मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

ऐसे कैसे झाले भोंदू



ऐसे कैसे झाले भोंदू
दाभोलकर, आसारामबापू, फसवणूक




ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करुनिया म्हणती साधू।
            अंगी लावूनिया राख । डोळे झाकून करिती पाप।।
            दावुनी वैराग्याच्या कळा । भोगी विषयाचा सोहळा।
            तुका म्हणे सांगू किती । जळो तयांची संगती।।

तुकोबांनी हे सांगितले, त्यालाही साडेतीनशे वर्षे उलटून गेली. आता आधुनिक जमान्यातल्या हायटेक बाबा-बुवांना, स्वामी-महाराजांना, संत-महंतांना राख अंगाला फासण्याचे नाटक करण्याची गरजदेखील उरलेली नाही. विषयाचा सोहळा भोगण्यासाठी वरपांगी वैराग्याचे सोंग घेण्याचे कारण राहिले नाही. खेदाची गोष्ट ही आहे की, हे सगळे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ असताना जळो तयांची संगती असे म्हणत त्यांच्याकडे पाठ फिरवण्याऐवजी मिळो तयांची संगती म्हणत लक्षावधी जनसमुदाय त्यांच्या मागे धावत आहे.

नागपुरात आणि नंतर नवी मुंबईत आसारामबापूंनी याबाबत उधळलेले रंग या वास्तवाचे वेदनादायी व संतापजनक दर्शन घडवतात. त्यांनी शब्दश:ही रंगच उधळले. होळी, रंगपंचमी तिथीप्रमाणे दूर असली, तरी परमपूज्यनीय बापूंच्या सोयीसाठी व भक्तांच्या उद्धारासाठी ती दहा दिवस आधी आणण्यात आली. हजारो लिटर पाणी महानगरपालिकेकडून विकत घेतले गेले. त्यामध्ये रंग आणि सुगंधी द्रव्ये मिसळली गेली. दोन पाईप बापूंच्या हातात देऊन त्यातून प्रचंड दाबाखाली पाण्याचे अजस्र फवारे बापूंच्या हजारो भक्तजनांना भिजवून ओलेचिंब करण्याचा अध्यात्मिक आनंद देतील, याची सोय करण्यात आली. प्रत्येक भक्तागणिक वापरलेल्या पाण्याचा गणिती हिशेब मांडून बापूंच्या प्रवक्त्यांनी या रंगलीलेचे समर्थन केले. नागपुरातील या कार्यक्रमावर सडकून टीका झाली. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दुसऱ्या दिवशीच ऐरोलीला (मुंबईत) हाच खेळ पुन्हा खेळला गेला. त्यावर माध्यमांनी वाढत्या स्वरात निषेध नोंदवल्यावर बापूंनी अनुयायांना चिथावणी दिली. माध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ले झाले. कॅमेरे, ओबी व्हॅन यांची मोडतोड झाली. निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही प्रसाद मिळाला. याची कोणतीही खंत वा खेद बापूंना वा त्यांच्या भक्तांना नाही. बहुधा, आपले अवतारकार्यच आपण पार पाडत असल्याची त्यांची भावना असावी.
आसारामबापूंनी काही वर्षांपूर्वी एका नामवंत इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना असे सांगितले होते की, आम्ही संत (!) काय करतो? आम्ही आमच्या भक्तांचे प्रारब्धच बदलतो, त्यांच्या भौतिक अडचणी तर त्यातून दूर होतातच; परंतु जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतूनही त्यांची सुटका होऊन ते मोक्षाप्रत जातात. शिवाय आमच्या सत्संगाने भक्तांचे वासना, विकार गळून पडतात. काम, क्रोध, मोह, मद नाहीसे होतात. दया, क्षमा, प्रेम, शांती, करुणा या भावनांचा उगम होतो. आता हे सर्व कार्य करणारी व्यक्ती साक्षात् परमेश्वराचाच अवतार मानावयास हवी. हे लोक तसे स्वत:ला मानतात व त्यांचे अनुयायीही तसे समजतात, ही बाब अधिक चिंताजनक आहे.

प्रत्यक्षातला अनुभव किती विपरीत व विदारक असावा? बहुतांशी महाराष्ट्र पाण्यासाठी शब्दश: तडफडतो आहे. अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड देतो आहे. हंडाभर पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिला दिवसरात्र जिवाचा आटापिटा करीत आहेत. अंघोळ, कपडे धुणे, स्वच्छता यासाठी पाण्याचा वापर जणू हद्दपार झाला आहे. माणसांची ही स्थिती; तर पशुधनाला पाण्याची आणि चाऱ्याची उपलब्धता याबद्दल बोलायलाच नको. अजून तब्बल चार महिने वाढत्या दाहकतेने या भीषण वास्तवाला महाराष्ट्राला सामोरे जावयाचे आहे. अशा पार्श्वभूमीवर कोणताही संवेदनशील माणूस पाण्याचा वापर काटकसरीने करेल. निदान त्याची उधळण जाहीरपणे करणार नाही. त्यापुढे जाऊन त्याचे निर्लज्ज समर्थन करणे आणि वास्तवाचे भान करून देऊ इच्छिणाऱ्यांवर हल्ला करणे, हे तर संतत्व सोडाच; साधी माणुसकीही नसल्याचे लक्षण आहे. अर्थात आसारामबापूंचे हे अध:पतन आजचे नाही. त्यांच्यावर शेकडो एकर जमिनी हडप केल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. त्यांच्या आश्रमातील गूढ मृत्यू हे अपघात आहेत, आत्महत्या की खून, याची सतत चर्चा होत आली आहे. भक्ताला लाथ मारण्याचा त्यांचा उन्मत्तपणा अनेकांनी छोट्या पडद्यावर प्रत्यक्ष पाहिला आहे. कोणत्याही गुन्हेगाराला मी आश्रमात संरक्षण देऊ शकतो, कारण पोलीस येथे पोहोचू शकत नाहीत,’ ही त्यांची दर्पोक्ती आजतक या वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून सर्वांना दाखवली आहे. अशा बाबांना संत ही उपाधी कोणी लावली आणि त्यांना लक्षावधी अनुयायी मिळतात कसे, हाच एक चक्रावून टाकणारा प्रश्न आहे.

याचे एक उत्तर गेल्या २५ वर्षांतील अर्थ व समाजव्यवस्थेच्या बदललेल्या वास्तवातही आहे. बाबाशरणता आणि बाजारशरणता आता हातात हात घालून चालू लागली आहे. दोहोंचाही संदेश एकच आहे. तो असा की वत्सा, (ग्राहका) तुझे कल्याण कशात आहे, ते मला समजते आणि ते तुला समजणार नाही, हेही मला समजते. त्यामुळे मग अशा भक्तांना व्यक्तिगत सुखाचा मोक्ष देण्याची जबाबदारी महाराजांच्यावर अथवा आजच्या मार्केटवर येते. व्यक्तीला विचार करण्यापासून व व्यापक सामाजिक भानापासून तोडले जाते आणि नकली अध्यात्मिकता अथवा चंगळवादी उपभोक्ता या नात्याशी जोडले जाते. प्रचाराची परिणामकारकता वाढवण्यासाठी भक्तीचे इव्हेंट साजरे केले जातात. त्यात सहभागी होणे; मग तो महासत्संग असो वा खरेदीचा महामेळा,’ यातच जीवनाची अंतिम सार्थकता मानली जाते.

आसारामबापूंच्या असंवेदनशील उद्दाम वर्तनावर टीका करणे जेवढे सोपे आहे, तेवढे या मानसिकतेशी संघर्ष करणे सोपे नाही. तो एकाच वेळी व्यक्ती आणि व्यवस्था यांच्या परिवर्तनाचा प्रश्न आहे. परंतु यानिमित्ताने एक बरे झाले, महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी बापूंच्या वर्तनावर कडाडून झोड उठविली. अशा बाबा-बुवांचा बंदोबस्त करण्यासाठी कायदा हवा, अशी मागणी पुढे आली. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याखालीदेखील मारहाणीला प्रोत्साहन देणे, पाण्याच्या फवाऱ्याने रोग बरे करण्याचा दावा करणे, पिण्याच्या पाण्याचा गैरवापर, याबाबत थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. यावर राजकारण्यांत एकवाक्यता झाली. पाणीटंचाईच्या काळात अशा उधळपट्टीसाठी पाणी देण्याचा निर्णय घेणा ऱ्या प्रशासनप्रमुखांवर कारवाई करा, असा आग्रह पुढे आला. बापूंच्या कार्यक्रमावर व पाणी उधळपट्टीवर बंदी घालण्याची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असताना, पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला परवानगी देण्याची घाई का केली, याचा जाब विचारला गेला. वाईटातून चांगले निघते, ते असे!

या सर्व घडामोडीत दोन महत्त्वाचे मुद्दे मात्र विसरता कामा नयेत. एक म्हणजे महाराष्ट्रातील अवर्षण निसर्गनिर्मित असले, तरी पाणीटंचाई राज्यकर्तेनिर्मित आहे. महाराष्ट्रातील आरक्षित सिंचनापैकी ७० टक्के पाणी अवघ्या चार टक्के जमिनीवर असलेल्या उसाच्या पिकाने फस्त केल्यावर उरलेल्या जमिनीला, प्राण्यांना, माणसांना खात्रीचे पाणी उरणार कुठून? यापुढे उसाची शेती ठिबक सिंचनावरच करावी लागेल, असे आज महाराष्ट्राचे जाणते राजे सांगत आहेत. हे जाणतेपण ३० वर्षांपूर्वी सुचले असते तर? राज्याचा कारभार पाच वर्षांचा अपवाद वगळता सर्व काळ हाती असताना आणि माथा ते पायथा पाणलोट क्षेत्र बांधून काढले व पाण्याचा नियोजनपूर्वक वापर वेगवेगळ्या पिकासाठी केला, तर कितीही कडक दुष्काळ आला तरी आजच्यासारखी दैना होत नाही, याची उदाहरणे महाराष्ट्रातच असताना त्याचा पाठपुरावा का बरे झाला नाही? जमिनीत सोने सापडले, तर ते जमीनमालकाचे नव्हे तर शासनाचे असते; मग बोअर मारून जमिनीतील पाणी अमर्यादपणे संपवण्याचा अधिकार मुक्तहस्ते ज्याच्या बोअरला पाणी लागते त्याला कसा बरे मिळतो?
दुसरा प्रश्न आहे संतत्वाचा. बुवा, बाबा, स्वामी महाराज, संत, महंत या नावाने यांचे अमाप पीक सध्या महाराष्ट्रात आले आहे. महाराष्ट्राला संतांची एक अत्यंत उज्ज्वल परंपरा आहे. संतांनी निवृत्तिवादी महाराष्ट्राला मानवतावादी केले. परलोकवादी विचारांचे लोक इहलोकवादी केले. लोकांची कर्मकांडी, धार्मिकता नैतिकतेकडे वळवली. समाजविन्मुख धर्म व त्याचे अनुयायी समाजसन्मुख करण्याचा आटापिटा केला. याचा विचार केला, तर आजच्या तथाकथित संतांना ऐसे कैसे झाले भोंदू? असा परखड सवाल करणेच योग्य ठरेल.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल २०१३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...