यज्ञात
दोन लाख विटांचा वापर
दाभोलकर, यज्ञसंस्कृती, कर्मकांड, अन्नाचा विनाश, वैज्ञानिक दृष्टिकोन
समाजात धार्मिक वातावरण जाणीवपूर्वक सतत
जागते राहावे, असा प्रयत्न केला जात आहे. ही प्रक्रिया योजनाबद्ध पद्धतीने घडवली
जात असावी; अन्यथा एका पाठोपाठ एक असे यज्ञ महाराष्ट्रातच
झालेच नसते. मार्च महिन्यात नागपूरला एक मोठा अग्निस्तोम वाजपेय यज्ञ धुमधडाक्यात पार
पडला. त्यानंतर मे महिन्यात नांदेडला अश्वमेध यज्ञ मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा
झाला. त्या यज्ञाचा अश्व महाराष्ट्रात फिरून आला होता. अर्थात यज्ञ आधुनिक काळातील
असल्याने अश्वही चार चाकाच्या वाहनावर प्रतीक रूपाने बसवलेला असाच होता. या यज्ञाला
नांदेडच्या आपल्या शाखेने जोरदार विरोधही केला होता. गंगाखेड (जि. परभणी) येथे तर सध्या
सोमयाग महायज्ञ २८ मार्च १९९९ पासून पुढे सलग ३६६ दिवस चालणार आहे. अशा प्रकारचा महायज्ञ
महाभारत काळानंतर प्रथमच होत असल्याचा संयोजकांचा दावा आहे. या सर्वांमागे एका बाजूला
समाज; ज्यांना शहाणीसुरती समजतो ती माणसे आहेत, तर दुसरीकडे ज्या कष्टकरी बहुजन समाजाने हा दावा समजून घेण्याची
गरज आहे, त्यालाही याची भुरळ पडू लागली आहे. महाराष्ट्रातील
पुरोगामी चळवळीचा वारसा सतत सांगितला जातो. सत्यशोधकी चळवळ ही महाराष्ट्राची भूषण होती.
परंतु दुर्दैवाने या विरोधात कोणीही परखडपणे आवाज उठवत नाही. आंदोलने घडत नाहीत.
यज्ञाला विरोध केला की, विषय मुद्द्यावरून गुद्द्यावर
आणण्याचा ताबडतोब प्रयत्न केला जाईल. कारण प्रसंगी विश्वशांतीसाठी यज्ञ करत असल्याचा
दावा करणारी मंडळी नियंत्रक संघटनांच्याकडून इशारे आले की, धर्मावर हल्ला झाला, असा पुकारा करत लढाईला तयार होतात, असा अनुभव आहे. आपल्याला तर समाजाला नवा योग्य विचार देण्यात
आणि विचार करण्याची सवय लावण्यात रस आहे. म्हणून समितीने ‘यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती’ या विषयावर एक मोठी प्रबोधन
परिषद ता. ८ जुलै रोजी गंगाखेड येथे आयोजित केली आहे.
यज्ञ हे धर्माचे प्राथमिक अवस्थेतील रूप
आहे. यातुकल्पनेवर आधारित असे कर्मकांड आहे. आदिम मानवाच्या धर्मकल्पना यातुनिर्भर
होत्या. परंतु आता धर्मकल्पनेचाही कितीतरी विकास मानवी जीवनात झाला आहे. या विकसित समाजाला आवश्यक असणाऱ्या नैतिकतेवर
आधारलेल्या उन्नत स्वरुपातील धर्माशी यज्ञाचे काही देणेघेणे नाही. यामुळे यज्ञयागाच्या
वातावरणातून समाजाचे पाऊल पुढे पडण्याच्या दृष्टीने वाटचाल होत नाही.
भारतीय घटनेत नागरिकांच्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे.
त्यातील एक कर्तव्य वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे आहे. शैक्षणिक धोरणात देखील वैज्ञानिक
मनोभावाची निर्मिती याचा मूल्य म्हणून समावेश झाला आहे. यज्ञाच्यामुळे पर्जन्यवृष्टी
होते, संततीप्राप्ती होते. पुत्रकामेष्ठी यज्ञ
केला तर मुलगाच होतो, हे सर्व उघडपणे वैज्ञानिक दृष्टिकोनविरोधी
आहे. यज्ञात होणारी अन्नधान्याची नासाडी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नांदेड
येथील यज्ञात दोन लाख विटा वापरून १००८ कुंड तयार करण्यात आले. त्यामध्ये ८० टन लाकूड, १४ हजार किलो तूप, १६ पोती अन्नधान्य, ४ पोती जवस,
८ पोती तीळ, २० पोती साखर,
५० किलो मध एवढ्या अन्नाचा
विनाश करण्यात आला. लाखो लोक बेघर असताना दोन लाख विटा यज्ञकुंडासाठी वापरणे हा धर्म
नाही. देशातील ४० कोटी जनता अर्धपोटी असताना अन्नधान्याची होळी करणे हा अधर्म आहे.
या देशातील माणसाला तूप आणि मध खायला तर सोडाच; बघायलाही मिळणे अवघड आहे, त्या देशात या गोष्टी यज्ञाच्या नावाने जाळणे कितपत योग्य? लाकूड, तूप व अन्नधान्य जाळल्याने पर्यावरण शुद्ध
न होता प्रदूषणच वाढणार आहे, हे शाळेतील मुलगाही सांगू शकेल. यज्ञ केल्यामुळे
देशातील दारिद्र्य, विषमता संपून जाईल आणि देश समृद्ध बनेल, सर्वत्र शांती नांदेल, याला काडीचाही आधार नाही, हे विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाच्या लक्षात येईल. यामुळे यज्ञ
ही गोष्ट कालबाह्य समजून नाकारावयास हवी.
दुर्दैवाने आपल्या देशात जी विषम व्यवस्था
आहे, त्यांनी शोषण व्यवस्थांच्या प्रतीकांना पावित्र्य
बहाल केले आहे.
प्रतीकात शोषण नसले तरी परंपरेच्या आधारे शोषण करणारी व्यवस्थाच त्या प्रतीकातून जपली
जाते. स्त्रियांना, क्षुद्रांना यज्ञ कर्मकांडात समान अधिकार
नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. नांदेडच्या यज्ञात
देशभरातील १५०० ब्राह्मणांना बोलावून ७ दिवस रोज साजूक तुपातील अन्न पंगतीला वाढले
गेले. इतर जातीतील लोकांना का बरे बोलावले जाऊ नये? खरे तर भारताचे नागरिक
असलेल्या आणि आपले बांधव असलेल्या या देशातील कोट्यवधी अर्धपोटी लोकांना जेवण दिले
गेले, तरच त्याला निदान गोरगरिबांना अन्न देणे, हाच श्रेष्ठ ‘अन्नयज्ञ’ म्हटले असते.
भारतात प्रस्थापित धर्मसंस्थेच्या विरोधात जे विचारमंथन झाले, ज्या चळवळी झाल्या, त्या सर्वांनी यज्ञ संस्कृती
नाकारली आहे. उपनिषदांनी यज्ञाला ‘फुटक्या नावा’ म्हटले आहे. महावीर गौतम बुद्ध यांनी यज्ञसंस्था कटाक्षाने नाकारली. बौद्ध धर्माची पीछेहाट
भारतात झाल्यावरच यज्ञसंस्कृतीने पुन्हा उचल खाल्ली, हे ऐतिहासिक सत्य आहे.
संतांचा भक्ती मार्ग हा यज्ञ-यागातील बंदिस्त चाकोरी नाकारण्यासाठी दिलेला पर्याय आहे.
विठ्ठलाचे नाव हाच जपयज्ञ मानणाऱ्या संतांनी नाव यज्ञाचे ठेवले; पण आशय बदलला. माणसाने आणि समाजाने समाजहित लक्षात घेऊन विवेकाने
जगावे, निर्भयतेने वागावे असे समितीला वाटते. या
यज्ञाबाबत होणाऱ्या प्रबोधन परिषदेत डॉ. आ. ह. साळुंखे, रूपा कुलकर्णी,
प्रा. एन. डी. पाटील, डॉ. श्रीराम लागू, निळूभाऊ फुले असे अनेकजण भाग घेणार आहेत. मात्र एका कार्यक्रमापुरता
त्याचा प्रभाव न राहता आपण सर्वांनी तो विचार शक्य तेवढा सर्वदूर पोचवावयास हवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा