शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

अंनिसच्या दोन बँकांचा प्रस्ताव

अंनिसच्या दोन बँकांचा प्रस्ताव
दाभोलकर, संघटन, अनुभव 



संघटनेतर्फे दोन बँका काढण्याच्या विचारात आहे. वरील वाक्य वाचल्यानंतर चळवळीचे कार्यकर्ते, हितचिंतक नक्कीच विचारात पडणार. चळवळ करणे, प्रबोधन करणे हेच ज्यांचे काम, त्या संघटनेत हा भलताच (कु) विचार कठून आला? आणि कशासाठी? असे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनावर उमटले असणार.

बँक काय करते?
ठेवीदारांना आधार देते. पैसे आपलेच असतात; पण सुरक्षित राहतात, वाढतात. ठेवीदाराला हवे त्या वेळी, हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होतात.
     
संघटनेच्या बँका कशाच्या? एक कार्यकर्त्यांच्या क्षमतेच्या व वेळाच्या. दुसऱ्या आर्थिक सहकार्याच्या.

थोडे अधिक स्पष्ट करतो म्हणजे नेमकेपणाने समजेल. समितीच्या क्रियाशील सभासदत्वाचा एक निकष आहे की, त्याने स्वत:च्या वार्षिक उत्पन्नाचा अर्धा टक्का अथवा २५० रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती वार्षिक देणगी वा सभासदत्वाची फी म्हणून स्थानिक शाखेला द्यावी. माझ्या कल्पनेप्रमाणे हा निकष अत्यंत अपवादानेच शाखा, क्रियाशील कार्यकर्ते पाळतात. मग शाखेचा आर्थिक भार निघतो कसा? काही ठिकाणी शाखेने मिळवलेल्या जाहिरातीच्या रकमेच्या दहा टक्के मिळतात, काही ठिकाणी व्याख्यानांचे मानधन येते. कार्यकर्ते स्वत:च्या खिशातून बिनबोभाट खर्च करतात, तर काही वेळा स्वयंअध्ययन प्रकल्प मदतीला धावतो. हे सर्व चांगलेच आहे. पण एका अर्थाने परावलंबी आहे. जाहिरात देणारे, भाषणाला बोलावणारे, स्वयंअध्ययन प्रश्नपत्रिका घेणारे, हे सर्व बाहेरचे असतात. प्रतिकूल परिस्थितीत हा आधार तुटू शकतो. कार्यकर्ता स्वत: खर्च करतो, हे उत्तमच; पण तेही प्रकल्प, चळवळ निघाली तरच खर्च, अशा स्वरुपात होतो.
प्रकाश डब्बावारांचे खालील पत्र वाचावे -

प्रिय डॉ. दाभोलकर यांना,
प्रकाश डब्बावार यांचा स.न.
कार्यकर्ता काय नाही करू शकत, असा प्रतिप्रश्न मी कार्यकर्त्याला करतो. कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्याने मनावर घेतले तर अशक्य कार्य शक्य करू शकतो. उदा. माझे विद्युत मंडळ कार्यालय यवतमाळ येथे बस स्टँडजवळ आहे. मला रोज दुपारी दीड ते दोन विश्रांतीसाठी वेळ असते. त्या वेळेत मी बसस्टँडवर अंनिवाचे जुने अंक केवळ अर्ध्या तासात अल्प किमतीमध्ये (५० रुपयांचे) विकतो. कधी-कधी अंक विकले गेले नाही तर ओळख होते. यावर थोडीफार चर्चा होते, चमत्कार सादरीकरणाची तारीख मिळते. तसेच नवीन कार्यकर्ता पण मिळतो. भूत-भानामती-जादूटोणा-करणी कशी काय होते, जगात भूत आहे की नाही, नरबळी का दिला जातो, कर्मकांड कसे निरर्थक, हे सर्व प्रश्न या मासिकात वाचावयास मिळेल,’ असे म्हणून सुरूवात करतो. आपण वाचा, मित्रमंडळीला वाचावयास द्या किंवा जवळच्या वाचनालयाला भेट द्या. आपले ५-१० रुपये कोठे जात नाहीत,’ असे नंतर म्हणतो व शेवटी ऐकले तर हे बघा मी इलेक्ट्रिकल ऑफीसमध्ये बडे बाबू आहोत. मला २५ हजार रुपये पगार मिळतो. समाजकार्याचा एक भाग म्हणून मी तुमच्या समोर आलो आहे. या मासिकांचा प्रचार व्हावा व जनप्रबोधन व्हावे’, हाच मुख्य हेतू यामागे आहे.

आपणास बसस्टँडवर शक्य नसेल, तर लाईनमध्ये (क्यू) तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती किंवा कोणत्याही सरकारी, निमसरकारी कार्यालयात विकू शकता. प्रवासात एस.टी. किंवा रेल्वेमध्ये पण विकू शकता. तसेच रविवारी सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान ओळखीच्या घरी किंवा अपार्टमेंटमध्ये जाऊन चर्चा करून विकू शकता किंवा वर्गणीदार नोंदवू शकता. मनात लपलेली लाज काढून टाका. आपण चोरी, लबाडी करीत नाही; एक चांगलं समाजकार्य करीत आहोत, हे लक्षात ठेवा व प्रयत्न तर करून बघा.

नुकतीच ऑगस्ट ०९ च्या अं.नि.वा.मध्ये कार्याध्यक्षांची डायरी वाचली. स्व-मूल्यांकन केले आणि थोडा इतरांचा (नातेवाईक-शेजारी व अनेक) विचार केला की, धार्मिक लोक अज्ञानामुळे धार्मिकतेवर भरमसाठ खर्च करतात; वेळप्रसंगी कर्ज काढतात व नवस फेडतात. महालक्ष्मीचे (गणपती उत्सवा दरम्यान) जेवण द्यावयाला कमीत-कमी ५००० रुपये दरवर्षी लागतात. मी तर कोणतेच धार्मिक विधी करीत नाही किंवा देव मानत नाही; मग असाच खर्च समजून समितीला १० हजार रुपयांची देणगी दिली. मला समितीला अजून देणे बाकी आहे, हे पार विसरूनच गेलो होतो. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर व नीताताई सावंत, चाळीसगाव यांनी ऑगस्ट २००९ च्या अंकातून आठवण करून दिली, याबद्दल आभारी आहोत. तरी कार्यकर्त्यांस नम्र विनंती की, आपण पण स्व-मूल्यांकन करावे.

आपला,
प्रकाश डब्बावार, यवतमाळ
     
अशाच प्रवृत्तीची आणखी दोन नावे म्हणजे मल्हारपेठचे डॉ. वनारसे पती-पत्नी. परवाच त्यांचे २१ हजार रुपये आले. त्यांनी संघटनेला आजपर्यंत दिलेल्या देणगीचा आकडा आता लाखाच्या घरात पोचला असेल. पुण्याच्या अनंत लिमयेंना कोणतेच व्यसन नाही. पण संघटनेला पैसे देण्याचे व्यसन त्यांना असावे. पुन्हा यापैकी कोणालाही एका शब्दाचा गाजावाजा आवडत नाही, हे त्यांचे मोठेपण. मला असे दिसते की, आज संघटनेत एक वर्ग निश्चितपणे असा आहे की, वर्षाला जो हजार वा त्या पटीत संघटनेला पैसे देऊ शकतो. ते स्थानिक शाखेला द्यावेत वा मध्यवर्तीला. परंतु त्यामुळे असा विश्वास संघटनेत उभा राहतो की, भले प्रतिकुलतेची वादळे येवोत; पण आपली नाव भरभक्कम आहे. ज्या-ज्या संघटना ध्येयवादावर उभ्या राहतात, त्यांच्यासाठी हे नवीन नाही. कम्युनिस्ट या देणगीला लेव्ही म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला गुरुदक्षिणा म्हणतो. गुरुदक्षिणा तर गुप्त असते. इदं न मम म्हणून देऊन टाकायची. प्रवास, फोन, स्टेशनरी असले छोटे-मोठे खर्च तर कार्यकर्ते स्वत: करतातच; त्यापलिकडची आपली बांधिलकी म्हणजे लेव्ही अथवा गुरुदक्षिणा. ज्या संघटनांना असे आतून उचंबळलेले जिव्हाळ्याचे झरे लाभतात, त्या संघटना प्रतिकुलतेवर मात करत झुंजतात. कारण त्यांच्या बँकेवर हक्काची शिल्लक साठलेली असते. कार्यकर्त्यांनी आणि ज्यांना-ज्यांना असे काम उभे राहावे वाटते, त्या हितचिंतकांनी गांभीर्याने संघटनेच्या अशा बँकेत आपले खाते उघडण्याचा विचार करावा.
     
दुसरी बँक त्याहीपेक्षा गरजेची. संघटनेसाठी द्यावयाच्या वेळेची आणि क्षमतांची. खरे तर आज ती सुरू आहेच; पण असंघटित स्वरूपात. ती कल्पना मला सुचली. मकबूल गवंडी, जत यांच्या मागील वार्तापत्रातील निवेदनावरून मकबूल गवंडी यांनी काहीशी मुदतपूर्व निवृत्ती घेतली आणि सर्व वेळ ‘अंनिस’ला देण्याचे जाहीर केले. गेल्या वर्षभरात अशा आणखी दोन घटना घडल्या. मिलिंद देशमुख, पुणे व शहाजी भोसले, औरंगाबाद यांना निवृत्तीआधी बरेच दिवस सक्तीची स्वेच्छानिवृत्ती पत्करावी लागली. पर्यायी नोकरीच्या शोधात जाण्याऐवजी त्यांनी समितीचे कार्य करण्याचा निर्णय घेतला. शहाजी भोसलेंमुळे औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील कामाला अधिक उठाव मिळाला. मिलिंद देशमुखांमुळे पुणे शहर शाखा उत्तम प्रकारे रांकेला लागली. संघटनात्मक शिबिरात त्याचा चांगला उपयोग झाला. शहाजी भोसले तर चमत्कारांचे सादरीकरण व्यावसायिक दर्जाचे करतो. या सहकाऱ्यांकडे वेग आहे, क्षमताही आहे. अशीच आणखी दोन नावे म्हणजे प्रा. प. रा. आर्डे व श्रीमती सुमन ओक. आर्डे सर यशस्वीपणे वार्तापत्र सांभाळत आहेत; तर श्रीमती सुमन ओक मराठीचे इंग्लिश व इंग्लिशचे मराठी भाषांतर उत्तम आणि सत्वर करून देतात. आमच्याकडे एवढा वेळ आहे, या क्षमता आहेत आणि या स्वरुपाच्या कामाची इच्छा आहे. असे अनेक जण असणार. त्यांनी या बँकेत खाते उघडावे (म्हणजे मला कळवावे) बँकेतील पैसे गरजेनुसार काढतो, तसे या सर्वांचा वेळ आणि क्षमता संघटनेच्या गरजेला हुकमी पद्धतीने उपयोगात आणता येतील.
     
आजचे जग आहे व्यवस्थापनाचे, नियोजनाचे व स्वावलंबनाचे. या दोन्ही बँका आपण समृद्ध केल्या तर संघटनेचा पाया अधिक मजबूतपणे विस्तारला जाईल. 
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर २००९)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...