सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

देणाऱ्याने देत जावे

देणाऱ्याने देत जावे
दाभोलकर, निधीसंकलन
      

साधना साप्ताहिकाच्या एका कामासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींकडे अगदी अलिकडे गेलो होतो. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना भेटत होतो. भेट झाली. कामही झाले. विनामूल्य झाले. मी उठणार, तेवढ्यात ते म्हणाले, ‘अमुक अमुक गृहस्थ माझे मित्र आहेत. त्यांनी मला सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चांगले सुरू आहे. त्याला काही मदत करा. त्यांनी ज्यांचे नाव उच्चारले, ते मला माहीत होते. त्यांनादेखील मी कधी भेटलेलो नाही. तरी गेली तीन वर्षे ते न चुकता दरवर्षी समितीला रुपये पंधरा हजार पाठवतात. न्यायमूर्तींनी त्यांच्या मैत्रीला स्मरून मला दहा हजार रुपयांचा चेक दिला. असे अनुभव मला मला इतक्या वेळा आले आहेत की, मला त्याचा धक्का वगैरे आता बसत नाही. आनंद मात्र मनोमन होतो. पण या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मला आठवते ते वेगळेच. फेब्रुवारी महिन्यात यवतमाळला राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. निधी संकलन हा विषय चालू होता. अर्थातच हे निधी संकलन जाहिराती व व्यक्तिगत स्वरुपात देणग्या मिळवणे, अशा प्रकारचा होता. सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गिरीश ढोक यांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘आपण लोकांच्याकडून पैसे मिळवण्याचे बोलत आहोत. परंतु आपल्या संघटनेची २० वर्षे पुरी होत असतील, तर आपण स्वत:हून संघटनेला काही पैसे द्यावयास पाहिजेत, असे मला वाटते. त्यांनी रामदेवबाबांचे उदाहरण दिले. रामदेवबाबांचे हजारो (खरे तर लक्षावधी) अनुयायी त्यांच्या विविध कार्यक्रमांना स्वखर्चाने हजेरी लावतातच; परंतु त्यापलिकडे जाऊन वर्षाला किमान हजार, पंधराशे रुपये बाबांच्या कार्याला देतात. समितीने निदान द्विदशकपूर्ती वर्षात तरी हा वसा उचलावा, असा ढोक यांचा आग्रह होता. हा मुद्दा चर्चेत फारसा पुढे आलेला नाही. परंतु माझ्या मनोमनी मात्र रेंगाळला.
     
खरे तर यात फार नवीन अथवा वेगळे काही नाही. आपल्या समितीच्या क्रियाशील सदस्यत्वाचा एक निकषच आहे की, संबंधित सभासदांनी स्वत:च्या उत्पन्नाचा अर्धा टक्का अथवा अडीचशे रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे पैसे स्थानिक शाखेला वर्षाला द्यावेत. सुरुवातीच्या काळात हे काही ठिकाणी थोडेतरी घडत असावे. आता बहुधा सर्वच ठिकाणी थांबले असावे. कार्यकर्ते असा विचार कदाचित करत असतील की, मी संघटनेसाठी माझा वेळ आणि श्रम देतोच. पुन्हा फोन, प्रवास याचाही खर्च कमी-जास्त प्रमाणात करतोच; स्वाभाविकच संघटनेसाठी मी आणखी काही केले नाही तरी चालेल. कार्यकर्त्याचे वरवर पाहता योग्य वाटणारे हे आत्मसमर्थन खरे तर फसवे आहे. ज्या संघटना मोठ्या झाल्या, बलाढ्य झाल्या, स्थिरावल्या, आजही सक्षमपणे सुरू आहेत. त्यापैकी कोणत्याही संघटनेतील बिनीच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे, तर अन्य असंख्य कार्यकर्त्यांनीही कधीही असा आत्मसंतुष्ट विचार आत्मसमर्थनार्थ केला नाही. वर्षातून एक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गुरुदक्षिणा म्हणून संघाला देणगी देतात. ती गुप्त असते. एकेका शाखेची एकाच ठिकाणी जमा होते. त्यामुळे कोणी किती रक्कम दिली हे कळणेही शक्य नसते; परंतु लक्षावधी नव्हे, कोट्यवधी रूपये या माध्यमातून दरवर्षी संघाकडे जमा होतात. याशिवाय दरमहा नियमितपणे पैसे देणारे वेगळेच. कम्युनिस्ट कार्यकर्ते आपल्या पक्षाला आपल्या उत्पन्नातील काही भाग लेव्ही म्हणून देतात. समाजवादी मंडळीही राष्ट्रसेवा दलाला असे पैसे देतात, हे मला ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय अपेक्षा करू शकते? समितीचे आज पूर्ण वेळ कार्यकर्ते एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढेही नाहीत. बाकीचे स्वत:ची नोकरी, व्यवसाय सांभाळून समितीला वेळ देतात. त्यांचे काही पैसे समितीच्या कार्यासाठी खर्च होतात आणि ते पैसे ते काही समितीकडून मागत नाहीत, ते खरेच. त्याबद्दल समिती त्यांची ऋणी आहे आणि आभारीही. परंतु अशा कार्यकर्त्यांसकट मिळवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी थोडा अधिक समर्पित विचार करावयास हवा. घरी आलेले पाहुणे, हौसमौज, कपडेखरेदी, वाहनखरेदी, मोठे प्रवास आणि अशा अनेक बाबी सांगता येतील की, ज्यामध्ये हजारांच्या पटीतच खर्च होतो. समितीत कार्यकर्त्यांचा एक आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ मध्यम वर्ग आहे, त्याची मला जाणीव आहे. परंतु त्यांच्याबाबतही हा खर्च शेकड्याच्या घरात नक्कीच असणार. समितीत महाराष्ट्रभर असा एक वर्ग नक्की आहे की, ज्याला सुस्थितीतील मध्यमवर्ग वा प्रसंगी उच्च मध्यमवर्ग म्हणता येईल. सहाव्या वेतन आयोगानंतर तर ही बाब अत्यंत स्पष्टपणे पुढे आली आहे. त्या वर्गातील एक मोठा गट असा आहे की, जो स्वत: समितीचे कार्यकर्ते आहोत, त्याचा अभिमान बाळगतो. प्रासंगिक मदतही करतो. परंतु दैनंदिन कामात येणे त्याला शक्य नाही व त्याचा तो पिंडही नाही. हे कार्यकर्ते काय करू शकतात? दोन उदाहरणे देतो. जयसिंगपूरचे रमेश माणगावे एके काळी धडाडीने काम करत. प्रकृतीच्या काही मर्यादा म्हणून पुढे त्यांचे काम जवळपास थांबले. पण न चुकता दरवर्षी ते समितीला पाच हजार रुपये पाठवत असतात आणि संघटनेच्या कामासाठी संघटनेची गाडी कधीही आणि वर्षभरात कितीही वेळा त्यांच्या भागात गेली की, न चुकता त्या वाहनाची इंधनाची टाकी एकही पैसा न घेता पूर्ण भरत असतात. दुसरे उदाहरण आहे डॉ. वनारसे पती-पत्नीचे. न चुकता समितीसाठी त्यांची मदत येत असते आणि ती पाच आकड्यांतच असते. अनंत लिमये तर समितीची बँकच आहेत. त्यामुळे कधी गरज लागली तर त्यांना सहा आकडी मदत करा, असे सांगायलाही मला संकोच वाटत नाही. हा सारा वसा समितीला मानणाऱ्या सर्वांनी केवळ कार्यकर्त्यांनी नव्हे, तर समितीच्या हितचिंतकांनीदेखील द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने आपलासा करू नये? त्यामुळे प्रासंगिक गंभीर अडचणीसाठी एक कायमस्वरुपी निधी उभा राहील. समितीच्या आजारी कार्यकर्त्यांना उपचारासाठी, कोर्ट-कचेऱ्यासाठी, अत्यंत अपरिहार्य अडचणीसाठी समिती पैसे देते. अर्थातच अशा प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांना पत्रे पाठवून फोन करून निधी उभारावा लागतो. ते सोयीचे नाही, योग्यही नाही. द्विदशकपूर्ती निमित्ताने आपण एक भरभक्कम कार्यकर्ता सहाय्य निधी उभारण्याचा संकल्प करावा, असे मला वाटते. मात्र याबाबत प्रत्येकाने स्वत:च्याच मनाला कौल लावावयास हवा. मी माझ्यापुरता तो लावला. माझ्या सर्व मर्यादा सर्वजण जाणतात. मला व्यक्तिगत कमाईचे असे अर्थार्जनाचे नियमित साधन नाही. तरीही मला असे वाटते की, आपण दहा हजार रुपये द्यावेत. तेव्हा योजनेचा प्रारंभ झाला, असे समजावे आणि आपला मदतीचा भरभक्कम हात एकाच वेळी वा टप्प्याने; परंतु याच वर्षात निश्चितपणे आणि भरीवपणे पुढे करावा, हे कळकळीचे आवाहन.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे २०१०)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...