गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

आश्वासक


आश्वासक
दाभोलकर, अनुभव  

           


स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र आणि चांगल्या प्रकारे झाला. धावपळ होती, त्यामुळे दौरे गाडीने झाले. तो खर्च वाढलाच. आझाद मैदानावर कार्यक्रम घ्यावयाचा म्हणजे मंडप, माईक, खुर्च्या, स्टेज असा सगळा जामानिमा लागतो. त्याचा खर्च असतोच. कार्यकर्ते कुठून-कुठून येतात. त्यांच्या अल्पोपहाराचा, भोजनाचा खर्च ही स्वाभाविक गरज असते; शिवाय अनेक छोटे-मोठे खर्च असतात. या सगळ्यांचा आकडा जवळजवळ २५ हजारांपर्यंत गेला. संघटनेचे पैसे खर्च करताना शक्यतो खर्च न करायला लागले तर बरे, असे मला सारखे वाटत असते. अर्थात, चळवळीची गरज असते. पैसे खर्च करावे लागतातच. हे सगळे लिहिण्याचा मुद्दा मात्र वेगळाच आहे. मुंबईतील सर्व कार्यक्रम संपवून मी पुण्याला आलो. सकाळी साधना साप्ताहिकाच्या माझ्या कार्यालयात गेलो. एक पत्र माझी वाट पाहत होते. पत्र होते भारतीय प्रशासन सेवेतील जिल्हाधिकारी पातळीवरच्या एका निवृत्त व्यक्तीचे. त्यांचे नाव सदाशिव कुलकर्णी. त्यांनी लिहिले होते, समितीचे काम महत्त्वाचे आहे, उपयुक्त आहे. अशा कामाला आर्थिक सहाय्य लागतेच, यासाठी रु. १५ हजारांचा चेक सोबत पाठवत आहे. सातारला पोचलो. तोपर्यंत मुंबईच्या कार्यकर्त्यांतर्फे नंदकिशोर तळाशिलकरांच्या मार्फत निरोप मिळाला. आंदोलनाच्या वेळी झालेला अल्पोपहार, भोजन यांचा सर्व खर्च उचलण्याचे मुंबई जिल्ह्याने ठरवले आहे. आणखी काही दिवस गेले. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. आर. जहागिरदार यांच्याकडून १० हजार रुपयांची देणगी आली आणि हे सगळे कमीच ठरावे, असा आणखी एक प्रकार घडला. १२ एप्रिलला सातारा जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक व कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होता. त्यावेळेला कराडहून शिवप्रसाद मांगले भेटावयास आले. सोबत पत्नीला आणि कन्येला घेऊन आले. येण्याचे कारण त्यांनी सांगितले - मागच्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले होते आणि तिचा पहिला श्राद्धदिन याच महिन्यात येत होता. पती-पत्नी उभयतांनी असे ठरवले होते की, श्राद्धाचा कोणताही विधी न करता ते पैसे एका सामाजिक कार्यासाठी द्यावयाचे आणि ते सामाजिक काम म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची निवड केली होती आणि त्याचा १० हजार रुपयांचा चेक देण्यासाठी ते आले होते. हा संस्कार आपल्या मुलीवरही व्हावा आणि हा विचार तिच्यापर्यंत पोचावा, यासाठी नववीतील मुलीची दुसऱ्या दिवशी परीक्षा असतानाही तिला घेऊन आले होते. मांगले शेती खात्यामध्ये नोकरी करतात. अवघ्या एका महिन्यातील या चार घटना. यापैकी कोणालाही मी पैसे मागितले नव्हते. एक-दोघांशी तर ओळखही नव्हती. असे असतानाही ज्या प्रेमाने, मन:पूर्वकतेने व विश्वासाने त्यांनी समितीच्या कामाला देणगी दिली, ती मला फार आश्वासक वाटली. कामावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच अवघ्या महिनाभरात उत्स्फूर्तपणे घडलेल्या या चार घटना आश्वासक वाटतील, असा विश्वास वाटतो.संचित

दौऱ्यावर होतो. कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. त्या गावातील कार्यकर्ते असलेले उत्साही पती-पत्नी नेहमीप्रमाणे सोबत होतेच. कार्यक्रम संपल्यावर इकडच्या-तिकडच्या गप्पा निघाल्या. कार्यकर्ते आई-वडील काळजीच्या सुरात मला म्हणाले, ‘डॉक्टर, कधीतरी आमच्या मुलाशी बोला. सध्या नको. त्याची परीक्षा सुरू आहे. पण सवडीने नक्की बोलाच. मुद्दा असा होता की, आई-वडील दोघेही चळवळीतल्या प्रभावातले. विचाराला पक्के. शक्यतेनुसार सर्व ती धडपड करणारे. जमेल तेवढे जास्तीत जास्त झोकून देऊन काम करणारे. मुलगा तारुण्याच्या उंबरठ्यावर. विचाराने तसा नास्तिक. स्वाभाविकपणे आई-वडिलांनी असे गृहीतच धरले की, तो आपल्या कामात हात मिळवणार. मुलाने नकार दिला. तो म्हणाला, ‘हे काम कशाला करायचे? करून फायदा काय? समाजाचे वाईटपण कशाला घ्यायचे वगैरे वगैरे. मुलाचे आणि माझे बोलणे झाले नाही आणि आई-वडिलांशी झाले, तेही मोजकेच. त्यामुळे मला अधिक काही कळले नाही; पण त्या मुलाच्या मनात आणि त्याच्याच कशाला, कदाचित समितीच्या कार्यकर्त्यांपैकी, सहानुभूतीदारांपैकी अनेकांच्या तरुण मुलांच्या मनात हा प्रश्न येत असेल. प्रश्न अगदी थेट आहे. तो असा की, चळवळीच्या या उठाठेवी करून भौतिक किंवा लौकिक फायदा काय? याने चार पैसे जास्त मिळत नाहीत; उलट स्वत: जवळचे पैसेच खर्च करावे लागतात. काम समाजातील विचारप्रवाहाच्या विरोधी पोहण्याचे. त्यामुळे दमछाक होते; शिवाय समाजाच्या रोषाचे बळी व्हावयास लागण्याची शक्यता असते. स्वत:ची मौज-मजा यावर बंधने येतात. एवढे सगळे करून समाज बदलत नाहीच म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. मग कोणी सांगितली ही उठाठेव करायला? त्यापेक्षा मस्त मजेत जगावे, सर्व उपायांनी अधिकाधिक पैसे मिळवावेत, उपभोग घ्यावेत. कोणाला त्रास दिला नाही म्हणजे झाले. हे करून वेळ उरला तर समाजाला रुचेल, पटेल, पचेल असे सामाजिक काम करावे. या विचाराचा प्रतिवाद करता येतो आणि करायलाच हवा. परंतु वाचकांना काय वाटते, कार्यकर्त्याच्या त्या मुलाला काय सांगावयास हवे, कसे पटवावयास हवे, हे वाचकांकडून समजून घेण्यास मी उत्सुक आहे, जरूर कळवावे. पुढच्या अंकात त्यावर लिहिताना त्यातील काही मुद्दे सर्वांच्या समोर मांडायला मला आवडेल.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(मे २००५)


बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

त्याला जगायचंय, त्याला लढायचंयही


त्याला जगायचंय, त्याला लढायचंयही
दाभोलकर, मदत    
त्याचे नाव मनोज बबन आढाव, वय वर्षे १२, मु. पो. सांगवी (ता. सिन्नर, जि. नाशिक). आई-वडील दोघेहीजण मजुरीला जाऊन पोट भरणारे. निसर्गाने त्याला लहानपणापासूनच मधुमेह बहाल करून साखरसम्राट बनविले होते. पहिलीत असताना रोगाचे निदान झाले. त्या सहा-सात वर्षांच्या पोराला डॉक्टरांनी सांगितले, गोड-धोड बघून उगीच जीव पाखडू द्यायचा नाही. कडुलिंब खायचा, भात पूर्ण वर्ज्य, आणखी अशीच कडक पथ्यं; पोरगं निग्रही. त्याने पथ्य अगदी कडक म्हणजे कडक पाळायला सुरुवात केली. झालं उलटंच; चक्कर येऊ लागली, तोंडाला फेस येऊ लागला. मग आणखी मोठ्या डॉक्टरांना दाखविलं. त्यांनी समजावलं, ‘इतके कडक पथ्य नाही पाळायचे. साखर एकदम कमी होते. थोडी बाजरीची भाकरी, थोडा भात खात जा. साखर रक्तात जास्त नको, तशी कमीपण नको. मनोजने स्वत:चे स्वत:ला अ‍ॅडजेस्ट करून घेतले. कधी साखर कमी झाल्याने चक्कर येते वाटले, तर थोडी साखर खावी आणि ती किती खावी, याचे गणित त्याचे त्याने जुळविले. पण वर्षभरातच पथ्यावर भागेना. गोळ्या पुऱ्या पडेनात. इंजेक्शन अपरिहार्य बनले. रोज दोनदा हे इंजेक्शन घ्यायला हवे. सकाळी १० युनिट, संध्याकाळी २० युनिट. रोज डॉक्टर भेटणे, परवडणे आणि त्यांनी इंजेक्शन टोचणे, हे सारे ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतमजुराच्या पोरासाठी अशक्यच. मनोज स्वत: इंजेक्शन योग्य त्या प्रमाणात भरायला आणि टोचून घ्यायला शिकला. इंजेक्शनचा खर्च महिन्याला ६०० रुपये. एवढे पैसे दरमहा बाजूला काढणे म्हणजे सगळ्याच कुटुंबाची कसरत. मनोज यंदा सहावीला गेला. शाळा सोमठाणे येथे. घरापासून ३ किलोमीटर दूर. इंजेक्शन घेऊन धावत-पळत मनोज शाळा गाठायचा. उन्हातल्या त्या धावपळीत साखर कमी होऊन चक्कर येऊन पडायचा. नवीन मुख्याध्यापकांनी आजारपणासाठी शाळा सोडण्याचा सल्ला दिला. मनोजच्या वडिलांना तो सोयीचा वाटला. मनोजची शाळा सुटली. आणखी तीन महिन्यांतच बाळूमामांच्या मेंढरांचा कळप नाशिक जिल्ह्यात आला. बाळूमामाचा कृपाप्रसाद लाभलेली व त्यामुळे आजाऱ्याला बरे करण्याची अद्भुत शक्ती मिळालेली, असे या मेंढरांचे वर्णन केले जाते.’ वडिलांनी मनोजला बाळूमामाच्या मेंढरात सोडला. औषधे बंद केली. एक महिना त्या मेंढरात मनोज राहिला. इंजेक्शनशिवाय आपण जगत नाही, हे एव्हाना त्याला चांगले कळले होते. त्याने इकडून-तिकडून थोडे पैसे जमा केले. इंजेक्शन घेऊन मनोजने मेंढरांचा कळप सोडला. तो घरी परतला. बापाला ते फारसे रुचले नाही. शाळा सुटलीच होती. पोटासाठी काहीतरी मिळवणे गरजेचे होते. आदार माणिकराव कोकाटे यांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी पैशाची सोय करून मनोजला एक टपरी टाकून दिली. मनोज टपरीवर स्वत:चे पोट चालवू लागला. औषधापुरते पैसे मिळवू लागला. एवढ्यात कुठूनतरी गुटख्याचे भयानक दुष्परिणाम मनोजला समजले. त्यामुळे टपरीवरील गुटख्याची विक्री त्याने बंद केली. अर्थातच ते धंदाच बंद करण्यासारखे होते. मनोज आणि त्याची आई यांनी ही टपरी कशीबशी सुरू ठेवली आहे, एवढेच. चासनळी (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथील कृष्णा चांदगुडे व त्यांच्या मानवता संघाच्या सभासदांना ही बातमी कळली. श्रम न करता मनोजला शाळेत येता-जाता यावे, यासाठी त्यांनी त्याला सायकल घेऊन दिली. मनोजची धावपळ जरा वाचेल. परंतु या गोंधळात जानेवारी उजाडला. त्यामुळे मनोजचे हे वर्षतर गेलेच; मात्र तो जिद्दीने पुढच्या वर्षी पुन्हा सहावीत बसून शिक्षण सुरू ठेवण्याची व किमान बारावीपर्यंत पूर्ण करण्याची हिंमत बाळगून आहे. अर्थात हे सोपे नाही. औषधाच्या किमती त्याच राहिल्या असे मानले तरी दर महिन्याला किमान ६०० रुपये लागतील. बेभरवशाची मजुरी आणि टपरी यावर कुटुंबाचे पोट चालवून एवढी रक्कम दरमहा उभारणे मनोजच्या आई-वडिलांना अशक्यच आहे. त्यासाठी समाजातील शेकडो हात पुढे झाले तर मात्र अशक्य काहीच नाही.

     

(डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वरील लेखाला अनुसरून मनोजची बातमी दै. सकाळच्या सर्व आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्याच दिवशी साम मराठी या वाहिनीवर स्पेशल रिपोर्ट दाखविण्यात आला. मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद चांगला मिळाला. ८० हजार रुपये जमा झाले व पाच वेगवेगळ्या संस्थांनी मनोजला दत्तक घेण्याची तयारी दाखविली. यामध्ये महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश आहे. डॉ. दाभोलकर, कृष्णा चांदगुडे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस, नाशिक) व ‘सकाळ’ परिवार यांच्यामुळे मनोजचा लढा समाजासमोर आला. मदतीचे शेकडो हात पुढे आले. आज मनोज एका नवीन जीवनासाठी सज्ज झाला आहे.)

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(मे २००९)

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

पाऊल पडते पुढे

पाऊल पडते पुढे
दाभोलकर, भूमिका, कार्यक्रम


अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे कार्य करते आहे. समितीचा विचार लोकांना आधी रूचत नाही, रूचला तर पचत नाही आणि आचरणात तर येतच नाही; स्वाभाविक समितीचे काम अवघड आणि अप्रिय आहे. समितीकडे कसलीही राजकीय ताकद नाही; फार मोठी कार्यकर्त्यांची फौज नाही. आर्थिक क्षमतेद्वारे प्रभाव पाडण्याचा तर प्रश्नच येत नाही. कार्यकर्ते आहेत; पण पूर्णवेळ कार्यकर्ते अपवादात्मकच. या सर्व अडचणींचा मुकाबला करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपले प्रभावक्षेत्र वाढवते आहे, याचा चळवळीतील कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना सार्थ अभिमान वाटावयास हवा. संघटनेचा विचार सत्य आणि समाजाला पुढे नेणारा आहे, याबद्दल जनमानसात एक समर्थन आढळते. हे समर्थन आढळते, याचे काही उघड दृश्य पडताळे आहेत. लोकमानसाचे समर्थन राजकीय पक्षांना पाहिजे असते. सत्तारूढ पक्ष जनमानसाचे हे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करतो. यापलिकडे समाजात काही मान्यवर संस्थाही असतात की, ज्यांना दीर्घकालीन कामगिरीमुळे नावलौकिक प्राप्त झालेला असतो. या दोन्ही पातळीवर विचार केला तर काय आढळते?
     
फेब्रुवारीमध्ये वैज्ञानिक जाणिवा व अंधश्रद्धा निर्मूलन याचा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्याचे राज्यव्यापी चर्चासत्र समितीने घेतले, ते रयत शिक्षण संस्थेबरोबर. ही संस्था भारतातील एक सर्वांत मोठी शिक्षणसंस्था आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्याच्या कामात समितीबरोबर त्यांनी यावे, यामध्येच समितीच्या लोकशिक्षणाच्या कामाची पावती मिळून जाते. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील पहिले सर्पमित्र संमेलन वनखात्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर संयुक्तपणे घेतले. सर्व खर्च शासनाने केला. वनमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. वनखात्याच्या प्रधान सचिव पूर्ण दीड दिवस मुक्काम ठोकून होत्या. समितीने केलेल्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्याहीपलिकडे जाऊन आणखीही काही देण्यात आले. यामध्ये वनखात्याचे मंत्री व प्रशासन यांची मानसिक उदारता आहेच; परंतु त्याबरोबरच समितीला निर्माण झालेल्या मान्यतेचाही भाग आहे. नव्याने भरती झालेल्या पोलिसांचे प्रशिक्षण करणारी केंद्रे महाराष्ट्रात आहेत. या एकेका केंद्रात पाचशे प्रशिक्षणार्थी असतात. त्यांच्या प्रशिक्षणात आयुष्यभर उपयुक्त ठरणाऱ्या काही पूरक बाबींचा समावेश त्या केंद्राचा प्राचार्य, जो जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या दर्जाचा असतो त्याच्यामार्फत केला जातो. अनेक प्रशिक्षण केंद्रे आवर्जून समितीचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कार्यक्रम ठेवतात आणि तो उपयुक्त असल्याची दाद मनापासून देतात. सामाजिक वनीकरणाचे संचालनालय हे पर्यावरणरक्षणाचे कामही करते. त्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेनुसार महाराष्ट्रातील आठ हजार माध्यमिक शाळांच्यात हरितसेना स्थापन झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली काही वर्षे होळीच्या बाबतीत पर्यावरणाच्या दृष्टीने काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. सामाजिक वनीकरण विभागाने या सर्व उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात केवळ स्वागत केलेले नाही, तर हरितसेनेमार्फत ते उपक्रम यावर्षी राबवण्यात येत आहेत. पर्यावरणसुसंगत निर्माल्य व गणेश विसर्जन याची सुरुवात समितीने करून १० वर्षे उलटली. आता बहुतेक नगरपालिका, महानगरपालिका, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे छात्र निर्माल्य गोळा करतात. गणेशाच्या मूर्ती पाण्यात विरघळणाऱ्या शाडू मातीच्या असाव्यात, यासाठी हरितसेनेने यंदा पुढाकार घेतला. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने समितीने सुचविलेलेच पर्याय देत सर्व नगरपालिका व महानगरपालिकांना पत्रे आणि त्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश जोडलेले होते, त्याचा अर्थ हा कार्यक्रम ‘अंनिस’च्या मागणीशी पूर्ण सुसंगत असा होता.
     
जादूटोणाविरोधी कायदा करण्याची मागणी समितीने लावून धरली. कायदा मंत्रिमंडळात मंजूर झाला. विधानसभेत पारित झाला. मात्र त्यापुढची त्याची वाटचाल अडखळत सुरू आहे; परंतु हे देखील लक्षात घ्यावयास हवे की, अजूनही कायदा करणारच, या मुद्द्यावर शासन ठाम आहे. संयुक्त चिकित्सा समितीकडे कायद्याचे प्रारूप सोपवण्यात आले आहे. त्या संयुक्त चिकित्सा समितीत कायदा व्हावा, या मताच्या आमदारांचे बहुमत आहे. यामुळे कायदा होईल, अशी आशा करण्यास नक्कीच जागा आहे.
     
समितीचा मार्ग प्रबोधन, रचना, संघटन व संघर्ष हाच आहे. राजकीय पक्ष अथवा शासन यांच्या दारात आम्हाला पदरात घ्या, अशा लाचारीने समिती कधीही गेलेली नाही. तरीही समितीच्या कार्याचा जो प्रभाव निर्माण झाला आहे, त्यामुळे त्या कामाची मान्यता व अनुकुलता वाढत आहे. प्रतिकुलता संपली म्हणून हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही; परंतु पावले योग्य दिशेने पडत आहेत आणि त्या मार्गावर शासनाचा हात स्वत:हून पुढे येतो आहे, हे नक्कीच आश्वासक आहे. दीर्घ पल्ल्याची थकवा आणणारी अवघड वाटचाल करत असताना हा दिलासा नक्कीच आश्वासक आहे.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च २००८)

सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

पाथेय


पाथेय
दाभोलकर, चमत्कार  
माहिमचा समुद्र अचानक गोड झाल्याने आलेला उन्माद आता ओसरला आहे. या घटनेची शास्त्रीय मीमांसा समजते आहे; परंतु याकडे दैवी चमत्काराच्या श्रद्धेने बघणाऱ्यांना (तेच बहुसंख्य आहेत) त्यामुळे फरक पडत नाही. घटनेत नागरिकांचे कर्तव्य सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला यामुळे आपण जाहीर सोडचिठ्ठी देतो, याचे त्यांना सोयरसुतक नसते. कथित चमत्काराने निर्माण झालेला मास हिस्टेरिया हा माहिती व तंत्रज्ञानाच्या स्फोटाचे २१ वे शतक, जगातील चौथ्या क्रमांकाचे विज्ञान-तंत्रज्ञान बळ असलेला भारत, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारसा, क्षणोक्षणी प्रगत विज्ञानाच्या तालावर जगणारे मुंबई महानगर या सर्वांना कमीपणा आणतो, हे समाजमानसाला जाणवतच नाही. शासन व समाजधुरिणही याकडे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, रोगराई न पसरणे याच मर्यादेत पाहतात. व्यापक दृष्टिकोन काय सांगतो?विश्वकोषाने चमत्काराची व्याख्या अशी केली आहे, निसर्गाचा कार्यकारणभाव ज्या घटनांना लागू पडत नाही, अशा घटनांना अद्भुत म्हणतात. वैज्ञानिक दृष्टिकोनांद्वारे ज्या घटनांची उपपत्ती लागत नाही, त्यांना चमत्कार म्हणतात. चमत्काराचा पसारा खूप मोठा व प्राचीन आहे. जगातील सर्वच धर्मग्रंथांत किंवा धर्माच्या इतिहासात त्याची असंख्य उदाहरणे खच्चून भरलेली आहेत. व्रतवैकल्ये हे खरे तर उपासनेचे मार्ग; परंतु त्यांनाही प्रभावीपणे चमत्कार चिकटवलेले आहेत. शिर्डीचे साईबाबा अथवा शेगावचे गजानन महाराज यांच्या नावावर ढीगभर चमत्कार जमा आहेत. त्याचा तपास करणे आजही शक्य नाही आणि त्यांच्या श्रद्धाळू भक्तांना याबाबत ब्र उच्चारलेला चालत नाही. येशूच्या प्रार्थनेने रोग बरे होतात किंवा मकबूल बाबा अथवा अशाच दर्गाहच्या पिरांच्या कृपाप्रसादानं घडणारे चमत्कार सांगणारे जागोजाग भेटत असतात. बुद्धाच्या एका शिष्याने चमत्कार करून भिक्षापात्र तयार केले, ते बुद्धाने फोडून टाकले आणि शिष्यांना निक्षून सांगितले की, ‘त्यांनी कधीही चमत्कार करता कामा नयेत. पण आजही चमत्कार हे बुवाबाजीचे, तथाकथित दैवीशक्तीच्या सामर्थ्याचे आणि त्यातून मानसिक गुलामगिरी निर्माण करू इच्छिणाऱ्यांचे मोठे हत्यार आहे. चमत्कारापुढे त्याची सत्यता तपासण्यास कधीच उत्सुक नसलेला भक्तगण सदैव माथा टेकून उभा असतो. या विश्वाच्या निर्मिकाची लीला अगाध आहे, त्याच्या अथांग सामर्थ्यापुढे विज्ञानाचे सारे नियम किस झाड की पत्ती ठरतात, अशी त्या बहुसंख्यांची खात्रीच असते. माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, ज्यांना सरळ-सरळ भिडण्याची ताकद फारच थोड्यांकडे असते. या प्रश्नांची उत्तरे चमत्कार घडून मिळावीत, अशी त्यांची मनोमन इच्छा असते. या फॅन्टसीच्या आधारे जगणे ही माणसाच्या जगण्याची एक पद्धत आहे. ज्ञात कार्यकारणाच्या पलिकडे जाणाऱ्या निसर्गाच्या आणि मनाच्या शक्तीवर बहुतेकांची श्रद्धा असते. विज्ञानाचे काही नियम त्यांना माहीत असतात; परंतु त्याचे उपनियम, सूक्ष्मता, आवाका आणि वैविध्य यांची माहिती नसते, नियमांचे अपवाद तर ठाऊकच नसतात. अज्ञात असणाऱ्या या गोष्टी चमत्काराला जन्म घालतात.वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव; चमत्कार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. हे नाते प्रकाश-अंधारासारखे आहे. एकाचे असणे म्हणजेच अपरिहार्यपणे दुसऱ्याचे नसणे. विज्ञानात चमत्कार नसतातच. चमत्कार म्हणजे रासायनिक, भौतिक, यांत्रिक करामत असते अथवा हातचलाखी असते. बदमाषीही असू शकते आणि प्रसंगी निसर्गाचे अजून न उलगडलेले एखादे कोडेही चमत्कारात जमा होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जीवन स्वीकारणे, याचा अर्थ हे अज्ञान, कार्यकारणभाव आज वा उद्या वैज्ञानिक विचारपद्धतीनेच समजतील, यावरचा विश्वास. आपण विज्ञानाची करणी घेतली; परंतु विचारसरणी दूर ठेवली. त्यामुळेच विसंगती जन्माला येतात. चमत्कारांना आव्हान देणे, खोटे ठरवणे याबाबतची भूमिका नीटपणे समजून घ्यावयास हवी. प्रत्येक व्यक्तीला घटनेने उपासना, पारलौकिक जीवन, अध्यात्मिक कल्याण याचे स्वातंत्र्य दिले आहे, याचा आदर करावयास हवा; परंतु चमत्कारावर विश्वास ठेवणे, त्याच्या तपासास नकार देणे आणि अशा चमत्कारांचा प्रसार करत राहणे, हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन या कर्तव्याशी तो विसंगत ठरतोच; परंतु व्यक्ती व समाज यांचा बुद्धी-श्रम-वेळ-पैसा वाया घालवतो. चमत्कारातून गूढतेचे वातावरण निर्माण होते; प्रश्नाची खरी सोडवणूक करण्याचे माणसाचे भान हरपते.असाच एक धक्का गणेशमूर्तीच्या दुग्धप्राशनाने १९९५ मध्ये बसलेला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांची व्यक्तिगत पत्रे मिळवून ती महाराष्ट्र अंनिसने तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना पाठवली होती. मजकूर थोडक्यात असा होता - ‘‘ता. २१ सप्टेंबर रोजी भारतभर देवादिकांच्या मूर्तींचा दुग्धप्राशनाचा कथित चमत्कार घडला आणि थोड्याच वेळात सर्व देशात गोंधळाचे वातावरण तयार झाले. हा सर्व योजनाबद्ध बनाव होता, असे मला वाटते. लोकांचा वेळ-श्रम-पैसा आणि विवेक यांचा त्यात बळी गेला, ही गंभीर बाब आहे. यासाठी सी.बी.आय.मार्फत या सर्व प्रकाराची चौकशी करावी.’’ अशी पत्रे लिहिणाऱ्यांमध्ये जयंत नारळीकर, वसंत गोवारीकर, पु. ल. देशपांडे, श्रीराम लागू, निळू फुले, जयवंतराव टिळक, मोहन धारिया, ग. प्र. प्रधान, बाबा आढाव आदींचा समावेश होता. पंतप्रधान कार्यालयाकडून एका ओळीचेही उत्तर आले नाही. ही घटना घडली त्यावेळी ओरिसाचे मुख्यमंत्री असलेल्या जे. बी. पटनाईक यांनी मंदिरे बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला; प्रसंगी पुजाऱ्यांना अटक करण्यास सांगितले. कर्नाटकच्या विधानसभेतच मुख्यमंत्री देवेगौडा यांनी या गोष्टीचा इन्कार करून मंदिरातील गर्दी हटविण्याचे आदेश दिले. अशा स्वरुपाची कोणतीही तत्परता व तडफ पाणी गोड होण्याच्या प्रकाराबाबत महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाकडून दाखविली गेल्याचे दिसले नाही.भारतीय समाज सहज भीतिग्रस्त बनतो. दैववादी मनोवृत्तीमुळे आलेली संकटे ही नशिबाचेच भोग आहेत, असे मानतो. समस्यांचा खंबीर व निर्भयपणे मुकाबला करण्याऐवजी, दैवीशक्ती लाभलेला एखादा बुवा अथवा एखादे धार्मिक स्थळ अडचणींतून आपल्याला अलगद बाहेर काढेल, असे बहुसंख्यांना वाटते. ही विचारसरणी बाळगणारा समाज नेहमीच स्वाभिमानशून्य, पळपुटा, भ्याड वृत्तीचा आणि बुद्धी गहाण टाकणारा असतो. स्वाभिमानी, प्रयत्नवादी व निर्भय समाज बनवण्यासाठी चमत्काराला विरोध आवश्यक असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन असे मानतो, की हे विश्व स्वायत्तपणे अस्तित्वात आहे. कोणत्याही चांगल्या वा वाईट शक्तीच्या उपासनेने आपोआप काहीही चांगले-वाईट घडत नाही. घटना या कार्यकारणभावाप्रमाणेच घडतात आणि आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा हाच सर्वात खात्रीचा व प्रभावी मार्ग आहे.

     

माणसाचे सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे बुद्धी; मानवी संस्कृतीचा सारा विकास हा मानवी प्रज्ञेच्या विकासाशी निगडित आहे. बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन, ही शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती प्रतिज्ञा विसरून गेल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. कोणतीही शंका उपस्थित न करता, चमत्काराला सत्य मानून शरण जाणे, ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते. माणसे सहजासहजी सैरभैर का होतात, याचे एक व्यापक स्पष्टीकरण दिले जाते. ते असे की, समाजजीवनातील अनेकांगी शोषण, अगतिकता, चंगळवाद यामुळे मोडकळीस आलेले मन अशा मूर्खपणावर सहज विश्वास ठेवते. याचा अर्थ सर्वंकष समतावादी समाजपरिवर्तन होईपर्यंत हे असेच चालणार, या प्रतिपादनामध्ये तथ्यांश आहे; परंतु संपूर्ण समाजपरिवर्तनाचा दिवस येईपर्यंत फसवणुकीचा ताबडतोब प्रतिकार हे सूत्र दूर ठेवण्याची गरज नाही. दूरवरच्या उद्दिष्टांचे भान हवेच; पण शोषणाशी सत्वर संघर्षही हवा. चमत्कारांना शरण गेलेले मन या संघर्षासाठी उठू शकत नाही. माणसाच्या हात-पायात बेड्या असल्या आणि त्याला त्याबद्दल राग येत असला तर त्याला सांगता येते, ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या.’ पण या बेड्यांनाच माणसे फुलं-गजरे समजू लागली तर निर्माण होणारी मानसिक गुलामगिरीविरुद्धची झुंज अवघड बनते. मानसिक गुलामगिरीची सर्वांत भयानकता ही की, त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही; मग पटणे तर दूरच राहिले. चमत्कार हे माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करतात व मानसिक गुलामगिरीचे हत्यार बनतात. माणसाचा पुरुषार्थच मग नाहीसा होतो व चमत्कार करणाऱ्या त्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या हाती स्वत:ला सोपवून तो मोकळा होतो. व्यक्तीचे बुद्धिवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचार करण्याची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे गहाण पडतात, व्यक्ती परतंत्र बनते.

     

चमत्काराला सत्य मानणे ही त्याची सुरुवात बनते. चमत्कार खोटे असतातच; परंतु परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या मानसिकतेच्या मुळावरच ते येतात. हे अधिक धोकादायक असते. परिवर्तनाची लढाई मग स्वाभाविकच अधिक अवघड बनते. म्हणूनच जनमानस शोधक, निर्भय व कृतिशील बनून ते व्यापक परिवर्तनाच्या चळवळीसाठी तयार करावयास हवे. यासाठी असा संकल्प करावयास हवा की, ‘मी स्वत:वरचा विश्वास गमावणार नाही आणि चमत्कारावर विश्वास ठेवण्यासारख्या पळपुटेपणाच्या मार्गाचा आधार घेणार नाही. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धैर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत:चे प्रश्न काय आहेत व ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात, याचे भान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद यांचा वापर करून येते.

     

खरी गरज असते जीवनाच्या रणधुमाळीत लढण्याची हिंमत व ताकद कमविण्याची, त्याला चमत्कार उपयोगी नाहीतच; उलट चमत्कारावरील श्रद्धा व्यक्तीच्या कर्तृत्वाला पांगळेपण देणारी ठरते. स्वत:ला सजग, समर्थ, डोळस बनविण्यासाठी स्वत:च्या विवेकबुद्धीच्या रूपाने एक गुरू प्रत्येकाजवळ असतोच असतो. त्याच्यापासून पाथेय घेऊन वाटचाल करणे, यातच व्यक्तीच्या जीवनाची सार्थकता आणि निकोप समाजधारणेची शक्यता आहे!

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(सप्टेंबर २००३)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...