शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

पुनर्जन्माची चिकित्सा




पुनर्जन्माची चिकित्सा
दाभोलकर, पुनर्जन्म, चिकित्सा, पूर्वसंचित
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमने कुतो हे विधान चार्वाकने दोन हजार वर्षांपूर्वी केले. शरीराची राख होते. विश्वाच्या द्रव्यात मिळून जाते. सारा खेळ खलास होतो. जगाचे रहाटगाडगे अविरत चालूच राहते.

परंतु माणूस अनेक अतृप्त आशा, आकांक्षा, भावना, वासना, जबाबदाऱ्या ठेवून जातो. त्याच्यामागे राहणारे सगेसोयरे पण त्यामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे कायम वियोगाची ही कल्पना सहन होणारी नसते. त्यातूनच पुनर्जन्माच्या कल्पनेचा उदय झालेला आहे.

त्याशिवाय आपली परंपरा, धर्मकल्पना ठामपणे आत्मा मानते. माणसाने अंगावरचे कपडे बदलावेत तसा आत्मा शरीररूपी कपडे बदलतो आणि दुसऱ्या जीवात प्रविष्ट होतो. हा आत्मा अविनाशी असतो. तो शस्त्राने न मारला जाणारा, पावसाने न भिजणारा, वाऱ्याने न वाळणारा, अग्नीने न पोळणारा असतो, आपली ही परंपरा पक्केपणाने रूजलेली भावना आहे. याच्या मदतीला चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा जन्म-मृत्यूचा फेरा आहेच. हा फेरा छेदून कायम नरकात जाऊन पडणारे किंवा थेट स्वर्गातली सीट रिझर्व्ह करणारे पापात्मे व पुण्यात्मे फारच थोडे. बाकीच्या पामरांना या फेऱ्यांतून जाणे आहे आणि त्यामुळे पुनर्जन्मही आहे.

खरे तर या फेऱ्यात नशिबाने एकदाच मानवजन्म लाभतो. पण कुणी-कुणी महापुण्यवान असतात. त्यांना मरणोत्तर पुन्हा मानवजन्मच लाभतो. पुनर्जन्माचा दावा करणाऱ्या या व्यक्तींच्या हकिकती अधूनमधून ऐकिवात येतात. जगाच्या लोकसंख्येच्या १० टक्के असणाऱ्या हिंदू धर्मातच पुनर्जन्म मानतात. ख्रिस्ती व इस्लाम वर्ग पुनर्जन्म मानीत नाहीत. राजस्थान विद्यापीठाने अशा सातशे केसेसचा अभ्यास केला, या अभ्यासातून काहीच निष्पन्न होत नाही. म्हणून त्यांनी हा विभागच मग बंद केला.

अशा केसेसना आपल्या समाजात नेहमीच अफाट प्रसिद्धी मिळते. पैसा कमवायला या अफवा उपयोगी असतात. अशा केसेसची काळजीपूर्वक तपासणी केली, तर बनावट हकिकतींचे काही दुवे हेरता येतात. पुनर्जन्माचा दावा करणारी व्यक्ती आणि तिचे हल्लीचे व पूर्वजन्मीचे कुटुंब याचा पुसटसा संबंध लक्षात येऊ शकतो. शिवाय जन्म, मृत्यू, लग्न यांच्या नोंदी, मरणोत्तर तपासणी यांचे अहवाल पाहता येतात.
मृत व्यक्तीचे काही मागे राहिले आणि ते दुसऱ्या देखत काही काळाने प्रविष्ट होते, असे मानावयास गेलो तर फारच घोटाळे होतात. मधल्या काळात ते आत्मे कोठे राहतात? हवेत भटकतात की वेताळाच्या टेकडीवर? शिवाय हे पुनर्जन्म मिळतात कोणत्या आधारावर? सध्याच्या कल्पनेप्रमाणे आधार मानावयास हवा, पूर्वसंचिताचाच, म्हणजे सगळा कर्मविपाकाचाच सिद्धांत मानावयास हवा. या जन्मीच्या पाप-पुण्याचा हिशेब होणार, त्याआधारे कुठल्या योनीत पुनर्जन्म येणार का मोक्ष मिळणार, हे ठरणार. त्यामुळे पूर्वजन्मीच्या कल्पनेला पुसटशीही मान्यता घ्यायची म्हणजे आपल्याला संचिताने घडवले. चातुर्वण्य दिले. भोग दिले, हे सगळेच मानावयास हवे. पुरुषार्थी माणसाला पुर्नजन्माची कल्पना अशी एका फटक्यात पराधीन करून टाकते.

कधी-कधी घरातील अमुक एक व्यक्ती, आजोबा, आजी मरते आणि त्याचवेळी चार-दोन दिवसांनी सून वा नातसून बाळंत होते. तिला मुलगा झाला तर आजोबाच आणि मुलगी झाली तर आजीचा पुनर्जन्म मानला जातो, आता या तर्काला काय म्हणावे! जन्माला आलेला जीव खरे तर आईच्या उदरात नऊ महिन्यांपूर्वीच जन्माला आलेला असतो. ऑपरेशनची वा औषधाची मदत घेतली असती, तर तो आजोबा-आजीचा मृत्यू आधीही जन्माला येऊ शकला असता. आठव्या महिन्यापासूनच तो जीव जगण्यालायक (Viable Child) होतो; मग त्या जीवात आत्मा कुठला होता?  इकडे तर आजोबा-आजी जिवंतच होते. पण हे साधे प्रश्न अक्कल गहाण टाकली की सुचत नाहीत. आत्मा हा जिवापेक्षा वेगळा आहे. जीवाला नव्हे तर आत्म्याला पुनर्जन्म आहे, हा युक्तिवादही म्हणून टिकत नाही. खरे तर आत्मा म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये कोणती? याचे बुद्धिगम्य विश्लेषण अद्याप कुणीच केलेले नाही. एक तर केवळ कल्पनाशक्तीने (स्पेक्युलेशन) त्याचे वर्णन केले जाते किंवा फार तर काहीजणांच्या अनुभवाचा हवाला दिला जातो. यातली कोणतीच गोष्ट प्रत्यक्ष पाहता येत नाही. अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहता टिकत नाही. म्हणूनच अशा पुनर्जन्माच्या कल्पनेबाबत मुळापासूनच नकार देणे श्रेयस्कर व योग्य आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९८८)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...