वाटचाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाटचाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

जादूटोणाविरोधी कायद्याची वाटचाल




जादूटोणाविरोधी कायद्याची वाटचाल
दाभोलकर, कायदा, वाटचाल
नागपूरच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात जादूटोणाविरोधी कायदा कार्यक्रमपत्रिकेवर होता. तो चर्चेला येईल, असे ठाम आश्वासन (नेहमीप्रमाणे) संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले होते. कायदा सरकारचा आहे. राज्यकर्त्या पक्षाचे विधानसभा व विधान परिषदेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे कायदा मंजूर होईल, अशी समितीची अपेक्षा होती. कायद्याच्या चर्चेच्या वेळेला मदतीची ठरावी म्हणून कायद्याचे स्वरूप, त्याबाबतचे आक्षेप व त्याबाबतची वस्तुस्थिती याची मी लिहिलेली पुस्तिका सत्तारूढ पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा पाठवली होती. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स व लोकमत या प्रमुख दैनिकांनी कायद्याला सहाय्यभूत ठरतील, असे लेख अधिवेशनाच्या आधी १५ दिवस छापले होते. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत पत्रे लिहिली होती. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना कायदा करण्याबाबतची निवेदने देण्यात आली होती. ही सर्व अनुकुलता असतानाही एक मर्यादा स्पष्ट जाणवत होती. ती अशी की, १ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून अशी विनंती केली होती की, कायदा नागपूर अधिवेशनात मंजूर होण्यासाठी त्या उभयतांची विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांच्यासह बैठक घेऊन निर्णय व्हावा. खरे तर हे पत्र स्वत: ना. अजित पवारांनी ना. मुख्यमंत्र्यांच्या हातात दिले होते. त्याची प्रत मला पाठवली होती आणि त्यांचे कार्यालय मुख्यमंत्री कार्यालयाकडे बैठकीची वेळ मिळण्यासाठी पाठपुरावा करत होते. अधिवेशनाला तब्बल ४० दिवस असताना अशी बैठक घेणे ही बाब सहज साध्य होती; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. हे लक्षण कायदा करण्याच्या निर्धाराचे नव्हते.

१० डिसेंबरला अधिवेशन चालू झाले. १३ डिसेंबरला मी, अविनाश पाटील, गजेंद्र सुरकार नागपूरला विधिमंडळात होतो. वर उल्लेखलेली बैठक घेण्याबाबत दोनदा पत्र निघाले होते. परंतु प्रत्यक्षात बैठक झालेली नव्हती. ना. अजित पवार, ना. छगन भुजबळ, ना. लक्ष्मणराव ढोबळे, ना. हर्षवर्धन पाटील, ना. शिवाजीराव मोघे, ना. सचिन अहिर, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, आ. विलासकाका उंडाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. डॉ. तांबे, आ. शिरीष चौधरी इतक्या जणांना त्या दिवशी आम्ही भेटलो. सगळ्यांचा सूर होकारात्मक होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलावलेली बैठक दोनदा पुढे का ढकलली गेली, हे कोणालाच माहीत नव्हते. शेवटी आम्ही मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गाठले. तेथील अधिकारी वर्ग कायद्याबाबत मनापासून मदत करणारा आहे. त्यामुळे ही बैठक ताबडतोब दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ तारखेला दुपारी २.०० वाजता लावण्यात ते यशस्वी झाले. सर्व मंत्र्यांच्या टेबलावर कायद्याला का विरोध करावा, याबाबत सनातन प्रभातचे अंक आदल्या दिवशी पोचल्याचे आढळले. १४ तारखेला आम्ही पुन्हा विधानसभेत गेलो. अपेक्षा अशी होती की, बैठकीत एकमत होऊन कायदा चर्चेला आणला जाईल, मंजूर होईल; परंतु असे दिसते की, कायदा सहमतीनेच व्हावे, असे मुख्यमंत्र्यांना वाटते आहे. जी बैठक १४ तारखेला झाली, त्याबद्दल जी माहिती मिळाली, त्याप्रमाणे मा. सभापतींनी कायद्याबाबत वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधींसमवेत आणखी चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला. अशी बैठक बुधवार, ता. २० डिसेंबर रोजी झाली असे कळते. तिला मुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे आणि वारकरी संप्रदायाचे नेते हजर होते. या बैठकीत कायद्याच्या प्रारूपावर काही आक्षेप घेण्यात आले. खरे तर या आक्षेपात काही नवीन नव्हते. दीड वर्षांपूर्वी ना. अजित पवार यांनी जी बैठक घेतली, त्यामध्ये असेच आक्षेप घेण्यात आले होते व त्याचे समाधानकारक उत्तर ना. पवार, ना. आर. आर. पाटील, विधी खात्याचे सचिव यांनी दिले होते. तसेच त्यांनी हे देखील सांगितले होते की, तुमचे अजून काही म्हणणे असेल तरी तुम्ही पुन्हा सचिवांना भेटा. पुन्हा दीड वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती होत होती. शासनाने तत्परतेने काम केले असते, तर ही बाब सहज टाळता आली असती. एक गोष्ट बरी होती, कायद्याबाबत आक्षेप घेणारा व अधिक चर्चेची मागणी करणारा एक विस्तृत लेख १६ डिसेंबरच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झाला होता. मात्र त्यातील माहिती ही वास्तवाचा विपर्यास करणारी होती. त्यामुळे उत्तर देणारा माझा लेख १८ तारखेच्या ‘लोकमत’मध्ये त्याच जागी आणि तेवढ्याच विस्तृतपणे छापला गेला होता. तो ना. शिवाजीराव मोघे यांनी वाचला होता. तसेच अधिवेशन सुरू होण्यापूर्वी वृत्तपत्रात कायद्याबाबत आलेले माझे लेख हे मुख्यमंत्र्यांच्या नजरेसमोर ठेवण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्री कायदा करण्याबाबत होकारार्थी होते, असे कळते. तसेच तुकारामांचे थेट वंशज, ज्येष्ठ साहित्यिक व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनीही कायद्याच्या आवश्यक सामाजिक कार्याला वारकऱ्यांनी पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली. शेवटी ठरले असे की, सर्वांना सध्याच्या कायद्याचा मसुदा देण्यात यावा. त्यांच्या सूचनांसह कायदा पुन्हा तयार करावा आणि मंत्रिमंडळात मंजूर करून तो विधानसभेत मांडावा. कायदा शासनाचा आहे, त्यामुळे तो कशा पद्धतीने करायचा, हे अर्थातच शासन ठरवणार हे उघडच आहे; मात्र जे करावयाचे ते शासनाने कालबद्ध पद्धतीने व सत्वर करावे, अशी आपली अपेक्षा आहे.

नेमकी याच दिवशी आयबीएन लोकमत या चॅनेलवर प्राईम टाईममध्ये मी, शिवसेना नेते दिवाकर रावते व काँग्रेसचे नेते आ. भाई जगताप यांची चर्चा झाली. कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांत प्रथम क्रमांकावर आ. रावते होते. मात्र त्या दिवशीचे त्यांचे प्रतिपादन वेगळेच होते. ते असे सांगत होते की, कायद्यात काही बदल करू घातले आहेत. ते झाले तर विरोधाचा फारसा प्रश्न उरणार नाही. आम्हाला प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा आहे. मात्र कायदा सर्व धर्मांना लागू हवा. (तो तसाच आहे). कायद्यातील हे बदल मंत्रिमंडळ गुरुवार, ता. २१ रोजी मंजूर करेल आणि पुढच्या दोन दिवसांत कायदा मंजूर करेल, अशी एक शक्यताही त्यांनी या चर्चेत व्यक्त केली. भाई जगताप यांनी तर मुख्यमंत्री होकारात्मक निर्णय लवकर घेणार, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गुरुवारच्या वृत्तपत्रात असे होण्याची शक्यताही व्यक्त झाली होती. अर्थात असे काही झाले नाही, हे कायद्याच्या आजपर्यंतच्या वाटचालीला धरूनच झाले.

आता ९ जानेवारीला वारकरी संप्रदायाच्या नेत्यांच्याबरोबर कायद्यातील प्रारूपात सुधारणा सुचवण्यासाठी शासनाची बैठक होईल. तिला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर गृहमंत्री आर. आर. पाटील, पिढीजात वारकरी असलेले. ना. बबनराव पाचपुते हजर असतील. त्यानंतर या सुधारणांबाबत शासन बहुधा विरोधी पक्षनेत्यांशी आणि समितीशीही चर्चा करेल. यातून सहमतीने तयार होणारे विधेयक मंत्रिमंडळासमोर जाईल व तेथे मंजूर झाले की, विधिमंडळात चर्चेला येईल. सहमतीच्या या प्रक्रियेमुळे कायदा सुरळीतपणे मंजूर होईल, असे सरकारला वाटते.

प्रत्यक्षात काय घडले हे पाहावे लागेल. शासनाची कार्यक्षमता व राजकीय इच्छाशक्ती याचा आजपर्यंतचा अनुभव आश्वासक नाही. शासनाला जर खरेच जादूटोणाविरोधी कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करावयाचा असेल तर त्यांना ते सहज शक्य आहे. कायद्यामधील सुचवलेल्या बदलांबाबत त्वरित निर्णय घेणे, कायद्याचा सुधारित मसुदा मंत्रिमंडळाने ताबडतोब मंजूर करणे व अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात स्पष्ट बहुमत असल्याने कायदा सहमतीने व ती न झाल्यास बहुमताने मंजूर करून घेणे, हे शासन सहज करू शकते. परंतु यातील प्रत्येक टप्प्यावर कितीही वेळकाढूपणा होऊ शकतो; तसेच कोणत्या स्वरुपाचा कायदाच होऊ नये, यासाठी कार्यरत असणाऱ्या शक्ती सहजासहजी आपला पराभव मान्य करणाऱ्या नसल्याने कायदा होण्यापासून सरकारला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न त्या करणार, हे उघड आहे. काय होते ते प्रत्यक्षात दिसेलच; मात्र माझा असा अनुभव आहे की, कायदा व्हावा, याबाबत जनमत दिवसेंदिवस अधिक अनुकूल होत चालले आहे. या हिवाळी अधिवेशनात कायदा होईल, अशी त्यांची अपेक्षा होती आणि तो झाला नाही, याबाबत नाराजीही अनेक ठिकाणी व्यक्त झाली आहे. कायद्यात धर्मविरोधी काही नाही, याची तर आता लोकांना खात्री पटली आहे आणि कायद्याची गरज स्पष्ट करणाऱ्या इतक्या घटना आजूबाजूला घडत असतात की, त्यासाठी वेगळे सांगण्याचीच गरज नाही. हे सर्व लक्षात घेता समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सहानुभूतीदारांनी, पाठीराख्यांनी कायदा होण्याबाबतचा आपला आग्रह कायम ठेवला पाहिजे. सत्याचा विजय उशिरा; पण निश्चित होईल, अशी माझी धारणा आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी २०१३)




मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

कायदानिर्मितीच्या आघाडीवर




कायदानिर्मितीच्या आघाडीवर
दाभोलकर, कायदा, वाटचाल, इच्छाशक्तीचा अभाव, विरोध, खडतर संघर्ष
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन आले की, जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्याची चर्चा चालू होते. अधिवेशनाच्या विषय नियामक पत्रिकेत गेली चारही अधिवेशनांत या कायद्याचा समावेश होता. हा कायदा आम्ही करणार आहोत, असे संसदीय कामकाज मंत्री ना. हर्षवर्धन पाटील दर अधिवेशनाच्यावेळी सांगतात. यावेळेस तर मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनीही तसे सांगितले. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने पहिल्या पानावर चौकटीत ठळकपणे ते छापले. याबाबत संघटना म्हणून समितीने केलेल्या प्रयत्नाचा हा लेखा-जोखा...

कायदा करणार आहोत, असा स्पष्ट शब्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती स्पष्टपणे देत असल्याने याबाबत काही आंदोलन करावयाचे नाही, असा निर्णय समितीच्या राज्य कार्यकारिणीने जूनमध्ये घेतला. अपेक्षित होते की, सरकार पुढाकार घेईल आणि प्रत्यक्ष अमलातही आणेल.

सोमवार, ता. ९ जुलै रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू होणार होते. मी बुधवार, ता. ४ जुलैला मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संबंधित खात्याचे मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांना भेटलो. त्या आधी दोनच दिवस पुणे येथील प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता की, या अधिवेशनात कायदा मंजूर होईल का? त्यांनी उत्तर दिले होते, पावसाळी अधिवेशन छोटे असते. अर्थसंकल्पी अधिवेशनात कायदा करू. या त्यांच्या उत्तराबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनीही माझ्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ना. मोघे यांनी मला मोघम उत्तर दिले. त्यानंतर मी थेट मुख्यमंत्र्यांनाच गाठले. मुख्यमंत्र्यांना अपॉइंटमेंटशिवाय गाठणे तसे अशक्य असते. पण त्यांचे प्रधान सचिव श्री. जैन यांना कायद्याबाबत अगत्य असल्याने त्यांनी माझी थेट भेट घालून दिली. मी दिलेल्या निवेदनात लिहिले होते, गेल्या तीन अधिवेशनांत कायदा पटलावर होता. काहीही चर्चा झाली नाही. न्यायाला विलंब हा न्यायाला नकार ठरतो आहे. याच अर्थाचे चार स्पष्ट बोल मी मुख्यमंत्र्यांना ऐकवलेही. मुख्यमंत्र्यांनी कायदा अधिवेशनात चर्चेला घ्यावा, असा स्पष्ट शेरा निवेदनावर मारला. विधानसभेच्या सुरुवातीला बिल चर्चेला यावे, अशी अपेक्षा होती. म्हणून अधिवेशन सुरू झाल्यावर लगेच तिसऱ्या दिवशी ११ जुलैला पुन्हा एकदा मी व अविनाश पाटील विधिमंडळात गेलो. त्यावेळी एक नवीनच माहिती कळली. ती अशी की, मागील पावसाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक मांडण्यात आले होते. त्यानंतरच्या पुढील दोन अधिवेशनात ते चर्चेला आले नव्हते. या पावसाळी अधिवेशनातही ते चर्चेला न आल्यास एका वर्षापेक्षा अधिक काळ विधेयक विनाचर्चा राहिल्यामुळे ते आपोआपच रद्द होते. मग ते पुन्हा नव्याने मांडण्याचा सर्व खटाटोप करावा लागतो. सामाजिक न्याय विभागाचा प्रयत्न हे न घडू देण्याचा होता. याचा अर्थ विधेयक मंजूर होणे राहिले बाजूलाच; त्याला जिवंत ठेवण्याचीच धडपड चालू होती. ही बाब उघडपणे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाची होती. आम्ही संसदीय कामकाजमंत्री ना. हर्षवर्धन पाटील यांना भेटलो. त्यांनी दिलेले उत्तर राजकीय होते. या अधिवेशनात विधेयक प्राधान्याने मांडण्याची मागणी संबंधित मंत्र्यांनी माझ्याकडे केली की, मी लगेच कायदा कार्यक्रम पत्रिकेवर घेतो, असे त्यांचे मत होते. आता दोन्ही मंत्री आणि मुख्यमंत्रीही काँग्रेस पक्षाचेच असल्याने खरे तर ही जबाबदारी सामुदायिक होती. हे उत्तर मला टोलवाटोलवीचे वाटले. पण मी पुन्हा ना. शिवाजीराव मोघे यांच्याकडे गेलो आणि त्यांना असे पत्र संसदीय कामकाजमंत्र्यांना देण्याची विनंती केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद सभापती या दोघांनाही भेटलो. सभापती शिवाजीराव देशमुख यांचा प्रतिसाद आश्वासक वाटला. ते सभापती आहेतच, तसेच ज्येष्ठ काँग्रेस नेतेदेखील आहेत. त्यांनी स्वत:हून ना. शिवाजीराव मोघे यांना बोलावून घेऊन कायद्याची वाटचाल पुढे जाईल, याची खात्री दिली.

याच दरम्यान कायद्याच्या बाजूने व विरोधी हालचाली घडतच होत्या. कायदा विरोधकांनी नेहमीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना कायदा न करण्याबाबत निवेदने देणे, त्या कायद्यात जे नाहीच ते आहे, असा खोटा प्रचार रेटून करणे, आमदारांना भेटून, मंत्र्यांना भेटून समितीच्या कार्याबाबत दिशाभूल करणारी माहिती देणे, मुंबईत आझाद मैदानावर धरणे धरणे, वृत्तपत्रात विरोधी लेख छापून आणणे, या बाबी लावून धरल्या होत्या. खोट्या गोष्टीच्या रक्षणार्थ ते दाखवत असलेली अफाट चिकाटी ही खरोखरच कौतुकास्पद मानावयास हवी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांनी त्यापासून धडाही घ्यावयास हवा. याच दरम्यान म्हणजे ११ जुलैलाच आय.बी.एन. लोकमत या वृत्तवाहिनीवर कायद्याबाबत एक तासाची चर्चा ‘आजचा सवाल’ या कार्यक्रमात घडवली गेली. आमने-सामने असलेल्या या कार्यक्रमात कायद्याला विरोध करणाऱ्यांचे पुरते वस्त्रहरण झाले. हे सर्व लक्षात घेता मला असे वाटत होते की, कायदा चर्चेला नक्की येणार. त्यामुळे पुन्हा १८ तारखेला विधिमंडळ वारी करण्यासाठी मी फारसा उत्सुक नव्हतो. पण काँग्रेसवाल्ङ्मांचा काय भरवसा, असा विचार करत मी १८ तारखेला विधिमंडळात थडकलो. ते बरोबरच केले असे मला वाटते. कारण कायदा चर्चेला घेण्याची कोणतीही हालचाल नव्हती. उलट बिल चर्चेला न आल्याने ते Lapse होऊ नये. याचे नोटिंग संबंधित मंत्रालयाने पूर्ण केले होते. ते विधिमंडळात सादर करून बिल यशस्वीपणे हिवाळी अधिवेशनाकडे ढकलणे, यातच ते कृतार्थता मानत होते. अधिवेशन मोजून पाच दिवस राहिले होते. त्यापैकी शेवटचा दिवस वगळता चारच दिवस कामकाज चालणार होते. त्यामुळे मी तातडीने मुख्यमंत्र्यांना गाठले. विधानसभा अध्यक्षांशी चर्चा केली. त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. संसदीय कामकाज मंत्र्यांनी पुन्हा विषय प्राधान्यक्रमाने घेण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांचे पत्र मागवले. ते मिळवले. तोपर्यंत हा विषय प्राधान्याने घ्यावा, असा मुख्यमंत्र्यांचा शिफारसवजा आदेशही सामाजिक न्यायमंत्र्यांच्याकडे थडकला. सभागृहाचे कामकाज ठरवणाऱ्या समितीत सर्वांत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख आहेत. त्यांनीही हा विषय पुढच्या चार दिवसांतील कामकाजात यावा, याचा आग्रह धरण्याचा शब्द दिला.

हा लेख मी रविवार, दि. २२ जुलैला लिहीत आहे. अधिवेशनाचे आता मोजून तीन दिवस बाकी आहेत. त्यामध्ये काय घडेल, हे कळेपर्यंत अंक छापावयास गेलेला असेल. कायदा चर्चेलाही न येता वंचना चालूच राहील? की कायदा चर्चेला येऊन चर्चा अपुरी राहील? की कायदा फक्त विधानसभेत मंजूर होईल? की कायदा दोन्ही सभागृहात मंजूर होण्याची अभूतपूर्व घटना घडेल? यापैकी काही अंदाज वर्तविण्यात अर्थ नाही. कारण अंक वाचकांच्या हातात पडेपर्यंत प्रत्यक्षात काय घडले, हे वाचकांना समजले असेलच. माझा अनुभव मात्र मला मनातून सांगत आहे की, जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठीचा संघर्ष खडतर आहे. अजूनही काही काळ चिकाटीने तो आपल्याला चालवावा लागणार आहे आणि शेवटी विजय आपलाच होणार आहे, हेही नक्की.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१२)




बुधवार, १७ जानेवारी, २०१८

संघर्ष चालूच राहील, निर्धार अखंड राहील




संघर्ष चालूच राहील, निर्धार अखंड राहील
दाभोलकर, कायदा, वाटचाल, सनावळी, बैठकीचा वृत्तांत, डोळ्याला काळी पट्टी
१९९० : जादूटोणाविरोधी कायदा करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना सादर.
जुलै १९९५ : कायदा करण्याबाबतचे अशासकीय विधेयक विधान परिषदेत प्रचंड बहुमताने मंजूर
१९९९ : एका वर्षाच्या आत कायदा करण्याचा सरकारचा अधिकृत लेखी वायदा
६ ऑगस्ट २००३ : कायदा मंत्रिमंडळात मंजूर
१५ ऑगस्ट २००३ : असा कायदा करणारे भारतातले पहिले राज्य महाराष्ट्र शासनाची ठळक जाहिरात
३० मार्च २००५ : नव्या मंत्रिमंडळात कायद्याचे प्रारूप पुन्हा मंजूर
१३ एप्रिल २००५ : सत्तारूढ पक्षाच्या आमदारांचाच विरोध
जुलै २००५ : कायद्याचा मसुदा सौम्य करण्यात आला
१६ डिसें. २००५ : कायदा विधानसभेत मंजूर
जाने. २००६ ते मार्च २००७ : विधानपरिषदेत निष्फळ चर्चा
मार्च २००७ : संयुक्त चिकित्सा समितीकडे अधिक चर्चेसाठी कायदा पाठवला. सहा महिन्यांत समितीचे कामकाज संपवण्याची सूचना
जून २००९ : संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल सभागृहासमोर येऊच शकला नाही. कारण त्याचे कामच सुरू झाले नाही. विधानसभेचे शेवटचे अधिवेशन संपले. कायदा संसदीय मार्गाने कुजविण्यात आला.
१० जून २००९ : आझाद मैदानावर राज्यव्यापी अभिनव धरणे संघर्ष चालू ठेवण्याचा निर्धार

वरील सनावळी आता ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना पाठ झाली असेल. त्यात भर पडलेली तारीख एकच १० जून २००९. ज्या दिवशी पळपुट्या शासनाचा निषेध करून कायदा करून घेऊच हा अखंड निर्धार प्रकट करण्यात आला. त्याचे हे शब्दांकन.

२३ मे ला मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली. सहमतीने कायदा होऊ शकेल का, याबद्दल सर्व संबंधितांशी चर्चा करण्यास त्यांनी सामाजिक न्यायमंत्री हंडोरे यांना सांगितले. हा सिद्ध-साधकाचा खेळ होता असेच आता म्हणावे लागेल. कारण पुढील आठवडाभरात मी सातत्याने हंडोरे यांचा पाठपुरावा केला. पण संयुक्त चिकित्सा समितीची बैठक न घेण्याच्या आपल्या व्रताचा (!) भंग त्यांनी केला नाही आणि त्यामुळे आंदोलन करण्यासाठी आपल्या समितीलाही पर्याय राहिला नाही.

१० जूनला आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे होते. जिल्ह्या-जिल्ह्यात त्याचे कार्यक्रम आधीच चालू झाले होते. दोन पारडी असलेला तराजू. एका पारड्यात समाजसुधारकांचे विचारधन व चित्रे, दुसऱ्या पारड्यात अंधश्रद्धेचे प्रतीक असलेली काळी बाहुली, लिंबू, मिरची. तराजू महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेला. त्यांची करणीच अशी की, समाजसुधारकांचे पारडे हलके झालेले आणि काळ्या बाहुलीचे पारडे जड होऊन खाली गेलेले. हा तराजू प्रत्यक्षात वा चित्राद्वारे उभारणे ही सत्याग्रहाची मूळ कल्पना. सगळीकडेच लोकांना ती फार भावली. कायदा न करून समाजसुधारकांच्या विचारापासून महाराष्ट्र शासन पळ काढत आहे, हा विचार लोकांच्यात थेट पोचला. हे पळपुटे शासन पाहावयाचेही आम्ही नाकारतो म्हणून डोळ्याला काळी पट्टी बांधून धरणे धरणे, ही या कल्पनेला दिलेली जोड. तीही प्रभावी ठरली.

१० जूनच्या राज्यव्यापी धरण्याची तयारी चालू होती. तरीही इच्छा हीच होती की, कायद्याबाबत प्रत्यक्षात काहीतरी पुढे सरकावे. यासाठी ९ जूनला मी, अविनाश पाटील, नंदकिशोर तळाशीलकर विधानभवनात गेलो. अधिवेशन चालू असताना आत प्रवेश मिळवणे हे एक दिव्यच असते. परंतु प्रधान सचिव कळसे यांनी चळवळीच्या प्रेमाने तत्परतेने व्यवस्था केली. आम्ही विधानसभा सभागृहाच्या दारापाशी गेलो. शिपायाबरोबर आत आ. गणपतराव देशमुख व आ. नरसय्या आडम यांना चिठ्ठी पाठवली. त्यांचा मोठेपणा हा की, दोघेही तत्परतेने बाहेर आले. त्यांनी थोडी चर्चा केली. आम्हाला विधानसभा प्रेक्षक गॅलरीत जावयास सांगितले आणि घाईने ते परत सभागृहात गेले. आम्ही प्रेक्षकांच्या गॅलरीत पोचेपर्यंत आमदारद्वयांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तो थोडक्यात असा - संयुक्त चिकित्सा समितीचे आम्ही सभासद आहोत. या समितीच्या बैठकाच होत नसल्याने त्या विषयावरील कामकाज सुरूच झालेले नाही. तेव्हा मा. अध्यक्षांनी या समितीच्या बैठका त्वरित घेण्याचा आदेश द्यावा. सभापतींनी आदेश दिला. संसदीय कामकाजमंत्री ना. हर्षवर्धन पाटील यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. बैठक किती दिवसांत होईल, याची कालमर्यादा घालून देण्याची मागणी आमदारांनी केली. ती बाब मात्र सभापतींनी टाळली. (माझ्या मनात त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली.) याच पद्धतीने विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करण्याची विनंती आम्ही आ. कपील पाटील व आ. जयंत पाटील यांना केली. त्यांनाही विधानपरिषद सभागृहाच्या सभापतींनी तसेच आश्वासन दिले.
१६ तारखेला विधिमंडळ कामकाज संपणार होते. सभागृहातील आश्वासन असाधारण कार्यक्षमतेने पाळले गेले असते तर संयुक्त चिकित्सा समितीची बैठक घेऊन त्याचा अहवाल विधिमंडळासमोर मांडता आला असता. पूर्ण बहुमत असलेल्या सत्तारूढ पक्षाला तो मंजूरही करून घेता आला असता. पण शासनाला काही करावयाचे नव्हतेच. फक्त स्वत:च्या चेहऱ्यावरील पुरोगामी मेक-अप पुसला जाऊ नये, यासाठी एक नाटक त्यांना खेळावयाचे होते. धरणे आंदोलनाच्या दिवशी सकाळीच मी विधानसभेचे सभापती ना. बाबासाहेब कुपेकर यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली. ते मनापासून खरे खरे बोलले. त्याचा मला समजलेला ल.सा.वि. असा मुख्यमंत्र्यांना कायदा करण्याची इच्छा दिसत नाही. त्यांचे विधान बरोबर असणार. कारण विधिमंडळ सभागृहातील आश्वासनानंतरही संयुक्त चिकित्सा समितीचे कसलेही काम झाले नाही.

१० जूनला सकाळपासून आझाद मैदानावर कार्यकर्ते जमू लागले. त्या दिवशी आझाद मैदानाचा तो भाग अनेक मंडपांनी पुरता फुलून केला होता. अनेक मंडपांचे आकार, सजावट, उपस्थितांची संख्या हे सारेच आपल्यापेक्षा बरेच मोठे होते. अशा गर्दीत धरण्याचा कार्यक्रम परिणामाच्या दृष्टीने यशस्वी होणे अवघड असते. परंतु तो अत्यंत यशस्वी झाला. त्याचे मर्यादित श्रेय अर्थातच मंडपासमोर लावलेले दोन तराजू, दोन्ही तराजूच्या वेगवेगळ्या पारड्यातील महापुरुषांची पुस्तके आणि अंधश्रद्धांची प्रतीके आणि डोळ्याला पट्टी बांधून बसलेले कार्यकर्ते या चमकदार कल्पनेकडे जाते. चळवळीची गाणी, घोषणा या बाबीदेखील वातावरणनिर्मिती करत होत्या. मुंबईच्या सहकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे व्यवस्था चोख ठेवली होती. पंधरा जिल्ह्यांतील जवळपास १०० कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे होते. राज्य कार्यकारिणीत या विषयाबद्दल झालेल्या विचारमंथनाशी ते सुसंगतच होते. त्यातला मुख्य आशय असा -

·         येत्या निवडणुकीत जादूटोणाविरोधी कायद्याबाबतचा सरकारचा नादानपणा हा विषय चर्चेचा बनवावयास हवा.
·         उभे राहणाऱ्या; विशेषत: प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना याबाबत व्यक्तिगत भूमिका घ्यावयास लावावयास हवी.
·         राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात या विषयाबाबत भूमिका घ्यावयास लावायला हवी. १९९९ ची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात परत आणावयास हवी. (त्यावेळचे काँग्रेसचे सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर आले होते. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमाची समिती प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली व त्याद्वारे कायद्याचे आश्वासन मिळाले.)
·         नव्या येणाऱ्या सरकारकडे आग्रह धरावयास हवा.
·         गरज पडल्यास नव्या विधिमंडळात अशासकीय विधेयक दाखल करावयास हवे.
·         आपल्या लढ्याचा निर्धार कायम राखावयास हवा.

मुंबईच्या धरण्यानंतरही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धरणे झाली. मुंबईसह सर्वत्र सर्व प्रकारच्या माध्यमांनी फार चांगली प्रसिद्धी दिली. कायदा होण्याने महाराष्ट्र अंनिसची प्रतिमा जेवढी उजळली असती, त्यापेक्षा या लढ्यातून ती अधिक प्रमाणात पुढे आली, असे मला वाटते. याला तशीच कारणे आहेत.
१)    समाजात सतत अंधश्रद्धांच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची गरज जनमानसाला सतत जाणवत आहे.
२)    जादूटोणाविरोधी कायद्यासाठी अत्यंत चिकाटीने, सनदशीर, दीर्घकाळ आपण लढा दिला आहे. समाजमानसात, प्रसिद्धिमाध्यमात त्याबाबत सहानुभूती आहे.
३)    अन्य लढे हे त्या-त्या छोट्या-मोठ्या समूहांच्या हक्काचे लढे असतात (उदा. शिक्षक, कामगार, झोपडपट्टी रहिवासी) त्यामधून त्या घटकांना काही लाभ मिळणे अपेक्षित असते. जादूटोणाविरोधी कायद्याचा लढा, त्यासाठी लढणाऱ्यांच्या हिताचा नाही तर सर्व समाजासाठी हिताचा आहे. हा नि:स्वार्थीपणा लढ्याची नैतिकता वाढवतो.
४)    लढ्याच्या या टप्प्यावर आपण थेट राजकीय भूमिका घेतली आहे. समितीची राजकीय ताकद किती हा भाग गौण; परंतु राजकीय भूमिकेमुळे सर्व लढ्याला एक टोक येते. चळवळीला परिणामकारकता लाभते.

महात्मा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते. त्यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेसमोर उभारावयाचा ठराव नगरपालिकेत ४ सप्टेंबर १९२५ रोजी आला. त्याला असणारा विरोध मावळत जाऊन प्रत्यक्षात पुतळा ३१ मे १९६९ ला उभारला गेला. एका महानगरपालिकेसमोर पुतळा उभारण्यास ४४ वर्षे लागली. पण त्यानंतर अवघ्या वीस वर्षांत संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेसमोर पहिला पुतळा उभा राहिला महात्मा फुलेंचा. उशिरा; पण विजय सत्याचाच होतो. आपण मात्र आपला निर्धार अखंड ठेवावयास हवा.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जुलै २००९)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...