गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

संवादाचे प्रभावी माध्यम – संकल्प पत्र




संवादाचे प्रभावी माध्यम संकल्प पत्र  
दाभोलकर, संकल्प पत्र, संघटन, उपक्रम
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार जनमानसात विस्तारत आहे. याचा अर्थ असा की, प्रबोधनाची मोहीम मूळ धरत आहे. हे यश सर्वांचे आहे. कार्यकर्ते हे काम करतातच; परंतु विचाराचे हितचिंतकही यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत करतात. हे प्रबोधन सतत नवे व ताजे वाटावयास हवे. लोकांना भावेल अशा माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचावयास हवे.

कार्यकर्ते बऱ्याचदा एकाच प्रकारची भाषणे देतात. त्यामध्ये बरेचसे मनोरंजन, काही चळवळीचे किस्से व बहुधा अल्प विचार असतो. अनेकदा वापरलेला हा लोकप्रिय मसाला पुढे लोकांना फारसा न आवडण्याचा धोका असतो. अजून तसे झालेले नाही. परंतु धोका वेळीच ओळखावयास हवा.

विषयांची काहीशी नवीन मांडणी सांगण्याचा थोडा वेगळा फॉर्म ही गरज अंधरूढीच्या बेड्या तोडा संकल्प पत्राने भरून निघाली आहे, असे मला वाटते. या विषयाचा वैचारिक ऊहापोह मागील वर्षी जाहीरनामा परिषदेत झाला. अनिष्ट रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा हा अंधश्रद्धेचा अधिक वाईट भाग आहे. रूढी या कठिणीकरण झालेल्या व पावित्र्य लाभलेल्या अंधश्रद्धा असतात. या संदर्भात स्वत:पासून कृतीची सुरुवात करावी म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून अंधरूढीच्या बेड्या तोडा संकल्प पत्र तयार केले.

गेल्या दोन महिन्यांत सातारा, परभणी, धुळे, बेळगाव, सिंधुदुर्ग अशा काही जिल्ह्यात त्याबाबत कॉलेज विद्यार्थ्यांसमोर मी भाषणे दिली. इतरही काही कार्यकर्ते याबाबत विद्यार्थ्यांशी बोलले. याच विषयावर नागरिकांची जाहीर सभाही मी घेतली. तेव्हा लक्षात असे आले की, हा उपक्रम लोकांना आवडणारा व प्रबोधन पुढे नेणारा आहे. त्याची कारणे अशी दिसतात, एकतर हे संकल्प विविध आहेत. अंधश्रद्धेच्या अनेक बाजूंना ते एकाचवेळी स्पर्श करतात. त्यामुळे भाषण वैविध्यपूर्ण होते. एकाच विषयावर एकाच दिवशी तीन ठिकाणी भाषणे दिली, तरीही प्रत्येक ठिकाणी काही नवे सांगता येते.

दुसरे असे की, यातील एक संकल्प नशीब या कल्पनेवर विश्वास ठेवणार नाही, प्रयत्नवादाचा आधार घेईन, असा आहे. या मुद्द्यात प्रारब्धवाद, कर्मविपाकाचा सिद्धांत, त्याद्वारे शोषणाला दिली जाणारी तत्त्वज्ञानात्मक मान्यता याचे विवेचन करता येते. ते आवश्यक तर आहेत; परंतु त्याबरोबर एक वैचारिक उंचीही व्याख्यानाला ते मिळवून देते. तिसरे असे की, या संकल्पात मी व्यसन करणार नाही व इतरांना व्यसनापासून दूर ठेवीन, असा एक संकल्प आहे. व्यसन हा विषय थेटपणे समितीच्या कार्याशी संबंधित नसला तरी वेगळ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे आणि ती बाजू की अंधश्रद्धा माणसाचा विवेक आतून नाहीसा करते, तर दारू तो बाहेरून नाहीसा करते. गुटख्यासारखे साधे वाटणारे व्यसनही खरे तर अन्य व्यसनांएवढेच गंभीर असते. संकल्पपत्र विषद करताना या मुद्द्यासाठी पाच ते सात मिनिटेच मिळतात. परंतु तरीही श्रोता अंतर्मुख होतो, असा अनुभव आहे.

अधिक महत्त्वाच्या दोन गोष्टी या उपक्रमातून साधल्या जातात. एकतर केवळ भाषण असे कार्यक्रमाचे स्वरूप राहत नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना योग्य वाटेल तो संकल्प स्वीकारावा, असे सांगितल्याने एक विधायक कृती कार्यक्रम ताबडतोब उपलब्ध होतो. संकल्पपत्रही केवळ खिरापतीसारखे न वाटता त्याला ५० पैसे तरी मूल्य जरूर घ्यावे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेणारेच संकल्प पत्र घेतात. अनुभव असा आहे की, प्रभावीपणे विचार पोचल्यास श्रोतृवर्गातील २५ ते ५० टक्के व्यक्ती संकल्प पत्र भरून देतात. याबरोबरच संकल्पपत्रात सर्वात शेवटी एक विचारणा आहे. ती आहे, संबंधित युवक समितीचे कार्य करू इच्छितो का? याबद्दलची जेवढ्या व्यक्ती संकल्प पत्रे भरतात, त्यातील सुमारे निम्म्याच्या आसपास समितीचे काम करण्याबाबत होकारार्थी कौल नोंदवतात. त्यांना पुढे संपर्कात ठेवून त्यातील काहीजणांना चळवळीकडे, संघटनेकडे वळवणे हे आपले काम आहे. ही संकल्प पत्रे कार्यकर्त्यांनी महाविद्यालयातच भरून घ्यावीत, असे नाही तर वार्तापत्राच्या वाचकांनीही आपल्या संपर्कातील क्रीडा मंडळे, तरुण मंडळे, युवकांचे गट यांना अथवा आपल्या मित्रांना या उपक्रमात जरूर सामील करून घेण्याचा प्रयत्न करावा. अंधरूढीच्या बेड्या तोडा संकल्पपत्र हे संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९९)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...