शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

यात्रेतील पशुहत्येचा गळफास सोडवताना...



यात्रेतील पशुहत्येचा गळफास सोडवताना...

दाभोलकर, यात्रेतील पशुहत्या, सत्याग्रह
महाराष्ट्रात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. नवस फेडण्यासाठी दिले जाणारे प्राण्यांचे बळी हे यापैकी अनेक यात्रांचे समान वैशिष्ट्य आहे. प्रचंड पशुहत्या, कमालीची अस्वच्छता, अंगात येणाऱ्या स्त्रियांची झुंबड यामध्ये लाख-दोन लाख लोक सुखाने वावरत असतात. लक्षावधीच्या त्या जनसमुदायाला या प्रथेमागचे शोषण व अमानुषपणा जाणवतच नाही. उलट त्यांना ती प्रथा पाळणे हाच धार्मिक आचार व अधिकार वाटतो. भाविक परंपरा जपणारे आणि ती मानाने मिरवणारे असतात. त्यांना या प्रकाराविरोधात समजावण्यासाठी कशाला वेळ, श्रम व पैसा फुकट घालवायचा?  गाडगेमहाराजांनी जेथे गुडघे टेकले, तेथे तुम्ही कोण लागून गेलात?’ या शेरेबाजीची आता सवय झाली आहे. या चळवळीवर एक आक्षेप हिंदुत्ववादी हेतुपुरस्सर घेतात. त्यांचे मत असे की, बकरी ईदला हजारो बोकडांचा बळी दिला जातो. त्याविरुद्ध न बोलता तुम्ही आमच्याच धर्मामागे का लागता?’ याचे एक उत्तर असे आहे की, हिंदू धर्म असे मानतो की, प्रत्येक प्राणिमात्रात देव आहेच. स्वाभाविकच बोकडाचा जीव सुरी मानेवर फिरवून घेतला जातो, त्यावेळी त्यामध्ये असलेल्या देवाचा आपण काय विचार करतो? आपण आपल्याच धर्मातील उदात्ततेचे अवमूल्यन करीत नाही का? हा प्रश्न खरे तर प्रत्येक हिंदू अभिमान्यांनी स्वतःला विचारावयास हवा. अर्थात, परवडत नसताना सणवार म्हणून किंवा कर्जबाजारी होऊन बोकड बळी देणे ही कोणत्याही धर्मात असो अंधश्रद्धाच आहे. कारण ते गरिबाला गरीब ठेवण्याचे हुशारीने रचलेले कट-कारस्थान आहे. सर्व विरोधासह समितीने आजपर्यंत यात्रेमध्ये होणाऱ्या पशुहत्या सुमारे दीडशे ठिकाणी थांबवल्या आहेत. ही गोष्ट खरीच आहे की, हे यश मर्यादित आहे. कारण पशुहत्या होणाऱ्या यात्रांची संख्या महाराष्ट्रात जवळजवळ तीन ते चार हजार एवढी जास्त आहे. शिवाय ज्या ठिकाणी आम्ही पशुहत्या थांबवतो, त्या ठिकाणी यात्रेचे दिवस सोडून चुपचुपके ती सुरूच राहते. या साऱ्या मर्यादांना घेऊन आम्ही लढत आहोत.
यात्रेतील पशुहत्या म्हटली की, मला चिवरी (जि. उस्मानाबाद) येथील चित्तथरारक अनुभव आठवतो. त्याला बरोबर दोन दशके झाली. आम्ही सत्याग्रह केला, त्याच्या आदल्या वर्षी त्या यात्रेत पाच हजार बोकड आणि दहा हजार कोंबड्या मारल्याच्या यात्रा समितीच्या पावत्या फाटल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूर्ण महिनाभर धडक प्रचार मोहीम राबवली. आलुरे गुरुजी या गांधीवादी माजी आमदारांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह चांगली साथ दिली. यात्रेला येणारे बहुसंख्य भाविक अनुसुचित जाती व भटक्या विमुक्त जातीमधील होते. त्यामुळे मागास समाजाच्या वस्ती-वस्तीतून या प्रथेविरोधात रान उठवले. प्रतिसाद चांगला होता. पण एके ठिकाणी मार खावा लागला, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाला. स्थानिक वृत्तपत्रांनी विषय उचलून धरला आणि यात्रेच्या आदल्या दिवशी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांनी चिवरीत बैठक घेऊन पशुहत्येला कायद्याने बंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. वातावरणात प्रचंड ताण आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रा सुरू झाली. झुंडीझुंडीने भाविक लक्ष्मीआईच्या देवळाकडे येऊ लागले. देवळाच्या उजव्या बाजूला पोलिसांचा भला मोठा फौजफाटा होता. त्या ठिकाणी ‘सार्वजनिक ठिकाणी पशुहत्या हा गुन्हा आहे, तो केल्यास दंड व शिक्षा दोन्ही होऊ शकते,’ असा इशारा वारंवार दिला जात होता. भाविकांकडील बोकड, कोंबड्या पोलीस जप्त करत होते. कार्यकर्ते देवळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. ग्यानबा तुकाराम, बोकडाचे काय काम ही घोषणा करत गाणी म्हणत हँडबिल वाटत कार्यकर्त्यांचे काम चालू होते. ताटात चपात्या, गूळ, भात, नारळ असा नैवेद्य घेऊन भक्तांच्या रांगा पुढे सरकत होत्या. पशुहत्या पूर्णपणे बंद होती. देवळाच्या समोर तरण्याताठ्या मुलीपासून ते म्हाताऱ्या बायांपर्यंत सर्व वयातील स्त्रिया आळोखे-पिळोखे देत कपड्याची शुद्ध न बाळगता बेभानपणे घुमत होत्या. त्यांच्याच बाजूला हलगी-ताशे याच्या कडकडण्यात चिंध्याचा घागरा, हातात आसूड, मोकळे केस, पायात चाळ आणि पूर्ण चेहऱ्यावर शेंदरासारखा गडद रंग फासून डझनवारी पोतराज घुमत होते. दुपारी १२ वाजता काशिनाथ घोडके नावाचा तरुण शंभर-दीडशे जणांच्या घोळक्याने जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत मंदिरासमोर आला. हात उंच करून पकडलेले कोंबडे देवीसमोरच बळी देण्याचा त्याचा हट्ट होता. त्याला पोलिसांनी बाजूला घेतले. वातावरण तणावपूर्ण बनत गेले. कोंबडे मारावयास दिले जाणार नाही, याची खात्री पोलीस, आम्ही सत्याग्रही आणि काशिनाथ व त्याचे साथीदार या सर्वांनाच पटली... आणि मग अगदीच अनपेक्षित घडले ! तोंडाला शेंदूर फासून घुमणाऱ्या एका पोतराजाने काशिनाथच्या हातातून कोंबडे हिसकावून घेतले. त्याची मान स्वतःच्या दाताखाली घातली. ती कचाकचा चावली. ती धडापासून वेगळी केली. धड फेकून दिले. कोंबडीचा मानेपासूनचा पुढचा भाग तसाच स्वतःच्या तोंडात धरून ठेवला. त्यातून गळणारे रक्त काशिनाथच्या सहकाऱ्यांनी हातावर घेतले. काशिनाथच्या कपड्यावर त्यांचे पंजे उमटवले आणि हिंदू धर्म की जय अशा घोषणा देत काशिनाथला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली. आम्ही तक्रार नोंदवूनही पोलिसांनी याबाबत कारवाई करण्याचे टाळले. यानंतर माळरानावर पसरलेल्या काही भाविकांनी ही परवानगी समजून आपल्या सुऱ्या सरसावल्या. जवळपास पाच-सहाशे बकऱ्या व हजारभर कोंबड्या कापल्या गेल्या. पोलिसांनी काही ठिकाणी सुऱ्या आणि कातडे जप्त केले खरे; पण त्यांनी प्रामुख्याने मंदिरासमोरच्या मैदानावरच आपले लक्ष केंद्रित केले. यात्रेतील पशुहत्या रोखण्याचे एक पाऊल पुढे पडले, यात आम्ही समाधानी होतो.

मात्र हे समाधान फार दिवस टिकले नाही. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी तेथे भुताची यात्रा भरते. कारण पशुहत्येतील रक्त आणि हाडे खायला भुते येतात म्हणे! या कल्पनेचा पगडा इतका जबर की, लाखाची यात्रा दुसऱ्या दिवशी दुपारी चारपर्यंत खाली होत असे. जगात भूत कुठेच नसते, असे मानणारे आम्ही ‘अंनिस’वाले. आम्ही असे ठरवले की, दुसऱ्या दिवशी यात्रेच्या ठिकाणी रात्रभर मुक्काम करायचा आणि भूत नसते, याची प्रचिती सर्वांना द्यायची. कार्यकर्ते सायंकाळी ६ पासून पहाटे चारपर्यंत जागेवर थांबले. पहाटे परत निघाले, त्यावेळी पुढे काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. रात्री चिवरी गावात यात्रेचे नाटक होते. तेथे सत्याग्रहींच्यावर आग ओकणारी भडक भाषणे झाली. अद्दल घडवण्याचा संकल्प ठरला. मग पहाटे सत्याग्रह आटोपून यशस्वीपणे परत येणाऱ्या सत्याग्रहींची वाहने रस्ते दगड टाकून अडविण्यात आली. काचा फोडण्यात आल्या, वाहनांची मोडतोड झाली. कोणाच्या डोक्याला मारहाणीने टाके पडले, तर कोणाच्या हाताचे हाड मोडले. मात्र या सुनियोजित भ्याड हल्ल्याचा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र विरोध झाला आणि पोलिसांनीही संबंधितांना पकडून योग्य ती कारवाई केली.
परंतु अशा अडचणींना न जुमानता पशुहत्येविरोधात संघर्ष करण्याचा ‘अंनिस’चा निर्धार कायम आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मार्च २०१३)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...