प्रबोधन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रबोधन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन




व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन
दाभोलकर, व्यसनमुक्ती, प्रबोधन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या कामाचा एक भाग म्हणून व्यसनविरोधी प्रबोधन मोहीम राबवणार आहे. केवळ एक विधायक समाजोपयोगी कार्य असे त्याचे स्वरूप नसून या दोन्ही कार्यात कामाची पार्श्वभूमी, त्यातील मूल्यात्मक आशय यात साधर्म्य आढळते. म्हणून आपण हे करत आहोत. यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे -
१)   दोन्हीकडे माणसांची बुद्धी गहाण पडते. सारासार विचार संपुष्टात येतो, विवेक नाहीसा होतो.
२)    मानसिक गुलामगिरी दोन्हीमध्येही निर्माण होते.
३)    माणसे अंधश्रद्धांचा व व्यसनांचा आश्रय सुरुवातीला आनंद म्हणून,  आधार म्हणून, सहज म्हणून घेतात. आपण या बाबींवर अवलंबून आहोत, अशी कबुली कोणीही देत नाही. व्यसनी व्यक्तीला वाटते की, मी व्यसन केव्हाही सोडू शकतो. तसेच अंधश्रद्धाळू माणूस आपण प्रयत्नवाद सोडून अंधश्रद्धांचा आधार घेतला, असे कधीही कबूल करत नाही. वस्तुस्थितीत आधार घेता-घेता संपूर्ण आहारी कधी जावयास होते, हे समजत नाही.
४)    दोन्हींच्यामध्ये व्यक्ती आत्मकेंद्रित होते.
५)    जागतिक आरोग्य संघटनेने व्यसन हा एक मानसिक आजार आहे, असे म्हटले आहे. कमकुवत मनोवृत्तीची मानसिक दुर्बलता असलेली व्यक्तिमत्त्वे अंधश्रद्धेला बळी पडणे वा व्यसनाकडे वळणे हे सहज शक्य होते.
६)    घरातील प्रमुख व्यक्ती व्यसनाधिन असेल, तर सर्व घराला आर्थिक त्रास होतो. तसेच घरातील प्रमुख व्यक्ती, बुवा, दैवते, मंत्र-तंत्र यांच्या आहारी गेलेली असल्यास सर्व कुटुंबाला त्रास होतो.
७)    कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनी असेल, तर कुटुंबातील तरुण मुलांना वा लहान मुलांना तरुण झाल्यावर व्यसन लागण्याची शक्यता असते. कुटुंबप्रमुख अंधश्रद्ध असल्यास सर्व कुटुंब अंधश्रद्धाळू बनते.
८)    व्यसन व अंधश्रद्धा या दोन्ही मूलत: व पूर्णत: विकासविरोधी असतात.
९)    व्यसन व अंधश्रद्धा यांनी समाजाचे नुकसान होते. खऱ्या प्रश्नाबाबतचे भान निघून जाते.
१०)   आपल्या देशात दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात आहे; परंतु चरस, अफू, गांजा, गर्द, रेस, जुगार, मटका हे सर्व व्यसनाचेच विविध प्रकार आहेत. याप्रमाणेच बुवाबाजी, भानामती, मंत्र-तंत्र, जादूटोणा, फलज्योतिषावरील विश्वास, शोषण करणाऱ्या रूढी, परंपरा असे अंधश्रद्धेचेही विविध प्रकार आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९३)




शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

पहिले पाऊल... पुढेच टाकू

पहिले पाऊल... पुढेच टाकू
दाभोलकर, कायदा, जनशक्ती, एकहाती झुंज, जनजागरण अभियान, प्रबोधन
हजारो मैलांचा प्रवास कोणत्या तरी पहिल्या पावलापासूनच सुरू होतो..... अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला आणि या उक्तीची आठवण झाली.

महाराष्ट्र विधानसभेत कायदा मंजूर झाला. पुढील संपूर्ण दिवस दूरध्वनी शब्दश: अखंड निनादत होता. त्यात कार्यकर्ते होते. अंधश्रद्धांबाबत पोटतिडीक असणारे नागरिक हेते. सर्वपक्षीय पुरोगामी होते. पंधरा वर्षांची खडतर वाटचाल झाली. सहा मुख्यमंत्री झाले. विधानपरिषदेत विधेयक मंजूर होऊन दहा वर्षे झाली. मंत्रिमंडळात तब्बल चार वेळा मंजूर झाले. आचारसंहितेच्या काळात राज्यपालांनी सही करण्यास नकार दिला. असा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य अशी शासनाची जाहिरात तीन वर्षांपूर्वीच फडकून गेली. विधेयक हिंदू धर्मावर घाला घालते म्हणून त्याविरोधी भरपूर अपप्रचार झाला. असे विधेयक आणणाऱ्या काँग्रेसला पराभूत करा, असा मागील विधानसभा निवडणुकीत डंका पिटला गेला. एप्रिल महिन्यात विधेयक दाखल करताना सत्तारूढ पक्षाचाच प्रचंड विरोध झाला. विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवून अडगळीत टाकण्याचा राजकीय रडीचा डाव खेळला गेला. हे सर्व अडथळे पार पाडत अखेर कायदा झाला. (हुश्श!) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जवळपास एकहाती ही झुंज दिली. कायदा तर झाला. आता खरा प्रश्न पुढे काय?

कायद्याने समाज बदलत नाही, हे अर्धसत्य आहे. जागृत जनशक्तीला दंडशक्तीची जोड उपयोगी ठरते. मात्र अंधश्रद्धांना कायद्याच्या क्षेत्रात आणणे हे अधिकच संवेदनशील. अंधश्रद्धा कोणती व श्रद्धा कोणती, हे व्यक्तिनिहाय बदलते. एकाची पूजनीय श्रद्धा दुसऱ्याला जीवघेणी अंधश्रद्धा वाटते. माणसे याबाबत एकाच वेळी हळवी व आक्रमक असतात. अशा वेळी दोन प्रमुख वृत्तपत्रांनी या कायद्याने अंधश्रद्धा जातील का? या विचारलेल्या वाचक कौलाला ३५ व ५४ टक्के मते मिळावीत, हेही आश्वासकच. पण मुख्य प्रश्न तसाच राहतो, मते देणाऱ्यांनी अंधश्रद्धा कशाला मानले आहे? आणि कायद्यात खरोखर काय आहे?

कायद्याविषयी, मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली, त्यावेळी त्यांनी कायद्याच्या नावातून अंधश्रद्धा वगळण्याची विनंतीवजा सूचना केली. त्यामुळे कायद्याचे उद्दिष्ट अतिशय थेटपणे स्पष्ट करणारे जादूटोणा व दुष्ट प्रथा यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २००५ असे नाव ठेवण्यात आले. पुढे उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून त्यात अघोरी शब्द वाढविण्यात आला. कायद्यात काय आहे? सैलानीबाबांच्या दर्ग्यावर मनोरुग्णांवर भूतबाधा झाली, असे मानून साखळदंडाने बांधून अमानवी उपचार होतात. आदिवासीबहुल जिल्ह्यात डाकीण, भुताळी समजून बाईला गावातून हाकलले जाते; प्रसंगी तिला जीव गमवावा लागतो. कोणी अस्लमबाबा हाताच्या बोटाने पोटाची, हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्याचा दावा करतो. त्याकडे हजारोंची रीघ लागते. अंगात देवीचा संचार झाला सांगून दहशत निर्माण केली जाते. चमत्कार करून फसवले जाते. मंत्र घालून जहरी नागाचे विष उतरविल्याचा दावा केला जातो. पिसाळलेला कुत्रा चावल्यावर गावठी औषधे दिली जातात. भूत-प्रेत जादूटोणा याची दहशत बंगालीबाबा तयार करतात. कोणी पार्वतीमाँ निपुत्रिक स्त्रीच्या पोटावर हात फिरवून संतान देण्याचा दावा करते. या सर्व बाबी आता कायद्याच्या कक्षेत येतील. सहा महिने ते सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होईल. १३ एप्रिल २००५ ला विधानसभेत मांडलेला कायदा यापेक्षा कडक होता. त्याला काँग्रेस आमदारांनी खरे तर पूर्णत: चुकीचा विरोध केला. मग मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार किमान समान मसुदा तयार करण्यात आला. हिंदू जनजागरण समितीसोबत सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दोनदा चर्चा केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत विरोधी पक्षनेते रामदास कदम, गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा झाली. विधिमंडळातील चर्चेतील आक्षेप लक्षात घेतले गेले. कायद्याचे प्रारूप सौम्य करण्यात आले; मूळ मसुद्यात अंधश्रद्धेची व्यापक व्याख्या होती. त्यामुळे कारवाई थेट व सोपी झाली असती, ती वगळली गेली. आता परिस्थितीतील (वर उल्लेखलेल्या स्वरुपातील) बाबी यांनाच अंधश्रद्धा मानण्याचे ठरले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाची उत्तम तरतूद पूर्णपणे वगळण्यात आली. यात्रेतील देवाच्या नावाने होणारी पशुहत्या, अंगावर तीक्ष्ण हत्यारांनी जखमा करणे आदी बाबी सर्व सहमतीसाठी वगळण्यात आल्या. तरीही विधिमंडळात व बाहेर कायद्याला झालेला विरोध पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे म्हणावे लागेल.

जगभराच्या समाज विभागांच्या विकासक्रमात एक बाब सर्वत्र व सतत दिसते - प्रत्येक समाज रूढी, कर्मकांडे, परंपरा यांच्यात अडकून पडलेला असतो. त्यापैकी अनेकांना धर्माचरणाचे रूप येते. शतकानुशतके हे चालत राहते. आपण असे का वागतो, हे न तपासता आंधळेपणाने आचरण चालू राहते. त्याच सामाजिक व्यवहाराचे समाजाला वळण पडते. बहुसंख्य समाज भोळेभाबडेपणाने त्याप्रमाणे वागतो आणि त्याचा लाभ उठविणारा मतलबी छोटा वर्ग तयार होतो. तो यासाठी धर्माचा बुरखा वापरतो. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला असतानाही अंधाराच्याच झापडा लावण्याचे समर्थन चलाख भोंदू करत राहतात. दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री संजय पास्वान यांनी काळी विद्या किंवा जादूटोणा करणाऱ्यांना मान्यता देण्याची केलेली घोषणा या भयावह वास्तवाचे विदारक दर्शक घडवते.

भारतीय संविधानाच्या २५ व्या कलमाप्रमाणे धर्मपालन, उपासना, पारलौकिक कल्याण, अध्यात्मिक उन्नती याचे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य आहे. समिती त्याचा पूर्ण आदर करते. याविरोधी जाणारा कायदा करताच येणार नाही आणि सध्याचा कायदा तर दूरान्वयानेही तसा नाही. दुसऱ्या व्यक्तीस शारीरिक, मानसिक इजा पोचवणे, तिचे वित्तीय, भौतिक नुकसान करणे; हेच अंधश्रद्धामूलक कृत्य मानले जाईल. तसे करणे कायद्याने गुन्हा ठरेल. न्यायशास्त्राचा साधा नियम असा आहे की, समाजातील कुणाचे कसले तरी नुकसान कुणी जाणून-बुजून केले तरच त्याला शिक्षाप्राप्त गुन्हा म्हणावे. माझ्या अंगातील दैवीशक्तीने पाऊस पडतो, असे एखादा म्हणाला तर तो गुन्हा नाही. कुणाला कितीही वेडगळ बडबड करण्याचे स्वातंत्र्य आपल्या घटनेने दिले आहे. दुसऱ्याला इजा होणे हा महत्त्वाचा घटक आहे. ही इजा करणारी व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरी त्यामुळे काही फरक पडत नाही. हा कायदा पूर्णत: धर्मनिरपेक्ष आहे. सर्व धर्माच्या अनुयायांना तो सारासार लागू पडणार आहे.

सामान्य लोकांच्या जीविताचे, वित्ताचे रक्षण करणे, त्यांची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा देणे, हे कल्याणकारी शासनाचे कर्तव्य आहे. ज्या अंधश्रद्धा, रूढी, प्रघात लोकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला घातक आहेत, त्यांना अटकाव करणारे अधिकार शासनाने वापरावयास हवेत. लोकांच्या अंधश्रद्धांच्या आधारे स्वत:चे पोट भरू पाहणाऱ्या सर्वधर्मीय प्रस्थापित लुटारूंचा शासनाच्या या कायद्याला विरोध होणारच. अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्यांना ते स्वत:च्या स्वार्थासाठी भडकवणारच. धर्म खतरे में है ही घोषणा त्यातून आली आहे.

महाराष्ट्रात समाजसुधारणेची जी चळवळ झाली, तिचा विचार या अनिष्ट प्रथा, रूढी, अंधश्रद्धा यांच्या विरोधात स्पष्टपणे होता. भाजप ज्यांच्या नावाचा उदो-उदो करते, ते सावरकर आणि शिवसेनेचे थेट नाते असलेले प्रबोधनकार ठाकरे यांनी केवळ जादूटोण्यावर नव्हे, तर धर्माधिष्ठित अंधश्रद्धेवर किती परखड व थेट हल्ले केले होते, याचे विस्मरण हेतुपुरस्सर आहे, असे जाणवते. जादूटोणा, अघोरी प्रथा यातून व्यक्त होणाऱ्या अंधश्रद्धा हे असंस्कृततेचे विकृत, ओंगळ, बीभत्स, अमानुष रूप आहे. हिंदू जनजागरण मोहीम या नावाने होत असलेला कायद्याचा विरोध हा हिंदू धर्माच्या प्रगत व बुद्धिवादी परंपरांच्याही विरोधात आहे. वेदांत, उपनिषदांत, भगवद्गीतेत या प्रथांचे समर्थन आहे काय? या मंडळींचे कायद्याला विरोध करण्याचे कारण धर्मप्रेम नव्हे, तर धर्माच्या आधारे विद्वेषाचे राजकारण रूजविणे हे आहे. जादूटोणा, अघोरी प्रथा या लोकांचे शोषण करणाऱ्या बाबींना धर्माच्या नावाच्या आडून जर विरोध होत असेल, तर विरोध करणारी मंडळी लोकविरोधी व धर्मविरोधी आहेत, असे मानावे लागेल. महाराष्ट्रातील सूज्ञ जनता हे ओळखेलच, असा विश्वास वाटतो.

कायदा झाला, पुढे काय? याबाबत समितीचा कृती आराखडा तयार आहे. १ जानेवारीपासून समिती महाराष्ट्रव्यापी जनजागरण मोहिमेला प्रारंभ करेल. कायद्याचे खरे रूप लोकांना सांगेल. हा कायदा हिंदू धर्मावर घाला आहे अशी तद्दन खोटी अफवा पसरवणाऱ्या, त्याचा प्रचार करणाऱ्या, त्यासाठी लोकांच्या सह्या गोळा करणाऱ्या हिंदू जनजागरण समितीच्या या कारवाईवर चिथावणी देणाऱ्या अफवा पसरवणे या कलमाखाली कारवाई करावी, अशी समितीची मागणी राहील. कायद्यातील वस्तुस्थितीबाबत लोकांनी निर्भयपणे पुढे येणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यांचे नाव पूर्ण गुप्त राखले जाईल. या स्वरुपाच्या बाबी घडणारी ठिकाणे कळली तर या कायद्याने प्रथम प्रतिबंधात्मक; आणि त्याने न भागले तर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा समितीचा प्रयत्न राहील. या सर्वेक्षणात काही नवीन वास्तवही समोर येईल; ज्यामुळे कायद्यात आवश्यक असलेली संभाव्य वाढही दृष्टिपथात येऊ शकेल. कोणताही कायदा परिणामकारकपणे अमलात आणण्यासाठी व्यापक प्रबोधन अत्यंत गरजेचे असते. यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक विद्यार्थी आहे. कायद्यातील परिस्थितीमुळे अंधश्रद्धा म्हणजे काय, हे आज विद्यार्थ्यांना थेट समजावणे सोपे आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षण खात्याच्या मदतीने करून उद्याचे नागरिक अंधश्रद्धाबाबत समंजस, डोळस व प्रशिक्षित करण्याचे काम समिती करेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीनेही या प्रकारांचे सर्वदूर सर्वेक्षण होऊ शकेल. कायदा अंमलबजावणीबाबत पोलीस अधिकारी मदतीचे ठरतात. प्रात्यक्षिकासह त्यांचे प्रबोधन करण्याचीही समितीची योजना आहे.

या सर्व प्रयत्नांतूनही अंधश्रद्धांचा मुकाबला फक्त प्राथमिक पातळीवरच होऊ शकेल. अंधश्रद्धाच मानावयास हव्यात, अशा अनेक बाबी आज धर्माच्या आचरणाचा अविभाज्य भाग म्हणून मिरवत आहेत. देवाच्या नावाने होणारी पशुहत्या, सत्यनारायण, नारायण नागबळी, वास्तुशास्त्र, वैभवलक्ष्मीचे व्रत या श्रद्धा आहेत की - अंधश्रद्धा? हा प्रश्नही बहुसंख्यांना रूचत नाही. धर्माच्या आधारे राजकारण करणारे तर त्याला कडाडून हिंसक विरोध करतात. आधी मुसलमान समाजाला सुधारा, असा एक हास्यास्पद (पण लोकांना प्रक्षुब्ध करणारा) युक्तिवाद केला जातो. या देशात ८२ टक्के हिंदू आहेत. त्यांच्या घरात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या रूपाने ज्ञानाचा दिवा लावला तर समाजातील फार मोठ्या वर्गात प्रकाश पसरेल. मग उरलेल्या अंधारालाही हळूहळू काढता पाय घ्यावाच लागेल, ही सरळ बाब या मंडळींना कशी समजत नाही! अध्यात्मिक बुवाबाजी तर या संपूर्ण कक्षेच्या पूर्ण बाहेर आहे. या टप्प्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ एका अधिक मूलभूत टप्प्यावर पोचते. धर्मनिरपेक्ष जनमानस तयार करणे हे अवघड व महत्त्वाचे काम आहे. भारतीय घटनेतील धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व युरोप खंडासारखे दीर्घकाळ राजसत्ता, धर्मसत्ता, विज्ञान याच्या शतकांच्या घुसळणीतून आले नाही. हिंदू-मुस्लिम सलोखा, सर्वधर्मसमभाव हेच त्याचे रूप राहिले. त्यामुळे रूढी, कर्मकांड, परंपरा, धर्माचरण यांची विधायक चिकित्साही जनमानसाला रुचत नाही. धर्माआधारे समाजकारण, राजकारण करणाऱ्या शक्ती तर त्याला हिंसक विरोध करतात. संविधानाचा आशय, कायदा व विवेकशक्ती या आधारे जनजागरण करून धर्मनिरपेक्ष जनमानस घडविणे हे समितीचे पुढील काम आहे. महाराष्ट्रात याला महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, गाडगेबाबा, न्या. रानडे यांची परंपरा आहे. या समाजसुधारकांनी ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री बनवला. समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला. ही प्रबोधन परंपरा जनमानसात रूजवली गेली, तर आज आचरत असलेल्या असंख्य बाबी या खऱ्या धार्मिकतेचा भाग नाहीत, हे लोकांना समजेल, समजावे असा समितीचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास गरजेनुसार या बाबींच्या विरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावानेच कायदा करता येईल. प्रबोधनच प्रभावी व परिणामकारक ठरल्यास त्याचीही गरज पडणार नाही.  हाच संत व समाजसुधारकांचा मार्ग या देशात विधायक भावात्मक धर्मनिरपेक्षता आणेल. हे काम काही दशके; प्रसंगी शतके करावे लागेल, याची समितीला कल्पना आहे. त्यासाठी समिती कटिबद्ध आहे.
कायदा जनजागरण अभियान
१)    हे अभियान १ जानेवारी २००६ पासून ते राज्यपालांची सही कायद्यावर होईपर्यंत किमान तीन महिने चालू राहील.
२)    अभियानात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (धर्मनिरपेक्ष), रिपब्लिकन सर्व गट व शेतकरी संघटना यांचा अत्यंत प्रयत्नपूर्वक सहभाग घ्यावा. अन्य पुरोगामी संघटना व संस्था यांनाही आवर्जून सहभागी करून घ्यावे.
३)    अभियानात शिवसेना, भाजप व हिंदू जनजागरण समिती यांच्याशीही संपर्क साधावा. त्यांच्याशी चर्चा करावी.
४)    याबाबत समितीची भूमिका मांडणाऱ्या पत्रकाचा नमुना मध्यवर्तीकडून मागवून घ्यावा. कायद्याच्या मसुद्यासाठी प्रत्येकी रुपये ५ प्रमाणे एम.ओ.ने ‘मध्यवर्ती’कडे     पैसे पाठवावेत. पत्रके घरोघरी देऊन चर्चा करावी. ती पाठवू नयेत.
५)    कायद्याबाबत जनजागृती करणारे लेख (वार्तापत्रातील या अंकातील लेख, पूर्वीची पुस्तिका, कायद्याचा मसुदा याआधारे) छोट्या-मोठ्या सर्व साप्ताहिकांना व वृत्तपत्रांना लिहावेत.
६)    छोट्या-छोट्या बैठका ऑफीस स्टाफरूम, महिला मंडळ वगैरे ठिकाणी जरूर      घ्याव्यात. त्यात कायद्याची गरज स्पष्ट करणारी सी. डी. मागवून घ्यावी.
७)    जाहीर सभा घ्याव्यात. त्यात सर्व पक्षांच्या व संघटनांच्या लोकांना बोलवावे. सभेत केवळ कायद्याचे समर्थन नव्हे, तर अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज स्पष्ट होणे इष्ट ठरेल.
८)    या तीन महिन्यात (जानेवारी ते मार्च) उभयतांच्या सवडीने डॉ. दाभोलकर तुमच्या जिल्ह्यात दोन दिवस येण्याचा प्रयत्न करतील. त्यांची जाहीर भाषणे, पत्रकार परिषद, वकिलांसोबत चर्चा, मान्यवरांशी संवाद असे कार्यक्रम ठेवता येतील. जाहीर व्याख्यान घेतल्यास ते पूर्वतयारीने प्रभावीपणे नियोजित व्हावयास हवे.
९)    या अभियानाची मशाल मुख्यमंत्री पेटवतील व गाडीला हिरवा झेंडा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील दाखवतील, असा प्रयत्न चालू आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी २००६)






बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

लोकशाही प्रबोधनाच्या निमित्ताने...

लोकशाही प्रबोधनाच्या निमित्ताने...
 दाभोलकर, लोकशाही, प्रबोधन, माहितीचा अधिकार
हा अंक वाचकांच्या हातात पडेल आणि त्याच्या पाठोपाठ निवडणुकांचे निकाल थडकतील. ते काय लागतील, याबद्दल प्रचंड अनिश्चितता आणि म्हणून उत्सुकता आहे. या निकालांच्या विजयोत्सवात कोणीही जिंकले तरी लोकशाहीच जिंकली, अशी आरोळी न चुकता ठोकली जाईल. परंतु लोकशाही म्हणजे मतपेटीतून कौल मिळवून सत्तेवर देणारे राज्य नव्हे, तर सत्तेवर आल्यानंतर लोककल्याणाची हमी देणारे सरकार. सत्तेवर येणारे सरकार या ब्रीदाला स्मरून वागेल, ही शक्यता फारच कमी. कारण निवडून येताना त्यांनी लोकप्रबोधनाचे व नैतिकतेचे मार्ग वापरले आहेत, असे म्हणणे कठीण दिसते. असे व्हावयास नको तर या देशातला मतदार सुबुद्ध व संघटित व्हावयास हवा. यावेळी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत हे काम काही संघटनांनी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे केले. अशी कामे निवडणुकांच्या वेळी उत्साहाने होतात, हे खरे; परंतु ती तेवढ्यापुरतीच राहता कामा नयेत. ती अधिक गतिमान, प्रभावी व लोकांच्या मनाचा थेट ठाव घेणारी व्हावयास हवीत. विचार जेव्हा समुदायाची पकड घेतात, त्यावेळी ते भौतिक शक्ती बनतात, असे मार्क्सचे सुप्रसिद्ध वचन आहे. प्रबोधनाच्या विचारांनी याप्रकारे जनमानसाची पकड घेण्याची गरज आहे. यासाठी या प्रचारमोहिमेतून जे मुद्दे पुढे आले, ते वाचकांच्या विचारार्थ ठेवत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मतदारराजा सार्वभौम आहे, याची खरीखुरी प्रचीती निवडणुकीत यावयास हवी. दिसायला अत्यंत सोपी; परंतु प्रत्यक्षात अत्यंत अवघड अशी ही गोष्ट आहे. मतदार हा खरंच सार्वभौम असेल तर त्याच्या हिताचे विषयच निवडणूक प्रचाराच्या ऐरणीवर येतील. आज मतदारांचे पोटतिडकीचे विषय वेगळेच असतात आणि निवडणुकीची राणा भीमदेवी थाटाची भाषणे वेगळ्याच मुद्द्यांना धरून सुरू असतात. हे बदलावयास हवे. श्रमिकांना योग्य मोबदला, जंगल, जमीन, पाणी यावर येथील लोकांचा प्रथम अधिकार, रोजगारनिर्मिती करणारे सुयोग्य तंत्रज्ञान, व्यसनविरोधी समग्र नीती, ७३ व्या घटना दुरुस्तीप्रमाणे ग्रामसभेला थेट अधिकार आणि पैसे हे लोकांच्या विकासाचे व जिव्हाळ्याचे खरे प्रश्न आहेत. निवडणुकीत याबाबत फारच कमी बोलले गेले. आग्रह तर निर्माण झालेच नाहीत. लोकशाहीसाठीच्या प्रबोधनासाठी हे अग्रहक्काने घडावयास हवे.

परंतु यापुढे जाणारा एक महत्त्वाचा मुद्दा उरतो आणि त्याची तड समाज म्हणून लावण्याचा निर्धार जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपणास चांगले लोकप्रतिनिधी अभावानेच लाभणार. बहुसंख्य लोकप्रतिनिधी भ्रष्ट व अकार्यक्षम आहेत, असा समज आहे. तो खराही आहे. परंतु त्याचे खरे कारण असे आहे की, समाजामध्ये बहुसंख्यांच्या विचारात, कृतीत कमी-जास्त प्रमाणात हे दुर्गुण लपलेले आहेत. जोपर्यंत समाज म्हणून आपण अधिक दक्ष, कार्यक्षम व चारित्र्यवान बनण्याचा प्रयत्न व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर करत नाही, तोपर्यंत त्याच गुणाचे प्रतिबिंब घेऊन उभे राहणारे लोकप्रतिनिधी वेगळे निपजणार नाहीत. अतिशय महत्त्वाचा व पिढ्यानपिढ्या चिकाटीने करावयाच्या परिश्रमाचा हा भाग आहे.

निवडणूक आली की, अनेक कल्पना व अनेक सूचना पुढे येतात. त्यातील अनेक सूचना गांभीर्याने घेण्याजोग्याही असतात. त्यांचा सातत्याने पाठपुरावा करून निवडणूक प्रक्रियेतच सुधारणा घडवून आणण्याचा काही प्रयत्न करावयास हवा. उदा. निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या लोकप्रतिनिधीने स्वत:चे उत्पन्न जाहीर करावे; तेही प्रतिज्ञापत्रावर आणि निवडून आल्यास प्रतिवर्षी ते जाहीर करावे. उभे राहिलेल्या उमेदवारापैकी कोणीही पसंत नसल्यास आजच्या पद्धतीत त्यापैकी मत द्यावेच लागते; अन्यथा ते वाया जाते. त्याऐवजी अशी काही तरी तरतूद हवी की, उभे राहिलेले सर्व उमेदवार नाकारण्यासाठी मतदार कोरी पत्रिका मतपेटीत टाकेल. सर्वांत जास्त मते पडलेल्या उमेदवारापेक्षा जर मतपेटीतील या कोऱ्या मतपत्रांची संख्या जास्त असेल तर त्या मतदार संघातील निवडणूक रद्द समजण्यात येईल. त्यामुळे पैसा, जात, गुंडगिरी या आधारे उमेदवार मतदार संघावर लादण्याच्या प्रक्रियेला चांगलीच चपराक बसेल.

या स्वरुपाची आणखी एक बाब म्हणजे सामान्य जनतेला माहितीचा अधिकार मिळण्याची. तो मिळाल्यास लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघांनाही सावध राहावे लागेल; मन मानेल तसा कारभार करता येणार नाही. जरब बसेल. एकूण कामकाजात पारदर्शकता येईल. लोकांना भ्रष्टाचाराविरोधी लढण्यासाठी एक हत्यार मिळेल.

निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या प्रचार मोहिमांच्या पलिकडे जाऊन जे प्रबोधन झाले, त्यामधून असे महत्त्वाचे अनेक मुद्दे पुढे आले. समितीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असा की, समिती विवेकाची चळवळ चालवते आणि आजची लोकशाही व त्याचे दृश्य स्वरूप असलेल्या निवडणुका यामध्ये झपाट्याने विचाराऐवजी विकाराचे प्राबल्य वाढत आहे. याचाच अर्थ असा की, माणसांना डोळस विचार करावयास शिकण्याची उमेद बाळगणाऱ्या चळवळीने यामध्ये प्रबोधनाद्वारे पदार्पण करावयास हवे. चळवळीच्या कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना आणि वार्तापत्राच्या वाचकांना याबाबत काय वाटते, ते समजून घेण्यास मी उत्सुक आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर १९९९)





‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...