकडे देखील धर्मचिकित्सेचा एक गंभीर पैलू राहतो, सर्व धर्मांत ज्याला खरा धर्म म्हणतात, त्यात सर्व बाबींचे पवित्र-अपवित्र व लौकिक अशा तीन गटांत वर्गीकरण केलेले असते. उदा. धर्मग्रंथ, मंदिर, पुरोहित हे पवित्र; प्रेत, रजस्वला स्त्री अपवित्र. भाजीपाला, कागद या लौकिक वस्तू. सामान्य लौकिक अथवा अपवित्र वस्तूंचा व्यवहार हा पवित्र गोष्टीकडून नियत केला जातो, अशी धर्मकल्पनेची ठाम धारणा असते. ज्याला खरा धर्म मानले जाते, त्यामध्ये अपरिहार्यपणे अस्तित्वात असलेल्या पावित्र्याच्या या संकल्पनेमुळे वस्तूंच्या बाबतीत धर्मातील अंधश्रद्धेवर आधारलेली एक विषमता तयार होते. याच दांभिक पावित्र्य कल्पनेतून एक व्यक्ती जन्मजात इतकी पवित्र बनते की, तिच्या पायाचे पाणी घेतले तर ते तीर्थ असते. दुसरी व्यक्ती इतकी अपवित्र ठरते की, तिच्या सावलीचा विटाळ होतो. या विषमतेवर आघात करावयाचा तर धर्माच्या नीतीची निर्मिती ज्या पावित्र्याच्या कल्पनेतून झालेली असते, तीच नाकारावी लागेल. ती नाकारली तरच नीती म्हणजेच खरा धर्म, म्हणजेच सुरळीत समाजजीवन कोसळून पडेल, असा धाक दाखवला जातो. तेव्हा याबाबत अशी स्पष्ट भूमिका घ्यावयास हवी की, पावित्र्याची संकल्पना व नीतिमूल्ये यांच्यामध्ये अंतर असते. समाजधारणेसाठी पावित्र्याच्या संकल्पनेची आवश्यकता नाही. नीतिमूल्ये मात्र समाजधारणेला आवश्यक असतात. अर्थात त्याचे स्वरूप देश-काल सापेक्ष, परिवर्तनशील व न्याय आणि विवेकावर आधारलेले असे असते, असावयास हवे. समाजातील नीतिमूल्ये जर नीतीच्या नावाने कोणाचे अन्यायी हितसंबंध जपत असतील, कोणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवीत असतील; तर ती नीतिमूल्ये ही त्याज्यच मानावी लागतील. थोडक्यात, कोणताही खरा धर्म त्याला खरा आणि धर्म ही विशेषणे प्राप्त करून घ्यावयाची असतील, तर पावित्र्याच्या संकल्पनेच्या आधारे विषमतेचे समर्थन करणारी मूल्ये स्वीकारावयास सांगू शकत नाही.

ही सर्व धर्मचिकित्सा भारतीय जनता पक्षालाच काय; पण मनसेला आणि दोन्ही काँग्रेसनाही न पचणारी, न परवडणारी आहे. महाराष्ट्रातील अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांच्या विरोधातील कायदा तब्बल १६ वर्षे एकमेकांकडे बोट दाखवत या पक्षांनी बासनात बांधून ठेवला आहे. अशा वेळी महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या धडक मोर्चाने एक पाऊल पुढे पडले असले तरी त्याकडे चिकित्सेचे धर्मकारण याऐवजी प्रसिद्धीचे राजकारण असेच पाहावे लागते.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मे २०११)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...