इच्छाशक्तीचा अभाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इच्छाशक्तीचा अभाव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २८ जानेवारी, २०१८

जादूटोणाविरोधी कायद्याची धीमी वाटचाल




जादूटोणाविरोधी कायद्याची धीमी वाटचाल
दाभोलकर, कायदा, चालढकल, इच्छाशक्तीचा अभाव, कालहरणाची काळी पत्रिका, आरोप
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांना दोन जुलैला पुणे येथे पत्रकारांनी छेडले. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘या पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर होईल. आतापर्यंत कायदा मांडू,’ असे म्हणणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच कायदा मंजूर करू, असे शब्द वापरत होते, हे सुद्धा आश्वासक होते. त्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की, ‘हा कायदा फक्त अघोरी अंधश्रद्धांच्या विरोधात आहे; शिवाय वारकऱ्यांच्या सर्व सुधारणा मान्य करून वीस बदल कायद्यात केलेले आहेत. यामुळे कायदा करण्यात अडचण नाही. ८ जुलैला संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मला फोन करून भेटीला बोलाविले. त्या भेटीच्या वेळी योगायोगाने विधानसभेचे अध्यक्ष ना. दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण मला भेटले. त्या सर्वांचा सूर कायदा करण्याबाबत होकारार्थी होता. एकूण सर्व वातावरण कायदा होऊ शकेल, असे वाटणारे होते. ९ जुलैला मी, अविनाश पाटील व नंदकिशोर तळाशीलकर यांनी विधानपरिषदेचे भाजप नेते विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यांच्याशी कायद्याबाबत चर्चा केली. दुसऱ्या दिवशी टी.व्ही.९ चॅनेलवर कायद्याचे कट्टर विरोधक शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याशी चर्चा झाली. या दोघांनी जे आक्षेप घेतले, ते अर्थहीन होते. दुसरीकडे, १० तारखेला सकाळी आम्ही राज ठाकरे यांना भेटलो. त्यांनी कायद्याला पूर्ण पाठिंबा दिला. कायद्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत म्हणून चित्रपुस्तिका प्रकाशित करण्याची सूचना केली व स्वत: त्यासाठी सहकार्य देण्याचे कबूल केले. याबरोबरच झी.टी.व्ही. यांनी माझी कायद्याबाबत अर्धा तास मुलाखत दाखविली. ए.बी.पी. माझाने देखील एक विशेष कार्यक्रम सादर केला. हे सर्व वातावरण दिलासा देणारे होते.

दुसऱ्या बाजूला, १० जुलैपासून वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांनी, त्यांना न विचारता कायदा केल्यास वारी रोखण्याची भूमिका घेतली. त्याबाबत मुख्यमंत्री यांनी यू टर्न घेतला आणि त्यांनी जाहीर केले की, वारकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कायदा करणार नाही. आता वारकरी बांधवांशी तब्बल दोन वर्षे चर्चा केल्यानंतर व कायदा करणार, असे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनाकलनीयपणे पुन्हा चर्चा सुरू करणे, यामागचे कारण समजणे अवघड होते. मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक इच्छाशक्तीचा अभाव एवढेच त्याचे कारण असणार. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांना लिहिले की, बहुसंख्य वारकऱ्यांचा व त्यांच्या प्रतिनिधींचा कायद्याला पाठिंबा आहे. मात्र काही राजकीय हिंदुत्ववादी शक्ती वारकऱ्यांच्यात कार्यरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून कायदा याच अधिवेशनात करावा. कारण मुख्यमंत्र्यांना हे नक्की माहीत आहे की, कायद्यामध्ये धर्माची उपासना व आचरण यावर कसलेही बंधन नाही. सर्व वारकऱ्यांची १०० टक्के समज पटेपर्यंत कायदा थांबवल्यास तो कधीच होणार नाही. त्यामुळे आता खरा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक व राजकीय निर्धाराचा आहे. मात्र आजची परिस्थिती अशी आहे की, याबाबत मुख्यमंत्र्यांकडून फारशी आशा बाळगता येत नाही.

कायद्याच्या कालहरणाची काळी पत्रिका प्रकाशित करण्याच्या कार्यक्रमाला मराठीतील प्रिंट मीडियाने मोठीच मदत केली. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांत कायद्याच्या काळ्या पत्रिकेचे प्रकाशन काही ठिकाणी समाजसुधारकांच्या पुतळ्यासमोर झाले; तर बहुतेक ठिकाणी ते पत्रकार परिषदेत झाले. त्यांचे इतिवृत्तांत स्थानिक जिल्हा वृत्तपत्रांत; तसेच विभागीय वृत्तपत्रांतही चांगल्या प्रकारे आले आहेत. शासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ स्वत:च्या तोंडाला काळे फासण्याचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात व लातूर येथे उत्तम प्रकारे पार पडला. कदाचित हा महिना संपेपर्यंत आणखी काही ठिकाणी कार्यक्रम घडतील.

या सर्वांमध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक संघटित शक्ती असून सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी सातत्याने गेली १८ वर्षे संघर्षशील आहे, हे वास्तव ठळकपणे लोकमानसासमोर आले. काळ्या पत्रिकेची कल्पना ही मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना आवडली. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची आग्रही मागणी समितीने कायम ठेवली आहे. मात्र आता निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीवर आहे. २२ जुलैला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यानंतरच परिस्थितीचा अचूक अंदाज येऊ शकेल.

ताजा कलम
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत मंगळवार, ता. २३ जुलै रोजी मी विधानभवनात थडकलो. कोणतीही वेळ न घेता थेट भेटीसाठी गेल्यावर काही वेळा प्रचंड गैरसोय होते आणि काही वेळा अनपेक्षित लाभ होतो. माझे तसेच झाले. जादूटोणाविरोधी कायदा ज्या संसदीय कामकाज मंत्री ना. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे, ते मला त्यांच्या कार्यालयात तुलनेने मोकळे भेटले. आतापर्यंत अनेकदा या कामासाठी मी त्यांना भेटलो आहे. ते उडवाउडवी करतात, असा माझा ग्रह अनुभवाने बनला होता. २३ जुलैला मात्र अनुभव वेगळा आला. त्यांनी माझे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र नीट वाचले. त्यावर खुणा केल्या. सचिवाला बोलावून असे सांगितले की, हे पत्र ताबडतोब सामाजिक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांच्याकडे द्या व वारकरी प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यासाठी वेळ मागण्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवावे, अशी विनंती करा. त्याबरोबर त्यांनी ११ जुलै रोजी वारकरी संपद्रायाच्या नेत्यासमवेत झालेली चर्चा सांगितली. ही चर्चा मी मुख्यमंत्र्यांच्या समवेत बोलूनच त्यांच्यावतीने केली आहे, हे सांगितले. त्याप्रमाणे ते म्हणाले की, वारकरी बांधवांना मी स्पष्ट कल्पना दिली आहे की, हा कायदा फक्त अघोरी बाबी, जादूटोणा, करणी याविरोधात आहे. अशा बाबींना संतांनीही नेहमीच विरोध केला आहे. हा कायदा मांडण्यापूर्वी तुम्हाला दाखवण्यात येईल आणि मुख्यमंत्री तुमची बैठकही घेतील. याप्रमाणे ही बैठक आपण लवकरात लवकर घेऊ या, असे त्यांचे होकारात्मक प्रतिपादन होते. त्यानंतर मी थेट ना. शिवाजीराव मोघे यांच्याकडे गेलो. तेही लगेच भेटले. पत्र लिहिण्यासाठी ते तयारच होते. त्यांचे सचिव श्री. नाईकडे यांनी पत्र तयार केले. तोपर्यंत ना. महोदय विधान परिषदेत कामकाजासाठी गेले होते; पण विधानपरिषदेत कर्मचारी पाठवून त्यांची सही ताबडतोब आणण्यात आली. त्यानंतर हे पत्र घेऊन मी या बाबीशी संबंधित मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना भेटलो. त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. मात्र नेहमीप्रमाणेच त्यांनी मला ताबडतोब वेळ दिला. मी त्यांना दोन्ही पत्रे दिली. एक ना. शिवाजीराव मोघे यांचे व दुसरे मुख्यमंत्र्यांची भेट मागणारे माझे पत्र. त्यांनी ताबडतोब भेटी ठरवण्याशी संबंधित मुख्यमंत्र्यांचे पी. एस. अभिजित घोरपडे यांच्याकडे माझे पत्र पाठवले. म्हणजे खरे तर मीच ते घेऊन गेलो. अधिवेशन चालू असताना पी. एस. अत्यंत व्यस्त असतात. मात्र ते त्यांच्या जागेवर होते. ते पूर्णत: महात्मा फुले यांच्या विचाराला मानणारे आहेत. त्यांनी सोमवार अथवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या सोयीनुसार वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींच्याबरोबर बैठक बोलावण्याचे मान्य केले. मी परतलो. सातारा गाठण्यास रात्री एक वाजला. २५ तारखेला सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याचा फोन आला. ताबडतोब गाडी घेऊन निघालो. पाऊस, खराब रस्ते यावर मात करत चार वाजता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोचलो. तिथे महाप्रचंड गर्दी होती. दालनात मराठवाड्याबरोबरच्या मोठ्या प्रतिनिधी मंडळाशी मुख्यमंत्री चर्चा करत होते. मुख्यमंत्र्यांच्या खोलीत दाटीवाटीने आमदार बसले होते वा उभे होते. त्याच्या आतल्या बाजूच्या मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्येही काही जण घुसले होते. माझ्या आधीची भेटीची वेळ दिलेले तीन आजी-माजी आमदार ताटकळत होते; शिवाय सहा वाजता मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठक होती. अशा परिस्थितीत भेट मिळणे केवळ अशक्य दिसत होते. मराठवाडा प्रतिनिधींसमवेत बैठक संपवून मुख्यमंत्री त्यांच्या खोलीत आले. मुख्यमंत्री निधीला देणगी देणाऱ्या काहीजणांचे चेक हातात घेऊन त्यांनी फोटो दिले. ते घाईघाईने आतील चेंबरमध्ये गेले. तेथे काही महत्त्वाची चर्चा चालू असावी. मी आणि इतर अनेक इच्छुक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अस्वस्थपणे काय होणार, असा विचार करत बसलो होतो. तेवढ्यात आतून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह बाहेर आले. मी त्यांना मला चारची वेळ मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले. त्यांनी दारावरच्या शिपायास आतील लोक बाहेर आल्यावर मला सोडण्यास सांगितले. तोपर्यंत काटा सहावर सरकला होता. आतील लोक बाहेर येण्याच्या आतच घाईघाईने ना. हर्षवर्धन पाटील व ना. नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये घुसले. आता त्यांची चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री थेट कॅबिनेटलाच जाणार, हे उघड होते. त्यामुळे मी क्षणभर विचार केला. संकेत बाजूला ठेवले आणि मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये घुसलो. दारावरच्या पहारेकऱ्याने किंवा आत असलेले पी. एस. यादव यांनी माझी ही घुसखोरी चालवून घेतली. मुख्यमंत्र्यांची संबंधित दोन मंत्र्यांच्या बरोबरची कामाची चर्चा संपली. ते कॅबिनेटला जाण्यासाठी वळले, तेवढ्यात मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. मी म्हणालो, ‘आपण वारकरी प्रतिनिधींशी कायद्याच्या मसुद्याबाबत चर्चा करणार आहात. विधानसभा चालू आहे. त्यामुळे हक्कभंग होणार नाही का?’ या मुद्द्याने मुख्यमंत्री व ना. हर्षवर्धन पाटील यांनी थोडी चर्चा केली. दोघांचेही मत असे पडले की, तसे होणार नाही. मग मी ही चर्चा आपण लवकरात लवकर करावी, विधिमंडळात कायदा मांडावा व मंजूर करावा, अशी मागणी केली. त्याला अर्थातच ठोसपणे होय, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. ना. हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘जर आम्हाला कायदा करावयाचाच नसता तर आम्ही आधीच्या या सर्व बाबी तरी कशाला केल्या असत्या?’ मी म्हणालो, ‘वारकऱ्यांमध्ये हिंदुत्ववादी राजकीय शक्ती कार्यरत आहेत. यामुळे सर्व वारकरी नेत्यांचे समाधान अशक्य आहे. याबाबत मुख्यमंत्री स्पष्टपणे असे म्हणाले की, ‘आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे व त्याबाबत आम्ही योग्य ती दक्षता घेऊ चर्चा संपली. मात्र वारकरी प्रतिनिधींच्या समवेत बैठक घेणे, कायदा विधानसभेत मांडणे व तो मंजूर करून घेणे याबाबत ठोस वेळापत्रक ठरले नाही. कायदा करण्याची शासनाची तयारी आहे; मात्र त्याबाबत प्राधान्य दाखवण्यासाठी सामाजिक इच्छाशक्ती कमी पडत आहे, असे माझे मत बनले. मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्याच्या काळात आमदार भाई जगताप व डॉ. सुधीर तांबे (काँग्रेस), आमदार विद्याताई चव्हाण यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. यासाठी वातावरणनिर्मिती करावयास राज्यव्यापी मोहीम काढावी, अशी सूचना त्यांच्यामार्फत पुढे आली.

या अधिवेशनात कायदा दोन्ही सभागृहात मंजूर होणे. मला शक्य दिसत नाही. परंतु वातावरण कायद्याच्या दिशेने हळूहळू, पण निश्चितपणे अनुकूल बनत आहे. याच दिवशी सनातन संस्थेचे धरणे आझाद मैदानावर होते आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटावयास त्यांचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी आता कायदा संपूर्ण रद्दच करण्याची मागणी केली आहे. वारकरी संप्रदायातील मोठा गट कायद्यास पाठिंबा देण्याची शक्यता त्यांना दिसत असल्याने त्यांनी आता कायदा सुधारणा याऐवजी कायदाच नको, अशी टोकाची भूमिका घेतलेली दिसते, जी एका अर्थाने समितीची मागणी मान्य होण्याच्या वाटेवर आहे, या मानसिकतेचे लक्षण आहे, असे मला वाटते. याचाच एक भाग म्हणजे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी समितीवर व माझ्यावर आरोप केले. परदेशातून पैसे घेऊन समिती लोकांची दिशाभूल करते आहे, या स्वरुपाचे हे आरोप होते. त्यांना तिथल्या तिथेच विधान परिषदेत आमदार विद्याताई चव्हाण यांनी विरोध केला. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाईम्सने याबाबत माझे म्हणणे मागवून घेऊन छापले होते, हे विद्याताईंनी वाचले होते आणि मी आता विधान परिषदेत हे वाचून दाखवीन, असे त्या मला म्हणाल्या. अनेक कार्यकर्त्यांनीही ते वाचून फोन केले. एकूण आपण हळूहळू ध्येय साध्य करण्याच्या दिशेने चाललो आहोत, अशी माझी भावना आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी आणखी एक जोरदार धक्का द्यावा लागेल, तो आपण देऊच.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१३)




शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

कायद्याच्या आघाडीवर




कायद्याच्या आघाडीवर
दाभोलकर, कायदा, इच्छाशक्तीचा अभाव, उपोषण, कायदा प्रक्रिया
जादूटोणाविरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर करण्याबाबत शाब्दिक सहानुभूती भरपूर आहे. मात्र तिचे प्रत्यक्षात कृतीत रूपांतर होऊ शकते का, याबद्दल मी साशंक आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अवघे दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येथे कायदा या अधिवेशनात होईलच, अशी ग्वाही पत्रकार परिषदेत दिली. दैनिक सकाळने त्यांच्या सर्व आवृत्त्यांत ठळकपणे पहिल्या पानावर हे छापले. इतर वृत्तपत्रांनीही या बातमीस यथोचित जागा दिली. त्यानंतर दोनच दिवसांनी अधिवेशनापूर्वीचे विरोधकांसमवेतचे चहापान झाल्यानंतरच्या वार्तालापात मुख्यमंत्र्यांनी याच बाबीचा पुनरुच्चार केला. त्यामुळे अनेकांना असे वाटले की, कायदा या अधिवेशनात नक्की होणार; परंतु कथनी आणि करणी यात नेहमीच बरेच अंतर असते. कायदा मंजूर होण्यासाठी काय घडावयास हवे, याची नोंद खाली क्रमश: दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया किती खडतर असते, याची कल्पना येऊ शकेल.

१.    २१ डिसेंबरला नागपूरला मुख्यमंत्र्यांनी वारकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा एकदा ९ जानेवारीला वारकरी प्रतिनिधींच्याबरोबर सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे सविस्तरपणे बोलले. त्यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात येणाऱ्या बदलाची नोंद त्यांनी प्रतिनिधींना दिली. हे एक महत्त्वाचे पाऊल शासनाने उचलले.
२.    हा सुधारित मसुदा मुख्यमंत्र्यांच्या सहीने सामाजिक न्याय विभागाकडे जावयास हवा. हा लेख लिहीपर्यंत (२१ मार्च) तो गेलेला नव्हता. स्वाभाविक त्यापुढील सर्व बाबींची तर सुरुवातही झालेली नाही.
३.    सामाजिक न्याय विभागाचे सचिव; तसेच राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री यांच्या सहीने तो महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरी यांच्याकडे जावयास हवा.
४.    चिफ सेक्रेटरी यांनी तो मसुदा मंत्रिमंडळासमोर मांडण्यासाठी मंत्रिमंडळाच्या कामकाज पत्रिकेत समाविष्ट करावयास हवा.
५.    मंत्रिमंडळाने मसुदा मंजूर करावयास हवा.
६.    यानंतर तो मसुदा कायदेशीर परिभाषेत होण्यासाठी विधी खात्याकडे पाठवण्यात येईल.
७.    विधी खात्याने मंजूर केलेला मसुदा हा कायदा सध्याच्या ‘इंडियन पिनल कोड’मधील तरतुदीशी सुसंगत आहे ना, हे पाहण्यासाठी गृहखात्याकडे पाठवण्यात येईल.
८.    गृहखात्याकडून अनुमती आल्यानंतर तो मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रिमहोदया-कडून विधानसभेत मांडण्यात येईल. मसुदा बदललेला असल्यामुळे जुलै २०११ मध्ये मांडलेला मसुदा रद्द झाला आहे. त्यामुळे हा नवा मसुदा सभागृहाच्या पटलावर ठेवावा लागेल.
९.    यानंतर सभागृहाच्या कामकाजपत्रिकेत दाखवून त्यावर चर्चा करून विधानसभेत तो मंजूर करावा लागेल.
१०.   विधानसभेत मंजूर झाल्यानंतर तो विधान परिषदेत मंजूर करून घ्यावा लागेल.

वरील सर्व बाबी जास्तीत जास्त २६ एप्रिलपर्यंत म्हणजे विधिमंडळ कामकाजाच्या शेवटच्या दिवसापर्यंत करवून घ्याव्या लागतील. काहीजणांच्या मते, हे अधिवेशन १८ एप्रिलपर्यंतच चालणार आहे. असे झाल्यास वेळ आणखी कमी होईल.

आतापर्यंतचा शासनाचा याबाबतचा अनुभव उत्साहवर्धक नाही. तरीही अत्यंत चिकाटीने समितीने हा लढा चालू ठेवला आहे. याबाबत आजची परिस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
१.    मुख्यमंत्री कायदा करण्यास अनुकूल आहेत. मात्र तो त्यांच्या प्राधान्याचा विषय नाही.
२.    उपमुख्यमंत्री कायदा करण्याबाबत आग्रही आहेत.
३.    वारकरी संप्रदायाच्या सूचनेप्रमाणे कायद्यात बदल केला आहे.
४.    या बदलानंतर शिवसेना-भाजपचा विरोध सौम्य झाला आहे. त्यांचा एकच मुद्दा आहे की, कायदा सर्व धर्मियांसाठी हवा आणि तो तसाच असल्यामुळे त्यांचा आक्षेप टिकणारा नाही.
५.    मनसेचा कायद्याला विरोध नाही.
६.    शेकाप, लोकभारती, रिपब्लिकन, सीपीएम हे पक्ष थेटपणे कायद्याच्या बाजूचे आहेत.
७.    कायद्याला अजूनही धर्माच्या नावाने विरोध करणारे जे आहेत, ते ज्या संघटनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे केली आहे, त्यांचे सभासद आहेत, याची जाणीव महाराष्ट्र शासनाला आहे. याच मंडळींनी नेहमीप्रमाणे विधानसभा अधिवेशन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आरोप केले आहेत, ज्यांची दखल माध्यमांनी घेतलेली नाही.
८. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत निवेदने कायदा करण्याबाबत पाठवण्याची जी मोहीम चालवण्यात आली, त्याला सर्वसामान्य नागरिक व मान्यवर    यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री ना. हसन मुश्रीफ, तसेच खा. सुप्रिया सुळे, कोल्हापूरचे सध्या गादीवर असलेले शाहू महाराज, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विविध पक्षांचे आमदार यांच्या व्यक्तिगत सहीची निवेदने मुख्यमंत्र्यांच्या समोर थेटपणे ठेवण्यात आली. त्याचा परिणाम झाला आहे.
९.    कायदा करण्यासाठी सत्तारूढ पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे.

समिती आता काय करत आहे?
१.    कायदा होण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडावयास हवी, असे वर लिहिलेले आहे. ती लवकरात लवकर पार पाडावी, यासाठी प्रयत्नशील आहे.
२.    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांची एकत्रित बैठक होऊन कायदा होण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन समितीला मिळावे, यासाठी समिती प्रयत्नशील आहे. या स्वरुपाचे पत्र ना. अजितदादा पवार, दोनदा मा. मुख्यमंत्र्यांना दिले आहे, ही जमेची बाजू आहे. यामुळे अशी बैठक होण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव जैन यांच्याशीही याबाबत तपशिलात बोलणे झाले आहे व त्यांनीदेखील अशी बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले आहे.

वरील सर्व आढावा लक्षात घेतला तर कायदा होण्याबाबत अनुकुलता असली तरी पूर्वीचा प्रदीर्घ अनुभव शासनावर विसंबून राहण्यासारखा नाही. त्यामुळे १० एप्रिलपर्यंत काय घडते, हे पाहिले जाईल. कायदा करण्याच्या प्रक्रियेने योग्य ती गती न पकडल्यास ११ एप्रिल महात्मा फुले जयंती ते १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत ७२ तासांचे आत्मक्लेष उपोषण मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले जाईल. हे उपोषण दबाव आणण्यासाठी नसून शासनाची असंवेदनशीलता व नाकर्तेपणा याच्या विरोधात असेल. त्यानंतर १५ तारखेला मुंबईला आझाद मैदानावर अंनिसचे सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते जेलभरो सत्याग्रह करतील. सत्याग्रही गुन्हा कबूल करून शिक्षा स्वीकारतील.

उपोषण व जेलभरो याबद्दलच्या सूचना :-
१.    उपोषणात सहभागी होणाऱ्यांनी एक दिवस उपोषण करणे अभिप्रेत आहे. ७२ तास उपोषण करावयाचे असल्यास स्वत:च्या प्रकृतीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. कुटुंबियांशीही बोलावे.
२.    एक दिवस उपोषण करणारे अन्य दोन दिवस उपोषणस्थळी थांबू शकतात. त्यांची आवश्यक सोय केली जाईल.
३.    पुणे, कोल्हापूर, इस्लामपूर येथून वाहनाने एकत्रितपणे व नियोजनपूर्वक कार्यकर्ते उपोषणात सहभागी होतील, असे पाहिले जात आहे. अर्थात, महाराष्ट्रातून कोठूनही कार्यकर्ते येऊ शकतात.
४.    १५ तारखेला अथवा १६ तारखेला मुंबईला जेलभरो आंदोलन होईल.

वरील दोन्ही कार्यक्रम हे शासनाचा प्रतिसाद काय आहे, यावर अवलंबून आहेत. मात्र आपण आपल्या बाजूने ते करावे लागतील, असे गृहीत धरून तयारी करत आहोत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल २०१३)




मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

कायदानिर्मितीच्या आघाडीवर




कायदानिर्मितीच्या आघाडीवर
दाभोलकर, कायदा, वाटचाल, इच्छाशक्तीचा अभाव, विरोध, खडतर संघर्ष
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन आले की, जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्याची चर्चा चालू होते. अधिवेशनाच्या विषय नियामक पत्रिकेत गेली चारही अधिवेशनांत या कायद्याचा समावेश होता. हा कायदा आम्ही करणार आहोत, असे संसदीय कामकाज मंत्री ना. हर्षवर्धन पाटील दर अधिवेशनाच्यावेळी सांगतात. यावेळेस तर मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनीही तसे सांगितले. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने पहिल्या पानावर चौकटीत ठळकपणे ते छापले. याबाबत संघटना म्हणून समितीने केलेल्या प्रयत्नाचा हा लेखा-जोखा...

कायदा करणार आहोत, असा स्पष्ट शब्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती स्पष्टपणे देत असल्याने याबाबत काही आंदोलन करावयाचे नाही, असा निर्णय समितीच्या राज्य कार्यकारिणीने जूनमध्ये घेतला. अपेक्षित होते की, सरकार पुढाकार घेईल आणि प्रत्यक्ष अमलातही आणेल.

सोमवार, ता. ९ जुलै रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू होणार होते. मी बुधवार, ता. ४ जुलैला मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संबंधित खात्याचे मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांना भेटलो. त्या आधी दोनच दिवस पुणे येथील प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता की, या अधिवेशनात कायदा मंजूर होईल का? त्यांनी उत्तर दिले होते, पावसाळी अधिवेशन छोटे असते. अर्थसंकल्पी अधिवेशनात कायदा करू. या त्यांच्या उत्तराबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनीही माझ्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ना. मोघे यांनी मला मोघम उत्तर दिले. त्यानंतर मी थेट मुख्यमंत्र्यांनाच गाठले. मुख्यमंत्र्यांना अपॉइंटमेंटशिवाय गाठणे तसे अशक्य असते. पण त्यांचे प्रधान सचिव श्री. जैन यांना कायद्याबाबत अगत्य असल्याने त्यांनी माझी थेट भेट घालून दिली. मी दिलेल्या निवेदनात लिहिले होते, गेल्या तीन अधिवेशनांत कायदा पटलावर होता. काहीही चर्चा झाली नाही. न्यायाला विलंब हा न्यायाला नकार ठरतो आहे. याच अर्थाचे चार स्पष्ट बोल मी मुख्यमंत्र्यांना ऐकवलेही. मुख्यमंत्र्यांनी कायदा अधिवेशनात चर्चेला घ्यावा, असा स्पष्ट शेरा निवेदनावर मारला. विधानसभेच्या सुरुवातीला बिल चर्चेला यावे, अशी अपेक्षा होती. म्हणून अधिवेशन सुरू झाल्यावर लगेच तिसऱ्या दिवशी ११ जुलैला पुन्हा एकदा मी व अविनाश पाटील विधिमंडळात गेलो. त्यावेळी एक नवीनच माहिती कळली. ती अशी की, मागील पावसाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक मांडण्यात आले होते. त्यानंतरच्या पुढील दोन अधिवेशनात ते चर्चेला आले नव्हते. या पावसाळी अधिवेशनातही ते चर्चेला न आल्यास एका वर्षापेक्षा अधिक काळ विधेयक विनाचर्चा राहिल्यामुळे ते आपोआपच रद्द होते. मग ते पुन्हा नव्याने मांडण्याचा सर्व खटाटोप करावा लागतो. सामाजिक न्याय विभागाचा प्रयत्न हे न घडू देण्याचा होता. याचा अर्थ विधेयक मंजूर होणे राहिले बाजूलाच; त्याला जिवंत ठेवण्याचीच धडपड चालू होती. ही बाब उघडपणे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाची होती. आम्ही संसदीय कामकाजमंत्री ना. हर्षवर्धन पाटील यांना भेटलो. त्यांनी दिलेले उत्तर राजकीय होते. या अधिवेशनात विधेयक प्राधान्याने मांडण्याची मागणी संबंधित मंत्र्यांनी माझ्याकडे केली की, मी लगेच कायदा कार्यक्रम पत्रिकेवर घेतो, असे त्यांचे मत होते. आता दोन्ही मंत्री आणि मुख्यमंत्रीही काँग्रेस पक्षाचेच असल्याने खरे तर ही जबाबदारी सामुदायिक होती. हे उत्तर मला टोलवाटोलवीचे वाटले. पण मी पुन्हा ना. शिवाजीराव मोघे यांच्याकडे गेलो आणि त्यांना असे पत्र संसदीय कामकाजमंत्र्यांना देण्याची विनंती केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद सभापती या दोघांनाही भेटलो. सभापती शिवाजीराव देशमुख यांचा प्रतिसाद आश्वासक वाटला. ते सभापती आहेतच, तसेच ज्येष्ठ काँग्रेस नेतेदेखील आहेत. त्यांनी स्वत:हून ना. शिवाजीराव मोघे यांना बोलावून घेऊन कायद्याची वाटचाल पुढे जाईल, याची खात्री दिली.

याच दरम्यान कायद्याच्या बाजूने व विरोधी हालचाली घडतच होत्या. कायदा विरोधकांनी नेहमीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना कायदा न करण्याबाबत निवेदने देणे, त्या कायद्यात जे नाहीच ते आहे, असा खोटा प्रचार रेटून करणे, आमदारांना भेटून, मंत्र्यांना भेटून समितीच्या कार्याबाबत दिशाभूल करणारी माहिती देणे, मुंबईत आझाद मैदानावर धरणे धरणे, वृत्तपत्रात विरोधी लेख छापून आणणे, या बाबी लावून धरल्या होत्या. खोट्या गोष्टीच्या रक्षणार्थ ते दाखवत असलेली अफाट चिकाटी ही खरोखरच कौतुकास्पद मानावयास हवी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांनी त्यापासून धडाही घ्यावयास हवा. याच दरम्यान म्हणजे ११ जुलैलाच आय.बी.एन. लोकमत या वृत्तवाहिनीवर कायद्याबाबत एक तासाची चर्चा ‘आजचा सवाल’ या कार्यक्रमात घडवली गेली. आमने-सामने असलेल्या या कार्यक्रमात कायद्याला विरोध करणाऱ्यांचे पुरते वस्त्रहरण झाले. हे सर्व लक्षात घेता मला असे वाटत होते की, कायदा चर्चेला नक्की येणार. त्यामुळे पुन्हा १८ तारखेला विधिमंडळ वारी करण्यासाठी मी फारसा उत्सुक नव्हतो. पण काँग्रेसवाल्ङ्मांचा काय भरवसा, असा विचार करत मी १८ तारखेला विधिमंडळात थडकलो. ते बरोबरच केले असे मला वाटते. कारण कायदा चर्चेला घेण्याची कोणतीही हालचाल नव्हती. उलट बिल चर्चेला न आल्याने ते Lapse होऊ नये. याचे नोटिंग संबंधित मंत्रालयाने पूर्ण केले होते. ते विधिमंडळात सादर करून बिल यशस्वीपणे हिवाळी अधिवेशनाकडे ढकलणे, यातच ते कृतार्थता मानत होते. अधिवेशन मोजून पाच दिवस राहिले होते. त्यापैकी शेवटचा दिवस वगळता चारच दिवस कामकाज चालणार होते. त्यामुळे मी तातडीने मुख्यमंत्र्यांना गाठले. विधानसभा अध्यक्षांशी चर्चा केली. त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. संसदीय कामकाज मंत्र्यांनी पुन्हा विषय प्राधान्यक्रमाने घेण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांचे पत्र मागवले. ते मिळवले. तोपर्यंत हा विषय प्राधान्याने घ्यावा, असा मुख्यमंत्र्यांचा शिफारसवजा आदेशही सामाजिक न्यायमंत्र्यांच्याकडे थडकला. सभागृहाचे कामकाज ठरवणाऱ्या समितीत सर्वांत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख आहेत. त्यांनीही हा विषय पुढच्या चार दिवसांतील कामकाजात यावा, याचा आग्रह धरण्याचा शब्द दिला.

हा लेख मी रविवार, दि. २२ जुलैला लिहीत आहे. अधिवेशनाचे आता मोजून तीन दिवस बाकी आहेत. त्यामध्ये काय घडेल, हे कळेपर्यंत अंक छापावयास गेलेला असेल. कायदा चर्चेलाही न येता वंचना चालूच राहील? की कायदा चर्चेला येऊन चर्चा अपुरी राहील? की कायदा फक्त विधानसभेत मंजूर होईल? की कायदा दोन्ही सभागृहात मंजूर होण्याची अभूतपूर्व घटना घडेल? यापैकी काही अंदाज वर्तविण्यात अर्थ नाही. कारण अंक वाचकांच्या हातात पडेपर्यंत प्रत्यक्षात काय घडले, हे वाचकांना समजले असेलच. माझा अनुभव मात्र मला मनातून सांगत आहे की, जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठीचा संघर्ष खडतर आहे. अजूनही काही काळ चिकाटीने तो आपल्याला चालवावा लागणार आहे आणि शेवटी विजय आपलाच होणार आहे, हेही नक्की.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१२)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...