धरणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धरणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

कायदा न झाल्यास निषेध आंदोलन

कायदा न झाल्यास निषेध आंदोलन
दाभोलकर, कायदा, आंदोलन, धरणे, अभिनव कल्पना,  शासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव
जादूटोणाविरोधी कायद्याचा संघर्ष आता शेवटच्या टप्प्यावर आहे. ता. २३ मे ला मुख्यमंत्र्यांच्या समवेत याबाबत जी बैठक झाली, त्याचा बातमीवजा छोटा वृत्तांत चौकटीत आहेच.

शासनाने सहमती तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु त्याबाबत विश्वास बाळगावा, अशी स्थिती नाही. सहमतीने कायदा होण्याचे ठरले तर वृत्तपत्रातून, ते कळेलच. परंतु तसे झाले नाही तर महाराष्ट्र अंनिस आपला संघर्ष जारी ठेवेल, असा निर्णय अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारिणीने मे महिन्यात घेतला आहे. याची रुपरेखा पुढीलप्रमाणे आहेः

१)    मंगळवार, ता. ९ जून रोजी एक राज्यव्यापी धरणे मुंबईतील आझाद मैदानावर धरण्यात येईल. शाखेतील, जिल्ह्यातील शक्य असेल त्या सर्वांनी यावे. धरण्याची वेळ १० ते ३.
२) आपापल्या जिल्ह्याला, आपापल्या शाखेत शक्यतो ९ जूनच्या आत; परंतु प्रसंगी २० जूनपर्यंत (तोपर्यंत विधानसभा अधिवेशन चालू आहे) धरणे धरावयाचे आहे.
३)    या धरण्याची कल्पना अभिनव आहे. शासन महाराष्ट्राच्या समाजसुधारकांच्या वारशापासून आणि स्वत:च्या वचनापासून पळ काढत आहे. दोन प्रकारे लोकमानसावर आपण हे ठसवणार आहोत.
(अ)   एका खराखुरा मोठा तराजू धरणेस्थळी असावा. त्यातील एका पारड्यात महात्मा फुले व अन्य समाजसुधारकांचे वाङ्मय ठेवावे अथवा त्या पुस्तकांची रंगीत मुखपृष्ठे ठेवावीत. दुसऱ्या पारड्यात अंधश्रद्धेचे प्रतीक असलेली बाहुली, लिंबे, सुया, टाचण्या अशा बाबी ठेवाव्यात. अंधश्रद्धेचे हे पारडे महाराष्ट्र सरकारने जड केले आहे, असे आपणास दाखवायचे आहे. त्यामुळे पारड्याची ही बाजू प्रत्यक्षात जड होईल, याची काळजी घ्यावी.
(ब)   शासनाचा हा पळपुटेपणा बघवत नाही म्हणून डोळे बांधून धरणे धरावे. साधारणपणे तीन तास कार्यक्रम करावा. तो कोठेही सोयीच्या जागी करावा.
(क) धरण्याच्या स्थळी फलक लावावा. त्यावर पुढील स्वरुपाचा मजकूर असावा, जादूटोणा-विरोधी कायदा करण्याचा अंनिसचा अखंड निर्धार सूज्ञ नागरिकहो! समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा करण्याच्या स्वत:च्या १० वर्षांपूर्वीच्या लेखी वचनापासून सत्तारूढ राज्यकर्त्यांनी पळ काढला आहे. महाराष्ट्रात समाजसुधारकांच्या विचारापेक्षा अंधश्रद्धांचे पारडे जड झाले आहे. याचा निषेध डोळ्याला पट्टी बांधून करीत आहे.
निर्धार : महाराष्ट्रात हा कायदा करण्याचा महाराष्ट्र अंनिसचा निर्धार कायम आहे. यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या विविध पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांना भूमिका घेण्यास समिती भाग पाडेल. १९९९ सालची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात परत यावी, असा प्रयत्न समिती करेल. (यावेळी डाव्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसची सत्ता आली होती.) गरज पडल्यास नव्या विधिमंडळात अशासकीय विधेयक मांडण्यात येईल. सत्तारूढ पक्षाच्या कचखाऊपणाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पराभव आम्ही सहजासहजी होऊ देणार नाही, हाच आमचा निर्धार आहे. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमात शहरातील मान्यवर सहभागी होतील, असे पाहावे. झालेल्या कार्यक्रमांच्या वृत्तातांची बातमीची कात्रणे म.अं.नि.स.कडे पाठवावीत.

कायदा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
जादूटोणाविरोधी कायदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने दि. २३ मे रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री ना. छगन भुजबळ, संसदीय कामकाजमंत्री ना. हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्यायमंत्री ना. चंद्रकांत हंडोरे, ना. पतंगराव कदम उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळात डॉ. नरेंद्र दाभोलकर, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, मृणालताई गोरे, सुशीला मुंडे, विजय परब यांचा समावेश होता.

कायद्याबाबत संपूर्णत: असत्य प्रचार प्रतिगामी शक्तींनी केला आहे. त्या दबावाला बळी न पडता शासनाने कायदा करण्याचा दिलेला शब्द पाळावा, असा आग्रह समितीने धरला. कायद्याबाबत अपप्रचार झाल्याने हा विषय संवेदनशील बनला आहे, तेव्हा सर्व सहमतीने निर्णय होणे श्रेयस्कर ठरेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. त्यांनी अशी सूचना केली की, विधिमंडळातील सर्व पक्षांच्या प्रमुखांशी बोलावे. त्यांच्या मनातील आशंका दूर करण्यासाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे सहाय्य घ्यावे; प्रसंगी कायद्यातील काही तरतुदी वगळाव्यात. हा मसुदा संयुक्त चिकित्सा समितीमार्फत विधिमंडळात मांडून कायदा करण्यात यावा. या आठवड्यात याबाबत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ना. चंद्रकांत हंडोरे हे त्यांच्या पुढाकाराने ही चर्चा घडवून आणणार आहेत. शासनाने याबाबत अधिक खंबीर व होकारात्मक भूमिका घ्यावी, अशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अपेक्षा होती. मात्र या सर्वसमावेशक भूमिकेतून तरी विधिमंडळाच्या या अखेरच्या अधिवेशनात कायदा करून घेणे, ही शासनाच्या राजकीय इच्छाशक्तीची कसोटीच ठरेल, असे समितीला वाटते.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून २००९)






सोमवार, ८ जानेवारी, २०१८

पुढच्या हिवाळी अधिवेशनात कायदा?




पुढच्या हिवाळी अधिवेशनात कायदा?
दाभोलकर, कायदा, धरणे, स्थगनप्रस्ताव
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या स्वतंत्र कायद्याचे बिल अमरावतीचे ज्येष्ठ आमदार बी. टी. देशमुख यांनी मांडले. पावसाळी अधिवेशनात हे बिल चर्चेला येईल, त्याच दरम्यान विधिमंडळाबाहेर धरणे धरावे, अशी व्यूहरचना होती. ६ ऑगस्ट ही तारीख नक्की करण्यात आली. आवश्यक सर्व परवान्यांची, धरण्यासाठीच्या तयारीची पूर्तता मुंबईच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक व चोखपणे केली. मग महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या दोनच; एक म्हणजे बिल चर्चेला येणे आणि दुसरे म्हणजे धरण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी स्थगनप्रस्ताव मांडून सरकारला निवेदन करण्यास भाग पाडणे.

पहिला दणका बसला बिलाबाबत. विधिमंडळ अधिवेशन नेहमीप्रमाणे लवकर गुंडाळण्याचे ठरले. बिल लागण्याची शक्यता कमी झाली होतीच, ती रद्दबातल झाली. त्यामुळे विधिमंडळातील चर्चेने जनजागृती करणे अशक्य ठरले. विधिमंडळाच्या बाहेर आझाद मैदानावर धरणे धरण्यासाठी नामवंतांचा सहभाग लाभणार होता, हे खरेच; परंतु तरीही या प्रश्नावर स्थगनप्रस्ताव मांडून विधिमंडळाचे कामकाज रोखून सरकारला निवेदन करायला लावणे जमेलच, याची खात्री नव्हती. स्थगनप्रस्तावासाठी काही अधिक गंभीर कारण हवे, असे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे मत होते.

याबाबतची जुळवाजुळव ५ तारखेला सकाळपासून आम्ही चालू केली. किसनराव देशमुख, पी. जी. दस्तूरकर यांच्यासह मी, राजीव देशपांडे, अविनाश पाटील, माधव बावगे, नंदकुमार तळाशीलकर या सर्वांनी प्रथम ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना गाठले. विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर सभापतींनी काही निवेदन करण्याचा आदेश सरकारला करावा, यासाठी सभापती अरुण गुजराथी यांना भेटावयास दुपारी विधानभवनात गेलो. त्यावेळी प्रा. एन. डी. पाटीलही सोबत आल्याने आमची उमेद वाढली होती.

विधानसभा चालू असताना दुष्काळावरची चर्चा, आमदार गोटे यांच्यावरील आरोपाची गरमागरमी अशा अन्य बाबी, या साऱ्या गदारोळात सभापती अरुण गुजराथी निवांत भेटणे अवघडच होते आणि काहीसे अनपेक्षितपणे अघटित घडले. अरुण गुजराथींच्या चेंबरमध्ये त्यांच्यासह मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री छगन भुजबळ, संसदीय कामकाज मंत्री रोहिदास पाटील सारेच जण भेटले. पण खरा धक्का पुढेच होता. या तिघांनीही अंधश्रद्धा कुठे कायदा करून जातात का? अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केल्यावर आम्ही नारळ फोडावयाचा का नाही? प्राण्यांचा नवसबळी कसा रोखणार? लोकांच्या श्रद्धेवर हल्ला कसा करता येईल? श्रद्धा, अंधश्रद्धा यात फरक कसा करणार? असा भडिमार चालू केला. त्यांचे प्रबोधन करण्यात अर्थ नव्हता. मुद्दा लक्षात आला की, सभापती स्थगनप्रस्ताव दाखल करून घेणार नाहीत. पर्याय एक, तो एन. डी. सरांनी काढला. गणपतराव देशमुखांनी प्रश्न उपस्थित केल्यावर संसदीय कामकाजमंत्री रोहिदास पाटील यांनी लगेच उठून काही निवेदन करावे, अशा स्वरुपाचा तो तोडगा होता. आता हे निवेदन काय असेल? ‘नेहमीप्रमाणे हा प्रश्न शासनाच्या विचाराधिन आहे,’ या स्वरुपाचे का काही अधिक ठोस? याबाबत अर्थातच चर्चा झालीच नाही.

त्यानंतर आम्ही विधान परिषद अध्यक्ष ना. स. फरांदेंना भेटलो. ते भाजपाचे; पण त्यांनी विधानपरिषदेत या संदर्भात चर्चा घडवून आणण्यास पूर्ण मदत देण्याचे कबूल केले. आश्चर्य म्हणजे कायदा करण्याच्या प्रस्तावाला गोपीनाथ मुंडे व नारायणराव राणे यांनी पाठिंबा जाहीर केला. सर्व भेटीगाठीनंतर मी काही फारसा आशावादी नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी ६ तारखेला ३.४५ वाजता शिष्टमंडळास भेटीची वेळ दिली होती. एन. डी. पाटील, किसनराव देशमुख, दस्तूरकर, माजी आमदार जयवंत ठाकरे, माजी पोलीस महासंचालक भास्करराव मिसार, डॉ. श्रीराम लागू, मृणाल गोरे, पुष्पा भावे, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, मी, माधव बावगे, अविनाश पाटील, राजीव देशपांडे, रासकर असे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दालनात थडकले. मुख्यमंत्री प्रचंड गडबडीत होते. शेजारची बैठकीची खोली आमदारांनी भरलेली होती. आमच्या खोलीत एवढ्या शिष्टमंडळास बसण्यास पुरेशा खुर्च्याही नव्हत्या. अनेक मान्यवर उभेच होते. मुख्यमंत्री दहा मिनिटे उशिरा येऊन स्थानापन्न झाले. त्यांची घाई जाणवत होती. समोर अनेक मान्यवर असूनही त्यांनी ना विचारपूस केली, ना चहा सांगितला. चर्चा थेट मुद्द्यावर आणली. त्यांनी धाडकन् सांगून टाकले, शासन पुढच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा करेल; अगदीच अडचण आली तर बजेट सेशनमध्ये. समितीने दिलेला मसुदाच थोड्याफार फरकाने स्वीकारू, तुमच्या तीन ते पाच प्रतिनिधींना कायदा करताना पाचारण करू. चर्चा, सवाल-जवाब असे फारसे काही घडलेच नाही आणि ते करण्यास रस तरी कोणाला होता? मुख्यमंत्री आतल्या दालनात गेले. आम्ही बाहेर पडलो. माझ्या मनात सततचा प्रश्न. काल रात्री नेमके असे काय घडले की, असे ठोस स्पष्ट आश्वासन आम्हाला आधी विधानसभागृहात आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्याकडून मिळाले. शक्यता अनेक असू शकतात.
·         पुरोगामी चेहरा जपण्याचा एक प्रयत्न.
·         आश्वासन दिले ते पाळावयास थोडेच हवे?
·         आश्वासन पाळताना इतकी दिरंगाई शक्य आहे की, कायदा होण्याआधीच नव्या निवडणुका येतील.
·         राजकीय पेचप्रसंगामुळे लोकशाही आघाडीतील घटकपक्षांना सांभाळण्याचा राजकीय शहाणपणा.
·         विधानपरिषदेत फार मोठ्या संख्येने या मागणीच्या ठरावावर आमदारांनी सह्या केल्या होत्या, या स्वरूपाचा काही राजकीय दबाव.
·         इतरही अनेक, सगळेच डावपेच आपल्याला कोठे समजतात?

पण कारण काहीही असो. विधानसभेत अत्यंत स्पष्ट आश्वासन मिळाले, मुख्यमंत्र्यांकडून मिळाले आणि मग मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या धरणे धरणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या दिवसाचे तरी सार्थक झाले, असे वाटले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००२)




रविवार, ७ जानेवारी, २०१८

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा : काही नोंदी




अंधश्रद्धा निर्मूलन कायदा : काही नोंदी
दाभोलकर, कायदा, धरणे, कायद्याची गरज, वाटचाल, जनशक्ती    
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा, यासाठी ६ ऑगस्ट २००२ रोजी मुंबई येथे विधिमंडळासमोर म.अं.नि.स. एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहे. त्यानिमित्ताने कायद्याची आवश्यकता का? या संदर्भातील लेख.

१)    कायदा करून समाज बदलतो का, असा प्रश्न सतत विचारला जातो. यासाठी हुंडाबंदी व दारूबंदी कायद्याची उदाहरणे दिली जातात. हा युक्तिवाद अर्धसत्य आहे. केवळ कायद्याने समाज बदलत नाही, हे मान्य आहेच; परंतु संबंधित प्रश्नावर प्रभावी जनचळवळ असेल तर कायद्याची मदत नक्कीच होऊ शकते. अस्पृश्यताविरोधी कायदा किंवा हुंडा व दारूबंदीचे कायदे याबाबत ही गोष्ट लक्षात आली आहे. जनशक्तीला दंडशक्तीची जोड असेल, तर प्रबोधनाची परिणामकारकता नक्कीच वाढू शकते. समितीच्या कार्यामुळे आज अंधश्रद्धा निर्मूलनामागे जनशक्ती येत असून, कायद्यामुळे कार्याची परिणामकारकता वाढेल.

वाटचाल  
२)  अ) १९८९ साली पुणे येथे अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद झाली. कायद्याचे पहिले प्रारूप या परिषदेत मांडण्यात आले. चर्चेमधून पुढे आलेल्या सूचना लक्षात घेऊन ते सुधारित करण्यात आले. महाराष्ट्र मंत्रिमंडळासमोर सध्याचे असलेले कायद्याचे प्रारूप हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या कायदेविषयक समितीच्या सहभागातून तयार करण्यात आले आहे. हे तयार करण्यात मा. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, दिवंगत न्या. बॅ. राजा भोसले, महाराष्ट्राचे निवृत्त कायदा सचिव म. बा. पवार, निवृत्त पोलीस महासंचालक व निवृत्त गृहसचिव भास्करराव मिसर, दादासाहेब रूपवते, नरेंद्र दाभोलकर यांचा समावेश होता.
ब)    या समितीने तयार केलेल्या मसुद्याचे वैशिष्ट्य हे की, श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती, या चर्चेत कायद्याची अंमलबजावणी अडकून पडू नये म्हणून अंधश्रद्धा कशास समजावे, या बाबींचा स्पष्ट उल्लेख या कायद्याच्या परिशिष्टात करण्यात आला आहे. कायदा मंजूर करताना परिशिष्टातील या बाबींची संख्या कमी अथवा अधिक करणे शक्य आहे. या तरतुदींमुळे कायदा करण्यातील महत्त्वाची अडचण दूर झाली आहे.
क)    अंधश्रद्धा समजाव्यात म्हणून कायद्यात समावेश केलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे आहेत.
करणी अथवा भानामती करणे, दैवीशक्तीच्या नावाने मंत्र-तंत्र करणे, भूत उतरवण्यासाठी उदी, ताईत, अंगारा देणे, गंडेदोरे बांधणे, दैवीशक्ती असल्याचा भास निर्माण करून त्याचा प्रसार करणे, देव-देवतांच्या नावांवर संतांचे व थोर पुरुषांचे नाव बदनाम करणे, अंगात आणणे, चेटूक करणे, दैवी शक्तीचा दावा करून चमत्कार करणे, भूत काढण्यासाठी साखळदंडाने बांधून मारहाण करणे, अघोरी विधी करणे, तांत्रिक क्रिया करून परिसरात घबराट पसरवणे, मुलगा होण्यासाठी गोपाल संतानविधी करणे, वैद्यकीय उपचाराला विरोध करून अघोरी उपचार करावयास लावणे, मंतरलेले खडे, दोरे, ताईत विकणे, अंगात संचार येऊन लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, नवस फेडण्यासाठी हाल करून प्राण्याची कत्तल करणे, सर्पदंशावर वा पिसाळलेला कुत्रा चावल्यावर गावठी औषधोपचार करणे, दैवी कृपेने संतती मिळवून देणे, या व या स्वरुपाच्या अनेक बाबींना अंधश्रद्धा मानण्यात आले आहे. या सर्व बाबींच्या संदर्भात कायद्याच्या अभावाने कारवाई न झालेली अनेक उदाहरणे समितीकडे आहेत.
ड)    हा कायदा होण्यासाठी आमदार पी. जी. दस्तूरकर, जयवंत ठाकरे, व्यंकप्पा पत्की, दि. बा. पाटील या चार आमदारांनी १९९५ च्या एप्रिल उन्हाळी अधिवेशनात अशासकीय ठराव दिला. परंतु त्यावर प्रत्यक्ष चर्चा होऊ शकली नाही. जुलै १९९५ च्या पावसाळी अधिवेशनात त्यावर सांगोपांग चर्चा झाली. त्यावेळी युती शासन सत्तेत होते. गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मागणी मान्य केली व शासन कायदा करेल, ठराव मागे घ्यावा, अशी विनंती केली. ठराव मांडणाऱ्या आमदारांनी ती फेटाळून ठराव मतास टाकला व २३ अनुकूल विरुद्ध ६ प्रतिकूल याप्रमाणे विभाजन होऊन अशासकीय प्रस्ताव संमत झाला. विशेष म्हणजे विधान परिषदेत चर्चा होताना कोणीही या ठरावास विरोध केला नव्हता. सर्वच्या सर्व भाषणे कायदा करण्याची गरज मान्य असणारी होती.
३)    त्यावेळी विरोधात असून विधान परिषदेत बहुमताने असलेला काँग्रेस पक्ष सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे. सत्तेतील लोकशाही आघाडीने प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक किमान कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये हे सरकार सत्तेवर आल्यापासून एका वर्षाच्या आत उघड स्वरुपाच्या अंधश्रद्धांना विरोध करणारा स्वतंत्र असा अंधश्रद्धा निर्मूलन      कायदा करेल, असे एक कलम आहे. याबाबत शासनाला वारंवार आठवण करून देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नाही.

जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून धरण्याचा प्रयत्न आमदार बी. टी. देशमुख; तसेच अन्य काही आमदार करणार आहेत. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार ता. ६ ऑगस्ट रोजी विधिमंडळासमोर एक धरणे आंदोलन समितीने आयोजित केले आहे. महाराष्ट्र अंनिसच्या सर्व ३० शाखांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत. तसेच प्रा. डॉ. एन. डी. पाटील, पुष्पाताई भावे, डॉ. श्रीराम लागू, चंद्रशेखर धर्माधिकारी, निखिल वागळे आदी मान्यवरही सहभागी होणार आहेत. केलेल्या ठरावाची कालबद्ध पूर्तता करावी, अशी समितीची मागणी आहे. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी हीच मागणी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना केली आहे.

४)    सध्या असलेले व उपयोगी पडणारे कायदे-
अ)    यात चमत्कारिक औषधाची जाहिरात करणाऱ्या ड्रग्ज अ‍ॅण्ड मॅजिक रेमिडीज अ‍ॅक्ट १९५४ नुसार काही बाबतीत कारवाई होऊ शकते. हा कायदा बहुसंख्य पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नसतो, असा अनुभव आहे.
ब)    ४२० अंतर्गत, ठकबाजी म्हणून कारवाई होऊ शकते. परंतु अंधश्रद्धेचे प्रकार वा बाहेरची बाधा वा दैवीशक्ती असे मानून हा कायदा होऊ शकतो. हा कायदा या फसवणुकीस अपवादात्मक वेळीच वापरला जातो.
क)    औषध व अन्नभेसळ प्रशासन यांच्या परिपत्रकाप्रमाणे बोगस डॉक्टरवरील कारवाईचा आधार मिळू शकतो.
५)    अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची गरज उदाहरणाने स्पष्ट करणाऱ्या काही बाबी नोंदीच्या स्वरुपात पुढे दिल्या आहेत. याबाबतचे सर्व तपशील समितीचे मासिक; तसेच लढे अंधश्रद्धेचे या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकात तपशीलवार उपलब्ध आहेत.

१)    भावनगरची पार्वतीमाँ - चार वर्षांपूर्वी भावनगर (गुजरात) येथील पार्वतीमाँ ही बाई तिला मिळालेल्या शंकराच्या वरामुळे निपुत्रिकांना संतती देऊ शकते, हा प्रचार महाराष्ट्रात प्रचंड झाला. महाराष्ट्रात एकही तालुका असा नसेल की, ज्यामधून मोठ्या संख्येने निपुत्रिक जोडपी गुजरातला गेली नाहीत. वेळ, श्रम, पैसा वाया गेला; आरोग्याला धोकाही झाला. मात्र त्यावेळचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी यावर काही कारवाई करण्यास असमर्थता व्यक्त केली.

२)    तीन वर्षांपूर्वी कुशिरे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील गुरव बंधूंच्या बैलाचे डोळे गेले. त्यांना स्वप्नात देव दिसला. त्याने सांगितले त्याप्रमाणे एका झाडाच्या पाल्याचा रस गुरव यांनी बैलाच्या डोळ्यात घातला. त्याची दृष्टी आली. गुरव बंधूंनी हाच प्रयोग माणसांवर सुरू केला. दोन ते तीन महिन्यांत एक ते दीड लाख लोकांनी हे औषध घालून घेतले. नेत्ररोगतज्ज्ञांच्या संघटनेने याबाबत स्पष्ट विरोधी मत नोंदवले. तरीही हा प्रकार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी वा जिल्हा पोलीसप्रमुख थांबवू शकले नाहीत. त्यांच्या मते यासाठी कायदा नव्हता. समितीने चळवळ करून हे प्रकार थांबवले.
३)    सातारा येथे दोन वर्षांपूर्वी साहिबजादी या बाईने घरातील करणी काढण्याचे प्रात्यक्षिक म्हणून लिंबातून खिळे, टाचण्या, ताईत काढून दाखविले. संबंधित व्यक्तीची पूर्ण झडती घेऊन मग तिला चमत्कार करायला लावण्याची तरतूद आजच्या कायद्यात नाही. प्रत्येकजण आपल्या श्रद्धेप्रमाणे वागेल, असे म्हणून असे प्रकार राजरोस चालू राहतात.

४) दोन महिन्यांपूर्वी बागलकोट येथील अस्लम ब्रेडवाले या बाबाने नरसोबाचीवाडी व मिरज येथे नुसत्या हाताच्या बोटांनी, भुलीशिवाय पोटावर मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. अपेंडिक्स, मूतखडा, हृदयाच्या झडपा या सर्व बाबी अशाप्रकारे दुरुस्त करण्याचा त्याचा दावा होता. यासोबत रुग्णांना तो औषधेही देत होता. प्रचंड गर्दी होती. समितीने तक्रार नोंदवूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. सरतेशेवटी अगदी नाईलाजाने कारवाई करावयास गेले, तोपर्यंत बाबा पसार झाला. उपचार मिळालेल्या हजारो (अंधश्रद्ध) रुग्णांच्या रागाचे बळी समितीला व्हावे लागले.

५) आजही गावोगावी मंत्र-तंत्र, ताईत, तोडगे, उतारे या आधारे जीवनातील आरोग्यासकट अन्य सर्व प्रकारच्या समस्यांवर उपाय केले जातात. मुंबईच्या लोकलमधील बंगाली बाबांच्या जाहिराती हे याचे चांगले उदाहरण आहे. यावर कारवाई होऊ शकत नाही

६)    करणीकरतो म्हणून दहशत घातली जाते. करणी केली या नावाने भांडणे, मारामाऱ्या होतात. अशा बाबतीत अडचणीत असलेल्याच्या बाजूला पोलीस काही मदत करत नाहीत. ‘हा प्रकार बाहेरचा आहे, तुमचे तुम्ही बघा,’ असे म्हणून पोलीस तक्रार दाखलच करून घेत नाहीत.
७)    मानसिक आजारावर उपचार म्हणून मांत्रिकाने मारहाण करणे; प्रसंगी साखळदंडाने बांधून ठेवणे हे प्रकार आजही चालतात. मागील वर्षी बुलढाण्यापासून २० किलोमीटर अंतरावरील सैलानीबाबाच्या दर्ग्यावरील अशी प्रकरणे सविस्तरपणे वृत्तपत्रात आली होती.

८) हातामधून आपोआप प्रसाद पाडून, कुंकवाचा बुक्का व बुक्क्याची हळद करून या चिल्लर कथित चमत्काराच्या नावाने दहशत घालून अरिष्ट टाळण्यासाठी माणसांना ग्रहाची, देवाची शांती करावयास लावले जाते. या व्यक्तींच्यावर कोणतीच कारवाई आज करता येत नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००२)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...