बुवाबाजीचे घातक चाळे (भाग ३)
दाभोलकर, बुवाबाजी,
अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन
व्यापक समाजपरिवर्तनाची चळवळ यशस्वी झाल्याशिवाय
एकांगी पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन अथवा बुवाबाजी निर्दालन शक्य होणार नाही,
ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवावयास हवी. समाजपरिवर्तनाला
एका अगतिकतेने वेढले आहे. विज्ञानाने माणसाच्या हातात दिलेला प्रकाशझोत मानवी मनातील
व जीवनातील अगतिकतेमुळे निर्माण झालेला अंधार दूर करू शकत नाही. त्यामुळे विज्ञानयुगातही
अंधश्रद्धांच्यात अडखळणे आणि बुवाबाजीच्या चिखलात रूतणे चालूच आहे. गेल्या १० वर्षांत
अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाल्यानंतर ही अगतिकता प्रत्येक क्षेत्रात वाढीस लागली आहे.
कारखाने बंद पडत आहेत आणि सुरक्षित रोजगार संपुष्टात येत आहेत. पदवी असणाऱ्या,
प्रामाणिक कष्टाची तयारी दाखवणाऱ्या युवकांना
आपली बेकारी दूर होण्याची कोणतीच शाश्वती वाटत नाही. सरकारी आकडेवारी काहीही सांगत
असली तरी प्रत्यक्षात महागाई वाढतेच आहे. समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात भ्रष्टाचार
उदंड आहे. कोणतेही क्षुल्लक कारण दंगली पेटण्यास कारणीभूत ठरते आणि माणसांची व मालमत्तेची
सहजपणे राखरांगोळी होते. अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. व्यसनी आक्राळविक्राळ
स्वरुपात समाजात थैमान घालत आहेत आणि प्रतिष्ठा व मान्यताही मिळवत आहेत. स्वत:च्या
कर्तृत्वाने वा समाज बदलून यामधून मार्ग काढता येईल, अशी आशा जनसामान्यांना राहिलेली नाही. मग
त्यांना त्यासाठी कोणीतरी बाबा, बुवा,
स्वामी, महाराज, संत-महंत लागतो आहे. सामान्यांचे सोडाच;
आपापल्या क्षेत्रातील असामान्यांनाही अस्थिरतेचा
फटका बसताच पहिल्यांदा आठवतो, तो
कोणीतरी बाबाच. एखाद्या सुपरस्टारचे सिनेमे धडाधडा कोसळतात, राजकारणात काल पंतप्रधान असलेला आज उच्च
न्यायालयाकडून शिक्षा होऊन गुन्हेगार ठरतो. उभे केलेले आर्थिक साम्राज्य एखाद्या विपरीत
निर्णयाने बघता बघता कोसळते आणि मग ही सारी ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळीदेखील बुवा-बाबाच्या पायावर
लोटांगण घालण्यासाठी हजर होतात. एका बाजूला प्रचंड अगतिक आणि अस्थिर बनलेले जग आणि
दुसरीकडे प्रसारमाध्यमांनी उभे केलेले चकचकीत, श्रीमंत, चंगळवादी जग. रोज नवे पोषाख, नव्या फॅशन, नव्या हौशीमौजी, जगण्याचे नवनवे उपभोगवादी मानदंड हे सारे
मिळवायचे तर एकतर भ्रष्टाचार करावयास हवा; आणि त्यामुळे मनाला लागलेली टोचणी दूर करण्यासाठी अथवा पापक्षालनासाठी
बाबाचे पाय पकडायला हवेत किंवा हीनदीन होऊन बाबांच्या सेवेत रूजू होऊन कधीतरी
त्यांच्या कृपाकटाक्षाने आपण मालामाल होऊ, अशी आशा बाळगत जगावयास हवे. व्यक्तिमत्त्व दुभंगून टाकणारा असा
अंधश्रद्धेचा प्रचंड विळखा येथील माणसाच्या जीवनाला बसतो आहे आणि त्याची चारही बाजूने
कोंडी होत आहे. यातून सुटका करण्यासाठी तो कुणा बुवा, बाबा, महाराज, भगवान यांच्यामागे लागतो. ते सांगतील त्याप्रमाणे
अंगठी घालतो, उदी
लावतो, रामनाम जपतो, संमोहनाच्या गाढ निद्रेत जाऊन अथवा कुंडलिनी
जागृत करून अथवा बाबांच्या पुढे संपूर्ण शरणार्थी बनून आपले सर्व प्रश्न चुटकीसरशी
सुटतील, अशी आशा बाळगतो. त्याचे
सारे प्रश्न समाजाच्या जडणघडणीशी जोडलेले आहेत. पण ते प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्था
परिवर्तनाच्या लढ्यात उतरण्यापेक्षा, धार्मिक संस्कृती, परंपरेतून आलेला आणि जणू अलिबाबाच्या थेट गुहेतच घेऊन जाणारा हा
बिनसंघर्षाचा मार्ग या समाजातील बहुसंख्यांच्या मानसिकतेला जवळचा वाटतो, हवाहवासा वाटतो. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर
यांनी आपल्या ‘दासबोध’ या कवितासंग्रहात बुवाशक्तीनिरुपण करताना लिहिलेल्या ओळी ही
वस्तुस्थिती विदारकपणे समोर ठेवतात-
“माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली,
अदृश्य
दहशतीने तंगलेली, आधार
नाही,
प्रत्येकास
येथे हवा, कोणीतरी
जबरी बुवा,
जो
काढील साऱ्या उवा, मनातल्या चिंतांच्या,
आधी
म्हणायचे ‘जय साई’, मगचि अधिकारी लाच खाई,
अजून
पकडला गेला नाही, कृपा
मानी बाबांची ,
आपण
शोधायचे नाही, आपण
लढायचे नाही,
आपण
भिडायचे नाही, आयुष्याला.
कणा
झिजून गेला पार, शिरजोरापुढे
सर्व लाचार.
बुवा
नामजपाचा उच्चार, नशा
देई.”
जनसामान्यांची मने या नशेतून मुक्त करण्याचे
काम वैज्ञानिक
दृष्टिकोनाचे असते आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातून रूजवावा लागतो. त्याबाबतचा
आग्रह राजकारणात व समाजजीवनात धरावा लागतो. याबाबत सारा आनंदीआनंदच आहे. वैज्ञानिक
दृष्टिकोन हा भले देशाच्या घटनेत नागरिकांचे कर्तव्य असेल, तो शैक्षणिक धोरणाचा भाग असेल; परंतु अनेक कारणांनी तो तेथील जनसामान्यांचा
जिव्हाळ्याचा भाग नाही. मग त्याप्रमाणे जगण्याचा आग्रह तर दूरच राहिला. समाजात वैज्ञानिक
दृष्टिकोनाच्या विचाराला प्रतिष्ठा नसल्याने राजकीय नेत्यांनी त्याबाबत आग्रह धरण्याची
गरजच वाटत नाही. समाज डोळस बनावा, त्याने
शास्त्रीय विचारपद्धती स्वीकारावी, यासाठी
सत्ताधीश कधीही राजकीय इच्छाशक्ती वापरत नाहीत. स्वाभाविकच शिक्षणात येणारा वैज्ञानिक
दृष्टिकोन हा यांत्रिक असतो. त्यामागच्या मूल्यभावनेचा विचार शिक्षकांना नसतोच. त्यामुळे
विद्यार्थ्यांपर्यंत तो पोचण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. या सर्व परिस्थितीमुळे
डोळस विचाराचा व त्याचा कृतिशील भाग म्हणून बुवाबाजीविरोधाचा आग्रह धरावा, हे घडून येत नाही आणि अशा निर्धाराअभावी
समाजमानस बदलणे अवघड होऊन बसते. प्रसिद्धिमाध्यमेही या प्रकाराला खतपाणीच घालत असतात.
या सर्व कारणांबरोबर आणखी एक जैविक कारण असणे शक्य आहे. माणसाचा मेंदू हा मूलत: प्राण्याचा
मेंदू आहे. उत्क्रांतीच्या कालखंडात प्रगत अवस्थेतील बुद्धी धारण करणारा मानवी मेंदू
त्या प्राणी मेंदूवर विकसित झाला. पशुमेंदूच्या उत्क्रांतीसाठी काही कोटी वर्षे लागली;
मानवी मेंदूची उत्क्रांती त्या मानाने फारच
कमी वेळात झाली. या गतीमुळे मेंदूच्या या दोन्ही भागात पुरेशी सुसंगती निर्माण होण्यास
जो कालखंड मिळावयास हवा होता, तो
लाभला नाही. त्यामुळे मानवी मेंदूला आपल्याच मेंदूचा एक मोठा भाग असलेल्या प्राणी
मेंदूवर व त्याद्वारे व्यक्त होणाऱ्या अतार्किक विचार व वागण्यावर मात करता आलेली नाही.
म्हणजेच सदैव वैज्ञानिक दृष्टिकोनानेच विचार करण्याची क्षमता मानवी मेंदूला अजून लाभलेली
नाही. जीवनाच्या प्राथमिक, शारीरिक
निसर्गप्रेरणा, भूक,
झोप, भीती, मैथुन या प्रभावाखाली व पारंपरिक संस्काराखालीच
हा मेंदू आहे. यामधून त्याला मुक्त करणे आणि वैचारिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संपूर्ण जीवनभर सर्व
निर्णयात पाठपुरावा करणे ही क्षमता माणसाच्या मेंदूत पूर्णत: निर्माण होणे,
याला स्वाभाविकच काही काळ द्यावाच लागेल.
प्रभावी शिक्षणाने हा कालावधी कमी होऊ शकेल; परंतु तरीदेखील त्याला मर्यादा आहेत,
हे लक्षात घ्यावयास हवे. ही जैविक स्थिती
स्वाभाविकच माणसाला अविवेकी विचार करायला व त्यामुळे बुवाबाजीकडे वळवायला कारणीभूत
ठरू शकते.
ही सगळी वैचारिक मांडणी झाली. परंतु काही
मजबूत भौतिक पाया असल्याशिवाय आज फोफावली, तशी चारही अंगाने बुवाबाजी फोफावू शकत नाही. कोणताही बुवा अथवा
बाबा, स्वामी
अथवा महाराज केवळ लोकांच्या भोळेपणावर अथवा मूर्खपणावर आपला जम बसवत
नाही किंवा फक्त धर्म आणि अध्यात्म याच बाबी याचा प्रभाव वाढवण्यासाठी पुरेशा
नसतात. पैसा, पुढारी,
प्रेस, जात, सत्ता, धर्म, गुंडगिरी या सर्व गोष्टींचा वापर आपल्या
बुवाबाजीची राखीव फौज म्हणून भरभराटीला आलेला कोणताही बाबा करत असतो. खोलात उतरून थोडी
तपासणी केली तर हेच आढळेल.
म्हणूनच अशा तपासणीला बाबा आणि त्यांचे भक्त हिंसकपणाने विरोध करतात. पैसा सहजपणे
मुबलक येतो. हिशोब, आयकर
असल्या सामान्यांना सतावणाऱ्या क्षुद्र बाबींपासून बाबा मुक्त असतो. याच पैशाच्या आधारे
तो वृत्तपत्रे आणि गुंड यांना विकत घेतो. बाबांचा माहोल उभा राहू लागला, लोकांच्या झुंडी बाबाच्याकडे वळू लागल्या
की, पुढारी मंडळी आपोआप बाबांच्याकडे
येतातच. त्यांचा संबंध मूल्यांशी नसतो. बाबाचा प्रभाव आपली काही टक्के मते टिकवेल वा
वाढवेल, असे त्यांना वाटत असते.
काही वेळा तर हे पुढारी सरळसरळ अंधश्रद्धच असतात. संरक्षणाची एवढी कवचकुंडले कमी वाटतात
म्हणून की काय, आणखी
धर्माचे कवचकुंडल वापरले जाते. बुवाबाजीविरुद्ध संघर्ष सुरू केला की, काही वेळेला बाबा अथवा त्याचे चेले कुजबूज
अथवा प्रच्छन्नपणे मोहीम सुरू करतात की, ‘पाहा यांची लढाई खरेतर आमच्याविरोधी नाहीच; त्यांना हिंदू धर्मच बुडवायचा आहे.’ हेही पुरे पडले नाही, तर मग बाबाची जात आणि त्याच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची
जात, याचा शोध घेतला जातो.
अर्थ एवढाच की, एखादी
बुवाबाजी ज्यावेळी भरभराटीला येते, त्यावेळेला
या सर्व व्यवहारात त्यांची मुळे रूतलेली असतात. धर्मभास्कर वाघ असोत अथवा नरेंद्र
महाराज, निर्मला मातादेवी असो
किंवा सत्यसाईबाबा; त्या-त्या
पातळीचा विचार करता या सगळ्यांकडे पैसा स्तीमित करणारा असतो. विकत गेलेली वृत्तपत्रे
व दृक्श्राव्य माध्यमे त्यांचा ठरवून उदोउदो करत असतात. कोणी विरोध करण्याचा प्रयत्न
केला, तर त्यांचे अध्यात्मिक
बुरखे टराटरा फाटतात. धर्मभास्कर वाघांनी ‘टिळे संप्रदाय’ या नावाने मारहाण करणारे
गुंडच बाळगले होते. नरेंद्र महाराजांच्या गुंडांनी ‘चित्रलेखा’च्या वार्ताहराला बेदम मारहाण केली. निर्मलामातेच्या भक्तांचा प्रसाद
तर आमच्या समितीच्याच अनेक कार्यकर्त्यांनी घेतला. सत्यसाईबाबावर हल्ला करणारे त्यांचेच
चार भक्त खोलीत कुलूपबंद झाले असतानाही त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून त्यांची
बोलती कायमची बंद करण्यात आली. सर्व जगात आश्रय न मिळाल्याने रजनीश अखेर भारतात परतले.
त्यांच्या पुण्याच्या पूर्वीच्या आश्रमात बेकायदेशीररित्या येऊन थडकले. त्यावेळच्या
पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर रात्री एक वाजता ताबडतोब हद्दपारीची नोटीस
बजावली. रात्री दोन वाजता वकील जेठमलानी यांनी फोन करून हायकोर्टाने या आदेशाला तातडीने
रात्रीच स्थगिती दिल्याचे सांगितले. बाबांचे हात कसे आणि कुठपर्यंत पोचलेले असतात,
हे स्पष्ट करणारा हा किस्सा पोलीस आयुक्त
भास्करराव मिसर यांनीच आमच्या दिवाळी अंकात लिहिला आहे.
प्रत्येक बाबाला धर्मग्रंथ आणि अध्यात्म याचे ज्ञान नसले तरी चालेल;
पण व्यवहारज्ञान व धूर्तपणा असावाच लागतो.
कोणत्याही बाबाचा तपास चालू झाला तर हा धूर्तपणा लगेच समजतो. कोणताही बाबा बहुधा कशावरही
सही करत नाही. लेखी काहीही देत नाही. बुवांच्या संस्थानांचे कोट्यवधी रुपयांचे ट्रस्ट
असतात. अनेक आर्थिक व्यवहार असतात. त्या बाबाच्या शब्दावाचून तेथील पान हलत नाही.
मात्र त्या सर्वांमध्ये हे बुवा, बाबा
कोठेही नसतात. विश्वस्तच नसतात तर आर्थिक व्यवहारात, सहीत अडकवण्याचा प्रश्नच येत नाही. यामुळे
सर्व काही करूनही ते नामानिराळे राहतात. निरिच्छ म्हणून स्वत:ला मिरवतात.
बाबांचा बोलबाला होण्यासाठी त्यांची भाकिते
खरी ठरावीच लागतात. त्याशिवाय बाबा त्रिकालदर्शी कसे ठरणार? बाबांच्या खऱ्या ठरलेल्या भाकितांचा डंका
सतत वाजवला जातो आणि फसलेल्या भाकितांबद्दल सोयीस्कर मौन पाळले जाते. संभाव्यतेचा साधा
सिद्धांत लक्षात घेतला तर बाबाच्या अचूक भाकीत करण्याच्या दैवी सामर्थ्याचा पाया किती
तकलादू आहे हे लक्षात येते. मुलगा होईल की मुलगी? लग्न जुळेल की नाही? निवडून येईल का पडेल? या स्वरुपाचे प्रश्न घेऊन बाबांकडे भक्त
जात असतात. अशा प्रश्नांच्या उत्तरात ५० टक्के उत्तरे बरोबर येण्याची शक्यता ‘लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी’प्रमाणे असतेच. मात्र
बरोबर आलेल्या भाकितांचा उदोउदो होतो आणि चुकलेली भाकिते संबंधितांच्या नशिबाचा
मामला ठरतो.
बुवाबाजी म्हटले तर बिनभांडवली धंदा आहे,
हे खरे; पण काही अनुकुलता हा धंदा अधिक उत्तम चालवतात. प्रभावी व्यक्तिमत्त्व,
धर्म, तत्त्वज्ञान, योग, सेक्स अशा विषयांवर लोकांना नाविन्यपूर्ण
वाटेल व आवडेल, असे
बोलणे, हिंदी आणि इंग्लिशवर प्रभुत्व,
या बाबी बाबांचा प्रभाव वाढवणाऱ्या ठरतात.
रजनीश हे याबाबत आदर्श ठरावेत. त्यांचे हिंदी व इंग्लिश विलक्षण प्रभावी आणि प्रवाही
होते. वाचन विपुल होते. आधुनिक वेशभूषेचा वापर आणि अत्यंत ऐश्वर्याची राहणी या सर्वांतून
आपले वलय त्यांनी उभे केले. अशा गोष्टींना गूढता अथवा चमत्काराची अफवा यांचीही जोड
दिलेली असते. रजनीशांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील हा उल्लेख बघा,
‘परमोच्च ज्ञानप्राप्तीसाठी मागच्या जन्मात
वयाच्या १०६ व्या वर्षी त्यांनी २१ दिवसांचा उपवास सुरू केला. परंतु १८ व्या दिवशी
त्यांचा खून झाला. उपवासाचे तीन दिवस बाकी राहिले. त्यामुळे या जन्मात जन्म झाल्यावर पहिले तीन दिवस
त्यांनी काहीही घेतले नाही.’ अशा अद्भुत सुरस, चमत्कारिक गूढ गोष्टी नावारूपाला आलेला अथवा
येऊ लागलेला कुठलाही बाबा, बुवा
जरा तपासायला घ्या, की
त्याने संधिवातामुळे गुडघे न हलविताही येणारी बाई कशी बरी केली आणि तिने टुणकन् कशी
उडी मारली, या स्वरुपाच्या कथा सतत
ऐकावयास येतात, पुस्तकात
लिहिलेल्या आढळतात; परंतु
प्रत्यक्षात मात्र तपास केला तर व्यक्ती कधीच सापडत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा