गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

आश्वासक


आश्वासक
दाभोलकर, अनुभव  

           


स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र आणि चांगल्या प्रकारे झाला. धावपळ होती, त्यामुळे दौरे गाडीने झाले. तो खर्च वाढलाच. आझाद मैदानावर कार्यक्रम घ्यावयाचा म्हणजे मंडप, माईक, खुर्च्या, स्टेज असा सगळा जामानिमा लागतो. त्याचा खर्च असतोच. कार्यकर्ते कुठून-कुठून येतात. त्यांच्या अल्पोपहाराचा, भोजनाचा खर्च ही स्वाभाविक गरज असते; शिवाय अनेक छोटे-मोठे खर्च असतात. या सगळ्यांचा आकडा जवळजवळ २५ हजारांपर्यंत गेला. संघटनेचे पैसे खर्च करताना शक्यतो खर्च न करायला लागले तर बरे, असे मला सारखे वाटत असते. अर्थात, चळवळीची गरज असते. पैसे खर्च करावे लागतातच. हे सगळे लिहिण्याचा मुद्दा मात्र वेगळाच आहे. मुंबईतील सर्व कार्यक्रम संपवून मी पुण्याला आलो. सकाळी साधना साप्ताहिकाच्या माझ्या कार्यालयात गेलो. एक पत्र माझी वाट पाहत होते. पत्र होते भारतीय प्रशासन सेवेतील जिल्हाधिकारी पातळीवरच्या एका निवृत्त व्यक्तीचे. त्यांचे नाव सदाशिव कुलकर्णी. त्यांनी लिहिले होते, समितीचे काम महत्त्वाचे आहे, उपयुक्त आहे. अशा कामाला आर्थिक सहाय्य लागतेच, यासाठी रु. १५ हजारांचा चेक सोबत पाठवत आहे. सातारला पोचलो. तोपर्यंत मुंबईच्या कार्यकर्त्यांतर्फे नंदकिशोर तळाशिलकरांच्या मार्फत निरोप मिळाला. आंदोलनाच्या वेळी झालेला अल्पोपहार, भोजन यांचा सर्व खर्च उचलण्याचे मुंबई जिल्ह्याने ठरवले आहे. आणखी काही दिवस गेले. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. आर. जहागिरदार यांच्याकडून १० हजार रुपयांची देणगी आली आणि हे सगळे कमीच ठरावे, असा आणखी एक प्रकार घडला. १२ एप्रिलला सातारा जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक व कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होता. त्यावेळेला कराडहून शिवप्रसाद मांगले भेटावयास आले. सोबत पत्नीला आणि कन्येला घेऊन आले. येण्याचे कारण त्यांनी सांगितले - मागच्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले होते आणि तिचा पहिला श्राद्धदिन याच महिन्यात येत होता. पती-पत्नी उभयतांनी असे ठरवले होते की, श्राद्धाचा कोणताही विधी न करता ते पैसे एका सामाजिक कार्यासाठी द्यावयाचे आणि ते सामाजिक काम म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची निवड केली होती आणि त्याचा १० हजार रुपयांचा चेक देण्यासाठी ते आले होते. हा संस्कार आपल्या मुलीवरही व्हावा आणि हा विचार तिच्यापर्यंत पोचावा, यासाठी नववीतील मुलीची दुसऱ्या दिवशी परीक्षा असतानाही तिला घेऊन आले होते. मांगले शेती खात्यामध्ये नोकरी करतात. अवघ्या एका महिन्यातील या चार घटना. यापैकी कोणालाही मी पैसे मागितले नव्हते. एक-दोघांशी तर ओळखही नव्हती. असे असतानाही ज्या प्रेमाने, मन:पूर्वकतेने व विश्वासाने त्यांनी समितीच्या कामाला देणगी दिली, ती मला फार आश्वासक वाटली. कामावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच अवघ्या महिनाभरात उत्स्फूर्तपणे घडलेल्या या चार घटना आश्वासक वाटतील, असा विश्वास वाटतो.



संचित

दौऱ्यावर होतो. कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. त्या गावातील कार्यकर्ते असलेले उत्साही पती-पत्नी नेहमीप्रमाणे सोबत होतेच. कार्यक्रम संपल्यावर इकडच्या-तिकडच्या गप्पा निघाल्या. कार्यकर्ते आई-वडील काळजीच्या सुरात मला म्हणाले, ‘डॉक्टर, कधीतरी आमच्या मुलाशी बोला. सध्या नको. त्याची परीक्षा सुरू आहे. पण सवडीने नक्की बोलाच. मुद्दा असा होता की, आई-वडील दोघेही चळवळीतल्या प्रभावातले. विचाराला पक्के. शक्यतेनुसार सर्व ती धडपड करणारे. जमेल तेवढे जास्तीत जास्त झोकून देऊन काम करणारे. मुलगा तारुण्याच्या उंबरठ्यावर. विचाराने तसा नास्तिक. स्वाभाविकपणे आई-वडिलांनी असे गृहीतच धरले की, तो आपल्या कामात हात मिळवणार. मुलाने नकार दिला. तो म्हणाला, ‘हे काम कशाला करायचे? करून फायदा काय? समाजाचे वाईटपण कशाला घ्यायचे वगैरे वगैरे. मुलाचे आणि माझे बोलणे झाले नाही आणि आई-वडिलांशी झाले, तेही मोजकेच. त्यामुळे मला अधिक काही कळले नाही; पण त्या मुलाच्या मनात आणि त्याच्याच कशाला, कदाचित समितीच्या कार्यकर्त्यांपैकी, सहानुभूतीदारांपैकी अनेकांच्या तरुण मुलांच्या मनात हा प्रश्न येत असेल. प्रश्न अगदी थेट आहे. तो असा की, चळवळीच्या या उठाठेवी करून भौतिक किंवा लौकिक फायदा काय? याने चार पैसे जास्त मिळत नाहीत; उलट स्वत: जवळचे पैसेच खर्च करावे लागतात. काम समाजातील विचारप्रवाहाच्या विरोधी पोहण्याचे. त्यामुळे दमछाक होते; शिवाय समाजाच्या रोषाचे बळी व्हावयास लागण्याची शक्यता असते. स्वत:ची मौज-मजा यावर बंधने येतात. एवढे सगळे करून समाज बदलत नाहीच म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. मग कोणी सांगितली ही उठाठेव करायला? त्यापेक्षा मस्त मजेत जगावे, सर्व उपायांनी अधिकाधिक पैसे मिळवावेत, उपभोग घ्यावेत. कोणाला त्रास दिला नाही म्हणजे झाले. हे करून वेळ उरला तर समाजाला रुचेल, पटेल, पचेल असे सामाजिक काम करावे. या विचाराचा प्रतिवाद करता येतो आणि करायलाच हवा. परंतु वाचकांना काय वाटते, कार्यकर्त्याच्या त्या मुलाला काय सांगावयास हवे, कसे पटवावयास हवे, हे वाचकांकडून समजून घेण्यास मी उत्सुक आहे, जरूर कळवावे. पुढच्या अंकात त्यावर लिहिताना त्यातील काही मुद्दे सर्वांच्या समोर मांडायला मला आवडेल.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(मे २००५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...