वारकरी संप्रदाय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वारकरी संप्रदाय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

सामाजिक समतेचे मन्वंतर घडविणारी वारी




सामाजिक समतेचे मन्वंतर घडविणारी वारी
दाभोलकर, वारकरी संप्रदाय, समता, जाती निर्मूलन
वारीला काही शतकांची परंपरा आहे. वारीच्या माध्यमातून विराट जनसमुदाय संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला पायी चालत निघतो. दरवर्षी त्यात भर पडते आहे. तरुणांची, महिलांची संख्या लक्षणीय वाढते आहे. अशा सामाजिक शक्ती अधिकाधिक विधायकतेकडे कशा वळतील, याचे चिंतन सर्व समाजालाच पुढे नेणारे ठरेल.

लक्षावधी लोकांनी तीन आठवडे अडचणी सोसत, पावसा-पाण्यात भिजत, कामधाम सोडून असे चालण्याने काय साधते?’ हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना परंपरा आणि आधुनिकता या दोन्हीचे सामर्थ्य कळलेले नाही. कोणतीही अपेक्षा न धरता, नवस फेडण्याचा कसलाही संबंध नसताना, सश्रद्धेने लक्षावधींचा जनसमूह एक विशिष्ट प्रकारची वागणूक करतो, त्यावेळी ती त्याची जीवन जगण्याची रीत आहे. म्हणून समजून घ्यावयास लागते. आधुनिक पद्धतीने विचार केला तरी प्रत्येकाला आपल्या जीवनात काही बाबी प्राधान्यक्रमाच्या वाटतात. कोणासाठी ते गिर्यारोहण असेल, आणखी कोणासाठी ते वनभ्रमण असेल; तर आणखी कोणाला संगीताची मैफील अथवा चित्रकलेचे संग्रहालय पाहण्यात ब्रह्मानंद लाभेल. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्याकडील श्रम, वेळ, पैसा यांची शक्यतेनुसार गुंतवणूक करत असते. व्यक्तीला असलेल्या या स्वातंत्र्याचा आदरच करावयास हवा. मोठ्या संख्येने ज्यावेळी जनसमुदाय बाहेर पडतो, त्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतातच. शारीरिक विधीमुळे स्वच्छतेचे काही प्रश्न येत असणार; परंतु नव्या कल्पनांचा, वापर करून जनता, शासन, उद्योगसमूह यांच्यामार्फत ते सोडवणे सहज शक्य आहे; परंतु खरा मुद्दा यापेक्षा वेगळाच आहे.

संत नामदेवांनी या संप्रदायाची सुरुवात केली. वारकरी संप्रदायात जात, धर्म, शुद्र आदी भेदाभेद मनात नाहीत. या अर्थाने वारकरी संप्रदायाचे वर्तन हे अध्यात्मिकतेच्या अंगाने जाणारे क्रांतिकारी आहे. अध्यात्म या शब्दाच्या घटापटादी चर्चेत मी जात नाही. माझ्या मते, खरी अध्यात्मिकता असे मानते, की भौतिक सुखाच्या पलिकडे जीवनाचे एक श्रेयस आहे आणि ते भौतिक सुखापेक्षा अनंतपटीने मोलाचे आहे. ही जाणीव अंतरंगात उमटलेली व्यक्ती संयमी, सदाचारी असते. ती करुणेने मानवसन्मुख कृती करते. या मार्गावरून जाण्याच्या साधनेचा प्रारंभ वारीच्या मार्गावरून चालण्याने होतो, असे अनेक वारकऱ्यांना वाटते. उत्तम खाणे, निवास, विश्रांती, सर्व सुविधा या सर्व भौतिक सुखाच्या बाबी आहेत. याउलट वारीच्या काळात वारकरी रोज २०-२० किलोमीटर चालतो. प्रवासातील भोजन, निवास, पावसाने झोडपणे, चिखल तुडवणे हे सारे आनंदाने स्वीकारतो, यामागची भावना समजून घ्यावयास हवी. वारकरी (बहुतेक) माळ धारण करतात. एका अर्थाने व्रतस्थ होतात. मांसभक्षण, धूम्रपान, पेयपान, दुर्व्यवहार आपोआप वर्ज्य होतात. ज्या गोष्टी करावयाच्या त्यामध्ये नामस्मरण, पंढरीची वारी, भगवद्भक्ती, पुण्यकर्म, शुद्ध आचार यांचा समावेश होतो. वारी शक्यतो पायीच केली जाते. वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांतीची प्रस्थापना, मानवतेची समानता हा असतो.

पंढरपूरची वारी ही अंधश्रद्धा असेल तर त्याला विरोध का करत नाही व जर ही श्रद्धा असेल तर त्यात पुरोगामी खुल्या दिलाने सामील का होत नाहीत, असा प्रश्न विचारला जातो. श्रद्धा म्हणजे काय, हा एक बहुचर्चित प्रश्न आहे. १९ व्या शतकातील अव्वल धर्म प्रबोधनकार न्या. रानडे यांनी उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकबुद्धी अशी श्रद्धेची एक समर्पक व्याख्या केली आहे. त्यातील उत्कटपणा आणि कृतिशीलता या दोन्ही बाबी वारकऱ्यांमध्ये पुरेपूर दिसून येतात. त्याशिवाय कोणीही न बोलवता स्वखर्चाने एवढा मोठा जनसमूह शांतपणे येत राहिला नसता. या व्याख्येतील तिसरा शब्द फार महत्त्वाचा आहे. माणसाचे मूल्यविवेक उन्नत करते, ती श्रद्धा असते आणि अवनत करते, ती अंधश्रद्धा असते.

वारकरी संप्रदायाशी संबंधित दोन मूल्य, विवेकाच्या बाबी तरी आज महाराष्ट्राच्या समाजजीवनात ऐरणीवर आहेत. मद्यमुक्तीबाबत वारकरी आग्रही असतात. गळ्यात वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली तुळशीची माळ घातली की, तिच्या प्रभावाने व्यसनी व्यक्तीसुद्धा व्यसनमुक्त होते, असा त्या माळेचा दरारा आहे. मात्र आज महाराष्ट्रात याबाबत काय स्थिती आहे? विकासासाठी अधिकाधिक पैसा कररुपाने गोळा करण्याच्या मोहापोटी राज्य शासन मद्यवर्धक धोरण राबवत आहे. दुसऱ्या बाजूला व्यसन हा लोकांचा जीवन आनंदाने जगण्याचा मार्ग आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क बनला आहे. राज्य शासनाला मद्यविक्रीच्या करापासून मिळणारे उत्पन्न गेल्या वर्षात २५० कोटीवरून २,६०० कोटी रुपयांपर्यंत म्हणजे दहापटीने वाढले. वारी हा सज्जन शक्तीच्या स्रोतांचा आविष्कार बनू शकतो. या शक्तीने भूमिका घेतल्यास शासनाला काही प्रमाणात जाग येईल आणि दुसरीकडे लोकांना जीवन आनंदाने जगण्यासाठी मद्यसेवनातील व्यर्थता आणि धोकादायकपणा कळू शकेल. याहीपेक्षा मोठे आव्हान आहे, ते समतेचे. वारकरी संप्रदायाचा पायाच क्रांतिकारी आहे. समतेकडे घेऊन जाणारा हा संप्रदाय आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाची मांडणी जातिअंताच्या दिशेने जाणारी आहे. वारकरी संप्रदाय निर्माण झाला, त्याकाळी समाजात जाती, उपजाती यांचा कमालीचा बुजबुजाट झाला होता. बाह्यांगाच्या खुणांपासून ते जीवनाच्या सर्व व्यवहारात दुसऱ्यापासून वेगळे आणि श्रेष्ठ असल्याचे दाखवणारा अट्टाहास समाजात चालू होता. अशा वेळी वारकरी संप्रदायाने समतेचा विचार मांडला आणि आचरला. ज्याच्या कपाळी टिळा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जो चुरमुरे-बत्ताशे यांचा गोपालकाला सर्वांसमवेत आनंदाने घेतो, तो जाती-धर्माने कोण आहे, याची क्षुद्र चौकशी न करता वारीची वाटचाल चालू झाली.
वैष्णव ते जन। वैष्णवाचा धर्म।। भेदाभेद भ्रम। अमंगळ।।
ही वारकरी संप्रदायाची प्रतिज्ञा होती. आजही वारीतले सगळे वारकरी एकमेकाला ‘माऊली’ म्हणून संबोधतात. जात-धर्म यांचा विचार न करता समोरच्या माऊलीच्या पायावर नतमस्तक होतात.

मात्र चंद्रभागेच्या तीरावर उभा राहिलेला हा समतासंगर गावोगावच्या सीमा ओलांडून गावातील जाती-पातीचे गडकोट उद्ध्वस्त करण्याइतका अजून प्रभावी ठरलेला नाही. सामाजिक समतेच्या चळवळीत असे भान आर्य समाजाने दाखविले आहे. आर्य समाजाच्या मांडणीबाबत मतभिन्नता संभवते. मात्र जाती निर्मूलनाबाबत आर्य समाजाने एके काळी प्रबोधन आणि चळवळ जोरदारपणे चालवली होती. ज्या वेळी सहभोजने हा जाती निर्मूलनाचा प्रभावी उपक्रम होता, त्यावेळी विविध जातींच्या लोकांची सहभोजने हजारो नव्हे, लक्षावधी आर्य समाजाने घडविली होती. मराठवाड्यात आर्य समाजाचा काही भागात अधिक प्रभाव होता. त्या भागात अनेक व्यक्तींच्या आई-वडिलांचे विवाह हे ५०-६० वर्षांपूर्वी आंतरजातीय झाले होते, असे लक्षात येते. महाराष्ट्रात सामाजिक समतेचा प्रश्न हा ऐरणीवरचा आहे. एका जातीची व्यक्ती ही दुसऱ्या जातीच्या व्यक्तीपेक्षा उच्च किंवा नीच आहे, असे जातिव्यवस्थेची मानसिकता म्हणते. ही एक निखालस आणि जीवघेणी अंधश्रद्धा आहे. आधुनिक विज्ञान असे सांगते की, जगातल्या सर्व मानवांचा जीनोम पॅटर्न ९९.९७ एकच आहे. मात्र या वैज्ञानिक सत्याला पुरून उच्च-नीचतेची जातीची भावना टणकपणे उरली आहे. सावरकरांची सहभोजने, एक गाव-एक पाणवठा चळवळ, साने गुरुजींचे उपोषण, संविधानातील तरतुदी, शासनाचे प्रयत्न या सर्वांमधूनही जातीची मानसिकता बदलण्यात यश आलेले नाही. जात ही व्यवस्था म्हणून एक भौतिक रचनाही आहे आणि या व्यवस्थेतून निर्माण झालेल्या विषमतेवर भौतिक उपाययोजनांची गरजही आहे. मात्र याबरोबरच जन्माधिष्ठित उच्च-नीचता ही एक मानसिकताही आहे; अन्यथा अजूनही जातवार वस्त्या दिसल्या नसत्या. भूकंपाने उद्ध्वस्त झालेले गाव पुन्हा बांधताना जातवार वस्त्यांचे आग्रह धरले गेले नसते. आंतरजातीय विवाहाला आजही ज्या प्रमाणात व ज्या प्रकारे विरोध होतो, तो या बाबतीतील सामाजिक चळवळींचे अपयश आणि जातिव्यवस्थेचे जहर किती जालीम आहे, याचे दर्शन घडवतो. हे आव्हान बिकट आहे आणि तरीही स्वीकारणे अत्यावश्यक आहे -
जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत।
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत।।
ही वारकरी संप्रदायाची मनोभूमिका आहे. सगळे जग मानवातील कृत्रिम बंधने गळून पडण्याची वा पाडण्याची स्वप्ने पाहत आहे. अशा वेळी सामाजिक समतेचे मन्वंतर घडविण्याचे वारकरी संप्रदायाने मनावर घेतले, तर एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राला ती मोठीच भेट ठरेल.


अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००७)




रविवार, २४ डिसेंबर, २०१७

वारकऱ्यांशी शत्रुत्व कशासाठी?




वारकऱ्यांशी शत्रुत्व कशासाठी?
दाभोलकर, वारकरी संप्रदाय, वैचारिक वाद, मिथक, धर्मांधता
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे आणि यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व संत तुकारामांचे नामवंत अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्यामधील वाद हा वृत्तपत्रांतून गाजला आहेच आणि आपल्या वार्तापत्राच्या वाचकांच्या मनातही त्याचे साद-पडसाद उमटले असणार, उमटतही असणार. या विषयावर डॉ. बाबा आढाव, पुष्पाताई भावे, राम बापट, डॉ. श्रीराम लागू, गोविंद पानसरे, सुनील देशमुख (अमेरिका) यांच्याबरोबर आणि दस्तूरखुद्द लेखकांच्या बरोबर वेगवेगळ्या निमित्ताने चर्चा करण्याची संधी मिळाली. या सर्वांच्या चर्चेमधून जे मुद्दे पुढे आले, ते विचारमंथनासाठी वाचकांच्या समोर मांडत आहे. यातील कोणते विचार कोणाचे आहेत, हे मुद्दामहून लिहिलेले नाही. कारण या लेखनाचे ते प्रयोजन नाही, तर एखाद्या वैचारिक वादाकडे किती विविध बाजूने पाहता येते व किती विविध अवधाने सांभाळून पाहावे लागते, याची काहीशी कल्पना वाचकांना यावी आणि आपल्या मनात यापैकी कोणते विचार येऊन गेले, याचा त्याने सहज पडताळा घ्यावा व यासाठी हे लिहिले आहे.
१)    अशा चर्चा करताना दोन्ही लेखकांची संत तुकारामांवरील पुस्तके नीटपणे वाचून गांभीर्याने त्यावर चर्चा व्हावयास हवी.
२)    डॉ. साळुंखे व डॉ. मोरे हे दोघेही संत तुकारामांच्या जीवनकार्याबद्दल बोलतात. तुकारामांचे सदेह वैकुंठगमन वा तुकारामांचा झालेला खून हा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचा भाग नसतो.
३)    तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, ही गोष्ट अशक्य आहे आणि त्यांचा खूनच झाला, या कल्पनेस तर्कापलिकडचा प्रत्यक्ष पुरावा मिळणे, हे देखील शक्य दिसत नाही. या मर्यादा लक्षात घ्यावयास हव्यात. तसेच वैचारिक वाद खेळताना त्यात वैचारिकता असावी, कटुता नसावी, याचे भान सदैव राखले जावे. वाद कितीही अप्रिय वाटले तरी वैचारिक स्पष्टता करून घेण्यासाठी आवश्यक असल्याने ते टाळता कामा नयेत. मात्र त्यांना चुकूनही जातीय स्वरूप येणार नाही, याची काळजी घ्यावी.
४)    वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर मिथके टिकत नाहीत; परंतु मिथकांच्या       मध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अन्वयार्थ असतो. येशू ख्रिस्ताचा अयोनी जन्म, तुकारामांचे सदेह वैकुंठाला जाणे ही अशा प्रकारची मिथके आहेत. वेगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून मिथकांच्याकडे बघणारा माणूस पुरोगामी नसतो, असे नव्हे.
५)    प्रत्येक वास्तवाकडे बघण्याचा एक ऐतिहासिक दृष्टिकोन असतो. काशी - मथुरा येथील मंदिरे मुसलमान राजांनी पाडली व त्याठिकाणी मशिदी उभारल्या, हे सत्य आहे. तरीही ही घटना त्या काळातल्या वास्तवात समजून घ्यावयास लागते. त्या घटनेचा प्रतिवाद म्हणून आज तेथील  मशिदी पाडून न्याय करणे योग्य ठरत नाही. उलट १९४७ साली स्वातंत्र्य मिळताना धर्मस्थळांची जी स्थिती होती, ती तशीच ठेवण्याचा निर्णय योग्य मानावा लागतो. या ऐतिहासिक पद्धतीनेच ऐतिहासिक वादाचे मूल्यमापन करावयास हवे.
६)    हिंदुत्ववादी धर्मांधाचा वाढता धोका ओळखावयास हवा. अशा वेळी समविचारी मंडळींची मतभिन्नता ही वैचारिक वादापलिकडे पोचली, तर त्याचा फायदा घेण्यासाठी प्रतिगामी शक्ती टपूनच बसल्या आहेत. त्यामुळे आपापसातील छोट्या मतभेदांचा मोठा फायदा प्रतिगाम्यांना करून देण्याची पुरोगाम्यांची चूक नकळतही घडता कामा नये. वारकरी पंथ आहे. त्यांच्या मनात तुकोबांच्याबद्दल विलक्षण जवळीक आहे. त्यांच्या भावना तुकोबांच्या बुद्धीच्या पलिकडे जाऊन गुंतलेल्या आहेत. तुकोबांच्या जीवनाचा वेगळा अर्थ सांगण्याचा पुरोगाम्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे होणारा प्रक्षोभही ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यासाठी धैर्याने पचवू शकतील. परंतु यामुळे प्रतिगामी मंडळींच्या हातात आयतेच कोलीत मिळेल व ते पुरोगामी लोक हे सश्रद्ध वारकऱ्यांचे कसे शत्रू आहेत, याचे एक चित्र जाणीवपूर्वक उभे करतील. एका मोठ्या जनसमुदायाला पुरोगामी चळवळीच्या विरोधात उभे करण्याचा व्यापक तोटा. या सर्व घडामोडी लक्षात घ्यावयास हव्यात.
७)    वारकरी संप्रदायाच्या गुणावगुणाचे, सामर्थ्य व मर्यादांची ऐतिहासिक भूमिकेतून व आजच्या वास्तवातून खुली चर्चा होणे उपकारक आहे. या प्रयत्नाला वारकरी पंथातील अनेकांचे सहकार्यही लाभू शकेल; मात्र ही भूमिका आस्थेवाईक असावी; अभिनिवेशी नसावी.
८)    ब्राह्मणेतर जातीयवादी हा धोकाही ओळखावयास हवा. त्याबद्दल बोलण्याची हिंमत हवी, तसेच शोषितांच्या मधील अंतर्गत शोषणही मांडावयास हवे. जातिव्यवस्थेचा द्वेष म्हणजे जातीचा द्वेष नव्हे.               
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९९)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...