जनशक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जनशक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

पहिले पाऊल... पुढेच टाकू

पहिले पाऊल... पुढेच टाकू
दाभोलकर, कायदा, जनशक्ती, एकहाती झुंज, जनजागरण अभियान, प्रबोधन
‘हजारो मैलांचा प्रवास कोणत्या तरी पहिल्या पावलापासूनच सुरू होतो.....’ अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला आणि या उक्तीची आठवण झाली.

महाराष्ट्र विधानसभेत कायदा मंजूर झाला. पुढील संपूर्ण दिवस दूरध्वनी शब्दश: अखंड निनादत होता. त्यात कार्यकर्ते होते. अंधश्रद्धांबाबत पोटतिडीक असणारे नागरिक हेते. सर्वपक्षीय पुरोगामी होते. पंधरा वर्षांची खडतर वाटचाल झाली. सहा मुख्यमंत्री झाले. विधानपरिषदेत विधेयक मंजूर होऊन दहा वर्षे झाली. मंत्रिमंडळात तब्बल चार वेळा मंजूर झाले. आचारसंहितेच्या काळात राज्यपालांनी सही करण्यास नकार दिला. ‘असा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य’ अशी शासनाची जाहिरात तीन वर्षांपूर्वीच फडकून गेली. विधेयक ‘हिंदू धर्मावर घाला घालते’ म्हणून त्याविरोधी भरपूर अपप्रचार झाला. असे विधेयक आणणाऱ्या काँग्रेसला पराभूत करा, असा मागील विधानसभा निवडणुकीत डंका पिटला गेला. एप्रिल महिन्यात विधेयक दाखल करताना सत्तारूढ पक्षाचाच प्रचंड विरोध झाला. विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवून अडगळीत टाकण्याचा राजकीय रडीचा डाव खेळला गेला. हे सर्व अडथळे पार पाडत अखेर कायदा झाला. (हुश्श!) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जवळपास एकहाती ही झुंज दिली. कायदा तर झाला. आता खरा प्रश्न पुढे काय?

कायद्याने समाज बदलत नाही, हे अर्धसत्य आहे. जागृत जनशक्तीला दंडशक्तीची जोड उपयोगी ठरते. मात्र अंधश्रद्धांना कायद्याच्या क्षेत्रात आणणे हे अधिकच संवेदनशील. अंधश्रद्धा कोणती व श्रद्धा कोणती, हे व्यक्तिनिहाय बदलते. एकाची पूजनीय श्रद्धा दुसऱ्याला जीवघेणी अंधश्रद्धा वाटते. माणसे याबाबत एकाच वेळी हळवी व आक्रमक असतात. अशा वेळी दोन प्रमुख वृत्तपत्रांनी ‘या कायद्याने अंधश्रद्धा जातील का?’ या विचारलेल्या वाचक कौलाला ३५ व ५४ टक्के मते मिळावीत, हेही आश्वासकच. पण मुख्य प्रश्न तसाच राहतो, मते देणाऱ्यांनी अंधश्रद्धा कशाला मानले आहे? आणि कायद्यात खरोखर काय आहे?

कायद्याविषयी, मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली, त्यावेळी त्यांनी कायद्याच्या नावातून ‘अंधश्रद्धा’ वगळण्याची विनंतीवजा सूचना केली. त्यामुळे कायद्याचे उद्दिष्ट अतिशय थेटपणे स्पष्ट करणारे ‘जादूटोणा व दुष्ट प्रथा यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २००५’ असे नाव ठेवण्यात आले. पुढे उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून त्यात ‘अघोरी’ शब्द वाढविण्यात आला. कायद्यात काय आहे? सैलानीबाबांच्या दर्ग्यावर मनोरुग्णांवर भूतबाधा झाली, असे मानून साखळदंडाने बांधून अमानवी उपचार होतात. आदिवासीबहुल जिल्ह्यात डाकीण, भुताळी समजून बाईला गावातून हाकलले जाते; प्रसंगी तिला जीव गमवावा लागतो. कोणी अस्लमबाबा हाताच्या बोटाने पोटाची, हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्याचा दावा करतो. त्याकडे हजारोंची रीघ लागते. अंगात देवीचा संचार झाला सांगून दहशत निर्माण केली जाते. चमत्कार करून फसवले जाते. मंत्र घालून जहरी नागाचे विष उतरविल्याचा दावा केला जातो. पिसाळलेला कुत्रा चावल्यावर गावठी औषधे दिली जातात. भूत-प्रेत जादूटोणा याची दहशत बंगालीबाबा तयार करतात. कोणी पार्वतीमाँ निपुत्रिक स्त्रीच्या पोटावर हात फिरवून संतान देण्याचा दावा करते. या सर्व बाबी आता कायद्याच्या कक्षेत येतील. सहा महिने ते सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होईल. १३ एप्रिल २००५ ला विधानसभेत मांडलेला कायदा यापेक्षा कडक होता. त्याला काँग्रेस आमदारांनी खरे तर पूर्णत: चुकीचा विरोध केला. मग मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार किमान समान मसुदा तयार करण्यात आला. हिंदू जनजागरण समितीसोबत सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दोनदा चर्चा केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत विरोधी पक्षनेते रामदास कदम, गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा झाली. विधिमंडळातील चर्चेतील आक्षेप लक्षात घेतले गेले. कायद्याचे प्रारूप सौम्य करण्यात आले; मूळ मसुद्यात अंधश्रद्धेची व्यापक व्याख्या होती. त्यामुळे कारवाई थेट व सोपी झाली असती, ती वगळली गेली. आता परिस्थितीतील (वर उल्लेखलेल्या स्वरुपातील) बाबी यांनाच अंधश्रद्धा मानण्याचे ठरले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाची उत्तम तरतूद पूर्णपणे वगळण्यात आली. यात्रेतील देवाच्या नावाने होणारी पशुहत्या, अंगावर तीक्ष्ण हत्यारांनी जखमा करणे आदी बाबी सर्व सहमतीसाठी वगळण्यात आल्या. तरीही विधिमंडळात व बाहेर कायद्याला झालेला विरोध पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे म्हणावे लागेल.

जगभराच्या समाज विभागांच्या विकासक्रमात एक बाब सर्वत्र व सतत दिसते - प्रत्येक समाज रूढी, कर्मकांडे, परंपरा यांच्यात अडकून पडलेला असतो. त्यापैकी अनेकांना धर्माचरणाचे रूप येते. शतकानुशतके हे चालत राहते. आपण असे का वागतो, हे न तपासता आंधळेपणाने आचरण चालू राहते. त्याच सामाजिक व्यवहाराचे समाजाला वळण पडते. बहुसंख्य समाज भोळेभाबडेपणाने त्याप्रमाणे वागतो आणि त्याचा लाभ उठविणारा मतलबी छोटा वर्ग तयार होतो. तो यासाठी धर्माचा बुरखा वापरतो. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला असतानाही अंधाराच्याच झापडा लावण्याचे समर्थन चलाख भोंदू करत राहतात. दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री संजय पास्वान यांनी काळी विद्या किंवा जादूटोणा करणाऱ्यांना मान्यता देण्याची केलेली घोषणा या भयावह वास्तवाचे विदारक दर्शक घडवते.

भारतीय संविधानाच्या २५ व्या कलमाप्रमाणे धर्मपालन, उपासना, पारलौकिक कल्याण, अध्यात्मिक उन्नती याचे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य आहे. समिती त्याचा पूर्ण आदर करते. याविरोधी जाणारा कायदा करताच येणार नाही आणि सध्याचा कायदा तर दूरान्वयानेही तसा नाही. दुसऱ्या व्यक्तीस शारीरिक, मानसिक इजा पोचवणे, तिचे वित्तीय, भौतिक नुकसान करणे; हेच अंधश्रद्धामूलक कृत्य मानले जाईल. तसे करणे कायद्याने गुन्हा ठरेल. न्यायशास्त्राचा साधा नियम असा आहे की, समाजातील कुणाचे कसले तरी नुकसान कुणी जाणून-बुजून केले तरच त्याला शिक्षाप्राप्त गुन्हा म्हणावे. माझ्या अंगातील दैवीशक्तीने पाऊस पडतो, असे एखादा म्हणाला तर तो गुन्हा नाही. कुणाला कितीही वेडगळ बडबड करण्याचे स्वातंत्र्य आपल्या घटनेने दिले आहे. दुसऱ्याला इजा होणे हा महत्त्वाचा घटक आहे. ही इजा करणारी व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरी त्यामुळे काही फरक पडत नाही. हा कायदा पूर्णत: धर्मनिरपेक्ष आहे. सर्व धर्माच्या अनुयायांना तो सारासार लागू पडणार आहे.

सामान्य लोकांच्या जीविताचे, वित्ताचे रक्षण करणे, त्यांची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा देणे, हे कल्याणकारी शासनाचे कर्तव्य आहे. ज्या अंधश्रद्धा, रूढी, प्रघात लोकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला घातक आहेत, त्यांना अटकाव करणारे अधिकार शासनाने वापरावयास हवेत. लोकांच्या अंधश्रद्धांच्या आधारे स्वत:चे पोट भरू पाहणाऱ्या सर्वधर्मीय प्रस्थापित लुटारूंचा शासनाच्या या कायद्याला विरोध होणारच. अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्यांना ते स्वत:च्या स्वार्थासाठी भडकवणारच. ‘धर्म खतरे में है’ ही घोषणा त्यातून आली आहे.

महाराष्ट्रात समाजसुधारणेची जी चळवळ झाली, तिचा विचार या अनिष्ट प्रथा, रूढी, अंधश्रद्धा यांच्या विरोधात स्पष्टपणे होता. भाजप ज्यांच्या नावाचा उदो-उदो करते, ते सावरकर आणि शिवसेनेचे थेट नाते असलेले ‘प्रबोधन’कार ठाकरे यांनी केवळ जादूटोण्यावर नव्हे, तर धर्माधिष्ठित अंधश्रद्धेवर किती परखड व थेट हल्ले केले होते, याचे विस्मरण हेतुपुरस्सर आहे, असे जाणवते. जादूटोणा, अघोरी प्रथा यातून व्यक्त होणाऱ्या अंधश्रद्धा हे असंस्कृततेचे विकृत, ओंगळ, बीभत्स, अमानुष रूप आहे. ‘हिंदू जनजागरण मोहीम’ या नावाने होत असलेला कायद्याचा विरोध हा हिंदू धर्माच्या प्रगत व बुद्धिवादी परंपरांच्याही विरोधात आहे. वेदांत, उपनिषदांत, भगवद्गीतेत या प्रथांचे समर्थन आहे काय? या मंडळींचे कायद्याला विरोध करण्याचे कारण धर्मप्रेम नव्हे, तर धर्माच्या आधारे विद्वेषाचे राजकारण रूजविणे हे आहे. ‘जादूटोणा, अघोरी प्रथा’ या लोकांचे शोषण करणाऱ्या बाबींना धर्माच्या नावाच्या आडून जर विरोध होत असेल, तर विरोध करणारी मंडळी लोकविरोधी व धर्मविरोधी आहेत, असे मानावे लागेल. महाराष्ट्रातील सूज्ञ जनता हे ओळखेलच, असा विश्वास वाटतो.

कायदा झाला, पुढे काय? याबाबत समितीचा कृती आराखडा तयार आहे. १ जानेवारीपासून समिती महाराष्ट्रव्यापी जनजागरण मोहिमेला प्रारंभ करेल. कायद्याचे खरे रूप लोकांना सांगेल. हा कायदा ‘हिंदू धर्मावर घाला आहे’ अशी तद्दन खोटी अफवा पसरवणाऱ्या, त्याचा प्रचार करणाऱ्या, त्यासाठी लोकांच्या सह्या गोळा करणाऱ्या हिंदू जनजागरण समितीच्या या कारवाईवर ‘चिथावणी देणाऱ्या अफवा पसरवणे’ या कलमाखाली कारवाई करावी, अशी समितीची मागणी राहील. कायद्यातील वस्तुस्थितीबाबत लोकांनी निर्भयपणे पुढे येणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यांचे नाव पूर्ण गुप्त राखले जाईल. या स्वरुपाच्या बाबी घडणारी ठिकाणे कळली तर या कायद्याने प्रथम प्रतिबंधात्मक; आणि त्याने न भागले तर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा समितीचा प्रयत्न राहील. या सर्वेक्षणात काही नवीन वास्तवही समोर येईल; ज्यामुळे कायद्यात आवश्यक असलेली संभाव्य वाढही दृष्टिपथात येऊ शकेल. कोणताही कायदा परिणामकारकपणे अमलात आणण्यासाठी व्यापक प्रबोधन अत्यंत गरजेचे असते. यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक विद्यार्थी आहे. कायद्यातील परिस्थितीमुळे अंधश्रद्धा म्हणजे काय, हे आज विद्यार्थ्यांना थेट समजावणे सोपे आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षण खात्याच्या मदतीने करून उद्याचे नागरिक अंधश्रद्धाबाबत समंजस, डोळस व प्रशिक्षित करण्याचे काम समिती करेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीनेही या प्रकारांचे सर्वदूर सर्वेक्षण होऊ शकेल. कायदा अंमलबजावणीबाबत पोलीस अधिकारी मदतीचे ठरतात. प्रात्यक्षिकासह त्यांचे प्रबोधन करण्याचीही समितीची योजना आहे.

या सर्व प्रयत्नांतूनही अंधश्रद्धांचा मुकाबला फक्त प्राथमिक पातळीवरच होऊ शकेल. अंधश्रद्धाच मानावयास हव्यात, अशा अनेक बाबी आज धर्माच्या आचरणाचा अविभाज्य भाग म्हणून मिरवत आहेत. देवाच्या नावाने होणारी पशुहत्या, सत्यनारायण, नारायण नागबळी, वास्तुशास्त्र, वैभवलक्ष्मीचे व्रत या श्रद्धा आहेत की - अंधश्रद्धा? हा प्रश्नही बहुसंख्यांना रूचत नाही. धर्माच्या आधारे राजकारण करणारे तर त्याला कडाडून हिंसक विरोध करतात. आधी मुसलमान समाजाला सुधारा, असा एक हास्यास्पद (पण लोकांना प्रक्षुब्ध करणारा) युक्तिवाद केला जातो. या देशात ८२ टक्के हिंदू आहेत. त्यांच्या घरात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या रूपाने ज्ञानाचा दिवा लावला तर समाजातील फार मोठ्या वर्गात प्रकाश पसरेल. मग उरलेल्या अंधारालाही हळूहळू काढता पाय घ्यावाच लागेल, ही सरळ बाब या मंडळींना कशी समजत नाही! अध्यात्मिक बुवाबाजी तर या संपूर्ण कक्षेच्या पूर्ण बाहेर आहे. या टप्प्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ एका अधिक मूलभूत टप्प्यावर पोचते. धर्मनिरपेक्ष जनमानस तयार करणे हे अवघड व महत्त्वाचे काम आहे. भारतीय घटनेतील धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व युरोप खंडासारखे दीर्घकाळ राजसत्ता, धर्मसत्ता, विज्ञान याच्या शतकांच्या घुसळणीतून आले नाही. हिंदू-मुस्लिम सलोखा, सर्वधर्मसमभाव हेच त्याचे रूप राहिले. त्यामुळे रूढी, कर्मकांड, परंपरा, धर्माचरण यांची विधायक चिकित्साही जनमानसाला रुचत नाही. धर्माआधारे समाजकारण, राजकारण करणाऱ्या शक्ती तर त्याला हिंसक विरोध करतात. संविधानाचा आशय, कायदा व विवेकशक्ती या आधारे जनजागरण करून धर्मनिरपेक्ष जनमानस घडविणे हे समितीचे पुढील काम आहे. महाराष्ट्रात याला महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, गाडगेबाबा, न्या. रानडे यांची परंपरा आहे. या समाजसुधारकांनी ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री बनवला. समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला. ही प्रबोधन परंपरा जनमानसात रूजवली गेली, तर आज आचरत असलेल्या असंख्य बाबी या खऱ्या धार्मिकतेचा भाग नाहीत, हे लोकांना समजेल, समजावे असा समितीचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास गरजेनुसार या बाबींच्या विरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावानेच कायदा करता येईल. प्रबोधनच प्रभावी व परिणामकारक ठरल्यास त्याचीही गरज पडणार नाही.  हाच संत व समाजसुधारकांचा मार्ग या देशात विधायक भावात्मक धर्मनिरपेक्षता आणेल. हे काम काही दशके; प्रसंगी शतके करावे लागेल, याची समितीला कल्पना आहे. त्यासाठी समिती कटिबद्ध आहे.
कायदा जनजागरण अभियान
१)    हे अभियान १ जानेवारी २००६ पासून ते राज्यपालांची सही कायद्यावर होईपर्यंत किमान तीन महिने चालू राहील.
२)    अभियानात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (धर्मनिरपेक्ष), रिपब्लिकन सर्व गट व शेतकरी संघटना यांचा अत्यंत प्रयत्नपूर्वक सहभाग घ्यावा. अन्य पुरोगामी संघटना व संस्था यांनाही आवर्जून सहभागी करून घ्यावे.
३)    अभियानात शिवसेना, भाजप व हिंदू जनजागरण समिती यांच्याशीही संपर्क साधावा. त्यांच्याशी चर्चा करावी.
४)    याबाबत समितीची भूमिका मांडणाऱ्या पत्रकाचा नमुना ‘मध्यवर्ती’कडून मागवून घ्यावा. कायद्याच्या मसुद्यासाठी प्रत्येकी रुपये ५ प्रमाणे एम.ओ.ने ‘मध्यवर्ती’कडे     पैसे पाठवावेत. पत्रके घरोघरी देऊन चर्चा करावी. ती पाठवू नयेत.
५)    कायद्याबाबत जनजागृती करणारे लेख (वार्तापत्रातील या अंकातील लेख, पूर्वीची पुस्तिका, कायद्याचा मसुदा याआधारे) छोट्या-मोठ्या सर्व साप्ताहिकांना व वृत्तपत्रांना लिहावेत.
६)    छोट्या-छोट्या बैठका ऑफीस स्टाफरूम, महिला मंडळ वगैरे ठिकाणी जरूर      घ्याव्यात. त्यात कायद्याची गरज स्पष्ट करणारी सी. डी. मागवून घ्यावी.
७)    जाहीर सभा घ्याव्यात. त्यात सर्व पक्षांच्या व संघटनांच्या लोकांना बोलवावे. सभेत केवळ कायद्याचे समर्थन नव्हे, तर अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज स्पष्ट होणे इष्ट ठरेल.
८)    या तीन महिन्यात (जानेवारी ते मार्च) उभयतांच्या सवडीने डॉ. दाभोलकर तुमच्या जिल्ह्यात दोन दिवस येण्याचा प्रयत्न करतील. त्यांची जाहीर भाषणे, पत्रकार परिषद, वकिलांसोबत चर्चा, मान्यवरांशी संवाद असे कार्यक्रम ठेवता येतील. जाहीर व्याख्यान घेतल्यास ते पूर्वतयारीने प्रभावीपणे नियोजित व्हावयास हवे.
९)    या अभियानाची मशाल मुख्यमंत्री पेटवतील व गाडीला हिरवा झेंडा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील दाखवतील, असा प्रयत्न चालू आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी २००६)






रविवार, ७ जानेवारी, २०१८

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा : काही नोंदी




अंधश्रद्धा निर्मूलन कायदा : काही नोंदी
दाभोलकर, कायदा, धरणे, कायद्याची गरज, वाटचाल, जनशक्ती    
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा, यासाठी ६ ऑगस्ट २००२ रोजी मुंबई येथे विधिमंडळासमोर म.अं.नि.स. एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहे. त्यानिमित्ताने कायद्याची आवश्यकता का? या संदर्भातील लेख.

१)    कायदा करून समाज बदलतो का, असा प्रश्न सतत विचारला जातो. यासाठी हुंडाबंदी व दारूबंदी कायद्याची उदाहरणे दिली जातात. हा युक्तिवाद अर्धसत्य आहे. केवळ कायद्याने समाज बदलत नाही, हे मान्य आहेच; परंतु संबंधित प्रश्नावर प्रभावी जनचळवळ असेल तर कायद्याची मदत नक्कीच होऊ शकते. अस्पृश्यताविरोधी कायदा किंवा हुंडा व दारूबंदीचे कायदे याबाबत ही गोष्ट लक्षात आली आहे. जनशक्तीला दंडशक्तीची जोड असेल, तर प्रबोधनाची परिणामकारकता नक्कीच वाढू शकते. समितीच्या कार्यामुळे आज अंधश्रद्धा निर्मूलनामागे जनशक्ती येत असून, कायद्यामुळे कार्याची परिणामकारकता वाढेल.

वाटचाल  
२)  अ) १९८९ साली पुणे येथे अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद झाली. कायद्याचे पहिले प्रारूप या परिषदेत मांडण्यात आले. चर्चेमधून पुढे आलेल्या सूचना लक्षात घेऊन ते सुधारित करण्यात आले. महाराष्ट्र मंत्रिमंडळासमोर सध्याचे असलेले कायद्याचे प्रारूप हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या कायदेविषयक समितीच्या सहभागातून तयार करण्यात आले आहे. हे तयार करण्यात मा. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, दिवंगत न्या. बॅ. राजा भोसले, महाराष्ट्राचे निवृत्त कायदा सचिव म. बा. पवार, निवृत्त पोलीस महासंचालक व निवृत्त गृहसचिव भास्करराव मिसर, दादासाहेब रूपवते, नरेंद्र दाभोलकर यांचा समावेश होता.
ब)    या समितीने तयार केलेल्या मसुद्याचे वैशिष्ट्य हे की, श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती, या चर्चेत कायद्याची अंमलबजावणी अडकून पडू नये म्हणून अंधश्रद्धा कशास समजावे, या बाबींचा स्पष्ट उल्लेख या कायद्याच्या परिशिष्टात करण्यात आला आहे. कायदा मंजूर करताना परिशिष्टातील या बाबींची संख्या कमी अथवा अधिक करणे शक्य आहे. या तरतुदींमुळे कायदा करण्यातील महत्त्वाची अडचण दूर झाली आहे.
क)    अंधश्रद्धा समजाव्यात म्हणून कायद्यात समावेश केलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे आहेत.
करणी अथवा भानामती करणे, दैवीशक्तीच्या नावाने मंत्र-तंत्र करणे, भूत उतरवण्यासाठी उदी, ताईत, अंगारा देणे, गंडेदोरे बांधणे, दैवीशक्ती असल्याचा भास निर्माण करून त्याचा प्रसार करणे, देव-देवतांच्या नावांवर संतांचे व थोर पुरुषांचे नाव बदनाम करणे, अंगात आणणे, चेटूक करणे, दैवी शक्तीचा दावा करून चमत्कार करणे, भूत काढण्यासाठी साखळदंडाने बांधून मारहाण करणे, अघोरी विधी करणे, तांत्रिक क्रिया करून परिसरात घबराट पसरवणे, मुलगा होण्यासाठी गोपाल संतानविधी करणे, वैद्यकीय उपचाराला विरोध करून अघोरी उपचार करावयास लावणे, मंतरलेले खडे, दोरे, ताईत विकणे, अंगात संचार येऊन लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, नवस फेडण्यासाठी हाल करून प्राण्याची कत्तल करणे, सर्पदंशावर वा पिसाळलेला कुत्रा चावल्यावर गावठी औषधोपचार करणे, दैवी कृपेने संतती मिळवून देणे, या व या स्वरुपाच्या अनेक बाबींना अंधश्रद्धा मानण्यात आले आहे. या सर्व बाबींच्या संदर्भात कायद्याच्या अभावाने कारवाई न झालेली अनेक उदाहरणे समितीकडे आहेत.
ड)    हा कायदा होण्यासाठी आमदार पी. जी. दस्तूरकर, जयवंत ठाकरे, व्यंकप्पा पत्की, दि. बा. पाटील या चार आमदारांनी १९९५ च्या एप्रिल उन्हाळी अधिवेशनात अशासकीय ठराव दिला. परंतु त्यावर प्रत्यक्ष चर्चा होऊ शकली नाही. जुलै १९९५ च्या पावसाळी अधिवेशनात त्यावर सांगोपांग चर्चा झाली. त्यावेळी युती शासन सत्तेत होते. गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मागणी मान्य केली व शासन कायदा करेल, ठराव मागे घ्यावा, अशी विनंती केली. ठराव मांडणाऱ्या आमदारांनी ती फेटाळून ठराव मतास टाकला व २३ अनुकूल विरुद्ध ६ प्रतिकूल याप्रमाणे विभाजन होऊन अशासकीय प्रस्ताव संमत झाला. विशेष म्हणजे विधान परिषदेत चर्चा होताना कोणीही या ठरावास विरोध केला नव्हता. सर्वच्या सर्व भाषणे कायदा करण्याची गरज मान्य असणारी होती.
३)    त्यावेळी विरोधात असून विधान परिषदेत बहुमताने असलेला काँग्रेस पक्ष सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे. सत्तेतील लोकशाही आघाडीने प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक किमान कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये हे सरकार सत्तेवर आल्यापासून एका वर्षाच्या आत उघड स्वरुपाच्या अंधश्रद्धांना विरोध करणारा स्वतंत्र असा अंधश्रद्धा निर्मूलन      कायदा करेल, असे एक कलम आहे. याबाबत शासनाला वारंवार आठवण करून देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नाही.

जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून धरण्याचा प्रयत्न आमदार बी. टी. देशमुख; तसेच अन्य काही आमदार करणार आहेत. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार ता. ६ ऑगस्ट रोजी विधिमंडळासमोर एक धरणे आंदोलन समितीने आयोजित केले आहे. ‘महाराष्ट्र अंनिस’च्या सर्व ३० शाखांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत. तसेच प्रा. डॉ. एन. डी. पाटील, पुष्पाताई भावे, डॉ. श्रीराम लागू, चंद्रशेखर धर्माधिकारी, निखिल वागळे आदी मान्यवरही सहभागी होणार आहेत. केलेल्या ठरावाची कालबद्ध पूर्तता करावी, अशी समितीची मागणी आहे. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी हीच मागणी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना केली आहे.

४)    सध्या असलेले व उपयोगी पडणारे कायदे-
अ)    यात चमत्कारिक औषधाची जाहिरात करणाऱ्या ‘ड्रग्ज अ‍ॅण्ड मॅजिक रेमिडीज अ‍ॅक्ट १९५४’ नुसार काही बाबतीत कारवाई होऊ शकते. हा कायदा बहुसंख्य पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नसतो, असा अनुभव आहे.
ब)    ४२० अंतर्गत, ठकबाजी म्हणून कारवाई होऊ शकते. परंतु अंधश्रद्धेचे प्रकार वा बाहेरची बाधा वा दैवीशक्ती असे मानून हा कायदा होऊ शकतो. हा कायदा या फसवणुकीस अपवादात्मक वेळीच वापरला जातो.
क)    औषध व अन्नभेसळ प्रशासन यांच्या परिपत्रकाप्रमाणे बोगस डॉक्टरवरील कारवाईचा आधार मिळू शकतो.
५)    अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची गरज उदाहरणाने स्पष्ट करणाऱ्या काही बाबी नोंदीच्या स्वरुपात पुढे दिल्या आहेत. याबाबतचे सर्व तपशील समितीचे मासिक; तसेच ‘लढे अंधश्रद्धेचे’ या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकात तपशीलवार उपलब्ध आहेत.

१)    भावनगरची पार्वतीमाँ - चार वर्षांपूर्वी भावनगर (गुजरात) येथील पार्वतीमाँ ही बाई तिला मिळालेल्या शंकराच्या वरामुळे निपुत्रिकांना संतती देऊ शकते, हा प्रचार महाराष्ट्रात प्रचंड झाला. महाराष्ट्रात एकही तालुका असा नसेल की, ज्यामधून मोठ्या संख्येने निपुत्रिक जोडपी गुजरातला गेली नाहीत. वेळ, श्रम, पैसा वाया गेला; आरोग्याला धोकाही झाला. मात्र त्यावेळचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी यावर काही कारवाई करण्यास असमर्थता व्यक्त केली.

२)    तीन वर्षांपूर्वी कुशिरे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील गुरव बंधूंच्या बैलाचे डोळे गेले. त्यांना स्वप्नात देव दिसला. त्याने सांगितले त्याप्रमाणे एका झाडाच्या पाल्याचा रस गुरव यांनी बैलाच्या डोळ्यात घातला. त्याची दृष्टी आली. गुरव बंधूंनी हाच प्रयोग माणसांवर सुरू केला. दोन ते तीन महिन्यांत एक ते दीड लाख लोकांनी हे औषध घालून घेतले. नेत्ररोगतज्ज्ञांच्या संघटनेने याबाबत स्पष्ट विरोधी मत नोंदवले. तरीही हा प्रकार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी वा जिल्हा पोलीसप्रमुख थांबवू शकले नाहीत. त्यांच्या मते यासाठी कायदा नव्हता. समितीने चळवळ करून हे प्रकार थांबवले.
३)    सातारा येथे दोन वर्षांपूर्वी साहिबजादी या बाईने घरातील करणी काढण्याचे प्रात्यक्षिक म्हणून लिंबातून खिळे, टाचण्या, ताईत काढून दाखविले. संबंधित व्यक्तीची पूर्ण झडती घेऊन मग तिला चमत्कार करायला लावण्याची तरतूद आजच्या कायद्यात नाही. प्रत्येकजण आपल्या श्रद्धेप्रमाणे वागेल, असे म्हणून असे प्रकार राजरोस चालू राहतात.

४) दोन महिन्यांपूर्वी बागलकोट येथील अस्लम ब्रेडवाले या बाबाने नरसोबाचीवाडी व मिरज येथे नुसत्या हाताच्या बोटांनी, भुलीशिवाय पोटावर मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. अपेंडिक्स, मूतखडा, हृदयाच्या झडपा या सर्व बाबी अशाप्रकारे दुरुस्त करण्याचा त्याचा दावा होता. यासोबत रुग्णांना तो औषधेही देत होता. प्रचंड गर्दी होती. समितीने तक्रार नोंदवूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. सरतेशेवटी अगदी नाईलाजाने कारवाई करावयास गेले, तोपर्यंत बाबा पसार झाला. उपचार मिळालेल्या हजारो (अंधश्रद्ध) रुग्णांच्या रागाचे बळी समितीला व्हावे लागले.

५) आजही गावोगावी मंत्र-तंत्र, ताईत, तोडगे, उतारे या आधारे जीवनातील आरोग्यासकट अन्य सर्व प्रकारच्या समस्यांवर उपाय केले जातात. मुंबईच्या लोकलमधील बंगाली बाबांच्या जाहिराती हे याचे चांगले उदाहरण आहे. यावर कारवाई होऊ शकत नाही

६)    ‘करणी’ करतो म्हणून दहशत घातली जाते. करणी केली या नावाने भांडणे, मारामाऱ्या होतात. अशा बाबतीत अडचणीत असलेल्याच्या बाजूला पोलीस काही मदत करत नाहीत. ‘हा प्रकार बाहेरचा आहे, तुमचे तुम्ही बघा,’ असे म्हणून पोलीस तक्रार दाखलच करून घेत नाहीत.
७)    मानसिक आजारावर उपचार म्हणून मांत्रिकाने मारहाण करणे; प्रसंगी साखळदंडाने बांधून ठेवणे हे प्रकार आजही चालतात. मागील वर्षी बुलढाण्यापासून २० किलोमीटर अंतरावरील सैलानीबाबाच्या दर्ग्यावरील अशी प्रकरणे सविस्तरपणे वृत्तपत्रात आली होती.

८) हातामधून आपोआप प्रसाद पाडून, कुंकवाचा बुक्का व बुक्क्याची हळद करून या चिल्लर कथित चमत्काराच्या नावाने दहशत घालून अरिष्ट टाळण्यासाठी माणसांना ग्रहाची, देवाची शांती करावयास लावले जाते. या व्यक्तींच्यावर कोणतीच कारवाई आज करता येत नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००२)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...