मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

तरुणांनी टिकायला हवे




तरुणांनी टिकायला हवे
दाभोलकर, तरुण पिढी, व्यापक परिवर्तन, व्यक्तिमत्त्व विकास 
अलिकडेच दोन अनुभव आले. ते असे, परिवर्तनवादी चळवळीतील एका मोठ्या कार्यक्रमासाठी जाण्याचा प्रसंग आला. कार्यक्रम तसा महत्त्वाचा होता. लोक आपुलकीच्या, बांधिलकीच्या भावनेतून आवर्जून आले होते. परंतु बहुतेक श्रोतृसमुदाय साठीच्या पुढील होता. ४० ते ६० या वयोगटातील तुरळक होते आणि चाळिशीखालील तर अपवादात्मकच. दुसऱ्या अशाच एका प्रसंगी शिवसेनेच्या एका नेत्याला भेटायला जावयाचा योग आला. गर्दी होती. बहुसंख्य २० ते ३० वयोगटातील तरुण होते. त्या जिल्ह्यात काम करत असूनही त्यांचे चेहरे मला अपरिचित होते.

तरुणांचे जथ्थे पुरोगामी परिवर्तनाकडे का वळत नाहीत, हा शोध, हा प्रश्न आणि त्यांची चिंता तशी नवीन नाही. याची काही कारणे जाहीरही आहेत. तरुणांना भडकवणारी आक्रमक विद्वेषी भाषा; साध्य, साधनशूचिता यांचा घोळ न घालणारी कामाची बिनधास्त पद्धत; नंबर दोनच्या धंद्याला सहजपणे मान्यता देणे याबरोबरच उत्साही उपक्रमशीलता व तरुणांना दिली जाणारी विशेष संधी वगैरे. पुरोगामी चळवळीत तरुण न येण्याच्या कारणांमध्ये युवक नेतृत्वाचा अभाव, संघर्षाची किंमत द्यावी लागण्याची भीती, अशा अनेक बाबी आहेत. हाच प्रश्न अधिक नेमकेपणाने एप्रिलमधील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चेला आला. आज समितीच्या कुठल्याही शाखेत आणि राज्य पातळीवरही डोक्यावर काळे केस असलेल्यांचीच गर्दी आहे. परंतु हे चित्र कायम टिकावयास हवे असेल तर समितीमध्ये तरुणांचा ओघ अखंड राहावयास हवा. ही गोष्ट जाणीवपूर्वकच घडवावी लागते. तसे झाले नाही तर आज रॅशनॅलिस्ट संघटनांची आणि काही प्रमाणात कम्युनिस्टांची स्थिती आहे तशी समितीची होईल. याचा अर्थ तरुण कार्यकर्ता समितीमध्ये येईल, टिकेल व वाढेल, अशी व्यवस्था हवी. ती कोणती याबद्दल चर्चा झाली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आकर्षणाने येणारा तरुण तेवढ्यामुळेच टिकून राहत नाही आणि टिकून राहिला नाही तर त्याच्यातील कार्यकर्ता घडणार कसा? यासाठी त्या तरुणाला हवेहवेसे वाटणारे विचार देण्याची व उपक्रम करण्याची यंत्रणा हवी. संमोहन, लैंगिकता प्रशिक्षण, व्यसनमुक्ती, आकाशदर्शन, गिरीभ्रमण असे अनेकविध विषय त्याला हवेसे वाटणे स्वाभाविक आहे. ते आकर्षकपणे त्याच्या भाषेत त्याला मिळाले तर तो संघटनेत टिकून राहील. याबरोबरच त्याच्यावर काही जबाबदाऱ्या द्यावयास हव्यात आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता त्याच्यामध्ये यावी, यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे व नेतृत्वगुण वाढविण्याचे प्रशिक्षण त्याला द्यावयास हवे. संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आवर्जून त्याच्या संपर्कात राहावयास हवे आणि वय वाढलेल्या कार्यकर्त्याने संघटनेच्या हितासाठी पदाचा त्याग करून (कामाचा नव्हे) तरुणांसाठी स्वत:हून वाट मोकळी करावयास हवी. या साऱ्याचा परिणाम एका वाक्यात सांगावयाचा तर असा दिसावयास हवा की, संघटनेचे सरासरी वय सदैव तीसच राहावयास हवे. याबाबत शिवसेनेचे यश लक्षणीय आहे. शिवसेना स्थापन होऊन ३० वर्षे झाली. स्थापनेच्या वेळेस तो तरुणांचा समूह होता. म्हणजे खरे तर आजचा शिवसैनिक पन्नाशीच्या पुढे पोचावयास हवा होता. परंतु आजही शिवसेनेत डोळ्यात भरणारी संख्या दिसते ती तरुणांचीच. अर्थात तरुण हवा म्हणूनच केवळ तरुण कार्यकर्ता निवडणे, असा याचा अर्थ नव्हेच. ध्येयवाद, वैचारिक बांधिलकी यांचा महत्त्वाचा संबंध आहेच. पण तरुण संघटनेकडे आकृष्ट कसे होतील, याची आखणी, मांडणी करणे, त्याप्रमाणे कृती करणे, त्या प्रयत्नाचे मूल्यमापन करणे आणि त्याआधारे सुधारित कृती करणे हे सतत घडत राहावयास हवे. याबद्दल कार्यकर्त्यांना आणि वाचकांना काय सुचते? काय वाटते, हे समजून घ्यायला मी उत्सुक आहे.

विस्तारणारी क्षितिजे हे सदर जवळजवळ वर्षभर चालले. या अंकापासून हे सदर आपला निरोप घेत आहे. वर्ष संपले हे त्याचे एक कारण. दुसरे कारण असे की, या सदरातील मांडणी प्रामुख्याने चळवळ व कार्यकर्ता यांच्यासाठी होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता समितीच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र बुलेटीन चालू होत आहे. त्यामुळे या स्वरुपाच्या चर्चा आता तेथे होतील आणि वार्तापत्राचे हे एक पान सर्व वाचकांना आवडणाऱ्या मजकुरासाठी मोकळे होईल. हे सदर चालवण्याचे आणखी एक उद्दिष्ट होते, ते म्हणजे चळवळीत आणि संघटनेत ज्याला तोंड द्यावे लागते, अशा काही प्रमुख मुद्द्यांबाबत मांडणी व्हावी आणि वाचकांकडून आलेल्या प्रतिसादातून त्याबाबत अधिक चर्चा व्हावी. वस्तुस्थितीत हे मात्र फारसे घडून आले नाही. चळवळीची क्षितिजे विस्तारत आहेत, असे मला स्पष्टपणे जाणवते. मात्र अल्प प्रतिसाद हा परस्परसंवादाबद्दल आळस आहे की, अभाव याचे मलाही आकलन झाले नाही. कदाचित माझ्या मांडणीची परिणाकारकता ही कमी पडली असेल. असो.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र                             
 (मे १९९८)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...