कार्यकर्ता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कार्यकर्ता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

नव्या कार्यकर्त्यासाठी आखणी हवी




नव्या कार्यकर्त्यासाठी आखणी हवी
दाभोलकर, तरुण पिढी, कार्यकर्ता, बैठका
विस्तारणाऱ्या क्षितिजांची दोन टोके दाखविणाऱ्या घटना याच महिन्यात घडल्या. २१, २२ मार्चला हैदराबाद येथे भारतातील रॅशनॅलिस्ट संघटनांचे अधिवेशन आहे. समविचारी संघटनांना भेटण्याची, विचारांचे आदान-प्रदान करण्याची सुसंधीच. त्यांचे आवर्जून निमंत्रण आले आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी जागतिक पातळीवर याच स्वरुपात भरणाऱ्या अधिवेशनाची सूचना आली. हे अधिवेशन इंदूमती पारीख यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी १९९९ मध्ये होणार आहे. त्याला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन तब्बल एक वर्ष आधीच मिळाले. यासंदर्भात विस्तारणारी क्षितिजे लिहिणार आहेच. परंतु आता पुढे कधीतरी हे घडायचे कारण झाले, ते असे -

सातारा शाखेतील दोन तरुण उत्साही, तळमळीचे कार्यकर्ते माझ्याकडे आले. वय विसाच्या आतील. संघटनेत येऊन दीड-दोन वर्षे झालेली. सातारला माझा असणारा कमी मुक्काम आणि असेल त्यावेळेची धावपळ; त्यामुळे या दोघांची भेट बैठकीतच होत असे. सर्वांच्या बरोबर झालेल्या त्या बैठकीतील भेटीचे स्वरूप मर्यादितच असे. मात्र ते घरी आले त्या दिवशी बऱ्याच मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यांच्या बोलण्यात नाराजी नव्हती, तर संघटनेच्या कामात सुधारणा व्हावी, संधी मिळावी ही तळमळ होती. त्यासाठी स्वत: अधिक चांगली धडपड करण्याची प्रामाणिक इच्छा होती. त्यांचे सगळे ऐकून घेत असताना सातारा शाखेच्या एका तपाचा इतिहास तरळला.

१९८५ ऑक्टोबरमध्ये वाईला अंधश्रद्धा निर्मूलन सखोल प्रशिक्षण शिबीर झाले. त्यानंतर सातारा येथे समितीच्या बैठका सुरू झाल्या, त्या आजतागायत. बैठकांना अगदी सुरुवातीपासून येणारे कार्यकर्ते आजही साताऱ्यात आहेत. आजही चळवळीशी संबंधित आहेत. परंतु एखादा अपवाद वगळता त्यांचे बैठकीला येणे खूप कमी झाले आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी उत्साहाने आलेली काही मंडळी तगून आहेत, तर काही हळूहळू अनियमित बनत आहेत. बैठकीला नियमितपणे येणारे जुने-जाणते कार्यकर्ते यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण स्नेहभाव आहे. स्वत:च्या व्यवसायात कौटुंबिक जबाबदारीचा वा अन्य प्राधान्याच्या कामात त्यांना बैठकीस येणे जमत नसावे, असेच मी गृहीत धरतो. मग काय घडते? आज सातारच्या शाखेत अशा अगदी नव्या उत्सुक सात-आठ तरुण कार्यकर्त्यांचा जो गट आहे, त्याला काय अनुभव येतो? आपण वेळेवर बैठकीस आलो तर बैठक वेळेवर चालू होतेच, असे नाही. बैठकीच्या कामकाजात वैचारिक चर्चा पुरेशी गांभीर्याने व नियमितपणे होत नाही. मागील आठवड्यातील कामाचे जुजबी रिपोर्टिंग झाले की, मग बरचसा वेळ असा तसाच जातो. नवीन येणारे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने ते ज्यांना घेऊन येतात ते त्यांचे मित्र या दर्शनाने नाउमेद होतात. बैठकीत जे ठरत नाही वा घडत नाही, ते नंतर घडणे अवघडच असते. विचारांची ओढ, कामाची हौस, नाविन्य व कुतूहल, संघटनेत व्यक्तिमत्त्व विकासाची मिळणारी संधी, अशा अनेक उद्देशाने तो कार्यकर्ता समितीकडे खेचला गेलेला असतो. त्याला घडविणे, संधी देणे, टिकविणे ही गोष्ट कष्टपूर्वक करायची असते. माझ्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांची व्यथा (खरे तर उत्कट इच्छा) अशी होती की, त्यांना चमत्कारांचे चांगले सादरीकरण शिकायचे होते, भाषणे द्यायची होती; त्याचबरोबर मनात भीतीही होती. समितीचे सभासद झाल्यापासून त्यांना लोक आडवे-तिडवे प्रश्न विचारत होते. त्याची समर्पक उत्तरे देताना त्यांची तारांबळ उडत होती. त्याचे परीक्षण त्यांना हवे होते. ज्या समविचारी कॉलेजमित्रांना ते संघटनेत खेचू पाहत होते, त्यांना काहीजणांना संमोहनात, तर काही जणांना आकाश निरीक्षणात रस होता. समितीच्या माध्यमातून हे थोडेसे घडून यावे, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांच्याकडे मोकळा वेळ होता; पण समितीच्या कामासाठी तो कसा वापरावा, हे त्यांना कळत नव्हते. कोणी समजून देत नव्हते. या सर्वांतून आलेली अस्वस्थता त्यांनी माझ्याकडे मोकळी केली. मलाही खूप बरे वाटले. चळवळीत असलेल्या सर्वांत तरुण घटकाशी सुसंवाद असणे, हे मी खूप मोलाचे मानतो. उद्याची संघटना ज्यांच्या खांद्यावर उभी असते, त्यांची जडणघडण सर्वांत महत्त्वाची.

चार वर्षांपूर्वी आपण समितीचे एक परिचयपत्रक छापले आहे. त्यामध्ये संघटनात्मक कार्यामध्ये पुढील सूचनांची कार्यवाही अपेक्षित आहे. या शीर्षकाखाली- नवे कार्यकर्ते आकृष्ट करण्यासाठी काय करावे, याचे चिंतन व कृती सतत चालू ठेवावी, हा मुद्दा आहे. नवे कार्यकर्ते बनविणे म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांनी काही जबाबदारी उचलणे आलेच. संघटनेच्या बैठकीसाठी खरे तर तास-दीड तास काढायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दशकानुदशके साप्ताहिक शाखेसाठी असे जाताना मी पाहिले आहेत. कोणत्याही कारणाने हा नियमितपणा शक्य नसल्यास येणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांशी तरी एखाद्या विशिष्ट कामाच्या माध्यमातून थेट नाळ जोडून घेण्याची आखणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी करावयास हवी. याबरोबर प्रत्येक पाच-सहा वर्षांनी येणाऱ्या कार्यकर्त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची यंत्रणाही संघटनेत उभारावयास हवी. कोणतीही संघटना कायमच्या समर्पित कार्यकर्त्यांवर उभी राहू शकत नाही. त्याबरोबर सतत ताज्या, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा सतत पुरवठा लागतो आणि समर्पित कार्यकर्ता होण्याच्या दृष्टीने त्याची आखणी लागते.
विस्तारणाऱ्या क्षितिजाचे एक टोक विश्वातील विवेकवादी चळवळीशी जोडले जात असताना दुसरीकडे आपल्या संघटनेच्या प्रत्येक शाखेतील प्रत्येक नव्या छोट्या कार्यकर्त्यांशी देखील थेटपणे जोडले जावयास हवे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल १९९८)




गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

‘बऱ्या’चे ‘चांगले’ कसे होणार?




 ‘बऱ्या’चे ‘चांगले’ कसे होणार?
दाभोलकर, संघटन, कार्यकर्ता, गुणदोष चिकित्सा
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते भेटले. सतत सर्वदूर संचार, अनेक संघटनांबरोबर संपर्क. सध्या काम करणाऱ्या संघटनांत आलेली निराशा, मरगळ याबाबत ते बोलत होते. बोलताना असेही म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीत तुमचेच बरे चालले आहे, असे अनेकांना वाटते.
     
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य बरे चालले आहे म्हणजे काय? काही बाबी लक्षात येतील. कार्याचे अस्तित्व सतत जाणवायचे तर विविध उपक्रम आखावयास हवेत आणि ते नीटपणे पार पाडणारी यंत्रणा हवी. काही प्रमाणात आपल्या संघटनेबाबत हे घडते आहे. संघटनेचा विचार वैशिष्ट्यपूर्ण हवा आणि तो पटविण्याची ताकद हवी. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम विवेकवादाचे काम करणाऱ्या ज्या संघटना महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी जवळपास सर्वांचे मत असेच असते की, देव व धर्म या पायाभूत अंधश्रद्धांना उखडल्याशिवाय मलमपट्टी काय कामाची? या पार्श्वभूमीवर देव व धर्म याबाबतची आमची भूमिका तटस्थ आहे, हा समितीचा विचार लोकांना वेगळा वाटला. प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धा असते, हे झाले प्रचलित मत. विधायक श्रद्धांचा आम्ही आदर करतो आणि श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा निर्णय घेताना या शब्दाचे अर्थ व्यक्ती आपापल्या सोयीनुसार लावते आणि खरी अडचण तेथे आहे. ही झाली समितीची भूमिका. या वैचारिक भूमिकांचा फायदाही आपल्या संघटनेच्या वाढीला नक्कीच मिळाला असणार. परंतु यापलिकडे कुठल्याही संघटनेत एक महत्त्वाचा पैलू असतो. तो म्हणजे कार्यकर्त्यांच्या आपापसातील संबंधांचा, राग-लोभांचा. त्याआधारेच संघटनेच्या वस्त्रातील आतील ताणे-बाणे विणले जात असतात. याबाबत आपल्या संघटनेत काय स्थिती आहे? असावयास हवी?

संघटना माणसांची असते. कार्यकर्ते हे वासनाविचार असलेली माणसेच असतात. त्यांच्या या मर्यादांचे प्रतिबिंब जसे त्यांच्या कुटुंबात उमटणार, तसेच जणू मोठे कुटुंबच असलेल्या संघटनेतही पडणारच. अशावेळी काही पथ्ये पाळावी लागतात, पाळली जावीत. पहिले महत्त्वाचे म्हणजे सहकाऱ्यांच्या मागे टीका करू नये, उणी-दुणी काढू नयेत. सहकाऱ्यांचे दोष, त्याबाबतची नाराजी, आपले मत याची चर्चा खुलेपणाने समोरासमोर करावयाची तयारी हवी. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चुकांच्यावर जिव्हाळ्याने बोलावे; पण सतत टीकाच करून तेजोभंग करू नये. कार्यकर्ता वरिष्ठ झाला की, त्याला वरचा दर्जा प्राप्त झाला आहे, असे आपोआप वाटू लागते. मग अन्य कनिष्ठ सहकाऱ्यांना सूचना देण्याऐवजी नकळत आदेश दिले जाऊ लागतात. हे टाळावयास हवे. संघटनेत नवे तरुण मोठ्या उमेदीने येतात. समितीमध्ये आपोआपच दोस्तवर्तुळे तयार झालेली असतातच. त्यामध्ये या नव्या कार्यकर्त्याला प्रवेश नकळत नाकारला जातो. त्यांना अपेक्षित संधी मिळत नाही, मानही नाही. त्यांच्या उत्साहाला आणि त्याबरोबरच संघटनेच्या विस्ताराला ओहोटी लागते.

महत्त्वाकांक्षी असणे ही बाब स्वाभाविक आहे. स्वत:च्या महत्त्वाकांक्षेला वाव मिळावा, असे माणसाला वाटणे यात गैर काही नाही. एका अर्थाने व्यक्तीच्या व संघटनेच्या वाढीसाठी हा गुण उपयुक्त आहे. पण या साऱ्यांबरोबरच गैरवाजवी आकांक्षा निर्माण झाली, तर संघटनेत ताण निर्माण होतात. कार्यहानी होते.

संघटनेतील असे व्यक्तिवादी गुणदोष बरेच मांडता येतील. ते नसणारी संघटना असेल, हे मानणे मानवी स्वभावाच्या अज्ञानाचे लक्षण मानावे लागेल. माझ्यापुढचा प्रश्न जो मी विचारचिंतनासाठी मांडत आहे, तो हा की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात आज या प्रकारे जाणवणारे कोणते दोष समितीच्या कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना वाटतात आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते दूर करण्याचे कोणते मार्ग त्यांना सुचतात?

अनेक मार्ग व पद्धती सुचू शकतील. त्या जरूर सुचवाव्यात. त्याच्या कार्यवाहीचे प्रयोग करावे लागतील. ते आपण करू. पण त्यासाठी आपल्याला एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे चिंतन करावेच लागेल.

आपण शिबिरे अनेक घेतो. ती वैचारिक असतात. संघटना बांधणीची शिबिरे जवळपास घेत नाही. स्वाभाविकच समितीच्या विचारांचा प्रचारक घडतो; पण शिस्तबद्ध कार्यकर्ता घडत नाही. अशी शिबिरे घेणे हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग आत्मटीका करणाऱ्या बैठकांचा, साम्यवादी चळवळीतील हा आवडता शब्द. तो मोलाचा आहे. कार्यकर्ते खस्ता खाऊन-धावून कामे करीत असतात, त्यामुळे त्यांची चिकित्सा करणे हे काम तसे अप्रियच. काही वेळा यश मिळते. त्या सुखाची चव मनात रेंगाळत असताना त्याचे विश्लेषण नकोसे वाटते; परंतु आत्मटीका सुरू ठेवली तरच खरी प्रगती चालू राहते. चुका सुधारायला प्रत्येक वेळी बौद्धिकेच लागतात असे नाही. संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांचे वर्तन हे देखील मार्गदर्शक ठरू शकते. त्या संयमित वर्तनातून संघटना बांधणीचे संस्कार अबोलपणे परिणामकारक ठरू शकतात. अशाच चर्चेच्या वेळी एकाने एक वेगळाच उपाय सुचविला. तो म्हणाला सहकाऱ्याचे दोष सांगणे चांगले; पण खूप अवघड. वाईटपणा नको म्हणून टाळले जातात. त्यापेक्षा शाखांच्या बैठकीत बाजूला एक पेटी असावी. ज्या व्यक्तीबद्दल जी सूचना असेल (उदा. बैठकीला वेळेवर येत नाही, रागावतो चटकन, कार्यकर्त्यांना तोडून बोलतो.) ती त्या व्यक्तीच्या नावे चिठ्ठी लिहून त्या पेटीत टाकावी. लिहिणाऱ्याने स्वत:चे नाव लिहायची गरज नाही. चिठ्ठीवरची नावे पाहून संबंधितांनी आपापल्या चिठ्ठ्या घेऊन जाव्यात. आपल्या मित्राचे मत समजून घ्यावे. स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करावा.

सुरुवातीलाच मी लिहिले आहे, आपली चळवळ बरी चालली आहे, असे महाराष्ट्रात मानले जाते. ती चांगली चालवायची, वर्धिष्णु बनवायची तर संघटनेतील कार्यकर्त्यांची जडणघडण व त्यांच्यामार्फत होणारी समितीची घडण निर्दोष हवी. वर काही कल्पना वानगीदाखल दिल्या आहेत. आपापल्या प्रतिभेने आपण त्यात सुधारणा करू शकाल, भर घालू शकाल; मात्र त्यासाठी विचार करण्याचा आणि नंतर लिहिण्याचा आळस झटकावयास हवा.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९७)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...