हरविलेला
सत्यशोधकी बाणा
दाभोलकर, शनि-शिंगणापूर, विरोध, चिकित्सा, चमत्कार
शनि-शिंगणापूर येथील दैवी चमत्कार व स्त्री-पुरुष विषमता याबद्दल
मी बोललो. त्यामुळे उठलेले वैचारिक वादळ आता सर्वज्ञात आहे. शनि-शिंगणापूरच्या भोवतीचे
चमत्काराचे वलय तसेच ठेवण्यात ज्यांना रस आहे, त्यांनी याबाबत काहूर
उठवावे, हे स्वाभाविकच आहे. परंतु याबाबत नाराजीचा
अनपेक्षित सूर उमटला तो सत्यशोधक समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांकडूनच. याबाबत वृत्तपत्रात
आलेल्या बातम्या साधारणपणे पुढीलप्रमाणे होत्या.
वसंतराव फाळके यांचा आरोप
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन दाभोलकरांच्या वक्तव्यामुळे लांबले- अंधश्रद्धा
निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे
वातावरण बिघडल्यामुळे सोनई येथे होणारे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुढे ढकलावे लागल्याची
खंत सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष अॅड. वसंतराव फाळके यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले
की, स्त्रियांच्या गुलामगिरीस धर्म व अंधश्रद्धा
कारणीभूत आहेत. या परिसंवादासाठी अध्यक्ष या नात्याने आम्ही डॉ. दाभोलकर यांना निमंत्रित
केले होते. परिसंवादामध्ये त्यांनी या विषयावरील विचार व्यक्त केले असते तर ते संयुक्तिक
ठरले असते. परंतु शनि-शिंगणापूरच्या श्रद्धा व परंपरा याविरुद्ध दाभोलकरांनी भाष्य
केले व वातावरण बिघडविले. त्यामुळे शासनाने हस्तक्षेप करून हे अधिवेशन पुढे ढकलण्यास
भाग पाडले. प्राचार्य गजमल माळी यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
व अखिल भारतीय सत्यशोधक समाज यात खूप फरक आहे.
याबाबतची
वस्तुस्थिती काय आहे?
1.
अंधश्रद्धा
निर्मूलन समिती व सत्यशोधक समाज यांच्या कामात फरक असला, तरी दैवी चमत्कारांना विरोध व धर्माधिष्ठित स्त्री-पुरुष विषमता
नाकारणे हा समान धागा आहे. कारण तो थेट महात्मा फुले यांच्या विचारांचा धागा आहे.
2.
सत्यशोधक
अधिवेशनानिमित्तानेच समितीने काहीतरी आक्रस्ताळे वैचारिक वर्तन केले, हे खरे नाही. समितीचे मुखपत्र असलेल्या मासिकात, दोन वर्षांपूर्वीच दिवाळी अंकात याबद्दल विशेष लेख होता. त्यानंतर
समितीने या विषयावर स्वतंत्र पुस्तिका काढली. तिचे वितरण नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात
झाले. या विषयावर महाराष्ट्रात समितीला सतत विचारले जाते आणि समिती आपली भूमिका रोखठोकपणे
मांडत असते. नगर जिल्ह्यात या मोहिमेचे नेतृत्व करणारे कॉ. बाबा आरगडे हेच सत्यशोधक
अधिवेशनाच्या संयोजक समितीचे कार्याध्यक्ष आहेत. संयोजन समितीचे मार्गदर्शक आहेत. पी.
बी. कडू-पाटील जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती नगर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.
3.
हरिदास
हे सत्यशोधक समाजाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी दाभोलकरांना पत्र लिहून अशी
विनंती केली की, सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनानिमित्ताने तुम्ही
शनि-शिंगणापूर प्रकाराबाबत भूमिका घ्यावी.
4.
सत्यशोधक
समाजाचे सध्याचे अध्यक्ष आहेत व्यंकटअण्णा रणधीर. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या
भूमिकेला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली
माझी जाहीर सभा शिरपूर व बोराडी येथे ता. २४ व २५ डिसेंबरला झाली. त्यावेळी अधिवेशन
स्थगितीची घटना घडून गेलेली होती. या दोन्ही सभेत त्यांनी शनि-शिंगणापूर येथील
दैवतांच्या चिकित्सेला जाहीर पाठिंबा दिला. याचा अर्थ असा होतो की, सत्यशोधक समाजातील पदाधिकाऱ्यात याबाबत वेगवेगळी
मते होती.
5.
मी
अधिवेशनाला उपस्थित राहिलो तर अधिवेशन उधळून लावण्याची धमकी शनि-शिंगणापूरच्या ग्रामस्थांनी
व हिंदू संरक्षणकर्त्यांनी दिली होती. याबाबतची
भूमिका अशी होती की, ज्यांनी मला निमंत्रण दिले आहे, ते माझे मित्र आहेत. त्यांना अडचण वाटत असेल तर मी अधिवेशनाला जाणार
नाही. ही भूमिका घेण्यामागे दुहेरी कल्पना होती. एक तर असे की, अधिवेशनात माझ्या उपस्थितीचे निमित्त करून वैचारिक हितशत्रूंना
गोंधळ घालावयास मिळाला, तर त्यामुळे मूळ वैचारिक कार्याला गौणत्व
प्राप्त झाले असते, जे घडणे इष्ट नाही. तेव्हा या गोंधळासाठी
त्यांनी जे निमित्त शोधले ती माझी उपस्थिती हे निमित्त त्यांना मिळूच द्यावयाचे नाही.
अर्थात, हा निर्णय संयोजन समितीने घ्यावयाचा होता.
मी परिषदेला गेलो नसतो आणि अन्य सर्व प्रमुख पाहुणे व वक्ते यांच्यासह परिषद पार पडली
असती - ज्यामध्ये बाबा आढाव, निळू फुले, पुष्पाताई भावे,
प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. य. दि. फडके, पन्नालाल सुराणा, हरी नरके ही समविचारी
ज्येष्ठ मंडळी होती, तरी हा विषय त्यांच्यामार्फत नक्कीच चर्चेचा
व विचारमंथनाचा झाला असता. यापुढे जेव्हा केव्हा ही परिषद होईल, त्यावेळीही हे होईलच.
6.
सगळ्यात
महत्त्वाचा मुद्दा असा की,
दैवी चमत्काराची चिकित्सा
व स्त्री- पुरुष विषमतेवर आधारित जाहीर धर्मवर्तन याबाबत सत्यशोधक समाजाची संघटना म्हणून
भूमिका काय, हे या निमित्ताने स्पष्ट व्हावयास हवे. त्याचा संदर्भ लक्षात घेता कोणती भूमिका
असू शकते, याबाबत संदेह राहण्याचीही गरज नाही. दैवी
चमत्काराची चिकित्सा झाली पाहिजे,
त्या नावाने होणारी दिशाभूल
व शेटजी-भटजीद्वारे होणारी लूट थांबली पाहिजे. स्त्रियांना लिंगावर आधारित विषम वागणूक मिळता कामा नये आणि कोणत्याही धमक्यांना न घाबरता या मागण्या
पुढे मांडल्या जातील, अशी रोखठोक भूमिका सत्यशोधक समाजाकडून अपेक्षित
आहे. सत्यशोधक समाजाला ऐतिहासिक परंपरेने, महात्मा फुले यांच्या
नावाने अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या संदर्भात सर्वस्वी वडिलकीचा मान आहे. त्यामुळे
शनि-शिंगणापूरच्या प्रकरणात त्यांच्या कृतिशील पाठिंब्याची अपेक्षा आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी १९९९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा