अंधश्रद्धा
निर्मूलन कायदा : काही नोंदी
दाभोलकर, कायदा, धरणे, कायद्याची गरज,
वाटचाल, जनशक्ती
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा, यासाठी ६ ऑगस्ट २००२ रोजी मुंबई येथे विधिमंडळासमोर
म.अं.नि.स. एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहे. त्यानिमित्ताने कायद्याची आवश्यकता
का? या संदर्भातील लेख.
१) कायदा करून समाज
बदलतो का, असा
प्रश्न सतत विचारला जातो. यासाठी हुंडाबंदी व दारूबंदी कायद्याची उदाहरणे दिली जातात.
हा युक्तिवाद अर्धसत्य आहे.
केवळ कायद्याने समाज बदलत नाही, हे
मान्य आहेच; परंतु
संबंधित प्रश्नावर प्रभावी जनचळवळ असेल तर कायद्याची मदत नक्कीच होऊ शकते. अस्पृश्यताविरोधी
कायदा किंवा हुंडा व दारूबंदीचे कायदे याबाबत ही गोष्ट लक्षात आली आहे. जनशक्तीला दंडशक्तीची
जोड असेल, तर प्रबोधनाची परिणामकारकता
नक्कीच वाढू शकते. समितीच्या कार्यामुळे आज अंधश्रद्धा निर्मूलनामागे जनशक्ती येत असून,
कायद्यामुळे कार्याची परिणामकारकता वाढेल.
वाटचाल
२) अ) १९८९ साली पुणे येथे
अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद झाली. कायद्याचे पहिले प्रारूप या परिषदेत मांडण्यात
आले. चर्चेमधून पुढे आलेल्या सूचना लक्षात घेऊन ते सुधारित करण्यात आले. महाराष्ट्र
मंत्रिमंडळासमोर सध्याचे असलेले कायद्याचे प्रारूप हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
मुंबई यांच्या कायदेविषयक समितीच्या सहभागातून
तयार करण्यात आले आहे. हे तयार करण्यात मा. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, दिवंगत न्या. बॅ. राजा भोसले, महाराष्ट्राचे निवृत्त कायदा सचिव म. बा.
पवार, निवृत्त पोलीस महासंचालक
व निवृत्त गृहसचिव भास्करराव मिसर, दादासाहेब
रूपवते, नरेंद्र दाभोलकर यांचा
समावेश होता.
ब) या समितीने तयार केलेल्या
मसुद्याचे वैशिष्ट्य हे की, श्रद्धा
कोणती आणि अंधश्रद्धा कोणती, या
चर्चेत कायद्याची अंमलबजावणी अडकून पडू नये म्हणून अंधश्रद्धा कशास समजावे,
या बाबींचा स्पष्ट उल्लेख या कायद्याच्या
परिशिष्टात करण्यात आला आहे. कायदा मंजूर करताना परिशिष्टातील या बाबींची संख्या कमी
अथवा अधिक करणे शक्य आहे. या तरतुदींमुळे कायदा करण्यातील महत्त्वाची अडचण दूर झाली
आहे.
क) अंधश्रद्धा समजाव्यात म्हणून कायद्यात समावेश
केलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे आहेत.
करणी अथवा भानामती करणे, दैवीशक्तीच्या नावाने मंत्र-तंत्र करणे,
भूत उतरवण्यासाठी उदी,
ताईत, अंगारा देणे, गंडेदोरे बांधणे, दैवीशक्ती असल्याचा भास निर्माण करून त्याचा
प्रसार करणे, देव-देवतांच्या
नावांवर संतांचे व थोर पुरुषांचे नाव बदनाम करणे, अंगात आणणे, चेटूक करणे, दैवी शक्तीचा दावा करून चमत्कार करणे,
भूत काढण्यासाठी साखळदंडाने
बांधून मारहाण करणे, अघोरी
विधी करणे, तांत्रिक
क्रिया करून परिसरात घबराट पसरवणे, मुलगा होण्यासाठी गोपाल संतानविधी करणे, वैद्यकीय उपचाराला विरोध करून अघोरी उपचार
करावयास लावणे, मंतरलेले
खडे, दोरे,
ताईत विकणे, अंगात संचार येऊन लोकांच्या प्रश्नांची उत्तरे
देणे, नवस
फेडण्यासाठी हाल करून प्राण्याची कत्तल करणे, सर्पदंशावर वा पिसाळलेला कुत्रा चावल्यावर गावठी औषधोपचार करणे, दैवी कृपेने संतती मिळवून देणे, या व या स्वरुपाच्या अनेक बाबींना अंधश्रद्धा
मानण्यात आले आहे.
या सर्व बाबींच्या संदर्भात कायद्याच्या अभावाने कारवाई न झालेली अनेक उदाहरणे समितीकडे
आहेत.
ड) हा कायदा होण्यासाठी
आमदार पी. जी. दस्तूरकर, जयवंत
ठाकरे, व्यंकप्पा पत्की,
दि. बा. पाटील या चार आमदारांनी १९९५ च्या
एप्रिल उन्हाळी अधिवेशनात अशासकीय ठराव दिला. परंतु त्यावर प्रत्यक्ष चर्चा होऊ शकली
नाही. जुलै १९९५ च्या पावसाळी अधिवेशनात त्यावर सांगोपांग चर्चा झाली. त्यावेळी युती
शासन सत्तेत होते. गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मागणी मान्य केली व शासन कायदा करेल,
ठराव मागे घ्यावा, अशी विनंती केली. ठराव मांडणाऱ्या आमदारांनी
ती फेटाळून ठराव मतास टाकला व २३ अनुकूल विरुद्ध ६ प्रतिकूल याप्रमाणे विभाजन होऊन
अशासकीय प्रस्ताव संमत झाला. विशेष म्हणजे विधान परिषदेत चर्चा होताना कोणीही या ठरावास
विरोध केला नव्हता. सर्वच्या सर्व भाषणे कायदा करण्याची गरज मान्य असणारी होती.
३) त्यावेळी विरोधात असून
विधान परिषदेत बहुमताने असलेला काँग्रेस पक्ष सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे. सत्तेतील
लोकशाही आघाडीने प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक किमान कार्यक्रम
जाहीर केला. त्यामध्ये हे सरकार सत्तेवर आल्यापासून एका वर्षाच्या आत उघड स्वरुपाच्या
अंधश्रद्धांना विरोध करणारा स्वतंत्र असा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करेल, असे एक कलम आहे. याबाबत शासनाला वारंवार
आठवण करून देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नाही.
जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून
धरण्याचा प्रयत्न आमदार बी. टी. देशमुख; तसेच अन्य काही आमदार करणार आहेत. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी
मंगळवार ता. ६ ऑगस्ट रोजी विधिमंडळासमोर एक धरणे आंदोलन समितीने आयोजित केले आहे. ‘महाराष्ट्र अंनिस’च्या सर्व ३० शाखांचे
प्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत. तसेच प्रा. डॉ. एन. डी. पाटील, पुष्पाताई भावे, डॉ. श्रीराम लागू, चंद्रशेखर धर्माधिकारी, निखिल वागळे आदी मान्यवरही सहभागी होणार
आहेत. केलेल्या ठरावाची कालबद्ध पूर्तता करावी, अशी समितीची मागणी आहे. महाराष्ट्रातील अनेक
मान्यवरांनी हीच मागणी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना केली आहे.
४)
सध्या असलेले व उपयोगी पडणारे कायदे-
अ) यात चमत्कारिक औषधाची
जाहिरात करणाऱ्या ‘ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज अॅक्ट १९५४’ नुसार काही बाबतीत कारवाई होऊ शकते. हा कायदा बहुसंख्य पोलीस अधिकाऱ्यांना
माहीत नसतो, असा
अनुभव आहे.
ब) ४२० अंतर्गत,
ठकबाजी म्हणून कारवाई होऊ शकते. परंतु अंधश्रद्धेचे
प्रकार वा बाहेरची बाधा वा दैवीशक्ती असे मानून हा कायदा होऊ शकतो. हा कायदा या फसवणुकीस
अपवादात्मक वेळीच वापरला जातो.
क) औषध व अन्नभेसळ प्रशासन
यांच्या परिपत्रकाप्रमाणे बोगस डॉक्टरवरील कारवाईचा आधार मिळू शकतो.
५) अंधश्रद्धा निर्मूलन
कायद्याची गरज उदाहरणाने स्पष्ट करणाऱ्या काही बाबी नोंदीच्या स्वरुपात पुढे दिल्या
आहेत. याबाबतचे सर्व तपशील समितीचे मासिक; तसेच ‘लढे अंधश्रद्धेचे’ या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकात तपशीलवार उपलब्ध आहेत.
१) भावनगरची पार्वतीमाँ
- चार वर्षांपूर्वी भावनगर (गुजरात) येथील पार्वतीमाँ ही बाई तिला मिळालेल्या शंकराच्या
वरामुळे निपुत्रिकांना संतती देऊ शकते, हा प्रचार महाराष्ट्रात प्रचंड झाला. महाराष्ट्रात एकही तालुका
असा नसेल की, ज्यामधून
मोठ्या संख्येने निपुत्रिक जोडपी गुजरातला गेली नाहीत. वेळ, श्रम, पैसा वाया गेला; आरोग्याला धोकाही झाला. मात्र त्यावेळचे
गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी यावर काही कारवाई करण्यास असमर्थता व्यक्त केली.
२) तीन वर्षांपूर्वी कुशिरे
(ता. पन्हाळा, जि.
कोल्हापूर) येथील गुरव बंधूंच्या बैलाचे डोळे गेले. त्यांना स्वप्नात देव दिसला. त्याने
सांगितले त्याप्रमाणे एका झाडाच्या पाल्याचा रस गुरव यांनी बैलाच्या डोळ्यात घातला.
त्याची दृष्टी आली. गुरव बंधूंनी हाच प्रयोग माणसांवर सुरू केला. दोन ते तीन महिन्यांत
एक ते दीड लाख लोकांनी हे औषध घालून घेतले. नेत्ररोगतज्ज्ञांच्या संघटनेने याबाबत स्पष्ट
विरोधी मत नोंदवले. तरीही हा प्रकार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी वा जिल्हा पोलीसप्रमुख
थांबवू शकले नाहीत. त्यांच्या मते यासाठी कायदा नव्हता. समितीने चळवळ करून हे प्रकार
थांबवले.
३) सातारा येथे दोन वर्षांपूर्वी
साहिबजादी या बाईने घरातील करणी काढण्याचे प्रात्यक्षिक म्हणून लिंबातून खिळे,
टाचण्या, ताईत काढून दाखविले. संबंधित व्यक्तीची पूर्ण
झडती घेऊन मग तिला चमत्कार करायला लावण्याची तरतूद आजच्या कायद्यात नाही. प्रत्येकजण
आपल्या श्रद्धेप्रमाणे वागेल, असे
म्हणून असे प्रकार राजरोस चालू राहतात.
४) दोन महिन्यांपूर्वी बागलकोट येथील अस्लम ब्रेडवाले या बाबाने
नरसोबाचीवाडी व मिरज येथे नुसत्या हाताच्या बोटांनी, भुलीशिवाय पोटावर मोठ्या शस्त्रक्रिया केल्या.
अपेंडिक्स, मूतखडा, हृदयाच्या झडपा या सर्व बाबी अशाप्रकारे
दुरुस्त करण्याचा त्याचा दावा होता. यासोबत रुग्णांना तो औषधेही देत होता. प्रचंड गर्दी
होती. समितीने तक्रार नोंदवूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. सरतेशेवटी अगदी नाईलाजाने
कारवाई करावयास गेले, तोपर्यंत
बाबा पसार झाला. उपचार मिळालेल्या हजारो (अंधश्रद्ध) रुग्णांच्या रागाचे बळी समितीला
व्हावे लागले.
५) आजही गावोगावी मंत्र-तंत्र, ताईत, तोडगे, उतारे या आधारे जीवनातील आरोग्यासकट अन्य
सर्व प्रकारच्या समस्यांवर उपाय केले जातात. मुंबईच्या लोकलमधील बंगाली बाबांच्या जाहिराती
हे याचे चांगले उदाहरण आहे. यावर कारवाई होऊ शकत नाही
६) ‘करणी’ करतो म्हणून दहशत घातली जाते. करणी केली
या नावाने भांडणे, मारामाऱ्या
होतात. अशा बाबतीत अडचणीत असलेल्याच्या बाजूला पोलीस काही मदत करत नाहीत. ‘हा प्रकार
बाहेरचा आहे, तुमचे
तुम्ही बघा,’
असे म्हणून पोलीस तक्रार दाखलच करून घेत नाहीत.
७) मानसिक आजारावर उपचार
म्हणून मांत्रिकाने मारहाण करणे; प्रसंगी
साखळदंडाने बांधून ठेवणे हे प्रकार आजही चालतात. मागील वर्षी बुलढाण्यापासून २० किलोमीटर
अंतरावरील सैलानीबाबाच्या दर्ग्यावरील अशी प्रकरणे सविस्तरपणे वृत्तपत्रात आली होती.
८) हातामधून आपोआप प्रसाद पाडून, कुंकवाचा बुक्का व बुक्क्याची हळद करून या
चिल्लर कथित चमत्काराच्या नावाने दहशत घालून अरिष्ट टाळण्यासाठी माणसांना ग्रहाची,
देवाची शांती करावयास लावले जाते. या व्यक्तींच्यावर
कोणतीच कारवाई आज करता येत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा