घटनाक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घटनाक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

कायद्याची डायरी




कायद्याची डायरी
दाभोलकर, कायदा, घटनाक्रम, उपक्रम, मुख्यमंत्र्यांना निवेदन, जेलभरो आंदोलन
एप्रिल महिन्यात जादूटोणाविरोधी कायद्याबाबत खूपच हालचाली झाल्या. अंनिसचे कार्यकर्ते व वार्तापत्राचे वाचक या दोघांनाही याबद्दल उत्सुकता असणार म्हणून डायरीवजा त्याची नोंद खाली देत आहे.

मार्च महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्र्यांना कायद्याबाबत व्यक्तिगत निवेदने जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत देण्याचा कार्यक्रम झाला. या निवेदनावर आपल्या भागातील मान्यवरांच्या आवर्जून सह्या घेणे; तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सह्याही मोठ्या प्रमाणात गोळा करणे, हे काम उत्साहाने करण्यात आले. कायदा करण्याचे लेखी आश्वासन १४ वर्षांपूर्वी मिळाले म्हणून १४ हजार व्यक्तिगत निवेदने पाठवण्याचे ठरले होते. हा कार्यक्रम १९ फेब्रुवारीला चालू झाला आणि मार्चअखेरीस महाराष्ट्रातून जवळजवळ ३० हजार निवेदने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोचली. यातील मान्यवरांची निवेदने खुद्द मुख्यमंत्र्यांच्या टेबलावरही ठेवण्यात आली आणि त्याचा एक परिणामही घडून आला.

मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी, जादूटोणाविरोधी कायदा मंत्रिमंडळात मंजूर करून विधानसभेत तो सुधारित कायदा मांडावा, यासाठी काहीच घडत नसल्याने मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेष उपोषण महात्मा फुले जयंती ता. ११ एप्रिल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ता. १४ एप्रिल करण्याचे महाराष्ट्र अंनिसने जाहीर केले होते. २४ मार्चला मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून १ एप्रिलनंतर केव्हाही बेमुदत उपोषणासाठी मी बसेन, असे कळवले होते. ३१ मार्चला मुख्यमंत्र्यांचे माहिती व जनसंपर्क प्रमुख सतीश लळित यांचा मला फोन आला की, एका आठवड्यात हा कायदा मंत्रिमंडळासमोर मंजूर होऊन विधिमंडळात मांडला जाईल. तेव्हा तुम्ही उपोषणाला बसू नये, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. कायदा करण्याबाबत मुख्यमंत्री ठाम आहेत.

ता. ३ एप्रिलला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांची कार्यालयात भेट घेतली. ते म्हणाले, मुख्यमंत्री, आत्ता १० मिनिटांत येत आहेत. त्यांची भेट घ्या. मी म्हणालो, मला तशी उभ्या-उभ्या दोन मिनिटांची भेट नको आहे. सविस्तर नियोजनपूर्वक अर्ध्या तासाची बैठक हवी आहे.त्यांनी माझी मागणी मान्य केली आणि भेट नियोजन ठरवण्याची जबाबदारी असलेले श्री. संजय यादव या मुख्यमंत्र्यांच्या पी. एस. यांच्याकडे माझे पत्र पाठवले. १५ मिनिटांनी मला श्री. यादव भेटले. त्यांनी, मुख्यमंत्रीसाहेब चेंबरमध्ये आहेत त्यांना भेटत का नाही, असे विचारले. अशा भेटीत काही निष्पन्न होत नाही. ही माझी रेकॉर्ड मी पुन्हा त्यांच्यासमोर वाजवली. ते म्हणाले, निदान १२ तारखेची बैठक तरी नक्की होईल. मग त्या आशेने मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. चेंबरमध्ये आम्ही दोघे सोडून कोणीही नव्हते. मी मुख्यमंत्र्यांना बैठकीची मागणी केली. ते अनपेक्षितपणे म्हणाले, तुम्हाला आज सायंकाळी सवड आहे का? आज मी वेळ देऊ शकेन, असे मला वाटते. मी संधी साधण्याचे ठरवले.

त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात माझी पत्रकार परिषद झाली. त्याला दूरदर्शन, आय.बी.एन. लोकमत, झी.टी.व्ही., ए.बी.पी. माझा, टी.व्ही.९ व आकाशवाणी या सर्वांचे प्रतिनिधी हजर होते. त्यामध्ये मी असे सांगितले की, शासनाची कमालीची अकार्यक्षमता व असंवेदनशीलता याच्या विरोधात ११ ते १४ एप्रिल आम्ही आत्मक्लेष उपोषण सातारला करत असून १६ एप्रिलला मुंबई येथे जेलभरो आंदोलन करणार आहोत. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे ठामपणे व उघडपणे कायद्याच्या बाजूने आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कायद्याच्या बाजूने सक्रियता दाखवावी, असे आवाहन केले.

सायंकाळी ५ वाजता मी पुन्हा मुख्यमंत्री कार्यालय, विधानभवन येथे गेलो. त्यावेळी तेथे कमी बजेट मिळाले म्हणून शिवसेना-भाजपचे आमदार मुख्यमंत्री कार्यालयाचा पॅसेज पूर्णपणे अडवून उभे होते. तो तिढा अर्ध्या तासात सुटला. नंतर शिष्टमंडळांची गर्दी होती. अनेक आमदार आपापल्या कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीत ठाण मांडून बसले होते. या सर्व गोंधळात माझी भेट कशी होणार, हे मला कळत नव्हते. परंतु मुख्यमंत्र्यांचे बहुतेक कार्यालयीन कर्मचारी हे ठामपणे कायद्याच्या बाजूचे आहेत. ३ तारखेला मुख्यमंत्र्यांच्यासमवेत माझी भेट घालून देण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. मात्र एकंदरीत वातावरणाचा ताण बघता ते कसे जमणार, याची मलाच नव्हे, तर त्यांनाच काळजी होती. मुख्यमंत्री कोठेतरी गेले होते. बहुधा विधानसभेत आणि त्यांची अधिरतेने वाट पाहणाऱ्या आमदारांच्या गर्दीने त्यांचे ऑफीस ओसंडून वाहत होते. तेथेच एका खुर्चीवर मी चिकाटीने बसून होतो. असा अर्धा तास गेला आणि अगदी अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांच्या ऑफीसला लागून असलेल्या त्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमधून मला आत बोलवण्यात आले. तेथे मुख्यमंत्री ना. चव्हाण व संसदीय कामकाजमंत्री ना. हर्षवर्धन पाटील हे फक्त दोघेच होते. आमची तिघांची बैठक चालू झाली. मुख्यमंत्र्यांची अशी स्वतंत्र व आवश्यक तेवढा वेळ देणारी भेट मला आतापर्यंत कधी मिळाली नव्हती. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना हा कायदा करण्याबाबत शासनाची अनास्था आम्हाला कशी-कशी जाणवते, हे सांगितले. गेल्या पाच अधिवेशनांत कार्यक्रमपत्रिकेत हा कायदा असूनही त्यावर एक शब्दाची चर्चा झाली नाही, हे निदर्शनास आणून दिले. तसेच या अधिवेशनाच्या पूर्वी त्यांनीच या अधिवेशनात कायदा मंजूर करण्याची ग्वाही दिली होती, तिकडे लक्ष वेधले. अशा परिस्थितीत वारकरी बांधवांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तयार झालेले कायद्याचे सुधारित प्रारूप अजून मंत्रिमंडळासमोरही आलेले नाही, तर त्यानंतरची सर्व प्रक्रिया होऊन उरलेल्या दिवसांत ते मंजूर होणार कसे? त्यासाठी शासनाला असाधारण कार्यक्षमता दाखवावी लागेल, असे सुनावले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधला. त्यांचे मुख्य सचिव अजितकुमार जैन यांना बोलावले. येणाऱ्या मंत्रिमंडळात कायदा चर्चेला येईल आणि विधानसभेत याच अधिवेशनात तो मांडला जाईल, असा शब्द त्यांनी दिला. उपोषण न करण्याची विनंती केली. मात्र या अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचा शब्द देण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शवली. उपोषण सुरू करू नका, अशी विनंतीही केली. अर्थात, याबाबतचा निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकारी समिती घेईल, असे मी त्यांना सांगितले.

ता. ७ एप्रिल - मुख्यमंत्र्यांशी झालेला संवाद सांगणे व उपोषण आणि जेलभरो याबाबत निर्णय घेणे, यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक ७ एप्रिलला पुण्याला झाली. त्याला बहुतेक सरचिटणीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबाबत तपशीलवार चर्चा झाली. त्यांची भेट मिळणे, कायदा मंत्रिमंडळासमोर ठेवणे व तो विधानसभेत मांडणे, या मर्यादित यशामुळे उपोषण रद्द करावे; मात्र धरणे व जेलभरो कायम ठेवावे, असे ठरले. सातारा येथे उपोषणाबाबत पूर्वतयारी चालू झाली होती. ती स्थगित करण्यात आली.

ता. १० एप्रिल - मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांची भेट त्यांच्या कार्यालयात घेतली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात हा विषय घेतलेला नाही. यामुळे फसवणूक झाल्याची भावना असल्याचे त्यांच्यासमोर मांडले. ते चटकन् उठले. मुख्यमंत्री ऑफीसमध्येच होते. त्यांना भेटले. पाच मिनिटांत परत येऊन म्हणाले, या मंत्रिमंडळात निश्चितपणे तो येईल म्हणजे येईलच, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ही बाब आश्वासक होती; पण समाधानकारक नव्हती. मंत्रिमंडळाची मीटिंग होती १७ तारखेला, १८ तारखेला अधिवेशन संपत होते. त्यामुळे मंत्रिमंडळाने केलेला कायदा हा विधिमंडळासमोर दुसऱ्या दिवशी मांडणे शक्यच होणार नव्हते. कारण त्याआधी किमान दोन दिवस तरी विधी खात्याला त्यावर काम करणे गरजेचे होते. अर्थातच जेलभरोचा निर्णय होताच, तो अधिकच दृढ झाला.
ता. ११ ते १४ एप्रिल - महाराष्ट्रामध्ये सातत्याने संपर्क करण्यात आले. मुंबईला आझाद मैदानावर मंडप, माईक, भोजन याची व्यवस्था करण्यात आली. समिती विवेकवादी संघटना असल्याने सत्याग्रहाला येणाऱ्या सर्वांनी तिकीट काढून येणेच अपेक्षित होते. हा खर्च बराच असतो आणि सामान्य कार्यकर्त्यांना तो करणे अवघड असतो. तरीही एकंदरीत १३० कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आणि किमान १०० कार्यकर्ते जेलभरो करतील, हेही नक्की झाले.

ता. १५ एप्रिल - मी, अविनाश पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्याला झी-२४ तास; तसेच आय.बी.एन. लोकमत या चॅनेलचे प्रतिनिधी आलेले नव्हते. त्यामुळे रात्री आम्ही त्यांच्या कार्यालयातच गेलो. दोघांनीही तत्परतेने बाईट घेतले.

ता. १६ एप्रिल- सकाळी ७ वाजता मुंबईचे कार्यकर्ते मैदानात हजर होते. आठ वाजता नाष्टा, चहा पोचला. मंडप ऐसपैस होता. स्टेज होते. ध्वनिक्षेपकही होता. ९ पासून कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. दुपारी १ ला त्यांना फूड पॅकेटस् दिले. त्यावेळी ही संख्या दीडशेच्या पुढे गेल्याचे लक्षात आले. महिलांची संख्याही चांगली होती. धरण्याला पाठिंबा देण्यासाठी पुष्पाताई भावे आवर्जून आल्या. आ. जयदेव गायकवाड, आ.विद्या चव्हाण, आ. डॉ. सुधीर तांबे यांनी काही काळ धरण्यात भाग घेतला. पाठिंबा दिला. दूरदर्शन, डी.डी.१, टी.व्ही.९, आय.बी.एन. लोकमत चॅनेलचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारी अडीच वाजता कार्यकर्त्यांनी दोन-दोनच्या रांगा लावल्या. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे फोटो हातात घेतले आणि जादूटोणाविरोधी कायदा झालाच पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा आझाद मैदानाच्या बाहेर निघाला. अपेक्षेप्रमाणे दाराच्या बाहेर पोलिसांचे पिंजरे असलेल्या गाड्या स्वागतासाठी सज्जच होत्या. तीन गाड्या खच्चून भरल्या आणि जोरजोरात घोषणा देत त्या गाड्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. पोलिसांना दोन पर्याय होते. एकतर रात्रभर ताब्यात ठेवून सकाळी न्यायालयासमोर उभे करणे, दुसरा अटक न दाखवताच नाव नोंदवून कार्यकर्त्यांची यादी करून त्यांना सोडून देणे. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. त्यामुळे कार्यकर्ते जेलभरोच्या अस्सल अनुभवाला मुकले. चार वाजता सर्व कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

त्याच दिवशी रात्री साडेसात ते आठ टी.व्ही.९, रात्री ९.१५ ते १० ए.बी.पी. माझा, व १० ते ११ आय.बी.एन. लोकमत या चॅनेलवर कायद्याबाबत चर्चा झडल्या. आय.बी.एन. वरील आजचा सवाल होता, जादूटोणाविरोधी कायदा करण्याबाबत सरकार चालढकल करत आहे काय? त्याला ८७ टक्के इतक्या दर्शकांनी होकारार्थी मत नोंदवले. हे कार्यक्रम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बघितले गेले. त्यामुळे कायद्याला जनमानस अधिक अनुकूल होण्यासाठी मदत झाली.
ता. १७ एप्रिल- मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्याचे प्रारूप मंजुरीसाठी येत असल्याबाबत मला माहिती मिळाली.
ता. १८ एप्रिल- १७ तारखेची मंत्रिमंडळाची बैठक रात्री ११.३० पर्यंत चालली. तेथे एकमताने या कायद्याला मंजुरी मिळाली, अशी माहिती मिळाली.

ही सर्व वाटचाल हा एका नव्या पर्वाचा प्रारंभ आहे. हा कायदा आता कायदे खात्याकडे जाईल. त्यानंतर गृहखात्याकडे जाईल. नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मांडला जाईल आणि या शासनाकडे जर राजकीय इच्छाशक्ती असेल, तर तो पावसाळी अधिवेशनात मंजूरही होऊ शकेल. याला विरोध करणाऱ्या संघटना आपला विरोध; जो अत्यंत चुकीचा व खोटा अपप्रचार आहे, तो अधिक जोराने करून कायदा होऊ नये, यासाठी आकाशपाताळ एक करतील. परंतु शेवटी सत्याचाच विजय होतो, हा इतिहासाचा दाखला आहेच.

जाता-जाता असे कार्यक्रम आयोजित करणे, यासाठी बरीच धावपळ व निधी लागतो. मुंबईतील कार्यकर्त्यांनी ही धावपळ तर केलीच; शिवाय स्वत: मिळवलेल्या ३ लाख रुपयांच्या जाहिरातींची १० टक्के रक्कम, जी त्या शाखेला मिळणार होती, ती सर्व त्यांनी आंदोलनाच्या खर्चाला दिली. असे सहकारी आणि असे संघटन कोणालाही आश्वासक व अभिनंदनीयच वाटेल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे २०१३)




शनिवार, १३ जानेवारी, २०१८

झुंज चालूच राहील....

झुंज चालूच राहील....
दाभोलकर, कायदा, विरोध, घटनाक्रम, वेळकाढूपणा 
शनिवार, ता. १५ जुलै : मी सातारा ऑफिसमध्ये होतो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून दूरध्वनी खणखणला. थोड्याच वेळात सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिवांच्याकडूनही फोन आला. १७ जुलै २००६ ला दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्र्यांच्या विधानभवनातील कार्यालयात कायद्याबाबतच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा तो निरोप होता. मी तातडीने प्रा. एन. डी. पाटील यांना संपर्क साधला. त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे एकट्यानेच किल्ला लढवणे क्रमप्राप्त होते.

१७ जुलै २००६, वेळ स. १२ वाजता स्थळ उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय :-
उपस्थिती : आर. आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, विरोधी पक्षनेते नितीन गडकरी व फुंडकर, शिवसेनेचे सरपोतदार, दिवाकर रावते, गृहखात्याचे व सामाजिक न्याय खात्याचे सचिव, उपमुख्यमंत्री स्थानापन्न झाले, तोच रावते व सरपोतदार यांचे त्रागावजा गरजणे चालू झाले. मुद्दा असा की, विधिमंडळाशी संबंधित या बैठकीला विधिमंडळाबाहेरचे डॉ. दाभोलकर व श्याम मानव यांना बोलावण्याचे कारणच काय? मुद्दा पूर्णपणे अप्रस्तुत; तरीही १५-२० मिनिटे तावातावाने लावून धरला गेला. आर. आर. पाटील म्हणाले, अहो, खरे तर तुम्हाला तरी बैठकीला बोलावण्याचे कारण काय? विधानपरिषदेत काय ते होऊन जाऊ दे, असे आम्ही म्हणू शकलो असतो. गेली १५-२० वर्षे हा प्रयत्न करणारी मंडळी यासाठी बोलवली तर कोठे बिघडले? तरीही ठेका कायम राहिला. शेवटी मी म्हणालो, आमचे मत सांगून आम्ही बाहेर जातो किंवा आत्ताच बाहेर जातो आणि तुमची चर्चा झाल्यावर तुम्ही बोलवले तर आत येतो. गृहमंत्र्यांनी यावर मला माझे म्हणणे मांडण्यास सांगितले. मी थोडक्यात आढावा घेतला आणि एक मुद्दा अत्यंत ठामपणे मांडला की, कसल्याही परिस्थितीत कायदा संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवला जाऊ नये. कारण तसे करणे म्हणजे निव्वळ कालहरणच नव्हे, तर तो कायदा करण्यालाच नकार देणे, असे वस्तुस्थितीत होईल. आधीचा कायदा आणि आताचे त्याचे सौम्य सुधारित प्रारूप, याबद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून श्याम मानव यांनी माहिती दिली. यानंतर या कायद्याबाबत दिवाकर रावते यांनी आरोपांच्या फैरी सुरू केल्या. त्यातील प्रत्येक मुद्दा समर्पकपणे खोडला जाऊ लागला. यामुळे त्यांची पंचाईत झाली. आम्ही जर बैठकीला नसतो तर कदाचित त्यांच्या या आरडाओरडीला किंमत दिली गेली असती आणि पुन्हा एकदा विधेयक पुढे ढकलले गेले असते. दिवाकर रावते यांनी आणखी एक पिल्लू पुढे सोडले. ते असे की, मी कायद्याचा हा मसुदा करून आणला आहे. त्याचा तुम्ही विचार करून या कायद्यात बदल घडवून आणा; अन्यथा हा कायदा करण्याची तुमची कृती ही लोकांच्या धर्मपालनावर गंभीर हल्ला आहे. यासाठी मी सुप्रीम कोर्टात तुमच्याविरोधी याचिका दाखल करीन. कायदा करण्याची जबाबदारी विधी विभागाच्या प्रधान सचिवांकडे असते. त्यांना जवळपास दमबाजी करत रावते यांनी विचारले, तुम्ही या कायद्याची जबाबदारी स्वीकारून खटल्याच्या परिणामाला तोंड देण्यास तयार आहात काय? कायदा विभागाचे प्रधान सचिव शिंदेकर यांनी ती तयारी दाखविल्यामुळे रावते आणखी चिडले. मग त्यांनी हा कायदा करून सरकारला किती पस्तावण्याची वेळ येईल, अशी भाषा चालू केली. दुसऱ्या बाजूला हाही राग आळवण्यास सुरुवात केली, की संयुक्त चिकित्सा समितीकडे हे प्रकरण पाठवूया, दोन महिन्यांत त्याचा निर्णय घेऊया आणि मग कायदा करूया. (प्रत्यक्षातील अनुभव असा आहे, की अधिक चर्चेसाठी एखादे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवले तर प्रत्यक्षात त्यात अनेक वर्षांचे कालहरण  होते. त्यानंतर जे बदल सुचवले जातात, ते पुन्हा विधानसभेकडूनच मंजूर होऊन यावे लागतात. प्रत्यक्षात याचा अर्थ अमर्याद कालापर्यंत कायदा न होणे असाच होतो.) अर्थातच ही रावते यांची जुनी मागणी होती आणि ती चंद्रकांत हांडोरे यांनी त्या-त्या वेळेला फेटाळूनही लावली होती. तरीही शेवटचा निकराचा प्रयत्न रावते यांनी केला. भाजपचे नितीन गडकरी यांची भूमिका सामंजस्याची होती. त्यांच्या मते, या कायद्याचा अभ्यास त्यांच्या पक्षाने केला होता. कायद्यातील मान्य बाबींना पाठिंबा द्यावा आणि मान्य नसलेल्या बाबींना विधान परिषदेत व बाहेर रस्त्यावर विरोध करावा, असे त्यांचे मत होते. कायदा होणार या वास्तवाचे भान त्यांच्या भूमिकेत दिसत होते. त्यामुळे शक्यतो एकमताने कायदा करावा. त्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक दृष्टीने चांगला संकेत जाईल, अशी भूमिका ते घेत होते. चर्चेची कोंडी काही फुटेना. काँग्रेसचे आमदार गुरुनाथ कुलकर्णी बैठकीत होते. त्यांनी चांगल्या प्रकारे व आक्रमकपणे कायद्याचे समर्थन केले. बैठकीत एकमत काहीच होऊ शकले नाही. मात्र दोन गोष्टी झाल्या. एक तर बैठक संपताना ना. आर. आर. पाटील यांनी ठीक आहे. विधान परिषदेत काय होते, ते पाहू या, अशी रोखठोक भूमिका घेतली आणि दुसरे म्हणजे दिवाकर रावते यांनी त्यांच्याकडच्या कायद्याचा सुधारित मसुदा आमच्या स्वाधीन केला.

ता. १७ जुलै वेळ दु. १.३० ते ७, स्थळ - सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांचे कार्यालय
दिवाकर रावते सतत कायदाविरोधी अतिशय आक्रमक भाषा गेली वर्षभर बोलत आहेत. हा कायदा हिंदूविरोधी आहे, असे एकीकडे म्हणत दुसरीकडे स्वत:ला अंधश्रद्धा निर्मूलनवादी म्हणत, स्वत:चे कायद्याचे प्रारूप पुढे रेटत होते. विधान परिषदेतील चर्चेच्या वेळी त्यांनी असे पर्यायी प्रारूप सभागृहात पुढे केले असते, तर कदाचित संयुक्त चिकित्सा समितीकडे ते पाठवण्यास अनुकुलता प्राप्तही झाली असती. उपमुख्यमंत्र्यांच्याकडील बैठकीमुळे एक फायदा झाला होता की, आम्हाला ते प्रारूप प्राप्त झाले होते. तातडीने त्याच्या झेरॉक्स प्रती काढण्यात आल्या. मी आणि श्याम मानव यांनी त्याचा अभ्यास केला. नंतर मंत्रिमहोदयांच्या बरोबर सविस्तर चर्चा झाली. लक्षात असे आले, की या मसुद्यातल्या बहुसंख्य तरतुदी या पर्यायी नसून कायदा संपूर्णपणे निष्प्रभ व अर्थहीन बनवणाऱ्या गोष्टी आहेत. त्या मान्य करणे अथवा त्यावर चर्चा करण्यास तयार होणे म्हणजे कायद्याचा गळा घोटण्यास मंजुरी देणे, असे होईल. मंत्रिमहोदयांना याची स्पष्ट कल्पना देण्यात आली. कायदा खात्याच्या प्रधान सचिवांना पाचारण करण्यात आले. निर्णय असा झाला, की विधेयक आहे तसेच मंजूर करून घ्यावयाचे, फार तर ताण न वाढू देण्यासाठी असे आश्वासन द्यावे, की चर्चेतील योग्य सूचना मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येतील आणि त्यांची उपयुक्तता पटल्यास कायद्यात सुधारणा करण्यात येईल; परंतु आता कायदा मंजूर करण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. ना. हंडोरे हे आमदार झाले आणि लगेच कॅबिनेट मंत्री झाले. विधिमंडळ कामकाजाचा त्यांचा अनुभव मर्यादित, यामुळे चर्चा कशी होईल, याची सविस्तर संभाव्यता लक्षात घेतली गेली.

ता. १७ जुलै, वेळ सायं. ७ वा. स्थळ : विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे कार्यालय.
शिवाजीरावांनी मनापासून स्वागत केले. अतिशय नि:संदिग्ध शब्दात सांगितले, की या कायद्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. हा कायदा एकमताने मंजूर करता येईल का, याची चर्चा झाली. त्याबाबत त्यांचे मत हे परिपक्व राजकारण्यांचे होते. ते म्हणाले, याबाबत भरपूर प्रयत्न झाले आहेत. आजचा प्रयत्न हा शेवटचा होता. यानंतर आणखी प्रयत्न करण्यात शक्ती वाया घालवू नका, त्यातून काही निष्पन्न होणार नाही. शेवटी राजकारणात विरोध गृहीत धरूनच काम करावे लागते. कायद्याचे विधेयक शक्यतो दुसऱ्या दिवशी आणि अगदीच शक्य न झाल्यास निदान १९ तारखेला चर्चेला यावे, अशी आमची विनंती होती. या विधेयकावर भरपूर चर्चा होण्याची शक्यता होती. तसा विधानसभेचा अनुभव होता. त्यामुळे १९ आणि २० हे दोन दिवस चर्चेसाठी हवे होते. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील परगावी गेले होते. ते रात्री उशिरा परत आल्यावर शक्यतो १९ तारखेला चर्चा घेण्याचे सभापतींनी मान्य केले. बाहेर आल्यावर मी पहिल्यांदा सभापतींच्या कार्यालयात गेलो आणि बुधवारी विधानभवनात प्रवेश मिळविण्याचा पास ताब्यात घेतला. सावधगिरी म्हणून २० तारखेचा पासही घेतला. (ती सावधगिरी कामाला आली. कारण सर्व आश्वासनांना हुलकावणी देऊन चर्चा प्रत्यक्षात २० तारखेलाच घेण्याचे ठरले.)

ता. १७ जुलै, वेळ रा. ८.३० ते १२.०० स्थळ : ना. चंद्रकांत हंडोरे यांचा बंगला
उपस्थिती : ना. हंडोरे, मी, श्याम मानव, त्यांचे सहकारी अशोक घाटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद शंभरकर.
चर्चेचा मुद्दा - विधान परिषदेत हंडोरेसाहेबांचे उत्तराचे भाषण प्रभावीपणे कसे होईल? त्याहून महत्त्वाचा मुद्दा काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी बहुसंख्येने उपस्थित कसे राहतील? हंडोरेसाहेबांच्या भाषणाबाबत मी त्यांना माझे मुद्दे दिले. कायद्यामध्ये असलेल्या कलमांना धरून जे वास्तव कार्यकर्ता पाहतो, त्याची एक फाईल श्याम मानव यांनीही त्यांना करून दिली होती. आमदारांच्या उपस्थितीबद्दल असे ठरले, की दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यावेळी हंडोरेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करायची, की त्यांनी सर्व आमदारांना एकत्र बोलावून, उपस्थित राहून विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश द्यावा. व्यक्तिगत पातळीवर आमदारांना विनंती करण्यासाठी ना. हंडोरे यांनी पुढाकार घेणे व श्याम मानव व मी यांनी आमदारांचे गैरसमज दूर करणे, असा प्रयत्न करण्याचेही ठरले. मला अर्थातच त्यासाठी दुसऱ्या दिवशी थांबणे शक्य नव्हते. कारण मंगळवारी साधना साप्ताहिकाचा अंक पोस्टात पडण्यासाठी मी पुण्याला जावयास पर्याय नव्हता. उपसचिव शंभरकर यांच्या गाडीने रात्रीला १२ ला मंत्र्यांचा बंगला सोडला. पहाटे ४.३० ला पुण्यात पोहोचलो.

मंगळवार, ता. १८ जुलै. स्थळ साधना साप्ताहिकाचे कार्यालय.
दिवसभर संपर्क दूरध्वनीद्वारा. जवळपास खात्री होती, की बुधवार, दि. १९ रोजी विधेयक चर्चेला येईल. प्रत्यक्षात बुधवारचे विधिमंडळाचे कामकाज ठरले. मंगळवारी रात्री १०.३० वाजता त्याप्रमाणे विधेयक २० तारखेला मांडण्यात येण्याचे कळले. दोन प्रश्नचिन्हे माझ्यासमोर उभी राहिली. पहिली गोष्ट अशी, की २० तारीख ही बिल मांडण्याच्या दृष्टीने अधिवेशनाची शेवटची तारीख होती. त्या दिवशीच्या कामकाजात दोनपेक्षा अधिक बिले होती. संकेत असा आहे, की एका दिवशी दोन विधेयकापेक्षा अधिक विधेयके मंजूर करावयाची असल्यास त्याबाबत सभागृहाचे एकमत लागते. या तांत्रिक मुद्द्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात बिल मांडणे कार्यक्रम पत्रिकेत असूनही शक्य झाले नाही. पुन्हा असेच २० तारखेला झाले, तर ही एक शंका, दुसरी शंका अधिक गंभीर होती. कोणत्याही विधेयकाच्या वेळी सत्तारूढ पक्षाच्या अपुऱ्या गणसंख्येने बिल नामंजूर होण्याचा धोका राहू नये, यासाठी शासन व्हिप (आदेश) काढते. मात्र असे असतानाही या पावसाळी अधिवेशनात एकदा १२ तारखेला व पुन्हा १८ तारखेला सरकारची दोन विधेयके मंजूर होऊ शकली नव्हती. ही बाब तांत्रिक होती; परंतु ढिसाळपणा या दृष्टीने अत्यंत गंभीर होता. जादूटोणाविरोधी कायद्याबाबत असेच झाल्यास ते विधेयक नामंजूर होण्याचाच धोका होता नि वर्षभर ते मांडताही आले नसते. यामुळे आमदारांनी हजर राहणे ही अत्यावश्यक बाब बनली. मुख्यमंत्री १९ तारखेला पूर्ण दिवस मा. राष्ट्रपती महोदयांबरोबर असल्यामुळे हंडोरे यांचे त्यांच्याशी बोलणेही होऊ शकलेले नव्हते. यावेळी याची भीती होतीच; परंतु एक आश्वासक बाब होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री ना. आर. आर. पाटील यांनी मला व्यक्तिश: पत्र लिहिले होते. कायदा होण्यासाठी महाराष्ट्रातील १३ मान्यवरांची पत्रे मी त्यांना पाठविली होती. त्यांचे पत्र असे होते, की विधिमंडळात जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर होण्यासाठी मी निश्चितपणे लक्ष घालणार आहे आणि ज्यांची पत्रे मी त्यांना पाठविली होती, त्या सर्व मान्यवरांना मी तसे कळवलेही आहे.

बुधवार, ता. १९, वेळ रात्री. स्थळ : रेल्वे स्टेशन, सातारा
मोबाईलवर एस.एम.एस. येऊन थडकला. अर्थ असा धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर होऊ नये, यासाठी पुढील नंबरवर फोन, फॅक्स करून आपण विरोध नोंदवा. खाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, विधानपरिषद सभापती यांचे फॅक्स व फोन नंबर.

गुरुवार, ता. २० दुपारी १. स्थळ : चंद्रकांत हंडोरे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांचे प्रशस्त केबीन.
उपस्थिती : ना. हंडोरे, स्वीय सहाय्यक शंभरकर, मी, श्याम मानव.
कायद्याला विरोध करण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी एक खेळी केलेली. स्वत:चे एक पर्यायी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पुढे सरकवलेले. सभागृहाच्या कामकाज पटलावर. त्याची पण नोंद. याचा अर्थ वेळकाढूपणा. दुपारी चार वाजता नितीन गडकरी मंत्र्यांच्या केबीनमध्ये काही दुसऱ्या कामासाठी. त्यांचे प्रतिपादन असे, की मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो; पण हे विधेयक हिंदूविरोधीच आहे, यावर ते ठाम आहेत. आमची त्यांना विनंती अशी की, तुम्हाला सत्यस्थिती माहीत आहे. तुम्ही मतदानात भाग न घेता तटस्थ राहा वा बहिष्काराच्या घोषणा देत बाहेर पडा. त्यांचे राजकीय उत्तर युतीत आहोत, मान राखावा लागेल.

गुरुवार, ता. २० वेळ दुपारी ५ वाजता. स्थळ : सभापती प्रेक्षक गॅलरी
मोबाईल बंदीची सक्ती. एक करविषयक विधेयक चालू. ते दीड तासात संपण्याची अपेक्षा. प्रत्यक्षात तीन तास त्यावर चर्चा. मग पुढचे विधेयक जादूटोणाविरोधी कायद्याचे. विधेयक पुकारण्याबरोबरच भाजप आमदारांचा सभापतींना आग्रह, सकाळी दहापासून बसून आहोत. आता कामकाज थांबवा. आर. आर. पाटील यांचा हस्तक्षेप, आज बिल मांडू द्या, चर्चा उद्या करू.ना. हंडोरे बिल मांडावयास उभे राहतात. दिवाकर रावते हरकतीचा मुद्दा काढतात, हे बिल धर्मविरोधी आहे, त्यामुळे ते मांडताच येत नाही. आश्चर्य म्हणजे हा हरकतीचा मुद्दा सभापती मान्य करतात. विरोधी पक्ष टाळ्या वाजवतात. रावतेंचे दमदार भाषण सुरू. मी अवाक्. नाशिकचे आमदार डॉ. वसंतराव पवार उभे राहतात. नियमच वाचून दाखवतात, विधानसभेत मंजूर झालेले विधेयक विधानपरिषदेत मांडताना हरकतीचा मुद्दा घेता येत नाही. रावते आपोआप खाली बसतात. अनुभवी सभापतींना हे कसे माहीत नाही, माझ्या मनात प्रश्न येतो. ना. हंडोरे घाईने उभे राहतात. दोन मिनिटात विधेयक मांडल्याचे सांगून खाली बसतात.

दिवाकर रावते उभे राहतात, तोपर्यंत अन्य विरोधी आमदारांनी (ठरवून) केलेला आरडाओरडा! फार उशीर होतो आहे! सभापती ते मान्य करून बैठक संपवतात. उद्याच्या कार्यक्रम पत्रिकेत हा विषय पुढे चालू होईल, हे सांगण्यास विसरत नाहीत.

शुक्रवार, ता. २१ : वेळ सकाळी १२. स्थळ : नामदार हंडोरेंचे कार्यालय
पुन्हा एकदा परीक्षेची तयारी सुरू. २ वाजतात. आता कधीही विधेयक चर्चेला येईल. मी प्रेक्षकांची गॅलरी गाठतो.
शुक्रवार, ता. २१. वेळ दुपारी २. स्थळ : प्रेक्षक गॅलरी.
समोर विधान परिषदेचे कामकाज चालू. फरक एवढाच, की ते पूर्वघोषित कार्यक्रमाप्रमाणे नाही. जादूटोणाविरोधी विधेयकाच्या खालच्या क्रमांकावर असलेले फायर ब्रिगेड सेवेबद्दलचे बिल चर्चेला घेतले जाते. चर्चा लांबते. काटा ४ कडे सरकतो. मग काही लक्षवेधी सूचना. तोपर्यंत कायद्याचे आज बिल आहे, याचा उल्लेख तरी होत असतो. ना. हंडोरे पूर्ण तयारीशी बसलेले. नितीन गडकरी उठतात, बोलतात, साडेचार वाजले आहेत, मुख्यमंत्र्यांचे चहापान आहे. आमदारांना आपापल्या गाड्या, विमाने गाठावयाची आहेत. शेवटच्या दिवशी कधीच एवढे कामकाज चालत नाही. तेव्हा आता उर्वरित कामकाज पुढील अधिवेशनात ४ डिसेंबरपासून घ्यावे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित. मात्र त्यांची अर्थपूर्ण स्तब्धता. सभापती शिवाजीराव देशमुख दोन मिनिटात तीन आठवड्यांच्या कामकाजाच्या वेळेचा आढावा घेतात. लगेच राष्ट्रगीत सुरू. राष्ट्रगीत संपते. प्रेक्षागृहाच्या गॅलरीतून बाहेर पडताना मागे काही साधक मोठ्या उत्साहाने घोषणा देतात, सनातन हिंदू धर्माचा विजय असो!

ता. २१ वेळ : सायं. ५ वाजता. ना. हंडोरेंचे कार्यालय
हंडोरे काही सांगण्याचा प्रयत्न करतात. मी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो. काहीशा संतापाने आणि उद्विग्नतेने उच्चारतो, ही तर काँग्रेसने आमची चक्क फसवणूक केली.

ता. २१ वेळ : सायं. ६ ते ९
मुंबई दूरदर्शन बाईट घेते. ई. टी. व्ही. स्टुडिओत नेऊन मुलाखत होते. महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळच्या कार्यालयात जाऊन प्रतिक्रिया देतो. कुमार केतकर, लोकसत्तेसाठी लेख लिहावयास सांगतात. धावत-पळत ११ वाजता जळगावला जाणारी गाडी पकडतो. हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करून घ्यायचाय, हा अभंग आवेश उरात जपत.

जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठी; प्रसंगी आमरण उपोषण
विधानसभेत वर्षापूर्वीच मंजूर झालेला जादूटोणाविरोधी कायदा विधानसभेत पारित करण्यासाठी शासन अक्षम्य दिरंगाई करीत आहे. ही अकार्यक्षमता आहे, अनास्था आहे, की कायदाविरोधाबद्दलची मिलीजुली असा प्रश्न पडतो, परंतु ते काहीही असले तरी या हिवाळी अधिवेशनात हा कायदा करून घेऊच, हा निर्धार समितीने बाळगला आहे.

पावसाळी अधिवेशनात कायदा करण्याचे नि:संदिग्ध आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी देऊनही प्रत्यक्षात विधिमंडळाच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या कामकाजात विधेयकाचा समावेश करण्यात आला नाही. अधिवेशन संपण्याच्या आधीच्या दिवशी दि. २० जुलैला हे विधेयक मांडण्यासच घेतलेली हरकतीची सूचनाही अनुभवी सभापतींनी कशी मंजूर केली, हे एक कोडेच आहे? आमदार वसंतराव पवार यांनी त्यातील बेकायदेशीरपणा स्पष्ट केला, म्हणून हरकत घेण्यासाठी उभे राहिलेल्या दिवाकर रावते यांना खाली बसवून निदान विधेयक तरी मांडले गेले. शेवटच्या दिवशीच्या २१ जुलैच्या कामकाजात विधेयकाचा समावेश होता. प्रत्यक्षात खालच्या क्रमांकाची विधेयके व अन्य कामकाज संपवून सदर विधेयक, हिवाळी अधिवेशनावर ढकलण्यात आले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत हे घडून आले, याचा अर्थ काय लावायचा?
१७ जुलैला कायद्याबाबत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी शिवसेनेचे मधुकर सरपोतदार, दिवाकर रावते, भाजपचे पांडुरंग फुंडकर, नितीन गडकरी यांच्या समवेत घेतलेल्या बैठकीत मी व श्याम मानव यांनी कायद्यावरील सर्व कथित आक्षेपांचा फोलपणा स्पष्ट केला होता. मात्र हे विधेयक हिंदूविरोधी असल्याचा आपला हेका कायम ठेवून शिवसेनेने विरोध चालूच ठेवला. यामागची राजकीय खेळी सत्तारूढ पक्षाला सहज समजावयास हवी होती. मागच्या अधिवेशनात त्यांचा हा डाव यशस्वी झाला होता. संभ्रमित करण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांचा पाठिंबा मिळेल का? या साशंकतेमुळेच मागील अधिवेशनात विधेयक न मांडल्याचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले होते. दुर्दैवाने याही वेळी आपल्या आमदारांना काँग्रेसने कायद्याबाबत सज्ञान केले नव्हते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तो प्रयत्न केला. बी. टी. देशमुखांच्या नेतृत्वाखालील अनेक अपक्ष आमदारही विधेयकाच्या बाजूस होते. मुख्यमंत्र्यांनी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना पत्र लिहून व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मला पत्र लिहून विधिमंडळात सदर विधेयक संमत होण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे कळवले होते. तरीही असे घडले; या सर्वांचा अर्थ शासन पुरोगामी भाषा बोलते, प्रत्यक्षात वेगळेच वागते असा होतो. हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडून, पुरेसे आमदार मतदानाला उपस्थित ठेवून, मंजूर करण्याचे ठोस लेखी आश्वासन १० नोव्हेंबरपर्यंत न मिळाल्यास सामूहिक आमरण उपोषणापर्यंतचे सर्व मार्ग चोखाळण्याचे समितीने ठरवले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००६)





‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...