विवेक जागर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विवेक जागर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

सत्कार्य चालूच ठेवा...



सत्कार्य चालूच ठेवा...
दाभोलकर, खुनीहल्ला, निषेध, विवेक जागर, विवेकवाद, नीतिमत्ता
३१ मार्चला माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मला दोन बुक्के मारण्यात आले. कार्यकर्ते मध्ये पडल्याने हल्लेखोर व त्यांची हातघाई झाली. त्यामध्ये दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली. डॉ. लागूंच्या गाडीला अडवण्यात आले. धक्काबुक्की झाली. त्याबद्दल दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातून आलेली बातमी सोबत लावली आहे. त्यावरून सविस्तर कल्पना येईल.

ही बातमी दूरदर्शनवर सांगण्यात आली. वृत्तपत्रातूनही आली. या बातम्यांच्यामध्ये मला उपचारासाठी सर्वसाधारण रुग्णालयात नेल्याची बातमी होती. स्वाभाविकच प्रेमाने, काळजीने, जिव्हाळ्याने असंख्य फोन सातारला खणखणले, खूप पत्रे आली.

अनेक प्रकारे निषेध नोंदविले गेले. मराठवाड्यातून प्रसिद्ध होणाऱ्या जवळपास सर्व वृत्तपत्रांनी (अपवाद सामना व दै. तरुण भारत) विस्तृतपणे पहिल्या पानावर निषेधपर बातमी दिली. दुसऱ्या दिवशी डॉ. लागू व मी यांच्या झालेल्या वार्तालापालाही ठळकपणे प्रसिद्धी दिली. दै. मराठवाडा व लोकपत्र यांनी पहिल्या पानावर स्वतंत्र स्फुटे लिहिली. दै. ‘महानगर’ने श्रीरामा यांना माफ कर असा, तर देशदूतने सत्कार्य चालूच ठेवा या नावाचे विचाराला पाठिंबा देणारे चांगले अग्रलेख लिहिले. मराठवाड्याबाहेर लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स वगैरे अनेक दैनिकांत, त्यांच्या विविध आवृत्त्यांत बातम्या आल्या.

अनेक संघटनांनी तातडीने निषेध नोंदविले. महाराष्ट्रातील छात्रभारतीच्या अनेक शाखांनी ताबडतोब बैठका घेऊन निषेधपत्रे काढली. कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट) भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी जन परिषद यांनी; तसेच रिपब्लिकन पार्टीने कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन अशा घटनांचा प्रतिकार करण्याचे जाहीर केले. अन्य अनेक संघटनांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. भ्याड हल्ल्याचा निषेध केला. त्यामध्ये सामाजिक संस्था आहेत, वाचनालये आहेत. छोटी-मोठी वृत्तपत्रे, साप्ताहिके आहेत.

आपल्या समितीच्या शाखांना ही बातमी समजताच प्रतिक्रिया स्वाभाविकच उत्स्फूर्त संतापाची आणि कळकळीची होती. निषेधाची पत्रके काढण्यात आली. त्या-त्या भागातील वृत्तपत्रांनी ती ठळकपणे दिली. निषेधाचे बोर्ड गावात लावण्यात आले. काही शाखांनी आपापल्या ठिकाणच्या शासनाच्या प्रतिनिधीला याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये कडक कारवाईचा आग्रह धरला. सातारा येथे दूरदर्शनची बातमी ऐकताच आपले व अनेक मित्रसंघटनांचे कार्यकर्ते तातडीने एकत्र आले. त्यांनी निषेधाच्या मशाल मोर्चाला सुरुवात केली. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे हा मोर्चा पूर्ण होऊ शकला नाही.

सनातन्यांच्या हल्ल्यामुळे विवेकजागरा’ची मोहीम थांबणार नाही
आमच्या प्रतिनिधीकडून - औरंगाबाद दि. १ - समाजामध्ये सध्या असहिष्णू आणि विद्वेषाचे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न संघटितपणे चालू असल्यामुळे हे वातावरण अधिकाधिक निकोप, निर्भय आणि विवेकी होण्यासाठी आपण विवेकजागरा’ची ही मोहीम चालवीत आहोत. काल झालेल्या सनातन्यांच्या हिंसक हल्ल्यामुळे आपली मोहीम थांबणार नाही. पण या प्रयत्नाबद्दल असहिष्णुता दाखविण्याऐवजी त्याला पद्धतशीर विरोध करण्याचे रूप सत्तेच्या आशीर्वादाने यावे, ही बाब चिंताजनक आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आज येथे केले.

रविवारी रात्री सरस्वतीभुवन सभागृहामध्ये डॉ. लागू आणि डॉ. दाभोलकर यांचे भाषण झाल्यानंतर पतितपावन व काही सनातनी हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्यावर हिंसक हल्ला केला. त्या पार्श्वभूमीवर आज बोलताना डॉ. लागू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण कोणत्याही प्रकारचे अनुदार उद्गार काढलेले नाहीत; पण याबाबत पूर्णपणे खोटी, विपर्यस्त आणि प्रक्षोभक अशी बातमी येथील देवगिरी तरुण भारत या दैनिकाने शिवाजी महाराजांबद्दल अनुदार उद्गार : डॉ. श्रीराम लागूंना पळता भुई थोडी या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली. असे वृत्त प्रसिद्ध करणे आणि हिंदुत्ववाद्यांनी हल्ला करणे ही एकाच समाजविघातक प्रवृत्तीची रूपे आहेत. या प्रकाराबद्दल आपण प्रेस कौन्सिलकडे दाद मागणार आहोत. सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने या प्रवृत्तीच्या विरोधात आपण लढा देऊ, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, परवाच्या कार्यक्रमामध्ये एका प्रश्नकर्त्याने असे विचारले की, साधारणपणे पौराणिक, ऐतिहासिक दंतकथांमध्ये त्याला नैतिक प्रमाण देण्याचा हेतू आहे, असे वाटत नाही का? त्या वेळी मी म्हणालो की, यातून काही प्रश्न उभे राहतात. बालशिवाजीची एक गोष्ट लहानपणी पाठ्यपुस्तकात सांगितली जात होती- बालशिवाजी सवंगड्यांसह खेळत होता. तेव्हा एक गाय घाबरून धावतपळत आली. त्यामागून यवन आला आणि त्याने विचारले, ‘पोरांनो गाय कोठे गेली?’ त्यावेळी बालशिवाजीने मोठी नैतिक कामगिरी केली; पण त्याकरिता खोटे बोलण्याची अनैतिकता त्याने पत्करली. पण खरे बोलला असता तर गायीचे प्राण वाचले नसते. आता या कथित दंतकथेमध्ये शिवाजी महाराजांबद्दल कोणतेही अनुद्गार काढले नाहीत. पण काही वर्तमानपत्रांनी हे विपर्यस्तपणे प्रसिद्ध केले. ही प्रचाराची पद्धती मला कळत नाही. पण ज्यावेळी मी हे काम हाती घेतले, त्यावेळीच मला कल्पना होती. पण असा धाकदपटशा दाखविल्याने मी बधणार नाही, असेही म्हणाले.

डॉ. लागू म्हणाले की, अलिकडे समाज भावनांच्या आहारी चालला आहे. त्या माणसाने विवेकवादी बनण्याची आजची गरज आहे. स्वातंत्र्य हे स्वयंभू मूल्य आहे. समाजातील अनाचार थांबवायचा असेल, तर या स्वयंभू मूल्याचा आदर करण्याचे प्रत्येकाने शिकले पाहिजे. हे मूल्य शिकवणे म्हणजे माणसाला विवेकवादी बनविणं इतकं हे साधं आहे. विवेकवादी मनुष्य सहिष्णू होता. त्याला नीतिमत्ता शिकवण्याची गरज नाही. त्यासाठी ही विवेकजागरा’ची मोहीम आपण हाती घेतली आहे, असेही डॉ. लागू यांनी सांगितले.

डॉ. लागू आणि डॉ. दाभोलकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी डाव्या लोकशाही आघाडीने केली आहे. हिंदुत्ववाद्यांचा हा हल्ला पूर्वनियोजित होता. पण पोलिसांनी सूचना मिळाल्यावरही घटनास्थळी येण्यास विलंब केला, असा आरोप केला आहे. या पत्रकावर उद्धव भवलकर, अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर, सुभाष लोमटे, पंडित मुंडे, बुद्धिनाथ बराळ आदींच्या सह्या आहेत. छात्रभारतीच्या औरंगाबाद शाखेनेही या घटनेचा निषेध गेला आहे. (दै. महाराष्ट्र टाईम्स)

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मार्च १९९६)

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

ठामपणे उभे राहा



ठामपणे उभे राहा
दाभोलकर, विवेक जागर, विरोध, चळवळ
, , ३ जुलै रोजी डॉ. श्रीराम लागू व मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. विवेक जागराच्या वादसंवादाचे कार्यक्रम होते. नाशिक, सटाणा, निफाड येथे कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद. हॉल ओसंडून वाहणारे. सटाण्याहून निफाडकडे जातानाच बातमी कळली की, शिवसेना (कळवण) ३ तारखेच्या कार्यक्रमाला विरोध करण्याच्या तयारीत आहे. नंतर असेही कळले की, तेथील शिवसेनेत दोन गट आहेत. त्यापैकी पदभ्रष्ट गट आपला कडवेपणा सिद्ध करण्यासाठी या खटाटोपीत आहे; परंतु एकूण प्रकरण फारसे गंभीर नाही.

दोन तारखेचा सटाण्याचा कार्यक्रम आटोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कळवणला जाण्यासाठी निघायचे होते. पण रात्री एक वाजताच कळवणहून सात-आठ जण निफाडला थडकले. त्यांनी मला उठविले. कळवणला आपली सक्रिय शाखा नाही, संपर्क आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कामाची उभारी धरण्याचा प्रयत्न करणारा जो गट होता, तोच सगळा आला होता. त्यांचे चेहरे चिंताक्रांत आणि निराश वाटत होते. त्यांनी गावातील घडामोडी सांगितल्या. शिवसेनेच्या शाखेने आक्रमक रूप घेतले होते. कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली होती. कार्यक्रम बाजारपेठेत भर वस्तीत बँकेच्या हॉलमध्ये होता. मुलाखत घेणाऱ्या प्राचार्यांना एकेकाळी त्यांचेच विद्यार्थी असणाऱ्या शिवसैनिकांनी खबरदार..! मुलाखत घ्यायला आला तर... असा सज्जड दम भरला होता. कार्यक्रम झालाच तर दंगल होईल, असा इशारा देण्यात आला होता. हे सगळे टाळायचे असेल तर एक मार्गही सुचविला होता. तो म्हणजे दाभोलकरांनी असे लिहून द्यावे की, देव आणि धर्म याबाबत एक शब्दही कार्यक्रमात उच्चारला जाणार नाही. या सगळ्या ताणातून सुटका होण्यासाठी स्थानिक मंडळींनी पोलिसांना कार्यक्रम रद्द केल्याचे सांगून मला सांगण्यास ते आले होते. पोलीस हे देखील पक्षपाती आहेत आणि त्यांचे सहकार्य देखील खात्रीचे नाही, अशी त्यांची भावना होती.

...तर आमच्यावर खटला भरावा
त्यांच्या बोलण्याचा आवेग ओसरल्यानंतर मी त्यांना शांतपणे; पण ठामपणे सांगितले, ते थोडक्यात असे, उद्या आम्ही कळवणला येणारच. योग्य वाटेल ते बोलणारही. आम्ही काय बोलावे, यासाठी कोणाचीही सेन्सॉरशिप अजिबात मान्य नाही. बँकेच्या संचालकांनी हॉल नाकारला आणि प्राचार्य आलेच नाहीत, तर बँकेसमोरच्या रस्त्यावर आम्ही सभा घेऊ. ध्वनिक्षेपक मिळाला नाही तर त्याच्याशिवाय भाषण करू. आमचे मत मांडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो घटनात्मक हक्क असल्याने पोलिसांनी आम्हाला संरक्षण देणे आणि गुंडांना प्रतिबंध करणे, ही त्यांची जबाबदारी आहे; विशेषत: शिवसेनेचे राज्य असताना शिवसैनिकच घटना मोडीत काढत असतील तर ती आणखी गंभीर बाब आहे, असे मी मानतो. आमची भाषणे कोणत्याही कारणाने पोलीस वा शिवसैनिक यांना प्रक्षोभक वाटल्यास त्यांनी आमच्यावर खटला भरावा. तो आम्ही लढवू आणि भाषण देण्यालाच पोलिसांनी प्रतिबंध केल्यास तोंडाला पट्टी बांधून, हातात निषेधाचा फलक घेऊन फेरी काढू; परंतु आम्ही कळवणला येणारच. संयोजन समितीला अडचणीचे वाटत असल्यास त्यांनी दूर राहावे. अर्थात, हे सर्व माझे मत आहे. उद्या पहाटे मी डॉ. लागूंच्या बरोबर चर्चा करेन. तुम्हीही रात्री चार तास इथेच थांबावे व पहाटे डॉक्टरांच्याबरोबर बोलून निघावे, असे मी त्यांना सांगितले. ते सर्वजण निफाडच्या कार्यकर्त्यांसोबत निघून गेले. पहाटे ५.३० ला डॉ. लागूंना हा विषय मी सांगू लागलो. तेवढ्यात त्यांच्याबरोबर रात्री आलेला निफाडचा श्रीवास्तव हा कार्यकर्ता आमच्या खोलीवर थडकला. त्याने सांगितले की, माझ्या बोलण्याने कार्यकर्त्यांची मानसिकताच बदलली. स्वत:च्या भित्रेपणाबद्दल ओशाळलेपण आले आणि पडेल ती किंमत देऊन ३ तारखेला सकाळचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ते रातोरात कळवणला परतले होते.

कळवण गावाला कलंक
सकाळी ठीक ९.३० वाजता मी व डॉ. लागू नाशिकचा कार्यकर्ता महेंद्र दातरंगे हे कळवणला पोचलो. कार्यकर्त्यांनी ठामपणे घेतलेल्या भूमिकेचा परिणाम वातावरणात जाणवत होता. आमच्या कार्यक्रमाचा बोर्ड चौकात ठळकपणे लिहिलेला होता. शिवसेना कार्यालयासमोरील विरोधाचा बोर्ड पुसलेला होता. बँकेसमोर गाडी उभी केली तर त्यावर दगडफेक होईल, ही आधीची भीतीदेखील खरी वाटली नाही. त्यामुळे आम्ही भर बाजारात बँकेच्या बाजूला आमची गाडी उभी केली. बँकेत यथोचित स्वागत झाले. प्राचार्यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र दातरंगेने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कार्यक्रम सुरू झाला. एवढ्यात खाली निषेधाच्या घोषणा देत १५-२० जणांचे टोळके आले. पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांनी थोडीशी वादावादी केली. काहीतरी केले याचे समाधान मिळविले आणि काढता पाय घेतला. हॉलमधील कार्यक्रमाला त्याचा काहीच परिणाम झाला नाही. दोन तास कार्यक्रम उत्तमपणे पार पडला. बऱ्यापैकी गर्दी होती. कॉलेज सुटल्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रम संपता-संपता आल्या. त्यामुळे गर्दीत भरच पडली. पोलिसांनीदेखील काम चोख बजाविले. अध्यक्षस्थानावरून बोलताना बँकेच्या चेअरमननी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि अशा स्वरुपाची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा कळवण गावाला कलंक असल्याचे सांगितले.
कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहार घेऊन निघण्यापूर्वी रात्री जाणवलेल्या दहशतीच्या उदास वातावरणाचा मागमूसही राहिला नव्हता. कळवण येथे शाखा कशी वाढवता येईल, वार्तापत्राचे वर्गणीदार कसे नोंदवता येतील, शिबीर कधी घेता येईल, याची चर्चा सुरू होती. कार्यक्रम जिद्दीने आणि निर्भयपणे यशस्वी करून दाखवल्याचा उत्साह आणि समाधान चेहऱ्यावर जाणवत होते. निर्धाराने, ठामपणे, कणखरपणे उभे राहिले तर धमकावणारे वाघ कागदीच निघतात, या प्रचितीचा तो आनंद होता.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर १९९६)

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

खोट्या बातम्यांची बित्तंबात



खोट्या बातम्यांची बित्तंबात      

दाभोलकर, डॉ. लागू, विवेक जागर, प्रेस कौन्सिल, सामना, तरुण भारत, खोटी बातमी
ता. ३१ एप्रिल १९९६ रोजी मी व डॉ. श्रीराम लागू यांच्या औरंगाबाद येथील विवेकजागराच्या कार्यक्रमात स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. मला मारहाण केली. या घटनेचे अत्यंत विपर्यस्त वृत्त औरंगाबादेवरून निघणाऱ्या सामनादेवगिरी तरुणभारत या दोन दैनिकांनी छापले. त्यातील काही भाग असा-
१. एप्रिल सामना - औरंगाबाद : छत्रपती शिवाजी खोटे बोलला, असा शब्द शिवरायांची संभावना करणारे डॉ. श्रीराम लागू व हिंदू धर्मावर टीका करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर संतप्त तरुणांनी प्रश्नांची सरबत्ती केली.... शनिवारी दुपारी ४ वाजता विवेकानंद महाविद्यालयाच्या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले होते. प्रसंगी शिवाजी महाराज खोटे बोलले, असे वाक्य त्यांनी उच्चारले होते. तसेच स. भु. सभागृहात दाभोलकरांनी संतांच्या ईश्वरी साक्षात्काराबद्दल शंका घेणारे मत व्यक्त केले. याबाबत दाभोलकरांनी असे म्हटले आहे की, परमेश्वरी साक्षात्कार झालेला माणूस वेडा असला पाहिजे, तो खोटे बोलत असला पाहिजे किंवा मग तो संमोहन विद्येच्या आहारी गेला असला पाहिजे....
१ एप्रिल, दै. ‘देवगिरी तरुणभारत’ -....
काल, शनिवारी विवेकानंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू यांनी शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले. महाभारतात व्यासांनी जे लिहिले त्या कमी भाकडकथा आहेत, शिवाजीच्या तर खूपच भाकडकथा आहेत. त्यांना चरित्रच नाही. शिवाजीने गायीला कसायापासून वाचविले, असा उल्लेख केला जातो. पण शिवाजी किती खोटे बोलला, हे सांगितले जात नाही, अशी व अन्य काही विधाने डॉ. श्रीराम लागू यांनी शिवाजी महाराजांबद्दल केली होती....
अत्यंत चुकीच्या व लोकांच्या मनाची दिशाभूल व्हावी, अशा प्रकारे छापलेल्या बातम्यांच्या बाबत दोन्ही वृत्तपत्रांविरुद्ध प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे मी व डॉ. लागूंनी ठरविले. पण त्याआधी संबंधित वृत्तपत्रांना संधी द्यावी, यासाठी त्या दोन्ही वृत्तपत्रांच्या संपादकांना पत्रे पाठविली, ती अशी-

स.न.वि.वि.
मी व डॉ. श्रीराम लागू हे महाराष्ट्रात ‘विवेकजागरा’चा वादसंवाद हा कार्यक्रम करतो. श्रद्धा-अंधश्रद्धा, देवाचे अस्तित्व, धर्माचे प्रयोजन, फलज्योतिष, अंगात येणे, या स्वरुपाच्या विविध बाबी याबद्दल मुलाखतीद्वारे प्रश्नोत्तर रूपाने होणारी चर्चा, असे त्याचे स्वरूप असते.          
या स्वरुपाचा आमचा कार्यक्रम ता. ३० मार्च १९९६ रोजी औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका दंतकथेचा उल्लेख एका प्रश्नाचे उत्तर देताना झाला. दुसऱ्या दिवशी सरस्वती भुवन, औरंगाबाद येथे खुला कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर आदल्या दिवशी जे अजिबात बोलले गेले नाही, त्यावरून काही तरुणांनी वितंडवाद घातला. मला मारण्याचा प्रयत्न झाला. मला वाचविणाऱ्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. डॉ. श्रीराम लागूंनाही धक्काबुक्की झाली.  
हे वृत्त आपल्या दैनिकाच्या ता. १ एप्रिल १९९६ च्या अंकात अत्यंत विपर्यस्त, चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाले. त्यामुळे मी व डॉ. लागू, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ यांचे नुकसान झालेच; तसेच समाजात प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्नही दिशाभूल करणाऱ्या वृत्तामुळे झाला.
तरी आपण याबाबत दिलगिरी व्यक्त करून सत्य परिस्थिती ठळकपणे प्रसिद्ध करावी. असे न झाल्यास आम्हास न्यायालयात व प्रेस कौन्सिलकडे त्याबाबत दाद मागावी लागेल.

आपला विश्वासू,
(डॉ. नरेंद्र दाभोलकर)
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
      
या पत्राला अर्थातच उत्तर आले नाही. पुन्हा एकदा १५ सप्टेंबरला स्मरणपत्र पाठविले आणि त्याच वेळेला प्रेस कौन्सिलकडे तक्रार नोंदविण्यात आली. खरे तर तक्रार दोन महिन्यांच्या आत नोंदवायची असते. त्यामुळे उशीर का झाला, यावरही खुलासे झाले. ते पटल्यानंतरच केस दाखल झाली. दोन्ही वृत्तपत्रांतील बातम्या इंग्लिशमध्ये भाषांतर करून पाठवाव्या लागल्या. तक्रार, पत्रव्यवहार हा अर्थात इंग्लिशमध्ये होता. एकूण कोर्टाची (किंवा प्रेस कौन्सिलची) प्रक्रिया वेळ खाणारी असते; पण चिकाटीने ती लढवायची, असे ठरविले होते.          
थोडी आणखी पत्रापत्री झाली आणि २२ एप्रिल १९९७ ला सुनावणीची तारीख लागली. फक्त चार दिवस आधी पत्र मिळाले. एवढे बरे होते की, सुनावणी मुंबईला होती; पण डॉ. लागूंना ही तारीख सोयीची नव्हती. त्यामुळे पुढची तारीख मागून घेण्याचे ठरले. तारखा देणे ही गोष्ट कोर्टाला अजिबातच नवी नसते. मुंबईच्या कौन्सिल हॉलमध्ये प्रेस कौन्सिलचे चेअरमन न्या. पी. बी. सावंत (निवृत्त न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली) आपल्या कौन्सिलच्या सदस्यांसह वेळेत उपस्थित झाले. कोणत्याही परिस्थितीत पुढची तारीख देण्यात येणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. कौन्सिलच्या कामाची सुरुवात झाली.   
पहिली केस चालविताना बघितल्यावरच ही काहीशी अनौपचारिक प्रक्रिया आहे, याची कल्पना आली. आणखी काही खटल्याचे कामकाज बघितल्यावर तर आमची बाजू मी स्वत:च मांडण्याचा निर्णय घेतला. एक तर वकिलाशिवाय आपापली बाजू मांडायची मुभा होती. न्या. सावंत मराठीमध्ये बोलण्यासही अनुमती देत होते. शिवाय घडणाऱ्या घटनांचा संदर्भ, आमची वक्तव्ये, छापून आलेल्या खोडसाळ बातम्या यांचा अन्वयार्थ मला अधिक नेमकेपणाने माहीत होता. दोन्ही वृत्तपत्रांचे संपादक व मी यांच्यात सुनावणीस प्रारंभ झाला. दैनिक सामनाच्या प्रतिनिधीचे म्हणणे असे होते की, कार्यक्रमाच्या स्थळी संतप्त तरुणांच्याकडून मिळालेली माहिती आम्ही छापली. दुसऱ्या बाजूची माहिती आम्हास मिळाली नाही म्हणून छापली नाही. न्या. सावंत यांनी त्यास समज दिली. डॉ. दाभोलकर इतकी वर्षे हे काम करतात, हे तुम्हाला ठाऊक असणार. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधून सत्य जाणून घेणे, हे तुम्ही करावयास हवे होते. तुम्ही जर विद्यार्थी नेत्यांना विचारले तर मग डॉ. लागू-दाभोलकर यांना का विचारले नाही? न्यायमूर्तींनी आणखी एक प्रश्न विचारला, हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम चांगले आहे, असे आपणास वाटते ना? आणि त्या प्रश्नाला दै. सामनाच्या प्रतिनिधीने होकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील कथित घटनेबद्दल डॉ. लागू हे नेमके काय म्हणाले, ते मी सांगितले. बालशिवाजीला कसायाने गाय कोठे गेली, हे विचारले, बालशिवाजीने गाय गेल्याच्या विरुद्ध दिशेला बोट दाखविले. त्यामुळे अकारण मारल्या जाणाऱ्या गायीचे प्राण वाचवून शिवाजीने नैतिक कामगिरी केली; पण मग त्याला त्यासाठी खोटे बोलावे लागले. हे धार्मिक भाषेत अनैतिक आहे. असा पेच अनेकदा जीवनात येतो आणि त्याचा निर्णय धर्माच्या नव्हे, तर विवेकाच्या आधारे घ्यावा लागतो. हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यानंतर न्यायमूर्ती म्हणाले, डॉ. लागूंचे प्रतिपादन मला अतिशय संयुक्तिक दिसते. विवेक हा कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कोणत्याही खऱ्या धर्मभावनेचा पाया हा विवेकच असतो. या विवेकाचे पालन करून शिवरायांनी चांगले उदाहरण घालून दिले आहे. या मांडणीत गैर काहीच नाही. उलट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कामच या विवेकाधिष्ठित, खऱ्या धर्मभावनेचे पोषण करणारे आहे. यानंतर मुद्दा निघाला साक्षात्काराचा. साक्षात्काराबद्दल दाभोलकरांनी व्यक्त केलेली शंका ही हिंदू धर्माचा अपमान आहे, असे वृत्तप्रतिनिधींचे म्हणणे होते. याबाबत न्या. सावंत यांचे मत अगदी स्पष्ट होते. ते म्हणाले, एक तर हे सर्व विवेचन मला शास्त्रीय दिसते. अधिक महत्त्वाचे म्हणजे संतांचे, प्रेषितांचे साक्षात्कार हे सर्वच धर्माचे भाग आहेत; फक्त हिंदू धर्माचे नाहीत. त्यामुळे साक्षात्कारावरचे हे मत हे तर फक्त हिंदू धर्मावरची टीका होऊच शकत नाही.

या सगळ्या सुनावणीच्या अंती न्यायमूर्तींनी स्पष्टपणे दोन्ही प्रतिनिधींना सांगितले, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे चांगले आहे, तुम्ही या कामाला मदत करण्याच्या दृष्टीने विचार करणे हेच योग्य आहे. तेव्हा या कामाला मदत देण्याचे दोन्ही प्रतिनिधींनी मान्य केले. यानंतर डॉ. लागू व दाभोलकर यांचा खुलासा तिसऱ्या पानावर छापण्याबाबत आदेश न्यायमूर्तींनी दिला. त्यामध्ये दिलगिरी असावी, असेही सांगितले. या निकालाची बातमी महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांनी छापली. मराठवाड्यातील सर्वाधिक खपाच्या दै. ‘लोकमतने तर ठळकपणे प्रसिद्ध केली.
या बातमीनंतर मी प्रत्यक्ष खुलासा वृत्तपत्रांना पाठविला- डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल छापलेल्या बातमीबाबत दिलगिरी.
दैनिक सामना, संभाजीनगर यांच्या १ एप्रिल १९९६ च्या अंकात म्हणे शिवाजी खोटे बोलला, हिंदू धर्माचीही संभावना केली या मथळ्याखाली जी बातमी प्रसिद्ध झाली, त्यामुळे डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर व त्यांच्या ‘विवेकजागरा’चा कार्यक्रम यांना जी हानी पोचली, त्याबद्दल दै. ‘सामना, संभाजीनगर दिलगिरी व्यक्त करीत आहे. त्या वृत्ताबाबत डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुढील खुलासा केला आहे - छत्रपती शिवाजी खोटे बोलला, अशा शब्दांत डॉ. लागू यांनी शिवरायांची संभावना केली, अनुद्गार काढले.... प्रसंगी शिवाजी महाराज खोटे बोलले ही सर्व वचने डॉ. लागूंच्या तोंडी घातली आहेत. डॉ. लागू यांना शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी असे उद्गार काढणे शक्यच नाही. हे उद्गार त्यांच्या तोंडी घालणे म्हणजे निव्वळ कुभांड आहे. बालशिवाजीने कसायापासून गायीचे प्राण वाचविले, या कथेचा संदर्भ देऊन निर्माण होणारा नैतिक पेच हा विवेक व सारासार बुद्धी याआधारे कसा सोडवावा लागतो, याचे विवेचन लागू यांनी औरंगाबाद येथील विवेकजागराच्या कार्यक्रमात केले होते. या गोष्टीतून नीतीचा पाया विवेकाधिष्ठित असावा, हा विचार मांडला गेला. २१ एप्रिल १९९७ रोजी प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. पी. बी. सावंत यांनीही या विचाराला नि:संदिग्ध अनुकुलता दर्शविली. हिंदू धर्मावर डॉ. दाभोलकर यांनी टीका केली, यासाठी बातमीत ईश्वर साक्षात्काराबद्दल दाभोलकरांचे मत दै. ‘सामना’च्या वरील बातमीत देण्यात आले आहे. साक्षात्कार या प्रकाराचे मानसशास्त्रीय पातळीवर दाभोलकर नेहमीच स्पष्टीकरण देतात. त्यामध्ये हिंदू धर्माच्या अवमानाचा कोणताच प्रश्न येत नाही. ता. २२ एप्रिल १९९७ रोजी प्रेस कौन्सिल समोरच्या सुनावणीत न्या. सावंत यांनी याबाबत स्पष्ट मतप्रदर्शन केले की, सर्वच धर्मात साक्षात्कार आहेत, त्याची शास्त्रीय चिकित्सा चूक ठरत नाही व कोणाचा अवमान ठरत नाही. आपली मते मान्य नसणाऱ्या व्यक्ती व त्यांचे विचार यांना हेतुपुरस्सर बदनाम करण्यासाठी अशा बातम्या पसरविल्या जातात काय, याचा संपादकांनी शोध घेणे व त्याला आळा घालणे, हे गरजेचे आहे. संपादक म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असे मत डॉ. लागू व डॉ. दाभोलकर यांनी काढलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.
हा खुलासा दै. ‘देवगिरी तरुण भारतने प्रसिद्ध केला. तो १३ जुलैपर्यंत तरी दै. ‘सामना’ने मात्र तो प्रसिद्ध केला नाही (वा केला असल्यास निदान माझ्या पाहण्यात नाही - तरुण भारतने रजिस्टर पोस्टाने त्यांचे अंक मला पाठविले) असेच चालू राहिले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट १९९७)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...