रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

कॅच देम यंग

कॅच देम यंग
दाभोलकर, तरुण पिढी
      

शरद पवार यांनी आपल्यावरील मंत्रिपदाचा भार कमी करण्यासाठी पंतप्रधानांना केलेल्या विनंतीची बातमी अनेकांनी वाचली असणार. त्यातील राजकीय आशय जो काढावयाचा असेल, तो काढला जाईलच; परंतु स्वत: पवार यांनी त्यासाठी दिलेले कारण हे कोणत्याही चळवळीला गंभीरपणे विचारात घेण्यासारखे आहे, असे मला वाटते. शरद पवार यांनी दिलेले कारण असे की, पक्षाच्या संघटनेकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ पाहिजे आहे. पुढे त्यांनी असेही सांगितले की, मंत्रिपदाच्या कामामुळे अनेक जिल्ह्यांत मला जाता येत नाही आणि तरुणांसोबत संवाद साधता येत नाही. तो साधण्याची माझी इच्छा आहे. शरद पवार यांच्या राजकारणाबाबत गंभीर मतभेद असणे स्वाभाविक आहे, आणि ते आहेतही. मात्र त्यांची राजकीय समज व दूरदृष्टी या गुणांवरच ते राजकारणात टिकून आहेत. त्यांनी मांडलेला विचार हा जरी पक्षीय राजकारणाच्या संदर्भातील असला, तरी कुठल्याही संघटनेला या तीनही बाबी लागू आहेत. पहिली म्हणजे संघटनेला यश, नावलौकिक, प्रसिद्धी, पुरस्कार वगैरे वगैरे लाभत असले, तरी या सर्वांची पायाभूत ताकद संघटना आहे, याची जाणीव ठेवून या बाबीकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये. दुसरे असे की, ज्या संघटनेची जबाबदारी पार पाडावयाची आहे, त्यांनी सतत लोकांना भेटत राहावयास हवे. हे भेटणे पत्र, ई-मेल, फोन या मार्गानेही चालेल; परंतु त्याबरोबरच संबंधित कार्यकर्त्याच्या गावी जाऊन त्याला भेटणे याला पर्याय नाही, याचेही भान बाळगावयास हवे; पण अर्थातच या दोन मुद्द्यांची चर्चा म्हणजे संघटनाबांधणीची चर्चा होईल आणि स्वाभाविकच अं. नि. वार्तापत्राचा बहुसंख्य वाचक हा कार्यकर्ता नसल्याने यापुढील मजकूर वाचणे सोडून देईल. त्यासाठी मला प्रामुख्याने भर द्यावयाचा आहे तो तिसऱ्या मुद्द्यावर. तो मुद्दा म्हणजे तरुणांच्या सोबत सतत संवाद साधण्याचा.
     
शरद पवारांना हा संवाद निश्चितच सोपा आहे. कारण यांच्याकडे सत्तेचे चुंबकत्व आहे. विचाराच्या आधारे समाज बदलू इच्छिणारे अंनिसचे कार्यकर्ते परिवर्तनाच्या विचारावर प्रेम करत असल्यामुळे हे मासिक वाचणारे वाचक यांच्या बाबतीत हा मुद्दा अधिकच महत्त्वाचा आहे. तो लक्षात आणून देणे, यासाठी हा लेखनप्रपंच.
     
समाज कृतीने बदलावा लागतो, हे खरेच; परंतु त्याची सुरुवात लोकांच्या मनात विचाराची पेरणी करूनच करावी लागते. कोणत्या भूमीत पेरले असता भरघोस पीक येईल, या निवडीचे शहाणपण बळीराजा दाखवतो. विचारांच्या निवडीबाबतही हेच म्हणता येईल. विचार पेरण्याची सर्वांत सोयीस्कर व किफायतशीर मनोभूमी ही तरुणांची किंवा किशोरवयीन मुलांचीच असते. एकतर त्यांचे मन तुलनेने अधिक कोरे, अधिक संवेदनशील, वयामुळे अधिक सजग व प्रतिसादक्षम असण्याची शक्यता असते; नव्हे असतेच, शिवाय त्यांना जो विचार पटेल, तो आयुष्यभर जोपासण्याची आणि जी चूक वाटेल त्यासाठी लढण्याची स्वाभाविक ऊर्मी तरुणांच्यात असते. धोक्याची बाब अशीही आहे की, प्रतिगामी शक्ती या तरुणांच्या आणि किशोरांच्या मनाचा ताबा घेण्यासाठी धडपडत असतात. त्यांना त्या बीजारोपणात त्यांच्या पुढील यशाचे आडाखे दिसत असतात. अशा वेळी तरुणांशी संवाद साधणे, ही बाब केवळ अंनिस कार्यकर्त्यांसाठी नाही, तर परिवर्तनावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रामाणिक व्यक्तीसाठी आवश्यक ठरते. हा संवाद साधताना निदान दोन गोष्टींचे भान बाळगावयास हवे. पहिली गोष्ट अशी की, आपल्याला केवळ समाजाचे काही भले करण्याचा संदेश वा विचार द्यावयाचा नाही. तसे असेल तर विधायक कामाची सरकारछाप एजन्सी असे स्वरूप या प्रयत्नाला येईल. परिवर्तनाचा पुरोगामी विचार, भले त्याची छटा कोणतीही असो; जे सूत्र मानते ते एका वाक्यात असे - आपल्या आजूबाजूच्या सर्व घटनांचा कार्यकारणभाव लावता येतो आणि प्रयत्नातून अनुकूलपणे बदलता येतो. माझ्या अलिकडील काळातील महाविद्यालयातील वा अन्यत्र ठिकाणच्या शेकडो व्याख्यानांचा अनुभव मला असे सांगतो की, परिवर्तन हे सूत्र बहुसंख्यांना माहीतच नसते. त्यामुळे मान्य असणे वा नसणे याचा संबंध येत नाही. अर्थातच हे सूत्र तरुणांपर्यंत पोचवावयाचे असेल, तर स्वत: त्याचा अभ्यास करणे व ती जीवनदृष्टी स्वीकारणे, हे महत्त्वाचे आहेच. मात्र हा फक्त पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की, सर्व प्रकारची साधने वापरून हा विचार तरुणांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाषण देणे वा चमत्कार करणे, यापेक्षा अन्य अनेक कल्पक मार्ग या संवादासाठी वापरता येणे शक्य आहे. ते तुम्हाला सहज सुचतील. स्वत:ची क्षमता व परिस्थितीची गरज लक्षात घेऊन स्वत:च्या विचारांची बीजे सतत चर्चेत राहतील, असा प्रयत्न करावयास हवा. उदा. जागतिक फुटबॉल सामन्यात जर्मनीच्या बलाढ्य संघाचा विजय होणार की पराजय, हे जर्मनीतील एका मत्स्यालयातील ऑक्टोपस’ अचूक सांगतो, ही बाब प्रचंड चर्चेची झाली होती. आता अशा घटनेची चर्चा करून नियती, दैव, भविष्य, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा अनेक बाबींच्या चर्चा गप्पा मारत-मारत तरुणांच्यांत घडवून आणता आल्या असत्या. हेही लक्षात ठेवावयास हवे की, तरुणाचा अर्थ केवळ कॉलेजातील विद्यार्थी नाही. आज आपल्या देशात १८ ते २३ वयोगटातील फक्त ९ टक्के विद्यार्थी कॉलेजात जातात. त्यामुळे त्यांच्या बाहेर पसरलेल्या तरुणाईच्या अथांग सागराशी संवाद साधण्याचे कौशल्य आपल्या प्रतिभेने निर्माण करावयास हवे. १३ ते १६ वयोगटातला किशोर छोट्या प्रमाणात शाळेत उपलब्ध आहे. त्यांच्याशी संवाद साधावयास हवा.
     
तुम्ही समितीचे कार्यकर्ते असा वा नसा; किशोर व युवक यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलनाचा किंवा परिर्वतनवादी कोणत्याही विचाराचा संवाद साधण्याचा जो प्रयत्न कराल, त्याचा अनुभव मला जरूर कळवा. महाराष्ट्रातील तरुणाईशी संवाद साधण्याचे अभिनव मार्ग त्यातूनच मिळतील आणि असा तरुणच उद्याच्या विचारी समाजाचे चित्र साकार करू शकेल.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१०)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...