शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

गुटखा निर्मूलन हवे




गुटखा निर्मूलन हवे
दाभोलकर, समाजजीवन, कार्यक्रम, विवेकजागर, व्यसनविरोध, चळवळ
लातूर येथील आपल्या समितीच्या राज्य कार्यकारिणीत एक मुद्दा चर्चेला आला. तो असा होता की, आपण स्वत:ला विवेकवादी संघटना मानतो. अंधश्रद्धा विवेकवादाला थेट छेद देतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात आपण लढतो. समितीचे विवेकवादी बनवू इच्छिणाऱ्या संघटनेस एवढ्यावर समाधान मानून चालेल काय? समाजजीवनात आज एकूणच अविवेक फार वाढला आहे. त्या विरोधात वैचारिक भूमिका घ्यावयास हवी. त्याशिवाय विवेकाचे आणि शहाणपणाचे केवळ शब्द लोकांचे समाधान करू शकणार नाहीत. त्यासाठी त्यांच्या जीवनात उपकारक श्रेयस्कर अशी काही कृती विवेकवादी संघटना व व्यक्ती यांनी करावयास हवी; अन्यथा लोकांना विवेकवाद हा फक्त शब्दांचा बुडबुडा वाटेल. यासाठी काय करावे, याची चर्चा आपण आता समितीत सुरू करत आहोत. परंतु खरे तर केवळ समितीच्या कार्यकर्त्यांचा हा प्रश्न नाही. ज्यांना-ज्यांना समाजात काही चांगला बदल घडवावासा वाटतो, योग्य विचार रूजावा, असे वाटते, त्या सर्वांनीच या धडपडीत सामील व्हावयास हवे.

विचाराच्या पातळीवर आणि कृतीच्या पातळीवर असे दोन कार्यक्रम यासाठी आता उपलब्ध होत आहेत.

पहिला कार्यक्रम आहे, धर्मांधताविरोधी प्रबोधन मोहिमेचा. एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन ही समविचारी संघटना साने गुरुजी जन्मशताब्दीच्या निमित्ताने ही मोहीम चालवणार आहे. विवेकजागर हे त्याचे नाव असेल. महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचे विचार आक्रमक प्रबोधनाच्या रूपात पोचवणे असा त्याचा प्रयत्न असेल. याची गरज किती आहे, हे वेगळे सांगायला नकोच. अलिकडे भोपाळ येथे चमत्कारामागील विज्ञान यासाठी भारतीय पातळीवरील एक चर्चासत्र झाले. आपल्यासारखेच कार्य मध्य प्रदेशमध्ये करणाऱ्या सायन्स सेंटर या संस्थेने ते आयोजित केले होते. परंतु त्याला जोडूनच धर्मांधतेविरोधात एक राष्ट्रव्यापी संमेलनही त्यांनी आयोजित केले होते. त्यामध्ये भारतातील अनेक व्यक्ती सहभागी होत्या. सध्या देशामध्ये धर्मांधता वाढविण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक चालू आहेत. अशा वेळी धर्मविषयक व्यापक भूमिका धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व संविधानाचा भाग कसे झाले? त्यामध्ये काय अभिप्रेत आहे? धर्मनिरपेक्षता नाकारल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सोडाच; परंतु लोकाशाही कार्यप्रणाली कशी धोक्यात येते, हे सर्व विषय आता समितीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी महाराष्ट्रभर पोचवण्याची गरज आहे. विविध नामवंत वक्त्यांची व्याख्याने महाराष्ट्रभरातील आपल्या विविध शाखांच्यात घडवून आणण्याची आपली कल्पना होतीच. विवेकजागर अभियान हे त्याच प्रकारचे; परंतु अधिक व्यापक व टोकदार आंदोलन आहे. आपापल्या ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी यामध्ये आवर्जून आणि पुढाकाराने सहभागी व्हावयास हवे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत असतानाच आपण व्यसनविरोधी भूमिका घेत असतोच. अंधश्रद्धा आणि व्यसन दोन्ही विवेकविरोधी असतात, अशी आपली मांडणी असते. व्यसनविरोधी लढाई अत्यंत अवघड आहे. दारूचा खप प्रत्येक दिवशी वाढत आहे. दारूविक्रीतून अधिकाधिक महसूल मिळतो म्हणून शासन दारूविक्रीस प्रोत्साहन देते, परमिट रूम, बिअरबार या धंदेवाल्यांची जोरदार लॉबी सत्तारूढ राजकीय पक्षात असते. बेकायदा दारूविक्रीत खेडेगावातले आर्थिक हितसंबंध आणि पोलिसांचे हातही गुंतलेले असतात. हे सर्व लक्षात घेतले तर दारूबंदीचा लढा जवळपास अशक्य बनतो.

गेल्या १० वर्षांत गुटख्याचे व्यसन पसरले आहे आणि ते तेवढेच घातक आहे. मात्र त्या विरोधात प्रखर आवाज उठला तर संपूर्ण गुटखाबंदी शक्य आहे, असे मला वाटते. एक तर गुटख्याच्या विक्रीपासून मिळणारा महसूल हा अजून तुलनेत बराच कमी आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे थेट हितसंबंध गुटखाविक्रीत गुंतलेले आहेत. गुटख्यामुळे पहिल्यांदाच व्यसन लहान मुले व महिलांच्यात उघडपणे पोचले, याची समाजमनात खंत आहे. पूर्ण गुटखाबंदी झाल्यास बेकायदा गुटखा विक्री करणे अवघड आहे. हे सर्व लक्षात घेता गुटखाबंदीची मागणी पूर्ण होणे तुलनेने शक्य आहे. लवकरच महाराष्ट्रातील निवडणुका येतील. प्रत्येक राजकीय पक्षाने स्वत:च्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास संपूर्ण गुटखाबंदीचे आश्वासन द्यावयास हवे; अन्यथा असे आश्वासन न देणारे पक्षच नागरिकांनी पराभूत करावेत, असे आवाहन आपण करू शकतो व त्याचा किमान परिणाम होऊ शकतो. प्रत्यक्षात यासाठी चळवळ कशी उभारावी? मी मा. अण्णा हजारेंना विनंती केली की, त्यांनी या महाराष्ट्रव्यापी मोहिमेचे नेतृत्व करावे. महाराष्ट्रातून अनेक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे आपापल्या ठिकाणी वातावरणनिर्मिती करतील आणि जनमानस संघटित बनवतील. कृती कार्यक्रम एक कलमी व सोपा आहे. आपापल्या भागात ज्या-ज्या राजकीय पक्षांचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य असतील, त्यांना ही मागणी पटवून देणे. स्वाभाविकच ते आपापल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत या मागणीचा आग्रह धरतील आणि पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात या मागणीचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहतील. समजा त्यांनी नकार दिलाच तर त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून उपोषणाचा सनदशीर मार्ग शिल्लक आहेच. एप्रिलपासून ही मोहीम सुरू होईल. ऑक्टोबरपर्यंत चालेल. महाराष्ट्रातील निवडणुका नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान होणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये कदाचित पक्षांचे जाहीरनामे तयार होऊ लागतील. त्यावेळच्या परिस्थितीवर २ ऑक्टोबरची कार्यवाही ठरेल. परंतु तोपर्यंत तरी उत्साहाने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी आपापल्या कुवतीनुसार यात सहभागी व्हावयास हवे. ज्यांना अशी इच्छा असेल, त्यांनी मला जरूर लिहावे. अधिक तपशील देता येईल.

मुद्दा कोणताही असो; वैचारिक जनजागरणाचा की, गुटखा निर्मूलनाचा त्यातील मूळ असे आहे- अंनिसला अभिप्रेत असलेले विवेकवादी चळवळ विस्तारण्याचे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९९)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...