रविवार, २४ डिसेंबर, २०१७

वारकऱ्यांशी शत्रुत्व कशासाठी?




वारकऱ्यांशी शत्रुत्व कशासाठी?
दाभोलकर, वारकरी संप्रदाय, वैचारिक वाद, मिथक, धर्मांधता
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे आणि यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व संत तुकारामांचे नामवंत अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्यामधील वाद हा वृत्तपत्रांतून गाजला आहेच आणि आपल्या वार्तापत्राच्या वाचकांच्या मनातही त्याचे साद-पडसाद उमटले असणार, उमटतही असणार. या विषयावर डॉ. बाबा आढाव, पुष्पाताई भावे, राम बापट, डॉ. श्रीराम लागू, गोविंद पानसरे, सुनील देशमुख (अमेरिका) यांच्याबरोबर आणि दस्तूरखुद्द लेखकांच्या बरोबर वेगवेगळ्या निमित्ताने चर्चा करण्याची संधी मिळाली. या सर्वांच्या चर्चेमधून जे मुद्दे पुढे आले, ते विचारमंथनासाठी वाचकांच्या समोर मांडत आहे. यातील कोणते विचार कोणाचे आहेत, हे मुद्दामहून लिहिलेले नाही. कारण या लेखनाचे ते प्रयोजन नाही, तर एखाद्या वैचारिक वादाकडे किती विविध बाजूने पाहता येते व किती विविध अवधाने सांभाळून पाहावे लागते, याची काहीशी कल्पना वाचकांना यावी आणि आपल्या मनात यापैकी कोणते विचार येऊन गेले, याचा त्याने सहज पडताळा घ्यावा व यासाठी हे लिहिले आहे.
१)    अशा चर्चा करताना दोन्ही लेखकांची संत तुकारामांवरील पुस्तके नीटपणे वाचून गांभीर्याने त्यावर चर्चा व्हावयास हवी.
२)    डॉ. साळुंखे व डॉ. मोरे हे दोघेही संत तुकारामांच्या जीवनकार्याबद्दल बोलतात. तुकारामांचे सदेह वैकुंठगमन वा तुकारामांचा झालेला खून हा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचा भाग नसतो.
३)    तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, ही गोष्ट अशक्य आहे आणि त्यांचा खूनच झाला, या कल्पनेस तर्कापलिकडचा प्रत्यक्ष पुरावा मिळणे, हे देखील शक्य दिसत नाही. या मर्यादा लक्षात घ्यावयास हव्यात. तसेच वैचारिक वाद खेळताना त्यात वैचारिकता असावी, कटुता नसावी, याचे भान सदैव राखले जावे. वाद कितीही अप्रिय वाटले तरी वैचारिक स्पष्टता करून घेण्यासाठी आवश्यक असल्याने ते टाळता कामा नयेत. मात्र त्यांना चुकूनही जातीय स्वरूप येणार नाही, याची काळजी घ्यावी.
४)    वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर मिथके टिकत नाहीत; परंतु मिथकांच्या       मध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अन्वयार्थ असतो. येशू ख्रिस्ताचा अयोनी जन्म, तुकारामांचे सदेह वैकुंठाला जाणे ही अशा प्रकारची मिथके आहेत. वेगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून मिथकांच्याकडे बघणारा माणूस पुरोगामी नसतो, असे नव्हे.
५)    प्रत्येक वास्तवाकडे बघण्याचा एक ऐतिहासिक दृष्टिकोन असतो. काशी - मथुरा येथील मंदिरे मुसलमान राजांनी पाडली व त्याठिकाणी मशिदी उभारल्या, हे सत्य आहे. तरीही ही घटना त्या काळातल्या वास्तवात समजून घ्यावयास लागते. त्या घटनेचा प्रतिवाद म्हणून आज तेथील  मशिदी पाडून न्याय करणे योग्य ठरत नाही. उलट १९४७ साली स्वातंत्र्य मिळताना धर्मस्थळांची जी स्थिती होती, ती तशीच ठेवण्याचा निर्णय योग्य मानावा लागतो. या ऐतिहासिक पद्धतीनेच ऐतिहासिक वादाचे मूल्यमापन करावयास हवे.
६)    हिंदुत्ववादी धर्मांधाचा वाढता धोका ओळखावयास हवा. अशा वेळी समविचारी मंडळींची मतभिन्नता ही वैचारिक वादापलिकडे पोचली, तर त्याचा फायदा घेण्यासाठी प्रतिगामी शक्ती टपूनच बसल्या आहेत. त्यामुळे आपापसातील छोट्या मतभेदांचा मोठा फायदा प्रतिगाम्यांना करून देण्याची पुरोगाम्यांची चूक नकळतही घडता कामा नये. वारकरी पंथ आहे. त्यांच्या मनात तुकोबांच्याबद्दल विलक्षण जवळीक आहे. त्यांच्या भावना तुकोबांच्या बुद्धीच्या पलिकडे जाऊन गुंतलेल्या आहेत. तुकोबांच्या जीवनाचा वेगळा अर्थ सांगण्याचा पुरोगाम्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे होणारा प्रक्षोभही ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यासाठी धैर्याने पचवू शकतील. परंतु यामुळे प्रतिगामी मंडळींच्या हातात आयतेच कोलीत मिळेल व ते पुरोगामी लोक हे सश्रद्ध वारकऱ्यांचे कसे शत्रू आहेत, याचे एक चित्र जाणीवपूर्वक उभे करतील. एका मोठ्या जनसमुदायाला पुरोगामी चळवळीच्या विरोधात उभे करण्याचा व्यापक तोटा. या सर्व घडामोडी लक्षात घ्यावयास हव्यात.
७)    वारकरी संप्रदायाच्या गुणावगुणाचे, सामर्थ्य व मर्यादांची ऐतिहासिक भूमिकेतून व आजच्या वास्तवातून खुली चर्चा होणे उपकारक आहे. या प्रयत्नाला वारकरी पंथातील अनेकांचे सहकार्यही लाभू शकेल; मात्र ही भूमिका आस्थेवाईक असावी; अभिनिवेशी नसावी.
८)    ब्राह्मणेतर जातीयवादी हा धोकाही ओळखावयास हवा. त्याबद्दल बोलण्याची हिंमत हवी, तसेच शोषितांच्या मधील अंतर्गत शोषणही मांडावयास हवे. जातिव्यवस्थेचा द्वेष म्हणजे जातीचा द्वेष नव्हे.               
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९९)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...