नव्या
कार्यकर्त्यासाठी आखणी हवी
दाभोलकर, तरुण पिढी, कार्यकर्ता, बैठका
विस्तारणाऱ्या क्षितिजांची दोन टोके दाखविणाऱ्या घटना याच महिन्यात
घडल्या. २१, २२ मार्चला हैदराबाद येथे भारतातील रॅशनॅलिस्ट
संघटनांचे अधिवेशन आहे. समविचारी संघटनांना भेटण्याची, विचारांचे आदान-प्रदान करण्याची सुसंधीच. त्यांचे आवर्जून निमंत्रण
आले आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी जागतिक पातळीवर याच स्वरुपात भरणाऱ्या अधिवेशनाची
सूचना आली. हे अधिवेशन इंदूमती पारीख यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी १९९९ मध्ये होणार
आहे. त्याला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन तब्बल एक वर्ष आधीच मिळाले. यासंदर्भात
‘विस्तारणारी क्षितिजे’ लिहिणार आहेच. परंतु आता पुढे कधीतरी हे घडायचे कारण झाले, ते असे -
सातारा शाखेतील दोन तरुण उत्साही, तळमळीचे कार्यकर्ते माझ्याकडे आले. वय विसाच्या आतील. संघटनेत येऊन
दीड-दोन वर्षे झालेली. सातारला माझा असणारा कमी मुक्काम आणि असेल त्यावेळेची धावपळ; त्यामुळे या दोघांची भेट बैठकीतच होत असे. सर्वांच्या बरोबर झालेल्या
त्या बैठकीतील भेटीचे स्वरूप मर्यादितच असे. मात्र ते घरी आले त्या दिवशी बऱ्याच मनमोकळ्या
गप्पा झाल्या. त्यांच्या बोलण्यात नाराजी नव्हती, तर संघटनेच्या कामात सुधारणा
व्हावी, संधी मिळावी ही तळमळ होती. त्यासाठी स्वत:
अधिक चांगली धडपड करण्याची प्रामाणिक इच्छा होती. त्यांचे सगळे ऐकून घेत असताना सातारा
शाखेच्या एका तपाचा इतिहास तरळला.
१९८५ ऑक्टोबरमध्ये वाईला अंधश्रद्धा निर्मूलन सखोल प्रशिक्षण शिबीर
झाले. त्यानंतर सातारा येथे समितीच्या बैठका सुरू झाल्या, त्या आजतागायत. बैठकांना अगदी सुरुवातीपासून येणारे कार्यकर्ते
आजही साताऱ्यात आहेत. आजही चळवळीशी संबंधित आहेत. परंतु एखादा अपवाद वगळता त्यांचे
बैठकीला येणे खूप कमी झाले आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी उत्साहाने
आलेली काही मंडळी तगून आहेत, तर काही हळूहळू अनियमित बनत आहेत. बैठकीला
नियमितपणे येणारे जुने-जाणते कार्यकर्ते यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण स्नेहभाव आहे.
स्वत:च्या व्यवसायात कौटुंबिक जबाबदारीचा वा अन्य प्राधान्याच्या कामात त्यांना बैठकीस
येणे जमत नसावे, असेच मी गृहीत धरतो. मग काय घडते? आज सातारच्या शाखेत अशा अगदी नव्या उत्सुक सात-आठ तरुण कार्यकर्त्यांचा
जो गट आहे, त्याला काय अनुभव येतो? आपण वेळेवर बैठकीस आलो तर बैठक वेळेवर चालू होतेच, असे नाही. बैठकीच्या कामकाजात वैचारिक चर्चा पुरेशी गांभीर्याने
व नियमितपणे होत नाही. मागील आठवड्यातील कामाचे जुजबी रिपोर्टिंग झाले की, मग बरचसा वेळ असा तसाच जातो. नवीन येणारे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने
ते ज्यांना घेऊन येतात ते त्यांचे मित्र या दर्शनाने नाउमेद होतात. बैठकीत जे ठरत नाही
वा घडत नाही, ते नंतर घडणे अवघडच असते. विचारांची ओढ, कामाची हौस, नाविन्य व कुतूहल, संघटनेत व्यक्तिमत्त्व विकासाची मिळणारी
संधी, अशा अनेक उद्देशाने तो कार्यकर्ता समितीकडे
खेचला गेलेला असतो. त्याला घडविणे, संधी
देणे, टिकविणे ही गोष्ट कष्टपूर्वक करायची असते. माझ्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांची व्यथा
(खरे तर उत्कट इच्छा) अशी होती की,
त्यांना चमत्कारांचे चांगले
सादरीकरण शिकायचे होते, भाषणे द्यायची होती; त्याचबरोबर मनात भीतीही होती. समितीचे सभासद झाल्यापासून त्यांना
लोक आडवे-तिडवे प्रश्न विचारत होते. त्याची समर्पक उत्तरे देताना त्यांची तारांबळ उडत
होती. त्याचे परीक्षण त्यांना हवे होते. ज्या समविचारी कॉलेजमित्रांना ते संघटनेत खेचू
पाहत होते, त्यांना काहीजणांना संमोहनात, तर काही जणांना आकाश निरीक्षणात रस होता. समितीच्या माध्यमातून
हे थोडेसे घडून यावे, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांच्याकडे मोकळा
वेळ होता; पण समितीच्या कामासाठी तो कसा वापरावा, हे त्यांना कळत नव्हते. कोणी समजून देत नव्हते. या सर्वांतून आलेली
अस्वस्थता त्यांनी माझ्याकडे मोकळी केली. मलाही खूप बरे वाटले. चळवळीत असलेल्या सर्वांत
तरुण घटकाशी सुसंवाद असणे, हे मी खूप मोलाचे मानतो. उद्याची संघटना
ज्यांच्या खांद्यावर उभी असते, त्यांची जडणघडण सर्वांत महत्त्वाची.
चार वर्षांपूर्वी आपण समितीचे एक परिचयपत्रक छापले आहे. त्यामध्ये
संघटनात्मक कार्यामध्ये पुढील सूचनांची कार्यवाही अपेक्षित आहे. या शीर्षकाखाली- नवे
कार्यकर्ते आकृष्ट करण्यासाठी काय करावे, याचे चिंतन व कृती सतत
चालू ठेवावी, हा मुद्दा आहे. नवे कार्यकर्ते बनविणे
म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांनी काही जबाबदारी उचलणे आलेच. संघटनेच्या बैठकीसाठी खरे
तर तास-दीड तास काढायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दशकानुदशके
साप्ताहिक शाखेसाठी असे जाताना मी पाहिले आहेत. कोणत्याही कारणाने हा नियमितपणा शक्य
नसल्यास येणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांशी तरी एखाद्या विशिष्ट कामाच्या माध्यमातून थेट
नाळ जोडून घेण्याची आखणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी करावयास हवी. याबरोबर प्रत्येक पाच-सहा
वर्षांनी येणाऱ्या कार्यकर्त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची यंत्रणाही संघटनेत
उभारावयास हवी. कोणतीही संघटना कायमच्या समर्पित कार्यकर्त्यांवर उभी राहू शकत नाही.
त्याबरोबर सतत ताज्या, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा सतत पुरवठा
लागतो आणि समर्पित कार्यकर्ता होण्याच्या दृष्टीने त्याची आखणी लागते.
विस्तारणाऱ्या क्षितिजाचे एक टोक विश्वातील विवेकवादी चळवळीशी जोडले
जात असताना दुसरीकडे आपल्या संघटनेच्या प्रत्येक शाखेतील प्रत्येक नव्या छोट्या कार्यकर्त्यांशी
देखील थेटपणे जोडले जावयास हवे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा