एक गाव-एक गणपती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एक गाव-एक गणपती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

गणेशमूर्ती दानामागील विधायकता


गणेशमूर्ती दानामागील विधायकता

दाभोलकर, गणपती मूर्ती दान, पर्यावरण, धार्मिक उत्सव, एक गाव-एक गणपती, विरोध
धार्मिक बाबतीत समाजमन संवेदनशील असते. सध्या तर ही संवेदनशीलता वाढावी, यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत. माणसांची धार्मिकता नैतिकतेऐवजी धर्मांधतेकडे वळवण्यात या शक्तींना रस असतो. धर्मांचे व्यापारीकरण, बाजारीकरण; प्रसंगी विकृतीकरण करून त्यांना आपले राजकारण साधावयाचे असते. लोकांची धार्मिक भावना हा या शक्तीचा लेखी जणू कच्चा माल असतो. त्याचे धर्मांधतेत रूपांतर झाले की, मतपेटीतील मताच्या रूपाने त्याचा पक्का माल तयार होतो. पुरोगामी शक्तींनी धर्माकडे पाठ फिरवली. धार्मिक उत्सवात इथल्या माणसाचे मन अधिकाधिक गुंतवायला निघालेल्या शक्तींना हे पथ्यावरच पडले. निर्माल्य व विसर्जित गणपती दान करा या एका कार्यक्रमाद्वारे यामध्ये काही लक्षणीय बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत अजून बरेच काही करावे लागेल, हे खरे; परंतु धार्मिक बाबतीत देखील मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद साधता येतो, हा अनुभव आश्वासक आहे.
मोहिमेची पार्श्वभूमी
गणेशमूर्तीसोबतचे निर्माल्य जमा करण्याच्या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. प्रथम कोल्हापूरला अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनांनी हा उपक्रम सुरू केला. प्रचंड प्रदूषित असलेल्या पंचगंगेच्या काठी राहणाऱ्या कोल्हापूरकरांनी तो उचलून धरला. पुढील दोन वर्षांत तो कोल्हापूर जिल्ह्यात पसरला. त्यानंतर आणखी तीन वर्षांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखांनी तो जवळपास २० जिल्ह्यांत पोचवला. आता हा जणू लोकउपक्रमच झाला आहे. ज्या ठिकाणी तो सातत्याने पाच वर्षे सुरू आहे, तेथे भाविकांना सांगावे लागतच नाही. ते स्वत:हून निर्माल्य जमा करतात. अनेक ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका स्वत:ची वाहने निर्माल्य जमा करण्यासाठी ठेवतात. बहुतेक ठिकाणी हे निर्माल्य खतासाठी वापरले जाते. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मिळून शब्दश: शेकडो टन निर्माल्य जमा झाले, असा अंदाज आहे. निर्माल्य दानानंतर चार वर्षांनी सुरू झालेली विसर्जित गणपती दान करा ही मोहीम पहिली दोन वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातच होती. गेल्या दोन वर्षांत ती महाराष्ट्रात सर्वदूर पोचली. यंदा तर तिला लोकचळवळीचे रूप आले. पर्यावरणाचे रक्षण व पाण्याचे वाढते प्रदूषण याबाबत लोकांत जागृती वाढत आहे, याचे हे एक सुचिन्ह आहे. याबाबतची सर्व माहिती लोकांच्यापर्यंत पद्धतशीरपणे पोचवण्याच्या समितीच्या प्रयत्नांचाही यात वाटा आहे. महाराष्ट्रात असलेल्या सुमारे दीड कोटी कुटुंबांपैकी साधारणपणे एक कोटी कुटुंबे तरी घरी गणपती बसवतात. यापैकी बहुतेक सर्व मूर्तींना रासायनिक रंग वापरले जातात. त्यामध्ये सोडियम ट्रायक्लोरोफायनेट, कार्बोक्सी मिथाईल सेल्युलोज अशी घातक द्रव्ये त्यात असतात. रंग बनवताना अत्यंत विषारी पोटॅशिअम सायनाईड वापरले जाते, तर रंग लवकर सुकावेत म्हणून जे पदार्थ वापरले जातात, त्यात पारा व शिसे असते. ही सर्व रासायनिक द्रव्ये अत्यंत हानिकारक असतात. त्वचारोगापासून कॅन्सरपर्यंत अनेक व्याधी त्यातून उद्भवतात. स्थानिक कंपन्या हलक्या प्रतीचा डिस्टेंपर बनवतात. त्याचा पक्केपणा वाढविण्यासाठी ग्लुफ्लेक्स वापरतात. या ग्लुफ्लेक्समधील महत्त्वाचा पदार्थ जनावरांच्या हाडांची पावडर असते. बहुतेक मूर्तींचे विसर्जन सोयीच्या ठिकाणी; विशेषत: नद्या, कालवे, मोठी तळे यामध्ये केले जाते. खडकवासला धरणाहून निघालेला कॅनॉल हडपसरमार्गे दौंडपर्यंत जातो. पूर्ण दौंड शहर व २० टक्के पुणे शहर या कॅनॉलचे पाणी पिते. या कॅनॉलमध्ये किमान ५० हजार मूर्ती तरी निश्चित विसर्जित होतात; शिवाय निर्माल्य असतेच. पाणी शुद्धीकरण यंत्रणेत निर्माल्य अडकून गणेश विसर्जनानंतर अनेकदा ती बंद पडते आणि पाणी शुद्धीकरण यंत्रणेद्वारेही एवढे सगळे रासायनिक प्रदूषण दूर होणे सर्वस्वी अशक्य असते. ग्रामीण भागात शेतातील विहिरीत मूर्तींचे विसर्जन होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती पाण्यात अजिबात विरघळत नाहीत. विहिरीचे नैसर्गिक झरे बंद करतात. विहिरीची खोली गाळ साठून कमी होते. पिकांना हे विषारी पाणी मारक ठरते. एकूण माणसे, जलचर वनस्पती या सर्वांनाच हे विसर्जन त्रासदायक होते.
या वर्षीचा मोहीम अनुभव
गणेश विसर्जनासारख्या संवेदनशील प्रश्नाबाबत कृती कार्यक्रम घेताना जो ताण असतो, तो गेली तीन वर्षांच्या वाढत्या लोकसहभागामुळे कमी होतो आहे. धोरणात्मक भाग म्हणून समितीने उपक्रमाचा आशय पोचविण्यासाठी शाळा हे माध्यम निवडले. विद्यार्थ्यांना मुद्दा पटला तर दुहेरी काम होते. एक तर ते मूर्ती दान करण्याचा आग्रह धरतात आणि दुसरे म्हणजे ते नागरिक बनतील, त्यावेळी नक्कीच याची अंमलबजावणी करतील. माझ्याकडे जमा झालेल्या माहितीनुसार यावर्षी २५ हजारांहून अधिक मूर्तींचे दान मिळाले. परंतु हा आकडा लोकांच्या प्रतिसादाचा निदर्शक नाही. कारण यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने मूर्ती दान मिळणे सहज शक्य होते. गणपती पाचव्या, सातव्या व अनंत चतुर्दशीदिवशी प्रामुख्याने विसर्जित होतात. प्रत्येक शहरात ही ठिकाणे विविध असतात. या सर्व ठिकाणी सर्व दिवशी उभे राहणे हे समितीच्या आवाक्याबाहेरचे काम होते. तसेच या सर्व मूर्ती काळजीपूर्वक प्रदूषण टाळून निर्गत करावयाच्या होत्या. त्यासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था व कार्यकर्त्यांचे बळ हे देखील मिळणाऱ्या प्रतिसादाच्या मानाने अपुरेच होते. या सर्वांमुळे दान स्वीकारण्यावर मर्यादा आल्या आणि बहुतेक गावाच्या बाहेर दगड काढलेल्या व त्यामुळे झालेल्या भल्या-मोठ्या खड्ड्यात पाणी साचलेल्या दगडाच्या खाणी आहेत, त्यावर वाढणारे डास हे पुन्हा उद्भवलेल्या मलेरियाचे कारण आहे. या खाणीत मूर्ती निर्गत केल्याने प्रदूषण तर टळतेच; शिवाय आज ना उद्या खाण भरून निघण्याची व मलेरियाचे एक केंद्र कमी होण्याची शक्यता देखील निर्माण होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जरी पुढाकार घेतला असला, तरी बऱ्याच व्यापक प्रमाणात विविध संघटनांचा याला पाठिंबा लाभला. कोल्हापूरमध्ये याबाबत काढलेल्या पत्रकावर २० संघटनांची नावे आहेत. भोर (जि. पुणे) येथे आवाहन पत्रकावर नगराध्यक्षा, वैद्यकीय अधिकारी, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, लायन्स व रोटरी क्लब, पत्रकार संघ, प्राचार्य व मुख्याध्यापक, धरणग्रस्त परिषद, डॉक्टर व केमिस्ट असोसिएशनचे प्रमुख, जैन समाज, राष्ट्रसेविका समिती, विश्व हिंदू परिषद, घरोघरी पूजा करणारे ब्रह्मवृंद यांच्याबरोबरच तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्याही सह्या आहेत. गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील जवळच्या एका शाळेत खड्डा करून त्यात पाणी भरून मूर्ती विसर्जित केल्या गेल्या व ती माती कार्यानुभवास वापरण्याचे ठरले. इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथे गावातील पहिल्या नंबरची ११ फुटी मूर्ती दान मिळाली. सातारा येथे अनेक मंडळांनी मूर्ती दान देण्याची इच्छा दर्शविली. अंमळनेर (जि. धुळे) डांगी, साक्री माखड अशा छोट्या-छोट्या गावात जवळजवळ सर्व मूर्तींचे दान मिळाले. नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या सहकार्यामुळे नाशिकमध्ये फार मोठ्या प्रमाणात गणपती मिळाले. हा आकडा १० हजारांच्या आसपास असावा. मोहोळ, जि. सोलापूर येथे पोलिसांनी स्वत:हून मूर्ती स्वीकारल्या व निर्गत केल्या; तर पुण्याला पाटबंधारे खात्याच्या उपअभियंते व सर्व कर्मचारी वर्ग यांनी मूर्तींचे दान स्वीकारण्यापासून त्यांच्या वाहतुकीपर्यंत सर्व व्यवस्था केली. पुणे येथे रावसाहेब पटवर्धन हायस्कूल व हरिभाऊ गिरमे प्रशाला यांनी १० दिवस गणपती स्वीकारले व ७०० हून अधिक गणपती जमले. (पुढील वर्षी महाराष्ट्रातील अनेक शहरात अशी केंद्रे मोठ्या प्रमाणावर उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणपती केव्हाही स्वीकारणे शक्य होते.) पुणे येथे एका शाळेने तात्पुरता हौद बांधून भाविकांची सोय केली. सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील वर्षी शासनाची पूर्ण ताकद या उपक्रमाला देण्याचे; तसेच फिरत्या वाहनावर पाण्याचे मोठे हौद ठेवून त्या-त्या ठिकाणीच विसर्जन करून घेण्याबाबत सोय करण्याचे जाहीर केले. पिंपरी-चिंचवडला घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी गणेशमूर्ती गोळा केल्या. नदीच्या बाहेर आलेल्या मूर्ती अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्रित करून योग्य प्रकारे निर्गत केल्या व लोकांच्या धार्मिक भावनांची कृतिशील कदर केली. रत्नागिरीपासून नंदुरबारपर्यंत निर्माल्य गोळा करण्यास तर प्रचंड प्रतिसाद मिळाला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने आपल्या कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांत फार प्रभावीपणे निर्माल्य संकलन केले. त्यांना नागरिकांचे फार चांगले अभिप्राय मिळाले व पुढील वर्षी गणपती दानही घ्यावे, असा आग्रह झाला.

अन्य पर्याय
पुणे शहरात यावर्षी अचानकपणे चांदीच्या गणेशमूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. गेली १०० वर्षे पंचांग धर्मशास्त्राप्रमाणे प्रसिद्ध करणाऱ्या सोलापूरच्या दाते पंचांगकर्त्यांनी अशी भूमिका घेतली की, घराच्या बागेतील एक ओली माती घ्यावी, तिचा गोळा करावा, त्याला डोळे, सोंड, कान काढावेत. प्रतिष्ठापना करून पूजा करावी व घरीच परातीत पाणी घेऊन तिचे विसर्जन करून ते पाणी झाडांना घालावे. याचे एक कारण पर्यावरणविषयक वाढलेली जागरूकता हे मानण्यात येते. स्वत:च्या बागेत गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्याकडेही यावर्षी अनेक शहरात कल वाढलेला दिसला. प्लॉटमध्ये काही ठिकाणी गणेशमूर्तींच्या ऐवजी मातीच्या छोट्या गणोबाचे अथवा सुपारीचे विसर्जन करण्यात आले. दोन ठिकाणी कुंभारांनी दान मिळालेल्या मूर्ती मागून नेल्या, तर दोन ठिकाणी दान मिळालेल्या मूर्ती अदलाबदल करून पाहुणा म्हणून भाविक आपल्या घरी घेऊन गेले. एकूण काय, उत्तरपूजा झाल्यानंतर ज्या मूर्तींचे देवत्व संपते, तिचे विसर्जन पाणी प्रदूषण दूर करण्याकडे लोकांचा कल होता.
विरोध व त्याचा अर्थ
शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सनातन भारतीय संस्था यांनी कोल्हापूर येथे पंचगंगेच्या काठावर व गडहिंग्लज, इचलकरंजी येथे या मोहिमेला आक्रमक विरोध केला. पंचगंगा ही महाराष्ट्रातील जवळपास सर्वाधिक प्रदूषित नदी आहे. परंतु या लोकांच्या मते नदीत निर्माल्य व गणेशाचे विसर्जन धर्मपालनाची आवश्यक बाब आहे. आणखी गमतीचा प्रतिवाद असा की, मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यावर त्यामध्ये पवित्रके निर्माण होतात. ती मूर्तीच्या विसर्जनानंतर पाण्याबरोबर वाहत जातात आणि पाण्याच्या बाष्पीभवनाने सर्वत्र पसरून मांगल्य व पावित्र्य निर्माण करतात म्हणे! धर्मरक्षणार्थ उभ्या असलेल्या शक्तींचा जोर जास्त असल्याने या दोन्ही ठिकाणी मागील वर्षापेक्षा कमी गणपती दान मिळाले. मात्र कोल्हापुरातील आणि कुठल्याही ठिकाणी पंचगंगेवरील विरोधाचा परिणाम झाला नाही, अनेक सुविद्य नागरिकांनी या विरोधाचा प्रतिबंध करत जाणीवपूर्वक मूर्ती दान दिली. वृत्तपत्रांनीही या प्रवृत्तींचा निषेध केला, ही समाधानाची बाब म्हणता येईल.
पोलीस खात्याने चालू केलेल्या एक गाव-एक गणपती मोहिमेस यंदा कोल्हापूर जिल्ह्यात तरी लक्षणीय प्रतिसाद मिळाला. न्यायालयाच्या आदेशाने ध्वनिप्रदूषण पातळी बरीच आटोक्यात राहिली. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने निर्माल्य व विसर्जित गणपती दान करा ही मोहीम उचलली जात आहे, आकार घेऊ लागली आहे. हे सर्व एका अर्थाने धर्मनिरपेक्ष शक्तींनी समाजहितासाठी विधायक पद्धतीने धर्माची दखल घेतल्याने चांगले पाऊल उचलले जात आहे. त्याची सुरुवात आहे. धार्मिक भावनांचा आदर करून आणि उत्सवाचा आनंद कायम ठेवून त्यात कालोचित मूल्यात्मक बदल करण्याचा हा प्रयत्न आहे. समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात गेली काही दशके अडखळलेली धर्मचिकित्सा अशा विधायक कृतिशीलतेतून पुढे जाऊ शकेल आणि सर्व समाजासाठीच ती भली गोष्ट ठरेल.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑक्टोबर २००१)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...