शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन




व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन
दाभोलकर, व्यसनमुक्ती, प्रबोधन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या कामाचा एक भाग म्हणून व्यसनविरोधी प्रबोधन मोहीम राबवणार आहे. केवळ एक विधायक समाजोपयोगी कार्य असे त्याचे स्वरूप नसून या दोन्ही कार्यात कामाची पार्श्वभूमी, त्यातील मूल्यात्मक आशय यात साधर्म्य आढळते. म्हणून आपण हे करत आहोत. यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे -
१)   दोन्हीकडे माणसांची बुद्धी गहाण पडते. सारासार विचार संपुष्टात येतो, विवेक नाहीसा होतो.
२)    मानसिक गुलामगिरी दोन्हीमध्येही निर्माण होते.
३)    माणसे अंधश्रद्धांचा व व्यसनांचा आश्रय सुरुवातीला आनंद म्हणून,  आधार म्हणून, सहज म्हणून घेतात. आपण या बाबींवर अवलंबून आहोत, अशी कबुली कोणीही देत नाही. व्यसनी व्यक्तीला वाटते की, मी व्यसन केव्हाही सोडू शकतो. तसेच अंधश्रद्धाळू माणूस आपण प्रयत्नवाद सोडून अंधश्रद्धांचा आधार घेतला, असे कधीही कबूल करत नाही. वस्तुस्थितीत आधार घेता-घेता संपूर्ण आहारी कधी जावयास होते, हे समजत नाही.
४)    दोन्हींच्यामध्ये व्यक्ती आत्मकेंद्रित होते.
५)    जागतिक आरोग्य संघटनेने व्यसन हा एक मानसिक आजार आहे, असे म्हटले आहे. कमकुवत मनोवृत्तीची मानसिक दुर्बलता असलेली व्यक्तिमत्त्वे अंधश्रद्धेला बळी पडणे वा व्यसनाकडे वळणे हे सहज शक्य होते.
६)    घरातील प्रमुख व्यक्ती व्यसनाधिन असेल, तर सर्व घराला आर्थिक त्रास होतो. तसेच घरातील प्रमुख व्यक्ती, बुवा, दैवते, मंत्र-तंत्र यांच्या आहारी गेलेली असल्यास सर्व कुटुंबाला त्रास होतो.
७)    कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनी असेल, तर कुटुंबातील तरुण मुलांना वा लहान मुलांना तरुण झाल्यावर व्यसन लागण्याची शक्यता असते. कुटुंबप्रमुख अंधश्रद्ध असल्यास सर्व कुटुंब अंधश्रद्धाळू बनते.
८)    व्यसन व अंधश्रद्धा या दोन्ही मूलत: व पूर्णत: विकासविरोधी असतात.
९)    व्यसन व अंधश्रद्धा यांनी समाजाचे नुकसान होते. खऱ्या प्रश्नाबाबतचे भान निघून जाते.
१०)   आपल्या देशात दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात आहे; परंतु चरस, अफू, गांजा, गर्द, रेस, जुगार, मटका हे सर्व व्यसनाचेच विविध प्रकार आहेत. याप्रमाणेच बुवाबाजी, भानामती, मंत्र-तंत्र, जादूटोणा, फलज्योतिषावरील विश्वास, शोषण करणाऱ्या रूढी, परंपरा असे अंधश्रद्धेचेही विविध प्रकार आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९३)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...