शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

चमत्कार सादरीकरण प्रभावी हवे

चमत्कार सादरीकरण प्रभावी हवे
दाभोलकर, चमत्कार, प्रभाव



अलिबागला गेलो होतो. सायंकाळी जाहीर व्याख्यान होते. त्याआधी दुपारी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या समवेत चर्चा झाली. जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी गेली २० वर्षे सातत्याने क्रियाशील राहून जिल्ह्यात चळवळ रुजवली आहे. मुख्य उपक्रम चमत्कारांचे सादरीकरण व भाषण. २० वर्षांत किती भाषणे दिली असतील व चमत्कार केले असतील, याची मोजदादच नाही. त्यांचे प्रतिपादन असे होते की, ‘आम्ही चमत्कार करतो, भाषणे देतो, लोकांनाही कमी-जास्त प्रमाणात ती आवडतात. पण आम्हाला आता असे वाटते की, तेच-तेच चमत्कार आणि तीच-तीच भाषणे देऊन आता काहीसा कंटाळा येतो आहे. यावर उपाय काय?’ हा प्रश्न प्रातिनिधिक मानावयास हवा. आपले अनेक प्रमुख कार्यकर्ते चमत्कारांचे सादरीकरण आणि त्यासोबत तेच-तेच भाषण देत असतात. श्रोतृ वर्ग वेगळा असतो. त्यामुळे श्रोत्यांना कदाचित ते चमत्कार व ते व्याख्यान आवडतही असेल; परंतु कार्यकर्त्याला त्याचा आनंद घेता येत नसेल तर..? तरीही आता कंटाळलो बुवा चमत्कार करून, पुरे झाले, आता इतरांनी; ज्यांना हे प्रयोग करावयाचे असतील त्यांनी करावेत,’ असा विचार कार्यकर्त्याने करणे चूक आहे. चमत्कार सादरीकरण हे चळवळीचे प्रभावी हत्यार आहे. चळवळवाढीची अत्यंत गरज आहे. अशा वेळी आपले प्रभावी हत्यार म्यान करण्यात काहीच शहाणपणा नाही. पण मग करायचे काय? त्याच कंटाळवाण्या पाट्या परत-परत टाकत राहावयाच्या काय? याचे खरे उत्तर असे आहे की, आहे या परिस्थितीतही अनेक सुधारणा निश्चितपणे शक्य आहेत की, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढेल आणि स्वाभाविकच सादर करणाऱ्याचाही उत्साह वाढेल. यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे :



१) अनेक वेळा तेच-तेच चमत्कार सादर केले जातात. कारण नवे चमत्कार शिकण्याची वृत्ती दाखवली जात नाही. समितीच्या प्रकाशनात अनेक चमत्कार आहेत. त्यातील काही ना काही चमत्कारांची भर स्वत:च्या कार्यक्रमात कार्यकर्ता घालत राहिल्यास त्याला ही भावना येणार नाही.



२) सर्वच चमत्कार बुवाबाजीविरोधाचे असण्याची गरज नाही. विज्ञानाच्या नियमावर आधारित अनेक चमत्कार आता तयार विकत मिळतात. ते खरे तर रंजक विज्ञान प्रयोग असतात. त्यापैकी काही प्रयोगांचा सराव करून त्याचा समावेश चमत्कार सादरीकरणाच्या कार्यक्रमात करावा.

३) काही प्रयोग चक्क जादूचे असतात; परंतु थोड्या कल्पकतेने त्याला बुवाबाजी चमत्काराचे रूप देता येते. असे प्रयोग हुडकावेत.



४) राज्यातील वेगवेगळ्या शाखेतील कार्यकर्ते काही निराळे चमत्कार करत असतात, ते मिळवावेत.



५) चमत्कार सादरीकरणाएवढेच त्या समवेत द्यावयाचे भाषणदेखील महत्त्वाचे असते. हे भाषण तेच-तेच करणे हा निव्वळ आळसाचा प्रकार आहे. तीन प्रकारच्या समावेशाने भाषण एकाच वेळी रंजक व उद्बोधक बनू शकते. त्या बाबी अशा

·         वैज्ञानिक दृष्टिकोन,

·         बुवाबाजी, भूत, भानामती या विरोधातील वैचारिक मुद्दे,

·         चळवळीचे किस्से.

या तिन्ही बाबतीत भरपूर तपशील चळवळीत उपलब्ध आहे. त्यापैकी फारच थोडा भाषणात वापरावयास मिळतो. स्वाभाविकच वेगवेगळ्या भाषणात वेगवेगळे मुद्दे येतात आणि त्यामुळे भाषण देणाऱ्याला कंटाळा येण्याचा प्रश्नच येत नाही.



६) चमत्कारांची खरी शक्ती ही सादरीकरणाच्या कौशल्यावर अवलंबून असते. याबाबत मला असे स्पष्ट जाणवते की, सुधारणेला प्रचंड संधी आहे. चमत्काराची परिणामकारकता ही बहुसंख्य प्रमाणात सादरीकरणाच्या क्षमतेवर अवलंबून असते. यासंदर्भात कार्यकर्ते अजिबात लवचिकता दाखवत नाहीत. चमत्कार तोच असतो; परंतु वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळे कार्यकर्ते, विविध प्रकारे चमत्कार सादर करून रंगत आणत असतात. याबाबत एक स्टॅण्डर्ड यशस्वी फॉर्म्युला ही समितीच्या चमत्कार सादरीकरणाची संहिता या कुमार मंडपे व प्रशांत पोतदार लिखित पुस्तकात आहे. तोच वापरावयास हवा, असा आग्रह नाही; परंतु तो पुरेसा परिणामकारक आहे, हे सिद्ध झाले आहे आणि बहुसंख्य ठिकाणी तेवढीही परिणामकारकता सादरीकरणात साधली जात नाही. अर्थातच तो काही शेवटचा शब्द नाही. आपले सादरीकरण इतरांच्या सूचनांनी, मदतीने, अनुभवांनी, परीक्षणांनी सतत सुधारत ठेवावयास हवे. असे झाले तर चमत्कार सादरीकरण हे व्यावसायिक तोडीचे होऊ लागते आणि स्वाभाविकच त्यातील स्वत:ची आणि इतरांची रूचीही वाढते. याबाबत जे कार्यकर्ते चमत्कार सादरीकरणाचे कार्यक्रम करतात, त्यांच्या सूचनांचे संघटनेला अगत्य आहे. त्यांनी जरूर त्यांचे अनुभव मला कळवावेत. या टिपणात नक्कीच त्यांची भर घालून आपण संघटनेचे हे हत्यार अधिक परिणामकारक व अधिक प्रभावी करू शकू.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(जून २००९)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...